Now Reading
खयालों में… खयालों में…

खयालों में… खयालों में…

Menaka Prakashan

‘‘चला निघू या! बघा निघालोच आपण इथून’’ कमांडरचा आवाज तिथली बर्फासारखी थंडगार शांतता भेदत गेला. कमांडर एकदम कडक युनिफॉर्ममध्ये अगदी तयारीत उभा होता. आपली मोठ्या चुणीची चुन्नटदार टोपी त्यानं अगदी खाली, आपल्या करड्या डोळ्यांपर्यंत ओढून घेतलेली होती.
आपण ती कामगिरी पार पाडूच शकणार नाही सर! या भयंकर समुद्री तुफानात सारे काही फिस्कटून जाईल. माझं मत जर विचारलंत तर..
‘‘मी काही विचारलंय आहे का तुला, लेफ्टनंट बर्ग?’’ कमांडर त्रासिकपणे म्हणाला आणि ओरडला, ‘‘पॉवर लाईट्स ऑन! जहाजाला ८,५६६ फुटांपर्यंत न्या.. लवकर! नक्कीच यातून आपण बाहेर पडू!’’ आणि धडाक्यानं सिलेंडर्सवर वर चढवण्याचा आवाज कानांवर आदळू लागला. तेवढ्यात आवाज आला…. ‘पॉकेटा.. पॉकेटा.. पॉकेटा.. पॉकेटा.. पॉकेटा’

कमांडरने हळूहळू बर्फ जमा होत असलेल्या त्या पायलटच्या खिडकीकडे एक नजर टाकली. तो ताड ताड पावलं टाकत, गुंतागुंतीच्या व क्लिष्ट भासणार्‍या घड्याळ्यांच्या विविध तबकड्यांच्या रांगेकडे गेला. त्याने काही खुंट्या पिरगळल्या आणि ओरडला, ‘‘नंबर आठ.. असिस्टंट नंबर आठ, खिडकी खोला..’’ व काहीच प्रतिसाद मिळत नाही हे पाहून, तो आणखी जोरात आवाज उंच चढवत, लेफ्टनंट बर्गला आदेश देत म्हणाला, ‘‘नंबर आठ खिडकी.. लवकर उघडा! आणि त्याच आदेशाची पुनरावृत्ती करून झाल्यावर, तो ओरडला, ‘‘फुल स्ट्रेंथ नंबर तीन … नंबर तीन फुल स्ट्रेंथ… नंबर तीन स्ट्रेंथ.. फुल स्ट्रेंथ.’’
आठ इंजिने बसवलेले हायड्रोफोन, भरवेगात सणसणवत, पुढे पुढे थडकत आगेकूच करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामात गुंतलेले नौदलाचे उर्वरित अधिकारी आणि खलाशी, एकमेकांकडे हळूच कटाक्ष टाकत तोंडभर हसले. ‘‘हा आपला म्हातारा, नक्कीच आपली नैय्या पार लावेल!’’ ते एकमेकांत कुजबुजू लागले, हा एकदम जुना माणूस आहे.. बरेच उन्हाळे-पावसाळे पाहिलेला.. त्याला कसलीच.. अगदी नरकाचीदेखील भीती नाही!
***

‘‘अरेरेऽऽ काय हे! केवढ्या जोरजोरात गाडी चालवतो आहेस!’’ मिसेस मिट्टी करवादल्या, ‘‘झालंय काय तुला? कशासाठी एवढ्या जोरात गाडी चालवतो आहेस?’’
‘‘हूं..उं?’’ वॉल्टर मिट्टीने आपल्या बाजूच्या सीटवर बसलेल्या बायकोकडे पाहिलं आणि तो प्रत्यक्षसृष्टीत आल्यावर एकदम दचकलाच. त्याची ती बायको नेहेमीसारखी साधीच अशी न दिसता, एकदम भयानक विचित्र, जणू काही प्रती त्राटिकाच असल्याचे, त्याला भासलं. तिचा अंधुक-अस्पष्ट असा आवाज कुठूनतरी दूरवरून आल्यासारखा त्याला वाटला. ती ओरडत होती, ‘‘पंचावन्न पेक्षाही जास्त स्पीड वाढवलेला आहेस तू!’’ ती आणखी कर्कश्शपणे पुन्हा किंचाळली, ‘‘तुला कळत नाही, अशा या ठिकाणी ड्राईव्ह करताना, कोणीही.. अगदी मीदेखील, चाळीसच्यावर स्पीडने गाडी चालवत नाही आणि तू तर, पंचावन्नवर येऊन पोचलास!’’
एक सुस्कारा टाकून बापडा वॉल्टर, आता शांतपणे वॉटरबरीच्या दिशेने आपली जुनी पुराणी गाडी हाकू लागला. ‘वीस वर्षांपूर्वी नौदलात नौकरी करत असताना,’ भयानक वादळातून, एकट्याने, स्वत:च्या हिमतीवर, नौदलाचे ते जोरजोरात गर्जत, वेगात उडणारे भलेथोरले हायड्रोफोन तारून न्यायचे.’ हे त्यानं आपल्या काळजाच्या खोल कप्प्यात लपवलेलं, ते एकमेव दिवास्वप्न, आता विझून.. पार विरून गेलं होतं.

