Now Reading
कुटुंब रंगलंय तयारीत…

कुटुंब रंगलंय तयारीत…

Menaka Prakashan
View Gallery

आपल्याकडे लग्न हा ‘सोहळा’ असतो. साहजिकच त्यामध्ये अनेक गोष्टी, सोपस्कार येतात. परिणामी तयारीही कंबर मोडेपर्यंत आणि रात्रीचा दिवस करून करावी लागते. पण प्रत्येकानंच आपल्या घरातलं कार्य समजून लग्नघरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी लग्न हा आनंदाचा सोहळा होईल.

‘कन्या वरयते रूपम्् माता वित्तम् पिता श्रुतम् । बांधवाः कुलम् इच्छंति। मिष्टान्नम् इतरेजनाः।। ‘

तर या सुभाषितातल्या इतरेजनांना, जवळच्या मित्र-मैत्रिणींना, स्वकीयांना आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याचा सोहळा म्हणजे लग्न! भारतीयांचा लग्नसोहळा हा नाही म्हटलं तरी जगात औत्सुक्याचा विषय आहे. लग्नाची व्याख्या प्रत्येकासाठी ‘आमचं आपलं वेगळं आहे’, अशी असली, तरी लग्नाची तयारी जोरदार असते. म्हणूनच की काय, घाई-गडबडीनं एखादं काम सुरू असेल तर ‘लगीनघाई’ असा वाक्प्रचारच रूढ आहे. असो! तर मुद्दा जेव्हा लग्नाच्या तयारीचा असतो, तेव्हा आबाल-वृद्ध सगळ्यांना तयारीच्या मैदानात उतरावं लागतं हे मात्र नक्की!

तयारी प्रत्येकानेच करावी…
सगळ्यात आधी म्हणजे लग्नात आपण ‘वरा’कडून असो वा ‘वधू’च्या बाजूनं, कृतिशील होणं क्रमप्राप्त आहे. आपली भूमिका काय आहे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे असं की, आपल्याला काय जमू शकतं आणि आपण काय करणं अत्यावश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवं म्हणजे असं की, वधू माता-पिता आणि वर माता-पिता यांच्यावर पालक म्हणून सगळी जबाबदारी असते. पण यात भाराभर जबाबदाऱ्या उरकणं असं होऊ नये यासाठी एकेकावर एकेक जबाबदारी सोपवणं आणि त्यातली प्रगती, आवड आणि सर्वानुमते निवड असा फंडा थोडा सोयिस्कर ठरतो. तसं बघायला गेलं तर इव्हेन्ट मॅनेजमेंट करणारी अनेक आस्थापनं यात आहेत आणि ते आपल्याला सगळं काही करून देतात आणि आपण फक्त त्याला संमती देणं एवढा सोपस्कार असतो. पण आपल्या भारतीयांसाठी लग्न किंवा कोणताही सोहळा हा थोडा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यात आपण जातीनं लक्ष घालण्याची सहज स्वाभाविक, आपुलकीची मानसिकता दिसते.

कसे व्हाल सहभागी?
आता या तयारीकडे टप्प्याटप्प्यानं बघूया.

करवला आणि करवली : राइट हँड
सगळ्यात आधी करवली किंवा करवला यांची भूमिका लक्षात घेऊ. आता, वराच्या किंवा वधूच्या सतत बरोबर राहून, काय हवं-नको ते बघणारी समवयस्क व्यक्ती मोलाची ठरते. म्हणजे असं की, वर अथवा वधूच्या भाऊ, बहीण, मित्र-मैत्रिणी यांची जबाबदारी! एक तर वर किंवा वधू यांचे कपडे आणि दागिने यांचं व्यवस्थापन बघणं. त्यासाठी खरेदीपासून बरोबर असणं श्रेयस्कर. कोणते कपडे खुलतात, सध्या फॅशनच्या जगतात काय ‘इन’ आहे. काय सोयिस्कर आहे, काय रिवाजानुसार हवं याचा विचार या वेळी या ‘बंधु-भगिनी वर्गा’नं करावा. कपडे, त्यावर मॅचिंग दागिने या खरेदीत सहभाग महत्त्वाचा ठरतो. यानंतर त्यांचं व्यवस्थित पॅकिंग करून सगळ्या गोष्टी आठवणीनं ठेवणं ही जबाबदारी या मंडळींनी अवश्य घ्यावी. ऐन लग्नाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी हातात देणं, काम झाल्यावर कपडे व्यवस्थित आणि दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवणं. आपल्या गोटातल्या वर अथवा वधूला काय हवं नको ते सजग राहून बघणं. त्यांचा मेकअप ठीकठाक आहे ना, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना जास्तीत जास्त सहजता यावी, अडचण होणार नाही अशा पद्धतीनं बरोबर असणं अशी मोलाची भूमिका या मंडळींची असते. कोणी काही भेटवस्तू अथवा पाकीट दिलं तर ते त्यांच्या वतीनं नीट सांभाळून ठेवणं आणि नंतर सोहळ्यानंतर त्यांच्याकडे सुपूर्त करणं, अशा काही गोष्टी बघाव्यात. आता यात एक किंवा दोन जिवलगांची उपलब्धता आणि उत्सवमूर्तीची सोय बघून लक्ष घालू शकतात. टेक्नोसॅवी भाऊ अथवा मित्रांना फोटो, व्हीडिओ शूटिंगची जबाबदारी दिली तर ही मंडळी हौसेनं यात लक्ष घालतात. थोडक्यात, राईट हॅन्ड म्हणा ना!

