Now Reading
गुजगोष्टी मायलेकींच्या

गुजगोष्टी मायलेकींच्या

Menaka Prakashan

मैत्रिणींनो, जागतिक महिला दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करूही… पण एक माणूस म्हणून, आपण प्रत्येक दिवशी उन्नत होतोय का, हा प्रश्‍न या दिवशी स्वतःला नक्की विचारा. स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा, आत्मदीप प्रज्ज्वलित करा आणि स्वतःचा शोध घ्या, स्वतःच्या आनंदासाठी जगा, म्हणजे नक्की काय करायचं, असाच प्रश्‍न तुम्हाला पडलाय का? तर बयो, तुझ्याशी या लेखाच्या माध्यमातून संवाद साधतेय, बघ, विचार करून पटतंय का?

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना केवळ त्यांच्या जन्मापासून नव्हे, तर त्यांचा जन्म होण्याआधीपासून कायम दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ आणि ‘मुलगी म्हणजे धनाची पेटी’ असे कुविचार या पुरुषप्रधान संस्कृतीत रुजलेले व फोफावलेले आहेत. विविध शास्त्रीय शोधांमुळे वैद्यकीयसह सर्वच क्षेत्रांतलं ज्ञान-तंत्रज्ञान अद्ययावत झालं. समाजाची झपाट्यानं प्रगती होत आहे असं चित्र ढळढळीतपणे रंगवलं जातं आहे. मात्र समाजाची पुरुषप्रधान संस्कृतीची चौकट तशीच कायम राहिलेली असल्यामुळं स्त्रीला देवी मानून पूजा करणार्‍या आपल्या देशात स्त्री भ्रूणहत्येसारख्या निंदनीय गोष्टी राजरोसपणे होतात आणि मुलीचं लग्न म्हणजे एकदाचे तिचे हात पिवळे केले की आपली जबाबदारी संपली ही मानसिकताही तशीच व तितकीच घट्ट रुजलेली दिसून येते. खरं तर आई-मुलीचं नातं हे जिवाभावाचं नातं. हे नातं म्हणजे बहुतांशी वेळा माय-लेकी दोघींसाठीही बळ मिळवण्याचं व विसावा घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणून तर लेकीला माहेर मिळावं यासाठी धीरानं सासरी नांदणारी ‘माय’ बहिणाबाईंना सहज भेटली. पारंपरिक ओव्यांमधून तर अशा कित्येक माय-लेकी भेटतात. आईसाठी मुलीचं अस्तित्व हा जिवाचा आधार असतो.

‘जन्मा आली लेक, बाप म्हणतो ‘कचरा’
माय म्हणते, र्‍हाऊ द्या, माझ्या जिवाला ‘आसरा’

या खूणगाठीनं आई मुलीमध्ये दिलासा शोधते आणि मुलीच्या बापाचा अनुभव वडिलांनी नाकारला तरी आई समजुतीनं पदरात बांधून घेेते. शतकानुशतकं याच अनुभवापोटी आपल्या सुखदुःखांनी लेकीची ओटी भरून कित्येक आया मुक्यानं वावरल्या आहेत. काहींनी स्त्रीधन म्हणून आपली स्वप्नं लेकीकडे सोपवली आहेत, तर कित्येकींनी बाई म्हणून जगण्याचा भोगवटा लेकीच्या वाट्याला येऊ नये म्हणून स्वतःला खर्ची घातलं आहे.
जगण्यातलं शहाणपण, क्षमा करण्याची वृत्ती, समजून घेण्याचं व्रत हा तर जवळजवळ सगळ्या अनुभवी बायकांनी आपल्या मुलींना दिलेला वारसा आहे. कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्ष; कधी बोलून, तर कधी न बोलता. सामाजिक परिस्थितीमध्ये सातत्यानं व नेहमीच अर्थपूर्ण बोलण्याचा जिव्हाळा माय-लेकींमध्ये रुजतोच असं नाही, कधी परिस्थिती बोलू देत नाही, तर कधी सामाजिक संकेत! कधी स्वभाव, तर कधी व्यक्तिगत धारणा! कितीतरी गोष्टींची दडपणं, अडसर आणि बंधनं पण हा माय-लेकीतला जिव्हाळा कधी आटल्याचं दिसत नाही. जिव्हाळ्याचा संवाद माय-लेकींना अजून चांगल्या रीतीनं साधता येऊ लागला तो अलीकडे. विसावं शतक संपता संपता एका बाजूनं बाई म्हणून जगण्याचं भान आलं आणि दुसर्‍या बाजूनं तिला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं. मानसशास्त्रानं तिला पालक म्हणून जागं केलं आणि स्त्रीवादानं माणूस म्हणून डोळसपणाची दृष्टी दिली.

