Now Reading
दीपमाळ मावळती! उजळती!

दीपमाळ मावळती! उजळती!

Menaka Prakashan
View Gallery

गाण्यामागच्या गोष्टींमागेही किती गोष्टी दडल्या आहेत ते या गोष्टीवेल्हाळ लेखनानं मला सांगितलं. हा केवळ एका गीतकाराचा, त्यात दडलेल्या कवीचा प्रवास नव्हता, तर ती एक शोधयात्रा होती. ज्याच्यामागे कुणीही ‘गॉडफादर’ नाही, असा एक निम्न मध्यमवर्गीय मुलगा आपल्या प्रबळ झपाटलेपणामुळे या रुपेरी जगात चार दशकं गीतलेखन करू शकतो, हे त्या मुलाला जर चाळीस वर्षांपूर्वी कुणी सांगितलं असतं, तर ‘वेडे आहात’ या अर्थानं तो हसला असता…

विशेष म्हणजे आज २०१९ साल संपतानाही ‘आपलं काम अजून सुरू व्हायचंय’ ही ऊर्मी अबाधित आहे ही केवळ सरस्वतीची कृपा! सतत नवतेचा शोध घेण्याचं वेड! आणि हे सारं ‘अळवावरचं पाणी’ आहे याचं भान! म्हणूनच कालच्या कामाचं ओझं नाही, नि उद्याला कोरायचा ध्यास- ही या गाण्यामागची खरी गोष्ट आहे.

कवितेचं गाणं होऊ लागलं, नि मनातल्या ध्रुवतार्‍यांपर्यंत आपण या जन्मात कधी पोचू शकू याची ऊर्जा त्या गाण्यानं दिली. वेळीच एक कळलं, ‘गाणं’ केवळ शब्द-सुरांचंच नसतं; निश्‍चयाचं, संकल्पाचं, होकार-नकाराचं, यश-अपयशाचं, मानवी स्वभावाच्या आकलनाचंही असतं, हे गाण्यानंच शिकवलं.

चित्रपटाचं विश्‍व हे स्वप्नाळू मनांचं विश्‍व आहे. स्वप्नं बघितली जातात, स्वप्नविक्रेते असतात, नि स्वप्नातून बाहेर आल्यावर सत्य न पेलल्यानं स्वप्नच संपवूनही टाकतात, हे मला गाण्यांच्या या प्रवासात वेळीच कळलं, म्हणून मी स्टुडिओ नि घर यात पुरेसं अंतर ठेवत गेलो.

मी वयाच्या तेराव्या वर्षी पहिली कादंबरी लिहिली तेव्हा त्या कादंबरीतही मी ओघानं एक प्रणयगीत लिहलं; अगदी अस्थाई- अंतरे- यमक- यांसह! कीर्तनकारांच्या कीर्तनांपासून ते दारावर येणार्‍या वासुदेवापर्यंत ऐकू येणारं गाणं मी कुठल्या जिज्ञासेनं टिपत होतो हे मला आज सांगता येणार नाही. घरातला रेडिओ जो पुढच्या बटणांनी कधी सुरू झाला नाही, मागून चाक फिरवून दोरीनं- विविध भारती- सिलोन मुंबई-ब, ‘अ‍ॅटजेस्ट’ करावं लागलं, पण त्या रेडिओनं कानाचा ‘डोळा’ केला आणि नामवंत कवींची गाणी अर्थसौंदर्यासह बघण्याची दृष्टी आली. हे सगळं काही ठरवून केलं नव्हतं. मग हे सारं कोण ठरवत असतं? नियतीच आपलं उद्दिष्ट आणि पाऊलवाटा निश्‍चित करते की काय असं वाटायला पुरेसा वाव आहे, असे क्षण माझ्या गीतलेखनाच्या वाटेवर येत गेले हे मात्र खरंय!

