Now Reading
दुर्गंध (आलवंदर मर्डर केस भाग २)

दुर्गंध (आलवंदर मर्डर केस भाग २)

Menaka Prakashan

त्या लोखंडी ट्रंकेचं झाकण उघडताच, आतलं दृश्य पाहून त्या छोट्याशा शहरातल्या साध्या लोकांना एक प्रचंड हादरा बसला. ते दृश्य होतंही तसं भयानकच! या केसचा दुसरा भाग.

‘आलवंदर आपल्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. तो फक्त आपल्यावरच प्रेम करतो’ या भ्रमात देवकी होती, पण एके दिवशी तिच्या भ्रमाचा भोपळा फुटला. ‘आपल्याव्यतिरिक्त इतरही बर्‍याच स्त्रिया आलवंदरच्या आयुष्यात येऊन गेलेल्या आहेत आणि भ्रमर वृत्तीचा आलवंदर काही दिवसांनी आपल्या सहवासाचा कंटाळा आल्यावर; आपल्यालाही ठोकरून आणखी तिसरीच्या मागे जाऊ शकतो,’ हे सत्य तिला समजलं आणि लवकरच तिला परिस्थितीचं भान आलं. ‘दोन मुलांचा बाप असलेला आलवंदर, एक कुटुंबवत्सल गृहस्थ असून, आपल्या पत्नीला दुखावून आपल्याशी द्वितीय विवाह करणं अजिबात शक्यच नाही!’ हे तिला उमजल्यावर; तिनं मनोमन जाणलं, की ‘आपल्या या प्रेमाला कसलंही भवितव्य नाही!’ हे जाणल्यावर ती नाराज झाली. तिला वाटलं, ‘आपल्याहून वयानं बर्‍याच मोठ्या असलेल्या, चाळिशीच्या आलवंदरनं आयुष्य उपभोगलं आहे. त्याला स्वतःचं कुटुंब आहे. तो आयुष्यात बर्‍यापैकी स्थिर झाला आहे. पण आपण मात्र किती झालं, तरी एकाकीच आहोत… अजूनही आपल्या जीवनात स्थैर्य नाही. आपण अधांतरीच आहोत!’ असं वाटल्यानं देवकी खंतावली. देवकीच्या अंधारलेल्या मनात अचानकपणे एक विचार चमकला, ‘आपण हे चोरटं प्रेमप्रकरण का थांबवू नये? आपल्यापुढे एक मोठं आयुष्य पडलेलं आहे! आपण तरुण आहोत आणि सुंदरही! याशिवाय पदवीधर व कमावत्याही आहोत, आपल्याला दुसरा कोणताही बर्‍यापैकी असणारा तरुण नक्कीच भेटू शकतो!’

या विचारानं देवकीचा चेहरा उजळला. आयुष्याचा झाला तेवढा खेळखंडोबा पुरे झाला! यापुढे त्या आलवंदरकडून आपण अजिबात काहीही विकत घ्यायचंच नाही. मग ती इम्पोर्टेड साडी असो वा इमिटेशन ज्वेलरी वा प्लॅॅस्टिकच्या वस्तू अथवा पेन… अगदी काहीही… मुळीच विकत घ्यायचं नाही! कोणत्याही परिस्थितीत, काहीही झालं तरी त्या दुकानात पाऊलही ठेवायचं नाही, असा तिनं ठाम निर्धार केला. मैत्रिणीकडून पैसे उधार घेऊन, तिनं त्याचे उरलेसुरले पैसे फेडले आणि त्याच्याशी असलेला संपर्कही तोडून टाकला.
हे देवकी प्रकरण आलवंदरने सुरवातीला फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. पण तिनं त्याच्यासोबत असलेला संपर्क तोडल्यावर, त्याला जरा हादरा बसला, कारण तोपर्यंत असं कधीच घडलेलं नव्हतं. एखाद्या स्त्रीचा कंटाळा आला, की, आलवंदरच तिला झटकून टाकत असे. त्यातच देवकी आपल्या ‘मेनन’ समाजातल्या एका होतकरू युवकाशी विवाहबद्ध होत असल्याची बातमी त्याच्या कानांवर आल्यावर तर त्याचा प्रचंड जळफळाटच झाला. पण तो उघडपणे काहीही करू शकत नव्हता, कारण त्यालाही संसार होता आणि मद्रासमधल्या आपल्या समाजात त्याला उजळ माथ्यानं वावरायचं होतं.

देवकी ज्या युवकाबरोबर विवाहबद्ध होणार होती तो उमदा युवक होता प्रभाकर मेनन! १९५२ च्या मे महिन्यामध्ये एका कार्यालयात त्याची आणि देवकीची अचानक गाठ पडली. त्या वेळी लिहिण्याची व पत्रकारितेची आवड असलेला प्रभाकर मेनन इन्शुरन्स ऑफिसर म्हणून काम करत होता. सुरवातीला एका कंपनीमध्ये कारकून म्हणून लागलेल्या प्रभाकरनं कामात उत्साह दाखवल्यावर, त्याला प्रमोशन मिळून तो अधिकारीही झाला व त्याला कंपनीतर्फे घर आणि कारही देण्यात आली. पण त्याचा पिंड पत्रकाराचा असल्यानं, त्याचं मन काही त्या कामात रमत नव्हतं. म्हणूनच त्याने लवकरच ती नोकरी सोडून दिली व स्थानिक वृत्तपत्रात तो संपादक म्हणून काम करू लागला. या नोकरीत आर्थिक लाभ जरी पूर्वीपेक्षा थोडा कमी असला, तरी प्रभाकर आपल्या कामामध्ये खूष होता आणि अशा रीतीने नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर त्यानं १९५२ च्या जून महिन्यामध्ये देवकीशी विवाह केला. विवाहानंतर त्यानं मूळ शहरापासून जरा दूर असलेल्या, पण खिशाला परवडेल अशा ठिकाणी, मद्रासच्या किनारपट्टीजवळ ‘रोयापुरम’ इथं भाड्यानं जागा घेतली. देवकीला घरकामात मदत करण्यासाठी म्हणून; पाणी भरण्यासाठी व स्वयंपाकात मदत, तसंच बाजारहाट करण्यासाठी प्रभाकरनं, गावाहून एक मुलगाही आणला होता. त्या मुलासह ते नवपरिणित जोडपं रोयापुरम इथं भाडेकरू म्हणून राहू लागलं.

देवकीच्या विवाहानंतर, आलवंदरनं एक-दोनदा देवकीशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला त्यात यश मिळालं नाही. देवकीनं त्याला जणू आपल्या आयुष्यातून उडवून, दूर झटकून टाकलं होतं. तिनं त्याच्या सहवासाच्या सार्‍या आठवणी आपल्या स्मृतीतून पुसून टाकल्या होत्या. (त्याला टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, चुकून तो रस्त्यात भेटल्यावर त्याच्याकडे अनोळखी नजरेनं पाहणारी देवकी, त्या दिवशी आपणहून त्याला भेटायला त्या दुकानात का व कशासाठी आली होती, हे एक रहस्यच बनलं होतं.)

देवकीच्या सुदैवाचा आणि सुखी संसाराचा मनातून हेवा करणारा आलवंदर, त्यांच्या सुखी संसारात बिब्बा घालण्यासाठी संधी शोधत होता आणि त्याला तशी संधी लवकर मिळालीही. एके दिवशी प्रभाकर मेनन आपल्या ‘फ्रीडम’ या वृत्तपत्रासाठी, देऊ केलेल्या जाहिरारातीविषयी बोलणी करायला म्हणून एम. सी. कन्नन चेट्टी यांना भेटायला ‘जेम अँड कंपनी’च्या त्या शोरूममध्ये आला, तेव्हा एम. सी. कन्नन चेट्टी बाहेर गेले होते. त्या वेळी आलवंदरनं तिथं कामासाठी आलेल्या प्रभाकरला ओळखलं आणि स्वतःहून पुढे येऊन, मोठ्या नाटकीपणे झुकून अभिवादन करत, त्यानं ‘मी आपल्यासाठी काय करू शकतो,’ असं विचारलं. नंतर गोड बोलून विचारपूस करताना, ‘प्रभाकरचं नुकतंच लग्न झालं आहे’ हे आपल्याला आत्ताच कळल्याचा आव आणत, त्यानं खोट्या आनंदानं व उल्हासपूर्ण आवाजात प्रभाकरचं अभिनंदन केलं आणि मैत्रीचा व मोठ्या उदारतेचा आविर्भाव चेहर्‍यावर आणत, आपल्या खिशाला लावलेलं महागडं इम्पोर्टेड पेन प्रभाकरच्या खिशाला अडकवत, तो म्हणाला, ‘ही माझ्याकडून लग्नानिमित्त अल्पशी भेट!’ या दिखाऊ सहृदयतेनं भारावलेल्या प्रभाकरला आलवंदरनं सांगितलं, की प्रभाकरच्या ‘फ्रीडम’ वृत्तपत्राला कायम जाहिराती मिळवून देण्याचं काम, त्याच्याकडे लागलं आहे. तो ‘जेम अँड कंपनी’च्या आणि इतरही दुकानांच्या जाहिराती ‘फ्रीडम’ वृत्तपत्रासाठी नियमितपणे आणून देऊ शकेल. फक्त त्याला त्यामधील काही रक्कम, कमिशन म्हणून दिली जावी एवढीच त्याची अपेक्षा आहे. अर्थातच आलवंदरनं घातलेली ही अट, प्रभाकरनं आनंदानं मान्य केली. त्यानंतर दोस्तीचा हात पुढे करत, हस्तांदोलन करताना आलवंदरनं त्याला अगदी सहज सुरात सांगितलं, पुढच्या वेळी येताना, आपल्या नूतन पत्नीलाही सोबत माझ्या दुकानात घेऊन ये, संसारोपयोगी अशा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करायला! आणि तसंच झालं. देवकी नको-नको म्हणत असतानाही, पुढच्या आठवड्यात प्रभाकर तिला घेऊन त्या ‘जेम अँड कंपनीच्या शोरूममध्ये असलेल्या आलवंदरच्या दुकानात आला आणि त्याच्या सुखी संसाराला ग्रहण लागायला सुरुवात झाली.
तिथं आपल्या पत्नीची- देवकीची- आलवंदरशी ओळख करून देताना, प्रभाकरला त्या दोघांच्या वागण्या-बोलण्यातून उमजलं, की हे दोघं जरी फारसे परिचित नसल्याचा दावा करत असले, तरी एकमेकांना चांगलेच ओळखत आहेत आणि तिथंच प्रभाकरच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं.

