Now Reading
गुजराती खाद्यसंस्कृती

गुजराती खाद्यसंस्कृती

Menaka Prakashan

गुजरातचं नाव घेताच सगळ्यात आधी आठवते, ते खाद्यपदार्थामधलं वैविध्य. अतिशय सौम्य आणि सात्त्विक आहार ही गुजरातच्या चविष्ट खाद्यसंस्कृतीची वैशिष्ठ्यं सांगता येतील. इथं साजूक तुपाचा सढळ हातानं वापर बघायला मिळतो. खाकरा, ढोकळा, मुठिया, मेथी थेपला हे गुजराती पदार्थ जगभरात अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. याशिवाय इतर पदार्थांनी गुजराती खाद्यसंस्कृती समृद्ध केली आहे, अशाच पदार्थांविषयी आणि गुजराती खाद्यसंस्कृतीच्या वैशिष्ठ्यांविषयी विस्तारानं…

गुजरात हे नाव पडलं ते तिथं सातव्या-आठव्या शतकात राज्य करणार्‍या गुर्जर राजांच्या नावावरून. त्याआधी तिथं प्राचीन सिंधू संस्कृती नांदत होती. या संस्कृतीच्या खुणा राजस्थानप्रमाणे इथंही सापडतात. एवढंच काय, पण महाभारतातल्या श्रीकृष्णाची द्वारका याच भागात आहे.
गुजरातला एक हजार सहाशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर पांढरं वाळवंट या नावानं ओळखलं जाणारं कच्छचं रणही इथंच आहे. १९६० पर्यंत महाराष्ट्र-गुजरात-मुंबई असा मुंबई प्रांत होता. पण नंतर गुजरात स्वतंत्र झाला. गांधीनगर ही गुजरातची राजधानी असून अहमदाबाद हे कापड उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे आणि सुरत तर ऐतिहासिक काळापासून श्रीमंत शहर गणलं जातं. आजही सुरत डायमंड सिटी म्हणून ओळखली जाते.
व्यापार-उदीम हा गुजराती लोकांचा स्थायिभावच म्हटला पाहिजे. उद्योग व्यवसायातलं अंगभूत कौशल्य गुजराती माणसात आहे हे निर्विवादपणे मान्य झालेलं सत्य आहे. जगातल्या बहुतेक देशात व्यापार-उद्योगासाठी गेलेल्या गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे.

भारताला ललामभूत ठरलेल्या अनेक व्यक्तींना जन्म देण्याचं भाग्य गुजरातला लाभलं. भारताचे पितामह दादाभाई नवरोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचा पोलादी पुरुष गणले जाणारे वल्लभभाई पटेल, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची जन्मभूमी गुजरातच आहे. भारतात अंतराळ संशोधनाची सुरवात करणारे विक्रम साराभाई, भाभा अणुशक्ती केंद्राचे जनक होमी भाभा, भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा आणि भारतातलं सर्वांत धनिक समजलं जाणारं अंबानी कुटुंब मूळचं गुजरातमधलंच होतं. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातचा कायापालट घडवला, शासकीय कार्यालयाची घडी उत्तमरीत्या बसवली आणि त्याचा योग्य तो परिणाम गुजरातच्या सर्वांगीण प्रगतीवर झाला. पंतप्रधान या नात्यानं आजही त्यांचं कर्तृत्व जगाला मान्य झालेलं आहे.

आज गुजरात हे सर्वांत सुरक्षित राज्य गणलं जातं. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांचा लक्ष्मी विलास पॅलेस, गीर नॅशनल पार्क, कच्छच्या रणाला भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. ज्या मंदिराचा विध्वंस परकीयांकडून सतरा वेळा करण्यात आला ते सोमनाथ मंदिर तितक्याच वेळा दिमाखात उभं केलं गेलं आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पर्यटक त्याचं दर्शन घेतात. आज जगातला सर्वांत उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा वल्लभभाई पटेलांचा पुतळा तर भारताची शान आहे.

