Now Reading
चातुर्याने सुटका

चातुर्याने सुटका

Menaka Prakashan

राजकीय निर्वासित म्हणून पाच वर्षांपूर्वी प्रथम इथं अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्यापैकी कुणालाच हे शक्य होईल असं वाटलं नव्हतं. पण इथं परदेशात हमीद झेबारीनं नवीन आयुष्य सुरू केलं होतं म्हणून आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्‍वास त्याला वाटू लागला होता. आपली बायको शिरीन आपल्याला विमानतळावर सोडायला मोटार चालवत आली आहे या विचारानं तो स्वतःशीच हसला.

मागे पट्टा आवळून त्याच्या बहिणीशेजारी- मेशेजारी- बसलेला नदीम विचारत होता, ‘‘पपा, तुम्ही परत घरी कधी येणार?’’ पपा आता आपल्यापासून लांब चालले आहेत हे समजायला मे फारच लहान होती.
त्याचे वडील उत्तरले, ‘‘फक्त एक पंधरवडा, त्याहून जास्त नाही हे नक्की. आणि मी परत आलो की आपण सर्वजण सुट्टीवर जाऊ.’’
त्यांच्या मुलानं विचारलं, ‘‘पंधरवडा म्हणजे किती दिवस?’’
हमीद हसून म्हणाला, ‘‘चौदा दिवस.’’
टर्कीश एअरवेज अशी खूण असलेल्या रस्त्याला गाडी वळवत त्याची बायको म्हणाली, ‘‘आणि चौदा रात्री’’ तिनं एक बटण दाबल्यावर गाडीची डिकी उघडली. हमीदनं उडी मारून तिथल्या बॅगा काढल्या आणि फुटपाथवर ठेवल्या. मोटारीचा मागचा दरवाजा उघडून त्यानं प्रथम छोट्या मुलीला व मग मुलाला जवळ घेतलं. तो दूर चालला होता म्हणून मे रडत नव्हती, तर मोटार एकदम थांबल्यावर ती नेहमीच रडत असे तशी रडत होती. सहसा त्याच्या दाट मिशांवरून तिनं हात फिरला की, ती रडायची थांबत असे तसंच आत्ताही झालं.

त्याचा मुलगा परत म्हणाला, ‘‘चौदा दिवस.’’ हमीदनं बायकोला मिठीत घेतलं तेव्हा तिच्या पोटातल्या तिसर्‍या मुलामुळं ते थोडंसं पुढं आलेलं त्याला जाणवलं.
सामानासाठी हमीदनं ढकलगाडी ताब्यात घेतली तेव्हा शिरीन म्हणाली, ‘‘तुम्ही परत याल तेव्हा आम्ही इथं तुमची वाट बघत असू.’’
हमीदच्या सहा रिकाम्या केसेस एकदा चेकइन केल्यावर हमीद टर्कीश एअरलाईन्सच्या दिशेनं गर्दीत गायब झाला. तो वर्षातून दोनदा याच प्रकारे जात असल्यामुळे सर्व काही त्याच्या चांगल्याच परिचयाचं होतं.
सर्व सोपस्कार, बोर्डिंग पास वगैरे पार पाडल्यावरही विमान उडायला एक तासाचा अवधी असल्यामुळे हमीद सावकाशीनं फिरत राहिला. ‘टर्कीश एअरलाईन्स’चं विमान नेहमीप्रमाणे मॅनहॅटनच्या बाजूला उभं केलेलं असणार असा विचार करत तो चाललेला असताना असं दिसलं की, त्रेसष्ट हजार डॉलर भरून एक दुसरं विमान लगेच सोडण्यात येणार होतं.
014 क्रमांकाच्या ‘टर्किश एअरलाईन्स’च्या, न्यूयॉर्क-लंडन-इस्तंबूलच्या मार्गानं जाणार्‍या विमानाची पाटी लागली. काऊंटरवर 10.10 अशी वेळ झळकत होती.
विविध प्रकारच्या उतारूंना विमानात प्रवेश देण्यास सुरुवात झाली होती. तुर्कीश लोक त्यांच्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी चालले होते. सुट्टीवर निघालेल्या अमेरिकन लोकांची एक तास वाचवून त्रेसष्ट डॉलर खर्च करायची तयारी नव्हती. व्यवसाय करणारे लोकदेखील जादा त्रेसष्ट डॉलर भरायची तयारी दाखवण्यास असमर्थ होते.
हमीदनं रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाद्यपदार्थ व कॉफी मागवली. रोजच्या लहान-सहान गोष्टी किती सुखावह होत्या याबद्दल त्यानं नव्यानं लाभलेल्या अमेरिकन स्वातंत्र्याला मनात लाख वेळा दुवा दिली.