‘‘बघ ..बघ तू आता पुन्हा टेन्शनमध्ये आलेला आहेस.’’ मिसेस मिट्टी तार स्वरात म्हणाल्या. ‘‘पुन्हा तुझे ते ..ते.. ते झपाटलेपण सुरू झालेलं आहे. माझी इच्छा आहे की, तू एकदा डॉ. रेनशॉ यांना भेटून, स्वत:ला त्यांच्याकडून तपासून घ्यावंस.’’
वॉल्टर मिट्टीनं मूकपणे आपली गाडी एका इमारतीसमोर थांबवली. तिथल्या एका पार्लरमध्ये त्याची बायको तिचे केस कापायला, सेट करायला जाणार होती.
‘‘हे बघ, मी माझे केस सेट करायला जातेय. तोपर्यंत तू बाजारात जाऊन तुझ्यासाठी ते बुटांवर घालायचं, आपलं ते रबरी आवरण..ते ओव्हर शूज विकत आण.’’ निघत असताना ती त्याला म्हणाली.
‘‘काही नको. नकोच आहेत मला ते ओव्हरशूज!’’ वॉल्टर थोड्याशा रागाने म्हणाला.
कारमधून उतरण्यापूर्वी, छोट्याश्या आरशात आपला चेहरा न्याहाळून, तो ठीकठाक करून झाल्यावर, पुन्हा तो आरसा, आपल्या पर्समध्ये ठेवून देत, ती आग्रहाने म्हणाली, ‘‘एक लक्षात घे, तू काही पूर्वीसारखा तरुण राहिलेला नाहीस.’’ त्याने दुर्लक्ष करून किल्ली फिरवून इंजिन चालू केलं. आणि तू आपले ग्लोव्ह्ज का घातले नाहीस? हरवून टाकलेस का ते ग्लोव्ह्ज? घाल आधी!’’ ती पुन्हा ओरडली.
वॉल्टरने मुकाटपणे खिशात हात घातला आणि खिशातले ग्लोव्ह्ज काढून, शांतपणे हातात घातले. त्याने आपल्या बायकोसमोर ते ग्लोव्ह्ज घातले खरे; पण तिची पाठ वळताच व ती नजरेआड झाल्याची खात्री पटताच, तो ग्लोव्ह्ज काढता काढता, पुन्हा गाडी चालवू लागला.

सिग्नलपाशी आल्यावर लाल दिवा पाहताच, त्याने ते ग्लोव्ह्ज पटकन काढून टाकले आणि ते पुन्हा खिशात टाकले. ‘‘ए भाऊ! काय चाललंय रे तुझं मघापासून? आहेत तुझ्याकडे ग्लोव्ह्ज, तर मग घाल ना ते हातात!’’ असं त्या ट्राफिक पोलिसाने झाडल्यावर, त्याने पुन्हा मुकाटपणे ते ग्लोव्ह्ज खिशातून काढून पुन्हा हातात घातले आणि सिग्नल लागताच तो पुढे सरकला. आता वेळ काढायला तो निरुद्देशाने गाडी उगाचच रस्त्यांवरून इकडे तिकडे फिरवू लागला आणि आपली गाडी वेगात पार्किंग लॉटकडे घेऊन जाताना, आपण एक मोठं सुसज्ज हॉस्पिटल ओलांडून पुढे गेलेलो आहे हे त्याच्या ध्यानात आलं.
***

‘‘लक्षाधीश असलेले प्रसिद्ध बँकर, वेलिंग्टन मॅकमिलियन आले आहेत सर’’ सुंदरशी आणि चटपटीत नर्स त्याच्यापाशी येत म्हणाली.
‘‘हं .. असं का?’’ वॉल्टर मिट्टी शांतपणे हातातले ग्लोव्ह्ज काढता काढता म्हणाला, ‘‘कोणाची केस होती ही अगोदर?’’
‘‘डॉ. रेनशॉ आणि डॉ. बेंबो यांची पण आणखीही दोन स्पेशालिस्ट, खास तुम्हाला भेटायला म्हणून इथे हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. डॉ. रेमिंग्टन हे न्यूयॉर्क येथून आलेले आहेत तर लंडनवरून डॉ. प्रिटचर्ड मिटफोर्ड आले आहेत.’’
तिचं बोलणं संपेस्तोवर, एका लांबलचक कॅरिडॉरमधल्या केबिनचं दार धाडकन उघडलं गेलं आणि डॉ. रेनशॉ बाहेर आले. ते अतिशय निराश, विमनस्क आणि थकलेले दिसत होते. ‘‘हॅलो मिट्टी!’’ ते ओढूनताणून उत्साह आणत म्हणाले, ‘‘आम्ही अक्षरश: दुर्वासांच्या दाढीला कुरवाळून, त्यांच्या नाकदुर्‍या काढून, मुदत वाढवून घेऊन धावतपळत येथे आलोय. आमच्या जिवाला लागली आहे करवत! तो धनाढ्य मॅकमिलियन माहिती आहे ना.. तो.. तो आपल्या राष्ट्रपतींचा मित्र, त्याला झाली आहे व्याधी, ‘अति ग्रहणी उदरभरणी’. मग काकुळतीने डॉ. रेनशॉ म्हणाले, ‘‘तू त्याला तपासून बघतोस का जरा? आता पुढे ओपीडीमध्ये जाऊन, काय इलाज करायचा आहे? औषधपाण्याचा उपयोग होईल का काही, की थेट ऑपरेशन करायचं? काय ते सुचवून, जरा एकदाचा गुंता सोडवशील का?’’