एके दिवशी प्रभाकरने, तो ऑफिसमध्ये कामात व्यग्र असल्यानं, आलवंदरचे जाहिराती मिळवून दिल्याबद्दलचे कमिशन म्हणून देय असलेले पैसे चुकते करण्यासाठी देवकीलाच हॉटेलवर पाठवलं, तेव्हा त्या हॉटेलमध्ये सर्वांच्या देखत आलवंदरनं देवकीचा विनयभंग करायला सुरवात केल्यावर, देवकी कसाबसा स्वतःचा जीव वाचवून तिथून निसटली आणि मग रागानं वेडापिसा झालेला आलवंदर देवकीला शिव्या घालत बसला. झालेला हा तमाशा अर्थातच प्रभाकरच्या कानांवर आल्यावर, त्याच्या मनात रुजलेल्या संशयाच्या रोपानं चांगलंच मूळ धरलं.
प्रभाकर व देवकी जोडीनं बाहेर निघाले असता, रस्त्यात चुकून गाठभेट झाल्यावर, आलवंदरनं देवकीला प्रभाकरच्या सोबत पाहून विनोदाच्या नावाखाली मारलेले कुजकट टोमणे व त्याचं तिरकस बोलणं ऐकल्यावर तर प्रभाकरच्या मनात रुजलेलं ते संशयाचं रोपटं चांगलंच फोफावलं.
२७ ऑगस्टला तर जोडीनं थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेलेल्या प्रभाकर आणि देवकीमध्ये आलवंदरच्या कुत्सित बोलण्यामुळे प्रथम वादविवाद झाला व नंतर भांडण सुरू झाल्यावर, आपल्या तार स्वरातल्या बोलण्यामुळे, सिनेमा बघण्यात गुंतलेल्या बाकीच्या प्रेक्षकांचं लक्ष आपल्या दोघांकडे वेधलं जात आहे; हे पाहिल्यावर ते दोघं वरमले आणि ते दोघं, तो सिनेमा तसाच अर्धवट टाकून घरी निघून गेले. घरी आल्यावर लग्नानंतर प्रथमच त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

आधी आलवंदरशी आपलं प्रेमप्रकरण असल्याचं नाकारणार्‍या देवकीनं, त्या दिवशी सारं काही प्रभाकरला सांगून टाकल्यावर, प्रभाकरला आपली फसवणूक झाल्यासारखं वाटून अतिशय दुःख झालं. त्यातून देवकीनं रडत रडत, ‘आलवंदर कितीही झिडकारलं तरीही, अजूनही आपल्याशी पूर्वीप्रमाणेच शारीरिक संबंध ठेवू इच्छित आहे आणि आपण त्याला नाकारलं म्हणून तो आपल्याला मानसिक त्रास देत आहे. त्याचा हा त्रास असह्य झाल्यानं आपल्याला जीव द्यावासा वाटतो,’ असं सांगितल्यावर तर त्याचा संताप अनावर झाला.
आलवंदरमुळे आपल्या घराची शांती ढवळून निघत आहे. आपल्या आपापसांत होणार्‍या भांडणाचं मूळ कारण तो आलवंदर, त्याचं छद्मी बोलणं आणि आचरट व अशोभनीय वागणं आहे. थोडक्यात म्हणजे हा आलवंदरच आपल्या मानसिक त्रासाचं, अशांतीचं, कलहाचं व त्यातून होणार्‍या दुःखाचं मूळ कारण आहे, असं प्रभाकरच्या मनात आलं आणि काहीही करून त्या आलवंदरचा कायमचा बंदोबस्त करायलाच हवा, असंही त्याला वाटलं आणि तो त्यावर बराच वेळ विचार करता बसला.

‘हे बघ देवकी, आपण आलवंदरला उद्या दुपारी घरी जेवायला बोलावू आणि तो जेवायला आला, की प्रथम त्याच्याशी बोलून पाहू. तरीही त्यानं नाहीच ऐकलं, तर दुसरा जालीम उपायही आहे आपल्याकडे! आपण आपल्या डोक्याला ताप देणार्‍या त्या आलवंदरला छानपैकी धडा शिकवू! मी उद्या त्याच्याकडे बघतोच!’ हुंदके देत रडणार्‍या देवकीला समजावताना प्रभाकर रागानं थोड्याशा मोठ्या आवाजात म्हणाला आणि नेमकं हेच संभाषण, बाहेर अंगणात लघवी करण्यासाठी आलेल्या, त्यांच्याकडे घरकाम करणार्‍या मुलानं ऐकलं. ‘आपल्या नेहमीच शांत असणार्‍या, सुस्वभावी मालकाला आज एकाएकी भडकायला काय झालं,’ याचं त्याला नवल वाटलं. पण तो काहीही न ऐकल्यासारखं दाखवून, काहीही न बोलता आपल्या खोलीत परत गेला.
***

तारीख : २९ ऑगस्ट १९५२
ठिकाण : बोट एक्सप्रेस
अठ्ठावीस तारखेला रात्री आठ वाजता मद्रासमधल्या एग्मोर या स्टेशनहून सुटलेली ती ‘बोट मेल’ आता दुसर्‍या दिवशी, म्हणजे एकोणतीस तारखेला, मानमदुराई स्टेशनजवळ पोचलेली होती. ह्या ‘बोट मेल’मधला तृतीय दर्जाचा डबा प्रवाशांनी खचाखच भरलेला होता. डब्यातल्या त्या दमट-घामट वातावरणात, आता कसलीशी दुर्गंधीही हळूहळू पसरत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. सुरवातीला कुजलेल्या मासळीप्रमाणे भासणारा तो कुबट वास अधिकाधिक उग्र बनत चालल्याचं कळल्यावर प्रवाशांनी तो वास कुठून येत आहे त्याचा शोध घेण्याचं ठरवलं. जरा शोधल्यावर त्यांना एका बाकाखाली ठेवलेली, एक जुनाट गंजकी, मूळचा हिरवा रंग उडालेली लोखंडी ट्रंक आढळली. त्या ट्रंकेमधून तो दर्प वातावरणात पसरत होता. याशिवाय त्या ट्रंकेच्या दाबून गच्च बसवलेल्या झाकणाच्या फटीतून एक काळपट रंगाचं घाणेरड्या वासाचं द्रावणही बाहेर पडून, जमिनीवर ओघळत असल्याचं प्रवाशांना दिसलं. आपापसांत चौकशी केल्यावर, कुणाही प्रवाशानं ती लोखंडी ट्रंक आपल्या मालकीची नसल्याचं सांगताच, तिथे एकच गोंधळ उडाला. सारेच प्रवासी भयभीत झाले. ट्रेनची चेन खेचण्यात आली. पण तोपर्यंत स्टेशन अगदी जवळ आल्याने, मोटरमनने ट्रेन मानमदुराई स्टेशनला थांबवली. रेल्वे पोलिस जेव्हा तिथं पोचले, तेव्हा डब्यात एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी मोठमोठ्यानं बोलत एकमेकांवरच दोषारोप करत होते, तर काही तर्क-कुतर्क लावत, घसा खरवडून आपापसांत चर्चा करत बसले होते. डब्यात घुसलेल्या रेल्वे पोलिसांनी प्रथम ओरडून सर्वांना शांत केलं आणि त्या सर्व सावळ्या गोंधळाची जनक असलेली ती मोठ्ठी लोखंडी ट्रंक बाहेर काढली.