नाहीतर कॉलेजमध्ये माझ्याच बरोबरीनं शिकणारा एक विद्यार्थी सुहास कर्णिक- तो संगीतकार असतो काय नि कॉलेजच्या मागच्या हिरवळीवर बसून इतर मुलं जिथं हृदयीचं हितगुज करायचे तिथं तो ‘ट्यून’ देऊन त्यावर मी ‘गाणं’ लिहायचा सराव करायचो काय! पुढं मी अनेक संगीतकारांकडे एकदा ट्यून ऐकली की त्या चालीवर गतीनं लिहून देणारा गीतकार म्हणून चर्चिला गेलो. पण त्या सराईत लेखनामागं वय वर्षं १६ ते २२ अशी सहा वर्षं सुहास कर्णिक, राजू पोतदार, दीपक पाटेकर, अशोक कीर्तने यांच्याकडे अगदी हौसेनं गीतलेखन केलं; तो लेखनाचा अखंड रियाज होता ही खरी गाण्यामागची गोष्ट आहे.

शाळकरी वयात आर्थिक स्थिती टोकाची सामान्य असल्यामुळे ‘आराधना’ची गाणी केवळ थिएटरबाहेर उभं राहून, दरवाजाला कान लावून आपण का ऐकत असू, गाण्याचं शूटिंग बघायला उन्हातान्हात, सायकल हाणत कधी गंगापूर, कधी सोमेश्‍वर असं का पळत असू… मी जयश्री गडकर यांचं ते रूप नि लावणीतली बिजली, गदिमा, खेबुडकरांचे शब्द अनुभवण्यासाठी अगदी साठ पैशांतलं पडद्यालगतचं तिकीट काढून ‘बाई मी भोळी’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘टिळा लावतो मी रक्ताचा’, ‘कुंकू माझं भाग्याचं’ असे तमाशापट अनेकदा का पाहिले, ती ओढ माझ्यातल्या पुढल्या गीतकाराची असेल का?

त्याच वेळी बोरकरांच्या कविता त्यांच्याच तोंडून अनेकदा ऐकणं नि ‘सरीवर सरी’मध्ये चिंब होणं, ‘विशाखा’ असंख्य वेळा वाचून कुसुमाग्रज मनात रुजवणं, बापट-पाडगांवकर करंदीकर यांचे काव्यहोम एकदा नव्हे, पुनःपुन्हा पहिल्या रांगेत बसून ऐकणं, मी त्या क्षणी वयाच्या हिशोबात तेरा-चौदा वर्षांचाच असताना इतर वर्गमित्रांसारखा उनाडक्या करण्यापेक्षा कवितेचा लळा कसा लागत गेला नि या श्रेष्ठ कवींमध्ये मी एवढा जीव का गुंतवला? याचं उत्तर आजही माझ्यापाशी नाही.

कवितेचं कुठलंही वातावरण घरात नसताना कविताच मनात घर कशी करत गेली हे न कळणं हीसुद्धा या गाण्यामागचीच गोष्ट आहे.

जिद्द नि चिकाटी या कलाक्षेत्रातल्या दोन नाकपुड्याच! त्या मला लाभल्या होत्या आणि आरंभीच्या नकारांना सुधारण्याची नवी संधी हा दृष्टिकोन आजतागायत ठेवला म्हणून गीतलेखनाचे ‘रि-टेक’ होत गेले तेव्हाही कणभर डहुळलो नाही. आज मी जेव्हा या टप्प्यावर गीतलेखनाच्या आनंदयात्रेच्या पहिल्या पावलापासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा सगळा नकाशा नजरेसमोर आणतो, तेव्हा वाटतं, केवढी दीपस्तंभ माणसं आपण जवळून पाहिली! ‘लाखो इथले गुरू’ असं म्हणावं असे दिग्गज मला गीत-यात्रेत मिळाले. माणूस म्हणून इतकं समृद्ध होण्याची संधी मला वैपुल्यानं मिळाली हीसुद्धा माझ्यापुरती गाण्यामागचीच गोष्ट आहे.

