Now Reading
गरज संयमशील आचारधर्माची!

गरज संयमशील आचारधर्माची!

Menaka Prakashan

स्त्रियांवर असलेली बंधनं काही प्रमाणात कमी झाली आहेत, हे खरं असलं तरी तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याची मुभा नाही, हे सत्य डोळ्याआड करून चालणार नाही. एक सुंदर समाज घडवण्याची जबाबदारी आजच्या स्त्री-पुरुषांवर आहे, म्हणूनच विज्ञान, शास्त्र, मानसशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय न होता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला तर एक जाती निरपेक्ष, एकसंध आणि सुसंस्कृत समाज निर्माण होईल. त्यासाठी गरज आहे स्त्री आणि पुरुषांनी सजगतेनं पावलं उचलण्याची…

ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडलं, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली. आपल्याप्रतीचा आनंद झालेला असतानाही पतीनं घर सोडल्याची बातमी जेव्हा यशोधरेला समजली, तेव्हा ती मनातून पार उद्ध्वस्त झाली. पण तिनं कुणाकडंही तक्रार केली नाही आणि जग ज्याच्याकडे अभिमानानं पाहील, अशा पद्धतीनं मुलाला वाढवण्याचं ठरवलं आणि पतीशिवायचं एकाकी, भकास आयुष्य तिनं मुलाच्या संगोपनात खर्ची घातलं, आणि कित्येक वर्षांनी एका सुंदर सकाळी …ते (बुद्ध) परत आले आणि तिच्यासमोर उभे राहिले. तिनं शांतपणे त्यांना विचारलं, ‘‘आता तुम्हाला लोक ‘बुद्ध’ म्हणून ओळखतात ना?’’
त्यांनीही तितक्याच शांतपणे उत्तर दिलं, ‘‘होय, मीदेखील तसं ऐकलं आहे.’’

तिनं पुढं विचारलं, ‘‘त्याचा अर्थ काय?’’
‘‘जगण्याचा अर्थ कळला आहे अशी व्यक्ती!’’ ते म्हणाले.
ती किंचितशी हसली. मग शांत बसली. काही वेळानं ती म्हणाली, ‘‘आपण दोघंही काहीतरी नवं शिकलो आहोत असं मला वाटतं. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग समृद्ध होईल. पण मी जे शिकले आहे, ते फारसं जगापुढे येणारच नाही.’’
बुद्धांनी तिला विचारलं, ‘‘तू काय शिकलीस?’’
तिचे डोळे चमकले. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. ‘‘मी धैर्य शिकले! स्त्रीला उभं राहण्यासाठी इतरांची गरज लागत नाही. तिचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व परिपूर्ण असतं आणि ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते.’’ यशोधरा उत्तरली.
खरं पाहता रामायणातल्या लक्ष्मणाची ऊर्मिला आणि गौतम बुद्धांची यशोधरा; यांच्या दुःखाचा पदर सारखाच. स्वतःच्या जगण्यासाठी, अस्तित्वासाठी कधीही पुढं न आलेल्या व नवर्‍याच्या देवत्वाच्या पायाच्या दगड असलेल्या पुरुषप्रधान समाजानं स्त्रीवर लादलेल्या निकृष्ट आयुष्याची प्रातिनिधिक उदाहरणं परंतु त्यांच्या मनःस्थितीचा, भाववृत्तीचा त्यांच्या एकाकी अंधकारमय आयुष्याचा कुठेही ‘ब्र’ काढलेला दिसत नाही. किंबहुना अंधार्‍या घरात उंबर्‍याच्या आतल्या जगात तिनं जगावं हे अध्याहृत सत्य ठसठशीतपणे समोर येतं.