गुजराती खाद्यसंस्कृती देखील समृद्ध गणली जाते. काही भागात तिखटाचं प्रमाण जास्त असलं तरी सर्वसाधारण गुजराती जेवण सौम्य चवीचं आणि गोडसर असतं. विविध प्रकारच्या चटण्या-लोणची हे आणखी एक वैशिष्ट्य. फरसाणाचे भरपूर प्रकार आणि गोड पदार्थांची रेलचेल असते. जैनधर्माचा प्रभाव असल्यामुळे इथले बहुसंख्य लोक शाकाहारी आहेत. त्यामुळे तिथं अनेक प्रकारच्या भाज्या, कडधान्यं यांचा वापर अधिक केला जातो. भाज्यांमध्ये बटाटा भरपूर वापरला जातो. मसाल्यांमध्ये धने-जिरे, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर यांचाच वापर अधिक होतो. तेल-तुपाच्या बाबतीत मात्र हात सैल सोडलेला असतो. शिवाय ताक-दही मात्र हवंच. कट्टर जैन लोक अन्नात लसूण, कांदा, बटाटा आणि कंदमुळं यांचासुद्धा समावेश निषिद्ध समजतात. तरीही त्यांचं जेवण चविष्ट असतं.

गुजराती ढोकळा, खांडवी (सुरळीच्या वड्या), उंधियू, मेथी ठेपला, मुठिया, हांडवो, खिचडी, बाजरा नु रोटलो असे अनेकविध गुजराती पदार्थ आज देशोदेशी पोचलेले आहेत. अनेक वाट्यांनी भरलेली गुजराती थाळी प्रसिद्ध आहे. गोड पदार्थांत दुधाच्या अनेक पदार्थांसोबत कन्सार, मगज, घुगरा, अडादिया पाक हे त्यांचे खास पदार्थ.
गुजराती जेवण महाराष्ट्रीय शाकाहारी माणसाला खूपच जवळचं वाटतं. ढोकळा, मुठिया, मेथी ठेपला, छुंदा, फरसाण या पदार्थांना मराठी लोकांनी कधीच आपलंसं केलेलं आहे. अशा या समृद्ध प्रदेशात शाकाहारी माणसाला अनेक वैविध्यपूर्ण पदार्थांची चव चाखायला मिळते.

अथाणु मसाला (लोणच्याचा मसाला)
साहित्य : पाच टे. स्पून मेथी दाणे, एक कप काश्मिरी मिरच्यांचं लाल तिखट, दोन टे. स्पून काळी मिरी, एक कप मोहरी, दोन टे. स्पून हिंग, पाऊण कप मीठ, दोन टे. स्पून हळद, एक कप तिळाचं किंवा मोहरीचं तेल, पाव कप बडिशेप (आवडत असल्यास)
कृती : तेल कडकडीत तापवून गार करावं. मोहरी, मेथीदाणे, बडिशेप आणि काळी मिरी यांची भरड पावडर करावी. सगळं एकत्र करून त्यात तेल मिसळावं. कैरीच्या सालासकट मोठ्या फोडी करून त्यात हा मसाला मिसळावा. साधारणपणे एक कप कैरीच्या फोडींसाठी एक टे. स्पून मसाला वापरावा. मसाला मिसळल्यावर त्यात एक टे. स्पून तेल कडकडीत करून गार झाल्यावर घालावं.
गुंडा नु अथाणु (भोकराचं लोणचं)
साहित्य : अर्धा किलो भोकरं, पाव किलो कैरी, पाव किलो अचार मसाला
कृती : पहिल्यांदा भोकरं धुवून कुकरमध्ये दहा मिनिटं वाफवून घ्यावी. नंतर भोकरांच्या बिया काढाव्या, कैर्‍यांची सालं काढून किसाव्या. कीस हातानं पिळून घ्यावा. कैरीचा कीस आणि अचार मसाला एकत्र करून भोकरांमध्ये भरावा. सर्व भोकरं बरणीत ठेवावी. दोन कप तेल गरम करून गार झाल्यावर बरणीत ओतावं.

छुंदा
साहित्य : पाच कप कैरीचा जाडसर कीस, चार कप साखर, दोन टी स्पून मीठ, एक टी स्पून भाजलेल्या जिर्‍याची भरड पावडर, एक टी स्पून लाल तिखट
कृती: सर्व जिन्नस एकत्र करून मिश्रण एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात ठेवावं. पातेल्याला पातळ फडकं बांधून सात दिवस उन्हात ठेवावं. कीस थोडासा कोरडा झाला की छुंदा बरणीत भरून ठेवावा.

