Now Reading
तुळस मंजिर्‍या…

तुळस मंजिर्‍या…

Menaka Prakashan

सीता, वृंदा, अहल्या यांच्या गोष्टी आपण ऐकतो आणि हळहळतो. पण आजही अशाच सीता, वृंदा आणि अहल्या आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांना वेगवेगळ्या रूपात फसवणारे, त्यांच्यावर अत्याचार करणारेही आहेत. खरं तर आपण इतिहास शिकतो, ते चुका सुधारण्यासाठी. पण तसं होताना दिसत नाही. स्त्रियांवरच्या अत्याचाराचं प्रमाण काही कमी होत नाहीये. हे चित्र बदलण्यासाठी समाज म्हणून स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला नको का?

कोविड-१९ या महामारीनं मार्च २०१९ पासून सगळ्या जगाला वेठीला धरलं. या महामारीचा सामना करताना आपले सणवारही आपण उत्साहानं गर्दी जमवून साजरे करू शकलो नाही, तरी रीतिरिवाज व कर्मकांड पाळणं हे मात्र चुकलं नाही. नुकतीच दिवाळी होऊन गेली आणि तुळशीचं लग्न झालं की नेहमीच आपल्याकडची खरीखुरी माणसांची लग्नं सुरू होतात. तुळशीच्या लग्नाची कथा म्हणजे खरी स्त्री जन्माचीच दुर्दैवी कहाणी. सीतेच्या वाटेला आला तो भोग सीतेच्याही आधी वृंदेच्या वाट्याला आला. सीता देवपत्नी. तिला दैत्यराज रावणानं कपटानं पळवलं. रामाशी एकनिष्ठ राहूनही त्याच्यावर सर्वस्वानं प्रेम करूनही कलंकिनी ठरली ती सीता. वृंदा दैत्यपत्नी. तिला प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी फसवलं. पतीच्या रूपात येऊन फसवलं अन् पुण्य संपलं वृंदेचं! तीच गोष्ट अहल्येची. गौतम ऋषींच्या रूपात येऊन इंद्रानं तिला फसवलं.

इतिहासातल्या कित्येक कथांमध्ये, कपट केलं आहे ते पुरुषानं आणि अपराधी ठरली आहे स्त्री असंच दिसून येतं. ती देवपत्नी सीता असो वा दैत्यपत्नी वृंदा किंवा ऋषिपत्नी अहल्या. कलंकित झाली आहे ती स्त्री. पुुरुषसत्ताक संस्कृतीची धूर्तता व क्रूरता या पौराणिक कथांमधून अगदी सहज लक्षात येते. अगदी आजपर्यंतही स्त्री-पुरुष समानता व स्त्रियांना सुरक्षित, सन्मानाचं जगणं जगता येईल हे धूसरच चित्र आहे. आपण सुसंस्कृततेचा, आधुनिकतेचा कितीही आव आणला तरी आजही आपला समाज तितकाच मागासलेला आहे, जितका तो प्राचीन काळी अन् मध्ययुगात होता तितकाच. आजही ‘स्त्री’ ही भोगवस्तूच आहे आणि ती उपलब्ध करून घेणं अनेकांसाठी ‘श्रेयस’ आहे. याला कारणीभूत आहे त्या आपल्या तथाकथित (अ)सांस्कृतिक मनोधारणा. लैंगिकदृष्ट्या वखवखलेला असा समाजाचा मोठा घटक त्यातून तयार झालेला आहे. त्याचा क्रूर राक्षसी चेहरा बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटनांमधून दिसतो, तसाच तो समाज माध्यमांतून फिरणार्‍या तथाकथित विनोदांमधूनही जाणवतो. हे नासलेलं वैचारिक पर्यावरण व स्त्री दुय्यमत्व ठरवणार्‍या पारंपरिक रूढींची शृंखला आपण आजही मोठ्या अभिमानानं जोपासत आहोत ही दुर्दैवी शोकांतिका आहे.