‘बोट मेल’ आता काही काळासाठी त्या स्टेशनवर थांबवून ठेवण्यात येणार असल्याचं स्टेशन मास्टरनं पुढच्या स्टेशनला कळवून टाकलं. त्यानंतर फोन करून स्थानिक पोलिसांना बोलावण्यात आलं आणि पंचांच्या समक्ष ती लोखंडी ट्रंक उघडण्यात आली.
त्या लोखंडी ट्रंकेचं झाकण उघडताच, आतलं दृश्य पाहून त्या छोट्याशा शहरातल्या साध्या लोकांना एक प्रचंड हादरा बसला. ते दृश्य होतंही तसं भयानकच! त्या लोखंडी ट्रंकेत एका पुरुषाचा नग्नावस्थेत असलेला मृतदेह कोंबून भरलेला होता. कंबरेवरच्या काळ्या धाग्याच्या करदोड्याच्या आणि पावलावर असलेल्या गडद हिरव्या मोज्यांच्या व्यतिरिक्त, त्या शवावर एक चिंधीही नव्हती. तो मृतदेह कुजायला सुरवातही होऊन गेलेली होती… हे ओंगळ आणि भयंकर दृश्य पाहताच स्टेशनवरचे काही बघे आणि प्रवासी किंचाळले, तर एक-दोघांना चक्करही आली. अनुभवी पोलिससुद्धा हे दृश्य पाहताच दचकले.
त्या ट्रंकमधला मृतदेह पुढील कारवाईसाठी, म्हणजेच पोस्टमोर्टमसाठी पाठवणं, आता पोलिसांसाठी क्रमप्राप्त होतं.
वास्तविकतः मानमदुराई स्टेशन हे तेव्हा रामनाड (हल्लीचं रामनाथपुरम) हेड क्वार्टरच्या हद्दीत येत होतं, पण त्या काळी तिथं फार सुविधा नसल्यानं, तो मृतदेह मदुराई इथल्या हेड क्वार्टरला सोपवण्यात आला.

मदुराई इथल्या ‘एरस्किन हॉस्पिटल’मध्ये, डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर डॉक्टर कृष्णस्वामी यांच्यावर त्या ट्रंकमधल्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाची जबाबदारी सोपवण्यात आली. डॉक्टर कृष्णस्वामी हे एक कुशल रेडिओलॉजिस्ट होते. त्यांनी अगोदरच खराब झालेल्या मृतदेहाची आणखीनच वासलात लागून, काही सुगावा लागण्याची शक्यता नष्ट होऊ नये म्हणून लागलीच झटपट कामाला सुरवात केली. त्यांनी त्वरित एक्स-रे काढून परीक्षण केलं आणि परीक्षणाच्या अंती मृताचं अंदाजे वय, तो मृत झाला ती वेळ निश्चित केली.
‘मृताची पाठीच्या खालच्या बाजूची दोन्ही हाडं जुळली गेलेली असल्यानं, मृताचं वय निःसंशय पंचवीसच्या वर आहे,’ असा निर्वाळा डॉक्टर कृष्णस्वामी यांनी दिला. मृताच्या पोटात न पचलेल्या अन्नासोबत बरीच अफूही आढळून आल्यामुळे; ‘तो व्यसनी अफूबाजही असावा,’ असाही निष्कर्ष काढण्यात आला. पायात असलेल्या हिरव्या रंगाच्या पायमोज्यांच्यामुळे, तो धर्मानं मुसलमान असू शकेल, असा निष्कर्ष स्थानिक पोलिसांनी काढला व ‘कुणी पंचवीस वा त्याहूनही अधिक वयाचा, धर्मानं मुसलमान असलेला इसम बेपत्ता झाला आहे का?’ याचा कसून शोध घेणं सुरू झालं.

लोखंडी ट्रंकेत सापडलेल्या, मस्तकविरहित असणार्‍या मृतदेहाच्या बातमीने, दुसर्‍या दिवशीची सर्व वृत्तपत्रंही गाजवली होती. सर्वत्र या एकाच घटनेची चर्चा होत होती. इन्स्पेक्टर रामनाथ अय्यर यांनी वर्तमानपत्रांतली ती बातमी वाचल्यावर; त्यांचंही कुतूहल जागृत झालं. ‘हे त्या लोखंडी ट्रंकेत कोंबून ट्रेनमध्ये सोडून दिलेलं बेवारस प्रेत म्हणजे त्या बेपत्ता असलेल्या आलवंदरचा मृतदेह तर नाही ना?’ अशी शंका त्यांच्या मनात आल्यानं इन्स्पेक्टर रामनाथ अय्यर यांनी लागलीच मदुराई इथं तातडीचा फोन करून; तिथल्या पोलिस अधिकार्‍यांना सर्व हकीकत थोडक्यात सांगून; तो मस्तकविरहित असलेला मृतदेह ताबडतोब मद्रास इथं पाठवून देण्याची विनंती केली. ती विनंती स्थानिक पोलिसांद्वारे ताबडतोब मान्यही करण्यात आली आणि त्या मृतदेहाचा मद्रासच्या दिशेनं पुन्हा उलटा प्रवास सुरू झाला.
***

तारीख : ३१ ऑगस्ट १९५२
ठिकाण : रोयापुरम
रोयापुरममध्ये हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर यांनी आता मेनन कुटुंबीयांच्या शेजार्‍यांकडे प्रभाकर व देवकी मेनन यांच्याविषयी चौकशी करायला सुरवात केली. ‘मेनन कुटुंबीय अचानकच कसल्या तरी अर्जंट कामासाठी ‘बॉम्बे इलाका’ (सध्याची मुंबई) इथं रातोरात सामान बांधून निघून गेले,’ इतकीच माहिती हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर यांना मिळाल्यावर त्यांच्या मनात त्या मेनन कुटुंबीयांविषयी संशय निर्माण झाला. त्यांनी त्यांच्या घरी काम करणार्‍या नोकराचा शोध घ्यायला सुरवात केली.

सारी कार्यवाही पूर्ण करून हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर आपल्या सायकलवरून लॉ कॉलेज पोलिस स्टेशनवर परतत होते. तो रस्ता समुद्रालगतचा व समुद्राला अगदी खेटूनच जाणारा, अत्यंत चिंचोळा आणि तीव्र वळणं असणारा होता. म्हणून त्या वळणदार रस्त्यावरून हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर आपली सायकल अगदी सावधानतेनं व थोडीशी हळूच चालवत होते. वळण घेताना अचानक त्यांचं लक्ष एका वस्तूकडं वेधलं गेलं. किनार्‍यालगतच्या उथळ समुद्रात भरतीच्या लाटेनं आणून फेकलेलं एक बोचकं, लाटांच्या सोबत खालीवर होत डोलत-डगडगत होतं. हे दृश्य प्रथम कुतूहलानं पाहणार्‍या हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर यांची जिज्ञासू वृत्ती जागृत झाली. आपली सायकल बाजूला ठेवून, ते जलद पावलांनी किनार्‍यावरची रेती तुडवत, त्या उथळ समुद्राच्या आत गेले आणि त्यांनी ते बोचकं ओढून बाहेर आणलं.
तपकिरी रंगाच्या शर्टात काहीतरी गोलसर आणि भक्कमसं गुंडाळलेलं असल्याचं दिसल्यावर, त्यांनी ते बोचकं उघडलं. त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्या तपकिरी शर्टात गुंडाळलेली वस्तू म्हणजे एक छाटलेलं, तुकडे-तुकडे केलेलं आणि कुजू लागलेलं मानवी मुंडकंच होतं. ‘कुणीतरी घाईघाईतच समुद्राच्या काठावर एक उथळ खड्डा खोदून ते मुंडकं पुरलं असावं आणि मग भरतीच्या जोरदार लाटांमुळे तो खड्डा उघडा पडून ते मुंडकं पाण्यात पडलं असावं,’ असा अंदाज हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर यांनी बांधला. पुन्हा त्याच त्या तपकिरी शर्टात ते मुंडकं गुंडाळून, आपल्यासोबत ते बोचकं घेऊन हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर ‘लॉ कॉलेज पोलिस स्टेशन’ या आपल्या पोलिस ठाण्यावर रिपोर्ट करायला परतले.

दुसर्‍या दिवशी भारतातल्या जवळ जवळ सर्वच भाषांतल्या वृत्तपत्रांत, अगदी पहिल्या पानावर त्या मुंडक्याचा फोटो आणि त्या विषयीची चित्तथरारक कथा छापून आली. ह्या घटनेला अतिशय प्रसिद्धी मिळाली होती, कारण त्या दशकात अशा घटना अगदी अपवादानेच घडत असत. समाजात ह्या घटनेचे निरनिराळे प्रतिसाद उमटू लागले.
हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर यांना ते मुंडकं सापडल्यानंतर, दोन दिवसांच्या आत ते मुंडकं नसलेलं धड मदुराई इथून मद्रासला परत आलं. ते ‘क्षत-विक्षत झालेलं, कुजू लागलेलं मुंडकं’ आणि ते ‘कुजलेलं मुंडक्याच्या विरहित असलेलं धड’ या दोन्ही गोष्टी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये असणार्‍या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पुढच्या तपासणीसाठी पाठवून देण्यात आल्या. तिथं फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये असिस्टन्ट प्रोफेसर म्हणून कार्यरत असणार्‍या डॉक्टर सी. बी. गोपाळकृष्ण या तज्ज्ञ व्यक्तीवर, त्या मुंडक्याच्या पहिल्या आणि त्या धडाच्या दुसर्‍या शवविच्छेदनाची जबाबदारी सोपवण्यात आली. डॉक्टर के. सी. जेकब आणि डॉक्टर सी. बी. गोपाळकृष्ण यांच्या टीमनं तत्परतेनं कार्यवाहीला सुरवात केली.
इन्स्पेक्टर रामनाथ अय्यर आलवंदरच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधून काढण्यासाठी, अगदी झपाटल्यासारखेच अविरत काम करण्यात गर्क झालेले होते. घर धुंडाळण्याची अधिकृतरीत्या परवानगी मिळाल्यावर, दुसर्‍याच दिवशी आपल्यासोबत एक टीम घेऊन ते मेनन यांच्या घरी रोयापुरम इथे गेले आणि त्यांनी कुलूप तोडून आपल्या सहकार्‍यासह घरात प्रवेश केला.
घरात आल्यावर त्यांना ठिकठिकाणच्या भिंतींवर आणि हॉल व किचनमधल्या फरशीवर रक्ताचे शिंतोडे उडालेले दिसले. ते शिंतोडे खरवडून त्या रक्ताचे नमुने घेऊन, त्यांनी ते नंतर फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवून दिले.