‘‘ अवश्य.. अवश्य.’’ वॉल्टर मिट्टी आश्वासक सुरात म्हणाला. ‘‘मला तुमच्यासारख्या विद्वानांच्या उपयोगी पडायला नक्कीच आवडेल.’’
आत ऑपरेशन थेटरमध्ये, ऑपरेशनची पूर्वतयारी करता करता, सारे तज्ज्ञ हलक्या आवाजात कुजबुजत एकमेकांशी ओळख करून घेत होते. ‘‘डॉ. मिट्टी, हे डॉ. रेमिंग्टन आणि हे आहेत डॉ. प्रिटचर्ड मिटफोर्ड..’’ डॉ. रेनशॉ यांनी ओळख करून देताच, त्यांनी एकमेकांच्या सोबत हस्तांदोलन केलं.
‘‘डॉ. मिट्टी, मी नुकतंच, ‘कोल्ह्याची सर्दी’ या आजारावर तुम्ही लिहिलेलं पुस्तक वाचलं.’’ हस्तान्दोलन करता करता डॉ. प्रिटचर्ड मिटफोर्ड म्हणले, ‘‘काय अत्युच्च संशोधन आहे आणि तुमची भाषाशैली तर अतिउत्तम! तुमच्या अतीव बुद्धिमत्तेचा, प्रतिभेचा तो एक अप्रतिम परिपाकच आहे!’’
‘‘थँक यू!’’ वॉल्टर मिट्टी विनयाने म्हणाले. ‘‘कमालच आहे! तुमच्यासारखा प्रज्ञावान संशोधक अमेरिकेत आहे आणि आम्हाला त्याचा पत्ताच नाही!’’ डॉ. रेमिंग्टन कुरकुरत म्हणले, ‘‘डॉ. मिटफोर्डला आणि मला अक्षरश: उंबराची साल काढावी लागली.. तुम्हाला धुंडाळायला! माटमूट करून तुम्हाला शोधत येथवर या परगण्यात आलोच की शेवटी!’’

‘‘तुम्ही आता तर घोड्यापुढे धावताय हं! लाजवताय मला!’’ वॉल्टर मिट्टी नम्रपणे म्हणाला.
तेथल्या टेबलाला एक भलं मोठं अवजड आणि अत्यंत गुंतागुंतीचं उपकरण जोडलेलं होतं.. असंख्य ट्यूब्स, वायरी यांच्या संयोगाने बनलेल्या त्या क्लिष्ट उपकरणातून तितक्यात आवाज ऐकू येऊ लागला.. पॉकेटा पॉकेटा .. क्वीप.. पॉकेटा पॉकेटा क्वीप.. पॉकेटा पॉकेटा.. क्वीप.. पॉकेटा पॉकेटा.. क्वीप
‘‘मला वाटतंय सर, हे नवीन बसवलेलं अ‍ॅनेस्थेशिया देणारं उपकरण.. मानच टाकतंय! आणि इथे या पूर्व विभागात तर, हे अत्याधुनिक उपकरण रिपेयर कसं करायचं याची माहिती असलेला, कोणीही माहीतगार तंत्रज्ञ माणूस मुळी, अव्हेलेबलच नाहीये.’’ एक इंटर्न उत्स्फूर्तपणे ओरडला.
‘‘गप बसतोस का रे जरा!’’ शांत -संयत व थंड आवाजात वॉल्टर म्हणाला आणि तो त्या अत्याधुनिक मशीनपाशी उसळी मारून गेला. त्या मशीनमधून अजूनही ‘पॉकेटा पॉकेटा.. पॉकेटा पॉकेटा..’ असा आवाज निघत होता. त्याने त्या मशिनच्या वरील, घड्याळाच्या तबकड्यांप्रमाणे दिसणार्‍या, एका रांगेत असलेल्या तबकड्यांना नाजूकपणे हाताळलं.
‘‘मला एक फाऊंटन पेन दे जरा’’ त्यानं त्या इंटर्नला फटकारलं. कुणीतरी धावत-पळत जाऊन वॉल्टरला एक पेन आणून दिलं. त्यानं मशिनमधून नादुरुस्त असलेले पिस्टन बाहेर काढून, त्या जागी ते पेन बसवलं. ‘‘आता या आत सरकवलेल्या पेनमुळे, हे मशिन दहा मिनिटं चालू राहील.’’ वॉल्टर म्हणाला, ‘‘आता तोपर्यंत ऑपरेशन सुरू करून, लवकर उरकून टाकूया.’’
एक नर्स घाईघाईने, पळत जाऊन एक पांढरा गाऊन घेऊन आली आणि ती डॉ. रेनशॉ यांच्यापाशी जाताच, डॉ. रेनशॉ पांढरेफटक पडल्याचं वॉल्टर मिट्टीला दिसून आलं.

‘‘.न.. नको.. नको .. मी नाही करणार ऑपरेशन!’’ पेशंटला आता पोटात खरूज की गजकर्ण असं कायसं झालेलं आहे.’’ रेनशॉ नर्व्हस होत म्हणाले, ‘‘माझ्याऐवजी तूच ऑपरेशन कर ना मिट्टी.’’
वॉल्टर मिट्टीने त्यांच्याकडे आणि तंतरल्याने, घरूनच पिऊन तर्र होऊन आलेल्या, उत्साहहीन चेहेर्‍याच्या व अत्यंत डरपोक स्वभावाच्या डॉ. बेंबो यांच्याकडे; तसेच निरुत्साहाने भरून वाहणार्‍या, मख्ख चेहेर्‍याच्या इतर निकम्म्या व आळशी डॉक्टरांकडे; एक नजर टाकली.
‘जशी तुमची इच्छा’ असं वॉल्टरने म्हणताच, नर्सने तो पांढरा गाऊन त्याच्या अंगावर चढवला आणि मग त्याने आपला मास्क व्यवस्थित केला व अतिशय पातळ असे, ऑपरेशनसाठीच वापरण्यात येणारे ग्लोव्ह्ज आपल्या हातामध्ये घातले. मग नर्सेसनी येऊन त्याच्या हातात एकामागून एक अशी, चमकणारी आयुधं द्यायला सुरुवात केली.
***