स्त्रीची अब्रू हत्यार म्हणून वापरणं पातिव्रत्याच्या या कसोट्या कोणाला आणि कोणी निर्माण केल्या आहेत याचा वस्तुनिष्ठपणे विचार करायला लागलो की वर्षानुवर्षं रुजलेली पुरुषसत्ताक पद्धती अधोरेखित होते. स्त्री-पुरुष समानता हा टप्पा गाठताना ‘माणूस’पणाची लक्षणं अंगात भिनवून वास्तवात आणणं त्यासाठी स्त्री-पुरुष सामर्थ्यस्थळं समजून-उमजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, पण सद्यस्थिती पाहता पुरुषांना स्त्रियांची सामर्थ्यस्थळं न दिसणं हे आपण समजू शकतो, पण स्त्रियांनाही त्याचा विसर पडला आहे हे जास्त चमत्कारिक आहे. स्त्री प्रश्‍नाकडे पाहण्याचे पूर्वापर दोन दृष्टिकोन प्रचलित आहेत. पहिला करुणेचा- ज्यामध्ये सामान्यपणे स्त्रियांची बाजू घेणारे पुरुष स्त्रियांच्या परिस्थितीकडे करुणेनं पाहतात आणि दुसरा दृष्टिकोन पुरुषांकडे/पुरुष जातीकडे तुच्छतेनं पाहण्याचा असतो. ज्यामध्ये सगळे पुरुष खलनायक आहेत हे वाटत असतं. दुसर्‍या भागाचं उत्तर फार वर्षांपूर्वी ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकात दिलं आहे. पण पहिल्या भागाचं काय? वृंदाची/तुळशीच्या लग्नाची गोष्ट ही पहिला दृष्टिकोन रुजवणारी आहे.

वृंदा म्हणजे तुळस. कोणे एके काळी जालंधर नावाच्या महाप्रतापी दैत्यराजाची ती पत्नी होती. मोठी पतिव्रता. तिची पुण्याई एवढी की, त्यामुळे जालंधरदैत्य त्रिभुवनात अजिंक्य झाला होता. वृंदेचं सामर्थ्य, पण त्याचा फायदा तिच्या नवर्‍याला. मग (नेहमीप्रमाणे) देवांना मोठी काळजी पडली. जालंधराचा पराभव करणं त्यांना अशक्य झालं. देवांनी कपटीपणाचा वापर करून जालंधराशी युद्ध करताना दोन माकडांकरवी हुबेहूब जालंधराचं वाटावं असं धड व धडावेगळं झालेलं मस्तक वृंदेपुढे आणून टाकलं. वृंदा दुःखानं वेडीपिशी झाली. तेवढ्यात देवांनी पाठवलेला साधू तिथं आला आणि संजीवनी मंत्र जपून त्यानं जालंधराला पुन्हा जिवंत केलं. प्रत्यक्षात तो जालंधर नव्हताच. तो जालंधरासारखा दिसणारा श्रीविष्णू होता.

जालंधर जिवंत झाला असं मानून आनंदानं फुललेल्या वृंदेनं त्याला मिठी मारली. झालं! अज्ञानानं तिनं परपुरुषाला स्पर्श केला आणि तिची एवढ्या वर्षांची पुण्याई क्षणात नष्ट झाली. तिला कपटानं फसवणार्‍या विष्णूऐवजी तिचंच चारित्र्य भंगलं. तिची पुण्याई संपली. तिनं विष्णूला शाप दिला आणि चिताप्रवेश केला. कृष्णावतारात विष्णूनं वृंदेशी लग्न केलं, पण तिला त्या लग्नानं प्रतिष्ठा दिली नाही. उलट दर वर्षी तिचं पत्नीपद सिद्ध करण्यासाठी त्याच्याशी दर वर्षी लग्न लावावं लागतं आणि आपण वाजतगाजत तुळशीलग्न लावतो. या वृंदेचा संदर्भ सद्यपरिस्थितीतही ठसठशीतपणे अधोेरेखित होतो. आपली शेतीप्रधान अर्थव्यवस्था, त्यातून येणारी सरंजामशाही, जातीची उतरंड आणि त्याच्याच जोडीला पूरक अशी पुरुषप्रधान व्यवस्था या सगळ्यामध्ये स्त्रिया, दलित, गरीबांना तर जगणं असह्य आहे हे वास्तव.