इथं मी शेकडो माणसांमध्ये वावरलो, पण जीव जडवावा, निरपेक्ष मैत्रीनं एखाद्या पावसाळी संध्याकाळी कॉफी हाऊसमध्ये भेटावं असा काही मित्र मला इथं का भेटला नसावा? मी व्यवहार नि काम झाल्यावर अलिप्तता हे इथलं नात्यातलं सूत्र अनुभवलं. माणसं वाईट नव्हती, पण नव्या पुढच्या कामाच्या शोधात ठेवणारी इथली ‘इन्सेक्युरिटी’ भविष्याची अनिश्‍चितताही इथं पावलोपावली. राग-द्वेषाचे, पक्षपाताचे अनुभव फारसे वाट्याला आले नाहीत, कारण मी व्यावसायिक गीतलेखनही ईर्षेनं केलं नाही. काही झालं तरी ‘नंबर वन’ असायचंच ही जबरदस्ती स्वतःवर न केल्यामुळे मी इथं केवळ आनंद नि आनंदच घेतला.

सगळंच काम मनासारखं झालं का?
निश्‍चितच नाही! तडजोडीचं वीणकाम करण्याचं प्रवीण काम करणं हेच इथलं कौशल्य. ते करावंच लागलं. पण हाती जे आलं ते काम मनापासून केलं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी बोलता बोलता मला आधार देणारा सल्ला दिला- ‘‘चित्रपटसृष्टी हा बाजार आहे. बाजारात वस्तू विकल्या जातात, आपण उत्तम वस्तू विकाव्यात.’’

१९८२-८३ मध्ये मला चित्रपटगीत-लेखनाची संधी मिळाली तेव्हा आपल्याला उत्तम वाटणार्‍याही वस्तूंचा जमाना दूर गेला होता.

माझ्या मनात जगाच्या पाठीवर, सुवासिनी, एकटी, मोलकरीण अशा चित्रपटांतली गाणी गुंजत होती.आपल्या लेखणीतून गदिमा-बाबूजींसारखं काम घडावं असं सारखं वाटत होतं. तो जमाना माझ्यासमोर संपला. गदिमा गेले, बाबूजींनी वयानुसार काम केलं. मग वीट यावा इतका तमाशापटाचा जमाना लांबला. तो पाटील, सरपंचाचा कावेबाजपणा, एखादा खून, सवाल-जबाब यांत एखादाच ‘सामना’, ‘उंबरठा’ असे. बाकीचे ‘एक गाव बारा भानगडी’च! जगदीश खेबुडकरांनी ‘पिंजरा’ निमित्तानं उत्तम काम केलं. या सर्व ‘तमाशा पटा’च्या जत्रेत सुधीर मोघे ‘जानकी’त उत्कृष्ट गाणी देत होते. मोघेंनाही त्यांच्या क्षमतेचे चित्रपट मिळाले नाहीत असं मला वाटतं. खूप वेगळ्या वाटेनं जाणारी खरी काव्यात्मक लेखणी. ‘रात्रीस खेळ चाले…’ सारखं गाणं ‘हा खेळ सावल्यांचा’ निमित्तानं त्यांनी दिलं. पण त्यांनाही बाबूजींचा बहराचा काळ मिळाला नाही. पण भावगीतात त्यांनी संस्मरणीय काम केलं. राम फाटक, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर सुधीर मोघेंनी ‘पक्ष्यांचे ठसे’ गीतावकाशावर उमटवण्याचा निकरानं प्रयत्न केला. पण त्यांची क्षमता पाहता, आरती प्रभूंप्रमाणे ‘गेले द्यायचे राहुनी’ असंच ते म्हणाले असतील. एक उत्तम कवी, एक उत्तम व्यक्तिमत्त्व, सात्त्विक मित्र! सुधीर मोघे!

मला संधी मिळाली तेव्हा तर आणखीनच ‘गडबड घोटाळा’ झाला. विनोदपटाचा ‘धूमधडाका’ झाला नि त्यात मला ‘दे दणादण’ करावं लागलं.