‘‘इस्तंबूलला लहान मुलांना घेऊन जाणार्‍या उतारूंनी विमानात शिरण्यासाठी प्रथम पुढं यावं.’’ अशी घोषणा झाली.
हमीदनं पटापट खाणं संपवलं. प्रत्येक पदार्थ सॉसमध्ये बुडवून खायच्या अमेरिकन सवयीला तो अजून सरावला नव्हता. शेवटी त्यानं पातळ, बेचव कॉफीचा घोट घेतला. छोट्या बोन चायनाच्या कपातून मिळणारी ती टर्किश कॉफी त्यानं टाकून दिली. अमेरिकेसारख्या व्यक्तिस्वातंत्र्य जपणार्‍या देशात रहायला मिळण्याबद्दलची ही छोटीशी तडजोड होती. त्यानं बिल दिलं व एक डॉलरची टीप ठेवून उठला.
‘‘आता इतर उतारूंनी पुढं यावं’’ अशी घोषणा झाल्यावर हमीदनं त्याची ऑफिस बॅग उचलली. इकॉनॉमी क्लासच्या अगदी शेवटच्या बाजूकडची कडेची खुर्ची त्याला मिळाली होती. अजून अशा दहा फेर्‍या केल्या की मी जरा महाग ‘बिझिनेस क्लास’नं प्रवास करू शकेन असा त्यानं मनाशी विचार केला. तेव्हा त्याला तो नक्कीच परवडेल अशी त्याला खात्री वाटत होती.
विमानानं आकाशात झेप घेतल्यावर छोट्या खिडकीतून बाहेर बघत हमीद नेहमीप्रमाणे हळूहळू अदृश्य होत जाणार्‍या, त्यानं नव्यानं जिथं आयुष्य सुरू केलं त्या अमेरिकेबद्दल विचार करत राहिला.

पाच वर्षांपूर्वी सद्दाम हुसेननं हमीदला, त्याच्या दोन वर्षांच्या शेती खात्याच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला होता. त्या हिवाळ्यात गव्हाचं पीक खूपच कमी आलं. सैन्यातल्या लोकांनी व मधल्या दलालांनी त्यांचा वाटा घेतल्यावर इराणी लोकांना गव्हाचा अति तुटवडा जाणवला. कोणावर तरी याचा ठपका येणारच होता आणि त्यासाठी शेतकी मंत्र्याला जबाबदार धरणं अगदी साहजिकच होतं. हमीदचे वडील गालिच्यांचा व्यवसाय करत असत व हमीदनं तोच पुढे चालवावा असं त्यांना वाटे आणि ते स्वर्गवासी होण्यापूर्वी हमीदनं शेतकी मंत्र्याचा पदभार स्वीकारू नये अशी ताकीदही दिली होती. आधीचे या पदावरचे तीन मंत्री त्यांना डच्चू मिळून नाहीसे झाले होते व नाहीसे होण्याचा अर्थ इराकमधल्या प्रत्येकाला माहिती होता. पण तरीही हमीदनं ते पद स्वीकारलं. पहिल्या वर्षी वारेमाप पीक आलं आणि त्यानं मनाशी असा विचार केला की, हे पद म्हणजे दुसरं काही करण्यापूर्वीची मधली पायरीच तर आहे. इराक प्रमुखानंही सर्वांसमोर त्याला ‘माझ्या जवळचा व चांगला मित्र’ असं हमीदच्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी त्याला म्हटल्यामुळे त्याला स्वर्ग दोन बोटंच उरला होता.
पण दुर्दैवानं हमीदच्या वडिलांचं म्हणणं खरं ठरलं. जेव्हा हमीदची मंत्रिपदावरून हकालपट्टी झाली, तेव्हा सर्व मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. फक्त एकानंच- एकाच खर्‍या मित्रानं त्याला तिथून सुटका करून घेण्यासाठी मदत केली.

हमीद मंत्रिपदावर असताना त्यानं एवढी काळजी घेतली होती की, दर आठवड्याला त्याच्या बँकेतल्या खात्यातून रोजच्या खर्चाला लागणार्‍या रकमेपेक्षा थोडी जास्त रक्कम काढून उरलेल्याचे तो अमेरिकन डॉलर घेऊन ठेवत असे. प्रत्येक वेळी वेगळ्या दलालाकडून तो हे करे व संशय येईल इतक्या रकमेचे डॉलर कधीच घेत नसे. इराकमध्ये कुठून कुणाला कसला सुगावा लागेल याचा काही नेम नव्हता.
त्याची मंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर त्यानं गादीखाली लपवलेले एकूण किती डॉलर आहेत ते तपासून पाहिलं. ते अकरा हजार दोनशे एकवीस अमेरिकन डॉलर होते.
बगदादमध्ये दर गुरुवारी नवीन आठवडा सुरू होत असे. तेव्हा येणार्‍या गुरुवारी त्यानं व त्याच्या गरोदर बायकोनं इरबिलची बस पकडली. उपनगरातल्या त्याच्या आलिशान घरासमोर त्यानं त्याची आलिशान गाडी उभी करून ठेवली. अगदी दिसेल अशी व काहीही सामान बरोबर न घेता फक्त दोघांचे पासपोर्ट, जवळचे डॉलर व इराकी दिनार घेतले. सीमारेषेच्या जास्तीत जास्त जवळ पोचण्याचा त्याचा प्रयत्न होता.
त्या बसमध्ये त्यांना बघणारं कुणीच असायची शक्यता नव्हती. एकदाचे इरबिलला पोचल्यावर त्यांनी जवळचे डॉलर वापरून खुलेमानिया इथं जाण्यासाठी टॅक्सी केली. शहरापासून दूर फक्त एका हॉटेलात रात्र काढली. पडदेरहित खिडक्यांमधून सूर्य उगवायची वाट बघत त्यांनी टक्क उघड्या डोळ्यांनी रात्र काढली.
उंचावरच्या कुदीर्र्स्तानमध्ये दुसर्‍या दिवशी सकाळी ते बसनं निघाले व तिथून पुढे दुपारी झाखोला पोचले.

