Now Reading
काश्मिरी खाद्यसंस्कृती

काश्मिरी खाद्यसंस्कृती

Menaka Prakashan

प्रत्येक भारतीयाच्या ‘विश लिस्ट’मध्ये काश्मीर भेटीचा समावेश असतोच असतो. कारण पृथ्वीवरचा स्वर्ग आहे तरी कसा, याची अनेक वर्णनं ऐकलेली असतात, पण प्रत्यक्ष डोळ्यानं बघण्याचा आनंद निराळाच! निसर्गाचं मुक्तहस्त वरदान लाभलेला काश्मीर आहाराच्या बाबतीतही तेवढाच संपन्न आहे. केशर, सफरचंद, अक्रोड, बदाम हे प्रसिद्ध आहेच, शिवाय इथले पदार्थ आणि ते तयार करण्याची पद्धतीही खास आहे. कमळकाकडीचे चिप्स, मेथी चमन, काश्मिरी दम आलू ही नावं वाचताच तोंडाला पाणी सुटतं, याशिवाय इतरही काश्मीरची खासियत म्हणावी असे पदार्थ आणि त्यांच्या पाककृती वैशिष्ट्यपूर्ण अशाच आहेत.

भारतमातेच्या मुकुटाप्रमाणे शोभणारं, हिमालयाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेलं काश्मीर हे भारताचं नंदनवन समजलं जातं. काश्मीर हे भारतातलं एकच असं राज्य आहे ज्याचा पाच हजार वर्षांपासूनचा सलग इतिहास विविध ग्रंथांत उपलब्ध आहे. त्यात पंडित कल्हण यांचा राजतरंगिणी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की वेदातल्या सुरवातीच्या ऋचा काश्मीरमध्ये रचल्या गेल्या होत्या. योगाचार्य पतंजली काश्मीरमध्ये दुसर्‍या शतकात होऊन गेला. भारतीय नाट्यशास्त्राचा तसंच पंचतंत्राचा जन्मही काश्मीरमधलाच आहे. या प्रदेशाने वैदिक, बौद्ध आणि इस्लामी संस्कृती जोपासली.

हिमाच्छादित पहाड, पहाडातून खळखळ वाहणार्‍या झेलम, चिनाब, रावीसारख्या नद्या, निळं चमकदार पाणी असलेला दाल लेक आणि इतर सरोवरं, देवदार-चिनार-पाईनचे गगनचुंबी वृक्ष बघूनच जहांगीर बादशहा उद्गारला, पृथ्वीवर कोठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे.
या निसर्गरम्य परिसरात प्राचीन काळात वैष्णव देवी, महाकाली, अमरनाथ, शंकराचार्य अशी अनेक मंदिरं उभारली गेली. या मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी हजारो हिंदू भाविक दर वर्षी तिथं जातात. याशिवाय दल लेकमधल्या हाउसबोटीत वास्तव्य करणं, मुघल गार्डनची शोभा अनुभवणं आणि एकूणच काश्मीरच्या खोर्‍यातल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची तिथं गर्दी असते. त्यामुळे पर्यटन हा तिथला प्रमुख व्यवसाय आहे.
असं हे काश्मीर राजकारणाच्या शापामुळे वादग्रस्त बनलं, काश्मीरचे दोन तुकडे झाले- 1947 पासून काश्मीरचा पश्चिमेकडचा काही भाग पुढे पाकिस्तानला जोडला गेला. काश्मीर अतिरेकी हिंसक कारवायांमुळे अस्थिर होत गेलं आणि या प्रदेशात कायमच अशांतता धुमसत राहिली.

