Now Reading
दुर्गंध (आलवंदर मर्डर केस भाग १)

दुर्गंध (आलवंदर मर्डर केस भाग १)

Menaka Prakashan

मोह आणि मत्सर या दोन्हीला माणसाचा शत्रू म्हटलं आहे आणि त्यापासून दूरच राहण्याचा सल्ला दिला जातो. पण ते फार कमी जणांना जमतं, याचा अनुभव आपण पदोपदी घेतोच. मात्र मोह आणि मत्सर माणसाला कोणत्या थरापर्यंत घेऊन जातात आणि माणसाला कसं छिन्न-विछिन्न करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आलवंदर मर्डर केस…

प दशकात ‘नानावटी मर्डर केस’ भारतातच नव्हे तर विदेशातही गाजली होती. त्याच दशकात आणखी एका साधारण तशाच प्रकारच्या एका घटनेनं, फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतातच खळबळ माजवली होती. काही नामांकित अशा परदेशी वृत्तपत्रांनीसुद्धा, ह्या घटनेला ठळकपणे प्रसिद्धी दिली होती. भारतात सर्व दाक्षिणात्य भाषांत आणि इंग्लिशमध्ये या घटनेवर आधारित बर्‍याच कादंबर्‍या, कथा लिहिल्या गेल्या, तर परदेशातही ह्या घटनवरून प्रेरित होऊन, काही कथा, लघुकथा लिहिल्या गेल्या. या घटनेवर आधारित एक-दोन सिनेमेही दाक्षिणात्य भाषांत निघाले. परंतु सर्वांत गाजली ती ‘दीना थांती न्यूज पेपर ग्रुप’ ह्या प्रकाशन संस्थेनं बनवलेली तेरा भागांची टीव्ही सिरीयल! तामिळमधली ही मालिका नंतर इतर काही भारतीय भाषांमध्येही डब करण्यात आली होती. मद्रास (आता चेन्नई) दूरदर्शनसाठी १९९५ साली बनवलेली ही मालिका, त्यात तांत्रिक त्रुटी असूनही अत्यंत लोकप्रिय ठरल्यानं, वारंवार दूरदर्शनवर पुन:प्रक्षेपित करण्यात आली. अजूनही ती मालिका पुन:प्रक्षेपित झाल्यावर प्रेक्षक ती मालिका आवडीनं पाहतात.

ह्या घटनेवरून प्रेरित होऊन रंगादुराई उर्फ रँडॉर ह्या सुप्रसिद्ध सिनेइतिहासकार, सिनेपत्रकार आणि लेखकानं संशोधन करून लिहिलेल्या ‘द आलवंदर मर्डर केस’ या अत्यंत लोकप्रिय साहित्यकृतीवर आधारित ‘आलवंदर कोलाय वलक्कु’ ही मालिकाही टीव्हीवर लोकप्रिय ठरली.
एव्हढ्या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेचा मूळ कथाविषय म्हणजेच, ती मालिका ज्या घटनेवर आधारित होती ती कित्येक दशकं बहुचर्चित असणारी घटना. म्हणजे एक प्रेमत्रिकोणच होता. आणि या प्रेमत्रिकोणाचा अंत एका भयानक हत्येत झाला होता.
* * *

तो १९५२ च्या ऑगस्ट महिन्याचा अखेरचा दिवस होता. चेन्नई म्हणजे तेव्हाच्या मद्रासमधल्या सर्वाधिक खपाच्या ‘द हिंदू’ या वृत्तपत्राच्या सकाळच्या शहर आवृत्तीमध्ये, पहिल्या पानावर ठळक अक्षरात ‘एक व्यावसायिक गूढ रीतीनं बेपत्ता’ ह्या मथळ्याखाली एक बातमी छापून आली होती. ह्या बातमीनं सर्वच वाचकांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. हल्लीच्या मानानं तेव्हाचं, पन्नासच्या दशकातलं मद्रासमधलं जनजीवन बरंचसं शांत, सुस्त व थंड असल्यानं, वर्तमानपत्रातल्या त्या बातमीनं जनजीवन ढवळल्यासारखं झालं.

