Now Reading
चित्रमय ओळख देणारे ‘ट्रेडमार्क्स’

चित्रमय ओळख देणारे ‘ट्रेडमार्क्स’

Menaka Prakashan

पेटंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडत असतात, पण त्यांचा नेमका अर्थ काय, ते अनेकदा आपल्याला माहीत नसतं. या संकल्पना आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेल्या आहेत. त्यांना ‘बौद्धिक संपदा’ असं एकत्रित नाव आहे. संपदा म्हणजे संपत्ती, पण संपत्ती ‘बौद्धिक’ कशी असू शकते? कोणत्या संपदेला ‘बौद्धिक’ म्हणता येईल? या संपदेच्या धारणकर्त्याला काही फायदे आणि संरक्षण मिळतं का? आपण स्वत: एखादी बौद्धिक संपदा निर्माण करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ‘ग्रे मॅटर्स’ या लेखमालिकेतून मिळतील. बौद्धिक संपदांबद्दलची प्राथमिक माहिती, त्यांचे कायदे, फायदे आणि उदाहरणं देऊन हा विषय अधिकाधिक सोपा करून सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

आपल्याला लोगो हा परिचित शब्द आहे, कायद्याच्या भाषेत यालाच ‘ट्रेडमार्क’ असं म्हणतात. थोडक्यात ट्रेडमार्क म्हणजे व्यवसायाची चित्रमय ओळख. यामुळे जनमानसात आपल्या व्यवसायाचा, सेवेचा ठसा उमटवण्यासही मदत होते. ट्रेडमार्कचे अनेक प्रकार आहेत, ट्रेडमार्कविषयीचे कायदेही आहेत. याविषयी विस्तारपूर्वक जाणणं नक्कीच फायद्याचं ठरेल.

चित्रमय ओळख- ट्रेडमार्क
चित्रांची भाषा वैश्विक असते, तिला लिपी, व्याकरण यांची बंधनं नसतात. माणसालाही शब्दांपेक्षा चित्रांची भाषा अधिक जवळची वाटते. याच कारणामुळे प्रत्येक उद्योग/ व्यवसाय आपलं एक ‘चिन्ह’ तयार करतो. हे चिन्ह हीच त्या व्यवसायाची ओळख होते. या व्यापारचिन्हाला कायदेशीर भाषेत म्हणतात ‘ट्रेडमार्क’. याचंच रुळलेलं नाव म्हणजे ‘लोगो’.
एखाद्या उत्पादनाची ओळख त्याच्या ट्रेडमार्कमार्फत करोडो लोकांपर्यंत कशी पोचते याचं परिचित उदाहरण म्हणजे ‘मॅकडोनाल्ड्स’चा लोगो. नाव घेताक्षणी आपल्या डोळ्यापुढे ते भलंमोठं, पिवळ्या रंगाचं ‘एम’ हे अक्षर उभं राहतं. त्या पाठोपाठ, तिथं मिळणारे बर्गर्स आणि फ्राइज आठवतात आणि आठवणीनंदेखील तोंडाला पाणी सुटतं. अमेरिकेत जन्मलेला हा ब्रँड जगभरात पोचलेला आहे. भाषा बदलली, प्रांत बदलले, वेळोवेळी पदार्थांमध्येही बदल होत गेले, पण काय बदललं नाही? तर हा ट्रेडमार्क आणि तिथं मिळणार्‍या खाद्यपदार्थांची चव आणि गुणवत्ता. प्रवास करत असताना भूक लागली आणि अवचितपणे हा उंच ‘एम’ दिसला की कोण आनंद होतो! चव आणि स्वच्छतेची खात्री नसलेले बाकी कोणतेही पदार्थ खाण्यापेक्षा ‘मॅकडोनल्ड्स’ला पसंती दिली जाते. हा आनंद, ही खात्री म्हणजेच ‘मॅकडोनाल्ड्स’ची ब्रॅन्ड व्हॅल्यू. वास्तविक, हा ट्रेडमार्क म्हणजे फक्त विशिष्ट पद्धतीनं लिहिलेलं एक इंग्रजी अक्षर आहे, पण हेच अक्षर आज एक विशिष्ट गुणवत्ता असलेला विशिष्ट पदार्थ दर्शवतो. याच ट्रेडमार्कमुळे ‘मॅकडोनाल्ड्स’ हा जगातला श्रीमंत ब्रँड झालेला आहे.

