Now Reading
कोरोना क्लॅश

कोरोना क्लॅश

Menaka Prakashan

कोरोना काळात स्वप्ना इतकी का बिथरली? की, ती आधीपासूनच नॉर्मल नव्हती आणि आपल्या ते उशिरा लक्षात येतंय? तसा संगसहवासाच्या बाबतीत तिचा पुढाकार, स्वतःहून बिलगणं कधीच नसायचं… ओंकार आता वैवाहिक जीवनाची दोन वर्षं आठवू लागला. स्वप्नाला जॉब करायचा नव्हता, तेही त्यानं मान्य केलं होतं. नको तर नको! त्याला कंपनी सत्तर हजार दरमहा देत होती. त्यांना शहरात राहताना तेवढं उत्पन्न पुरत होतं. बचतीला उरत होतं.

कोरोनामुळे ओंकार आता कंपनीत काही दिवस तरी जाणार नव्हता. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद ठेवणार आहेत, हे कळल्यावर स्वप्ना विलक्षण नाराज झाली. ‘‘दिवसभर तुझंच तोंड बघत बसायचं का मी?’’ असं म्हणाली. ‘‘मग काय करू मी? जीव देऊ का? बाहेर उगाच पडलं की, चौकशी होते. बाईकसुद्धा जप्त केल्यात. ते त्यांचं बरोबरच आहे. साथीच्या महामारीत सार्वजनिक शिस्त हवीच. स्वप्ना, मग चीननं आपल्यावर लादलेलं युद्ध आहे हे. लक्षात येतंय का तुझ्या? माझं घरी राहणं तुला इतकं का खटकलं?… स्पष्टच विचारतो, कुणी दुसरा मित्र वगैरे यायचा का मी गेल्यावर?…’’ या मुद्द्याची ठिणगी पडल्यावर चांगलाच भडका उडाला.

‘‘तू मला समजलास काय? मी अशी-तशी उनाड वाटले तुला? हीच माझी परीक्षा केलीस तू? तू असं बोललासच कसं? संशय घेतोस माझ्यावर? लाज वाटते का तुला? सोसायटीतल्या एका पोराची ‘नजर’ चांगली नाही हे लक्षात आल्यावर, त्याच्याशी बोलणंसुद्धा बंद केलं मी! विस्तवाचा भडका उडू लागला.
‘‘तुला खरं सांगू? या खुराड्यात बसून कंटाळा आलाय मला. आज चूल आणि उद्या मूल यापलीकडे मी जायचं नसेल, तर माझ्या आयुष्याला अर्थच काय राहतो?’’
‘‘कमाल आहे! जॉब करणार नाही, हा तुझाच हट्ट होता ना? पप्पा-मम्मींबरोबर राहणार नाही, स्वतंत्र संसार करणार; हीपण तुझीच इच्छा. तसं सगळं करून दिलं, तरी परत तुझं तुणतुणं आहेच. बाई आहेस की कोण आहेस तू?’’
‘‘हडळ आहे मी. तुला खायला आलेय.’’
‘‘खेडवळ आहेस तू. बाकी काही नाही.’’
‘‘हो का? आणि तू काय चंद्रावरून उतरलायस? कोकणातच होतास ना शिकायला? आजीकडेच राहत होतास ना? तिथूनच निवडलंस ना मला? तू सेटल होईपर्यंत थांबलेच ना मी?…’’ शब्दांवर शब्द आपटत राहिले.
‘‘तू गावी जाऊन राहा काही दिवस. मी राहीन एकटी.’’
‘‘वेड लागलंय का तुला? रत्नागिरी जिल्हा सील केलाय. माहीत नाही? लपतछपत जाऊ का जंगलातून? की टारझनसारखा एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उड्या मारू? आणि काय गं, बाकीच्या बायका आपापल्या घरात फॅमिलीची काळजी घेत सुखानं नांदतायत ना? तुलाच काय झालंय?’’
‘‘कुणाला माहीत कोण सुखी आणि कोण दुःखी आहे ते? या पाच नंबर प्लॅटफॉर्ममधल्या सरूला परवा नवरा मारहाण करत होता. व्यसनी आहे तो. त्याला येतात झटके. मी असते तर लगेच बॅग भरून माहेरी गेले असते.’’
‘‘मग आता जा ना! मी राहतो एकटा. मला जेवण बनवता येतं. आजीनं गावी शिकत असताना शिकवलंय कुकिंग. माझं काही अडणार नाही!’’
‘‘बाईशिवाय ज्याचं अडत नाही, त्या पुरुषाला हल्ली ‘गे’ म्हणतात.’’

