Now Reading
तूच कर्ता आणि करविता

तूच कर्ता आणि करविता

Menaka Prakashan
View Gallery

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हेमकुंड असं नियोजन असलेल्या चारधाम यात्रेला एका यात्रा कंपनीबरोबर मैत्रिणींसह जाण्याचं माझं ठरलं.

दिल्लीला पोचल्यानंतर बसमधून हरिद्वारला जाण्यासाठी आम्ही एकत्र जमलो. बसमध्ये सामान चढवेपर्यंत एकमेकांशी ओळख करून घेणं सुरू झालं. प्रत्येकाकडे प्रवाशांच्या नावांची यादी व बसमधले सीट नंबरही दिले होते. ‘येल्लापूरकर कोण?’ असं म्हणत माझ्याशी आवर्जून ओळख करून घेणार्‍या दांपत्यानं मला विचारलं, ‘‘आपले कोणी मर्चंट नेव्हीत आहेत का? माझ्या मोठ्या दिरांचा मोठा मुलगा मर्चंट नेव्हीत आहे.’’ असं म्हणताच, ‘‘माझा मुलगाही मर्चंट नेव्हीत आहे व त्याचा मित्र म्हणजे माझा पुतण्या हे कळताच त्या म्हणाल्या, ‘‘तुम्हीही आमच्या घरच्याच झालात.’’

आमच्याबरोबर पुण्याचाही अठरा-वीस जणांचा गट होता. प्रवासात छान ओळखी झाल्या. कुटुंबातलं कोणी नाही याची बोच थोडी कमी झाली खरी!

या देवभूमीत मनाला मोहवणारा निसर्ग, खळाळणार्‍या नद्या, हिमशिखरं, निळंभोर आकाश, वळणावळणाचे रस्ते, अनोखा अनुभव आनंद देत होता. अलकनंदा, मंदाकिनीच्या संगमावर रुद्रप्रयाग, अलकनंदा पिडरीच्या संगमावर कर्णप्रयाग (जिथं कर्णानं तपश्‍चर्या केली होती) अलकनंदा-बिहरीगंगा, अलकनंदा-भागीरथी नद्यांच्या संगमावर देवप्रयाग, विष्णुप्रयाग वसवले आहेत.

बद्रीनाथ, गंगोत्री इथं मंदिरापर्यंत थेट बसनं जाता येतं. केदारनाथ, यमुनोत्री इथं मात्र भाविकांना चालत, घोड्यावरून अथवा केडी-पालखीसारखी काठ्यांवर तोलून धरणारी खुर्ची यावरून जाता येतं.

यमुनोत्रीला आम्ही घोड्यावरून जात असताना भेटणारा प्रत्येक भाविक ‘जय माता दी’ म्हणून अभिवादन करतो. घोड्यावरून उतरून विश्रांतीसाठी थांबले असताना काही अडचण आहे का, अशी आपुलकीनं चौकशी करणारेही अनेक जण भेटतात. तुमचं प्रवासाचं साधन कोणतंही असो अथवा पायी चालत असा, सगळे प्रवासी एकमेकांशी भक्तिरसानं जोडलेले असतात. ‘माता का बुलावा आया है’ म्हणूनच आम्ही दर्शनाला निघालो आहोत अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. स्थानिक लोकही मदतीसाठी तत्पर असतात.

चारधाम यात्रेतलं पहिलं यमुनोत्रीचं देवदर्शन आणि घोड्यावरचा प्रवासही सुखकर आणि सुसह्य झाला. माझ्याशी ओळख करून देणार्‍या जोडप्यातल्या पत्नीला बरं वाटत नसल्यामुळे त्या यमुनोत्रीला येऊ शकल्या नाहीत. त्या हॉटेलवरच थांबल्या होत्या. स्थानिक डॉक्टरांना दाखवून औषधोपचार चालू झाले होते. दुसर्‍या दिवशी उत्तर काशीला साधारण १६० मैलांचा प्रवास करून आम्ही हॉटेलवर पोचलो. तिथंही डॉक्टरांनी त्यांना तपासलं व पुढचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला. आम्हा सार्‍यांचीच मनं खंतावली. कोणी ना कोणी मदतीसाठी त्यांच्या खोलीत थांबलं होतं.