स्त्रीचं स्त्रीत्व अगदी आदिम आहे आणि अभिमान स्वाभिमान ही धगधगीत. अशी स्त्री एकेकाळी जगाच्या पाठीवर होती आणि आजही आहे. पुरुष केवळ वंशसातत्य राखण्यासाठी निमित्तमात्र. संसार चालवणारी, मुलांना वाढवणारी, सगळी संकटं झेलणारी, खंबीरपणे घरादाराची मेढ बनून राहणारी स्त्री. जन्म देणारी आणि वाढवणारी स्त्री. स्त्रियांमध्ये एक चिवटपणा असतो आणि न मालवणारी एक आत्मशक्तीही असते. स्त्रीच्या याच रूपाला भिऊन आक्रमक पुरुषानं कदाचित संस्कृतीच्या रूढी-परंपरेच्या जोखडात तिला बद्ध करून ठेवलेलं असावं. त्यामुळं आयुष्यातलं बरं-वाईट सोसताना आणि मनात झळकत असलेल्या स्वप्नांचे वेढून राहिलेले खुणावते कांचन कळस या दोन्ही गोष्टींसाठी माय-लेकींनी एकमेकींना वेढून घेतलं तर जीवन जगण्यातलं सुंदर मनस्वी आधार होणारं नातं रुजतं, फुलतं आणि आनंद देतं.

बेजबाबदार विधानं, कृती व अशोभनीय वर्तन या संदर्भातल्या घटना रोज वाचायला, पाहायला मिळत आहेत. कुंपणानं शेत खाल्ल्याची हळहळ रोजच व्यक्त करावी लागत आहे. माणूस म्हणून रुजण्याअगोदरच आपण कणाकणानं मरतो आहोत आणि सहिष्णुता लोप पावते आहे हे जाणूनही हतबलतेशिवाय हाती काहीच उरत नसताना माय-लेकीच्या नात्याची घट्ट वीण जगायला बळ देणारी, निर्भय बनायला आधाराचा टेकू देणारी ठरते. अशा वेळी सावित्रीच्या लेकींना शिक्षणानं आलेला शहाणपणा अन् भारतीय संविधानानं दिलेल्या निर्णय स्वातंत्र्याचा योग्य वापर करून घेण्याचा आत्मविश्‍वास टिकवून ठेवायला हवा. सावित्रीमायचं हे आपल्या आधुनिक शिकलेल्या लेकींना मैत्रिणींच्या नात्यानं दिलेला समतोल मोकळा, मैत्रीचा कानमंत्र-
‘‘बयो, आता तू शिकून शहाणी, कर्तीसवरती, नोकरी करणारी, पदे भूषविणारी आहेस. मात्र वेगवेगळ्या जाती, राजकीय विचारधारा आणि पितृसत्ताक विशेषाधिकार असलेल्या या समाजात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरणं, इथं पाय रोवणं तितकंसं सोपं नाही. या समाजात पाळले जाणारे बहुसंख्य नियम हे पुरुषांनी स्त्रियांना दुय्यमत्व देऊन त्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी, स्वतःच्या सोयीनुसार आखलेले आहेत. बयो, तुला ठाऊक असलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ आणि संवेदना या पुरुषप्रधान व्यवस्थेसाठी त्रासदायक आहेत त्यामुळे तुला तुझं मानसिक बळ खच्ची करणार्‍या पुरुषी प्रतिक्रियांचा वारंवार सामना करावा लागेल. तू घेत असलेल्या आवडीच्या शिक्षणाचा, स्वीकारलेल्या नोकरीचा, नोकरीतल्या पदोन्नतीचा, स्वतःच्या सर्वांगीण विकासाबरोबर समाजाचंही आपण काही देणं लागतो यातून स्वीकार करून वाग. तुझ्या आवडत्या कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा, त्यानुसार जगण्याचा तुला अधिकार आहे. या समाजात जगत असताना हे अधिकार आणि हक्क तुला मिळवण्यासाठी काही वेळा लढा द्यावा लागेल तेव्हा हिंमत हरू नकोस. सध्याच्या सामाजिक नियमांनुसार जोडीदार निवडताना दडपणांना बळी न पडता योग्य निर्णय घेण्याची समज वाढव. नात्याच्या किंवा सहजीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तुला वाटलं तर तू निवडलेल्या आणि राहत असलेल्या जोडीदारासोबत पुढे न राहण्याचा निर्णय घेण्याचा हक्क आहे. या हक्काबरोबर निर्णयाची जबाबदारीही तुझी राहील याचाही डोळसपणे स्वीकार कर. स्वतःच्या स्त्रीत्वाचा फायदा घेऊन गैरमार्गानं कोणतंही काम करू नकोस. मात्र पुरुषी वागण्याचा मनावर झालेला आघात झेलण्याची व त्यावर मात करण्याची लवचिकता व ताकद मिळवण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहा. स्त्रीवर मालकी हक्क सांगण्याच्या पुरुषांच्या प्रवृत्तीमधून पातिव्रत्याच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या समाजात निकोप लैंगिकता रुजलेली नाही. साहजिकच विवाहबाह्य संबंध, समागम स्वातंत्र्य, गर्भपात असे विषय कुचाकळ्या, हेटाळणीचे असून त्याची योग्य चर्चा करण्यास आजसुद्धा पूर्णपणे नाकारणारा समाजच अस्तित्वात आहे हे नेहमी लक्षात ठेवून स्वीकार कर आणि ताठ मानेनं वागणं ठेव. नको ते राजकारण, धर्म, वंश, लिंग, जात, भाषा या मुद्द्यांचा आधार घेऊन दुसर्‍यांविषयी द्वेष करायला शिकवणार्‍या कोणत्याही विचारधारेचा कधीच स्वीकार करू नकोस.

