Now Reading
दर्जेदार शिक्षणासाठी झटणारी क्वेस्ट

दर्जेदार शिक्षणासाठी झटणारी क्वेस्ट

Menaka Prakashan

विविध उपक्रमांतून शिक्षकांना अधिक सक्षम बनवणार्‍या, महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतल्या शाळांमधून शिकणार्‍या मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देत शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या ‘क्वेस्ट’ या संस्थेविषयी.

भारत आज अनेक गोष्टींत पुढे जात असला, तरीही शिक्षणासारख्या अतिशय मूलभूत क्षेत्रात भारताची प्रगती म्हणावी तितकी समाधानकारक नाही. भारताचा आत्मा गावात आहे, असं म्हटलं जातं. मात्र आपल्या देशातल्या छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात शिक्षण अजूनही पुढारलेलं नाही. दुर्गम भागात तर परिस्थिती आणखीन बिकट आहे. दुर्दैवानं आजही पाच-पाच वर्षं मुलं शाळेत शिकूनही, त्यांना मूलभूत अशा अक्षर आणि अंकांची ओळखही नसते. अर्थात यात त्या मुलांचा दोष नसतो. आपण जर प्रगत भारताचे स्वप्न बघत असू, तर या मूलभूत गोष्टी मागे राहून कशा चालतील? त्यामुळे त्यावर मात करून मुलांना सक्षम करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. अशी जबाबदारी सक्षमपणं उचलणारी एक संस्था म्हणजे ‘क्वालिटी एज्युकेशन ट्रस्ट’ अर्थात ‘क्वेस्ट.’

शहरातल्या मोजक्या शाळांमधली मोजकी मुलं उच्च शिक्षण घेऊन परदेशात देशाचा झेंडा रोवतात. यापेक्षा आपल्या देशातल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं शिक्षण हे सर्वांसाठी असावं, ते कालानुरूप असावं, त्यात कोणताही दुजाभाव असता कामा नये. त्यात आधुनिक तंत्रज्ञानासोबतच शिकण्याच्या नवीन पद्धती असाव्यात. शिक्षण हे प्रवाही असावं, त्यात वारंवार सुधारणा होत रहाव्यात. ज्यांच्यासाठी हे शिक्षण आहे, त्यांना हे शिक्षण प्रगत स्वरूपात प्राप्त व्हावं तसंच शिक्षकांच्या विकासातून वंचित मुलांना समृद्ध शिक्षण मिळावं या उद्देशानं क्वालिटी एज्युकेशन ट्रस्ट अर्थात ‘क्वेस्ट’ ही संस्था कार्यरत आहे. संस्थेची स्थापना २००७ साली प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि शिक्षण तज्ज्ञ नीलेश निमकर या दोघांच्या विचारांतून झाली. हे दोघंही संवेदनशील असल्यामुळे काहीतरी करावं, हा विचार त्यांच्या मनात आला. यासाठी आधी काही जण एकत्र येऊन शिक्षणावर चर्चा करत. मात्र त्याला औपचारिक स्वरूप असावं आणि ते काम पुढं जात राहावं यासाठी क्वेस्ट ही संस्था स्थापन करण्याचं ठरलं. त्यातून २००७ साली ‘क्वेस्ट’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. शैक्षणिक प्रश्नांवर केवळ चर्चा न होता, त्यावर मात करता यावी, मूलभूत शिक्षणातल्या त्रुटींवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं याकरता प्रथम शिक्षकांना सक्षम केलं पाहिजे, तसंच शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांची सक्षम यंत्रणा उभी रहावी या उद्देशानं संस्थेनं आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. यासाठी पर्यायी यंत्रणा उभी न करता, आहे त्याच यंत्रणेत सुधारणा कशा कराव्यात, यासाठी मुख्यत्वे सरकारी शाळा, अंगणवाड्यांमध्ये कामाला सुरवात झाली. ‘क्वेस्ट’नं एखादी शाळा सहज उभी केली असती. मात्र तसं केलं तर ते फक्त एक मॉडेल ठरलं असतं. तिथल्या शिक्षकांनाच आणि तिथल्या विद्यार्थ्यांनाच त्याचा फायदा झाला असता. ते मॉडेल इतरत्र पसरलं असतंच असं नाही. त्यामुळे या भूमिकेतून आहे त्याच शाळांना सक्षम करण्याचा पर्याय निवडण्यात आला. जेणेकरून अनेकांना त्याचा लाभ घेता येईल. जेणेकरून त्याचा विस्तार होईल अन् त्यातून ‘क्वेस्ट’च्या भूमिकेचा प्रसार होईल.

