Now Reading
तेलगु खाद्यसंस्कृती

तेलगु खाद्यसंस्कृती

Menaka Prakashan

भारताच्या पूर्व किनार्‍यावर असलेले आंध्र प्रदेश आणि तेलंगण हे दोन्ही तेलगुभाषी प्रदेश सुरवातीला एकत्र होते, पण 2014 साली तेलंगण स्वतंत्र झाला. निझामी राजवटीमुळे इथल्या संस्कृतीवर मुस्लिम संस्कृत प्रभाव पडलेला आहे असं दिसतं. इथलं पुट्ट्पूर्ती हे गाव सत्यसाईबाबांमुळे प्रसिद्ध झालं. तिरुपती हे भारतातलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. तिथलं टेकडीवरचं बालाजीचं मंदिर, बारा ज्योतिर्लिंगातलं एक असलेलं श्रीशैलम तसंच कुतुबशहानं बांधलेला हैदराबादमधला चार मिनार बघायला पर्यटकांची गर्दी होते. ‘मोत्यांचं शहर’ या नावानं प्रसिद्ध असलेलं हैदराबाद हे सध्या तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोघांचीही राजधानी आहे. नंतर मात्र आंध्रमधल्या गुंटूर जिल्ह्यात अमरावती इथं राजधानी होणार आहे.

आंध्रवासी त्यागराज आणि अन्नमाचार्य हे शास्त्रीय संगीतातले गुरू आहेत शिवाय दाक्षिणात्य परंपरेप्रमाणे आंध्र प्रदेशातलं कुचिपुडी नृत्य प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशची कलमकारी चित्रकला जगात नावाजली जाते. आंध्रची भाषा तेलगु आहे. या भाषेची लिपी वेगळी असली तरी ही भाषा संस्कृतला बरीच जवळ आहे.
तेलगु खाद्यसंस्कृती किनार्‍यालगतच्या प्रदेशापासून अंतर्भागात बदलत जाते. किनारपट्टीच्या प्रदेशात तांदळाचा वापर जास्त तर अंतर्भागात नाचणीचा आणि तेलंगणात तर ज्वारीची भाकरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. आंध्रला भारताचं ‘राईस बाऊल’ म्हणतात इतका तांदूळ तिथं पिकवला जातो. लाल मिरची, हिंग आणि चिंच या घटकांशिवाय आंध्रमधलं अन्नच शिजणार नाही. आंबट, तिखट आणि मसालेदार या तीन चवी ही तेलगु खाद्यसंस्कृतीची ओळख आहे असं म्हटलं तरी चालेल. अतिशय तिखट जेवणासाठी आंध्र प्रदेश प्रसिद्ध आहे. गोंगुराची (म्हणजे अंबाडीची) चटणी-लोणचं आणि इतरही चटणी-लोणच्यांशिवाय तेलगु लोकांचं जेवण पूर्णच होणार नाही. पुलिहरा, पेसरट्टु, हैदराबादी बिर्याणी, बगारा बैंगन आणि सालन प्रसिद्ध आहे. इतर दाक्षिणात्यांप्रमाणे केळीच्या पानावर जेवणं ही खासियत आहेच. गोड पदार्थात पायसम आहेच. बहुतेक गोड पदार्थ तांदूळ आणि गूळ यांपासून बनतात.

आंध्र प्रदेशात साजरा होणारा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे उगाडी- चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा सण. थोडक्यात आपला गुढीपाडवा. घर स्वच्छ करून, दाराला फुलांची तोरणं लावून, दारात सुंदर रांगोळ्या काढून हा सण साजरा होतो. ही नवीन वर्षाची सुरवात असते, त्यामुळे नवीन पंचांगाचं वाचन होतं, नवीन संकल्प केले जातात. कडूलिंबाची पानं किंवा फुलं, गूळ, केळी, हिरव्या मिरच्या, चिंचेचा कोळ, कच्ची कैरी आणि मीठ अशा सहा चवींची पचडी हे या सणाचं वैशिष्ट्य आहे. याशिवाय पोंगल म्हणजे संक्रांत हाही एक महत्त्वाचा सण. तसंच हैदराबादला होणारा डेक्कन महोत्सव आणि सर्वत्र साजरा होणारा विशाखा महोत्सव प्रसिद्ध आहे.
दक्षिणेतल्या इतर प्रांतांप्रमाणे इडली-डोसा, सांबार, रस्सम, तर्‍हेतर्‍हेचे भात हे अन्नपदार्थ थोड्या-फार फरकानं तेलगु लोकांच्या खाण्यात असतातच. फक्त त्यात तिखट आणि आंबट या चवींची मात्रा बरीच जास्त असते.