प्रकाशित झालेल्या माझ्या पहिल्या चित्रपटात विश्‍वनाथ मोरे यांच्याबरोबर ‘आज पांघरू नशा धुक्याची’सारखं एक काव्यात्मक युगलगीत मी लिहिलं तेव्हा मी अशा प्रकारच्या गाण्यांबाबत आशावादी होतो. परंतु विनोदपटांचा बाजार एवढा तेजीत होता, की त्यात हळुवार भावगीतांना वाव नव्हता.

आज ‘गाण्यामागच्या गोष्टी’ आठवताना मला या गोष्टीचं आश्‍चर्य वाटतं, अशा हास्यप्रधान चित्रपटांना मी खरंच कसं लिहू शकलो! अशा गाण्यांच्या चालीही कविताप्रधान नसतात. सिनेमातल्या मजेशीर घटना त्यात कथानकाचा भाग म्हणून याव्या लागतात. उदा. राजानं वाजवला बाजा, एक गाडी बाकी अनाडी, थरथराट, बाळाचे बाप ब्रह्मचारी (शीर्षकगीत) ‘डोक्याला ताप नाही’, ‘भुताचा भाऊ’ ही नावं जरी पाहिली, तरी या चित्रपटात मिस्कील आणि खट्याळ गीतरचना करणं हे किती वेगळं आव्हान होतं हे जाणवू शकेल. हे व असे अनेक चित्रपट माझ्या लेखणीच्या उमेदीत माझ्याकडे आले. चित्रपट यशस्वी झाले, गाण्यांना कधी सुवर्ण ध्वनिमुद्रिका तर कधी ‘डबल प्लॅटिनम’ डिस्कचा रसिकांचा सन्मान मिळाला, परंतु यात भावकविता लिहायला वाव नव्हता. विनोदपटाच्या या मोठ्या कालखंडात थोडी नव्हेत, वीस-पंचवीस वर्षं गेली, तरीही संवेदनेत कवितेची ज्योत व्रतस्थतेनं जपलेली असल्यानं मी याही कालखंडात आलेल्या कौटुंबिक वा सामाजिक चित्रपटांत माझ्या मनातली गीतरचना लिहू शकलो. उदा. मोजक्याच चित्रपटांची नावं आणि त्यातल्या मला माझ्या आवडलेल्या गाण्यांच्या ओळी आज इथं सांगायच्या आहेत.

आली जाग सोनियाच्या अंबराला (आत्मविश्‍वास), तिन्ही सांजेला प्रभू चरणाशी एक नित्य प्रार्थना (शपथ तुला बाळाची), वाट रेशमी फुलाफुलात हासते (शपथ तुला बाळाची), आकाश लहरले हे (अंगार), मी कशी तुला रे भुलले (भुताचा भाऊ), जीवन आता वादळ झाले (मधुचंद्राची रात्र), डोळ्यांत आज राणी सांगायला हवे का? (आहुती), घडायचे जे घडते मनुजा (एक रात्र मंतरलेली), जिवलगा… साजणा (जिवलगा), मी स्वतः हरवले, कुणास पण सापडले? (जिगर), प्रश्‍न उत्तर असते नेहमी शेजारी-शेजारी (शेजारी शेजारी), दिलदार आशिकांच्या झेलीत धुंद नजरा (येडा की खुळा), जगणेच गाणे असावे (रंगत संगत), माझा छकुला- माझा सोनुला (माझा छकुला), विठ्ठला विठ्ठला तुझ्या दारी आले व ओठा ओलावले (शुभमंगल सावधान), घर सांधते पुन्हा (मंथन)…

यातली (अजूनही काही आहेत, पण यादी लांबेल). अनेक गीतं मनासारखी लिहिता आली. श्रेय संगीतकार व चित्रपट दिग्दर्शकांचं आहे. परंतु वाचताना जाणवेल, यातली काही गाणी आपल्याला माहीतही नाहीत. कारण ही सगळी कॅसेटच्या जमान्यात रेकॉर्ड झाली व रेडिओनं कॅसेट लावण्याचं तंत्र मान्य केलं नव्हतं, व दरम्यान लोकांनी रेडिओचं काम मोबाईलवर सुरू ठेवलं- गाणं ‘पाहण्याचं’!