इन्स्पेक्टर अय्यर यांनी स्वतः रोयापुरम इथं ठिकठिकाणी जाऊन चौकशी करायला सुरवात केली. त्यांना जरासा भेदरलेला एक रिक्षावाला दिसल्यावर, त्यांनी त्याला दमात न घेता मित्रत्वाने विचारल्यावर, त्यानं चाचरत सांगितलं, की त्या परिसरात तो पहिल्यापासूनच रिक्षा चालवण्याचं काम करतो. तो तिथला जुना रहिवासी असल्यानं सर्वांना नावानं किंवा तोंडवळ्यानं ओळखतो. अठ्ठावीस तारखेला त्यानं जिथे रिक्षा उभी केली होती, त्या ठिकाणाच्या समोरच पी. पी. मेनन यांचं घर होतं. चार वाजता पी. पी. मेनन घरातून घाईघाईनं निघून, त्याच्या रिक्षात बसले आणि त्याला पी. पी. मेनन यांनी ‘रोयापुरम बीच’कडे रिक्षा घ्यायला सांगितली. पी. पी. मेनन यांनी जेव्हा त्याची रिक्षा भाड्यानं घेतली, तेव्हा त्यांच्या हातात एक छोटं गाठोडं होतं व त्यात एक गोलसर वस्तू गुंडाळलेली दिसत होती. त्यांनी अरुमुगमला ‘एक खराब झालेला भोपळा फेकून द्यायचा आहे,’ असं सांगितलं आणि बीचवर पोचल्यावर, ‘बोवेकुप्पम’ला उथळ समुद्राच्या मध्ये त्यांनी ते छोटं गाठोडं फेकून दिलं. त्या रिक्षावाल्याच्या जबानीमुळे, आता मेनन कुटुंबीयांचा या खुनाच्या भानगडीशी संबंध असल्याचं सुस्पष्ट झालेलं होतं. म्हणूनच खुन्याचा छडा लावून, ही केस लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी देवकी व प्रभाकर या दोघांचाही थांगपत्ता शोधून काढणं, ही पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण अशी बाब बनली होती.

तसंच मेनन कुटुंबीयांच्या एका शेजार्‍यानं अंदाजे पाच-साडेपाच वाजता प्रभाकर मेनन याला, आपल्या सोबत जुन्या बाजारातून विकत घेतलेली हिरवट, रंग उडालेली जुनाट अशी मोठी लोखंडी ट्रंक घेऊन, आपल्या सायकलवरून पेडल मारत येताना पाहिल्याचंही पोलिसांना सांगितलं.
त्यानंतर पुन्हा थोड्या वेळानं प्रभाकर त्या लोखंडी ट्रंकेसहित, सायकलवरून हळूहळू पेडल मारत स्टेशनच्या दिशेनं जातानाही त्या शेजार्‍याला दिसला होता. (त्या शेजार्‍याची साक्ष ही कोर्टात ग्राह्य व महत्त्वपूर्ण ठरली.)
पोलिसांनी लवकरच मेनन कुटुंबीयांच्या नोकराला- के. टी. नारायणन यालाही शोधून काढण्यात यश मिळवलं. के. टी. नारायणन हा कुमारवयीन मुलगा कोईम्बतूर इथून आपल्या आई-वडिलांच्या घरातून, कुणाला न सांगता सावरता गुपचूप पळालेला असल्यानं, पोलिसांना पाहताच तो एकदमच दचकला व खूपच घाबरून गेला. परंतु त्याला प्रेमानं चुचकारल्यावर, त्यानं तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली. ती अशी, की प्रभाकर व देवकी यांच्यामध्ये अठ्ठावीस तारखेच्या तीन-चार दिवस आधी भांडण झालं होतं व त्या भांडणात आलवंदरचं नाव घेतलं गेलं होतं. के. टी. नारायणनला जरी त्या मल्याळम भाषेतल्या संभाषणातला शब्द न् शब्द समजला नसला, तरी ‘प्रभाकर त्या आलवंदर नावाच्या कुणा एका व्यक्तीला रागानं शिव्या देत आहे आणि देवकी हुंदके देत शाप आणि दूषणं देत आहे व नंतर प्रभाकर याने आलवंदर नावाच्या व्यक्तीला धडा शिकवायचं ठरवलं आहे,’ एवढं मात्र त्याला कळलं. ‘ते दोघं प्रथम म्हैसूरला (सध्याचे कर्नाटक राज्य) जाऊन मग विमानानं बाँबे इथे जाणार असून, बॉम्बेमधले त्यांचे नातेवाईक सुभेदार मेजर नायर यांच्याकडे ते मुक्काम करणार आहेत,’ हा महत्त्वाचा सुगावा त्यांना त्या मुलाकडून मिळाला आणि लगेचच पोलिसांचं एक पथक म्हैसूरला रवाना झालं.

डॉक्टर के. सी. जेकब आणि डॉक्टर सी. बी. गोपाळकृष्ण यांच्या टीमनं तोपर्यंत आपलं काम विद्युत्गतीनं पूर्ण केलं होतं. सुपूर्द केलेलं ‘मुंडकं’ व ‘मुंडक्याविरहित असलेलं धड’ एकमेकांशी पूर्णपणे जुळल्यानं ते दोन्ही एकाच व्यक्तीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्राथमिक निष्कर्ष सांगितल्यानंतर त्यांनी आर्मी हेडक्वार्टरमधून, तिथं संग्रहित असलेले आलवंदरच्या हाताच्या बोटांचे ठसे मागवले आणि ते ठसे मृतदेहाच्या हाताच्या बोटांच्या ठशाबरोबर पूर्णपणे जुळल्यावर, तो मृतदेह आलवंदरचाच आहे, हे सिद्ध झालं.
‘मृत व्यक्तीचं वय अंदाजे बेचाळीस ते पंचेचाळीस असून, व्यक्ती साडेपाच फूट उंचीची व अफूबाज असून, सुरी अथवा चॉपरसारख्या धारदार हत्यारानं घाव घातले गेल्यानं मृत व्यक्तीची हत्या झाली आणि ज्या हत्यारानं हत्या केली गेली, त्याच हत्यारानं त्याचं मस्तकही छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला गेला,’ असा निर्वाळाही त्या डॉक्टरांच्या टीमने दिला.

अत्यंत बारकाईनं त्या कुजलेल्या मस्तकाचं निरीक्षण केल्यावर डॉक्टरांना असं दिसून आलं, की मृताच्या तोंडातील दोन्ही बाजूंच्या दातांची (सुळ्यांची) रचना वेगळीच होती. त्याचे दोन्ही दात (सुळे) एकमेकांवर चढलेले होते. डबल दात असल्याचा आभास त्यामुळे होत होता. याशिवाय त्याच्या तोंडातील एक दात काळा पडलेला होता. त्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर दोन ठिकाणी भोकं पडलेली होती, तर डाव्या कानाच्या पाळीवर फक्त एकाच ठिकाणी भोक पाडलेलं होतं. या सर्व बाबी श्रीमती आलवंदर यांना सांगितल्यावर, हे सर्व वर्णन आपल्या पतीच्या मस्तक व देहाच्या वर्णनाशी अगदी तंतोतंत जुळत असल्यानं त्यांनी ते मस्तक व देह आपल्या पतीचाच असल्याचं त्यांना सांगितलं. ‘त्यांना अफू घेण्याची सवय जडलेली होती आणि आपल्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार, आलवंदरने फार पूर्वी सुन्नत करून घेतलेली होती,’ असंही त्यांना श्रीमती आलवंदर यांनी सांगितलं. श्रीमती आलवंदर यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावल्यानंतर, त्यांनी त्या देहाकडे नजर टाकून तो संपूर्ण देह, धड आणि मस्तक आपल्या पतीचंच असल्याची ग्वाही दिली. आता ‘आलवंदर हा बेपत्ता नसून, त्याचा खून झालेला आहे, हे भक्कम पुराव्यानिशी सिद्ध झालं होतं.’ आणि आता फक्त खुन्याला पकडणं बाकी उरलं होतं. त्यासाठी पोलिस बंगलोरला पोचलेही होते.
बंगलोरमध्ये प्रभाकरचे कुणीही नातेवाईक नव्हते, म्हणून तो आपली त्या ‘फ्रीडम’ वृत्तपत्रातली संपादकाची, जबाबदारीची असलेली नोकरी तातडीनं सोडण्यासाठी आणि तत्पूर्वीची कामं उरकण्यासाठी व अकाऊंट सेटल करण्यासाठी आपल्या वृत्तपत्र समूहाच्या बंगलोरस्थित असलेल्या मुख्य कार्यालयात गेला असावा, हे तर्कानं ताडून पोलिस सर्वांत आधी त्या कार्यालयात गेले. तिथं पोचल्यावर तो आधीच आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन, अकाऊंट सेटल करून देवकीसह बाँबेला निघून गेल्याचं समजलं. मग लगोलग पोलिसांची ती तुकडी मुंबईला रवाना झाली.