शांत समाजजीवन खळबळवून टाकणारी, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना भयग्रस्त करणारी वृत्तपत्रातील ती बातमी; एका महिलेनं आपल्या कुटुंबाच्या साहाय्यकर्ता व दूरच्या नातेवाईक असलेल्या, एका प्रतिष्ठित उद्योजकाद्वारे, मद्रास मधल्या, ‘एस्नेड’ या विभागात असणार्‍या, ‘लॉ कॉलेज पोलीस स्टेशन’मध्ये; २९ ऑगस्ट १९५२ या तारखेला नोंदवलेल्या ‘मिसिंग कम्ेंट’वर आधारित होती. स्वतःला श्रीमती आलवंदर म्हणवून घेणार्‍या चाळिशीच्या जवळ असलेल्या, साध्या-सुध्या गृहिणीसदृश्य दिसणार्‍या, एका महिलेनं आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार, त्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असलेल्या इन्स्पेक्टर रामनाथ अय्यर यांच्याकडे, एम. सी. कन्नन चेट्टी यांच्या मार्फत नोंदवलेली होती. तिच्या सांगण्यानुसार; अठ्ठावीस ऑगस्ट १९५२ ला नेहमीप्रमाणे ‘दुपारी घरी जेवायला येतो’, असं सांगून कामावर गेलेला तिचा पती संध्याकाळ होऊन गेल्यावरही घरी न परतल्यानं चौकशी करायला, एका कोपर्‍यात असलेल्या त्याच्या ॅस्टिकच्या वस्तूंच्या छोट्याशा दुकानात गेली; तेव्हा ते दुकान तात्पुरतं बंद असल्याचं तिला दिसलं. शोरूममध्ये काम करणार्‍या स्टाफकडून तिला असं समजलं की; आपण पैशाच्या थकबाकीच्या एका वसुलीसाठी ‘रोयापूरम’ इथं जात आहोत, असं सांगून, आपलं दुकान तात्पुरतं बंद करून तिचा नवरा दुपारी निघून गेल्यानंतर, पुन्हा त्या दुकानात परतलाच नव्हता.

दुकानातल्या स्टाफनं ‘रोयापूरम’ असं म्हटल्यावर, तो नक्कीच त्याच्या पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीला भेटायला गेलेला असावा, असा तर्क काढून, ती दुसर्‍या दिवशी सकाळी पत्ता शोधत त्या मैत्रिणीच्या घरी गेली. तिने दरवाजा ठोठावल्यावर, त्या मैत्रिणीच्या नवर्‍याने दरवाजा उघडून, आपली पत्नी घरी नसल्याचं आणि त्या बाईचा नवरा तिथं मुळी आलेलाच नसल्याचं तिला सांगितल्यावर; ‘काहीतरी अघटित तर झालेलं नाही ना’ अशी तिला भीती वाटू लागली आणि म्हणूनच पुन्हा त्या शोरूममध्ये परतून, तिनं त्या शोरूमचे मालक एम. सी. कन्नन चेट्टी यांना सगळी हकिगत सांगितली. तिचं बोलणं शांतपणे ऐकल्यावर त्यांनी तिला वेळ न घालवता लगेचच पोलिसात तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. परंतु तिनं एम. सी. कन्नन चेट्टी यांनाच स्वतः पोलिसात जाऊन तक्रार नोंदवण्याची विनंती केली. ती फारशी शिक्षित, बाहेरच्या जगाचा जराही अनुभव नसलेली, एकदम साधीच गृहिणी होती व ती फारच घाबरलेली असल्यानं; तिला मदत करण्यासाठी, केवळ दयेपोटी, एम. सी. कन्नन चेट्टी स्वतः पोलिस स्टेशनवर आले व त्यांनी तिच्यासाठी स्वतःच तक्रार नोंदवली.