‘‘ओ साहेब, गाडी मागे घ्या.. मागे न्या.. तिकडे.. तिकडे न्या गाडी.. काय झालं… उलटी होतेय का?’’ कोणीतरी जोरात हटकल्यासारखा आवाज त्याला ऐकू आला. वॉल्टर मिट्टी कचकचून ब्रेक लावायचा प्रयत्न करत होता.
‘‘तुम्ही चुकीच्या लेनमध्ये गाडी घातलीय सायेब.’’ पार्किंग लॉटचा अटेंडन्ट, वॉल्टरपाशी येऊन म्हणाला आणि आणखी जवळ येऊन तो, वॉल्टर मिट्टीचा चेहरा बारकाईने न्याहाळू लागला. ‘‘ढोसली तर नाही ना या बेण्याने?’’ तो अटेन्डन्ट लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात, स्वत:शीच बडबडल्याचा वॉल्टरला भास झाला.
‘‘अं हो हो..’’ वॉल्टर गडबडून जात स्वत:शीच पुटपुटला आणि सावधपणे, ‘एक्झिट ओन्ली’ असं ठळकपणे मोठ्या अक्षरात लिहिलेली पाटी असलेल्या त्या लेनच्या बाहेर, आपली गाडी काढायचा प्रयत्न करू लागला.
‘‘ती गाडी तिकडेच सोडा आणि इथे जरा टेका!’’ तो अटेंडंट म्हणाला, ‘‘मी ती गाडी बरोबर जागेवर लावतो.’’ तो वॉल्टरला उद्धटपणे म्हणाला.
वॉल्टर मिट्टी गाडीच्या बाहेर पडला. ‘‘ओ साहेब! ती चावी नका नेऊ बरोबर..’’ अटेंडंटने समज देताच त्याने ती ‘इग्निशन की’ त्या अटेंडंटच्या हातावर ठेवली. तो अटेंडंट तत्काळ त्या गाडीत घुसला आणि आपल्या अंगभूत चढेलपणाने; त्याने ती गाडी जिथे पार्क केलेली असायला हवी, त्याच ठिकाणी एकाच फटक्यात बरोब्बर लावून ठेवली.

‘‘वागण्या बोलण्यात किती फाजील, गर्विष्ठ आणि मुजोर असतात ही अटेंडंट पोरं!’’ मेन रोडवरून चालता चालता वॉल्टर स्वत:शीच पुटपुटला, ‘‘ह्यांना वाटतं की आपल्यालाच सगळ्यातलंच, सगळं-सगळं कळतं!’’
एकदा न्यू मिलफोर्डमध्ये घराच्या बाहेर, लांबवर गेल्यावर, टायरभोवती गुंडाळेल्या स्नो चेन्स काढत असताना त्याने धांदरटपणे चुकून, स्नो चेन्सना चाकांवरून बाहेर काढण्याऐवजी, चाकाच्या अ‍ॅक्सेलच्या भोवतीच त्या चेन्स गुंडाळून, पार गुंतवून टाकलं होतं आणि अपघातग्रस्त व पूर्ण निकामी झालेल्या गाड्यांच्या मदतीसाठी खासपणे बनवलेली; रेस्क्यू ऑपरेशनसाठी लागणारी सामग्री असलेली ब्रेकिंग बोलवावी लागली होती. तो सगळा सावळा गोंधळ पाहिल्यावर, त्या व्रेकिंग कारमधला तरुण, हसतमुख मेकॅनिक आपल्यालाच फिदीफिदी हसत आहे, असंच मिट्टीला भासलं होतं. आणि त्याहूनही वाईट म्हणजे मिसेस मिट्टी यांनी, आपल्या नवर्‍याला चांगलंच हडसून खडसून, पुढल्या वेळी गॅरेज मध्ये जाऊन तिथल्या मेकॅनिक्सकडूनच त्या स्नोचेन्स काढून वा लावून घेण्याविषयी बजावलं होतं आणि तोही बिचारा ‘दिल्या हुकमावरून’ गॅरेजमध्ये जाऊन त्या चेन्सची घाल-काढ करत होता.पण त्या गॅरेजमधले ते मेकॅनिक्स नेहमीच आपल्याला मागाहून कुचेष्टेने हसतात, याची त्याला मनोमन खात्रीच होती.

‘आता पुढल्या वेळी मी जेव्हा गॅरेजमध्ये जाईन ना, तेव्हा माझा उजवा हात झोळीत घालून, गळ्यात अडकवूनच जाईन; म्हणजे त्या नाठाळांना वाटेल की, माझा उजवा हात मोडलेला आहे. मी त्या हाताने स्नोचेन्सची काढ-घाल किंवा इतर काहीही काम करू शकत नाही आणि म्हणूनच या असल्या फालतू कामासाठी मी गॅरेजमध्ये आलेलो आहे. मग तरी ते टाइम पास करायला, माझी खिल्ली उडवणार नाहीत. वॉल्टर स्वत:शीच बोलला आणि फूटपाथवरून चालता चालता वाटेत आलेला, एक अर्धवट वितळलेला बर्फाचा गोळा, त्याने लाथेने दूर उडवला. बायकोनं त्याला काय विकत आणायला सांगितलं होतं; ते काही त्याला आठवेना. शेवटी काही क्षणांच्या विचाराअंती त्याला आठवलं आणि तो स्वत:शीच उद्गारला, ‘‘ओव्हर शूज!’’ आणि तो जवळच्या दुकानात शिरला.

