Now Reading
कॉपीराईट्स – कल्पक आविष्कारांचं कायदेशीर संरक्षण

कॉपीराईट्स – कल्पक आविष्कारांचं कायदेशीर संरक्षण

Menaka Prakashan

कलाकृतीनं जन्म घेतला, की तिचा कॉपीराईटही आपोआपच निर्माण होतो. पण तो कसा मिळवावा, कोणाला मिळतो, त्यावर इतर कोणी मालकी हक्क दाखवल्यास कायदा कसं संरक्षण देतो, कॉपीराईटचा विशिष्ट कालावधी असतो का असे प्रश्‍न तुमच्याही मनात पिंगा घालत असतील तर या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला कॉपीराईट कायद्याविषयी विस्तृत माहिती मिळेल…

पेटंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडत असतात, पण त्यांचा नेमका अर्थ काय, ते अनेकदा आपल्याला माहीत नसतं. या संकल्पना आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेल्या आहेत. त्यांना ‘बौद्धिक संपदा’ असं एकत्रित नाव आहे. संपदा म्हणजे संपत्ती, पण संपत्ती ‘बौद्धिक’ कशी असू शकते? कोणत्या संपदेला ‘बौद्धिक’ म्हणता येईल? या संपदेच्या धारणकर्त्याला काही फायदे आणि संरक्षण मिळतं का? आपण स्वत: एखादी बौद्धिक संपदा निर्माण करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ‘ग्रे मॅटर्स’ या लेखमालिकेतून मिळतील. बौद्धिक संपदांबद्दलची प्राथमिक माहिती, त्यांचे कायदे, फायदे आणि उदाहरणं देऊन हा विषय अधिकाधिक सोपा करून सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

मानवानं त्याच्या चौकस मेंदूचा यथायोग्य वापर करून नवनवीन संशोधनं केली आणि स्वत:चं दैनंदिन आयुष्य सुखकर केलं. या नावीन्यपूर्ण संशोधनांना ‘पेटंट’ नावाची बौद्धिक संपदा बहाल केली जाते, हे आपण आधीच्या लेखात पाहिलं आहे. त्याचबरोबर, आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करून ती ग्राहकांच्या मनात पक्की करणारी दुसरी बौद्धिक संपदा म्हणजे ‘व्यवसाय चिन्ह’, अर्थात ‘ट्रेडमार्क्स’. पेटंट्स आणि ट्रेडमार्क्स या दोन्ही बौद्धिक संपदा मानवाच्या तीक्ष्ण बुद्धीशी निगडित आहेत. पण मानवी मेंदू भावनाप्रधानही आहे आणि अतिशय निर्मितीक्षमदेखील. निसर्गातले रंग, आकार, संगीत त्याला आकर्षून घेतात. त्याला सभोवतीच्या गोष्टींमधलं सौंदर्य खुणावतं. आपल्या तैलबुद्धीच्या आधारे या सौंदर्याला तो शब्दांचं, रंगांचं, संगीताचं कोंदण देतो आणि निर्माण होतात कविता, कथा, चित्र, शिल्प… मनाला आनंद देणारे हे आविष्कार पेटंट्स आणि ट्रेडमार्क्सपेक्षाही वरचढ समजले जातात. कला ही मानवाची सर्वोच्च बौद्धिक संपदा आहे. या संपदेचं कायदेशीर रूप ‘कॉपीराईट्स’ या नावानं ओळखलं जातं.