तक्रार नोंदवल्याच्या दुसर्‍या दिवशी, तिनं स्वतः त्या ‘लॉ कॉलेज पोलीस स्टेशन’वर येऊन, त्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असलेल्या इन्स्पेक्टर रामनाथ अय्यर यांना सांगितले की, ‘‘ज्या दिवशी माझा पती बेपत्ता झाला त्या दिवशी, त्याची ती मैत्रीण त्याला भेटायला म्हणून, बर्‍याच दिवसांनी त्याच्या दुकानात आली होती व तिच्या पाठोपाठ काही वेळानं माझा नवराही दुकानाच्या बाहेर पडला होता. तो नक्कीच तिच्या घरी गेलेला असणार! कारण रोयापुरममध्ये दुसर्‍या कोणालाही तो अजिबात ओळखत नाही. त्या मैत्रिणीच्या नवर्‍याला नक्कीच माझा पती कुठे आहे हे ठाऊक आहे. तो खोटं बोलतोय. कदाचित माझा नवरा तिच्या सोबत पळूनही गेला असावा. कृपया तुम्ही स्वतः जातीनं या प्रकरणात लक्ष घालून, त्या मैत्रिणीच्या नवर्‍याची चौकशी करा.’

इन्स्पेक्टर रामनाथ अय्यर यांनी, त्या दुकानातल्या इतर कर्मचार्‍यांकडे चौकशी केली. त्या कर्मचार्‍यांनीही एम. सी. कन्नन चेट्टी व श्रीमती आलवंदर यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि त्याशिवाय त्या वेळी योगायोगानं कंपनीच्या त्या शोरूममध्ये उपस्थित असलेल्या ‘वेंकटरंगन’ ह्या समाजसेवकानं व उगवत्या पुढार्‍यानंही; एक विशीतली चटपटीत आणि आकर्षक महिला, दुपारी या दुकानात येऊन गेल्यावर, काही वेळानं तिच्या पाठोपाठ आलवंदरही दुकान बंद करून बाहेर पडल्याचं, आपण स्वतः पाहिल्याचं, पोलिसांना सांगितल्यावर इन्स्पेक्टर रामनाथ अय्यर यांनी त्या महिलेच्या पतीला पोलीस स्टेशनवर बोलावून घेण्यासाठी, आपल्या हवालदाराला त्याच्या घरी रोयापुरम इथं पाठवण्याचं ठरवलं.
हवालदारानं त्याच्या घराला मोठ्ठं कुलूप असल्याचं कळवल्यावर, हेड कॉन्स्टेबल जयराम अय्यर यांना तिथं अधिक चौकशीसाठी पाठवण्याचं ठरलं.
***

वर्तमानपत्रातल्या त्या बातमीत; ज्या गूढरीत्या बेपत्ता झालेल्या व्यावसायिकाविषयी उल्लेख केलेला होता, तो व्यावसायिक होता- आलवंदर! मद्रासमध्ये राहणारा एक चाळिशीतला, साडेपाच फूट उंचीचा, भक्कम बांध्याचा, उजळ गव्हाळ वर्णाचा, अत्यंत रुबाबदार आणि एखाद्या फिल्म स्टारसारखा देखणा आणि दोन अपत्यांचा बाप असलेला संसारी गृहस्थ! या आलवंदरनं दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात नोकरी केली होती आणि आवडी इथल्या आर्मी ऑफिसमध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर या पदावर तो कार्यरत होता. दुसरं महायुद्ध संपलं आणि त्याची शॉर्ट टर्म सर्व्हिसही संपली आणि ‘आता मग उपजीविकेसाठी पुढे काय करावं’ हा प्रश्न पडला. त्याची चाळिशी उलटल्यामुळे, दुसरी सरकारी नोकरी मिळवणं कठीण जाणार होतं. म्हणून त्यानं सेल्समनची नोकरी किंवा एखादा व्यवसाय करावा असं ठरवलं. त्यानं प्रथम काही काळापुरती एका कंपनीत सेल्समनची नोकरी केली. पण महिन्याकाठी मिळणारी ठराविक रक्कम त्याला अपुरी पडत असल्यानं त्यानं स्वतःचा व्यवसाय करून, भरपूर पैसे कमावण्याचा निश्चय केला. त्या दशकात बाजारात नुकत्याच आलेल्या ॅस्टिकच्या उत्पादनांनी धूम मचवली होती. ॅस्टिकच्या गृहोपयोगी वस्तू काटकसरी आणि संसारी लोकांमध्ये हळूहळू लोकप्रिय होत होत्या. त्या वस्तूंची विक्री करण्याचा व्यवसाय, जर एखाद्यानं करण्याचं ठरवलं, तर त्यासाठी भांडवलही फार लागत नसे. अशाप्रकारे आलवंदरनं ‘स्वस्त आणि मस्त’ असलेल्या ॅस्टिकच्या घरगुती उत्पादनांचा व्यवसाय करण्याचं ठरवलं.