‘क्वेस्ट’नं सुरवातीपासून भाषा आणि गणित या विषयांवरच मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलं आहे. आज चौदा वर्षं होताना ‘क्वेस्ट’नं हजारो शाळा आणि लाखो विद्यार्थ्यांना आपल्या बहुमूल्य ज्ञानानं समृद्ध केलं आहे. हे सर्व करताना प्रथम ‘क्वेस्ट’नं सर्वेक्षण केलं. मुलांच्या आणि शिक्षकांच्या मूलभूत समस्या समजून घेतल्या. यातून मुलांना वाचन-लिखाणातच अडथळे असल्याचं जाणवलं. त्यामुळे पुढे जाऊन ‘बालभवन’ आणि ‘शिक्षण समृद्धी केंद्र’ ही संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्याच्या सोनाळ या गावी सुरू करण्यात आली. आज याच परिसरात अशा दहा शाळांमध्ये क्वेस्टचं काम चालतं. वाडा परिसरात मुख्य काम असताना पुण्याचं केंद्रही प्रशासकीयदृष्ट्या सक्षम झालं. दहापेक्षा जास्त केंद्र करायची नाहीत हे आधीच ठरवलं होतं. त्यानुसारच काम करणं यालाच ‘क्वेस्ट’नं प्राधान्य दिलं होतं. कारण आधी सांगितल्याप्रमाणे ‘क्वेस्ट’चा उद्देश हा पर्यायी यंत्रणा निर्माण करणं हा नव्हता तर व्यवस्थेला बळकट करणं हा होता. ‘क्वेस्ट’नं राबवलेले सगळे उपक्रम हे अभ्यासपूर्ण आहेत. शैक्षणिकदृष्ट्या मागं पडलेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी ‘अनुपद’ हा कार्यक्रम राबवला जातोय. तो आज अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहे. शिक्षक डी.एड, बी.एड. झालेले असतात, मात्र त्यानंतरही त्यांनी निरंतर शिकत राहिलं तरच ते शिक्षण प्रवाही होतं. शिक्षकांना सक्षम करण्यासाठी ‘शिक्षक’ ही संकल्पना राबवली जाते, यातून शिक्षकांचे हात बळकट करण्यास मदत होते. ‘पालवी’ नावाच्या प्रकल्पातून अंगणवाडी शिक्षकांना सक्षम करण्याचं काम करण्यात येतं.

अलीकडच्या शिक्षणात व्हिडीओद्वारे दिलेलं शिक्षण हे प्रभावी असतं हे आपण जाणतोच. यापुढील काळात या माध्यमाद्वारे शिक्षण हे अनिवार्य असणार आहे. त्यासाठी संस्थेनं सुमारे दीडशे शैक्षणिक फिल्म्स तयार केल्या आहेत. त्यातून शिक्षणात सुलभता आणि नेमकेपणा आला आहे. या सगळ्यात शिक्षक हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. ते यात स्वयंप्रेरणेनं आणि मन लावून काम करतात.

‘क्वेस्ट’चा आज चौदा वर्षांनंतर अधिक वेगानं विस्तार होत आहे. यात सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातल्या एकशे ऐंशी शाळांसह नाशिक विभागातल्या अनेक आदिवासी आश्रम शाळांमध्ये ‘क्वेस्ट’चं काम सुरू आहे. या व्यतिरिक्त अठराशे अंगणवाड्यांना बळकट करण्याचं काम क्वेस्टच्या माध्यमातून होत आहे. टाळेबंदीतही निरंतर सुरू असणारं काम ऑनलाइन स्वरूपातही अधिक व्यापक झालं.