निसर्गतः स्त्री नाजूक, कोमल हृदयी, पुरुष व पुरुष नातेवाइकांवर अवलंबून असते हे समाजात रुजलेलं आहे आणि किंबहुना स्त्रियांच्या मनावर व विचारांवर सतत हे रुजवलं जातं. स्त्री अबला आहे, अक्षम आहे, बाहेरच्या समाजात असुरक्षित आहे. हे वाईट, ते चूक, अमकं धोकादायक, तमकं अयोग्य या विचारांच्या खतांमुळे स्त्री नावाचं रोपटं तशाच पद्धतीनं वाढू लागतं आणि स्त्री स्वतःला अबला, नाजूक समजू लागते. जन्मानंतर आई-वडिलांचं, भावांचं, काका-मामाचं बंधन; सासरी नवरा, सासू, सासरे, दीर यांचं बंधन; उंबर्‍याबाहेर समाजाचं बंधन अशा चहूबाजूंनी पडणार्‍या बंधनांंमुळे स्त्रीची मानसिकता हे सर्व योग्यच आहे आणि हे सर्व असेल तरच माझ्या अस्तित्वाला मोल आहे अशी तयार झालेली आहे. बाईनं कायम दासी म्हणूनच रहावं, सहन करत जगावं, साधा ब्रदेखील काढू नये, न्याय मागू नये, स्वतः तर कधी बदलू नये पण बाह्य जगातल्या बदलांना पाठिंबाही देऊ नये ही मानसिकता समाजात पिढ्यान् पिढ्या चालतच आहे. स्वयंपाक करणं, घर आवरून स्वच्छ ठेवणं, मुलांचं संगोपन करणं, सणवार-उपवास-व्रत-पूजा बाईनं घराच्या रीती-रिवाजाप्रमाणे करावं, एकटीनं बाहेर प्रवास करू नये, प्रसंगी उपाशी मरावं पण एकटीनं हॉलेटमध्ये खायला जाऊ नये… या अपेक्षा पूर्वी होत्या आणि आजही आहेतच. फक्त आनंद एवढाच की, आज जरा या अपेक्षा निवळत चाललेल्या आहेत, पण संपलेल्या नक्कीच नाहीत.

घरातल्या बायकांसाठी कायदे करायचे, पुरुषांसाठी नाही ही मानसिकता बहुसंख्य कुटुंबांत आजही आहे. मुलींनी जास्त शिकू नये, शिक्षण लग्नापुरतं किंवा एखादी गरजेपुरती नोकरी करण्यापुरतं घ्यावं, रात्री अंधार पडायच्या आत घरात यावं, घरकाम, स्वयंपाक यायलाच हवा, सकाळी लवकर उठायची, पूजाअर्चा करायची, उपास करायची सवय हवी. तिला नवर्‍याला खूश ठेवता यायलाच हवं… अशा एक ना अनेक नियमांचं गाठोडं तिच्या पाठी बांधूनच तिला वागायला लावलं जातं. यापैकी एकही नियम कोणत्या तरी पुरुषाला लागू आहे का? किंवा तशी गरज तरी या पुरुषप्रधान संस्कृतीला कधी वाटली का? उलट नवर्‍यानं सोडून दिलं, घटस्फोट दिला तर सर्वस्वी दोष स्त्रीलाच दिला जातो हाही एक उफराटा न्याय!

पण बाईची जात मुळातच चिवट आणि चिकट. अंगात रग असणारी प्रचंड सहनशीलता वारंवार बौद्धिक विचारातून, संस्कृतीतून, शारीरिक वर्तणुकीतून होणारे अन्याय-अपमान तिला दर क्षणाला अधिकच मजबूत बनवत राहिले. विचारात, वागण्यात दणकटी येत राहिली. पूर्वी दाराआडून उंबर्‍याच्या आत, तोंडाला पदर लावून किलकिल्या डोळ्यांनी जग पाहणार्‍या बाईनं उंबरा ओलांडून अंगणात आणि बाहेरच्या रस्त्यावर धाडसानं पाऊल ठेवलं. स्वयंपाकघरातून रस्त्यापर्यंतचा तिचा प्रवास फार परीक्षा पाहणारा, सत्त्व पाहणारा, वेळ लावणारा ठरला. हे एवढं अंतर पार करायला तिच्या अनेक पिढ्यांचं बलिदान दिलं गेलं. अनंत काळापासून बाई या पुरुषप्रधान नियमांच्या चौकटीत असूनही स्वतःला पारंगत करत आली. त्यामुळे गर्भाधान आणि प्रसव ही स्त्री जीवनाची स्वाभाविक अंगं आहेत, ती तिच्या प्रगतीमधील अडसर नाहीत हेही ध्यानात घ्यायला हवं.

