Now Reading
त्याच्यातली ती

त्याच्यातली ती

Menaka Prakashan

पाच चाळीसची ट्रेन चुकली तर पुढचं सगळं चुकत जाईल!
मुंबईत लोकलवर अवलंबून असलेल्यांचं जीवन घड्याळीच्या काट्यात बंदिस्त असतं आणि ते किती काटेकोर पाळावं लागतं या विचारात मी धावत होते. मला धाप लागली होती. मला अंधेरीला जायचं होतं आणि पाच चाळीसला दोन मिनिटं बाकी होती. ट्रेन सुटण्याच्या बेतात होती. मी धडपडून दारात पाय टाकला. दांडका पकडला. स्वतःला आत ओढलं आणि दीर्घ श्‍वास टाकला.

हातात येणारं सुटतं की काय असं वाटून ते हस्तगत झालं की हायसं वाटतं याचा सुखद प्रत्यय घेतला. पाच चाळीस झाले. ट्रेन निघाली. मी आत जाऊन बाकावर बसले. डबा अर्थात महिलांचा होता.
आजूबाजूला पाहते तर पुढच्या बाकावर खिडकीशी ‘ती’ बसली होती. बाकी प्रवासी कुणीच नव्हते.
मी बारकाईनं तिच्याकडे पाहू लागले.
तिनं गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला होता. खांद्यावर निळी ओढणी होती. हातात पर्स पकडलेली होती आणि सावळ्या चेहर्‍यावर भडक मेकअप केलेला होता. डोक्यावरचे केस तोंडावर येऊन भुरभुर उडत होते. ती खिडकीबाहेरच्या अंधूक उजेडात पाहत होती. काय पाहत होती माहीत नाही.
माझं कुतूहल चाळवलं होतंच. मनाचा हिय्या करून मी तिच्यासमोरच्या बाकावर जाऊन बसले. चाहुल लागताच तिनं खिडकीतलं तोंड माझ्याकडे वळवलं. तिच्या डोळ्यात चमक होती. नजर भेदक होती. मी थोडी कचरले. अस्वस्थही झाले. ती पुन्हा दुसरीकडे पाहू लागली. ट्रेन थांबे सोडत पुढे धावत होती. डब्यात आम्ही फक्त दोघीच होतो.