या संगीत दुष्टचक्राचा गांभीर्यानं कुणी विचार केला नाही.

या जोडीला माझं भावगीतलेखन सातत्यानं सुरू होतं आणि कवितांचा बहर वसंतात होता, म्हणून ही वाटचाल सुकर झाली. चित्रपटगीतं नसलेली वेगळी भावगीतं याच काळात वैपुल्यानं आली व ती लोकप्रिय झाली, कारण संगीतकारांनी ‘गायक’ या भूमिकेतून ती प्रत्यक्ष मैफलीपर्यंत नेली. ‘तेजोमय नादब्रह्म हे’, ‘दोन रात्रीतील आता’, ‘संगीत मन मोही रे’, ‘घुम घुम गुम- घुमता वनी’ ही गीतं श्रीधर फडके यांनी देशात-परदेशात सादर केली. ‘माघाची थंडी’ ही लावणी यशवंत देव यांनी सर्वत्र म्हटली. उत्तरा केळकर व नंतर रचना जोगळेकर यांनी ती योग्य त्या ठसक्यात सादर केली. परंतु केदार पंडित यांनी स्वरबद्ध केलेली ‘जीवनरंग’मधली संजीव अभ्यंकर यांनी गायलेली सर्वच गीतं लोकप्रिय होऊ शकतील अशी आहेत. पण ती खूप कमी वेळा सादर झाली. ‘दत्ताची पालखी’ सुपर होण्याचं श्रेय अजित कडकडे यांना आहे, तर ‘चिंब भिजलेले’ हे प्रेमगीत शंकर महादेवन व अजय-अतुल यांनी देशात-परदेशात गायलं.
गाणं ही अशी गोष्ट आहे, जी केवळ एकदा ऐकून ठसत नाही. गाणंही कानवळणी पडावं लागतं. हे समर्थन नसून वस्तुस्थिती आहे. जेव्हा मनोरंजन माध्यम ‘कानां’भोवती एकवटलं होतं आणि गाणी वारंवार ऐकली जात होती, तेव्हा ती कोरली गेली. आज नव्या संगीतकारांना-गीतकारांना उत्तम दर्जाची प्रतिभा असूनही मिटून राहावं लागत आहे. जे कधी सादरीकरणात उत्तम आहेत, संगीतकार ज्यांच्याबरोबर फिरायला तयार आहेत, त्यांनाच लोकप्रियता आहे. कलाकृतीला व्यासपीठ व रसिक मिळणं हीसुद्धा पुण्याईच असावी. पुष्कळदा ती योग्य ‘धीरानं’ही मिळते.

आज या गोष्टीच्या अखेरच्या प्रकरणात आलो आहोत म्हणून हे सविस्तर सांगावं वाटलं, आणि शेवटी ‘समाप्त’ लिहिल्यानंतर सांगायच्या खूप गोष्टी राहून गेल्या आहेत हेही वाटत राहणारच आहे- आणि या राहण्यातच तर पुन्हा भेटण्याची गंमत आहे.

ही गीतरचनेची आनंदयात्रा माझ्या दृष्टीनं जगण्याची पाठशाळा होती. मधुकण टिपणार्‍या मधुमक्षिकेच्या वृत्तीनं वावरल्यामुळे मी टिपत गेलो. त्यातून माझं ‘गद्य’लेखन बहरात आलं. कथेतल्या व ललितलेखांना व्यक्तिरेखा आणि विषय मिळत गेले ते या खुल्या व्यासपीठातून.

मोठी ‘वाटणारी’ माणसं आणि खरंच ‘मोठी’ माणसं, मला इथंच कळली. कुठे परीक्षक पदावर मी असेन, तर आश्‍चर्य वाटेल अशा नामवंतांचे फोन यायचे. ‘जरा आमच्याकडे बघा’. तेव्हा फोन ठेवल्यावर व्यथेचे आवर्त उमटायचे. गाण्यांचं निवेदन केल्यानंतर मानधन घ्यायला गेल्यावर, संयोजकांनी दिलेला एक हजाराचा गठ्ठा- पिनअप केलेला- बँकेतून थेट दिला असेल- एका नामवंत कलावंतानं दाखवत म्हटलं, ‘‘नोटांची पिन निघत नाही. घरी या. मग घेऊन जा.’’