मेथी-पापड शाक
साहित्य : एक कप मेथीची पानं, दोन कप उडदाच्या पापडाचे तुकडे, एक टी स्पून धने-जिरे पूड, एक टी स्पून लाल तिखट, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, मोहरी-हिंग-हळद, चवीपुरतं मीठ
कृती : तेलाची फोडणी करून त्यात मेथीची पानं चिरून घालावी, मेथी परतून शिजल्यावर त्यात दोन कप पाणी, मीठ, तिखट, धने-जिरे पूड घालून उकळावं. उकळत्या पाण्यात पापडाचे तुकडे घालून ते शिजले की गॅस बंद करावा. मेथीच्या पानांऐवजी पाव कप मेथी दाणे भिजत घालून त्यांना मोड आणून ते वापरावे. पापडाऐवजी जाडी शेव घालावी.

परवल बटेटानु शाक
साहित्य : अर्धा किलो परवलं, दोन कप बटाट्याचे काप, एक टे. स्पून आलं-हिरव्या मिरच्यांची पेस्ट, अर्धा टी स्पून लाल तिखट, दोन टी स्पून धने-जिरे पावडर, अर्धा टी स्पून साखर, दोन टी स्पून लिंबाचा रस, दोन टी स्पून किसलेलं खोबरं, मूठभर चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी चार टे. स्पून तेल, एक टी स्पून जिरं, पाव टी स्पून हिंग, अर्धा टी स्पून हळद, चवीपुरतं मीठ
कृती : परवलं धुवून त्यांचे उभे काप करावे. आतल्या बिया नको असतील तर टाकून द्याव्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरं घालावं. ते तडतडलं की हिंग आणि हळद घालावी. आलं-मिरची घालावी. परतून चिरलेली परवलं आणि बटाटे घालावे. मीठ, धने-जिरे पावडर आणि तिखट घालून, ढवळून झाकण ठेवावं आणि बारीक गॅस वर अधूनमधून ढवळत भाजी शिजू द्यावी. शेवटी साखर, लिंबाचा रस, खोबरं आणि कोथिंबीर घालावी.

गुजराती उंधियू
साहित्य :
मुठियासाठी : एक कप बेसन, दीड कप मेथीची चिरलेली पानं, अर्धा टी स्पून लाल तिखट, पाव टी स्पून हळद, अर्धा टी स्पून ओवा, एक टे. स्पून दही, एक टी स्पून साखर, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल.
भाजीसाठी : पाच-सहा लहान वांगी, पाच-सहा लहान बटाटे, दीड कप दोरे काढलेली पापडी, अर्धा कप तुरीचे दाणे, अर्धा कप वालपापडीचे दाणे, एका कच्च्या केळ्याचे तुकडे, अर्धा कप रताळ्याचे मोठे तुकडे, पाव किलो कंद
एक कप ओलं खोबरं, एक टे. स्पून भाजलेल्या तिळाचं कूट, दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर, सात-आठ लसूण पाकळ्या, एक टे. स्पून आल्याचे तुकडे, तीन-चार हिरव्या मिरच्या, एक टे. स्पून जिरं, एक टी स्पून साखर, दोन टी स्पून लिंबाचा रस, एक टे. स्पून धने पावडर, अर्धा टी स्पून गरम मसाला, एक टी स्पून लाल तिखट, पाव कप चिरलेली लसणीची पात, फोडणीसाठी अर्धा कप तेल, मोहरी-हिंग-हळद, अर्धा टी स्पून बडिशेप, चवीपुरतं मीठ
कृती : मुठियासाठी असलेले सर्व जिन्नस एकत्र करावे, लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवावं आणि त्याचे गोळे करून तळून घ्यावे. ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या, जिरं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. त्यात, चवीपुरतं मीठ, तिळाचं कूट, धने पावडर, गरम मसाला, लिंबाचा रस, साखर आणि तिखट घालून कालवावं. वांगी, बटाटे, कच्च्या केळ्याचे तुकडे आणि रताळ्याचे तुकडे यांना चिरा पाडून त्यात लागेल तसा मसाला भरावा. कंद सोलून त्याचेही चौकोनी तुकडे करावे. मोठ्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी-हिंग-हळदीची फोडणी करावी. फोडणीत बडिशेप घालावी. नंतर त्यात तुरीचे-पापडीचे दाणे, पापडी घालून, परतून त्यावर उरलेला मसाला घालावा, त्यावर भरलेल्या भाज्या आणि कंद घालावा. पाण्याचं झाकण ठेवून भाज्या शिजत आल्या की अर्धा कप गरम पाणी घालून ढवळावं, त्यावर मेथीचे मुठिये घालावे आणि झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. शेवटी लसणीची पात आणि कोथिंबीर मिसळावी.