आलवंदर हा कोमटी चेट्टी म्हणजेच वैष्णव पंथीय असलेल्या तेलगू भाषिक वैश्य-वाणी समाजातला होता. नोकरीऐवजी स्वतंत्र धंदाच करायला प्राधान्य देणार्‍या या कोमटी चेट्टी समाजातले, बरेच लोक चाळीसच्या दशकापासून मद्रासमध्ये येऊन विविध प्रकारच्या व्यवसाय-धंद्यात स्थिरस्थावर झाले होते. (चायना टाउन वा पॅरीज कॉर्नर आणि कोतवाल चावडी यासारख्या ठिकाणांची भरभराट मुळातच हाडाच्या उद्योजक असणार्‍या, त्या कोमटी चेट्टी लोकांमुळे झालेली आहे असंही म्हंटलं जातं.) एम. सी. कन्नन चेट्टी या श्रीमंत व यशस्वी उद्योजकानं, आलवंदरला मदत म्हणून, त्याच्या ॅस्टिकच्या वस्तूंच्या विक्रीसाठी, त्याला आपल्या कंपनीच्या अगदी जवळच, एकदम मोक्याच्या जागी असणार्‍या, मोठ्या शोरूमच्या, प्रवेशद्वाराच्या जवळच, अगदी समोरच असलेला एक कोपरा आनंदानं देऊ केला.

‘जेम अँड कंपनी’ तेव्हा दणक्यात आपल्या उत्पादनांची विक्री करत असे. त्यांची शोरूम अत्यंत स्वच्छ, नीटनेटकी आणि आकर्षकरीत्या सजवलेली होती. जेम अँड कंपनी या दुकानातून फौंटन आणि बॉल पॉईंट पेन विकत घेऊन वापरणं हे त्या काळात मद्रासमध्ये प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असे. त्या शोरूममध्ये पेन विकत घ्यायला येणारे ग्राहक, जाता-येता कोपर्‍यातल्या त्याच्या त्या ॅस्टिकच्या वस्तूंच्या दुकानात सहज म्हणून डोकावून जात असत आणि आवडल्यास एखादी गृहोपयोगी वस्तूही विकत घेत. थोडक्यात म्हणजे ‘जेम अँड कंपनी’च्या शोरूमच्या अंतर्भागात जागा मिळाल्यानं आलवंदरचा फायदा होत होता.

आलवंदर उत्तम राहणी ठेवण्याबद्दल नेहमीच दक्ष असे. तो कडक इस्त्रीचा सूट आणि त्याच्याशी मिळत-जुळता टाय किंवा बो व सॉक्स-शूज घातल्याशिवाय घराबाहेर कधीच पडत नसे. ‘व्यवस्थितपणे भांग पाडून, पोमेड लावून चप्प बसवलेले केस, व्यवस्थित घोटलेली दाढी, सभोवती दरवळणारा आफ्टर शेव आणि टाल्कम पावडर, कोलोनचा दरवळ आणि त्यासोबत नेहमीच चेहर्‍यावर खेळणारं प्रसन्न हसू’ ही त्याच्या व्यक्तित्वाची खास वैशिष्ठ्यं होती. ब्रिटिश अधिकार्‍यांच्या सहवासात राहिल्यानं तो रीतिरिवाज पाळण्यात आणि स्त्री दाक्षिण्य दाखवण्यात तत्पर बनलेला होता. तो अनोळखी लोकांनाही स्वतःहून ‘हॅलो’ म्हणून अभिवादन करत असे आणि ओळखीच्या लोकांची तर आपुलकीनं विचारपूस करत असे. त्याच्या पेहरावामुळे आणि एकंदरीत सभ्य गृहस्थाप्रमाणे भासणार्‍या, दिखावटीच्या वागण्या-बोलण्यामुळे, बरेच जण, खास करून स्त्रिया त्याच्यावर भाळत. त्यानं प्रतिष्ठित क्लब्जची मेंबरशिप घेतलेली होती. समाजातल्या उच्च मध्यमवर्गात त्याची ऊठ-बसही होती.