काखोटीला ओव्हर शूजचं पुठ्ठ्याचं खोकं मारून, तो बुटाच्या दुकानाबाहेर पडला आणि बायकोने त्याला आणखीन एक पण नेहमीची नसलेली, कोणती तरी दुसरीच वस्तू, विकत आणायला सांगितल्याचं, त्याला अंधुकसं आठवलं. घरातून वॉटरबरीला जायला निघताना, त्याच्या बायकोनं त्याला चांगलं दोन-तीनदा बजावून सांगितलं होतं. ‘काय होतं ते बरं..’ तो आठवू लागला. त्याला खरंतर, दर आठवड्याला बायकोला सोबत घेऊन, गाडीने गावातून सकाळी निघून, त्या लांबच्या शहरात, उगाच आलतू-फालतू कामासाठी, फुटकळ खरेदीसाठी ट्रिपा मारायला, मनातून अजिबात आवडत नव्हतं. पण काय करणार! नाइलाजास्तव इलाजच नाही! आणि त्यातून त्याची बायको केस कापायला, रंगवायला वा सेट करायला त्या बायकांच्या सलूनमध्ये गेली की, तिकडे त्याला काय आणायचं ते न आठवल्याने, त्याची बोंब व्हायची आणि विचारायची तर, सोयच नव्हती. उगाचच स्वत:वर डाफरून घेण्याच्या ऐवजी, तो त्याला वाटेल ती, सुचेल ती आणि दिसेल ती वस्तू विकत आणायचा आणि त्या बदल्यात ढीगभर शिव्याही खायचा.

तो पुन्हा आठवू लागला. ‘काय बोलली होती ती बयाबाई .. भांडी घासण्याचा साबण की फारशी पुसायचं लिक्विड, टूथ पेस्ट की टूथ ब्रश.. का रेझर ..खायचा सोडा की प्यायचा सोडा..’ तो स्वत:शीच बोलला, ‘नाही नाही.. मागल्या आठवड्यातच ते सारं, चांगलं डझनभर आणून झालेलं आहे. मग काय? काय आणायचं होतं? अभ्रक की सिलिकॉन?’ तो डोकं खाजवत विचार करत आठवू लागला. त्याला काहीच आठवलं नाही आणि शेवटी कंटाळून त्यानं मग तो विचार सोडून दिला. ‘आपल्याला कसं काहीच आठवत नाही… आणि तिला.. तिला.. त्या कैकेयीला, कसं जुनं-पानं.. मागचं-पुढचं अगदी सारं कसं संगतवार आठवतं!’ त्याच्या मनात विचार डोकावला, ‘आता थोड्या वेळात ती बया, त्या दुकानाबाहेर येईल. केस पिंजारून दाखवेल. आणि मग आपल्याला टोचत म्हणेल, ‘हे बघ उगाच सबब सांगू नकोस…’ मला आठवलं नाही.. आठवलंच नाही! आणि काय रे, आठ्वलंच नाही, असं रे कसं? आणि नेहमी तुलाच कसं काय आठवत नाही?’
त्यानं एक सुस्कारा सोडला. तितक्यात त्याच्या जवळून काखोटीला वर्तमानपत्राचा गठ्ठा मारलेला, एक वर्तमानपत्र विकणारा पोर्‍या, हातातलं एक वर्तमानपत्र नाचवत, ओरडत ओरडत गेला, ‘‘निकाल निकाल.. खून खटल्याचा निकाल.. वॉटरबरी खटल्याचा निकाल.’’
***

‘‘बघ. बघ चांगलं बघून घे म्हणजे तुझ्या सार्‍या स्मृती पुन्हा ताज्या होतील.’’ गर्दीने खचाखच भरलेल्या त्या कोर्टात, सरकारी वकील, आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या,त्या एका शांत अविचल इसमाच्या पुढ्यात दणकट पिस्तूल आदळत म्हणाले, ‘‘तू हे अगोदर कधी पाहिलेलं आहेस?’’
वॉल्टर मिट्टीने ते हत्यार आपल्या हातात घेतलं आणि तज्ज्ञांच्या नजरेने तो त्या हत्याराची बारकाईने पाहणी करू लागला. ‘‘हे माझं वेब्लि-विकर्स ५०.८० आहे.’’ तो असं शांतपणे बोलताच, कोर्ट रूममध्ये लागलीच कुजबुज सुरू झाली व ती वाढत जाऊन एकच गलका सुरू होताच, माननीय न्यायमूर्ती आपल्या हातातला हातोडा आपटत कोकलले, ‘‘ऑर्डर ऑर्डर!’’
सरकारी वकील पुढे सरसावत म्हणाले, ‘‘तू नेहमीच पिस्तुलातून नेहमीच गोळ्या झाडत असतोस.. आणि तू कोणत्याही पिस्तुलाने गोळी झाडू शकतो. गोळी झाडायला कुठलंही हत्यार तुला कधीही चालतं.. खरं आहे ना हे.. काय?’’
यावर आरोपीचा वकील म्हणजेच वॉल्टर मिट्टीचा वकील तावातावाने ओरडत म्हणाला, ‘‘ऑब्जेक्शन मिलॉर्ड! माझ्या अशिलाचा एक हात.. उजवा हातच मुळी १४ जुलैच्या रात्रीपासून मोडलेला असून, तो त्याच्या गळ्यात बांधलेला आहे.’’