ट्रेडमार्क म्हणजे काय?
ट्रेडमार्क म्हणजे व्यवसायाची चित्रमय ओळख. प्रत्येक ट्रेडमार्कमध्ये उत्पादन/ सेवा, व्यवसायाचं/ कंपनीचं नाव अतिशय खुबीनं गुंफलेलं असतं. या छोट्याशा चिन्हात संपूर्ण व्यवसायाचं मर्म सामावलेलं असतं जणू! परिपूर्ण ट्रेडमार्क तयार करण्यासाठी कल्पकता आणि कौशल्य लागतं, म्हणूनच ती एक बौद्धिक संपदा आहे.
ट्रेडमार्करूपी बौद्धिक संपदा जपण्यासाठी भारतात आधी ‘द ट्रेड अँड मर्चंडाईज अ‍ॅक्ट, १९५८’ हा कायदा होता. पुढे, १९५८चा कायदा रद्द करून, त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापाराचं वैश्वीकरण यांना सामावून घेणारा ‘द ट्रेडमार्क्स अ‍ॅक्ट, १९९९’ संमत करण्यात आला. यानुसार, तुमचे उत्पादन/सेवा यांची ओळख पटवणारं आणि ज्याचं चित्र काढलं जाऊ शकतं असं कोणतंही चिन्ह हा ट्रेडमार्क असू शकतो. उत्पादनाचा विशिष्ट आकार, रंग, वेष्टण, आकडे, शब्द आणि त्यांची सरमिसळ हीदेखील ट्रेडमार्क असू शकते.
थोडक्यात, ट्रेडमार्क तयार करण्यासाठी कायदा आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य देतो. काही ट्रेडमार्क बघूया, म्हणजे हा मुद्दा पटकन समजेल.
जगप्रसिद्ध हार्डवेअर आणि सॉप्टवेअर कंपनी ‘आयबीएम’चा ट्रेडमार्क बारकाईनं पाहिला, तर लक्षात येईल, की त्या केवळ आडव्या रेघा आहेत, त्यांची मांडणी विशिष्ट पद्धतीनं करून ‘आय बी एम’ ही अक्षरं लिहिलेली आहेत.
‘नेस्ले’च्या ट्रेडमार्कमध्ये किती गोष्टी सामावलेल्या आहेत बघा- ‘बाळांसाठी दूध पावडर’ हे या कंपनीचं मुख्य उत्पादन होतं. म्हणून, ट्रेडमार्कमध्ये ‘घरट्यातल्या पिल्लांना भरवणारी पक्षीण’ आली. ही कंपनी हेन्री नेस्ले यांनी सुरू केली, म्हणून ‘नेस्ले’ हे शब्द. हा ट्रेडमार्क चित्र आणि शब्द यांचा उत्तम मिलाफ आहे.
‘टाटा मोटर्स’चा ट्रेडमार्क- म्हणालं तर ‘टाटा’तलं ‘टी’ हे अक्षर, पण असंही वाटतं की तीन रस्ते जिथं मिळतात तो तिठा आहे- रस्त्यावर मोटारी धावतात- त्याचं हे प्रतीक. एकाच अक्षरामधून नाव आणि काम दोन्ही अधोरेखित केलं आहे.
थोडक्यात, ट्रेडमार्क तयार करताना रेघा, चित्र, शब्द, रंग, काहीही, कसेही आणि कितीही वापरू शकता. त्यातून तुमच्या व्यवसायाची ओळख अधोरेखित व्हायला हवी, बस्स.