आलवंदरनं आपल्या सर्व ओळखींचा व आपल्या जादुई व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं. आणि त्यानं जोडधंदा म्हणून घरोघर जाऊन साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करण्यामागे त्याचा अंतस्थ हेतू, अगदी वेगळाच आणि अत्यंत कुटिल होता.
आलवंदर जरी सज्जन दिसत असला तरी मनातून तो स्त्री सहवासाचा लोभी, नेहमीच परस्त्रियांचा उपभोग घेण्याची इच्छा बाळगणारा, व्यभिचारी व अत्यंत नीच मनोवृत्तीचा होता. त्याच्या या साडी विकण्याच्या व्यवसायामुळे त्याला बिनदिक्कत कधीही, घरात पुरुष माणूस नसतानाही, कोणाच्याही घरी जाऊन गृहिणीशी वार्तालाप करता येणार होता आणि जमल्यास स्त्री सहवासाची मनोकामनाही पूर्ण करता येणार होती.

आलवंदर हा एक अत्यंत चलाख व्यावसायिक होता. स्त्रियांना ‘आपल्या बजेटच्या बाहेर असणार्‍या, परवडू न शकणार्‍या किंवा आकर्षक असलेल्या पण मुद्दामच किमती वाढवून, अतिशय महाग बनवलेल्या साड्या विकत घेण्यास उद्युक्त करण्यासाठी, त्याने एक आकर्षक स्कीम बनवलेली होती. ती ‘स्कीम’ म्हणजे ‘सारी बाय इंस्टॉलमेंट’. त्या काळात ही योजना अगदी नवीनच होती आणि ती योजना राबवणारा आलवंदर हा एकमेवच साडी विक्रेता होता. ज्या काळात साडी दुकानदार साडी विकताना, ग्राहकांना त्यांच्या जवळ असलेले पैसे कमी पडल्यास खरेदीदारांचा तोंडावर उघड-उघड अपमान करत; त्या काळात, ‘एखाद्या सिनेनटासारखा टापटिपीची राहणी असणारा देखणा विक्रेता, आपल्याला हसत-हसत एखादी किमती साडी, स्वतः जवळच्या घरखर्चातून कशाबशा वाचवलेल्या त्या तुटपुंज्या पैशात देऊन, हप्त्या-हप्त्यानं साडीचे उरलेले पैसे वा बाकीचं मूल्य, नंतर द्यायला सांगतो,’ हे साध्यासुध्या गृहिणी असणार्‍या महिलांना तर फारच भावलं. नोकरदार असलेल्या सुशिक्षित स्त्रियांनाही, ही स्कीम आवडली. आलवंदरच्या साड्या किमतीनं थोड्या महाग असल्या तरी रंग, डिझाईन आणि पोत यांनी उत्तम असत. तो नेहमीच नवनवीन आणि आकर्षक माल ठेवत असे. एकदम मिठ्ठास वागणं-बोलणं असलेला आलवंदर कधी आपल्या घरी येतो आणि त्याच्याकडच्या नव्या आलेल्या साड्या दाखवतो असं त्या परिसरातल्या महिलांना वाटायचं. परिणामतः गरज नसतानाही, महाग साड्या घेण्याकडे स्त्रियांच्या मनाचा कल वाढला व आलवंदरच्या साड्यांची प्रचंड विक्री होऊ लागली. परंतु आलवंदरच्या साड्यांची एव्हढी विक्री होऊनही, तो तितकासा श्रीमंत झालेला नव्हता. याला कारण होता तो त्याचा छंदी-फंदी स्वभाव! तो व्यसनी होता. आपल्याला अस्थम्याचे झटके येतात म्हणून त्यानं डॉक्टरांकडून स्वतःसाठी अफू प्रिस्क्राईब करून घेतली होती पण त्यामागचं खरं कारण निराळं होतं. ‘अफू कामोत्तेजक आहे’, असा गैरसमज झालेला असल्यानं तो अफूचं भरपूर सेवन करत असे. याशिवाय रोज क्लबमध्ये जाताना त्याला नेहमी स्वतःसोबत, डान्स करायला, वेळ मजेत घालवायला एक फॅशनेबल तरुण, सुंदर मुलगी हवीच असायची आणि त्याला त्या तरुणी नेहमी बदलत्या हव्या असायच्या. त्याचे हे किस्से अर्थात त्याच्या पत्नीच्या कानावर जायचे परंतु स्वतः फारशी शिकलेली आणि मिळवती नसल्यानं तसंच पदरात दोन मुलं असल्यानं ती त्याच्या बेताल आणि बेलगाम वागण्याकडे काणाडोळा करत होती.