कोरडी चटणी (करापोडी)
साहित्य : पाऊण कप धने, पंधरा-वीस कढीपत्त्याची पानं, दहा-बारा लाल सुक्या मिरच्या, पाच-सहा लसूण पाकळ्या, पाव कप चणा डाळ, पाव कप उडीद डाळ, एक टे. स्पून जिरं, लिंबाएवढी चिंच, चवीला मीठ, दोन टे. स्पून तेल
साहित्य : एक टे. स्पून तेल गरम करून त्यात लाल मिरच्या भाजाव्या. थोडं-थोडं तेल घालून त्यावर उडीद डाळ आणि चणा डाळ वेगवेगळी भाजून घ्यावी. परत थोडं तेल घालून त्यावर धने, जिरं आणि कढीपत्ता परतून घ्यावा. नंतर चिंचेचे तुकडे करून त्याच गरम कढईत घालून ठेवावे. सर्व जिन्नस गार झाले की दोन्ही डाळी, धने, जिरं, कढीपत्ता मिक्सरमध्ये घालून जाडसर पावडर करावी. त्यातच चिंच आणि मीठ घालून फिरवावं. नंतर लसणाचे काप करून घालावे आणि परत फिरवावं.

कांद्याची चटणी
साहित्य : दोन कप कांद्याच्या फोडी, चार-पाच लसूण पाकळ्या, सात-आठ लाल सुक्या मिरच्या, दोन टे. स्पून चिंचेचा कोळ, एक टे. स्पून चिरलेला गूळ, चवीला मीठ, फोडणीसाठी एक टे. स्पून तेल, एक टी स्पून मोहरी, अर्धा टी स्पून उडदाची डाळ, चिमूटभर हिंग, सात-आठ कढीपत्त्याची पानं
कृती : चिरलेला कांदा, लसूण, गूळ, चिंच, मीठ आणि लाल मिरच्या एकत्र करून जाडसर वाटून घ्यावं. तेल तापवून मोहरी घालावी. मोहरी तडतडली की उडदाची डाळ घालावी. डाळ गुलाबी झाली की हिंग आणि कढीपत्ता घालावा. ही फोडणी चटणीत घालावी.

अंबाडीचं लोणचं (गोंगुरा पिकल)
साहित्य : अंबाडी या पालेभाजीची एक मोठी जुडी, चार टे. स्पून तेल, पंधरा-वीस लाल सुक्या मिरच्या, एक टी स्पून धने, एक टी स्पून जिरे, चार-पाच मेथी दाणे, सात-आठ लसूण पाकळ्या ठेचून, फोडणीसाठी अर्धा टी स्पून चणा डाळ, अर्धा टी स्पून उडीद डाळ, कढीपत्त्याची पानं, चवीपुरतं मीठ
कृती : अंबाडीची पानं काढून धुवून कोरडी करावी आणि चिरावी. एक टे. स्पून तेल गरम करून त्यात पानं घालावी आणि झाकून दोन-तीन मिनिटं शिजवावी.
दुसर्‍या कढईत एक टे. स्पून तेल गरम करावं, जिरं, धने, मेथी घालावी. लाल मिरच्यांचे थोडेसे तुकडे घालावे. मीठ घालावं आणि गार झाल्यावर मिक्सरमध्ये पावडर करावी. त्यातच चिरलेला लसूण आणि शिजलेली अंबाडी घालावी आणि परत एकदा मिक्सर फिरवावा. उरलेलं तेल गरम करावं, चणा डाळ, उडीद डाळ घालून परतावी. डाळ लालसर झाली की उरलेल्या मिरच्यांचे तुकडे घालावे. कढीपत्त्याची पानं घालावी आणि ही फोडणी अंबाडीत मिसळावी.

