Now Reading
केल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान

केल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान

Menaka Prakashan

तर मी आणि प्रफुल्लाताईनं वैष्णवदेवी टूरसाठी होकार कळवून टाकला. प्रफुल्लाताई माझी मैत्रीण. तिचे व्याही कुठल्याशा संस्थेचे सदस्य होते. त्या संस्थेतर्फे ही टूर आयोजित करण्यात आली होती. त्यात अमृतसर, डलहौसी, धरमशाला वगैरे ठिकाणांचाही समावेश होता.

सगळे मुंबई सेंट्रलला भेटलो. सगळे मिळून एकोणचाळीस लोक होते आणि एक टूर ऑर्गनायझर जयंतशेठ. त्या एकोणचाळीस लोकांमध्ये बारा जणांचा एक मोठा ग्रुप होता. नरोत्तमभाई, त्यांची बायको, बायकोच्या चार बहिणी, त्यांचे पती आणि बायकोचा भाऊ व भावजय. तो ग्रुप सोडला तर बाकी सगळेच एकमेकांच्या चांगले परिचयाचे होते. त्यांपैकी बहुतेक जोडपीच होती. दोन-तीन कुटुंबं होती. त्यामुळे आमच्याकडे बघताना त्यांच्या नजरेत ‘कसं बाई यांना घरचे लोक सोडतात!’ पासून ते ‘घरच्यांना सोडून दोघीच बर्‍या आल्या’पर्यंत कुतूहल आणि चिमूटभर हेवासुद्धा!

प्रवासात थोड्या थोड्या ओळखी झाल्या. रात्रीची गाडी असल्यामुळे सुरवातीचा वेळ झोपेतच गेला. सकाळी उठल्यावर एकंदरीत सगळे आपल्या आपल्यातच होते. आम्ही दोघीही गप्पा मारत होतो.

इतर ठिकाणं करून कांगडाला पोचलो, तर संध्याकाळ उलटून काळोख पडायला सुरवात झाली होती. बस देवळापासून लांब उभी केली होती. जयंतशेठनं कसं जायचं ते सांगून एक-दीड तासात परत यायला सांगितलं.

तिकडची वज्रेश्‍वरी देवी ही माझ्या मुलीची सासरची कुलदेवता. त्यामुळे तिच्या वतीनं धर्मकार्य करण्यासाठी देणगी वगैरे देऊन आम्ही बाहेर पडलो.

आजूबाजूला तशी गर्दी होती, पण आमच्या ग्रुपमधलं कोणीच दिसेना.

मग रस्ता आठवत आठवत आम्ही चालायला सुरवात केली. एक गल्ली ओलांडून आलो आणि पाहिलं तर काय, सगळीकडे शुकशुकाट. सगळी दुकानं बंद. रस्त्यावर मंद उजेड पाडणारे दिवे.

तेवढ्यात बोलण्याचा आवाज आला. बघितलं तर आमच्या ग्रुपमधले दोघं. आम्हाला जरा धीर आला. त्यांनी आमच्याकडे बघून, ‘‘अरे, आप लोग हैं? चलो चलो’’ म्हटलं आणि झपाझप पावलं टाकत ते निघूनही गेले.

जरा पुढे आलो, तर रस्त्याला दोन फाटे. आता कुठच्या वाटेनं जायचं? दुकान बंद झाल्यावर सगळे रस्ते सारखेच दिसत होते. आजूबाजूला पाहिलं तर विचारायलाही कोणी माणूस नाही. मग त्यातल्या एका वाटेनं निघालो. पुढे एका बंद दुकानाच्या ओट्यावर तीन-चार माणसं बसली होती.

वज्रेश्‍वरीच्या या कांगडामध्ये तिचं अस्तित्व, तिची पाठराखण जाणवत होती. आमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही, अशा विश्‍वासानं भरलेल्या मनात भीतीला जागा नव्हती.

त्या माणसांना विचारायला गेलो, पण विचारणार काय? बस जिथं उभी केली होती, त्या जागेचं नावही आम्हाला ठाऊक नव्हतं. मग आम्ही त्यांना तसं सांगितलं. तर ते म्हणाले, ‘‘बसें तो वो रोडपेही खडी रहती है।’’ मग त्यांनी त्यांना आम्हाला कसं जायचं ते सांगितलं. त्यांचे आभार मानून आम्ही निघालो.

रस्ता कळला म्हटल्यावर इतर गोष्टी आठवायला लागल्या. आम्ही उशीर केला म्हणून इतर लोक वैतागले असतील आणि दोघी बायकाच, चुकल्या-बिकल्या म्हणून दोघं-तिघं वेगवेगळ्या दिशांना शोधायला तर गेले नसतील ना?

पोचलो तर काय? ‘‘ये दोखो, दोनों आ गयी’’ असं सांगितलं, ‘‘रस्ता कळेना.’’ तर मघाचे ते दोघं म्हणाले, ‘‘लेकिन, आप हमसे तो मिली थी ना? हमारे पीछे आना था।’’

अजून एक जोडपं यायचं बाकी होतं. मग सगळे वैतागत, त्यांची वाट बघत राहिले. शोधायला जायच्या भानगडीत कोणीही पडलं नाही.