बयो, शिक्षणानं आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. आपण स्वतःच्या व इतरांच्या स्वातंत्र्यासाठी नेहमी झगडा द्यायला हवा. आपला संघर्ष हा कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही, तर तो चुकीच्या व्यवस्था व अनिष्ट रूढी-परंपरांच्या विरोधात आहे. आपण या जगामध्ये फार थोड्या काळासाठीचे रहिवासी आहोत त्यामुळे सर्वप्रथम आधी स्वतःला स्वीकार, स्वतःवर प्रेम कर. तुझ्यामध्ये स्वतःकडे असलेला प्रेमाचा प्रकाश कायम ठेवून आयुष्याचा आनंदीपणानं स्वीकार कर.

बयो, आपल्याला आपणच आनंदी ठेवायचं असतं हे लक्षातच घेता येत नाही ही गोष्ट पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ नावाची अगदी छोटीशी कादंबरी आहे, त्यात एक गोष्ट आहे. एक म्हातारी, तिची छोटी नात लच्छी आणि मोराची. ती जीर्ण म्हातारी गावाबाहेर दूर जंगलापाशी राहत असते. एकदा म्हातारीच्या झोपडीबाहेर मोर येतो आणि मोराला पाहून आनंदानं तिची छोटी नात लच्छी नाचू लागते. ते पाहून मोरही पिसारा फुलवून नाचू लागतो. लच्छी हट्ट धरते की, मोराला आपल्या अंगणात बांधून ठेवावं पण म्हातार्‍या आज्जीला प्रश्‍न- त्या मोराला दाणा-पाणी कुठून खाऊ घालायचं हा पडतो. त्यावर मोर म्हणतो, ‘मला दाणा-पाणी काहीही नको. सारं जंगलरान तर सभोवतालीच आहे. मात्र लच्छीनं नाचायचं थांबवलं तर मी येणार नाही.’ लच्छी कबूल झाली, पण रोज आनंदानं नाचायचं ही काही साधी गोष्ट नव्हती. पण तेव्हापासून लच्छी सतत आनंदीच राहू लागली. तेव्हा गोष्टीचं तात्पर्य काय, तर मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणच व्हायचं. आपल्या मनातले मोरपिसारे झडून मदत देण्याची जबाबदारी ही फक्त अन् फक्त आपली असते. मग निळं आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश व उमललेली फुलं आणि आपण स्वतः आनंदाचं झाड होऊन जातो. रूढी-परंपरेच्या आरपार झुलणारे, डोलणारे!

– डॉ. सुषमा भोसले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.