यापुढचा प्रवास अत्यंत मंदगतीचा होता. खेचरांच्या पाठीवर बसून डोंगराळ भागातून डॉलर मोजून त्यांनी प्रवास केला. त्या खेचराच्या मालकानं इराकी दिनार घेण्यास नकार दिला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी तुर्कस्तानमधल्या एका खेडेगावात पोचण्यासाठी त्यांना पायी चालावं लागलं. त्या दिवशी रात्री ते किरमिजी रेंजला पोचले आणि तिथल्या स्थानिक स्टेशनवर अजून एक रात्र झोपेविना काढली.
आणि मग एकदाचे ते तुर्कस्तानच्या राजधानीकडे त्यांना घेऊन जाणार्‍या, दूरवरचा टप्पा असणार्‍या गाडीत बसले व थकून झोपी गेले. निर्वासित म्हणून सकाळी त्या प्रदेशात दाखल झाले. तिथं हमीदनं पहिल्यांदा काय केलं असेल तर दहा हजार आठशे डॉलर बँकेत भरले. नंतर अमेरिकन वकिलातीत मोठ्या खुबीनं त्यांचे पासपोर्ट दाखवून राजकीय आश्रयाची मागणी केली. त्याच्या वडिलांनी त्याला एकदा सांगितलं होतं की, इराकमधल्या नुकत्याच डच्चू दिलेल्या वरिष्ठ मंत्र्यांना अमेरिका नेहमीच आश्रय देते.
अमेरिकन वकिलातीनं हमीद व त्याच्या बायकोसाठी एका पहिल्या दर्जाच्या हॉटेलची सोय केली आणि ताबडतोब वॉशिंग्टनमध्ये या दोघांबद्दल कळवलं. त्यांनी हमीदला लवकरच परत भेटण्याचं वचन दिलं, पण त्याला किती वेळ लागेल ते मात्र सांगितलं नाही. त्याचे वडील गालिचे विकत. त्या दक्षिणेकडच्या गालिचा बाजाराला भेटी देण्यासाठी त्यांनी वेळेचा सदुपयोग केला.

तिथल्या गालिचा दलालांनी एक नेक मनुष्य, खूप कॉफी पिणारा व भाव करायला आवडणारा अशी हमीदच्या वडिलांची ओळख सांगितली. राजकारणात शिरलेल्या त्यांच्या मुलाबद्दल ते नेहमी बोलत असत असंही त्यांना आठवलं. एकदा अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर त्याचा काय करायचा विचार आहे हे हमीदच्या तोंडून ऐकल्यावर त्यांनी हमीदशी ओळख करून घेण्यात विशेष रुची दाखवली.
झेबारींना आठवड्याच्या आत व्हिसा मिळाला आणि सरकारी खर्चानं त्यांना वॉशिंग्टनला नेण्यात आलं. त्यात तेवीस टर्किश गालिच्यांचा जादा खर्च धरलेला होता.
आयए (सेंट्रल इंटेलिजेंट एजन्सी) कडून पाच दिवस कसून चौकशी करण्यात आली. हमीदनं उपयुक्त माहिती दिली व मदत करून सलोखा प्रस्थापित केला त्याबद्दल त्याचे आभार मानण्यात आले. नंतर अमेरिकेत त्याला मुक्त आयुष्य जगायची परवानगी देण्यात आली. तो, त्याची गरोदर बायको व तेवीस गालिचे न्यूयॉर्ककडे जाणार्‍या एका गाडीत बसले.
मॅनहॅटनच्या पूर्वेस खालच्या बाजूस योग्य दुकान शोधायला हमीदला सहा आठवडे लागले. तो दुकानदार त्याचे गालिचे विकायला तयार झाला. एकदा त्यांनी पाच वर्षांच्या करारपत्रावर सह्या केल्यावर शिरीननं दरवाजावर त्यांची नवीन अमेरिकन नावं रंगवायला सुरवात केली.
पहिले तीन महिने हमीदचा एकही गालिचा विकला गेला नाही. त्यांच्याजवळची पुंजी संपत आली, पण पहिल्या वर्षभरात तेवीसपैकी सोळा गालिच्यांची विक्री झाली आणि लवकरच इस्तंबूलहून नवीन माल आणावा लागेल; हे त्याच्या लक्षात आलं.

चार वर्षांनंतर झेबारींनी पश्‍चिम बाजूला मोठ्या जागेत दुकान असलेल्या ठिकाणी प्रस्थान ठेवलं. ‘ही नुसती सुरवात आहे’ असं हमीद बायकोला सांगत राहिला. अमेरिकेत काहीही करणं शक्य आहे. आता तो खराखुरा अमेरिकन नागरिक आणि फक्त त्याच्याकडे त्याची परिस्थिती दाखवणारा निळा पासपोर्ट होता म्हणून केवळ नव्हे, तर सद्दाम हुसेनची राजवट असेपर्यंत तो त्याच्या मायदेशी कधीच परत जाणार नव्हता याची त्यानं मनाशी खूणगाठ बांधली होती. त्याचं घर व मालमत्ता इराकी राज्यानं कधीच ताब्यात घेतली होती व त्याच्या अनुपस्थितीत त्याच्यावर फाशीच्या शिक्षेचं फर्मान लागू केलं होतं. पुन्हा आपण बगदादचं तोंड बघू की नाही याबद्दल त्याला संशय होता.