कैरीचं लोणचं
साहित्य : दीड किलो कैर्‍या, एक टे. स्पून मेथी दाणे, अर्धा कप लाल मोहरी, दोन कप काश्मिरी लाल तिखट, दोन टी स्पून हळद, दोन कप मीठ, अर्धा कप लसूण पाकळ्या, चार कप तिळाचं तेल
कृती : कैरीच्या चौकोनी फोडी कराव्या आणि फडक्यावर पसरून तीन-चार तास ठेवाव्या. तेल खूप कडकडीत करून मग गार करावं. मेथी दाणे लालसर होईपर्यंत भाजावे. मोहरी आणि मेथी दाणे एकत्र करून पावडर करावी. आंब्याच्या फोडी, मेथी-मोहरी पावडर, हळद, तिखट, मीठ आणि लसूण पाकळ्या एकत्र कराव्या. त्यात अर्धं तेल मिसळावं. लोणचं बरणीत भरावं आणि उरलेलं तेल वर ओतावं. ही बरणी कडकडीत उन्हात तीन-चार दिवस ठेवावी.

मिक्स रसभाजी
साहित्य : एक मध्यम बटाटा सोलून चौकोनी तुकडे करून, शेवग्याच्या एका शेंगेचे बोटाएवढे तुकडे, एक कप दुधी भोपळ्याचे चौकोनी तुकडे, एक कप लहान कांदे, दोन हिरव्या मिरच्या, एक टे. स्पून चिरलेला गूळ, एक कप चिंचेचं पाणी, एक टे. स्पून धने, एक टी स्पून मेथी, चार-पाच लाल सुक्या मिरच्या, एक टे. स्पून चणा डाळ, चार टी स्पून उडीद डाळ, एक टी स्पून जिरं, तीन टे. स्पून तेल, एक टी स्पून मोहरी, पंधरा-वीस कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, एक टी स्पून लाल तिखट, चवीला मीठ
कृती : एक टे. स्पून तेल गरम करून त्यात धने, मेथी, चणा डाळ, दोन टी स्पून उडीद डाळ, लाल मिरच्या आणि जिरं घालून परतावं. गार झाल्यावर मिक्सरमध्ये पावडर करावी. त्यात थोडं पाणी घालून पेस्ट करावी. एक टे. स्पून तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि चिरलेल्या भाज्या घालून, परतून त्यात हळद आणि थोडं मीठ घालावं. वाटलेला मसाला, गूळ, चिंचेचं पाणी आणि तिखट घालून कुकरमध्ये भाज्या शिजवून घ्याव्या. उरलेलं तेल तापवून त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की उडीद डाळ घालून परतावी. कढीपत्ता आणि हिंग घालावा. ही फोडणी भाजीत मिसळावी.

मसाला तोंडली
साहित्य : चार-पाच लाल सुक्या मिरच्या, वीस-पंचवीस कढीपत्त्याची पानं, तीन-चार लसूण पाकळ्या, दोन टी स्पून जिरं, पाव कप भाजलेले शेंगदाणे, पाव कप किसलेलं सुकं खोबरं, चारशे ग्रॅम तोंडली, पाव कप काजू, पाव टी स्पून हळद, अर्धा टी स्पून तिखट, पाव कप तेल, चवीला मीठ
कृती : तोंडली धुवून उभी चिरावी नाहीतर काप करावे. चार लाल मिरच्या, कढीपत्त्याची दहा-बारा पानं, लसूण पाकळ्या, एक टी स्पून जिरं कोरडंच भाजून घ्यावं. गार झाल्यावर पावडर करावी. तेल तापवून त्यात काजू तळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे. उरलेल्या तेलात जिरं घालावं, एक लाल मिरची आणि उरलेला कढीपत्ता घालावा. तोंडल्याचे काप आणि हळद घालून परतावे आणि झाकण ठेवून वाफेवर शिजवावे. नंतर त्यात वाटलेला मसाला, मीठ, तिखट घालून भाजीला एक वाफ द्यावी.