अफाट मुंबईमध्ये सुभेदार मेजर नायर यांना शोधून काढणं, हे मद्रास पोलिसांच्यापुढे मोठं आव्हान होतं.
मद्रास पोलिसांनी सर्वप्रथम ‘बाँबे’च्या पोलिस मुख्यालयात जाऊन, पोलिस उच्चाधिकार्‍यांची भेट घेतली आणि त्यांना आपला तिथं येण्यामागचा उद्देश सांगून, आपल्या केसची थोडक्यात माहिती सांगितली. मद्रास पोलिसांनी केलेल्या लेखी विनंतीवरून, पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. मुंबईच्या अतिशय कार्यकुशल व तत्पर पोलिसांनी मुंबईतल्या त्या अद्याक्षराच्या जमेल तितक्या ‘नायर’ मंडळींचे पत्ते, त्यांच्या ‘नायर’ समाजातल्या कार्यकर्त्यांच्या व समाजसेवकांच्या मदतीनं मिळवले. त्या पत्त्यांमधून काही पूर्वी आणि सध्या लष्करात कार्यरत असणार्‍या थोड्या काही नायर मंडळींना निवडून काढण्यात आलं. त्यातल्या एका ज्युनियर ऑफिसरकडे गावाहून पाहुणे आल्याची पक्की खबर मिळताच, मुंबई पोलिसांची एक छोटी तुकडी तिथं त्वरित जाऊन थडकली.
त्या सुभेदार मेजर यांच्याकडे, आजारी पडलेली देवकी झोपलेली आढळली. त्या सर्व प्रकरणामुळे देवकीच्या मनावर अतिशय ताण पडल्यानं, तिचा गर्भपात झालेला होता आणि अशक्तपणा आल्यानं ती वैद्यकीय सल्ल्यानुसार पूर्ण विश्रांती घेत होती.

पोलिस देवकीला अटक करण्यात यशस्वी ठरले. पण तिचा पती त्या वेळी घरी नसल्यानं, त्याला तेव्हाच अटक करणं पोलिसांना शक्य होऊ शकलं नाही. प्रभाकरनं तोपर्यंत के. एस. अल्वा यांना भेटून, त्यांच्याकडून शिफारसपत्र घेऊन, मुंबईतल्या एका कंपनीत नोकरीही मिळवली होती. पण त्या दिवशी तो कामावर गेलेला नव्हता. देवकीलाही प्रभाकर कुठे गेला आहे, हे ठाऊक नसल्यानं त्याला कसं शोधायचं, हा प्रश्न पोलिसांना पडला.

मग तिच्या पतीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईच धुंडाळायला सुरवात केली. मुंबईतली उद्यानं, वाचनालयं, स्टेशन्स, बसथांबे इत्यादी सारी महत्त्वाची ठिकाणं पालथी घातल्यानंतर; सरतेशेवटी पोलिसांना तो मुंबईतच एका चौपाटीवर विमनस्क स्थितीत, विचार करत बसलेला आढळला. पोलिसांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यानं आपल्या दाढी-मिशा काढून टाकून, चेहरा एकदम गुळगुळीत केलेला होता. पण तरीही मुंबई पोलिसांनी त्याला लगेच ओळखलं आणि त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं. पोलिस स्टेशनवर नेऊन त्याची झडती घेतल्यावर त्यांना प्रभाकरच्या शर्टाच्या खिशात एक महागडं पेन आढळलं. त्या पेनावर आलवंदरचं नाव कोरलेलं होतं. प्रभाकरच्या विरोधात पोलिसांना एक चांगलाच पुरावा मिळाला होता. तसंच पोलिसांना देवकी आणि प्रभाकरच्या सामानाच्या घेतलेल्या झडतीत आलवंदरचं किमती परदेशी बनावटीचं रिस्टवॉचही सापडलं. मुंबईमधल्या पोलिस मुख्यालयातल्या दोन इन्स्पेक्टर्स- इन्स्पेक्टर क्लार्क आणि इन्स्पेक्टर जाफर यांनी प्रभाकर व देवकी यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंदवून, त्या दोघांना अटक करून तुरुंगात टाकलं व मद्रास पोलिस मुख्यालयाला तसं कळवून टाकलं.

प्रभाकर व देवकी यांच्यावर अटकेनंतर, जाणूनबुजून संगनमतानं थंडपणे केलेल्या खुनाचा आरोप, तसंच कारस्थान रचल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप ठेवण्यात आला. ‘बाँबे सिटी मॅजिस्ट्रेट’नं प्रभाकर आणि देवकी यांना कस्टडी दिली. त्यानंतर त्या दोघांना मद्रास पोलिसांच्या तुकडीसोबत विमानानं मद्रासला पाठवून देण्यात आलं; मद्रासमधल्या मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात येणार होती.

सर्व वृत्तपत्रांतून मुख्य पानांवर छायाचित्रासहित ‘खुनी जोडपं’ असं उघडपणे संबोधलं गेल्यामुळे, बदनाम झालेलं हे कुप्रसिद्ध जोडपं पोलिसांसह मद्रासमध्ये येताक्षणीच, त्यांच्याभोवती पत्रकारांचा आणि देशा-विदेशातल्या प्रसिद्धिमाध्यमांतल्या प्रतिनिधींचा गराडा पडला होता. जराही ब्रेक न घेता, त्यांचा पिच्छा पुरवत होते. त्या जोडप्याला सुरक्षितपणे पत्रकारांच्या गराड्यातून बाहेर काढून, सेंट्रल जेलमध्ये पाठवणं पोलिसांच्या दृष्टीनं एक महामुश्किल काम होऊन बसलेलं होतं. पण त्यांची रवानगी कोठडीत करण्यात शेवटी पोलिसांनी यश मिळवलं.
ह्या खुनाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने, प्रभाकर आणि देवकी यांच्यावर नोंदवलेला ‘संगनमतानं घडवलेला खून’ हा आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांना परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून राहावं लागणार होतं. म्हणून न्यायालयात खटल्याच्या दरम्यान सरकारची बाजू भक्कम असावी म्हणून पोलिसांना ‘गुन्हा अपघातानं न घडता व्यवस्थित ठरवूनच केला आहे,’ हे दर्शवणारे जास्तीत जास्त पुरावे जमा करणं अत्यावश्यक होतं आणि त्यासाठी पोलिस खातं अगोदरपासूनच त्या जोडप्याच्या विरोधात न्यायालयात सादर करण्यासाठी भरभक्कम पुरावा गोळा करण्याच्या कामाला लागलं होतं.
ज्या रिक्षावाल्यानं अठ्ठावीस तारखेच्या दुपारी आलवंदरला मेनन यांच्या निवासस्थानजवळ सोडलं होतं त्याला शोधून, त्याची जबानी नोंदवून घेण्यात पोलिस यशस्वी झाले. (त्याची साक्ष नंतर कोर्टात महत्त्वपूर्ण ठरली.)

मेनन कुटुंबीयांच्या एका शेजार्‍यानं आणि भाड्यानं सायकल देणार्‍या एका दुकानदारानं; अठ्ठावीस तारखेच्या दुपारी, साधारण ‘लंच टाईम’च्या वेळी, आलवंदरला मेनन यांच्या घराचा दरवाजा ठोठावताना पाहिलं होतं. त्यांची जबानी ही सर्वांसमक्ष नोंदवण्यात आली. प्रभाकर त्याच्या घराजवळच्या कोल्ड्रिंंक्सच्या दुकानात, सकाळी साधारण दहा वाजता गेला. दुकानदाराला जेवायला पाहुणे येणार असल्याचं सांगून, लाल रंगाच्या, रास्पबेरी सोड्याच्या तीन-चार बाटल्या त्या दुकानातून विकत घेऊन, काही वेळानं आपल्या घरी परतला. दुपारी साधारण ‘लंच टाईम’च्या वेळी आलवंदरनं त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. नंतर चार वाजता प्रभाकरला घराबाहेर पडलेलं पाहिलं, परंतु आलवंदरला घरातून बाहेर जाताना पाहिलंच नाही, असं अँथनी नावाच्या आणखी एका शेजार्‍याचंही म्हणणं होतं. (नंतर न्यायालयात खटला सुरू असताना, उपरोक्त व्यक्तींची साक्षही कोर्टानं ग्राह्य मानली.)

‘अठ्ठावीस तारखेला आपल्या मालकाने, म्हणजे प्रभाकर मेनन ह्यांनी आपल्याला कामाला सुटी दिली आणि खर्चायला थोडेसे पैसे देऊन, मस्तपैकी फिरून मद्रास शहर पाहून यायला सांगितलं. आपण मद्रास शहरात फिरून परतल्यावर आपल्याला देवकी अम्मा कसलेतरी कपडे धुताना दिसल्यावर, आपण त्यांच्यापाशी जाऊन त्यांना मदत देऊ केली. पण त्यांनी जरा रागानेच आपल्याला तिथून निघून जायला सांगितलं. पण त्यानंतर अंदाजे पाच-साडेपाच वाजता प्रभाकरसाहेबांनी, आपल्याला किचनची जमीन पाण्यानं धुवून काढायला सांगितली. किचनमध्ये फरशीवर ओशट तवंग आणि कसलातरी मांसाचा घाणेरडा वास येत असल्याचं पाहिल्यावर, आपण मेननसाहेबांना सफाई करण्यासाठी साबण किंवा फिनाईल मागितलं, तेव्हा त्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी बाजारातून विकत आणलेल्या अंघोळीच्या साबणाच्या वड्या दिल्या व तो सुवासिक साबण फरशीला लावून, फरशी रगडून धुवायला सांगितलं. त्या साबणाच्या वड्या फरशीला दोन-तीन वेळा लावून, जोरजोरात रगडून, आपण ती फारशी खसखसून घासून, दोन-तीन वेळा धुवून काढली, तेव्हा कुठे तो वास जरासा कमी झाला,’ अशी त्यांच्या घरात काम करणार्‍या त्या कुमारवयीन नोकराची, के. टी. नारायणन याची जबानी सुद्धा सर्वांसमक्ष नोंदवण्यात आली.