‘स्त्री’ची अब्रू ही पुरुषाला नामोहरम करण्याचं हत्यार वर्षानुवर्षं वापरलं जात आहे. २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाच्या गांभीर्यामुळे सगळा देश हादरला होता, पण त्यानंतर गेल्या आठ वर्षांत एकामागून एक त्याहूनही गंभीर ठरावीत अशी प्रकरणं कोपर्डी, हैदराबाद, हिंगणघाट, उन्नाव, हाथरस इथं घडत गेली. आणखी किती काळ लैंगिक वर्चस्वाच्या राजकारणाला, जात वर्चस्वाला स्त्रिया बळी पडत राहणार आहेत? त्यांचा माणूस म्हणून कधीच विचार केला जाणार नाही का? हा अस्वस्थ करणारा प्रश्‍न मात्र तसाच आहे.

एकविसाव्या शतकात विकास किती वेगानं होतो आहे याचे माध्यमांतून दिंडोरे पिटवले जात असले, तरी त्या तथाकथित विकासाचा चेहरा कसा आहे? मोठे-मोठे हमरस्ते, इमारती, विमानतळं उभारली; उद्योगधंदे विस्तारले की विकास जरूर होतो व या विकासात सामान्य माणसाची सुरक्षितता व हित अपेक्षित असतं, तसंच आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास, स्त्रियांपर्यंत हा विकासाचा प्रवास पोचणं अपेक्षित असतं. त्यामुळे विकासाची चर्चा करताना आणखी किती काळ हे पुरुष सत्ता आणि स्त्रियांचं दुय्यमत्व हे समीकरण सुरू राहणार आहे? स्त्रियांचा माणूस म्हणून विचार होणार नाही का? हा अस्वस्थ करणारा प्रश्‍न आहे. कुठंही जा, बलात्काराचं प्रकरण पुढं आलं की तो कुठल्या जातीतल्या मुलीवर, स्त्रीवर झालेला आहे आणि कुठल्या जातीमधल्या पुरुषानं केला आहे त्यानुसार लगोलग संबंधितांच्या भूमिका ठरतात.

See Also

‘एका स्त्रीवर झालेला अत्याचार’ असं त्याकडे न बघता लगेचच त्याचं राजकारण केलं जातं. खरं तर समानता ही कायद्यापासून समाजाच्या सर्वच पातळ्यांवर यायला हवी. जाती वर्चस्व जाऊन समानता येणं हे महत्त्वाचं आहे. त्यातही लिंगसमानता यायलाच हवी. मात्र दरखेपेस समानतेच्या प्रयत्नांना सत्ताकारण ‘खो’ देतं. निवडणुका आल्या की उमेदवार निवडीपासून जाती-पातींचं राजकारण ती घातक व्यवस्था अधिक घट्ट करते. जातीव्यवस्थेची उतरंड दाखवण्यासाठी बलात्कार हे एक शस्त्र आहे आणि जातीय राजकारणाचं ते एक विषारी फळ आहे हे आपल्या कधी लक्षात येणार? एखाद्या स्त्रीला नमवण्यासाठी पुरुषी वृत्तीतून केलेला अत्याचार यापलीकडे सत्ता वर्चस्वीकरण हे पारंपरिक तत्त्व यामध्ये प्रामुख्यानं ठळकपणे पुढे येतं, त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?

तुळशीचं लग्न, शारदीय नवरात्र यामध्ये देवीची पूजा करायची, मात्र प्रत्यक्षात घराबाहेर व घरातही स्त्रियांची अवहेलना करत अत्याचारांची मालिका सतत सुरू ठेवायची हा अवघ्या समाजाचा भंपकपणा आहे आणि सुशिक्षित म्हणवणार्‍या स्त्रियाही डोळ्यांवर कातडं ओढून या सगळ्याची ‘री’ओढतात तेव्हा जाणवतं की, मनाच्या तळात दुःख पुरून ठेवणारी तुळस ही काळीनिळी असते ती उगीच नव्हे!!

– डॉ. सुषमा भोसले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.