पैशासाठी घरी जाणं मानसिकदृष्ट्या अवघड होतं. एका गीतलेखन स्पर्धेत वेगळाच अनुभव आला. प्रसिद्ध परीक्षक म्हणाले, ‘‘खरं तर ‘एक रात्र मंतरलेली’मधलं तुमचं गाणं आम्ही पारितोषिकपात्र ठरवलं होतं.’’

‘‘मग?’’
‘‘त्या ‘एका’ बाईंना पैशाची अडचण आहे. त्यांचे यजमानही नुकतेच गेलेत. म्हटलं, तेवढीच मदत होईल त्यांना.’’

तोपर्यंत मी पारितोषिक आणि मदतनिधी यात काही फरक असतो असं समजत होतो. हे सर्व कळत जाणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे जेव्हा पुरस्कार-पारितोषिक मिळालं तेव्हा आनंदानंही शांत राहिलो, जेव्हा अन्यायाची सावली घरंगळली तेव्हाही- क्षणभर थबकून पुढं निघालो… गाण्यानं हे नकार पचवायला शिकवले, पण एवढंच नाही- शिखरावर असलेल्या त्या पदाकडे निघालेल्या कलावंतांकडून जिद्दीची गुरुकिल्ली मिळाली.

दत्ता डावजेकरांकडून विनम्रता, स्वरलीनता, सहनशीलता; विश्‍वनाथ मोरे यांच्याकडून टोकाच्या उपेक्षेत गरिबीतही काम करत राहण्याचं धैर्य शिकलो. दशरथ पुजारीही त्याच वर्गातले. स्वरांचा, शब्दांचा आनंद घेणं हे पुजारींकडून शिकलो. गेले पन्नास-साठ वर्षं या थोर संगीतकारांच्या गाण्यांनी आजतागायत आनंद दिला. ते सारे गरिबीतच मरण पावले. त्यांच्या नावावर स्वतःची एक खोली नव्हती. मी एरवी दोन हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट असलेली मंडळी सरकारकडून सवलतीत घरं मिळवताना पाहिली. लाचारपणे मंत्र्यांचे उंबरे झिजवत, घरगुती मैफली करत फिरून त्यांना गरज नसताना मिळाले. त्यांना मिळण्याचं दुःख नाही, या दीपमाळेत तेल घालत, त्यांना तेवत ठेवण्याची यंत्रणा पोखरलेली आहे हे जाणवलं.

श्रीनिवास खळेंकडून शब्दांचा गोडवा, संवादातली आपुलकी शिकलो. जेव्हा खळेसाहेब गाणं गात असत, तेव्हा स्वर-वलयांची तरल कंपनं उलगडत जायची. मला एच.एम.व्ही. मधली अनेक ध्वनिमुद्रणं त्यांच्यामुळेच अनुभवता आली. मी कौटुंबिक व शारीरिक अशा दोन्ही स्तरांवर आपत्तींचा सामना इतक्या हसर्‍या चेहर्‍यानं करणारा दुसरा संगीतकार पाहिला नाही. प्रभाकर पंडित हे तर वात्सल्याचं लडिवाळ झाड होतं. आम्ही गाणी भरपूर केली, ती होताना त्यांच्या घरातले प्रत्येक क्षण ‘गाणं’ होते. आज केदार जगातला श्रेष्ठ तबलावादक आहे. त्याचं बौद्धिक, प्रातिभिक बहरत जाणं मला पंडितांच्या घरात अनुभवता आलं. त्यांच्या घराला मी ‘गाणारं घर’ म्हणायचो. पंडितजींच्या पत्नी अनुराधा पंडित व्हायोलिन वादक, केदारजी तबलावादक आणि प्रभाकर पंडितजी संगीतकार! त्यांच्या घरी केव्हाही जा, दोन-चार तरी शिष्य पंडितजींकडून गाणं शिकताना दिसत. त्यांच्या घरात माझी भावगीतं पंचवीस-तीस वर्षं झाली.