ज्या हत्यारानं खून झालेला होता, ते हत्यार शोधण्यासाठी, पोलिस मद्रास शहरातला कोपरा न् कोपरा धुंडाळू लागले. एके दिवशी ‘ब्रॉड वे’ इथल्या ‘सेंट्रल पार्क’मध्ये एक भली मोठी धारदार सुरी खुरट्या झुडपांच्या राईत पडलेली असल्याची बातमी त्यांना, तिथं फिरायला येणार्‍या एका स्थानिकाकडून समजल्यावर, ‘सेंट्रल पार्क’मध्ये पंचांच्या समक्ष जाऊन, त्यांनी प्रथम ती सुरी जप्त केली व तिथल्या माळ्याची जबानीही घेतली. नंतर त्या माळ्याशी बोलताना, सहजपणे मारलेल्या गप्पांतून, त्या माळ्याकडून पोलिसांना असं समजलं, की ‘सफाई कामगाराला तिथं एकोणतीस तारखेच्या सकाळी पार्क साफ करताना एक बेवारस साडीही सापडली होती. त्या साडीवर रक्ताचे डाग पडलेले होते. त्यानं ती साडी घरी नेऊन, आपल्या बायकोला दिली होती. ती साडी धुवून नंतर वापरायला घेण्याचा, त्या सफाई कामगाराच्या पत्नीचा मानस होता.’ पोलिसांनी त्या सफाई कामगाराच्या घरी अचानकपणे जाऊन, ती साडीही जप्त करून, त्या सफाई कामगाराची जबानी नोंदवली.
(नंतर ती सुरी व ती साडी तपासणीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आली व तपासणीतून त्यावरचे सुकलेले मानवी रक्ताचे डाग हे आलवंदरचे असल्याची शक्यता, सत्य असल्याचंच सिद्ध झालं.)

पोलिसांनी दाखवलेला साडीचा फोटो पाहिल्यावर, देवकीच्या एका शेजारणीनं फोटोतल्यासारखीच, अगदी हुबेहूब तशीच एक साडी देवकीच्या अंगावर काही दिवसांपूर्वी पाहिली असल्याचं पोलिसांना आठवणीनं सांगितलं. ती एक भारी किमतीची साडी होती. आपल्याला ती साडी आवडल्यानं आपण कुतूहलानं देवकीला, ‘ही एवढी सुंदर साडी कुठून आणली,’ असं विचारल्यावर देवकी म्हणाली होती, की ‘ती महाग असलेली साडी, प्रभाकरने वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे; त्या महागड्या दुकानातून एवढी भारी साडी विकत आणून, प्रभाकरनं उगाचच पैसे खर्च केले,’ असंही देवकीच्या त्या शेजारणीनं पोलिसांना आठवून सांगितलं. वरवर साध्यासुध्या बिनमहत्त्वाच्या वाटणार्‍या या संवादातून, पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. ते साडीचं दुकान शोधून त्यांनी साडी व प्रभाकरचा फोटो दाखवल्यावर त्या दुकानदाराने ती साडी ओळखून, मग प्रभाकरच्या फोटोकडे बोट दाखवून, ह्याच व्यक्तीनं आपल्या दुकानातून ती साडी विकत घेतल्याचं सांगून डुप्लिकेट बिलदेखील पोलिसांना दाखवलं. पोलिसांना आणखी एक भरभक्कम पुरावा मिळाला होता!

ज्या हत्यारानं खून झाला ते हत्यार होतं मलबार नाईफ! ‘मलबार नाईफ’ म्हणजे मोठी धारदार सुरी! ती ‘मलबार नाईफ’ ज्या व्यक्तीकडून प्रभाकरने विकत घेतलेली होती, त्या भांडी व कटलरी विकणार्‍या व्यक्तीला शोधून त्याचीही साक्ष नोंदवली गेली. प्रभाकर मेनन खून होण्यापूर्वी तीन-चार दिवस आधी, म्हणजे अंदाजे चोवीस किंवा पंचवीस ऑगस्टला मोठी सुरी विकत घेण्यासाठी दुकानात गेला, पण प्रभाकरला हवी ती सुरी (म्हणजेच मलबार नाईफ) नसल्यानं, प्रभाकर मेनननं अ‍ॅडव्हान्स पैसे भरून, ती विशिष्ट सुरी मागवली होती.
प्रभाकरनं सोबत आणलेली लोखंडी ट्रंक वाहून नेणार्‍या एग्मोर स्टेशनवरच्या हमालाला शोधून काढण्यात पोलिसांनी यश मिळवलं. पोलिसांनी दाखवलेला प्रभाकरचा फोटो त्या हमालानं ओळखला. ह्या अत्यंत घाईत असलेल्या त्या व्यक्तीला (म्हणजेच प्रभाकर) ती भलीथोरली व अवजड लोखंडी ट्रंक ट्रेनमध्ये चढवून, सीटच्या खाली ठेवायला आपणच मदत केल्याचं सांगून, त्या हमालानं त्या व्यक्तीनं मोठ्या औदार्यानं आपल्याला पाच रुपये हमाली म्हणून देऊ केल्याचंही पोलिसांना सांगितलं. तसंच त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला मोठी जखम झाली होती व त्यातून रक्तही वाहत असल्याचं दिसल्यावर, ती व्यक्ती ‘भाजी कापताना हात चुकून कापला गेला,’ असं बोलली असंही तो हमाल पोलिसांना म्हणाला. (त्या हमालाची साक्षही प्रभाकरच्या विरोधात पुरावा म्हणून पोलिसांना उपयोगी ठरली.)

अधिक खोलात जाऊन तपास करण्यासाठी आणि डॉक्टर के. सी. जेकब आणि डॉक्टर सी. बी. गोपाळकृष्ण यांना तपासकामात मदत करण्यासाठी डॉक्टर एन. पीतचंडी यांना पाचारण करण्यात आलं. त्या दोघांनी ते संपूर्ण घर आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. डॉक्टर एन. पीतचंडी यांच्या तीक्ष्ण नजरेला किचनमधल्या भिंतीवर एक रक्तरंजित हाताच्या पंजाचा ठसा आढळल्यावर, त्यांनी लगेच त्याचे नमुने गोळा करून, फोटोग्राफरला त्याचे फोटोही घ्यायला सांगितले. (तपासणीअंती ते रक्त आणि तो ठसा प्रभाकर मेननच्या डाव्या हाताच्या पंजाचा असल्याचं आढळलं.) तसंच स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाजूस ठेवलेल्या दगडी रगड्याच्या खाली त्यांना पाण्याचं थारोळं दिसल्यावर त्यांनी त्या पाण्याच्या नमुन्याची लगेचच, ‘ऑन द स्पॉट’ केमिकल टेस्ट घेतली. ते मानवी रक्तमिश्रित पाणी असल्याचं तपासणीअंती आढळून आलं.
पोलिसांच्या ताब्यात असलेला प्रभाकर मेनन आपल्याच स्टेटमेंटवर अडून बसला होता. ‘आमचा त्या मृत व्यक्तीशी कोणताही वा कसलाही संबंध नाही,’ फक्त या एका वाक्याचीच तो वारंवार पुनरावृत्ती करत होता. परंतु प्रभाकरइतकी देवकी मेनन खंबीर नव्हती. पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या भडिमारापुढे ती कोलमडून पडली. ‘त्या अधम आलवंदरने माझ्या घरी अनाहूतपणे येऊन, माझा मर्यादाभंग केला आणि तो माझा शीलभंग करण्याच्या प्रयत्न करत असताना, तिथं अचानकपणे आलेल्या माझ्या पतीनं माझं शीलरक्षण केलं व तसं करताना अपघातानं तो आलवंदर, त्यांच्या हातून मारला गेला,’ अशी जबानी देवकीनं पोलिसांना दिली. ‘देवकीनं जर सत्य काय ते सांगून, प्रभाकरच्या विरोधात स्टेटमेंट लिहून दिलं, तर नक्कीच तिला माफीचा साक्षीदार बनवलं जाईल आणि फाशी वा आजन्म कारावास अशासारख्या भयानक शिक्षा मिळण्यापासून तिची सुटका होऊ शकेल,’ अशा आशयाच्या वक्तव्याचा धोशा लावून, पोलिसांनी देवकीचं मन वळवण्याचा बराच प्रयत्नही केला. पण देवकी आपल्या म्हणण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिली व पोलिसांचे सारे प्रयत्न फुकट गेले.
***