कॉपीराईट अ‍ॅक्ट, १९५७
कॉपीराईट कायदा आणि न्यायालयानं वेळोवेळी दिलेले निकाल यांच्या आधारावर कॉपीराईट कशाला दिला जाऊ शकतो याची कल्पना येऊ शकते. त्यानुसार, खालील कलाकृतींना कॉपीराईटचं संरक्षण मिळतं-
१) स्वत: निर्माण केलेल्या साहित्यिक (लिटररी), रंगमंचीय (ड्रामाटिक), सांगीतिक (म्युझिकल) अथवा कलात्मक (आर्टिस्टिक) कलाकृती ( वर्क्स)
२) चलचित्र (सिनेमॅटोग्राफ फिल्म्स)
३) ध्वनिमुद्रणं (साऊंड रेकॉर्डिंग्स)
– ‘साहित्यिक कलाकृती’ या संज्ञेचा अर्थ विस्तृत आहे. कथा, कादंबर्‍या, कविता, नाटक हे तर त्यात अंतर्भूत आहेच, पण शब्दकोश, रेल्वेचं वेळापत्रक, प्रश्नपत्रिकांचे संच, प्रबंध यांवर सुद्धा कॉपीराईट मिळू शकतो!
– संगीतामध्ये विशिष्ट वाद्यमेळ एकत्र वाजवून एक धून तयार होते. त्याच्यावर अर्थातच संगीतकाराचा हक्क असतो. याच संगीतावर शब्द लिहिले, की गीत तयार होतं, ज्याच्या संगीतावर संगीतकाराचा आणि शब्दांवर कवीचा हक्क असतो. ‘रिमिक्स’ किंवा ‘कव्हर’ हा एक संगीताचा प्रकार सध्या प्रचलित आहे. यामध्ये मूळ गाण्याचा काही भाग तसाच ठेवून त्यावर आधारित नवीन शब्द, नवे आवाज, नवी वाद्य असं काहीतरी ‘नवीन’ केलं जातं. मूळ गाण्याच्या निर्माणकर्त्याची परवानगी घेऊन केलं असेल, तर या नवीन ‘गाण्या’लाही कॉपीराईट मिळू शकतो.
– चलचित्र, म्हणजे प्रचलित भाषेत ‘सिनेमा.’ एका सिनेमात अनेक कलाकृतींचा समावेश असतो. कथा, गाणी, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, दिग्दर्शन, अभिनय, संकलन इत्यादी घटक एकत्र येतात तेव्हा एक एकसंध कलाकृती निर्माण होते. त्यामुळे सिनेमाच्या काही घटकांना स्वतंत्रपणे आणि संपूर्ण सिनेमाला स्वत:चा कॉपीराईट मिळू शकतो.

– कलात्मक कृतींमध्ये सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांतल्या चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, स्थापत्यकला यांचा समावेश आहेच, शिवाय नकाशे, तक्ते हेही कॉपीराईटसाठी पात्र आहेत. छायाचित्रांनाही कॉपीराईट मिळतो.