ज्या स्त्रियांना एक-दोन हप्त्यांनंतर पुढचे हप्ते भरता येणं शक्य होतच नसे, त्यांच्यासाठी तर त्यानं वेगळीच पद्धती, वस्तुविनिमय पद्धती (इंस्टेड कॅश पे इन काईंड) अवलंबलेली होती. तो त्या स्त्रियांना आपल्या सोबत शय्यासोबत करण्यास भाग पाडे. त्यांना आपल्या त्या फौंटन पेनच्या शोरूमच्या आत असलेल्या दुकानात बोलवून, मग त्यांना लॉजवर घेऊन जात असे. ब्रॉडवे लॉज हे त्याचं नेहेमीचं लॉज होतं. आलवंदर स्वतःला ‘कादलमंदन’ (किंग ऑफ रोमान्स) किंवा ‘कॅसानोव्हा’ समजत असे. त्याचे बर्‍याच स्त्रियांसोबत रोमँटिक व जवळिकीचे संबंध होते, आणि खासगीत तर त्यानं आपल्या एका मित्रापाशी, आपण वेगवेगळ्या जाती-धर्माच्या आणि प्रांताच्या एकंदर चारशेहूनही अधिक स्त्रियांच्यासोबत शय्यासोबत केल्याची बढाईही मारली होती. (‘कोणातही मानसिकरीत्या न गुंतता, कायम अलिप्त व मोकळेच राहून फक्त शारीरिक संबंध ठेवून, कार्यभाग उरकून झाल्यावर, पुन्हा नवनव्या सावजांचा शोध घेणं’ हेच आपलं जीवनध्येय वा तत्त्व असल्याचंही तो त्या मित्राला म्हणाला होता. आलवंदर हा एक ‘पेशंट वूल्फ’ होता, असंही म्हटलं जातं.) आपली सारी विवाहबाह्य प्रकरणं छुपेपणानं करण्यात तर आलवंदरचा हातखंडाच होता. त्याच्या पत्नीच्या कानावर सारं काही जाण्याची शक्यता कमीच होती आणि समजा तिला जरी काही कळलं तरीही, ती त्याच्यावर आर्थिकदृष्ठ्या अवलंबून असल्यानं, फारशी शिकलेली नसल्यानं, साधी अननुभवी गृहिणी असल्यानं व घटस्फोट घेणं तिच्या दृष्टीनं अशक्य असल्यानं, त्याच्या चुकांना माफ करण्याची वा त्याच्या भानगडींच्याकडे काणाडोळा करण्याचीच शक्यता जास्त होती.
आलवंदरला मनमुराद स्त्रीसहवास उपभोगायला मिळत होता. आपण जणू स्वर्गातच आहोत असं त्याला वाटत होतं. ‘हेच व असंच सुखी आयुष्य कायमच राहील’ असं त्याला वाटत होतं. परंतु नियतीच्या मनात काय आहे हे कधीच कोणालाच कळत नाही… नियतीचा खेळ निराळाच असतो! नातेसंबंधांच्या गुंत्यात गुंतून पुन्हा मोकळा राहणारा हा आलवंदर, त्याच्याही नकळत कोणात तरी गुंतला आणि तिथंच त्याचा घात झाला. त्याच्या जीवनाची शोकांतिकेकडे अटळ वाटचाल सुरू झाली!