लंडनच्या थांब्यानंतर विमान इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर त्याच्या नेहमीच्या वेळेच्या आधीच काही मिनिटं उतरलं. हमीदनं त्याच्या नेहमीच्या लहानशा हॉटेल रूमचं आरक्षण केलं व दोन आठवडे त्याचा वेळ जास्तीत जास्त चांगल्या रीतीनं कसा घालवावा याचं नियोजन करू लागला. त्याला तुर्कस्तानच्या राजधानीतल्या मोठ्या उलाढालीत तो येऊन पडल्याचा आनंद झाला.
त्याला एकतीस दलालांना भेटायचं होतं. कारण या वेळेस निदान साठ गालिचे न्यूयॉर्कला घेऊन जायचा त्याचा बेत होता. म्हणजे चौदा दिवस दाट टर्किश कॉफी प्यावी लागणार, खूप घासाघीस करावी लागणार हे ठरलेलंच होतं. दलाल सुरवातीला हमीद द्यायला तयार असलेल्या किमतीच्या तिप्पट किंमत सांगणार हेदेखील त्यानं गृहीतच धरलेलं होतं. पण यातून काही सुटका नव्हती. हमीदच्या वडिलांप्रमाणे तो यातून नकळत आनंद मिळवत होता.
एकवीस हजार डॉलरपेक्षा थोड्या जास्त किमतीत त्यानं पंधरवड्याच्या शेवटी सत्तावन्न गालिच्यांची खरेदी केली. न्यूयॉर्कमधल्या ग्राहकांना आवडतील अशाच प्रकारचे गालिचे त्यानं काळजीपूर्वक निवडले होते. आणि या वेळेस त्याला त्याचे शंभर हजार अमेरिकन डॉलर नक्की मिळतील याची खात्री वाटत होती. ही इतकी यशस्वी फेरी ठरली होती की, हमीदला असं वाटू लागलं होतं की, न्यूयॉर्कसाठी परतीची महागड्या विमानाची तिकिटं काढावीत. तसं पाहिलं तर प्रत्येक वेळेस महागडी तिकिटं टाळून त्यानं त्रेसष्ट डॉलर वाचवले होतेच!

विमानानं आकाशात झेप घेण्यापूर्वीच तो शिरीन व मुलांना भेटण्याची वाट बघू लागला होता. अमेरिकन हवाई सुंदरीच्या मृदू भाषणानं व मधुर हास्यानं त्याला घरीच पोचल्यासारखं वाटत होतं. जेवण झाल्यावर त्यानं सिनेमा बघायचं टाळलं व काही काळात अमेरिकेत तो काय हासील करू शकेल याची स्वप्नं बघत झोप काढली. कदाचित त्याचा मुलगा राजकारणात शिरेल. 2025 मध्ये इराकी अध्यक्षासाठी अमेरिका तयार असेल का? या विचारानं त्याला हसू आलं व तो गाढ झोपेच्या अधीन झाला.
‘‘सभ्य स्त्री पुरुषहो, तुमच्या विमानाचा कॅप्टन बोलतो आहे. तुम्ही बघत असलेल्या सिनेमाच्या मध्ये अडथळा आणल्याबद्दल किंवा झोपलेल्यांना जागं केल्याबद्दल माफ करा, पण आपल्या इंजिनमध्ये थोडी समस्या उद्भवली आहे. लोकहो, यात विशेष काळजी करण्यासारखं काही नाही. उड्डाण अधिकारी कंपनी असं सांगत आहे की, पुढील प्रवास करण्यापूर्वी सगळ्यात जवळ असलेल्या विमानतळावर विमान उतरवून समस्या निराकरण केलं जावं. यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागू नये व त्यानंतर आपण ठरल्याप्रमाणे आपला पुढचा प्रवास सुरू करू. आपण आपला वेळ जास्तीत जास्त प्रयत्नानं भरून काढू.’’ असा धीरगंभीर आवाज सर्व उतारूंना आला.

