Now Reading
खरे सगेसोयरे

खरे सगेसोयरे

Menaka Prakashan
View Gallery

नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागली व आम्ही माथेरान सहलीचा घाट घातला. त्या तरुण चमूत मी एकटीच ‘यंग सिनियर सिटिझन’ (६२ वर्षं) होते. तिथं पोचल्यावर ‘वन ट्री पॉईंट’ पहायला निघालो. प्रवास घोड्यावरून करायचा होता. आम्हा पाच जणांचे पाच घोडे व सोबत त्यांचे मालकसुद्धा होते. रपेट चालू झाली. थोडं अंतर कापल्यावर घनदाट जंगल दिसू लागलं. वनस्पतींचा ओला वास मनाला आल्हाद देत होता, तर भोवतीची गर्द व फिक्या हिरव्या रंगाची वनराई डोळ्यांना सुखावत होती. पर्यटकांचा तांडा आगेकूच करताना मनाच्या कॅमेर्‍यावर सृष्टिसौंदर्य टिपत होता. उंचच उंच वृक्ष आमचं जणू सहर्ष स्वागत करत होते. खाली लाल मातीचा रस्ता, सर्वत्र नीरव शांतता अशा जंगलातून आमचा प्रवास सुरू होता. घोड्यांच्या टापांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. रस्ता हळूहळू कठीण होत चालला होता. प्रत्येक घोड्यासोबत त्याचा मालक (घोडेवाला) सुद्धा होता. माझा घोडा संथपणे न चालता आपलं शरीर इकडेतिकडे हलवत चालला होता. त्यामुळे मला धक्के बसत होते. निरीक्षण केल्यावर लक्षात आलं, इतर घोड्यांचीही चाल तशीच आहे.

‘‘घोडेवाले दादा, तुमचा घोडा सरळ का चालत नाही? सारखा वाकडातिकडा होतो. मला हिंदकळल्यासारखं होतंय. पुढं पोचेपर्यंत माझी पाठ आणि कंबर पार खिळखिळी होईल.’’
‘‘माजं नाव इरी हाय. ए सुभान्या (घोड्याचं नाव) बघ आजी काय म्हनून राहिल्या. जरा सिधा चाल बाबा. आजीला तकलिफ नाय झाली पायजेल.’’
मला आश्‍चर्य वाटलं. हे बोलणं सुभान्याला कसं समजणार?
‘‘इरीदादा, पण हे घोडे असे चलबिचल का आहेत?’’
‘‘आजी, त्यानला जंगलातल्या मोठ्या माशा चावतात. त्यानला ‘सोंडे माशा’ म्हनत्यात. त्या माशांला सुईसारखी सोंड असती. ती सोंड त्या घोड्याच्या शरीरात खुपसतात आनि त्यांचं रक्त पितेत. कदी कदी मानसानाबी त्रास देत्यात.’’
‘‘अरे बापरे! भयंकरच आहे हे!’’
‘‘तर वो! माशा चावे घ्याला लागल्यावर घोडे हैराण होत्यात. त्यांना हाकलताना हालतात आन् तुमाला धक्के बसतात जी.’’
‘‘असू दे. असू दे. बिचारी मुकी जनावरं काय करणार?’’
पण त्या मुक्या जनावरानं कमाल केली. त्यानंतर तो घोडा संथपणे चालू लागला. मला धक्के बसेनासे झाले. माशा गायब झाल्या की काय अशी शंका आली.
‘‘इरीदादा, घोडा शांतपणे चालतोय. माशा नाहीशा झाल्या का?’’
‘‘बघतो जी.’’
त्यानं पुढं होऊन घोड्याच्या शरीरावरून हात फिरवला व लालभडक झालेला तळहात माझ्यासमोर धरला. मी चक्रावून गेले.
‘‘इरीदादा, काय आहे हे?’’
‘‘आजी, सुभान्याला माशा चावत होत्या, पन तो न हाकलवता तसाच चालत र्‍हायला तुमाले तरास होईल म्हनून.’’
‘‘म्हणजे तुम्ही बोललात ते कळलं त्याला?’’
‘‘काय की. आजी, माजा सुभान्या लई गुनी हाय. अक्षी माज्या भावावानीच हाय.’’
त्यानं डोळे पुसले. मीसुद्धा कळवळले.
‘‘इरीदादा, मला खाली उतरव. पुढं नाही जायचं. सुभान्याला चावलेल्या माशा माझ्या मनाला डंख करतायत.’’
‘‘आजी, वन टिरी पाईंट थोडा फुडं हाय.’’
‘‘नाही बघायचा मला.’’
मी खाली उतरून सुभान्याला थोपटलं. तेवढ्यात एक डोलीवाला आला. त्याला इरीनं थांबवलं व मला शेवटपर्यंत नेऊन परत आणायला सांगितलं. इरी त्याला पैेसे देऊ लागला.
‘‘इरी थांब, त्याचे पैसे मी देते.’’
‘‘पण दादांनी (माझ्या मुलानं) जाण्यायेण्याचं पैसं दिलं हायती .’’
‘‘ते ठेव सुभान्याच्या खुराकासाठी.’’
माझ्या पायाला हात लावून तो म्हणाला, ‘‘असं पसिंजर आजपावेतो भेटलं नाय जी.’’
‘‘असा मायाळू घोडा आणि घोडेवाले आज प्रथमच भेटले.’’

ही सगळी हालचाल पाहून माझा मुलगा घोड्यावरून उतरून आला. मी त्याला सगळी हकिगत सांगितली.

‘‘आई, योग्यच केलंस तू. म्हणतात ना, ‘माणसा परीस जनावरं बरी.’ जवळच ‘वन ट्री पॉईंट’ होता. संपूर्ण परिसरात विरळ धुकं होतं. धावरी नदीवरचा मोखे धरणाचा विस्तीर्ण जलाशय दिसत होता. समोर एक लहान डोंगर होता. त्यावरच्या लहानशा सपाट जागेवर एकच तिरकं झाड होतं. कुठूनतरी एक माकड आलं व झाडाच्या शेंड्यावर बसून आम्हाला ‘टुक् टुक् माकड’ करून चिडवत होतं. हा निसर्गाचा चमत्कारच होता.

एकाच सहलीत निसर्गाचा अद्भुत आविष्कार, प्राण्यांची अद्वितीय भावनिक जाण व गरीब माणसांतला प्रामाणिकपणा अनुभवला म्हणूनच हा अनुभव विलक्षण…

रेखा नाबर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.