औद्योगिक विकास, शहरांची वाढ, मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, सर्वांना सहज उपलब्ध होणारं शिक्षण, स्त्री-पुरुषांना परस्परांविरोधात मिळणारी मोकळीक, स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि संततीप्रतिबंधक साधनांची सहज उपलब्धता या गोष्टी आज सर्वमान्य आहेत. स्त्री-पुरुष समानता अंगीकारली जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत असलं, तरी स्त्रियांना वाढती असुरक्षितता, अनिर्बंध वासनाशक्ती, स्वैर सुखोपभोग घेण्याच्या संस्कृतीत निपजलेली रोगट, खुजी व दुर्बल मनं हे प्रश्‍न वाढताना दिसत आहेत. नव्या बदलत्या जीवनात विकासाच्या विविध संधी मिळत असताना ‘स्त्री’ प्रश्‍न अजून गंभीर होताना दिसत आहेत आणि एकूणच माणसांचा जीवनक्रम अधिकाधिक अनैसर्गिक होत चालला आहे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच समाजातल्या काही व्यवस्था मोडणं अपरिहार्य आहे, पण नवीन यंत्रणा तयार करून जुन्यांच्या जागी त्यांची व्यवस्थित उभारणी करणं समाजाला जमलेलं नाही.

आर्थिक एकक हे कुटुंबाचं जे पूर्वीचं स्वरूप होतं, ते कालौघात संपुष्टात आलं. कुटुंबात मुलांवर होणार्‍या संस्कारांची जबाबदारी उचलण्याचं भान समाजानं दाखवलं नाही आणि त्याचा विचार कुटुंबव्यवस्थेला पर्याय शोधताना केला गेला नाही आणि शिक्षणपद्धती आखतानाही केला गेलेला नाही. त्यामुळे जुने दोष आपल्याला सुधारता आलेले नाहीत, उलट परिवर्तनाच्या ओघात ते तीव्र झालेले आहेत. जन्मानं किंवा जातीनं माणूस श्रेष्ठ होत नाही. स्त्री-पुरुषामध्ये पुरुष श्रेष्ठ नाही ही वस्तुस्थिती दंडसंहितेनं, नव्या शहरवस्तीनं, लहान-मोठ्या यंत्रांनी सामान्य माणसाला सांगितली तरीही जाती नाहीशा झाल्या नाहीत.

स्त्री-पुरुष श्रेष्ठत्व वाद, परिवर्तनाला विरोध; यासारखे प्रश्‍न तसेच आहेत आणि या जुन्या प्रश्‍नांच्या दलदलीत फसलेल्या आपल्याला नवे प्रश्‍न हाताळण्याइतकी उसंत नाही, त्यामुळे परिस्थितीमुळे आजवर झालेले परिवर्तन एकांगी, तुटक तुटक व अपुरे आहे हे ओळखलं पाहिजे. जुन्या मूल्यांचा त्याग करताना नव्या बदलाला, तंत्रज्ञानाला आपलंसं केलं गेलं, पण स्वातंत्र्य व समतेसारखी आवश्यक मूल्यं रुजवण्याचा प्रयत्न अत्यंत क्षीणपणे झाला. त्यामुळे शिक्षणानं नवी विधायक आणि सर्जनशील अशी जीवनदृष्टी निर्माण झालेली नाही. शिक्षणक्रमात विज्ञानाची लोकप्रियता वाढली खरी, पण त्या लोकप्रियतेचं कारण मात्र निसर्गनियमांबद्दलच्या मूलभूत जिज्ञासेपेक्षा पुढच्या तंत्रशिक्षणाची दारं उघडून चटकन श्रीमंत होणारे व्यवसाय मिळवणं हेच आहे. त्यामुळे विज्ञान हे अभ्यासक्रमाचा विषय ठरलं. ती जीवनशैली झाली नाही वा ते जीवनाचं तत्त्वज्ञानही होऊ शकलं नाही. अशा परिस्थितीत स्त्रीभोवतीचं कौटुंबिक सामाजिक दास्याचे पाश सैल करत जाणं सोपी गोष्ट नाही. भारतीय समाजापुरता विचार केला, तर पूर्वीची गृहस्थधर्माची चौकट गृहिणीला उपयुक्त नाही आणि अपत्यधर्माची चौकट नव्या मुलांना उपयोगी नाही. नैतिक मूल्यं जोपासणारा सामान्य माणूस (स्त्री आणि पुरुष) उद्याचे भाग्य ठरवणार आहेत. असा माणूस तयार करण्याची जबाबदारी आजच्या आधुनिक स्त्री-पुरुष दोघांवरही आहे आणि जाती निरपेक्ष एकतेची जाणीव मनात ठेवून समाजानं त्यासाठी सजग पावलं उचलण्याची गरज आहे. निर्भयतेनं जगण्यासाठी नवा संयमशील आचार धर्म तयार व्हायला हवा, ही काळाची गरज आहे.

– डॉ. सुषमा भोसले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.