तरीही काश्मीरचं आकर्षण अजिबात कमी झालेलं नाही. पर्यटक आणि भाविक या नात्यानं लोकांची तिथं कायम गर्दी असते. काश्मीरच्या पश्मिना शाली, हातानं नाजूक भरतकाम केलेले कपडे, अक्रोडाच्या झाडाच्या लाकडाच्या वस्तू, कलाकुसर केलेले गालिचे यांना भरपूर मागणी असते. काश्मीरची सफरचंदं, केशर, अक्रोड, बदाम प्रसिद्ध आहेत. तिथल्या स्त्रिया वापरत असलेले पायघोळ झगे-फेरान आणि पुरुषांचा वैशिष्ट्यपूर्ण पोशाख घालून फोटो काढल्याशिवाय पर्यटक तिथून परतत नाहीत.
काश्मीर म्हटलं की आपल्याला आठवतात केशर, सफरचंदं आणि अक्रोड. याखेरीज चेरी, अलुबुखार, जर्दाळू यांचीही झाडं तिथं आहेत. तांदूळ हे तिथलं मुख्य पीक आणि त्यामुळे भात हे प्रमुख अन्न. काश्मीरची बहुसंख्य जनता मांसाहारी असली तरी त्याबरोबर भात हवाच. काश्मिरी पंडितांना मात्र कांदा-लसूणही वर्ज्य असतो. मुस्लिम लोक हिंगाचा वापर करत नाहीत. भाज्यांचा वापरही भरपूर असतो, त्यातसुद्धा तिथली खास भाजी म्हणजे कमळाचे देठ. आतल्या बाजूनं सच्छिद्र आणि कुरकुरीत असलेल्या या कमळाच्या देठांचे विविध पदार्थ बनवले जातात. बडिशोप, सुंठ, वेलची, लवंग, दालचिनी यांचा वापर मसाल्यात होतो. तिथली बडिशोप पावडर प्रसिद्ध आहे. काश्मिरी मिरच्यांचं तिखट रंगाला लालभडक तरीही सौम्य तिखट असतं. ग्रेव्हीसाठी विशेषतः दह्याचा वापर केला जातो. राजमा, दम आलू, काश्मिरी पुलाव, याखनी हे अन्नपदार्थ काश्मिरी खासियत सर्वत्र प्रसिद्ध आहेत. याशिवाय बेकरीच्या पदार्थांची तिथली परंपरा फार जुनी आहे. शिरमल, लवास, कुलचा आणि बाकरखानी असे पदार्थ बनवणार्‍या बेकर्‍या जम्मू-काश्मीरमध्ये जागोजागी आढळतात. तरीही गोड पदार्थ साधारणपणे कमीच. काश्मिरी कहावा किंवा नून टी मात्र प्रसिद्ध आहे. प्रक्रिया न केलेली चहाची पत्ती, बेकिंग सोडा घातल्यामुळे आलेला गुलाबी रंग, किंचित मिठाची चव आणि बदाम-पिस्त्याच्या सजावटीमुळे प्रसिद्ध असलेल्या काश्मिरी चहाची चव तिथं गेल्यावर चाखायलाच हवी.

एकंदरीतच काश्मिरी खाद्यसंस्कृती शेकडो वर्षांपासून बदलत गेली आहे. तिच्यावर काश्मिरी पंडित, त्यानंतर अफगाण, पर्शिया, मध्य आशिया यांच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आढळून येतो. काश्मीरच्या अन्नपदार्थात मांसाहारावर भर जास्त असला तरीही निरामिष पदार्थही आपापलं वैशिष्ट्य राखून आहेत. आपण फक्त शाकाहारी पदार्थांचाच विचार करणार आहोत.

काश्मिरी कहावा
साहित्य ः चार टी स्पून काश्मिरी ग्रीन टी, चार चिमूट केशर, दोन वेलची (ठेचून), पाव कप बदामाचे काप, दोन दालचिनीच्या कांड्या, दोन लवंगा, दोन टी स्पून साखर किंवा मध
कृतीः तीन कप पाणी उकळत ठेवावं. उकळताना त्यात लवंग, दालचिनी आणि वेलची घालावी. दोन मिनिटं उकळल्यावर हे मिश्रण चहावर ओतावं आणि झाकून दहा मिनिटं मुरू द्यावं. दोन टी स्पून गरम पाण्यात केशर घालून कुस्करावं आणि चहा गाळून त्यात ते केशर घालावं, मध घालावा, बदामाचे काप घालून गरम चहा प्यायला द्यावा.
काश्मिरी नून चाय
साहित्यः दोन टी स्पून ग्रीन टी ची पानं, पाव टी स्पून बेकिंग सोडा, अर्धा टी स्पून मीठ, दोन वेलची ठेचून, दोन कप पाणी,
दोन कप दूध
कृतीः एक कप पाणी उकळून त्यात चहाची पानं घालून झाकून ठेवावं. मग त्यात सोडा घालून फेसाळ होईपर्यंत फेसावं. मग उरलेलं पाणी, वेलची घालून उकळावं. दूध घालून गुलाबी रंग येईपर्यंत फेसावं. मीठ घालून चहा प्यायला द्यावा. हवं असेल तर त्यात बदाम-पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्या मिसळाव्या.