‘‘तुझं डोकं फिरलंय. दुसरं काही नाही.’’
‘‘वेडी बायको केलीस कशाला? आता शोध दुसरी कुणीतरी. शोधली पण असशील कुणीतरी कंपनीत. मी इथून जावं, तिला आणता यावं म्हणून तुझी धडपड चाललीय.’’
क्षुल्लक वाद आणि स्वप्ना आणि ओंकारचे संबंध विनाकारण ताणले गेले. एकत्र असून सहवास थांबला. जेवण बनलं तरी चव गेली.
अन् लॉकमध्ये कंपनी सुरू झाल्यावर ओंकारची सुटका झाली. तो कामावर जाऊ लागला. स्वप्ना म्हणाली, ‘‘तू रोज बाहेर जातोस. कोरोना घेऊन घरात आलास तर? मी उद्या माहेरी जातेय. इतक्यात येणार नाही. माझ्या घरी मी जड नाही.’’
‘‘स्वप्ना, तू नॉर्मल नाहीस. मी दमून घरी आल्यावर स्वयंपाक करत बसू का?’’
‘‘कशाला? डबा लाव की. तुला काय कमी आहे?’’
‘‘बायको असताना ब्रह्मचार्‍यासारखा डबा का लावू मी?’’
‘‘आता तू ब्रह्मचारी आहेस असंच समजावं लागणार तुला. बायकोला नीट नांदवलंस का कधी?’’
‘‘काय कमी पडलं गं तुला? सांग ना! इतकी नाटकं आणि नखरे केलेस, तरी मी दर वेळी नमतं घ्यायचो.’’
‘‘कशाला नमतं घेतोस? राहा एकटा ऐटीत. तुझ्या कंपनीतला तो श्रेयस नाही का, ‘वन पर्सन फॅमिली’वाला. तसा तू आणखी एक.’’
‘‘तुझ्यासारख्या बायका असतील ना, तर पुरुषांचा विवाहसंस्थेवरचा विश्‍वास उडून जाईल स्वप्ना!’’
‘‘हो का? सासरी येऊन मी फसले त्याचं काहीच नाही.’’
‘‘फसलीस म्हणजे काय नेमकं झालं? मी सॅडिस्ट आहे की, तुझ्याकडे हुंडा मागितला? की सिनेमास्टारसारखे ड्रग्ज घेतो? की वेश्यागमन करतो? काय केलं काय मी?’’
‘‘मला घर खायला उठतं. मला जॉबवाल्या बायका हसतात. ‘घरकोंबडी’ म्हणतात. ती तन्वी मला म्हणाली, ‘कॅबमधून ऑफिसला जाण्यातली मजा तुला काय कळणार? कोरोना काही कायमचा नाही. आम्ही पुन्हा ऑफिस गाठणारच!’ त्या मुद्दामच मला असं काहीतरी सांगतात. खिजवतात.’’
‘‘हे बघ स्वप्ना, नोकरी करायची नाही; हा तुझा निर्णय आहे. शिवाय तू इतकी हळवी आहेस की, बॉसिंग तुला सहन होणार नाही.’’
‘‘ओंकार, मी असं केलं तर…’’
‘‘आता काय आणखी?’’
‘‘एखादं छोटं दुकान चालवलं तर?’’
‘‘जमेल तुला?’’
‘‘का नाही? आपल्याच सोसायटीत खाली दोन गाळे रिकामे आहेत. लोन काढावं लागेल, पण मी मालकीण असेल. घरातलं सगळं आवरून मी खाली दुकानात येऊन बसेन. अगदी स्टेशनरी, चॉकलेट्स, मास्क, दिवाळीचे कंदील, स्वीट्स, फराळाचे पदार्थ असं ठेवलं तरी कॉलनीतले कस्टमर नक्की मिळतील.’’