काही उदाहरणांसहित वरचा मुद्दा स्पष्ट करून बघूया…
– अभ्यासाच्या एका विषयावर अनेक लेखकांनी पुस्तकं लिहिलेली असतात. विषय एकच असतो, पण प्रत्येक लेखकाची शैली, मांडणी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक पुस्तक निराळं होतं, अर्थात प्रत्येक पुस्तक ही एक स्वतंत्र ‘साहित्यकृती’ असते.
– ‘प्रेम’, ‘चंद्र’, ‘पाऊस’ या विषयांवर अगणित कथा, कविता, चित्रपट निर्माण झालेले आहेत. संकल्पना एकच असते, पण तिचा आविष्कार प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणून प्रत्येकाला त्याच्या लेखनासाठी स्वत:चा कॉपीराईट मिळतो.
– एखादा सुंदर धबधबा आहे, त्याचं छायाचित्र पन्नास वेगवेगळ्या छायाचित्रकारांनी काढलं. कोणतं उपकरण वापरलं आहे, कोणती वेळ निवडली आहे, कोणता कोन साधला आहे आणि छायाचित्रकाराचं कौशल्य हे सगळं एकत्र येऊन त्या धबधब्याचं छायाचित्र निर्माण होईल. शेजारीशेजारी उभ्या असलेल्या दोन छायाचित्रकारांच्या छायाचित्रातही काही ना काही फरक असेलच. त्यामुळे धबधबा एकच असला, तरी प्रत्येक छायाचित्रकाराला त्याच्या छायाचित्राचा कॉपीराईट मिळतो.
थोडक्यात, स्वत:ची प्रतिभा वापरून निर्माण केलेल्या प्रत्येक कलाकृतीला या कायद्याखाली कॉपीराईट मिळतो आणि संरक्षणदेखील. ती कलाकृती समाजमान्य सौंदर्याच्या व्याख्येत बसायला हवी, असं कोणतंही बंधन कायदा घालत नाही. पण दोन अटी मात्र आहेत-
१) ही कलाकृती कागदावर, ध्वनिमुद्रणात अथवा चलचित्रात बंदिस्त केलेली असायला हवी. तुमच्या मनात उमललेल्या आणि मनातच राहिलेल्या एखाद्या कल्पनेला संरक्षण मिळू शकत नाही, तिला मूर्त स्वरूपात तुम्ही आणायला हवं.
२) ही कलाकृती तुम्ही स्वत: निर्माण केलेली असायला हवी. या अर्थानं ती अस्सल (ओरिजिनल) असायला हवी. एक लक्षात घ्यायला हवं- कायदा तुमच्या आविष्काराचं मूल्यमापन करत नाही, तुमचा स्वत:चा आविष्कार, तुमच्या कल्पनेचं मूर्त रूप फक्त त्याला पुरेसं आहे. पण ते तुमचं हवं.

कॉपीराईट म्हणजे काय?
कॉपीराईट म्हणजे कलाकृतीवरचा आणि तिच्या वापराचा हक्क. कॉपीराईटच्या मालकाला सर्वसाधारणपणे खालील हक्क मिळतात :
१) नकाराचा हक्क – परवानगीविना कोणी आपली कलाकृती परस्पर वापरत असेल, तर मालकाला त्याला थांबवण्याचा हक्क असतो.
२) वापराचा हक्क – आपली कलाकृती कशी वापरायची, कुठे वापरायची, कोणी वापरायची, कोणत्या स्वरूपात वापरायची, ती कोणाला विकायची, त्याबद्दल किती मानधन घ्यायचं- निर्णय घेण्याचे हे हक्क फक्त कलाकृतीच्या मालकाला असतात.
३) नैतिक अधिकार- जेव्हा जेव्हा, जिथं जिथं एखादी कलाकृती वापरली जाते, तेव्हा तेव्हा, तिथं तिथं तिच्या निर्माणकर्त्याला श्रेय मिळायला हवं. उदा. एक नाटककार एखाद्या कथेवर आधारित नाटक लिहितो. कथेचं रंगमंचीय रूपांतर करताना कथेच्या लेखकाची परवानगी घेणं, त्याला त्याचा योग्य मोबदला देणं आणि प्रत्येक वेळी जेव्हा नाटक सादर होईल तेव्हा मूळ लेखक म्हणून कथालेखकाला श्रेय देणं बंधनकारक असतं. मूळ लेखकाचा तो हक्क आहे.
४) ‘त्यागा’चा हक्क- ‘माझी कलाकृती कोणीही, कधीही, केव्हाही वापरू शकतो. माझ्या परवानगीची गरज नाही, मला मानधनही नको’- असा सर्व हक्क सोडून देण्याचा हक्कही अर्थातच तिच्या मालकाला मिळतो. सगळे हक्क सोडल्याचं एक घोषणापत्र तेवढं कॉपीराईट निबंधकाकडे द्यावं लागतं.
५) ‘नक्कले’वरचा हक्क- एखाद्या कलाकृतीची नक्कल करून तिच्या प्रती विकल्या जात असतील, तर या नकली मालावरही मूळ मालकाचाच हक्क असतो. तो नकली माल बाजारातून जप्त करणं, त्याची विल्हेवाट लावणं, इतकंच नाही तर नकली माल विकून जे पैसे मिळाले आहेत, त्यावरही मूळ मालकाचाच हक्क असतो.
६) ‘असाईनमेन्ट’चा हक्क- मूळ मालक उपरोल्लिखित सगळे किंवा निवडक हक्क एखाद्या व्यक्ती/संस्थेला हस्तांतरित करू शकतो. याला ‘असाईनमेन्ट’ असं म्हणतात. लिखित कराराद्वारे हे करता येतं. यामध्ये कलाकृतीचं नाव, तिच्यावरचे नेमके हक्क, किती काळासाठी हे हक्क दिलेले आहेत, मोबदला किती आहे इत्यादी बाबी लिहिणं आवश्यक असतं. पुढे जाऊन वाद/ गैरसमज होऊ नयेत म्हणून जितक्या विस्तारानं हे करार केले जातील, तितकं चांगलं. यानंतर ज्याच्या नावे हा करार केला त्या ‘असायनी’कडे कलाकृतीसंबंधी सगळे हक्क हस्तांतरित होतात. तोच मूळ मालक आहे असं समजलं जातं.
७) फौजदारी खटले – अस्सल कलाकृतीची नक्कल करून ती आपल्या नावावर खपवणं, त्यातून पैसे कमावणं ही गुन्हेगारी कृत्यं आहेत. अशा लोकांविरुद्ध मूळ मालक फौजदारी खटले दाखल करू शकतो. या चोरांना सहा महिने ते तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे.