भरली वांगी (गुट्टी वंकया कोरा)
साहित्य : आठ-दहा मध्यम आकाराची वांगी, दोन टे. स्पून चिंचेचा कोळ, एक कप चिरलेला कांदा, दहा-बारा लाल सुक्या मिरच्या, पाव कप भाजलेले शेंगदाणे, दोन टे. स्पून तीळ, पाव कप ओलं खोबरं, दोन टे. स्पून चिरलेली कोथिंबीर, दोन टी स्पून जिरं, दोन हिरव्या वेलच्या, सहा-सात लसूण पाकळ्या, एक टे. स्पून चणा डाळ, दोन तमालपत्र, दहा-बारा कढीपत्त्याची पानं, चवीला मीठ, तेल
कृती : वांगी धुऊन त्यांना दोन्ही बाजूंनी चिरा पाडाव्या. चिंचेच्या कोळात एक कप पाणी आणि मीठ घालून उकळावं. त्यात वांगी घालून गॅस बंद करावा आणि झाकण ठेवावं. दहा मिनिटं तसंच ठेवावं. कढईत एक टे. स्पून तेल घालावं. त्यात कांदा परतून घ्यावा. परतलेल्या कांद्यात थोडं चिंचेचं पाणी घालून त्याची पेस्ट करावी. धने, जिरं, तीळ, लाल मिरच्या, वेलच्या, चणाडाळ हे जिन्नस कोरडे भाजून पावडर करावी. पावडर करताना त्यात शेंगदाणे आणि लसूणही घालावा. यात मीठ आणि हळद मिसळावी. वाटलेल्या कांद्यात हा मसाला मिसळावा. हा मसाला वांग्यात भरावा. कढईत तीन टे. स्पून तेल तापवावं, त्यात जिरं, तमालपत्र आणि कढीपत्ता घालावा. वांगी घालून परतावी. त्यात उरलेला मसाला, चिंचेचं पाणी घालावं. झाकण ठेवून वांगी शिजवावी.

मिरची का सालन
साहित्य : दहा-बारा लांब मोठ्या हिरव्या मिरच्या, पाव कप शेंगदाण्याचं तेल, अर्धा टी स्पून मोहरी, अर्धा टी स्पून मेथी दाणे, पंधरा-वीस कढीपत्त्याची पानं, एक टे. स्पून चिरलेला गूळ, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून काश्मिरी मिरच्यांची पावडर, एक कप चिरलेला कांदा, एक टे. स्पून आल्याचे तुकडे, पाच-सहा लसूण पाकळ्या, अर्धा कप सुक्या खोबर्‍याचा कीस, पाव कप भाजलेले शेंगदाणे, पाव कप तीळ, एक टी स्पून खसखस, पाच-सहा लाल सुक्या मिरच्या, एक टे. स्पून धने, चवीला मीठ
कृती : तीळ, खसखस, खोबरं, लाल मिरच्या, धने कोरडे भाजून घ्यावे. तसंच कांदा, लसूण, आलंही एक टे. स्पून तेलावर परतून घ्यावं. हे सगळे जिन्नस आणि शेंगदाणे एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावे. लागल्यास थोडं पाणी घालावं. हिरव्या मिरच्या धुवून कोरड्या कराव्या. मध्ये चीर पाडून आतल्या बिया काढून टाकाव्या. तेल तापवून त्यात मिरच्या तळून घ्याव्या. त्याच तेलात मोहरी घालावी. ती तडतडली की मेथी दाणे आणि कढीपत्ता घालावा. वाटलेला मसाला घालून परतावं. एक कप पाणी घालावं आणि तेल सुटेपर्यंत परतत राहावं. चिंचेचा कोळ, गूळ, हळद, लाल तिखट आणि मीठ घालावं. तीन-चार मिनिटं शिजवावं. लागल्यास थोडं पाणी घालावं. त्यात तळलेल्या मिरच्या घालाव्या आणि दोन-तीन मिनिटं शिजू द्यावं. शेवटी कोथिंबीर घालावी.