अखेर सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, शेवटी त्या प्रसिद्ध खून खटल्याला मद्रास कोर्टात आरंभ झाला. जस्टिस ए. एस. पी. अय्यर या न्यायाधीशांसमोर, मद्रास हायकोर्टात त्या खटल्याची सुनावणी होणार होती. बॅरिस्टर झालेले हे न्यायाधीश अतिशय बुद्धिमान आणि न्यायनिष्ठुर म्हणून ख्यातनाम होते. न्यायदान करताना त्यांनी बर्‍याचदा तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या विरोधातही निर्णय दिले असल्यानं, ब्रिटिश सरकारची गैरमर्जीही त्यांना सहन करावी लागली होती. निवाड्यासाठी ए. एस. पी. अय्यर हे न्यायाधीश म्हणून लाभणं ही प्रभाकर व देवकी मेनन यांच्या दृष्टीने अत्यंत सुदैवाची गोष्ट होती, कारण रुढीप्रिय असणारे अय्यर हे सनातनी, पुराणमतवादी, थोडेसे कर्मठ आणि उत्तम चारित्र्य व उच्च नीतिमूल्यं यांच्याबद्दल अत्यंत आग्रही होते. आलवंदरच्या व्यभिचाराच्या कहाण्या त्यांना ऐकून माहीत असल्याने, मनातून त्यांना आलवंदरविषयी फारशी आस्था वाटत नव्हती. त्यांच्या मते, ‘आलवंदर हा एक कर्तव्यभ्रष्ट, नीतिभ्रष्ट, संस्कारहीन, संस्कृतीहीन, अधम, नीच आणि समाजहिताच्या दृष्टीने घातक होता. परस्त्रीवर लोभी नजर ठेवण्यासासारखं पाप कित्येक वेळा त्याच्या हातून घडलं होतं,’ तशा आशयाचं ते खासगीत बोललेही होते.

मद्रास हायकोर्टात त्या खटल्याचं कामकाज सुरू झालं. त्या वेळी ‘ज्युरी सिस्टीम’ अस्तित्वात असल्यानं न्यायाधीश अय्यर यांच्यासह ज्युरींचं एक मंडळ खटल्याच्या वेळी नियमितपणे हजर असे. त्या ज्युरींच्या मंडळात मद्रासमधली अत्यंत प्रतिष्ठित आणि नावाजलेली अशी बडी धेंडं होती. त्या ज्युरींनाही आलवंदरच्या लफड्यांविषयी बरीच ऐकीव माहिती असल्यानं, त्यांचंही मत आलवंदरविषयी कलुषितच होतं.
फिर्यादी असलेल्या सरकारसाठी एस. गोविंद स्वामिनाथन हे सुप्रसिद्ध वकील बाजू मांडत होते, तर आरोपी असलेल्या प्रभाकर व देवकी यांच्यासाठी अनुक्रमे बी. टी. सुंदरराजन आणि एस. कृष्णमूर्ती कोर्टात लढा देत होते. प्रभाकर व देवकी यांच्या विरोधात पुराव्यादाखल कोर्टात ‘मलबार नाईफ’ आणि देवकीची साडी सादर केली गेली होती.
त्या खटल्याविषयी लोकांना अनिवार उत्सुकता असल्याने फक्त कोर्ट रूमच नव्हे, तर कोर्टाचं आवार, कोर्टाबाहेरचा रस्ताही लोकांच्या गर्दीने खचाखच भरून गेलेला होता. मद्रास हायकोर्टात व कोर्टाच्या आसपास तुडुंब भरून वाहणार्‍या त्या जनप्रवाहाला आवर घालणं, ही एक अशक्यप्राय गोष्ट होऊन बसली होती.

देशी-विदेशी वृत्तपत्रांच्या, मासिकांच्या आणि प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींसह, नामांकित स्केच आर्टिस्ट, कार्टूनिस्ट, कमर्शिअल व फाईन आर्टिस्ट यांनीही तिथे गर्दी केलेली होती. खटला सुरू असताना घडलेल्या सार्‍या महत्त्वाच्या प्रसंगांना ते आर्टिस्ट हातातल्या कागदावर चित्रित करून नंतर संग्रहित करत. त्या चित्रांच्या खाली कॅप्शन असलेले, ‘द मर्डर मोस्ट फाऊल ..पिक्चर स्टोरी’ या नावाने फोटोसदृश्य असलेल्या चित्रांचं छोटं पॉकेट बुक, तसंच एक कॉमिक बुक किंवा छोटं पॉकेट साईजचं कार्टून बुक बनवून, लगेच ती पॉकेट बुक्स व कॉमिक्स बाजारात विक्रीसाठी आणली जात आणि त्यांची विक्रीही धडाक्यानं होत असे. या पिक्चर बुक्स, कार्टून बुक्स आदींची एक मालिकाच बनवली गेली होती. दर शुक्रवारी त्या मालिकेतलं एक नवं पुष्प किंवा नवीन पॉकेट बुक बाजारात विक्रीसाठी येताच, अवघ्या काही तासांतच सारी पॉकेट बुक्स विकली जाऊन ‘स्टॉक खल्लास’ असा बोर्ड त्या दुकानावर लागे.

खटल्याचं दिवसभराचं काम आटोपलं, की त्या दिवशी कोर्टामध्ये खटला सुरू असताना काय-काय घडलं, याविषयीची माहिती देणार्‍या छोट्या-छोट्या पुस्तिकाही लगेच छापल्या जात. ‘सेन्सेशनल हॅपनिंग्ज इन कोर्ट रूम नंबर फोर’, ‘स्टॉर्म इन कोर्ट रूम नंबर फोर’, यासारखी नावं त्या बुकलेट्सच्या मालिकांना असत. ‘जज ब्लास्ट्स मेनन’, ‘देवकी स्वून्स’ अशांसारखी दिलखेचक नावं देऊन आणि मीठ-मसाला लावून, त्या त्या दिवशी कोर्टात घडलेल्या प्रसंगांची रसभरित वर्णनं त्या पुस्तिकांतून केलेली असत.
याशिवाय कोर्टरूममधल्या घडामोडी उत्कृष्टपणे कव्हर करणार्‍या व फोटोसहित सचित्र बातम्या छापणार्‍या ‘द हिंदू’ या वृत्तपत्र समूहाच्या इंग्लिश व तमीळ भाषेतल्या वृत्तपत्रांचा खप तर नेहमीपेक्षा कितीतरी पटीनं वाढला होता. पत्रकार हिंडून हिंडून जनतेच्या प्रतिक्रिया गोळा करून छापत होते. जनमानसांत संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यातल्या काही प्रतिक्रिया गाजल्याही!
कुणाकुणाला असं वाटत होतं, की ‘स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजणार्‍या देवकी आणि प्रभाकर यांनी कायदा हातात घेऊन गुन्हेगाराला स्वतःच शासन करण्याऐवजी, प्रथम पोलिसांत तक्रार करून मग पुढे कायदेशीर कारवाई करायला हवी होती. एखाद्याला ठार मारून, त्याच्या देहाचे तुकडे करणं हे निःसंशय रानटीपणाचं लक्षण आहे.’

आलवंदरला जवळून जाणणार्‍या एका मित्राने तर, मुलाखतीतून असं स्पष्टपणे म्हटलं होतं, की ‘त्याचा स्वैर, स्वच्छंदी स्वभावच त्याच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत आहे. त्या पतिनिष्ठ असलेल्या देवकीच्या मागे जाऊ नकोस, असं वारंवार सांगूनही, त्यानं आमचं न ऐकल्यामुळे, तो आपल्या प्राणांना मुकला.’
प्रभाकरने त्या हत्येच्या दिवशीच्या दोन-तीन दिवस आधी, ‘मलबार नाईफ’सारख्या वस्तू आणलेल्या होत्या. खून घडला त्या दिवशी देवकी जाणूनबुजून आलवंदरला भेटायला गेली आणि तिनं त्याला, आपला नवरा घरी नसल्याचं सांगून घरी भेटायला बोलावलं. तो येताच प्रभाकरनं आतून दार बंद करून घेतलं व आलवंदरला आपल्या हातांच्या मजबूत पकडीत धरून, प्रभाकर त्याला भोसकण्याचा प्रयत्न करत असताना, आलवंदर त्याला चावला आणि त्यानं स्वतःला प्रभाकरच्या पकडीतून सोडवून घेतलं. आलवंदर निसटून जात असताना त्याला प्रभाकरने खेचून, उभं धरून भोसकलं. त्यानंतर घडलेली सारी हकीकत पोलिसांना सांगण्याऐवजी प्रभाकरने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला व तोही एक गुन्हाच होता. प्रभाकर व देवकी या दोघांनी मिळून आलवंदरच्या प्रेताची विल्हेवाट लावलेली असल्यानं; हा दोघांनी मिळून संगनमतानं व जाणूनबुजून केलेला खून आहे, असं फिर्यादी पक्षाचं म्हणणं होतं.

देवकी आलवंदरला समज देण्यासाठीच, ‘जेम अँड कंपनी’च्या, त्या शोरूममध्ये गेली होती. ‘इथून पुढे माझ्याशी नको असलेल्या सलगीनं वागण्याचा प्रयत्न करून, माझ्याकडे असभ्यपणे नाही-नाही त्या गोष्टींची मागणी करून, मला सतावू नकोस. माझ्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करून अशांती माजवायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मला कायदेशीर उपाय योजावे लागतील,’ एवढंच तिनं त्याला सुनावलं. यामुळे चिडून जाऊन आलवंदर, तिच्या पाठोपाठ रिक्षानं तिच्या घरी गेला. त्या वेळी देवकीला बरं नसल्यानं तिला स्वयंपाकात मदत करण्यासाठी प्रभाकर भाजी चिरत होता.
‘प्रभाकर नेहमीप्रमाणे कामावर गेला असल्यानं, देवकी आता घरी एकटीच आहे,’ असा गैरसमज झाल्यानं चवताळलेला आलवंदर, ‘माझी वसुली मी आत्ताच करतो,’ असं म्हणून सरळ देवकीवर तुटून पडायला लागला व झटक्यात तिची साडी ओरबाडून, तो तिचं ब्लाऊज फाडून काढायचा प्रयत्न करत असताना, तिचा ओरडा ऐकून प्रभाकर तिथे आला व त्यानं आलवंदरला थोपवलं. दोघांची हाणामारी सुरू झाली आणि त्यातच, आलवंदर अपघातानं मारला गेला, असं आरोपीच्या वकिलांनी बचाव करताना म्हटलं.