कॉपीराईट कोणाला मिळतो?
१. साहित्यिक किंवा रंगमंचीय कलाकृतींचा कॉपीराईट त्यांच्या लेखकाला मिळतो.
२. संगीताचा कॉपीराईट त्याच्या संगीतकाराला मिळतो.
३. प्रत्येक कलात्मक आविष्काराचा कॉपीराईट त्याच्या निर्माणकर्त्याला मिळतो.
४. छायाचित्राचा कॉपीराईट छायाचित्रकाराला मिळतो.
५. चलचित्र आणि ध्वनिमुद्रणाचा कॉपीराईट त्या चलचित्राच्या / ध्वनिमुद्रणाच्या निर्मात्याला मिळतो.
६. वरीलपैकी कोणतीही कलाकृती संगणकाच्या साहाय्यानं केली, तर ही व्यवस्था जो करतो, त्याला त्याचा कॉपीराईट मिळतो.

कॉपीराईट कसा मिळतो?
एका बाबतीत ही बौद्धिक संपदा इतर संपदांपेक्षा वेगळी आहे. कलाकृती आणि तिच्यावरचा हक्क हे एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कलाकृतीनं जन्म घेतला, की तिचा कॉपीराईटही आपोआपच निर्माण होतो. कॉपीराईट कायदा हा कलात्मक आविष्कारांना संरक्षण देणारा कायदा आहे. त्यामुळे ज्यानं त्या आविष्कारासाठी मेहनत घेतली आहे, स्वत:ची बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती वापरली आहे, अर्थातच त्यालाच त्या कलाकृतीच्या वापराचे हक्क मिळणार आहेत. हे हक्क कोणीही डावलू शकत नाही; ते अंगभूतच असतात. म्हणजेच, कॉपीराईटची नोंदणी बंधनकारक नाहीये.
पण म्हणजे कॉपीराईट मिळवण्याची गरजच नसते असं नाही. भारतात कॉपीराईट निबंधकाचं मुख्य कार्यालय दिल्लीला आहे. अर्जाचं बरंचसं काम ऑनलाईन होतं. कायदेशीर प्रक्रियेनुसार अर्जाची छाननी आणि तपासणी झाली, की ‘कॉपीराईट रजिस्टर’मध्ये कलाकृतीचे तपशील आणि तिच्या मालकाची माहिती नोंदवली जाते. यानंतर कोणी मूळ कलाकृतीचा परवानगीविना बेकायदेशीर वापर केला, तर या नोंदणीचा उपयोग होतो. ही नोंदणी म्हणजे कलाकृतीवरच्या हक्काचा नि:संदिग्ध, स्पष्ट पुरावा असतो. त्यामुळे कॉपीराईट नोंदणी अनिवार्य नसली, तरी ती करावी असा सल्ला दिला जातो.