ट्रेडमार्कची नोंदणी
ट्रेडमार्क कसा असावा यावर बंधन नसलं, तरी ट्रेडमार्क कसा असू नये याबद्दल कायदा स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारे अश्लील चित्रण, वर्णन, लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे किंवा भडकवणारे चिन्ह, समाजविघातक चित्रण अथवा वेष्टण, काही विशिष्ट शब्द यांचा ट्रेडमार्क मिळू शकत नाही.
एक हजार शब्दांत जे व्यक्त करता येत नाही, ते एका चित्रातून व्यक्त होतं, असं म्हणतात. ट्रेडमार्क हे याचं तंतोतंत उदाहरण आहे. पण, चित्रकाराला जसं अभिप्रेत आहे, तेच चित्र पाहणार्‍यालाही दिसतं असं नाही बरं! ‘मिंत्रा’ या कपडेविक्री करणार्‍या कंपनीचा लोगो आणि त्यानिमित्तानं उठलेलं वादळ ताजंच आहे. अनेक वर्षं त्या लोगोमध्ये कोणाला काही आक्षेपार्ह वाटलं नव्हतं, पण तो ‘स्त्रियांसाठी अवमानकारक आहे’ अशी याचिका त्यावर दाखल झाली आणि ‘मिंत्रा’ने वाद शमवण्यासाठी चक्क आपल्या लोगोत बदलही केला!

ट्रेडमार्क अ‍ॅक्ट, १९९९ अन्वये आपण आपल्या ट्रेडमार्कची नोंदणी करू शकतो. पेटंट्सच्या निबंधकाकडेच ट्रेडमार्कचीही नोंदणी होते. नोंदणी करताना, आपला ट्रेडमार्क कोणत्या ‘क्लास’खाली आहे हे नोंदवणं आवश्यक आहे. या कायद्यान्वये वेळोवेळी अनेक नियम केले जातात. २००२ सालच्या नियमांनुसार वस्तूंसाठी चौतीस, तर सेवांसाठी अकरा ‘क्लास’ आहेत. ट्रेडमार्कचा नोंदणी अर्ज करताना तुमचा ट्रेडमार्क या पंचेचाळीसपैकी नेमक्या कोणत्या ‘क्लास’अंतर्गत बसतो याची खातरजमा करून त्याप्रमाणे अर्जात तशी नोंद करावी लागते. एकापेक्षा जास्त क्लासमध्येदेखील नोंदणी करता येऊ शकते.
साध्या ट्रेडमार्कबरोबरच ‘कलेक्टिव्ह मार्क्स’ आणि ‘सर्टिफिकेशन मार्क्स’ असे ट्रेडमार्कचे आणखी दोन प्रकार आहेत.
कलेक्टिव्ह मार्क्स- एखादी कंपनी अनेकदा विविध प्रकारची उत्पादनं तयार करते, किंवा सेवा पुरवते. या सर्व उत्पादन/सेवांना एकच ट्रेडमार्क वापरला जाऊ शकतो. याला म्हणतात ‘कलेक्टिव्ह मार्क’. यामुळे ग्राहकाला समजतं, की अमूक एखादं उत्पादन नवं असलं, किंवा वेगळं असलं, तरी ते माहितीच्या कंपनीचं आहे. उदाहरणार्थ, होंडा ही एक नावाजलेली कार उत्पादक कंपनी आहे. होंडाचं स्पेलिंग आणि एका विशिष्ट पद्धतीनं लिहिलेला ‘एच’ हे त्यांचे ट्रेडमार्क आहेत. या कंपनीच्या अनेक कार आहेत- ‘अमेझ’, ‘जॅझ’, ‘सिटी’, ‘सिव्हिक’, ‘सीआरव्ही’ इत्यादी. या प्रत्येक कारचा आपापला ट्रेडमार्क आहे, तरीही प्रत्येकीवर ‘होंडा’चाही ट्रेडमार्क असतोच. कारण, ‘होंडा’ हा कलेक्टिव्ह मार्क आहे. यानं हे सिद्ध होतं, की ती कार होंडा समूहाची आहे, शिवाय ‘होंडा’च्या अन्य उत्पादनांइतकाच विशिष्ट दर्जा ठेवून आहे.