हमीद एकदम टक्क जागा झाला.
‘हा पूर्वनियोजित थांबा नसल्यानं काही झालं तरी विमान सोडून कुणाला जाता येणार नाही. तरीही तुम्ही आता बगदादमध्ये उतरला आहात हे तुम्ही तुमच्या घरी कळवू शकता.’ कॅप्टननं असं म्हणून सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
हमीदचं शरीर एकदम बधिर होऊन गेलं. विमानातली सेविका ताबडतोब त्याच्याकडे धावली.
‘‘सर, तुम्ही ठीक आहात ना?’’ तिनं विचारलं.
त्यानं डोकं वर उचलून तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘मला ताबडतोब कॅप्टनला भेटायचं आहे. अगदी लगेच.’’
तिनं झटपट त्याला खुर्चीतून बाहेर काढून गोल जिन्यावरून पहिल्या वर्गातून उड्डाणाच्या डेकवर नेलं.
कॉकपिटच्या दारावर टकटक करून तिनं ते दार उघडलं व म्हटलं, ‘‘कॅप्टन, एका उतारूला तुमच्याशी तातडीनं बोलायचं आहे.’’
‘‘त्याला आत आणा.’’ तो धीरगंभीर स्वर आला. वेड्यासारख्या थरथरणार्‍या हमीदकडे वळून कॅप्टन म्हणाला, ‘‘सर, मी तुम्हाला काय मदत करू शकतो?’’
त्यानं सुरुवात केली, ‘‘मी हमीद झेबारी. अमेरिकन नागरिक आहे. जर आपण बगदादमध्ये उतरलो तर मला पकडून, छळ करून फाशी देतील. मी राजकीय निर्वासित आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की, ते मला मारून टाकायला मागे-पुढे बघणार नाहीत.’’ चाचरत चाचरत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
एका दृष्टिक्षेपात कॅप्टनला समजून चुकलं की, तो अतिशयोक्ती करत नसून सर्व खरं बोलत आहे.
त्याच्या सहकारी पायलटला तो म्हणाला, ‘‘जिम, तू विमानाचा ताबा घे. तोपर्यंत मी मिस्टर झेबारींबरोबर बोलतो. आपल्याला खाली उतरायला ‘सर्व ठाकठीक’चा इशारा मिळाला की मला सांग.’’

कॅप्टननं त्याच्याभोवती आवळलेला पट्टा सोडवला व हमीदला घेऊन प्रथम वर्गातल्या एका निवांत कोपर्‍यात गेला व म्हणाला, ‘‘आता मला सावकाशीनं सर्व सांगा.’’
अगदी थोडक्यात हमीदनं असं स्पष्ट केलं की, त्याला बगदाद कसं सोडावं लागलं व तो अमेरिकेत कसा राहायला आला. जेव्हा तो त्याच्या कथनाच्या शेवटाकडे आला, तेव्हा कॅप्टननं मान हलवली व तो हसला. ‘‘घाबरायचं काही कारण नाही. कोणीच विमान सोडून जाणार नाही. पासपोर्टही तपासले जाणार नाहीत. इंजिन दुरुस्त झालं की लगेच आपण प्रस्थान ठेवणार. तुम्ही इथे प्रथम वर्गातच का बसत नाही. म्हणजे तुम्हाला वाटल्यास लगेच माझ्याशी बोलता येईल.’’
सहाय्यक पायलटबरोबर बोलण्यासाठी कॅप्टन निघून गेला. हमीदला वाटलं, आपल्याला काय मोठं होणार आहे आणि तरीही परत एकदा त्याचं शरीर कापू लागलं.
‘‘मी परत कॅप्टनच बोलतो आहे. पुढील माहिती तुम्हाला सांगतो. आपल्याला बगदाद विमानतळानं हिरवं निशाण दाखवल्यामुळे वीस मिनिटांत आपण तिथं उतरत आहोत. रनवेच्या पार टोकाला इंजिनीअर मंडळी थांबलेली असतील. त्यांनी इंजिन दुरुस्त केल्यावर लगेच आपण निघू.’’

जमावानं एक सुस्कारा टाकला. हमीदनं खुर्चीचा हात घट्ट पकडून ठेवला आणि त्यानं काही जेवण घेतलं नसतं तर बरं झालं असतं असा विचार त्याच्या मनात आला. पुढची वीस मिनिटं तो थरथरत राहिला आणि विमानाची चाकं त्याच्या मातृभूमीला लागताच तो जवळजवळ चक्कर येऊन कोसळलाच.
त्याच्या माहितीच्या धावपट्टीवरून विमान चालताना त्यानं खिडकीतून पाहिलं. शस्त्रसज्ज सैनिक विमानाच्या दारापासून विमानतळावर जायच्या रस्त्यावर उभे होते.
पुढील पंधरा मिनिटं फक्त इंजिनीअर मंडळींना घेऊन जाणार्‍या विमानतळावरच्या वाहनाचा आवाज येत होता. दोन इंजिनीअर्स त्यांची हत्यारं घेऊन एका यारीत चढून, उंच जाऊन विमानाच्या दुरुस्त करायच्या भागाशी पोचल्याचं व त्यांनी स्क्रू काढून एका इंजिनाचा बाहेरचा भाग सुटा केल्याचं हमीद बघत होता. चाळीस मिनिटांनी त्यांनी स्क्रू परत जागच्या जागी बसवले. ते परत जमिनीवर उतरले.

हमीदला पूर्णपणे नाही, तरी बरंचसं सुटका झाल्यासारखं वाटलं. त्यानं कमरेभोवती पट्टा आवळला. त्याच्या हृदयाचे ठोके मिनिटाला 180 पासून मिनिटाला 110 पर्यंत खाली आले. विमान उडून मार्गाला लागल्याशिवाय ते पूर्वपदावर येणार नाहीत हे त्याला माहिती होतं. पुढची काही मिनिटं काहीच घडलं नाही आणि हमीद पुन्हा अस्वस्थ झाला. नंतर चेहर्‍यावर भयानक भाव असलेल्या कॅप्टनला कॉकपीटचं दार उघडून त्याच्या दिशेनं येताना त्यानं पाहिलं.
कॅप्टन कुजबुजत्या स्वरात म्हणाला, ‘‘तुम्ही आमच्याबरोबर उड्डाणाच्या डेकवर आल्यास बरं होईल.’’ हमीदनं पट्टा सोडवला व तो कसाबसा उभा राहिला. धडपडत तो कॅप्टनच्या पाठोपाठ कॉकपीटमध्ये गेला. त्याचे पाय जड झाले होते. त्याच्यामागे दार बंद झालं.
कॅप्टननं सावकाश एकेक शब्द उच्चारला. ‘‘इंजिनीअर मंडळींना समस्या सोडवता आली नाही. मुख्य इंजिनीअरला यायला तासभर लागेल तोपर्यंत सगळ्यांनी खाली उतरून तात्पुरती बसण्याची सोय केलेल्या ठिकाणी जावं अशी आज्ञा आम्हाला देण्यात आलेली आहे.’’ असं कॅप्टननं सांगताच, हमीद अचानक बोलून गेला. ‘‘यापेक्षा विमान अपघातात मी मेलो असतो तरी चाललं असतं.’’