चिंचेचं रसम (पाची पुलुसू)
साहित्य : दोन कप चिंचेचं पाणी, तीन-चार हिरव्या मिरच्या, दोन टे. स्पून तीळ, एक टी स्पून साखर, अर्धा कप चिरलेला कांदा, एक टी स्पून जिरं, दोन टे. स्पून तेल, एक टी स्पून मोहरी, दोन लाल सुक्या मिरच्या, एक टी स्पून हळद, दहा-बारा कढीपत्त्याची पानं, चवीला मीठ
कृती : एक टे. स्पून तेल गरम करून त्यात मिरच्यांचे तुकडे परतावे, नंतर त्यात तीळ घालून परतावे. गार झाल्यावर मिरच्या आणि तीळ यांची भरड पावडर करावी. चिंचेचं पाणी, मीठ, साखर, तिळाची पावडर एकत्र करावं आणि उकळत ठेवावं. तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं घालून ते तडतडलं की लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हळद घालावी. कांदा घालून परतावा. ही फोडणी चिंचेच्या पाण्यात घालावी.

दहीभात
साहित्य : अर्धा कप तांदूळ, दीड कप पाणी, अर्धा कप दूध, एक कप दही, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, एक टी स्पून मोहरी, एक टी स्पून जिरं, एक टी स्पून चणा डाळ, एक टी स्पून उडीद डाळ, चिमूटभर हिंग, अर्धा टी स्पून भरडलेली काळी मिरी, सात-आठ कढीपत्त्याची पानं, चवीला मीठ
कृती : तांदूळ धुवून त्यात पाणी घालावं आणि कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा. नंतर त्यात दूध घालून तो गार होऊ द्यावा. नंतर त्यात दही आणि मीठ घालावं. तेल तापवून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की जिरं, उडीद डाळ, चणाडाळ, हिंग, मिरी आणि कढीपत्त्याची पानं घालावी. ही फोडणी भातात मिसळावी.

हैदराबादी दम बिर्याणी
साहित्य : पाच टे. स्पून तूप, दोन टे. स्पून तेल, अर्धा टी स्पून जिरं, एक कप बटाट्याचे चौकोनी तुकडे, एक कप फ्लॉवरचे तुरे, अर्धा कप ताजे मटार, पाव कप फरसबीचे तुकडे, पाव कप गाजराचे काप, पाव कप पाणी काढलेलं दही, दोन टी स्पून आलं-लसूण पेस्ट, एक टी स्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, एक टी स्पून लाल तिखट, एक टे. स्पून धनेपूड, अर्धा टी स्पून हळद, अर्धा टी स्पून गरम मसाला, अर्धा कप तळलेले कांद्याचे काप, चार टी स्पून लिंबाचा रस, तीन टे. स्पून चिरलेली कोथिंबीर, दोन टे. स्पून पुदिन्याची पानं, दोन कप बासमती तांदूळ, तीन-चार लवंगा, दोन तमालपत्र, एक इंच दालचिनी, चिमूटभर केशर, पंधरा-वीस काजू, मूठभर बेदाणे
कृती : दोन टे. स्पून तूप आणि एक टे. स्पून तेल गरम करावं. त्यात भाज्यांचे काप परतून घ्यावे आणि बाजूला काढावे. दही, आलं-लसूण-मिरच्यांची पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, धनेपूड, एक टे. स्पून लिंबाचा रस, दोन टे. स्पून कोथिंबीर आणि एक टे. स्पून तेल एकत्र करावं, त्यात तळलेल्या कांद्याचा पाव कप चुरा मिसळावा आणि या मिश्रणात भाज्या मिसळून तासभर ठेवाव्या. तांदूळ धुवून अर्धा तास भिजत घालावे. कढईत एक टे. स्पून तूप तापवून त्यात लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र घालून परतावं. तांदूळ निथळून त्यात घालून परतावे आणि त्यात चार कप पाणी घालावं, त्यात मीठ आणि एक टे. स्पून लिंबाचा रस घालावा आणि भात अर्धवट शिजवावा. थोडं तूप घालून त्यात दह्यातल्या भाज्या परताव्या.
जाड तळ असलेल्या पातेल्यात सुरवातीला भाताचा थर द्यावा, त्यावर थोडा तळलेला कांदा, थोडे काजू-बेदाणे, थोडी कोथिंबीर अणि पुदिन्याची चुरडलेली पानं घालावी. त्यावर भाज्यांचा थर घालावा, त्यावर परत शिजलेला भात घालावा. त्यावर उरलेलं तूप, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं चुरडून घालावी. तळलेला कांदा, तळलेले काजू आणि बेदाणे घालावे. त्यावर परत भाताचा थर द्यावा. त्यावर दुधात भिजवलेलं केशर पसरावं. घट्ट झाकण लावावं आणि पंधरा ते वीस मिनिटं बिर्याणी शिजू द्यावी.