गुजराती कढी
साहित्य : एक कप दही, दोन टे. स्पून बेसन, अर्धा टी स्पून आल्याची पेस्ट, दोन टी स्पून साखर, दोन कप पाणी, एक टे. स्पून तूप, अर्धा टी स्पून मोहरी, अर्धा टी स्पून जिरं, पाव टी स्पून हिंग, अर्धा टी स्पून मेथी दाणे, दोन-तीन लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, एक सुकी लाल मिरची, दोन हिरव्या मिरच्या, दहा-बारा कढीलिंबाची पानं, चवीपुरतं मीठ, दोन टे. स्पून चिरलेली कोथिंबीर
कृती : दह्यात पाणी घालून घुसळावं. त्यात आल्याची पेस्ट, बेसन, मीठ आणि साखर मिसळावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरं घालावं. ते तडतडलं की हिंग आणि हळद घालावी. लवंगा, दालचिनी, मेथी आणि लाल मिरची घालून परतावं, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालाव्या. दह्याचं मिश्रण त्यात ओतावं आणि कढी सतत ढवळत रहावी. पीठ शिजून कढी घट्ट झाली की गॅस बंद करावा.

डाळ ढोकळी
साहित्य : दीड कप तूर डाळ, दोन टे. स्पून चिंचेचा कोळ, एक टे. स्पून गूळ, एक टी स्पून धने-जिरे पावडर, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, मोहरी-हिंग-हळद, दोन दालचिनीच्या काड्या, दोन-तीन लवंगा, सात-आठ कढीपत्त्याची पानं, एक टे. स्पून आलं-मिरची पेस्ट, दोन लाल सुक्या मिरच्या, दोन टे. स्पून ओलं खोबरं आणि मूठभर चिरलेली कोथिंबीर
दोन टे. स्पून तूप, एक कप गव्हाची कणीक, अर्धा कप बेसन, एक टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून ओवा, अर्धा टी स्पून कसुरी मेथी, एक टे. स्पून तेल, चवीपुरतं मीठ
कृती : तूर डाळ धुवून त्यात चिमूटभर हिंग, हळद आणि दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यावी. कणीक, बेसन, ओवा, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ, तिखट, हळद, एक टे. स्पून तेल आणि पाणी घालून पीठ भिजवावं. शिजलेली डाळ घोटून त्यात तीन कप पाणी, आलं मिरची पेस्ट, चिंच, गूळ, धने-जिरे पावडर, तिखट आणि मीठ घालून उकळत ठेवावं. भिजवलेल्या कणकीच्या पोळ्या लाटून त्याचे चौकोनी शंकरपाळे कापून ते उकळत्या डाळीत सोडावे, गॅस बारीक करून उकळत ठेवावं. दोन टे. स्पून तेल आणि एक टे. स्पून तूप एकत्र करून गरम करावं, त्यात मोहरी, दालचिनी, लवंगा घालाव्या. मोहरी तडतडली की हिंग घालावा, हळद घालावी. कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून ही फोडणी उकळत्या डाळीत ओतावी. शंकरपाळे शिजून वर आले की गॅस बंद करावा. खोबरं, कोथिंबीर आणि तूप घालावं.

गुजराती खांडवी (सुरळीच्या वड्या)
साहित्य : एक कप बारीक बेसन, एक कप ताक, दीड कप पाणी, एक टे. स्पून आलं-मिरची पेस्ट, चवीपुरतं मीठ, एक कप ओलं खोबरं, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, मोहरी-हिंग-हळद, एक टे. स्पून तीळ, दहा-बारा कढीपत्त्याची पानं
कृती : बेसनात ताक आणि अर्धा कप पाणी, मीठ, चिमूटभर हळद, हिंग आणि आलं-मिरची पेस्ट मिसळून गुळगुळीत पीठ तयार करावं. उरलेलं पाणी उकळत ठेवावं. उकळत्या पाण्यात बेसनाचं मिश्रण घालून ढवळत राहावं. पीठ चांगलं शिजलं की मोठ्या जाड प्लॅस्टिकच्या कागदावर उलथन्यानं भराभर पातळ पसरावं. खोबरं-कोथिंबीर एकत्र करून त्यावर पसरावी. आणि साधारण दोन इंच रुंदीच्या पट्ट्या कापून गुंडाळ्या कराव्या. तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता आणि तीळ परतावे आणि ही फोडणी गुंडाळ्यांवर घालावी.