जेवणापूर्वी त्यांचे पती आमच्या खोलीत आले. मला म्हणाले, ‘’आपण मला काही पैसे देऊ शकाल का?’’ ते आमच्या मोठ्या दिरांच्या कुटुंबीयांना ओळखत होते म्हणून पैसे दिले (त्या वेळी मोबाईलची सोय नव्हती). त्यांची पत्नी आजारी होती. परतीच्या प्रवासात जास्तीचे पैसे लागू शकतात असा विचारही मनात आला.

थोड्या वेळात ते परत आले. म्हणाले, ‘‘तुमचा मला आधार वाटतो. तुम्ही मला खूप जवळच्या वाटता. तुम्ही आमच्याबरोबर येऊ शकाल का?’’

दुसर्‍याला मदत करण्याचा मूळचा माझा स्वभाव असल्यामुळे फारसा विचार न करताच मी त्यांना म्हणाले, ‘‘मी येईन तुमच्याबरोबर.’’

मी खरं तर माझ्या खोलीतच होते. त्यांनी मात्र स्वतःच मी त्यांच्याबरोबर येणार असल्याचं सर्वांनाच सांगितलं !

झोपण्यापूर्वी सहप्रवाशांपैकी दोन-तीनजण आमच्या खोलीवर आले व म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला ‘आशाताई’ म्हणतो त्याच अधिकारानं विचारतो, तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्यासाठी होकार कसा दिलात? चारधाम यात्रा कोणी अशी अर्ध्यावर सोडतं का? त्यांच्याबरोबर त्यांचे पती आहेत. तुम्हाला तर इथलं काहीही माहीत नाही, मग तुम्ही त्यांना मदत कशी काय करू शकाल? तुम्ही आम्हाला परत कुठे आणि कशा भेटणार? तुम्ही विचार करा आणि मगच निर्णय घ्या!’’ यात्रा अशी अर्ध्यावर सोडू नका असं बजावून खरं तर वास्तवतेची जाणीव करून देऊनच ते गेले.

मला ब्रह्मांड आठवलं. आमच्या कुटुंबीयांना ओळखणारी त्यांची पत्नी आजारी आहे. त्या क्षणी त्यांना मदत करायला हवी या जाणिवेपोटी मागचा-पुढचा काहीही विचार न करताच मी ‘हो’ म्हटलं खरं.

रात्री डोळ्यांशी निद्रादेवीची भेट झालीच नाही. अगदी पहाटेच दरवाजा वाजला, तर यात्रा व्यवस्थापक दारात उभे!

पहाटे जाग येताच प्रथम ते त्या सहप्रवाशांच्या पत्नीची तब्येत बघायला, विचारपूस करायला गेले होते. त्यांनीच मला सांगितलं, तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार आहात. हे समजल्यावर त्यांनीही मला चांगलंच फैलावर घेतलं.

त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय तुम्ही मला न विचारता घेतलात तरी कसा? तुम्हा सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या पत्नीला मी त्यांच्याबरोबर पाठवणार होतो. त्यांना मी विचारलं, ‘‘मुंबईला जाण्यासाठी तुम्ही दिल्लीहून विमान प्रवास केलात तर माझ्या पत्नीला विमानानं न्याल का?’’ त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. ‘‘समजा तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात तर तुमचं तरी ते विमान तिकीट काढणार आहेत का? की आम्ही येईपर्यंत तुम्ही दिल्लीत थांबणार? तुमचे नातेवाईक, मैत्रिणी वगैरे कोणी आहेत का तिथं? की विमानाचं तिकीट तुम्हीच काढणार आहात? असा प्रश्‍नांचा भडीमार करत त्यांनीही यात्रा अर्ध्यावर न सोडण्याबद्दल बजावलं.

त्यांच्याबरोबर मी स्थानिक माहीतगार मनुष्य देऊ शकतो, पण त्यांनी तेही मान्य केलं नाही. असं सांगून तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात तर मी तुमच्यासाठी काही करू शकणार नाही, असं ठणकावूनच ते गेले.