तूर डोसा
साहित्य : दोन कप तूर डाळ, दोन हिरव्या मिरच्या, एक टे. स्पून आल्याचे तुकडे, एक टी स्पून धने, अर्धा कप गव्हाचं पीठ, दोन टी स्पून शाही जिरं, चवीला मीठ
कृती : तूर डाळ धुवून तीन-चार तास भिजत घालावी. भिजवताना त्यात धने आणि शाहीजिरं घालावं. नंतर त्यात मिरच्या आणि आलं घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. नंतर त्यात गव्हाचं पीठ मिसळावं, लागल्यास थोडं पाणी घालावं आणि या पिठाचे डोसे घालावे.

हिंग रसम
साहित्य : दोन टे. स्पून चिंचेचा घट्ट कोळ, पाव कप शिजलेली तूर डाळ, दोन-तीन हिरव्या मिरच्या, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून हिंग, फोडणीसाठी दोन टी स्पून तेल, अर्धा टी स्पून मोहरी, अर्धा टी स्पून जिरं, अर्धा टी स्पून मेथी दाणे, सात-आठ कढीपत्त्याची पानं, मूठभर कोथिंबीर
कृती : चिंचेच्या कोळात दोन कप पाणी, हळद आणि मीठ घालावं. शिजलेलं वरण घोटून घालावं. हिरव्या मिरच्यांचे उभे तुकडे करून घालावे आणि उकळत ठेवावं. नंतर हिंग पावडर घालावी. तेल तापवून त्यात मोहरी, जिरं आणि मेथी दाणे घालावे. ही फोडणी उकळत्या मिश्रणावर घालावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. एक मिनिटाने गॅस बंद करावा.

See Also

तांदळाची मठरी (निपट्टू)
साहित्य : एक कप तांदळाचं पीठ, पाव कप थोडेसे कमी भाजलेले शेंगदाणे, पाव कप डाळं, दोन टे. स्पून किसलेलं सुकं खोबरं, एक टे. स्पून तीळ, अर्धा टी स्पून लाल तिखट, पंधरा-वीस कढीपत्त्याची पानं, दोन टे. स्पून तेल, चवीला मीठ
कृती : शेंगदाणे, डाळं आणि सुकं खोबरं मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटावं. त्यातच कढीपत्त्याची पानं, तांदळाचं पीठ, तिखट, मीठ, तीळ घालून परत फिरवावं. या मिश्रणात तेल कडकडीत करून घालावं आणि थोडं थोडं पाणी मिसळत घट्ट पीठ भिजवावं. या पिठाच्या लहान लहान लाट्या कराव्या. एकेक लाटी पातळ थापून त्यावर काट्याने टोचा माराव्या. हे वडे गरम तेलात खरपूस तळावे.

मुगाचा डोसा (पेस्सारट्टू)
साहित्य : एक कप हिरवे मूग, एक टे. स्पून आल्याचे काप, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक टी स्पून जिरं, चवीला मीठ, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर
कृती : मूग सहा-सात तास भिजत घालावे. त्यानंतर धुवून, निथळून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. वाटताना जिरं, आलं आणि मिरच्या घालाव्या. वाटलेल्या मिश्रणाचे जाडसर डोसे घालावे. डोशाचं पीठ तव्यावर पसरल्यावर त्यावर कांदा-कोथिंबीर पेरावी.