समस्त स्त्री वर्ग…
घरातल्या आई, मावशी, आत्या, काकू, मामी, वहिनी, आजी यांची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण असते, म्हणजे आपल्या आयुष्यात प्रत्येक स्त्री व्यक्तिमत्त्वाची एक खासियत असते. खरेदी, रुखवत, देण्या-घेण्याच्या वस्तू, भेटवस्तू यात नावीन्य शोधण्यात या सगळ्याजणी तत्पर आणि एक्स्पर्ट असतात. कोणी खरेदी मास्टर, कोणी पॅकिंग मास्टर, कोणी प्रेझेंटेशनमध्ये कलात्मकता आणतात. कोणी विधी कसे करावेत, रीतिरिवाज यात माहीतगार असतात. मुद्दा असा की, या बाबतीत या सगळ्याचा समन्वय साधला गेला तर नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.

आपण लाडक्या मावशी आणि आत्याकडे रुखवताची व्यवस्था नक्कीच सोपवू शकतो. भेटवस्तू देण्या-घेण्याची व्यवस्था एखादीवर सोपवावी. लग्नाच्या आधी घरात होणारे जे विधी आहेत, त्या दिवशीची जेवण व्यवस्था, त्याची ऑर्डर, मेन्यू या सगळ्याची जबाबदारी एखादीवर द्यावी. लग्न सोहळ्यात रंग भरणारे विधी म्हणजे बांगड्या भरणे आणि मेंदी काढणे. या दोन्ही कार्यक्रमांची जबाबदारी धावपळ करू शकणाऱ्या वहिनीवर सोपवावी. ब्यूटिशियनची अपॉइंटमेंट, सगळ्यांचे मेकअप, साडी ड्रेपिंग यांची जबाबदारीही सगळ्या वहिन्यांकडे सोपवायला हरकत नाही. कारण त्या खूप छान पद्धतीनं ही सगळी कामं पेलतील आणि लग्न सोहळा देखणा बनवतील. हल्ली थीम करण्यावरही भर दिला जातो. नवनवीन कल्पना अमलात आणण्यात तरुणाई आघाडीवर असते. त्यामुळे हे काम तरुणाईवर सोडून द्यावं.

वराच्या किंवा वधूच्या आईने मात्र सगळ्यांकडे जबाबदाऱ्या वाटून द्याव्यात आणि सगळं व्यवस्थित पार पडतंय ना, याकडे लक्ष ठेवावं. म्हणजे धावपळ टाळता येते, होणारा त्रास वाचतो आणि लग्नाच्या आधी आणि नंतर तब्येतही चांगली राहते. आणि हो, या सगळ्यात महत्त्वाची असते ती रांगोळी. तिची जबाबदारी एखाद्या कलासक्त व्यक्तीकडे सोपवावी. रांगोळीतही बरंच वैविध्य जपता येईल. पाण्यातली रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, फुलांची रांगोळी, भाजी-डाळींची रांगोळी असे प्रकार आजमावून बघता येतील.