गुजराती खिंचू
गुजराती खिंचू म्हणजे तांदळाची उकड
साहित्य : अर्धा कप तांदळाचं पीठ, दीड कप पाणी, एक टी स्पून आलं-मिरची पेस्ट, पाव टी स्पून पापडखार, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, अर्धा टी स्पून मोहरी, अर्धा टी स्पून जिरे, पाव टी स्पून लाल तिखट
कृती : एका पातेल्यात पाणी घालून गॅसवर ठेवावं. ते उकळलं की त्यात मीठ, आलं-मिरची पेस्ट, पापडखार आणि कोथिंबीर घालावी. तांदळाचं पीठ घालत ढवळत रहावं. गुठळ्या होऊ देऊ नये. नंतर झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ द्यावी. एका लहान कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की हिंग आणि हळद घालावी, आलं-मिरची पेस्ट आणि लाल तिखट घालून गॅस बंद करावा. शिजलेल्या उकडीवर ही फोडणी घालावी.

हांडवो
साहित्य : एक कप तांदूळ, अर्धा कप चणा डाळ, पाव कप तूर डाळ, पाव कप उडीद डाळ, अर्धा कप दही, एक कप दुधीचा कीस, पाव कप गाजराचा कीस, पाव कप चिरलेली कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक टी स्पून आल्याचा कीस, अर्धा टी स्पून लाल तिखट, एक टी स्पून साखर, पाव टी स्पून हळद, एक टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट, चवीपुरतं मीठ, तीन टे. स्पून तेल, अर्धा टी स्पून जिरे, एक टे. स्पून तीळ, मोहरी-हिंग-हळद, दहा-बारा कढीपत्त्याची पानं, चवीपुरतं मीठ
कृती : तांदूळ आणि तिन्ही डाळी तीन-चार तास पाण्यात भिजत घालाव्या आणि नंतर दही घालून वाटून घ्याव्या, त्यात दुधी आणि गाजराचा कीस, थोडी कोथिंबीर, मिरच्या, आलं, हळद, साखर, तिखट, एक टे. स्पून तेल आणि चवीपुरतं मीठ घालून कालवावं. पीठ इडलीच्या पिठाइतपत सैल असावं. उरलेल्या तेलाची मोहरी-हिंग-हळदीची फोडणी करून त्यात जिरं, तीळ, कढीपत्ता घालावा. एका बेकिंग पॅनमध्ये दोन टी स्पून फोडणी पसरावी. तयार पिठात इनो घालून फेसावं आणि हे पीठ त्यात ओतावं, त्यावर उरलेली फोडणी घालावी. हांडवो १८० सें.वर तापलेल्या ओव्हनमध्ये अर्धा तास भाजावा.

लिलवा कचोरी
साहित्य : दीड कप मैदा, चार टे. स्पून तेल, चवीपुरतं मीठ, एक कप ताजे तुरीचे दाणे, अर्धा कप कच्च्या बटाट्याचा कीस, दोन टी स्पून आलं-हिरव्या मिरच्या पेस्ट, एक टे. स्पून लिंबाचा रस, दोन टी स्पून साखर, एक टे. स्पून धने-जिरे पावडर, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर, पाव टी स्पून लवंग पावडर, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, मोहरी-जिरे-हिंग-हळद, अर्धा कप ओलं खोबरं, तळण्यासाठी तेल
कृती : मैदा, मीठ आणि तेल एकत्र करावं. त्यात पाणी घालून पीठ बोटानं भिजवावं, जास्त मळू नये. पीठ फार सैल किंवा फार घट्ट असू नये. तुरीचे दाणे मिक्सरमध्ये अर्धवट बारीक करून घ्यावे. तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरं घालावं, ते तडतडलं की हिंग आणि हळद घालावी. किसलेला बटाटा घालावा. बटाटा परतून तुरीचे दाणे घालावे आणि झाकण ठेवावं. बटाटा आणि तुरीचे दाणे शिजले की त्यात आलं, मिरची, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करावा. नंतर त्यात खोबरं, कोथिंबीर, लिंबाचा रस, धने जिरे पावडर, दालचिनी आणि लवंग पावडर मिसळावी. भिजवलेल्या पिठाचे लहान-लहान गोळे करावे. प्रत्येक गोळ्याची पारी लाटून त्यावर सारण ठेवून कडा बंद कराव्या. कडांची टोकं वर जुळवावी किंवा दाबून चपटा आकार द्यावा.
या कचोर्‍या गरम तेलात खमंग तळाव्या.