शेवटी एकदाचे ते आले. बिचारे वाट चुकले होते, त्यामुळे खूप उलटसुलट फिरून दमूनभागून गेले होते. त्या मानानं आम्ही नीट आलो म्हणायचं. देवीची कृपा!

कतरामध्ये पोचल्यावर, रात्री जेवून रूममध्ये परतल्यावर थोड्या वेळानं आमच्या ग्रुपमधल्या एकानं आम्हाला परतीची हेलिकॉप्टरची तिकिटं आणून दिली.

‘‘आपको दोपहर पौनेबाराकी मिली है। सुबह जल्दी, मतबल साडेचार-पौनेपाच बजे यहाँसे निकलना होगा। तोही आप दर्शन करके हेलिकॉप्टर के टाईपमे पहुँच सकती हो।’’

बापरे! असं अवेळी आम्ही दोघींनीच जायचं? तेही या परक्या ठिकाणी?

‘‘उसमें क्या है? और कोई जानेवाला होगा तो पूछो.’’ अर्धेअधिक लोक झोपलेही असतील. या वेळी त्यांची दारं ठोठावायला कसं जायचं?

मग भल्या पहाटे, खरं तर मध्यरात्रीच, उठून अंघोळ वगैरे आटोपून आम्ही निघालो. अटेंडंट ओमनं ठरवलेल्या रिक्षावाल्यानं आम्हाला पायथ्याशी आणून सोडलं.

आम्हाला वाटेत अर्धकुमारीला जायचं होतं. त्यामुळे वर जाताना हेलिकॉप्टरनं न जाता आम्ही घोड्यावरून जायचं ठरवलं होतं.

घोडेवाले उभे होते, पण त्यांनी सांगितलं, ‘‘आज घोडेवाल्यांचा संप आहे.’’

तसंही आता एवढा चढ चढून जाण्याची सवय राहिली नव्हती. त्यात पुन्हा आमची वयं ज्येष्ठ नागरिकत्वाच्या उंबरठ्याच्या जवळच आलेली.

उद्या सकाळी परतीचा प्रवास सुरू. म्हणजे आज वर चढलो नाही, तर आयुष्यात संधी मिळेल की नाही, याचीही शाश्‍वती नव्हती.

घोडेवाल्यांपैकी दोघं कसेबसे तयार झाले. ‘‘आठ वाजता आमचा संप सुरू होतोय. तोपर्यंत काटता येईल तेवढं अंतर आम्ही नेतो. मग पुढचं काय ते तुम्ही बघा.’’

आम्ही ठरवलं- निदान तेवढं तरी जाऊया. पुढे काहीच सोय झाली नाही, तर चालत जायचं.
मग घोड्यावरून अर्धंअधिक अंतर काटलं. नंतर चालायला सुरवात केली.

मध्ये मध्ये थांबत, दम खात तासभर चढल्यावर अर्धकुमारीला जाणारा फाटा लागला. तिथून आतमध्ये बरंचसं अंतर चाला, परत मागे तेवढंच अंतर या, आणि नंतर पुन्हा वर चढा. ताकदीच्या दृष्टीनं आम्हाला झेपण्यासारखं नव्हतंच. शिवाय एवढं सगळं करून, वैष्णवदेवीचं दर्शन घेऊन हेलिकॉप्टरच्या वेळात पोचणं शक्यच नव्हतं. मग आम्ही अर्धकुमारीला तिथूनच प्रणाम केला आणि वैष्णवदेवीच्या वाटेला लागलो.

वर पोचलो, तर हीऽ भलीमोठी रांग. थोडा वेळ आम्ही रांगेत उभ्या राहिलो. आजूबाजूला चौकशी केली, वेळेचा अंदाज घेतला, तेव्हा पुन्हा तेच. पावणेबारापर्यंत हेलिपॅडला पोचणं अशक्य होतं. म्हणजे एक तर हेलिकॉप्टर प्रवासाची संधी हुकणार होती, जी म्हटलं तर ‘वन्स इन अ लाइफटाइम’ होती आणि त्याहून भयंकर म्हणजे तिथून कतरापर्यंत चालत जावं लागणार होतं. तेवढं त्राण आम्हा दोघींमध्येही नव्हतं.
मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं वैष्णवदेवीचा मोठा फोटो होता. देवीला नमस्कार केला. ‘आम्हाला पुन्हा आण गं,’ म्हणून विनवलं. खाल्लं आणि हेलिपॅडकडे निघालो.

नशीब! इथे घोडेवाले होते.
हेलिपॅड ऑफिसमध्ये तिकिटं दाखवल्यावर त्यांनी पास मागितले.
‘‘कसले पास?’’
‘‘तुम्ही दर्शन घेतल्यावर…’’

आमच्या डोळ्यांत पाणी आलं. आम्ही घोडेवाल्यांचा संप, पुढे आम्ही चालत, धापा टाकत काटलेलं अंतर, शेवटी हेलिकॉप्टर चुकू नये म्हणून देवीचं फोटोतच घेतलेलं दर्शन वगैरे सांगितलं.