मला जाणवलं, माझे सहप्रवासी, यात्रा व्यवस्थापक माझी किती काळजी करत होते. त्यांची कळकळ, आपुलकी माझ्या चुकीच्या निर्णयापासून परावृत्त करत होती. अडचणीत असलेल्या त्यांना कोणी वार्‍यावर सोडलं नव्हतं. त्यांना माझ्यापेक्षाही चांगला पर्याय उपलब्ध होता. डेहराडूनच्या लष्करी हॉस्पिटलमध्येही त्यांना मदत मिळू शकत होती. यात्रा व्यवस्थापक अनुभवी होते. ते तर स्वतःच्या पत्नीलाही त्यांच्याबरोबर पाठवायला तयार होते, पण तिची जबाबदारी घ्यायला ते तयार नव्हते. हे सगळं लक्षात आल्यावर माझी चूक मला समजली. तरी नाही कसं म्हणायचं याची चिंता मला भेडसावत होती. शेवटी त्यांना नाही म्हणायचंच याचा निर्णय मी घेतला खरा!

अखेर तो क्षण आलाच. ते गृहस्थ म्हणाले, ‘‘तयार आहात ना? आपल्याला निघायचं आहे.’’
मी कसाबसा धीर गोळा करत त्यांना सांगितलं, ‘‘मला नाही येता येणार!’’

ते म्हणाले, ‘‘काल तर हो म्हणाला होतात. मी सर्वांना सांगितलंसुद्धा (खरं तर तेच माझ्या पथ्यावर पडलं कारण मी खोलीच्या बाहेर गेलेही नव्हते व मी कोणाला काही सांगितलं नव्हतं). आता नाही म्हणू नका. मला तुमचा खूप आधार वाटतो.’’

पण कशी कोण जाणे, मी माझ्या निर्णयावर ठाम राहत ‘नाही म्हणायला शिका’ या व्रताला चिकटून राहिले. ते नाराज होऊन निघून गेले. कुठंतरी मनाला खंत वाटत होती. मी त्यांना निरोप द्यायला सामोरी जाऊ शकले नाही.

आमचा पुढचा प्रवास चालू होता. बसमधल्या त्यांच्या दोन रिकाम्या जागा पाहून जाणवत राहायचं खरं! आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. आम्ही हरिद्वारला त्याच हॉटेलमध्ये परतीच्या प्रवासात राहणार होतो. दुसर्‍या दिवशी दिल्ली-मुंबई प्रवास सुरू होणार होता. त्या हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण पोचलो. सर्वजण सामान येईपर्यंत आरामात बसले होते. हॉटेल मॅनेजर म्हणाले, ‘‘तुमच्या ग्रुपमधले पती-पत्नी इथे आले होते. त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.’’

हे ऐकताच सर्व सुन्न झाले. माझा तर दगडच झाला जणू! डोळ्यांतून फक्त पाणी वाहत होतं. सर्वजण माझ्याभोवती जमा झाले. माझी समजूत घालताना ते म्हणाले, ‘‘तुम्ही आम्हा सर्वांचं ऐकलं म्हणून बरं झालं.’’ आमचं न ऐकता तुम्ही त्यांच्याबरोबर आला असतात तर? या प्रश्‍नाला खरंच काही उत्तर नव्हतंच. माझी मती कुंठित झाली होती.

खरं तर आम्ही सर्व प्रवासी ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट’ असेच एकत्र आलो होतो. या सर्वांनीच माझी काळजी घेतली. योग्य मार्ग दाखवला. कुणाच्या तरी रूपात देव येतो आणि आपलं संकट टळतं. ‘कर्ता आणि करविता’ तोच असतो.

एवढं मात्र खरं, यात्रा व्यवस्थापक आणि पुणेकर यांनी माझी घेतलेली शाळा म्हणा, झाडाझडती म्हणा, त्यामुळेच माझी यात्रा सफल संपूर्ण झाली खरी!

आशा येल्लापूरकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.