दिवाळीत ‘स्वप्ना स्टोअर’ सुरू झालं. बिल्डर म्हणाला, ‘‘गाळा माझ्याच ताब्यात आहे. तुमचा व्यवसाय सेटल होऊ दे. नंतर भाडं द्या. सध्या संकटाचे दिवस आहेत. तरी तुम्ही बिझनेसचं धाडस करताय. आम्ही एवढंही करू नये? तुमचं फ्लॅटचं पहिलं बुकिंग होतं माझ्याकडे…’’ बिल्डरने- सुधीरशेटनं असा गोडवा राखला.
कोरोनानं निर्माण केलेला जाळ विझला. सोसायटीवाल्यांनी यंदा फटाके वाजवायचे नाहीत, प्रदूषण करायचं नाही असं ठरवलंय. त्यामुळे स्वप्ना आणि ओंकारची दीपावली शांत, सुखद, सुगंधी बनलीय! आणखी काय हवं?
‘कोरोना फोबिया’ कमी झाल्यावर ओंकारनं स्वप्नाला मिठीत घेत विचारलं, ‘‘वेडाबाई, तुला काय झालं होतं? अगं, प्रेम करतेस ना तू माझ्यावर?’’ ती त्याच्या उघड्या, सशक्त देहाच्या स्पर्शानं मोहरली आणि अंगभूत मदनगंधानं सुखावली. त्याचं चुंबन घेत म्हणाली, ‘‘मला माझं स्वतंत्र अस्तित्व हवं होतं राजा. मलाच कळत नव्हतं की, मी असं का वागतेय. गुलामी तर करायची नव्हती नोकरीत… आणि घरातही घुसमटायचं नव्हतं. त्या नोकरीवाल्या बायकांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्याचं स्वप्न बघतेय मी आता.’’

स्वप्नाची प्रॅक्टिकल स्वप्नं ऐकताना ओंकारही सुखावला आणि नंतर सुखाची लयलूट करताना, कामोन्मादात तापून उसळताना, एकरूप होताना ती दोघं पृथ्वीवरच स्वर्ग अवतरणं म्हणजे काय, याचा अनुभव घेत राहिली. ‘‘संडे आणि सुट्टीला तुझ्या दुकानात मला बसायला देशील ना?’’ ओंकारनं चॉकलेट मागणार्‍या नॉटी मुलासारखं बालिश होऊन विचारलं.

‘‘पगार नाही हं मिळणार. ऑनररी कर काम.’’ म्हणत तिनं त्याचं नाक लाडानं चिमटीत दाबलं.
‘‘ओ…! श्‍वास घ्यायला त्रास होतोय… व्हेंटिलेटर प्लीज…’’ म्हणत तो खिदळला आणि स्वप्नानं त्याच्या ब्रॉड शोल्डरचा बाईट घेतला. प्रणयाला आता एक वेगळी, नवी बहार येऊ लागली होती. ‘कोरोना क्लॅश’ शेकोटीत जळून गेला होता. सोसायटीतल्या पोरासोरांनी शेकोटी पेटवली होती. रात्री उशिरा पोरं जागत होती आणि ‘हमारा ओंकारभाई अब मजेमें है’ म्हणत त्याला गमतीनं फ्लाइंग किस देत होती. गॅलरीतला झिलमिल कंदीलही वार्‍यासारखा हलत डुलत ‘ऑल इज वेल’ म्हणत होता.

– माधव गवाणकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.