सर्टिफिकेशन मार्क्स- एखाद्या व्यापारी संघटना किंवा मंचाचा हा मार्क असतो. काही विशिष्ट वस्तू/सेवांच्या विक्रीसाठी या संघटनेचे/मंचाचे ठराविक निकष असतात. ते पार केले, की तुम्ही त्यांचा मार्क वापरण्यासाठी ‘सर्टिफाय’ होता, म्हणजेच पात्र होता. हा मार्क तुमच्या उत्पादन/सेवेवर आहे, म्हणजेच तुमचे उत्पादन/सेवा एका विशिष्ट दर्जाची आहे असं समजलं जातं. साहजिकच, हा मार्क तुमच्या उत्पादन/सेवेवर उमटणं हे गुणवत्तेचं आणि प्रतिष्ठेचं लक्षण असतं. उदा. सोन्याची गुणवत्ता सिद्ध करणारा ‘हॉलमार्क’ हा एक सर्टिफिकेशन मार्क आहे.

ट्रेडमार्क नोंदणीचा कालावधी
सर्व प्रकारची छाननी होऊन एकदा तुमच्या ट्रेडमार्कची नोंदणी झाली, की सलग दहा वर्षं तो तुमच्या नावे होतो. यापैकी साडेनऊ वर्ष संपली, की तुम्ही पुनर्नोंदणी शुल्क भरून तुमचा ट्रेडमार्क आणखी दहा वर्षांसाठी संरक्षित करू शकता. अशा रीतीनं दर दहा वर्षांनी नोंदणी शुल्क भरून कितीही काळासाठी तुम्ही तुमचा ट्रेडमार्क संरक्षित ठेवू शकता. ट्रेडमार्कपुढे तुम्ही हे चिन्ह पाहिलं असेल. याचा अर्थ की तो ट्रेडमार्क नोंदणीकृत आहे.
पहिल्या दहा वर्षांनंतर काही कारणानं तुम्ही पुनर्नोंदणी केली नाहीत, तर आणखी एक वर्ष वाट पाहिली जाते. त्या कालावधीत तुम्हाला स्मरणपत्र आणि मागणीपत्र पाठवलं जातं. त्यावरही तुम्ही काही हालचाल केली नाहीत, तर मात्र तुमच्या ट्रेडमार्कचं संरक्षण संपतं. त्यानंतर कोणीही तुमचा ट्रेडमार्क किंवा तुमच्या ट्रेडमार्कसारख्या दिसणार्‍याट्रेडमार्कची नोंदणी करण्यासाठी अर्ज करू शकतो. तुम्ही तेव्हादेखील काहीही हरकत नोंदवली नाहीत, तर त्याच्या नावे त्या ट्रेडमार्कची नोंदणी केली जाऊ शकते.
ट्रेडमार्क केवळ भारतापुरता संरक्षित केला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदणी करायची असेल, तर तशीही करता येऊ शकते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनं भारतीय बाजारपेठेत आता सहज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेलं ‘मॅकडोनाल्ड्स’ आज भारतातल्या कित्येक शहरांत आहे. तरी अमेरिकेतल्या एखाद्या हाय-वेवर दिसणारा ‘मॅकडोनाल्ड्स’चा ट्रेडमार्क आणि पुण्यातल्या मॅकडोनल्ड्जचा ट्रेडमार्क एकच असतो. इतकंच नाही, तर रंगसंगती, खाद्यपदार्थ, सेवापद्धती यातही साम्य असतं. कोणीही याची ‘कॉपी’ करू शकत नाही, केली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. हे सगळं होऊ शकतं, कारण ‘मॅकडोनाल्ड्स’नं आपल्या ट्रेडमार्कसाठी आंतरराष्ट्रीय संरक्षण मिळवलेलं आहे.