खट्टा ढोकळा
साहित्य: एक कप तांदूळ, पाव कप उडीद डाळ, अर्धा कप आंबट दही, एक हिरवी मिरची बारीक चिरून, एक टी स्पून आल्याचा कीस, चवीपुरतं मीठ, एक टी स्पून तेल, अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर, अर्धा टी स्पून लाल तिखट, एक टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, मोहरी, हिंग-हळद , एक टी स्पून तीळ
कृती : तांदूळ आणि उडीद डाळ तीन-चार तास भिजवून वाटावी. वाटताना त्यात दही, आलं आणि मिरची घालावी. नंतर मीठ मिसळावं. पीठ झाकून सात-आठ तास फुगू द्यावं. नंतर तेल आणि इनो फ्रूट सॉल्ट घालून पीठ फेसावं. थाळीमध्ये अर्ध्या इंचाचा थर ओतावा आणि इडलीप्रमाणे सात-आठ मिनिटं वाफवून घ्यावं. नंतर त्यावर काळी मिरी पावडर आणि तिखट भुरभुरावं. तेलाची फोडणी करून त्यात तीळ घालावे आणि ही फोडणी ढोकळ्यावर ओतावी.

See Also

मकई का कुर्मा
साहित्य : दीड कप मक्याचा कणसाचा कीस, अर्धा कप दूध, दोन टी स्पून लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी दोन टे. स्पून तेल, मोहरी-हिंग-हळद, अर्धा टी स्पून जिरे, दोन हिरव्या मिरच्या, सात-आठ कढीपत्त्याची पानं, एक टे. स्पून चिरलेली कोथिंबीर
कृती : तेलाची फोडणी करून त्यात जिरे, मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घालावा. मक्याचा कीस, मीठ, दूध घालून ढवळून झाकण ठेवावं आणि एक वाफ द्यावी. कीस शिजला की लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी.

सुखडी
साहित्य : एक कप गव्हाचं जाडसर पीठ, अर्धा कप तूप, अर्धा कप गूळ, अर्धा टी स्पून वेलची पावडर
कृती : कढईत तूप घालावं. ते वितळलं की पीठ घालून लालसर रंग येईपर्यंत भाजावं. गॅस बंद करून त्यात बारीक केलेला गूळ घालावा, वेलची पावडर घालावी. गूळ वितळला की तूप लावलेल्या थाळीत मिश्रण ओतून थापावं. गार झाल्यावर वड्या पाडाव्या. या वड्यांना महाराष्ट्रात गूळ-पापडी म्हणतात. फरक एवढाच की त्यात तूप कमी घालतात.

कन्सार
साहित्य : एक कप गव्हाचं पीठ, पाऊण कप गुळाची पावडर, अर्धा कप तूप, अडीच कप पाणी, अर्धा टी स्पून वेलची पावडर, एक टे. स्पून बदामाचे काप
कृती : दोन टे. स्पून तूप वितळवून ते हातानं गव्हाच्या पिठात मिसळावं. पाणी उकळत ठेवून त्यात गूळ घालावा. गूळ विरघळला की त्यात थोडं थोडं पीठ घालत ढवळत राहावं, गुठळ्या होऊ देऊ नये. पीठ शिजत आलं की उरलेलं तूप घालावं, वेलची पावडर आणि बदामाचे काप घालावे.