वॉल्टरने आपला हात किंचित वर उचलताच, ते पोटतिडकीने भांडणारे, कावळ्यासारखे करकरणारे दोन्ही वकील एकदम गप्प झाले. ‘‘हे बघा, मी कोणत्याही मेकच्या पिस्तुलाने, अगदी देशी कट्टयानेदेखील, ३०० फुटांवरूनही माझ्या डाव्या हातानेदेखील, कोणालाही.. अगदी त्या फुलन देवीलासुद्धा गोळी झाडून ठार मारू शकतो.’’ वॉल्टरने असं थंडपणे म्हटलेलं ऐकताच, त्या कोर्टरूममध्ये एकच गोंधळ माजला. त्या वेड्यांच्या बाजारात चालू असलेल्या त्या कल्लोळात, सार्‍या गोंगाटामधून दुरूनच बर्‍याच अंतरावरून, एका महिलेने मारलेली एक कर्णभेदी किंचाळी, सार्‍या आवाजाच्या वरताण ठरली. तितक्यात अचानक, वॉल्टर मिट्टीची मनातल्या मनात मनोभावे पूजा बांधणारी, त्याची एक निस्सीम चाहती, एक सुंदरशी तरुणी, कुठूनतरी धावत येऊन, त्याच्या गळ्यात पडली. हे पाहताच मत्सराने काळ्या-निळ्या-जांभळ्या झालेल्या त्या सरकारी वकिलानं, त्या देखण्या मुलीला एक लगावून दिली व तडाखे मारत, हिसके मारून तो तिला वॉल्टरपासून दूर करू लागताच मग वॉल्टरचाही स्वत:वरचा ताबा सुटला आणि त्यानं सात्त्विक संतापानं, त्या खापरतोंड्या सरकारी वकिलाच्या हनुवटीवर जोरात एक ठोसा मारला आणि तो मोठ्यानं गरजला, ‘‘साल्या.. दळभद्य्रा! दोघांच्यात कशाला कडमडतोस रे, अवलक्षणी, माकडतोंड्या!’’
‘‘अहो, पण ती माझी भावी पत्नी आहे.’’ तो सरकारी वकील काकुळतीने म्हणाला.
‘‘होती.. पूर्वी होती! आता नाही!’’ वॉल्टर पुन्हा गरजला.
***

वॉल्टर मिट्टीची तंद्री एकाएकी भंग पावली. ती कोर्टरूम अचानक धूसर होत जात हवेत विरून गेली. आता वॉटरबरी शहराच्या उंच इमारती, उभ्या कड्यांच्या सारख्या त्याच्या सभोवती, अटेन्शनमध्ये खड्या असलेल्या त्याला दिसल्या. तो चालता चालता एकदम मध्येच थांबला. त्याला अचानकच आठवलं आणि तो मोठ्या आवाजात स्वत:शीच बोलला, ‘‘हो हो.. पपी बिस्किट्स! पपी बिस्किट्सच आणायची होती!’’
तितक्यात मैत्रिणीसोबत बोलत बोलत, त्याच्या जवळून पुढे निघून गेलेली एक स्त्री, त्याचे हे उद्गार अर्धं-मुर्धं ऐकून हसू लागली आणि हसता हसता मैत्रिणीला म्हणाली, ‘‘बघ.. तो बघ.. तो नादिष्ट माणूस.. स्व:शीच कसं ‘पपी बिस्किटस’..‘पपी बिस्किटस’ बडबडत उभा आहे.’’
वॉल्टर मिट्टी एकदम शरमून पुढे चालू पडला. वाटेत लागलेल्या पहिल्या दुकानात न जाता त्यानम लांबवर चालत जाऊन, एक छोटंसं दुकान निवडलं आणि आत शिरून तो त्या दुकानातल्या कारकुनापाशी गेला व त्याला म्हणाला, ‘‘मला छोट्या आणि लहान कुत्र्यांसाठी बिस्किटं हवी आहेत.’’
‘‘कुठला ब्रँड हवा आहे साहेब?’’ त्या कारकुनाने कामातून नजर न उचलता म्हटलं.

जगातील सर्वश्रेष्ठ पिस्तूलबाज वाल्ट्झ ऊर्फ वॉल्टर मिट्टी याने, क्षण-दोन क्षण विचार केला आणि तो म्हणाला, ‘‘ती.. ती.. तीच.. ज्यांच्या पॅकेट्सच्या बॉक्सवर, केकाटणार्‍या झिपर्‍या कुत्र्याच्या फोटोच्या खाली, छापलेलं असतं बघा.. ‘याजसाठी आम्ही कुत्री, भुंकून भुंकून करितो अट्टहास तीच द्या मला.’’
‘‘बायको आता हेअर ड्रेसरकडून सारं काही आटोपून पंधरा मिनिटांत बाहेर येईल.. वॉल्टर मिट्टीने मनगटी घड्याळ्याकडे नजर टाकून आत डोकावून पाहिलं. हां.. पण जर केस ड्रायरने वाळवताना काही प्रॉब्लेम झाला, तर नक्कीच जास्त वेळ लागेल तिला. येतो कधी कधी प्रॉब्लेम. ड्रायरने केस वाळवताना.. होतोही उशीर कधीकधी. पण तिला आधीच हॉटेलमध्ये गेलेले आवडणार नाही. बाहेर थांबून नेहेमीप्रमाणे तिची वाट बघत बसलेलं तिला हवं असतं. असं आपल्याशीच बोलून, वॉल्टर मिट्टीने लॉबीमधली एक जड खुर्ची ओढून खिडकीपाशी आणून ठेवली. त्यानं आपलं बुटाचं खोकं आणि तो पपी बिस्किटांचा बॉक्स, खुर्चीच्या बाजूला जमिनीवर ठेवून, त्याने बाजूच्या छोट्या टेबलावरून एक जुना लिबर्टी मासिकाचा अंक उचलला आणि तो खुर्चीत जणू कोसळलाच. त्या मासिकात वरून तुफानी बाँबवर्षाव करणारी विमानं आणि उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांचे फोटो होते. ते फोटो तो कुतूहलानं पाहू लागला… पाहता पाहता रंगून गेला.
***