‘‘मिस्टर झेबारी, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या समस्येवर आम्ही विचार केला आहे. आम्ही तुम्हाला आमच्याकडे एक जादा गणवेश आहे तो देतो. त्यामुळे तुम्हाला सतत आमच्याबरोबर राहता येईल व आमच्या ताफ्यासाठी असलेल्या सर्व सुखसोयी तुम्हाला मिळू शकतील. कोणी तुमचा पासपोर्टही बघायला मागणार नाही.’’
हमीद घाबरट स्वरात म्हणाला, ‘‘पण जर कुणी मला ओळखलं तर…’’
‘‘एकदा का तुम्ही तुमच्या मिशा उडवल्या व उड्डाण ऑफिसरचा गणवेष घातलात, गडद रंगाचा चष्मा घातलात व टोकेरी टोपी घातलीत, की तुमची आईसुद्धा तुम्हाला ओळखणार नाही.’’
मोठा अभिमान असलेल्या मिशा हमीदनं उडवल्या. त्याचा वरचा ओठ व्हॅनिला आईस्क्रीमच्या फुगीर भागासारखा दिसू लागला. उड्डाण विभागातल्या एका महिलेनं तिचं सौंदर्य प्रसाधन वापरून तो भाग इतर चेहर्‍यासारखा दिसणारा केला. मग हमीदनं साहाय्यक पायलटचा गणवेष अंगावर चढवला व बाथरूमच्या आरशात बघितलं. खरंच आपल्याला कोणी ओळखणार नाही याची त्याला खात्री पटली.
सुरक्षा रक्षकानं त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पांढर्‍या भिंतीच्या हॉलमध्ये ते खुर्चीवर स्थानापन्न झाले. सद्दाम हुसनचं गणवेष घातलेलं व हातात रायफल घेतलेलं मोठं चित्र हॉलची शोभा वाढवत होतं. हमीदला त्याच्या ‘जवळचा व चांगला मित्र’ म्हणवणार्‍या चित्रातल्या व्यक्तीकडे बघवेना.
इतर विमानातल्या लहान-मोठ्या पदाधिकार्‍यांचा ताफादेखील तिथं होता. हमीदला त्या कोणाबरोबरही बोलायची भीती वाटत होती. वरिष्ठ उड्डाण अधिकारी महिलेनं त्याला सांगायचा प्रयत्न केला, ‘‘ते सर्वजण फ्रेंच आहेत. मी रात्रीच्या फ्रेंच भाषेच्या क्लासमध्ये शिकलेलं काही उपयोगी पडतं आहे का ते बघू.’’ तिनं फ्रेंच कॅप्टनच्या शेजारच्या जागेत घेऊन त्याला काही जुजबी प्रश्‍न विचारायला सुरवात केली.

See Also

‘ते दिल्लीहून सिंगापूरला चालले आहेत,’ असं फ्रेंच कॅप्टन त्या महिलेला सांगत होता. हमीदनं सद् अल तक्रीतीला (एकेकाळी सद्दाम हुसेनचा व्यक्तिगत रक्षक असलेल्या) हॉलमध्ये येताना पाहिलं. त्याच्या खांद्यावरच्या सन्मान दर्शवणार्‍या पट्ट्यांवरून तो विमानतळाचा सुरक्षा अधिकारी वाटत होता.
त्यानं हमीदकडे बघू नये म्हणून हमीद प्रार्थना करत होता. अलतक्रीती फ्रेंच व अमेरिकन गटाकडे बघत हॉलमधून सावकाश चालला होता. त्यांच्या काळे मोजे घातलेल्या पायांवर त्याची नजर स्थिरावत होती.
कॅप्टननं हमीदजवळ जाऊन त्याला एक चिमटा काढला. ‘‘इकडे लक्ष द्या. तुम्हाला हे ऐकायला बहुधा आवडेल की, मुख्य इंजिनीअर विमान इंजिनाची दुरुस्ती करण्यासाठी यायला निघालेला आहे. तेव्हा आता फार वेळ लागणार नाही.’’
हमीदनं एअर फ्रान्सच्या विमानापलीकडून एक गाडी येऊन थांबल्याचं पाहिलं. यारीत एक निळा पोशाख घातलेला, बहुधा मुख्य इंजिनीअर बसलेला होता.
जवळून बघावं म्हणून हमीद उठून उभा राहिला आणि तेवढ्यात साद अल तक्रीती हॉलमध्ये आला. तो अचानक थांबला व दोघांनी एकमेकांकडे बघितलं. (हमीद झटकन कॅप्टनच्या जवळ जाऊन उभा राहायच्या आत) ‘आत शिरू नये’ अशी पाटी असलेल्या खोलीत अल तक्रीती नाहीसा झाला.
हमीद म्हणाला, ‘‘बहुतेक त्यानं मला टिपलं.’’ त्याच्या चेहर्‍याची रंगरंगोटी उडू लागली.
कॅप्टन मुख्य उड्डाण ऑफिसरच्या जवळ सरकला व तिचं फ्रेंच कॅप्टनबरोबर चाललेलं संभाषण थांबवलं. तिनं तिच्या बॉसचं म्हणणं ऐकून घेतलं व फ्रेंच कॅप्टनला एक मोठा अवघड प्रश्‍न विचारला.