कॉपीराईटचा कालावधी
– या कायद्याअन्वये कॉपीराईटचं संरक्षण एका ठराविक काळासाठी मिळतं. यासाठी ‘प्रकाशना’ची तारीख महत्त्वाची असते. प्रकाशन म्हणजे ज्या दिवशी ती कलाकृती आस्वाद घेण्यासाठी लोकांना खुली झाली तो दिवस.
– ज्या साहित्यिक, रंगमंचीय, सांगीतिक, कलात्मक कृती, चलचित्र, ध्वनिमुद्रण, छायाचित्र ‘प्रकाशित’ झाल्या आहेत, त्याच्या निर्माणकर्त्याला तो हयात असेपर्यंत आणि त्याच्या मृत्यूनंतर साठ वर्षांपर्यंत कॉपीराईट कायद्याचं संरक्षण मिळतं.
– कधीकधी एखाद्या कलाकृतीच्या मूळ निर्मात्याचं नावच माहीत नसतं, किंवा त्याचं ‘टोपणनाव’ माहीत असतं, पण खरी ओळख ठाऊक नसते. अशा कलाकृतीला प्रकाशन झाल्यापासून साठ वर्षांपर्यंत कॉपीराईट कायद्याचं संरक्षण मिळतं.
– कधीकधी एखादी कलाकृती निर्मात्याच्या मृत्यूनंतरच प्रकाशित होते. अशा वेळी त्या कलाकृतीला मग प्रकाशनानंतर साठ वर्षांपर्यंत कायद्याचं संरक्षण मिळतं.

सारांश
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे म्हणून गेले आहेत- आयुष्यात मला भावलेलं एक गूज सांगतो- उपजीविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य यातल्या एका तरी कलेशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगेल.

खरोखर, कला ही मनुष्यप्राण्याला मिळालेली देणगी आहे. कविता, संगीत यांमुळे आपलं दैनंदिन आयुष्य सुखकर होतं, नाट्यकला, चित्रकला, शिल्पकला यांमुळे आपण समृद्ध होतो. या कलांचे निर्माते असामान्य असतात. त्यांना अफाट कल्पनाशक्तीची देणगी लाभलेली असते. त्यांच्या कलाकृतींमध्ये अनेकांना आनंद देण्याची ताकद असते. या निर्माणकर्त्यांना त्यांच्या कलाकृतींसाठी योग्य ते श्रेय द्यायलाच हवं आणि मोबदलादेखील. कॉपीराईट कायद्यामुळे हे साध्य होऊ शकतं.

पण, पैसा सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्‍या जगात कलेला नेहेमीच नमतं घ्यावं लागलेलं आहे. शिवाय, कल्पनेच्या बळावर संपूर्णपणे नवीन कलाकृती निर्माण करण्याइतकी प्रतिभा मोजक्याच लोकांकडे असते. त्यापेक्षा त्यांची प्रतिभा चोरून ती आपल्या नावानं खुशाल वापरणं कितीतरी सोपं! आजच्या डिजिटल युगात तर हे चौर्यकर्म अगदी सहज करता येतं. हे होऊ नये, यासाठी लोकशिक्षण अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा आपण जे करत आहोत, ते बेकायदेशीर आहे हेच लोकांना माहीत नसतं. कायदा कलाकारांच्या पाठीशी आहेच, पण प्रत्येक कलाकृतीचा सन्मान करणारा, तिच्या निर्मात्याला श्रेय आणि मोबदलाही देणारा समाज जेव्हा निर्माण होईल, तेव्हा आपण खर्‍या अर्थानं सुसंस्कृत होऊ!

– पूनम छत्रे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.