‘‘विमानवेधी तोफांनी रॅले शहराला कसं गुंडाळून, अगदी घेरून टाकलेलं आहे सर! मला तर शत्रूच्या तळावर सॉर्टी मारण्यात काहीही हशील वाटत नाहीये.’’ सार्जंट नम्रपणे आपल्या ऑफिसरला म्हणाला.
कॅप्टन मिट्टी साहेबांनी आपल्या विस्कटलेल्या केसांच्या जंजाळातून, आपल्या धारातीर्थी पडलेल्या भिडूकडे एकदम तीक्ष्णपणे पाहिलं. ‘‘जा रे.. त्याला आता नेऊन बिछान्यात झोपव.’’ तो थकल्या भागल्या स्वरात सार्जंटला म्हणाला. ‘‘मी एकटाच तिथे उड्डाण करेन.’’
‘‘पण सर.. सर तुम्ही असं करू शकत नाही… अजिबातच नाही.’’ तो सार्जंट सचिंतपणे म्हणाला, ‘‘हे बघा.. सर.. एक फायटर प्लेन सांभाळायला कमीत कमी दोन तरी माणसं लागतात. आणि ते भुसनळे आपल्या तोफेतून पाऊंड पाऊंड वजनाचे गोळे हवेत मारून आपलं विमान पाडायला, नाक वर करून कसे टपून उभे आहेत. इथे आणि पलीकडच्या शहरात आग्या वेताळाची पालखी, हडळींची वरात आणि भुतावळीची सर्कस चालू आहे.’’ तो सार्जंट चांगलाच गर्भगळीत झालेला होता.

‘‘पण शेवटी कोणाला तरी ह्याच्या ह्या अग्नितांडवाच्या पलीकडे जाऊन, त्यांच्या थोबाडात दारूगोळा ठोसायला हवा आहे.. खरं ना! मग मीच जातो की तेथे विमान घेऊन! आत्ताच निघतो त्यांच्या घरावर हाड बांधायला! त्यांच्या नाकाला चुना लावून परत येतो. मला फक्त ब्रँडीचा एक घुटका जरा दे बघू!’’ बाहेर तुंबळ युद्धाचा दणदणाट चालू होता. तितक्यात स्फोटासारखा आवाज झाला. भिंती हादरल्या आणि आतल्या लाकडी सामानाच्या चिरफळ्या उडाल्या. थोडक्यात निभावलं.. ‘‘गेलोच असतो नाहीतर..’’ कॅप्टन वॉल्टर साहेब म्हणाले.
‘‘बाहेर तोफांचा तुफान भडीमार चालला आहे.. सर!’’ सार्जंट काकुळतीने म्हणाला.
‘‘पण झालं का काही आपल्याला? नाही ना? मग गप बस!’’ कॅप्टनसाहेब उत्तरले. आणि सार्जंटकडे एक ओझरतं हसू फेकत, कॅप्टन साहेबांनी स्वत:साठी ग्लासमध्ये, आणखी थोडी ब्रँडी ओतून घेतली.
‘‘तुमच्यासारखा.. अशी झोकात ब्रँडी घेणारा माणूस, मी आजवर नाही पाहिला सर! पण पाया पडतो मी तुमच्या.. सर नका ना मोहिमेवर निघू!’’ सार्जंटनं पुन्हा विनवणी केली.
‘‘आपण एकच आयुष्य एकदाच जगतो. शूर पुरुष फक्त एकदाच मरतो. डरपोक माणसासारखा वारंवार मरत नाही.. बरोबर ना?’’ वाघाच्या काळजाच्या कॅप्टनसाहेबांचं उत्तर तयारच होतं.

‘‘पण आत्ता या वेळी… त्या नरकाच्या आगीतून तुम्हाला चाळीस किलोमीटर जायचं आहे.. कसं जाल?’’ सार्जंटने पुन्हा प्रश्न उपस्थित केला.
‘‘त्याची काळजी तुला नको. काय करायचं आहे ते मी बघेन.. जाऊन त्यांच्या युनिटचा मुडदा बसवून येतो!’’ असं म्हणून कॅप्टनसाहेब निघाले. बाहेर तोफा धडाडतच होत्या. मशिगनमधून गोळ्यांचा वर्षांव होत होता. छाती काढून एखाद्या वीरपुरुषासारखे कॅप्टनसाहेब, त्या अग्नी गोलकांच्या वर्षावाला सामोरं जायला निघाले.. पण हाय! तितक्यातच तो अभद्र, अनिष्ट सूचक, ‘पॉकेटा, पॉकेटा.. पॉकेटा, पॉकेटा’ असा आवाज कॅप्टन साहेबांना ऐकू येऊ लागला.
‘‘दूरवर आहे पुण्यनगरीस.. माझी मस्तानी.. मोहिमेवर निघालो मी बुंदेलखंडी.. मी एकला.. बाजीऽऽराव.. बाजीऽऽराऽव’’ अशी तान मारत, कॅप्टन वॉल्टर मिट्टी निघाले आणि उंबरठ्यापाशी आल्यावर, मागे वळून आपल्या भेदरलेल्या सार्जंटकडे हसून पाहत, आपला हात हालवत म्हटलं, ‘‘चिअर्स! फिर मिलेंगे!..’’
***