‘क्वेस्ट’कडून आजच्या भाषेत ‘इनोव्हेटिव्ह’ म्हणता येईल अशी संकल्पना राबवली जाते. रंगभूमीची पार्श्वभूमी आहे, अशा नव्या दमाच्या पाच कलाकारांना एकत्र घेऊन एक शिष्यवृत्ती राबवली जाते. वर्षभर या कलाकारांना संस्थेकडून निधी पुरवला जातो. हा प्रयोग प्रभावी ठरलाय. गेल्या पाच वर्षांत असे पंचवीस कलाकार संस्थेच्या माध्यमातून तयार झाले आणि त्यांनी आपल्या फेलोशिपच्या माध्यमातून संस्थेच्या कामाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. शिष्यवृत्तीची मुदत संपल्यानंतर हे कलाकार आज टीव्ही-नाटक क्षेत्रात नाव कमावत आहेत. यासह ज्या तरुणांना ग्रामीण भागात शिक्षण विषयक कामात योगदान द्यायचं आहे,त्यांच्यासाठी एक वर्षाची ‘ताराबाई मोडक शिष्यवृत्ती’ संस्थेच्या वतीनं देण्यात येते. आज विविध राज्यांमध्ये संस्थेचे उपक्रमही विस्तारत आहेत. त्यात मध्य प्रदेशमधल्या एका संस्थेसोबत क्षमता बांधणीचं महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून होत आहे. याचबरोबर संस्था हिंगोलीच्या जिल्हा प्रशासनासोबत संस्थेचे सर्व प्रकल्प एक मॉडेल म्हणून राबवत आहे. आणखीन एक सांगण्याची बाब म्हणजे संस्थेची अनुपद ही संकल्पना राजस्थानमधल्या एकवीस शाळांमध्ये राबवली जात आहे. तसंच गुजरातच्या धरमपूर इथंही गुजराती भाषेत ही संकल्पना राबवली जात आहे. या सगळ्या सोबतच प्रसिद्ध अशा ‘शांतिलाल मुथा फाउंडेशन’ सोबत ‘अक्षर सेतू’ या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी भागातल्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘क्वेस्ट’नं भागीदार म्हणून काम केलं आहे. तसंच ‘मिशन फुलोरा’ अभियानात नाशिकच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत संस्थेचं काम सुरू आहे.

आकड्यांत बोलायचं झाल्यास, आज ‘क्वेस्ट’नं स्थापनेपासून सुमारे आठ हजारांहून अधिक शिक्षकांना सक्षम केलं आहे, तर साधारण अडीच लाख मुलांच्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं संस्थेचं काम सुरू आहे. मुलांचं शिक्षण सुलभ व्हावं यासाठी वेळोवेळी संस्थेच्या वतीनं हस्तपुस्तिकाही तयार केल्या जातात. यासाठी काही किट्सही तयार करण्यात आली आहेत. संस्थेचा मुख्य गाभा हा भाषा आणि गणित शिकवण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धती हाच असल्यानं यापुढील काळात इंग्रजी या विषयावरही संस्थेनं काम सुरू करावं अशी मागणी होत आहे. यावरही संस्था काम करत आहे. अशा नवकल्पना घेऊन काम करणं सोपं नाही. त्यातही एखादी संकल्पना शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जाऊन रुजवणं आणि त्यांना शिकण्यास उद्युक्त करणं, अभ्यासक्रमाबाहेर जाऊन त्यांना शिकण्यासाठी उद्युक्त करणं हे महाकठीण काम असतं. ते ‘क्वेस्ट’ला करावं लागतं. मात्र शिक्षणाचा दर्जा सुधारणं या एका ध्येयानं पछाडलेल्या ‘क्वेस्ट’च्या कार्यकर्त्यांना शिक्षणाचं सक्षमीकरण कायम खुणावत असतं. अशा संस्था चालवताना, एकीकडे कामाचा विस्तार होत असताना, आर्थिक आघाडीवरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ‘क्वेस्ट’ला सुरवातीचा काही काळ वगळता नंतर ‘टाटा ट्रस्ट’, ‘युनिसेफ’, ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाउंडेशन’ आदी संस्थांकडून नियमितपणे देणगी दिली जाते. या व्यतिरिक्त इतर माध्यमांतून येणार्‍या निधीतून संस्थेचा खर्च भागवला जातो. तसंच ‘एच.टी.पारेख’, ‘ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन’, ‘मोटिवेशन फॉर एक्सलन्स’, ‘अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती’, ‘फोर्ब्स मार्शल’, ‘शांतिलाल मुथा फौन्डेशन’ यांची मदत लाभते. देणगीदारांच्या उदार मनामुळे आज संस्था ठामपणे वाटचाल करते आहे. सुरवातीला अगदी मोजक्या लोकांसोबत सुरू झालेल्या संस्थेत आज साठ लोक काम करतात. कठीण काळातही कार्यकर्ते काम करत असतात. शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी पछाडलेल्या या कार्यकर्त्यांमुळे आज संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यात आर्थिक आव्हान असलं तरीही आपण करत असलेल्या कामामुळे अनेकांच्या जीवनात बदल घडणार असल्यानं हे कार्यकर्ते मनापासून काम करत असतात.