आलवंदर ज्या स्त्रीमध्ये कळत-नकळत गुंतला, ती स्त्री होती देवकी मेनन!
तो १९५१ मधला ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा होता. मद्रासमधलं वातावरण अतिशय दमट झालेलं होतं. घामाघूम झालेली, विशीतली एक तरतरीत तरुणी ‘जेम अँड कंपनी’च्या त्या दुकानात कोणाला तरी भेट देण्यासाठी म्हणून पेन विकत घेण्यासाठी आली. अत्यंत बांधेसूद आणि रेखीव नाक-डोळ्यांची ती तरुणी पाहिल्यावर आलवंदर स्वतःच पुढे सरसावला. आलवंदरनं प्रथम मंदपणे गरगरणारा पंखा मोठा करून, तिला थंड पाणी प्यायला दिलं आणि नंतरच तो तिला निरनिराळे पेन दाखवू लागला. आवडलेलं पेन महाग वाटलं म्हणून किंवा जवळ पुरेसे पैसे नसल्यानं, पेन विकत न घेता ती तरुणी परत जाणार तोच, बोलघेवड्या आलवंदरनं तिला थांबवून, ‘जवळ पैसे नसतील तर, नंतर पैसे दिले तर चालतील’ अशी हमी दिली आणि विक्रेत्याला ते पेन गिफ्ट पॅक करून द्यायला सांगितल्यावर ती तरुणी म्हणाली, ‘तुम्ही असं का करता? समजा मी हे पेन घेतल्यानंतर परत आलेच नाही तर? तर… तर तुमचं नुकसान होईल ना!’ यावर संभाषणकलेत चतुर असलेला आलवंदर मोठ्या तत्परतेनं म्हणाला, ‘बिलकूल नाही! आमचं नुकसान कधीच होत नाही! तुमच्यासारखी निष्पाप आणि प्रामाणिक तरुणी, कधीच कोणाचेही पैसे ठेवून घेणारच नाही… किंवा बुडवणार नाही. समजा यदाकदाचित तुम्ही जर पैसे द्यायला विसरलात किंवा कामात गर्क असल्यानं चुकून-माकून तुमचे पैसे देणे जर राहूनच गेलं… तरीही आमचं काहीही नुकसान होणार नाही. कारण आपल्या खास पसंतीनं, आपल्याच आवडीनं विकत घेतलेलं हे पेन, तुम्ही मोठ्या खुशीनं वापरणार आहात.. बरोबर ना! आणि तुमची खुशी हाच आमचा सौदा… तुमची पसंती हाच आमचा फायदा!’ गोडबोल्या आलवंदरच्या अशा मिठ्ठास चतुर बोलण्यावर देवकी मनोमन भाळली.

ती बावीस वर्षांची देवकी मेनन आपली आई व आपले वडील रामन मेनन यांच्यासह राहत होती. नुकतंच कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवकी समाजसेविकेचं काम करत होती आणि हिंदीच्या ट्युशन्स घेऊन, आई-वडिलांना घर चालवण्यासाठी मदत करत होती. हे मेनन कुटुंबीय मूळचं केरळच्या पश्चिम बाजूच्या किनारपट्टीत राहणारं होतं आणि नोकरी-धंद्यानिमित्त मद्रास शहरात आलं होतं. रामन मेनन यांना आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता होती, म्हणून ते आपल्या समाजात सुयोग्य वर शोधत होते. परंतु देवकी तर पाहताक्षणीच आलवंदरवर भाळली होती.
प्रथम देवकी आणि आलवंदर यांच्यात फक्त मैत्री होती. दोघं एकमेकांशी फोनवर बोलत. नंतर मुद्दाम वेळ काढून, काही ना काही बहाण्यानं देवकी आलवंदरला भेटायला, त्याच्या दुकानावर येऊ लागली. होता होता दोघांनाही एकमेकांविषयी अनावर आकर्षण वाटू लागलं. एका अनामिक ओढीनं, चुंबकीय आकर्षणानं ते एकमेकांकडे खेचले जाऊ लागले.