सद अल तक्रीती त्याच्या ऑफिसमधून बाहेर आला. अमेरिकन कॅप्टनकडे ताडताड चालत येऊ लागला.
हमीदकडे न बघता अल तक्रीती गुरगुरला, ‘‘कॅप्टन, तुमची सर्व माहिती उघड करा. तुमच्या ताफ्यात किती माणसं आहेत व त्यांचे पासपोर्ट.’’
‘‘माझ्या सहकारी पायलटकडे सर्व पासपोर्ट आहेत. तो तुम्हाला ते देईल असं मी बघतो.’’
अल तक्रीती म्हणाला, ‘‘आभारी आहे. ते माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आणून दिलेत की मला प्रत्येक पासपोर्ट तपासायचा आहे. मध्यंतरीच्या काळात तुमच्या ताफ्याला इथंच थांबायला सांगा. कुठल्याही परिस्थितीत माझ्या परवानगीशिवाय त्यांना ही इमारत सोडता येणार नाही.’’
कॅप्टन उठून कॉकपीटकडे गेला व त्यानं पासपोर्ट मागितले. नंतर त्यानं अशी एक आज्ञा केली की, सर्वजण त्याच्याकडे आश्‍चर्यचकित होऊन पाहू लागले. कॅप्टननं सर्व पासपोर्ट सुरक्षा ऑफिसमध्ये नेले तेव्हाच फ्रेंच ताफ्यातल्या लोकांना त्यांच्या विमानाकडे नेण्यासाठी बस येऊन थांबली.
सद-अल तक्रातीनं चौदा पासपोर्ट त्याच्यासमोरच्या टेबलावर ठेवले. एकेक पासपोर्ट सावकाशीनं तपासण्यात त्याला आनंद मिळत होता. जेव्हा त्याचं ते काम संपलं तेव्हा त्यानं चिडवल्यासारखं हसत कॅप्टनला विचारलं, ‘‘मला वाटतं, गणवेष घातलेले पंधराजण मी तुमच्या ताफ्यात बघितलं.’’
कॅप्टन उत्तरला, ‘‘नाही नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आम्ही चौदाजणच आहोत.’’
‘‘मग मला अजून खोलात जाऊन तपासणी केली पाहिजे. नाही का कॅप्टन? कृपया हे पासपोर्ट ज्याचे त्याला परत द्या. जर कोणी पासपोर्टशिवाय असेल तर ते मला कळून येईल.’’

‘‘पण हे जागतिक पातळीवर देशादेशासंबंधी जे कायदे आहेत, त्याविरुद्ध आहे. आम्ही इथे तात्पुरते, विमानात बिघाड झाला म्हणून उतरलो आहोत. ‘युनायटेड नेशन्स’च्या कायद्याचं कलम 238 आम्हाला लागू होते. आम्ही कायदेशीरपणे तुमच्या देशात नाही, हे तुम्हाला माहिती आहे.’’ कॅप्टन म्हणाला.
‘‘हे बघा कॅप्टन, इराकमध्ये आम्ही युनायटेड नेशन्सचे कायदे पाळत नाही. तुम्ही सुचवल्याप्रमाणे आमच्या दृष्टीनं तुम्ही देशात नाही हे कबूल आहे.’’
कॅप्टनला कळून चुकलं की, अजून थापा मारणं हे वेळ फुकट दवडण्यासारखंच आहे. त्यानं पासपोर्ट गोळा केले. जितके सावकाशीनं हे करता येईल तेवढं केलं व अल तक्रातीला हॉलमध्ये येऊ दिलं. त्याच्या ताफ्यातले सर्वजण इकडेतिकडे विखुरले होते ते अचानक त्याच्या जागेवर उभे राहिले व दिशा बदलून जोरजोरानं आपापसांत बोलत चालू लागले.