संस्थेचे आगामी प्रमुख उद्दिष्ट २०२५ पर्यंत पाच हजार अंगणवाड्यांपर्यंत पोचणं हे असून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणातली दरी भरून काढण्यासाठी अनुपदसारख्या उपक्रमाचा जास्तीत जास्त संस्थांना फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या व्यतिरिक्त शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी संस्थेनं विविध योजना आखल्या आहेत. यात डिजिटल साहित्य निर्मितीवर भर देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थी हे महत्त्वाचे घटक असतात, पालकांचाही कळत-नकळत मोठा सहभाग संस्थेच्या कामाला लागतो. टाळेबंदीच्या काळात अनेक संस्थांचा निधी हा आरोग्याकडे वळला असल्यानं यात आर्थिक अडचणी आहेत. मात्र यावरही मात करत संस्थेची वाटचाल सुरू आहे. टाळेबंदीच्या काळात संस्थेचं कार्य हे ऑनलाईन पद्धतीनं सुरू होतं. सुरवातीला महिनाभर अडचणींचा सामना केल्यानंतर ताळेबंदीतही संस्थेचं काम सुरळीत सुरू राहिलं.

या व्यतिरिक्त शिक्षकांच्या कामात मूल्यवृद्धी करण्यासाठी विविध परिसंवाद आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. पालकांना वाहिलेलं प्रसिद्ध असं ‘पालकनीती’ हे मासिक काही काळासाठी चालवण्यासाठी आलं होतं. एखादं मासिक चालवण्याचा उपक्रम ‘क्वेस्ट’नं पूर्ण वर्षभर सक्षमपणे चालवला. संस्थेकडून शैक्षणिक संशोधनही केलं जातं. पुढे संशोधनासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापण्याचा संस्थेचा मानस आहे.
स्थापनेपासून अध्यक्षपद भूषवलेल्या अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्यानंतर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा मनोज कार्येकर यांच्याकडे आहे, तर निलेश निमकर हे संचालक आहेत. संस्थेचे सर्व वरिष्ठ संस्थापक सदस्य हे आपल्या नव्या दमाच्या टीमला कायम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत असतात.

संस्थेचा हळूहळू विस्तार होतो आहे. शालेय शिक्षण हे अजून दर्जेदार व्हावं आणि त्याचा विस्तार व्हावा यासाठी ‘क्वेस्ट’ कायम प्रयत्न करत आहेत. अनेक अडचणींवर मात करून केवळ दर्जेदार शिक्षण मिळावं, शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात हाच संस्थेचा ध्यास आहे. खर्‍या अर्थानं शिक्षणाला बळकट करण्यासाठी ही संस्था काम करते आहे. संस्थेचा आलेख चढता आहे. त्यामुळे यातून निश्चितच मोठं काम उभं राहील याची खात्री वाटते…

– संतोष गोगले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.