या गाजलेल्या खटल्यातला सर्वांत हृदयद्रावक प्रसंग होता तो, श्रीमती आलवंदर यांच्या साक्षीच्या वेळचा! श्रीमती आलवंदर या जेव्हा साक्षीदाराच्या पिंजर्‍यात आल्या, तेव्हा काचेच्या पेटीत बंदिस्त केलेलं छाटलेलं, ते विद्रूप मुंडकं ओळख पटवण्यासाठी त्यांच्या पुढ्यात आणलं गेलं असता, त्यांनी एक मोठा हंबरडा फोडला आणि त्या मोठमोठ्यानं हुंदके देत ओक्साबोक्शी रडू लागल्या. हे पाहून त्या वेळी तिथं कोर्टात उपस्थित असलेल्या सर्वांची अंतःकरणं हेलावली आणि ज्युरींसह कोर्टरूममधल्या सर्वांचे डोळे पाणावले.
परंतु देवकीनं आपल्या भावपूर्ण व संगतवार बोलण्यानं आपली बचाव पक्षाची बाजू सावरून धरली. आपण अविवाहित व कुमारिका असताना, आलवंदरनं आपल्याला साड्यांचा मोह देऊन कसं फशी पाडलं ते थोडक्यात सांगून; तिनं आपण आलवंदरचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्याच्याशी असलेले संबंध तोडून प्रभाकरबरोबर आई-वडिलांच्या संमतीनं रीतसर ठरवून लग्न केल्यावर देखील आपण त्याच्यासोबत पुन्हा पूर्वीसारखे अनैतिक संबंध ठेवावे म्हणून, आपल्याला आलवंदर निर्लज्जपणे कशी गळ घालत होता ते स्पष्टपणे कोर्टात सांगितलं. हॉटेलवर आलवंदरच्या कमिशनचे पैसे द्यायला गेल्यावर त्यानं, आपल्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करून, आपल्याला कशी सर्वांसमक्ष लाज आणली, तेही तिनं कसलीही भीडभाड न बाळगता अगदी तपशीलवार सांगितलं.

देवकीने जेव्हा भरलेल्या कोर्ट रूममध्ये, लग्न झाल्यावर सतत माझा पिच्छा पुरवून मला त्रास देण्यार्‍या आलवंदरनं सर्वांच्या देखत गलिच्छ वागण्याचा अगदी कळस केल्यावर, मी त्याला जेव्हा पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली, तेव्हा तो आमच्या घरी आला व मी खूप पूर्वीच… लग्नापूर्वीच त्याची उधारी चुकती केलेली असूनसुद्धा, तो बेशरमपणे मी जणू त्याची देणेकरी आहे असे समजून, माझ्यावर तुटून पडून, मला विवस्त्र करायचा प्रयत्न करायला लागल्यावर, माझ्या पतीनं बाहेर येऊन, माझं शीलरक्षण करण्याचं आपलं आद्य कर्तव्य पार पाडलं आणि तसं करताना त्यांच्या हातून अपघातानं चुकून हत्या झाली,’ असं प्रांजळपणे व धीटपणे सांगितलं. कुख्यात असलेल्या, आलवंदरच्या व्यभिचाराच्या कर्मकहाण्या ऐकून, अगोदरच त्याच्याबद्दल आकस बाळगून असलेल्या न्यायमूर्तींच्या मनातली, चाकूच्या घावाला बळी पडलेल्या आलवंदरबद्दल असलेली उरलीसुरली सहानुभूतीही नष्ट झाली.

डॉ. सी. बी. गोपाळकृष्ण या शवविच्छेदन करणार्‍या अधिकार्‍याची कोर्टातली साक्ष तर सर्वांत महत्त्वपूर्ण आणि बुद्धिनिष्ठ ठरली. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळेला आणि भिन्न तारखेला, प्राप्त झालेलं मस्तक आणि धड हे त्या आलवंदरचं असल्याचं विधान केल्यानंतर, त्या विधानाला पुष्टी देण्यासाठी उदाहरण देऊन, योग्य ते पुरावेही त्यांनी कोर्टापुढे मांडले. त्यानंतर खून नक्की कसा घडला, हे बाळबोधपणे समजावून सांगण्यासाठी त्यांनी मद्रासमधल्या एका स्टुडिओला खास विनंती करून ‘डमी’ किंवा मृत आलवंदरसदृश असणारा, हुबेहूब तसाच दिसणारा असा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पुतळा बनवून घेतला व स्वतः हातात खोटा सुरा घेऊन, घाव कसा घातला गेला असावा, हे कोर्टात सर्वांसमक्ष साभिनय सादर करून दाखवलं.
बरेच दिवस अविरत गर्दीनं ओसंडून वाहणार्‍या ‘कोर्ट रूम नंबर ४’ मधल्या या जगप्रसिद्ध खूनखटल्याची कार्यवाही अखेर संपुष्टात आली. होता होता निकालाचा दिवस उजाडला. सर्व जगाचे डोळे या निकालाकडे लागलेले होते. कोर्ट रूम, कोर्टाचं आवार, कोर्टाच्या सभोवतालचा परिसर आणि आजूबाजूचे अगदी स्टेशनपर्यंत जाणारे लांबलचक रस्तेही माणसांनी फुलून गेले होते. सर्वांत आधी आपल्याला ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळावी म्हणून पत्रकार धडपडत होते. आलवंदरचे आणि मेनन कुटुंबीयांचे नातेवाईक व मित्र; तसंच पत्रकार, पोलिस, व्यावसायिक, राजकारणी आणि सामान्य नागरिक… सारेच जण मोठ्या उत्कंठेनं निकालाची वाट पाहत होते.

अखेर सर्वांच्या या प्रतीक्षेचा अंत झाला. या प्रचंड गाजलेल्या ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला! माननीय न्यायमूर्तींनी प्रभाकर आणि देवकीला दोषी ठरवून; प्रभाकरला सक्तमजुरीसह सात वर्षांचा कारावास आणि देवकीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
हा निकाल ऐकल्यावर प्रभाकर आणि देवकी मेनन सुप्रीम कोर्टात अपील करणार होते, परंतु त्यांच्या वकिलांनी त्यांना तसं न करण्याचा सल्ला दिला. कारण त्यांची बाजू तितकीशी बळकट नसल्याने, सुप्रीम कोर्टात निकाल नक्कीच त्यांच्या विरुद्ध लागून, त्यांना फाशी किंवा जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा होण्याचीच जास्त शक्यता होती.
***

प्रभाकर आणि देवकी यांची रवानगी, मद्रासच्या मध्यवर्ती कारागृहात झाली. तिथं त्यांची चांगली वर्तणूक पाहून त्यांना, शिक्षेत काही वर्षांची सूटही देण्यात आली. अंदाजे साधारण १९५५-५६ साली ते दोघंही तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर पडले.
यानंतर केरळ इथे आपल्या मूळ गावी परतून, त्यांनी छोटासा धंदा सुरू केला. एका छोट्याशा टी स्टॉलचे ते लवकरच मालक बनले आणि त्यानंतर त्यांची उत्तरोत्तर भरभराटच होत गेली. त्यांनी पलक्कड इथं एक आलिशान हॉटेल बांधलं. त्यांची त्यांच्या मेनन समाजातल्या व पलक्कडमधल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित अशा उच्च्भ्रू मंडळींत गणना होऊ लागली. पण असं असूनदेखील ते, आपल्या खर्‍या उपकारकर्त्याला कधीही विसरले नाहीत. आपल्या देवघरात देवांच्या मूर्तीसोबत त्यांनी न्यायमूर्ती ए. एस. पी. अय्यर यांचाही फोटो ठेवला होता. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, ते त्या फोटोला आदरपूर्वक नमस्कार करत आणि पूजेच्या वेळी इतर देवांसोबत, त्या फोटोचीही ते भक्तिभावानं पूजा करत.

‘आमचं उर्वरित आयुष्य आणि आयुष्यात कमावलेलं यश… सारं काही… अगदी आमचं सर्वस्वही… देवासमान असलेल्या न्यायमूर्ती अय्यर यांनी दिलेली, एक देणगीच असून, त्यांनी आमच्यावर कधीही न फिटणारे उपकारच केले आहेत,’ असंही ते नेहमी उघडपणे म्हणत.
ही ‘आलवंदर मर्डर केस’ फॉरेन्सिक विभागाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली असल्यानं, ती अजूनही चर्चिली व अभ्यासली जाते. मेल्यानंतर इतकी वर्षं उलटूनदेखील आलवंदरचं नाव अजूनही घेतलं जातं. ‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ हे वचन आलवंदरनं वेगळ्याच प्रकारे सिद्ध केलं आहे!

– कल्पिता राजोपाध्ये

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.