ट्रेडमार्कच्या नोंदणीचे फायदे
ट्रेडमार्कची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे, की त्याची नोंदणी करणं अनिवार्य किंवा बंधनकारक नाहीये. ‘वेल नोन ट्रेडमार्क’ किंवा ‘प्रायर यूज’ असाही ट्रेडमार्कचा एक प्रकार असतो.
प्रत्येक सेवा किंवा उत्पादन हे काही राष्ट्रीय स्तरावरचं नसतं. स्थानिक पातळीवरदेखील अनेक सेवा आणि उत्पादनांची निर्मिती आणि विक्री होते. त्यांचा दर्जा उत्तम असतो, ती लोकप्रिय असतात आणि त्यांचे ग्राहक दिवसेंदिवस वाढतही असतात. उदाहरणार्थ, असं समजूया की ‘मिठास’ नावाचं एक स्थानिक मिठाईचं दुकान आहे. या दुकानातली मिठाई, चव, दर्जा उत्कृष्ट आहेत. ‘मिठास’चा एक ट्रेडमार्कही आहे. ‘मिठास’चं नाव त्याच्या दुकानावर आणि प्रत्येक वेष्टणावर एका विशिष्ट पद्धतीनं लिहिलेलं आहे. पण या ट्रेडमार्कची नोंदणी केलेली नाही. आता, ‘मिठास’च्या एका स्पर्धकानं त्याच परिसरात त्याच पदार्थांचं दुकान सुरू केलं. वर, त्यानं ‘मिठास’ म्हणून स्वत:च्या नावे ट्रेडमार्क नोंदवायचा प्रयत्न केला. पण, त्याच्या ट्रेडमार्कची नोंदणी होऊ शकणार नाही. ‘मिठास’चा मूळ मालक हे सिद्ध करू शकतो, की त्याचा ट्रेडमार्क नोंदणीकृत नसला, तरी त्याचं दुकान जुनं आहे, नावाजलेलं आहे, त्याच्या ट्रेडमार्कला ओळख आहे. नोंदणी केलेली नसली, तरी त्याच्या ट्रेडमार्कला कायदेशीर संरक्षण मिळेल. याला म्हणतात ‘प्रायर यूज’. (पण, ट्रेडमार्कची नोंदणी केली, तर परत काही सिद्ध करायची गरज नसते, आपोआपच कायद्याचं संरक्षण मिळतं.)
सर्व ट्रेडमार्क्सना मात्र नेहमीच ‘पासिंग ऑफ इन्फ्रिंजमेंट’ आणि ‘डिसेप्टिव्हली सिमिलर’ ट्रेडमार्कची भीती असते. या शब्दांचा सोपा अर्थ म्हणजे दुसर्‍याच्या नावाजलेल्या ट्रेडमार्कचा गैरफायदा घेऊन आपला दुय्यम किंवा चोरलेला किंवा ढापलेला माल ‘ओरिजिनल’ म्हणून खपवणे. अर्थातच, यात दर्जाची तडजोड असते, शिवाय फसवणूकही असतेच. हे सगळे गंभीर गुन्हे आहेत आणि त्यांवर विविध अंगाने कारवाई होऊ शकते:-
१) ट्रेडमार्कचा मूळ मालक चोरावर दिवाणी खटला दाखल करू शकतो आणि त्याला त्याचा ट्रेडमार्क वापरण्यापासून रोखू शकतो.
२) नोंदणीकृत ट्रेडमार्क चुकीच्या पद्धतीने वापरून चोरानं स्वत:चा जो काही आर्थिक फायदा करून घेतला, तो त्याला मूळ मालकाला परत द्यावा लागू शकतो.
३) सर्व खोटा/ बनावट माल, चिठ्ठ्या, वेष्टणं, खोकी, पत्र, लिफाफे; थोडक्यात ज्या ज्या वस्तूंवर बनावट ट्रेडमार्क उमटवलेला आहे त्यांच्या जप्तीचा आणि त्या नष्ट करण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते.
४) याचबरोबर, चोरावर फौजदारी खटलाही चालवला जाऊ शकतो. त्यासाठी त्याला सहा महिने ते तीन वर्षं तुरुंगवास किंवा/ आणि पन्नास हजार रुपये ते दोन लाख रुपयांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.

सारांश
ट्रेडमार्क म्हणजे व्यवसायाची ओळख असते, गुणवत्ता आणि दर्जाचं प्रतीक असतं. ट्रेडमार्कमुळेच असली आणि नकलीमध्ये फरक करता येतो. त्यामुळे, व्यवसायवृद्धीसाठी आणि आपल्या प्रिय ग्राहकांच्या मनात कायमचं स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकानं आपल्या ट्रेडमार्कचा यथोचित वापर करावा.

– पूनम छत्रे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.