मीनाताई खडीकर म्हणजे मंगेशकर… यांनी तर मला आईची माया दिली. त्यांचं गाणं सोपं-साधं-निरागस, तसा त्यांचा स्वभाव! मला त्यांच्यापुढं ‘पाऊस पहिला’सारखं भावगीत लतादीदींच्या ‘म्युझिक रूम’मध्ये लिहता आलं. मीनाताईंच्या चेहर्‍यावर एक सात्त्विक समाधान आहे, त्या उत्तम समुपदेशक आहेत. माझ्या मनावरचे अनेक छोटे छोटे तणाव त्यांनी अगदी छोट्या रूपककथा सांगून दूर केले आहेत. याच घरात उषाताई मंगेशकरांकडून खूप शिकता आलं. गाण्याप्रमाणे चित्र काढण्यात रमलेल्या उषाताई स्पष्टवक्त्या आहेत. मनातलं पटकन बोलून मोकळं होणारा त्यांचा स्वभाव मला आवडला. मला त्यांच्याकडून लोकसंगीत व विविध भाषांमधल्या गाण्यांचा खजिना ऐकता आला. आश्‍चर्य वाटतं, एकाच वेळी एवढ्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं आणि दीदींची तर त्या सावलीच आहेत! खूप जपतात त्या दीदींना! प्रेम करणार्‍या, पण काही वेळा लतादीदींना त्रासदायक ठरणार्‍या मंडळींपासून दूर ठेवण्याचं काम निग्रहानं करतात. माझी धाकटी बहीण कविता तर म्हणते, ‘‘उषा मंगेशकरांना पाहिलं की मला रामाबरोबर सावलीसारखा असणारा लक्ष्मण आठवतो.’’ खरंय ते!

यशवंत देव यांच्याकडून गाण्याबरोबर जीवनगाण्याचे सूर मिळाले. ओशो-रजनीश यांचे ते शिष्य! स्वामी आनंद यशवंत! देवसाहेबांकडून ‘ध्याना’चा मंत्र घेतला. साक्षीभावानं घटनांकडे पाहायचं कसं ते त्यांनी सतत सांगितलं. ओशोंची करुणा देवसाहेबांमुळे कळली. आम्ही तासन् तास फक्त ओशोंबद्दल बोलत असायचो. म्हणजे ते बोलत आणि मी ऐकत! देवांच्या घरात मूर्तिमंत वात्सल्य म्हणजे करुणा देव! (नीलम प्रभू). त्यांचं निर्मळ हसणं अगदी आत्ताही कानात गुंजतंय! काम नसतानाही हक्कानं घरात जावं असं त्यांचं शिवाजी पार्कचं घर – ‘वंदन’! मी फोन न करता गेल्यावर क्षमा मागायचो. करुणाताई म्हणायच्या, ‘‘येत जा रे! तू आलास की आवडतं आम्हा दोघांना!’’ आता ते दोघंही नाहीत. मनाच्या देव्हार्‍यातला ‘देव’ गेला असं वाटतं. ओशोमयी गप्पांच्या सायंकाळी पोरक्या झाल्या.