बरोबरीनं एखाद-दुसऱ्या भावाला कार्यालयाच्या सजावटीत सहभागी करून घेता येऊ शकतं. या दोघा-चौघांच्या परस्पर समन्वयातून सजावटीचा भाग सांभाळला जाऊ शकतो. यामध्ये घराच्या सजावटीची जबाबदारीही त्याच व्यक्तीकडे द्या. म्हणजे सजावट विभाग एक-दोन व्यक्ती छान सांभाळतील.

पुरुष मंडळी
घरातल्या स्त्रिया जर घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी पूर्ण पार पाडत असतील तर घरातल्या पुरुषांनी बाहेरची कामं पार पाडावीत. किंवा व्हाइस व्हर्सा… बाहेरचं महत्त्वाचं काम म्हणजे लग्न ठरल्यानंतर कोणतं कार्यालय निवडायचं आणि ते उपलब्ध आहे अथवा नाही हे पाहणं. त्यासाठी आवश्यक असणारी सारी धावपळ करणं. ॲडव्हान्स देणं वगैरे… त्यानंतरच महत्त्वाचं काम म्हणजे लग्नाचा मेन्यू, या बाबतीत मात्र सगळ्या आपल्या माणसांची मतं विचारात घ्यावीत, केटरर्सबरोबर बसून सध्या असलेली विविध पदार्थांची कॉम्बिनेशन्स समजून घ्यावीत. वर-वधूच्या आवडीचा एक तरी पदार्थ आवर्जून जेवणात असेल तर अशी व्यवस्था उपस्थितांमध्ये कौतुकाचा मुद्दा होतो. त्यासाठीचे सर्व सोपस्कार पार पाडण्याची जबाबदारी एखाद्या काकांकडे द्यावी.

स्थळ आणि मुहूर्त दोन्ही फायनल झालं की, मग पत्रिका छापण्याची, त्यावरचा मजकूर, त्या वाटण्याची व्यवस्था याशिवाय फोनवरून द्यायचं आमंत्रण हे काम दोन जबाबदार व्यक्तींवर सोपवलं तर भावी सासू-सासऱ्यांची चिंता बऱ्यापैकी कमी होईल. समोरच्या गटातल्या नातेवाइकांना काय आवडेल, कोणत्या विधीच्या वेळी काय दिलं तर शोभा वाढेल, याचा विचार करत समन्वय साधणारे काका, आत्या अथवा मावशी-मामा दोन्हीकडच्या नातेवाइकांना छान सांभाळू शकतात. एखाद्या ज्येष्ठ नातेवाइकांच्या मार्गदर्शनाखाली कोणते विधी करावेत, कसे करावेत, त्यासाठी करायची तयारी याविषयी आजोबांकडून माहिती करून घ्यावी आणि त्यादृष्टीनं केलेलं नियोजन उपयुक्त ठरेल. तसंच ज्येष्ठ नातेवाइकांच्या जोडीला बसून सर्व निमंत्रित नातेवाइकांची यादी बनवणं सोयीचं ठरू शकतं. तसंच, तरुण मंडळींच्या सोयीनं परिसर-स्नेही यांची यादी करून पत्रिकेची निवड हे नियोजन करता येऊ शकतं.

याशिवाय लग्नात अनेक छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपण गृहीत धरलेल्या नसतात. त्याचा बारकाईनं विचार करून ती जबाबदारी एखाद्या ‘नारायण’वर दिली तर उत्तमच. म्हणजे मुंडावळ्या, फुलं-पानं आणि इतर पूजा साहित्य, जास्तीची ताटं-वाट्या-भांडी किंवा पत्रावळ्या, तोरण, नारळ, ओटीच्या पिशव्या, वाती असं एक ना अनेक… जसं आठवेल तसं या यादीत ॲड करत गेलात आणि योग्य व्यक्तीच्या हाती ही यादी सुपूर्द केली तर ऐनवेळेस विसरण्याची शक्यता अनेक पटींनी कमी होईल.