पाकातले वडे (बेलम गलेरू)
साहित्य : अर्धा कप उडदाची डाळ, अर्धा कप चिरलेला गूळ, अर्धा टी स्पून वेलची पावडर, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल
कृती : डाळ चार-पाच तास भिजत घालावी. नंतर शक्यतो पाणी न घालता वाटून घ्यावी. चवीला मीठ घालावं. तीन टे. स्पून पाणी आणि गूळ एकत्र करून पाक करावा. गूळ विरघळवून एक-दोन मिनिटांत गॅस बंद करावा. वाटलेल्या पिठाचे वडे थापून तळावे. वड्याला मधोमध भोक पाडावं. तळल्यानंतर निथळून वडे पाकात टाकावे.

मसाला बोंडं (पुनूगुलू)
साहित्य : एक कप उडीद डाळ, अर्धा कप तांदूळ, पाव टी स्पून बेकिंग सोडा, एक कप बारीक चिरलेला कांदा, दोन हिरव्या मिरच्या, एक टी स्पून जिरं, पाव कप चिरलेली कोथिंबीर, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल
कृती : डाळ आणि तांदूळ सहा-सात तास भिजत घालावे आणि लागेल तसं पाणी घालून वाटून घ्यावे. नंतर पीठ फुगण्यासाठी पाच-सहा तास झाकून ठेवावं. पीठ दुप्पट फुगलं की त्यात मीठ, कांदा, जिरं आणि मिरच्यांचे बारीक तुकडे घालून कालवावं. नंतर त्यात सोडा मिसळून तापलेल्या तेलात गोल बोंडं घालावी आणि खमंग तळावी.

तांदूळ-मूग डाळ खीर
साहित्य : अर्धा कप तांदळाचं पीठ, दोन कप पाणी, पाऊण कप चिरलेला गूळ, मूग डाळ अर्धा कप, अर्धा टी स्पून वेलची पावडर, पाव कप ओलं खोबरं, दोन टी स्पून तूप, दूध, चिमूटभर मीठ
कृती : एक कप पाणी उकळावं, त्यात तीन टे. स्पून गूळ आणि चिमूटभर मीठ घालावं. उकळत्या पाण्यात तांदळाचं पीठ हळूहळू घालत ढवळावं. पीठ शिजलं की गॅस बंद करावा. ही उकड मळून लहान लहान गोळे करावे. मुगाची डाळ धुवून त्यात दीड कप पाणी घालून ती शिजवावी. शिजलेली डाळ घोटावी. पुन्हा एक कप पाणी उकळावं, त्यात गूळ घालून गूळ विरघळला की त्यात शिजलेली मुगाची डाळ घालावी आणि पाच मिनिटं उकळावं. त्यात खोबरं आणि वेलची घालावी, तयार केलेले गोळे त्यात घालावे आणि एक-दोन मिनिटं उकळावं. गॅसवरून खाली उतरल्यावर त्यात लागेल तसं दूध मिसळावं.

केळ्याची खीर
साहित्य : पिकलेली दोन केळी, एक कप कंडेन्स्ड मिल्क, एक लिटर दूध, चार पिस्ते आणि चार बदाम यांचे काप, एक टी स्पून तूप
कृती : केळ्याचे काप करावे. दूध गरम करायला ठेवावं. ते उकळलं की त्यात कण्डेन्स्ड मिल्क घालावं आणि ढवळत राहावं. बदाम आणि पिस्त्याचे काप तुपावर परतून घ्यावे. दूध घट्ट झालं की त्यात केळ्याचे काप घालून ढवळत राहावं. ही केळ्याची खीर घट्ट झाली की गॅस बंद करावा. गार झाल्यावर ही खीर फ्रीजमध्ये थंड करावी.

गवालू
साहित्य : एक कप मैदा, दोन टे. स्पून तेल, चवीनुसार मीठ, अर्धा कप गूळ, पाव कप पाणी
कृती : तेल कडकडीत करून मैद्यात घालावं, मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवावं (पोळीच्या कणकेइतपत). पिठाच्या लहान लहान गोळ्या कराव्या. पिठाची गोळी काट्यावर ठेवून हलकेच दाबून रोल करावा. हे रोल खमंग तळावे. गुळात पाणी घालून घट्टसर पाक करावा. तळलेले रोल पाकात टाकून लगेच बाहेर काढावे. गवालू करण्यासाठी लाकडाचा गवालू मेकर मिळतो. त्यावर दाबून रोल करता येतात.

– वसुंधरा पर्वते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.