अल तक्रीती ओरडला, ‘‘त्यांना खाली बसायला सांगा.’’
कॅप्टननं ऐकू न आल्याचं दर्शवत विचारलं, ‘‘काय म्हणालात?’’
अल तक्रीती परत ओरडला, ‘‘त्यांना खाली बसायला सांगा.’’
कॅप्टननं मोठ्या कष्टानं आज्ञा दिली व काही क्षणात सर्वजण खाली बसले. पण अजूनही त्यांचं जोरजोरात बोलणं चालूच होतं.
‘‘त्यांना गप्प बसायला सांगा.’’
कॅप्टननं हॉलभर फिरून एकेकाला शांत राहण्याची विनंती केली.
अल तक्रीतीची नजर हॉलमधल्या सर्वांवरून फिरत होती, तर कॅप्टन बाहेर फ्रेंच विमान रनवेवरून धावायला सुरवात करत होेते, त्याकडे बघत होता.
अल तक्रीतीनं ताफ्यातल्या लोकांची संख्या मोजायला सुरवात केली व ती चौदाच असल्याचं पाहून तो चरफडला. त्यानं हॉलभर फिरून परत एकदा मोजदाद करायला सुरवात केली.
सर्वांना त्यांचे पासपोर्ट देत कॅप्टन बोलला, ‘‘सर्व चौदाजण हजर आहेत.’’
‘‘तुमच्यापुढे बसलेला मनुष्य कुठे आहे?’’ कॅप्टनला बोटांनी ढोसत अल तक्रीतीनं कडक शब्दांत सांगितलं.
‘‘आमच्या ताफ्यातला वरिष्ठ ऑफिसर म्हणता आहात का?’’
‘‘नाही. अरबासारखा दिसणारा.’’
कॅप्टननं खात्रीनं सांगितलं. ‘‘माझ्या ताफ्यात कुणी अरब नाही.’’
अल तक्रीती ताडताड चालत (वरिष्ठ उड्डाण ऑफिसरबरोबर) म्हणाला, ‘‘तो तुमच्यापुढे बसला होता. त्याच्या वरच्या ओठावर काहीतरी प्रसाधनं लावलेली होती व तो पळायला सुरवात करत होता.’’
‘‘फ्रेंच विमानाचा कॅप्टन माझ्यापुढे बसलेला होता.’’ वरिष्ठ उड्डाण अधिकारी म्हणाली. लगेच तिची चूक तिच्या लक्षात आली.

साद अल तक्रीतीनं वळून बाहेर पाहिलं. एअर फ्रान्सचं विमान रनवेच्या शेवटाला पोचलं होतं व उड्डाणाच्या तयारीत होतं. त्यानं हातातलं फोनचं बटण जोरात दाबलं. त्याच वेळेस ‘एअर फ्रान्स’च्या विमानाचं इंजिन चालू झालं. (त्यानं त्याच्या देशी भाषेत खेकसून आज्ञा केल्या.) अल तक्रीती काय आज्ञा देत होता, ते कळण्यासाठी कॅप्टनला अरेबिक भाषा अवगत असण्याची गरज नव्हती.
आता अमेरिकन ताफा फ्रेंच विमानाकडे हळूहळू पुढे हलत रोखून बघू लागला, तर अल तक्रीतीचा आवाज शब्दागणिक चढत गेला.
‘एअर फ्रान्स’चे 747 नंबरच्या उड्डाणाचं विमान हळूहळू उडायच्या तयारीत असताना साद अल तक्रीती जोरानं शिव्याशाप देत इमारतीबाहेर धावला व त्याच्यासाठी थांबलेल्या एका जीपमध्ये उडी मारून बसला. त्यानं ‘एअर फ्रान्स’च्या विमानाकडे बोट दाखवून ड्रायव्हरला त्याचा पाठलाग करायची आज्ञा दिली. उभ्या केलेल्या विमानांमधून रस्ता काढत जीप सुसाट निघाली. विमानाच्या जवळ आली तेव्हा तिचा वेग तासाला नव्वद मैल असावा. पुढचे शंभर यार्ड ती ‘एअर फ्रान्स’च्या विमानाशी समांतर धावत होती. अल तक्रीती पुढच्या सीटवरील खिडकीला चिकटून त्या विमानाच्या कॉकपीटच्या दिशेनं हात हलवत होता.
फ्रेंच पायलटनं त्याला ओळखलं व एक उडता सलाम केला. जसं विमान आकाशात उडालं तसं अमेरिकन ताफ्यानं आनंदानं चित्कार केला.
अमेरिकन कॅप्टन हसला व त्याच्या वरिष्ठ उड्डाण अधिकारी महिलेकडे वळून म्हणाला, ‘‘हे फ्रेंच लोक एक जास्तीचा उतारू मिळावा म्हणून कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात, हेच यातून सिद्ध झालं आहे.’’

हमीद झेबारी दिल्लीला सहा तासांनी उतरला व लगेच बायकोला फोन करून काय काय झालं ते सांगितलं. दुसर्‍या दिवशी सकाळी तो न्यूयॉर्कला जाणार्‍या विमानातल्या पहिल्या वर्गात बसला. जेव्हा न्यूयॉर्क विमानतळावरून बाहेर पडून स्वतःच्या बायकोच्या मोटारीजवळ गेला, तेव्हा तिनं बाहेर उडी मारून त्याच्या गळ्यात हात टाकले.
नदीमनं काच खाली केली व म्हणाला, ‘‘पपा, तुम्ही मला चुकीचं सांगितलंत. पंधरवडा तर पंधरा दिवसांचा निघाला.’’ हमीदनं त्याच्या मुलाकडे बघून हास्य केलं. त्याची मुलगी मे मात्र मोटार एकदम थांबली म्हणून नव्हे, तर आपल्या आईनं एका मिशी नसलेल्या परक्या माणसाला मिठी मारताना बघून रडू लागली.

(मूळ इंग्रजी लोकप्रिय कथेचा अनुवाद)
 – अनुवादः वृषाली जोशी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.