मला काय हवं होतं? कशासाठी येऊन बसले होते मी तिच्यासमोर? काय शोधत होते? मला प्रश्‍न पडला. कशाचा वेध घेत होते मी? तिच्यातल्या त्याचा की त्याच्यातल्या तिचा? कळत नव्हतं. आणि मला जाणीव झाली, की डब्यात आम्ही तीन प्रवासी आहोत. होय तीन.
ट्रेनमध्ये हिजड्यांना मी हात पसरून पैसे मागतानाच पाहत आले आहे. पण हा चूपचाप बसून होता. हाताची घडी घालून स्वतःला सावरत होता.
मी खोकण्याचा अभिनय केला. तिनं माझ्याकडे कटाक्ष टाकला. मी मंद हसले. तिच्या शांत चेहर्‍यावर अनेक भाव तरळून गेले. माझं स्मित कदाचित तिला रुचलं नसावं.
मग मात्र मी धाडस केलंच आणि तिला म्हटलं, ‘गुड मॉर्निंग.’
तिचा चेहरा प्रश्‍नार्थक झाला. हे तिला अनपेक्षित असावं. कारण ती ताडकन व्यक्त झाली, ‘‘तू मेरेकू गुड मॉर्निंग बोली?’’
‘‘हां.’’ मी गालात हसले. ‘‘क्यों? बोलना नही चाहिये?’’
‘‘बाब्बा रे बाब्बा. तेरेकू पता है क्या? इस डिब्बे मे सिर्फ तू है और मै है.’’
‘‘तो?’’
‘‘डर नही लगता?’’ तिनं खोचकपणे विचारलं.
‘‘नही.’’
‘‘क्यूं?’’
‘‘हम दो थोडे ही है यहा?’’ मी सहज बोलावं तसं म्हणाले, ‘‘तीन है.’’
तिच्या भुवया वर गेल्या. ‘‘वो कैसे?’’
‘‘एक मै. दुसरी तू. और तिसरा तुझमे जो है वो.’’
ती खळाळून हसली आणि मोठ्यानं म्हणाली, ‘‘साली! तूने तो मेरा दिल जीत लिया रे.’’
माझा जीव भांड्यात पडला.
‘‘क्या करती तू?’’ तिनं खुलून विचारलं.
‘‘बच्चों को पढाती.’’
‘‘अच्छा. मास्टरनी है.’’
‘‘हां.’’ मी होकार्थीा मान हलवली आणि विचारलं, ‘‘आपका नाम क्या है?’’
‘‘आपका!’’ तिला विस्मय वाटला. ‘‘बाबा रे बाबा! इतनी इज्जत?’’
‘‘क्यों? करनी नही चाहिये?’’
ती माझ्याकडे एकटक पाहत राहिली. ‘‘अच्छा. ऐसा सोचती है.’’
‘‘हां.’’
‘‘नाम पूछती ना. पन तेेरेकू कोनसा वाला चाईये?’’
मला हे कळलं नाही. ‘‘मतलब?’’
‘‘अरे तूईच तो बोली, मै दो है.’’
‘‘हूंऽऽ.’’ मी हसले.
‘‘तो बोल, मेरा नाम चाईये, या मुझमे छिपा उसका चाईये?’’
‘‘आपका.’’
‘‘देख, पहले ना सूरज था. लेकीन रोशनी कम पड गयी. हां. नतिजा मां बाप ने घर से हकाल दिया. अब आशा हूं.’’
‘अच्छा. करती क्या हो? मतलब काम वाम?’’
‘‘हॉस्पिटल मे साफसफाई. एचआयव्ही डिपारमेंट है, वहाँ करती ये काम.’’
‘‘ओह.’’ मला आश्‍चर्य वाटलं. ‘‘डर नही लगता?’’ मी कुतूहलानं विचारलं.
‘‘कायको? वो तो शरीर का बिमारी है. इधर ना, सब उलटा है. ये डर मन का बिमारी है. उसको कोन ठीक करेंगा?’’
‘‘हां. सही है.’’
स्टेशन आलं. तिथं ट्रेन थोडी अधिक थांबली. आमच्या डब्यात कुणीच चढलं नाही. काही वेळानं ट्रेननं हॉर्न दिला आणि हळूहळू निघाली.
‘‘रहती किधर हो?’’ मी तिला थोड्या वेळानं विचारलं.
तिची नजर बारीक झाली. ‘‘तू क्या मेरा इंटरव्यू करेगी क्या सबेरे सबेरे?’’ आणि ती दिलखुलास हसली.
मला उगाच खजिल झालं. ‘‘नही नही. ऐसे ही पूछ रही मै. आप अच्छी लगी इसलिये.’’
ती मोठ्यानं हसली. ‘‘पनवेल की झोपडपट्टी मे रयती मै. क्यो? आयेंगी क्या?’’
‘‘कभी खाने पे घर बुलाईये.’’ मी मजेनं म्हटलं.
तिला नवल वाटलं. मान तिरकी करत ती बोलली, ‘‘डर नही लगता मेरे से?’’
‘‘वो तो मन की बिमारी है.’’ मी खुदकन हसत परतफेड केली.
आता मात्र ती खूप मोठ्यानं हसली.

दरम्यान सहा वाजले होते. मधे दोन तीन स्टेशन्स येऊन गेली. या स्टेशन्सवर डब्यात काही ‘ती’ येऊन बसल्या.
आमच्यातलं बोलणं सुरूच होतं.
एकाएकी तिनं माझा उजवा हात हातात घेतला. मी थोडी घाबरले.
‘‘खूप काही सांगायचं आहे गं!’’ तिनं उसासा टाकला. ‘‘सगळं साचलं आहे. तू भेटलीस. आता सांगतेच.’’
तिची शुद्ध मराठी ऐकून मी चाट पडले.
त्या मंद प्रकाशात, खडक धडकच्या आवाजात तिनं सांगायला सुरुवात केली-
‘‘मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातच जन्माला आले. लहान असताना मला मुलीसारखं राहायला आवडत होतं. शिकत शिकत दहावीत गेले आणि कळलं, की आपण तीच आहोत. हे कळताच घरात धरणीकंप झाला. होत्याचं नव्हतं झालं. आईबाबांनी बोलणं बंद केलं. कारण मी आता मुलगा राहिले नव्हते. माझ्या घरच्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. त्यांनी घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद केले. बाहेर पडल्यावर एका संस्थेनं माझी दखल घेतली. मला आशा हे नाव दिलं. मी पहिल्यांदा मुलीचे कपडे अंगावर चढवले. साज शृंगार केला आणि समाजाने मला तो नव्हे तर ती म्हणून स्वीकारावं यासाठी माझी धडपड सुरू झाली.
मला इंग्रजी बर्‍यापैकी बोलता येत होतं. मी नोकरीसाठी वणवण फिरू लागले. कित्येक उंबरठे झिजवले, पण ती मिळाली नाही. समाजाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ ‘छक्का’, ‘हिजडा’ आणि आमचं काम काय, तर भीकमांगे! समाजाचा हा दृष्टिकोन लगेच बदलणं अशक्य आहे हे माझ्या लक्षात आलं. मी हताश झाले.’’