खांद्यावर मजबूत हाताचा जोराचा तडाखा बसताच, कल्पनासृष्टीत रमलेला वॉल्टर, पुन्हा परत सत्यसृष्टीमध्ये आला. केव्हाची मी तुला इथे ह्या हॉटेलमध्ये, सगळीकडे शोधत हिंडते आहे आणि तू या जुन्या-पुराण्या खुर्चीत स्वत:ला गाडून, तोंड लपवून बसलेला आहेस? आता सांग कसा दिसणार तू मला? तुला मी कसं काय शोधायचं?’’ वॉल्टरची सावित्री ऊर्फ मिसेस मिट्टी त्याच्यावर डाफरली.
‘‘जवळ आलेले होतं.. अगदी जवळच आलेलं होतं..’’ वॉल्टर अस्पष्टपणे अनिश्चित सुरात, हळू आवाजात म्हणाला.
‘‘काय.. काय आलं होतं? कोण आलं होतं?’’ मिसेस मिट्टी थोडयाशा वैतागून म्हणाल्या, ‘‘आणि सांग.. ते.. ते विकत आणलंस का आधी? ते आपलं हे.. हां, ती पपी बिस्किट्स आणलीस का विकत? आणि त्या पुठ्ठ्याच्या खोक्यात काय आहे?’’

‘‘ओव्हर शूज.. तू सांगितले होतेस ना आणायला?’’ हवालदिल झालेला वॉल्टर मिट्टी दीनपणे म्हणाला.
‘‘हो, पण तुला ते ओव्हर शूज, त्या बुटाच्या दुकानातच आपल्या बुटांवर चढवता येत नव्हते?’’ मिसेस मिट्टी कडाडल्या, ‘‘हे खोकं मिरवत जायची काय गरज होती?’’
‘‘तुला माहिती आहे ना, की मी एक विचारवंत आहे..’’ वॉल्टर सफाई देत म्हणाला, ‘‘कधीकधी विचारांत हरवून जातो आणि विचारात हरवल्यावर..’’
‘‘घरी चल आधी.. घरी गेल्यावर तुझ्या तोंडात थर्मामीटर घालते आणि ताप किती आलाय ते मोजते..’’ मिसेस मिट्टी अगदी ‘फायनल ’बोलल्या.
ढकलल्यावर हलकासा शिळेसारखा आवाज काढणार्‍या, त्या फिरत्या दरवाजा फिरवून, ते दोघे बाहेर पडले. पार्किंग लॉटपासून ते हॉटेल.. फक्त दोन घरं सोडून, इतक्याच अंतरावर होतं.

कोपर्‍यावरील ड्रग स्टोअर पाहताच मिसेस मिट्टी कसल्याशा आठवणीने, आपल्या नवर्‍याला म्हणाल्या, ‘‘तू इथेच माझी वाट बघत थांब. माझं काहीतरी घ्यायचं राहिलेलं आहे. आलेच मी! मला एक मिनिटभरसुद्धा लागणार नाही.’’ अर्थातच तिला मिनिटभराहून बराच वेळ, कितीतरी मिनिटं वा तासही लागणार आहेत, हे वॉल्टरला सवयीने ज्ञात झालेलं होतं.
वॉल्टर आरामात उभा राहिला आणि त्यानं आपली सिगारेट शिलगावली. तितक्यात पाऊस सुरू झाला. तो जोरदार मुसळधार पाऊस, सोबत गाराही घेऊन आला. वॉल्टर त्या ड्रगस्टोअरच्या भिंतीला पाठ टेकून उभा होता.
***

निधड्या छातीच्या वॉल्टरने, आपले खांदे मागे फेकले आणि दोन्ही टाचा जुळवून तो ताठ उभा राहिला. आपल्या सिगारेटचा एक खोल असा, शेवटचा झुरका त्यानं घेतला आणि बेफिकिरीने ती सिगारेट, त्यानं दूर भिरकावून दिली. ‘‘खड्यात घाला तो तुमचा तो रुमाल!’’ तो बेपर्वाईने म्हणाला, ‘‘मला माझ्या डोळ्यांवर रुमाल बांधायला नको आहे.’’ आपलं नेहमीचं मंद-ओझरतं असं हास्य, आपल्या ओठांवर खेळवत, तो अभिमानाने, अविचलपणे ताठ उभा राहून, आपल्या शत्रू सैनिकांकडे, त्यांच्यावर थुंकत असल्यासारख्या, तिरस्कारपूर्ण नजरेने पाहत, तो आपल्या छातीवर गोळ्या झेलून घेण्यासाठी, त्या फायरिंग स्क्वॅडला सामोरा उभा राहिला! न घाबरता.
वॉल्टर मिट्टी, होताच मुळी.. गूढ व्यक्तिमत्वाचा! अपराजित अजिंक्य!

मूळ कथा : द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी
लेखक : जेम्स थर्वर
अनुवाद : कल्पिता राजोपाध्ये

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.