आलवंदर आणि देवकीच्या भेटण्या-बोलण्याला एक महिना होऊन गेला होता आणि त्यांच्या प्रेमाची गाडी बोलण्याच्या पलीकडे जरादेखील सरकलेली नव्हती. पुढची पावलं उचलण्यासाठी आलवंदर तर उतावीळ झालेला होता. पण तरीही त्यानं घिसाडघाई करण्याऐवजी, थोडं ‘स्लो’ जाऊन, आपलं काम साधायचं ठरवलं. आपली जुनीच ‘ट्रिक’ वापरायची असं त्यानं मनाशी ठरवलं होतं.
एके दिवशी आपल्याजवळच्या अगदी नवीनच आलेल्या, अद्ययावत फॅशनच्या, आकर्षक रंगसंगतीच्या, तलम ‘इम्पोर्टेड’ नायलॉन-शिफॉनच्या साड्या घेऊन, त्या विकण्याचा बहाणा करून आलवंदर देवकीच्या घरी आला. आपल्यासाठी तो इतक्या दुरून सुंदर-सुंदर साड्या घेऊन आल्याचं पाहून, देवकी मनोमन सुखावली. तिनं त्याच्याकडच्या साड्यांपैकी एक-दोन साड्या पसंतही केल्या पण त्या साड्यांची पूर्ण किंमत तत्काळ चुकती करायला तिच्याजवळ तेवढे पैसे नव्हते. आलवंदरला अर्थातच साड्यांची पूर्ण किंमत नकोच होती! कारण त्याच्याजवळ त्याची स्वतःचीच अशी एक खास बार्टर सिस्टीम होती. आपल्याजवळ असलेल्या नवीन आलेल्या सहाही साड्या तिच्यापाशी ठेवून; नंतर सवडीनं त्यांचे पैसे चुकते करायला सांगून आलवंदर निघून गेला. त्यानं दाखवलेल्या या ‘सहृदयतेनं (?)’ देवकी एकदम भारावून गेली. आपण त्याच्या प्रेमातच पडलोय हे तिनं मनोमन कबूल केलं.

आणि मग दोन-तीन दिवसांनी देवकीला आलवंदरचा फोन आल्यावर ती आलवंदरनं तिला भेटण्याची इच्छा प्रकट करताच, पेन विकत घेण्याच्या बहाण्यानं ती त्याच्या दुकानात त्याला भेटायला आल्यावर, त्यानं तिला सरळ पुढे हॉटेलपाशी जाऊन थांबायला सांगितलं आणि तोही काही वेळानं जेवायला जाण्याच्या बहाण्यानं, दुकान तात्पुरतं बंद करून ब्रॉडवे हॉटेलच्या दिशेनं निघाला. ‘लंच’च्या दरम्यान देवकीला आपल्या जाळ्यात फसवून तिच्याशी शय्यासोबत करण्यात, आलवंदर यशस्वी झाला. अशा रीतीनं एकदा-दोनदा भेटल्यानंतर, त्या दोघांच्या चोरट्या भेटीची एक लांबलचक मालिकाच सुरू झाली. लोकांना संशय येऊ नये म्हणून नेहमी एका हॉटेलमध्ये जाण्याऐवजी इतरही जरा दूरवरच्या लॉजेसमध्ये ते प्रणय रंगवू लागले.
(क्रमश:)

– कल्पिता राजोपाध्ये

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.