आशानं माझा हात घट्ट पकडला. तिच्या काळ्याभोर डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तसे तिनं ओठ दाबून धरले. काही वेळ ती शांत राहिली.
ट्रेन टिळकनगर स्टेशनला येऊन थांबली. तिनं बाहेर पाहिलं. दोन क्षण विचार केला आणि म्हणाली,
‘‘या स्टेशनवर खूप रात्री काढल्या. इथं अनेकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना चकवण्यात, हुलकावण्या देण्यात नाकी नऊ येत होते. अखेर एके रात्री मी इथून पळ काढला. पळाले खरं, पण जाणार कुठं होते? माहीत नव्हतं. वाट नेईल तिकडे मी पळत होते. या धावण्यात राजूभाईवर जाऊन धडकले. राजूभाई. तो थोडा डॉनसारखा दिसत होता. त्यानं माझी चौकशी केली. वडा पाव खाऊ घातला. चहा पाजला. आणि ‘पनवेलला येणार का?’ असं विचारलं.
मी पनवेलला पोचले. तिथं राणी मा होती. म्हणजे मावशी. राजूभाईनं मला तिच्या स्वाधीन केलं. तिनं मला खाऊ पिऊ घातलं. विचारपूस केली. घरच्यांनी मला वार्‍यावर सोडलं होतचं. मी जिवंत आहे की नाही याचंही त्यांना काही घेणं देणं नव्हतं. रानी मा कडे बघून मला जरा बरं वाटलं. वाटलं, आता काहीतरी चांगलं होईल. त्या रात्री मला छान झोप लागली. सकाळी मी उशिरा उठले. दिवस चांगला गेला.

दिवेलागण होत होती. राणीमा मला म्हणाली, ‘‘चल तयार हो जा री. गिर्‍हाइक आनेका टाइम होयेला है.’’ माझ्या काळजात धस्स झालं. पायाखालची जमीनच सरकली. मी गयावया केली. विनवण्या केल्या. राणीमाच्या हातापाया पडले. पण तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तोवर रात्र झाली. कुणी ग्राहक आला. मला रूम नंबर आठशे एकमध्ये ढकलण्यात आलं आणि माझ्यातल्या तिच्यावर बलात्कार झाला. नंतर ते होतच गेले. आणि मला मग त्यांची सवय होत गेली.
जेवणापुतं माझं पोट भरत होतं. काही पैसे मिळत होते. राहायला छत मिळालं होतं आणि राणीमा खूश होती. एके रात्री माझ्याकडे राकेश नामक ग्राहक आलं. नंतर तो नित्यनेमानं येऊ लागला. त्यातून कळलं, की तो नामांकित डॉक्टर आहे. असे संबंध ठेवण्याची त्याला विकृती होती. तो माझ्यावर भलताच खूश होता. मी त्याच्याशी इंग्रजीत बोलू लागले होते. मला पण तो आवडू लागला. मला आता दुसरं कोणीच नको होतं आणि त्याला पण मीच हवे होते.
एके रात्री त्यानं राणीमाला सांगितलं, की तो मला विकत घेऊ इच्छितो. राणी मा तयार झाली. सौदा झाला. पंचवीस हजार एवढी किंमत ठरली. मी इतकी स्वस्त असल्याचं मला पहिल्यांदा कळलं. हा डॉक्टर मला तिथून घेऊन गेला. एका वेगळ्या ठिकाणी त्यानं माझी राहण्याची व्यवस्था केली. काहीच दिवसांत माझ्या लक्षात आलं, की त्याला मी केवळ त्याची विकृती शमवण्यासाठी हवी होती. त्याला माझ्यातली ती नव्हे तो हवा होते. त्यासाठीच तो हपापलेला असायचा.