एकत्रित तयारी
वाटून दिलेली कामं, जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या जात आहेत ना, कोणाला कोणती अडचण तर नाही ना किंवा कोणाची मदत हवी का, याची वेळोवेळी तपासणी गरजेची ठरेल. अर्थात हल्ली व्हॉट्सॲपवर ग्रुप केला की, हे काम आणखी सोपं होतं. तरी एकत्र येऊन आपला कार्यक्रम अधिक चांगला कसा होईल याची चर्चा होणं अधिक फायदेशीर ठरेल. नवीन कल्पना सुचतील, त्या अमलात आणता येतील.
थोड्या हौशी आणि जाणकार नातेवाइकांच्या मदतीनं दागिन्यांची तयारी करता येऊ शकते. याद्या तयार करणं, त्यामध्ये फेरफार करणं, छान-छान कल्पना सुचवणं, आलेल्यांचं स्वागत करणं, फोना-फोनी करणं असं जर सगळ्यांनी एकत्रित येऊन केलं तर कार्य सुरळीत आणि सुंदर पार पडेल यात शंकाच नाही.

…आणि वधू-वर
वधू-वर आपल्या कपड्या-दागिन्यांबरोबर छान दिसण्याची तयारी करणं ओघानं येतंच. त्याबरोबरीनं मानसिक तयारी ही मोलाची आहे, दुसऱ्या घरातल्या संस्कारात जाताना आपले संस्कार, समोरच्यांच्या विचारांचा आदर जपणं क्रमप्राप्त आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना थोडं उणं, थोडं अधिक, थोडं सोडून देणं याचा स्वीकार दोघांनाही करता यायला हवा. एकत्रित आयुष्य जगताना दोन वेगळ्या मानसिकता एकत्र येणं हा एक वेगळा प्रवास आहे. तो प्रवास आयुष्याचा एक पाठ आहे. आयुष्याची दिशा देणारा, परस्परांना सांभाळत पुढं जाण्याचा एक समृद्ध प्रवास असतो. या प्रवासात प्रत्येकाचा पाठ वेगळा असतो. प्रत्येकाचा धडा वेगळा असतो आणि प्रत्येकाची सांभाळून घेण्याची मानसिकता वेगळी असते.

अगदी नव्वदीच्या घरातल्या आजींनाही सगळं काही शिस्तीत, शास्त्रानुसार आणि आपल्या पद्धतीनुसार झालं हा एक दिलासा हवा असतो. ते सगळं पार पडलं की, याचसाठी केला होता अट्टहास असा काहीसा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलसत असतो.

या सगळ्यात कुटुंबातल्या मंडळींना स्वतःचं सगळं पटकन आणि देखणेपणाने आवरून इतरांच्या मदतीसाठी उपलब्ध असणं हे प्राधान्याचं आहे. मी माझे आवरू कधी आणि मदत कधी करू या सगळ्या घोळात न अडकता चुणचुणीतपणा आवश्यक आहे.

काही जण नोंदणी पद्धतीनं लग्नाचा पर्याय स्वीकारतात. या वेळी नोंदणी कचेरीत कधी जायचं, केव्हा अर्ज द्यायचा, कधी सह्या करायच्या याचं नियोजन आधीच करून ठेवणं सोयीचं ठरतं. साक्षीदार म्हणून सह्या, नातेवाईक किंवा स्नेही ठरवणं, तसंच त्यांची उपलब्धता असणं, हे आधीच बघून ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी परस्परांच्या कागदपत्रांची पूर्तता वेळेत करणं क्रमप्राप्त असतं.

लग्न हा कौटुंबिक सोहळा आहे. यात सगळ्यांना सहभागी करून घेतल्यानं एक आपलेपणाची भावना वृद्धिंगत होते. शिवाय ‘लग्न बघावं करून’, असं म्हणताना त्यात करावा तेवढा खर्च आणि भागवावी तेवढी हौस ही कमीच असते. शेवटी विवेक, भान हे प्रत्येकानं बाळगावं हा आपल्या संस्कारांचा पाठ आहे.

अक्षतांचा अपव्यय, सजावटीची फळं, भाज्या, उरणारं अन्न या सगळ्यांसाठी सेवाभावी संस्थांकडे संपर्क साधून गरजूंच्या मुखी जाऊ देणं अशा काही एका फोनवर अथवा क्लीकवर साध्य होणाऱ्या बाबींचा प्राधान्यानं विचार व्हायला हवा. घरातील तरुण मंडळी ही जबाबदारी घेऊ शकतात. थोडक्यात काय, तर पाया भक्कम ठेवत, सगळ्यांनी एकत्र येत सहकार्य आणि सहचर्याच्या या पाठाला हातभार लावला, तर ‘सदा मंगलम’चे स्वर आयुष्यभर निनादत राहतील, नाही का?
***

पल्लवी मुजुमदार
pallav.mujumdar@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.