प्रभाकर जोग त्याच ज्येष्ठ पिढीचे संगीतकार. वागण्यात संघाची शिस्त भिनलेली. एक शब्द इकडे नाही की तिकडे नाही. वेळेचा तसू तसू उपयोग. फोन भल्या सकाळीच यायचा. गाणं सुवाच्य अक्षरात, वर रेघ मारून लिहावं लागायचं. जोगसाहेब पितृतुल्य दरारा! त्यांच्याबरोबर ‘चंद्रही आहे धूसर धूसर’ व ‘कोण कुणावर भुलले आधी कळले नंतर नाही’ ही गाणी व एक चित्रपट केला. बाबूजी हे त्यांचं श्रद्धास्थान! त्यांच्या खूप आठवणी सांगायचे!
डी. एस. रुबेन हे नाव मोजक्याच रसिकांना माहीत असेल. मी आज पंच्याऐंशीव्या वर्षातही ‘स्वप्न बघणारा संगीत तरुण’ असं वर्णन करेन. सतत स्वप्नांच्या लडी उलगडत एकाकीपण सेलेब्रेट करत रुबेन जगले. नेहमी शिवाजी पार्कवर राऊंड मारताना भेटले की, त्यांच्या पारशी-मराठी रिमिक्स उच्चारात रुबेन म्हणणार, ‘‘प्रवीण, चार-पाँच पिक्चर आयें हैं। बुलाऊँगा तुझे। क्या लिखता है रे। नक्की ये.’’
मला माहीत असायचं, हे सगळं काल्पनिक आहे. मन व्याकूळ व्हायचं.’’

अनिल मोहिले म्हणजे अव्याहत काम! पंचवीस-तीस वर्षांत ‘अनिल मोहिले’ विसावलेत, डुलकी आलेय हे पाहिलंच नाही. एवढे कष्ट! एवढा उरक! घरातही जेवणार कसं? तर हातात एक बशी घेऊन फिरत फिरत! ते करताना वादकांना सूचना सुरू! मला नंदू होनप नि अनिल मोहिले यांच्यात एक साम्य वाटायचं, संगीत! संगीत! संगीत! दोघंही ना कधी पॉलिटिक्सवर बोलले, ना कधी क्रिकेटवर! दोघांनी अकाली साथ सोडली. त्यांच्याजवळ खूप कामं असताना…

श्रीधर फडके यांच्याकडून मी सश्रद्धता शिकलो. कवितेवर निःस्सीम प्रेम! एखादी ओळ कवीकडून समजून घेताना श्रीधरजी कधी संकोचले नाहीत. आम्ही एकेक गाणं कित्येक महिने लिहिलं.

तीस-पस्तीस वर्षांत ५०-६० संगीतकार व दीड-दोनशे गायकांबरोबर ही गीतलेखनाची आनंदयात्रा संपन्न झाली. शेकडो सुरेल क्षणांचा प्रवास टिपणं ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. या सर्व क्षणांनी कवी-गीतकार म्हणून जेवढं संपन्न केलं, त्याहून जीवनानं जो एक बहाराचा वाफा माझ्या आयुष्याला दिला, तो झंकारून टाकण्याचं सामर्थ्य दिलं.

खरं तर हे क्षण असेच निमित्तच मिळाले नसते, तर विरून गेले असते. पण मला वाटतं, नियतीचे खरंच काही संकेत असावेत…

दोन वर्षांपूर्वी वेगळ्याच कुठल्या कामाला मी ‘मेनका’ कचेरीत गेलो काय न् गप्पांच्या ओघात संपादक अमित टेकाळे म्हणाले काय, ‘‘अशा गाण्यामागच्या गोष्टी तुम्ही ‘मेनका’साठी का नाही लिहीत?’’ आणि त्यातून हा दोन वर्षांचा, ‘गाण्यामागच्या गोष्टीं’चा प्रवास सुरू झाला. लेख प्रकाशित झाल्यावर विविध व्यावसायिकांचे फोन यायचे. त्यात डॉ. र. म. शेजवलकर तर दर महिन्याला आवर्जून फोन करायचे.

कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची पत्रं यायची, चित्रपटासाठी गीतं लिहू इच्छिणारे कळवायचे, ‘एवढे परिश्रम असतात? बापरे!’
दोन वर्षं पाना-पानांत मी हरवलो. ‘मेनका’ कुटुंबीयांनी ‘गद्य’ गाण्याला सूर दिले. आज या मैफलीतली ही भैरवी!
डोळ्यांत निरोपाचं पाणी आणणारी… आणि उद्याच्या नव्या भूपाचं निमंत्रण देणारी!

प्रवीण दवणे
dilkhulass@rediffmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.