मी मात्र माझ्यातल्या ‘ती’ला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होेते. कधी कधी तिथून पळून जाण्याचा विचार यायचा. पण ते तितकसं सोपं नव्हतं. माझी ‘ती’च्यासाठी सुरू असलेली धडपड वाया जात होती आणि ‘ती’ दरदिवशी नव्याने मरत होती.
हे असह्य होऊन एके दिवशी माझ्यातली चंडिका जागी झाली. बाजूला पडलेली बॅट उचलून मी ती राकेशच्या डोक्यात हाणली आणि तिथून पळाले. राणीमाकडे तर जाऊ शकत नव्हते. स्वतःचं घरही कधीचंच मागं सुटलं होतं.

बावरलेल्या अवस्थेत मी पनवेल स्टेशनमध्ये आले. बाकावर जाऊन बसले. काही क्षण तशीच बसून राहिले. थोड्या वेळानं माझ्या बाजूला कुणीतरी बसलेलं दिसलं. मी मान कलती करून पाहिलं. पाहते तर तो माझा बाप होता. अभिजित कुलकर्णी. त्यानंही माझ्याकडे पाहिलं. लक्षात येताच तो घाबराघुबरा झाला. ताबडतोब तिथून उठला. आणि पाठ दाखवत पलीकडे निघून गेला. त्याला पाठमोरं पाहताना माझं काळीज तुटत होतं. पण ते दाखवायला कुणी नव्हतं.’’
ट्रेनमधला अंधुकसा उजेड आता विस्तारू लागला होता.
तिच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडांवरचं पाणी प्रकाशबिंदूंसारखं चकाकू लागलं होतं.
ती पुन्हा सांगायला लागली.
‘‘पाठमोरा बाप पाहत असताना मी ठरवलं, की आता मागं वळून पाहायचं नाही. तेवढ्यात तिथं पोलीस आले. पकडून मला चौकीत घेऊन गेले. रात्रभर तिथंच डांबून ठेवलं. पोलीस म्हटलं, की आपल्या काही धारणा झालेल्या असतात. पण म्हणतात ना, जगात चांगली पण माणसं आहेत म्हणून हे जग टिकून आहे. तो हवालदार चांगला माणूस होता. त्यानं माझी विचारपूस केली आणि सकाळी तो मला त्याच्या सरांकडे घेऊन गेला. भोसलेसर हे समाजसेवक होते. त्यांची एक ट्रस्ट होती नि तीत काही तृतीयपंथी काम करत होते. सरांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं.

पुढे मी ग्रॅज्युएशन केलं. पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. समाजासाठी मी अजूनही अशिक्षितच होते. पण मला प्रयत्न सोडायचे नव्हते. नोकरी करायची होती. माझ्या एकटीच्या जगात एकटीनंच छानपैकी राहायचं होतं. एरवी माझ्यातल्या ‘ती’ला कुणी स्वीकारू शकणार नव्हतंच. मी नोकरी शोधत राहिले.
एके दिवशी ही पायपीट फळाला आली. एका हॉस्पिटलमध्ये काही जागा निघाल्या होत्या. त्या एचआयव्ही विभागात होत्या. मी इंटरव्ह्यू दिला. उत्तीर्ण झाले. निवड करताना मला सांगण्यात आलं, इथं साफसफाईचं काम करावं लागेल. मी लगेच हो म्हटलं. लागलीच कामावर रुजू झाले. आता दोन वर्ष झालीत. ही आहे माझी कर्मकथा. हां. ये स्टोरी है अपूनका.’’

ती पुढे म्हणाली, ‘‘अब वही हूं. शरीर की बीमारी के पास और मन की बीमारी से काफी दूर!’’
अंधेरी स्टेशन आलं. मला उतरायचं होतं. मी उठू लागले. माझा हात सोडत ती ही उठली आणि म्हणाली, ‘‘तू भी यही उतरेंगी?’’
उतरताना माझ्या लक्षात आलं, आम्ही दोघीही भावूक झालोय.
खाली उतरल्यावर तिनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं, ‘‘मै अब चलती है. तेरे से बात करके अच्छा लगा.’’
माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं.
ती तिच्या दिशेनं चालायला लागली. मी डोळे पुसत तिला पाठमोरी बघत राहिले.

– प्रियांका पाटील

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.