See Also

तो माणूस एवढा चांगला होता, की त्यानं तिकिटांवरची वेळ बदलून पावणेतीन केली. ती आमच्याकडे परत देत म्हणाला, ‘‘आपण इतनी दूरसे आयी हैं। माँ का दर्शन किए बगैर हम आपको कैसे भेजेंगे? आप स्पेशल लाइन में खडी रहिए। पौनेतीन बजेतक आप आ सकती हो।’’

आता आनंदाश्रूंच्या धारांतून आम्ही त्याचे आभार मानले.
देवीचं यथासांग दर्शन घेऊन, तृप्त होऊन आम्ही हेलिपॅडकडे परत आलो. त्या माणसाचे आभार मानायला गेलो, तर तो भेटलाच नाही.

जाताना एवढा कष्टप्रद वाटलेला प्रवास! येताना हेलिकॉप्टरमधून चारच मिनिटांत तरंगत खाली आलो.

हॉटेलवर आल्यावर वेगळंच काय काय कळलं.
आम्ही खाली आल्यावर पाऊस सुरू झाला आणि हेलिकॉप्टरची सेवा बंद केली गेली. त्यामुळे सोईस्कर वेळेचं तिकीट काढलेल्या बर्‍याच लोकांना चालत खाली यावं लागलं.

आमच्यातल्या दुसर्‍या एका ग्रुपनं जाता-येताचं हेलिकॉप्टरचं बुकिंग केलं होतं. तिथपर्यंत गेल्यावर त्यांना कळलं की, आमच्या आयोजकानं त्याचं बुकिंग रद्द केलं होतं. चालत वर जाणं त्यांना शक्य नव्हतं. बिचार्‍या परतून हॉटेलवर येऊन बसल्या.

आम्हा दोघींना समाधान वाटलं, की पहाटे लवकर उठावं लागलं तरी पावसापूर्वी परत आलो आणि अवेळ असल्यामुळे आमची तिकिटंही कोणी रद्द केली नव्हती. शिवाय दर्शनही व्यवस्थित झालं. देवीची कृपा!

येताना पुन्हा दोन दिवसांच्या ट्रेनचा प्रवास. एव्हाना आमच्या बरोबरची मंडळी कंटाळून गेली होती. एवढ्या तेवढ्या कारणावरून त्यांच्यात कडाक्याची भांडणं होत होती.

आम्ही दोघी मात्र अख्खा वेळ काही ना काही खेळत होतो. भेंड्या, फुली-गोळा, ठिपके जोडून चौकोन करण्यापासून ते लहानपणीचा सर्वांत आवडता खेळ नाव-गाव-फळ-फूल वगैरे. शिवाय गप्पा, गाणी ऐकत होतोच.

मग त्या इतरांना आमचाही हेवा वाटू लागला. ‘‘ये दोनों देखो, कितना एन्जॉय कर रही हैं। बिलकूल बोअर नहीं हुई।’’

घरी आले तेव्हा मनात होतं, सर्व पाहून आल्याचं समाधान. हेलिकॉप्टर प्रवासाचं अक्रीत साध्य झाल्याची तृप्ती. पण सर्वांवर दाटलं होतं एक नकारात्मक सावट. आतापर्यंत सुरक्षित, संरक्षित वातावरणात जगलेल्या, वाढलेल्या आम्ही दोघी कशा एकट्या टाकल्या गेलो त्याचं. अख्खी ट्रीपच काळवंडून गेली त्यामुळे.

मग घरातून डोस. ‘‘असं कशाला एकटंच सुटायला पाहिजे? जमेल तेव्हा जाऊ की सगळे.’’ आले-गेलेही सल्ला देत होते. ‘‘असं अनोळखी माणसांबरोबर जाऊच नये कधी. ते व्याहीच होते ना दोघांमधला दुवा? मग तुम्हीही रद्द करायला हवं होतं तुमचं जाणं.’’

मग बचू आली भेटायला. ‘‘अगं आई, तू असा नकारात्मक विचार का करतेयस? उलट तुम्ही दोघीच गेला असूनही तुमची ट्रीप छानच झाली की. त्या लोकांनी हात पाठीमागे बांधले, तरी तुम्ही हिंमत नाही सोडलीत. उलट तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य ती पावलं टाकलीत आणि तुमची ट्रीप यशस्वी केलीत.’’

‘‘हो गं. हे लक्षातच आलं नाही माझ्या.’’
‘‘आणि आई, घोडेवाल्यांच्या संपाचं कळलं तरी तुम्ही पुढे गेलातच ना? तुमच्याबरोबर तुमचे तथाकथित प्रोटेक्टर्स असते ना तर त्यांनी, ‘आता कुठे जाता उगीच? झेपणार नाही तुम्हाला’ म्हणून तिथूनच परतायला लावलं असतं.’’

हे बाकी खरं होतं. आमच्यातल्या सुप्त शक्ती न ओळखता आम्ही उगीचच नकारात्मक विचार करत होतो.
थोडक्यात, या पर्यटनामुळे मला इतरांचीच नव्हे, तर स्वतःचीही ओळख पटली.

गौरी गाडेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.