मोहनथाळ
साहित्य : दोन कप बेसन, सव्वा कप तूप, पाव कप दूध, सव्वा कप साखर, अर्धा कप पाणी, अर्धा टी स्पून वेलची पावडर, चिमूटभर केशर, सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप
कृती : बेसन, दूध आणि पाव कप तूप एकत्र करून कुस्करावं आणि दाबून झाकण ठेवून अर्धा तास ठेवावं. नंतर मोकळं करून जाड चाळणीनं मिश्रण चाळून घ्यावं. उरलेलं तूप गरम करून त्यात हे पीठ लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावं. साखरेत पाणी घालून दोन तारी पाक करावा. पाकात हे मिश्रण घालून घोटावं. घट्ट झालं की तूप लावलेल्या थाळीत पसरून वर बदाम-पिस्त्याचे काप लावावे आणि गार झाल्यावर वड्या कापाव्या.

अडादिया पाक
साहित्य : दोन कप उडदाच्या डाळीचं जाडसर पीठ, दोन कप तूप, अर्धा कप दूध, अर्धा कप डिंक, दोन कप साखर / गूळ, दोन टी स्पून वेलची पावडर, अर्धा टी स्पून जायफळ पावडर, अर्धा कप सुक्या खोबर्‍याचा कीस, पाव कप सुंठ पावडर, एक टे. स्पून पिंपळीमूळ पावडर, अर्धा कप बदामाचे काप
कृती : उडदाचं पीठ, पाव कप तूप आणि दूध एकत्र करून ठेवावं. अर्ध्या तासानं ते चाळून घ्यावं. उरलेलं तूप गरम करून त्यात डिंक तळून घ्यावा. उरलेल्या तुपात पीठ घालून खमंग भाजावं. त्यात तळलेला डिंक चुरडून घालावा. खोबरं भाजून चुरडून घालावं. गूळ बारीक करून घालावा. सर्व मसाले आणि बदामाचे काप मिसळून मिश्रण थाळीत थापावं. तीन-चार तासांनी वड्या कापाव्या किंवा मिश्रणाचे लाडू वळावे.

सुरती घारी
साहित्य : एक कप मैदा, दोन टे. स्पून वितळलेलं तूप, पाव कप दूध, चिमूटभर मीठ, दीड कप बदाम किंवा पिस्त्याचा चुरा, दोन कप मावा, एक टे. स्पून बारीक रवा, दोन टे. स्पून बेसन, एक टी स्पून वेलची पावडर, चिमूटभर केशर, पाऊण कप साखर, तूप किंवा तेल, सजावटीसाठी अर्धा कप तूप आणि पाऊण कप पिठीसाखर
कृती : मैदा, मीठ आणि दोन टे. स्पून तूप एकत्र करावं. त्यात दूध घालून सैलसर पीठ भिजवावं आणि झाकून ठेवावं. बेसन आणि रवा दोन टे. स्पून तुपात भाजून घ्यावा, त्यात मावा मिसळावा, एक-दोन मिनिटं शिजवावं आणि गार करायला ताटात ओतून ठेवावं. त्यात बदामाचा चुरा, वेलची, साखर मिसळावी. बदामाचा चुरा आणि केशर मिसळावं. या मिश्रणाचे गोळे करावे. भिजवलेल्या पिठाच्याही तेवढ्याच गोळ्या कराव्या. प्रत्येक गोळ्याची पारी लाटून त्यावर बदामाचा गोळा ठेवून पारीच्या कडा दुमडून बंद कराव्या. सर्व घार्‍या तयार झाल्यावर तापलेल्या तुपात तळून घ्याव्या. तूप वितळवावं, त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत फेटावं. गार झालेली घारी तुपात बुडवून ताटात ठेवावी. दहा-बारा तासांनी तूप थिजेल.

दूधपाक
साहित्य : दोन लिटर होल दूध, दोन टे. स्पून बासमती तांदूळ, एक कप साखर, एक टे. स्पून तूप, चिमूटभर जायफळ पावडर, अर्धा टी स्पून वेलची पावडर, सात-आठ बदाम
कृती : तांदूळ धुवून एक तास भिजत घालावे. दूध उकळत ठेवावं आणि ढवळत राहावं. दूध थोडंसं आटलं की त्यात धुतलेले तांदूळ घालावे, तांदूळ शिजले की साखर, वेलची, जायफळ घालावं. बदाम अर्धा तास भिजवून, सोलून काप करावे आणि दुधात घालावे. हा दूधपाक पुर्‍यांबरोबर खावा.

– वसुंधरा पर्वते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.