काश्मिरी गरम मसाला
साहित्यः अर्धा कप बडिशोप, पाव कप शहाजिरे, पाव कप काळी मिरी, दोन टे.स्पून हिरव्या वेलचीतले दाणे, दोन दालचिनीच्या कांड्या, दोन टी स्पून लवंगा, एक टे.स्पून जायपत्री, अर्धं जायफळ, एक टे.स्पून सुंठ पावडर, एक टी स्पून केशर
कृतीः केशर आणि सुंठ पावडर सोडून बाकीचे जिन्नस तव्यावर हलके भाजून घ्यावे. गार झाल्यावर त्यात केशर आणि सुंठ मिसळून एकत्र पावडर करावी.

काश्मिरी लोणचं
साहित्यः नवलकोल, कांदापात, गाजर, मुळा, कमळकाकडी, हिरव्या मिरच्या, कांदा, लसूण अशा भाज्यांचे बारीक तुकडे 1 किलो, दोन टी स्पून मोहरी, दोन टी स्पून बडिशोप, एक टी स्पून ओवा, एक टी स्पून मेथी दाणे, तीन टी स्पून काश्मिरी मिरच्यांचं तिखट, अर्धा कप मोहरीचं तेल, मीठ
कृतीः पाणी उकळून त्यात एक टी स्पून मीठ आणि भाज्या घालाव्या आणि दोन मिनिटं उकळाव्या. पाणी निथळून फडक्यावर टाकून कोरड्या कराव्या. मोहरी, बडिशोप, ओवा, मेथी एकत्र करून मिक्सरमध्ये भरड पावडर करावी आणि भाज्यांमध्ये मिसळावी, त्यात तिखट आणि तेल घालून कालवावं आणि लोणचं बरणीत भरून ठेवावं.

माणी (कैरीचं रायतं)
साहित्यः कैर्‍या उकडून काढलेला गर दोन कप, एक कप साखर, पुदिन्याची
10-15 पानं, एक टे.स्पून किसलेलं आलं, एक टी स्पून जिरे पावडर, अर्धा टी स्पून बडिशोप पावडर, एक टी स्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा (हवा असल्यास)
कृतीः सर्व जिन्नस एकत्र करावे. व्यवस्थित एकत्र करून जेवताना वाढावे.

कमळकाकडीची भाजी
साहित्यः 2-3 कमळकाकड्या, राजगिर्‍याची पालेभाजी-एक जुडी, अर्धा टी स्पून सुंठ पावडर, अर्धा टी स्पून बडिशोप पावडर, अर्धा टी स्पून जिरे पावडर, तीन मसाला वेलची, दोन लवंगा, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून काश्मिरी लाल तिखट, पाच-सहा लसूण पाकळ्या, अर्धा कप चिरलेला कांदा, तीन टे.स्पून मोहरीचं तेल, चवीनुसार मीठ
कृतीः पालेभाजी निवडून, धुवून चिरून घ्यावी. कमळकाकडीची सालं काढून काप करावे आणि स्वच्छ धुवावे. प्रेशर कुकरमध्ये एक टी स्पून तेल घालून त्यात कमळकाकडीचे काप घालून परतावे आणि एक कप पाणी घालून शिजवून घ्यावे. शिजले की बाहेर काढून घ्यावे. त्याच कुकरमध्ये उरलेलं तेल घालून त्यात लवंग, वेलची घालून परतावं, लसूण आणि कांदा परतावा. पालेभाजी घालावी, सुंठ पावडर, बडिशोप पावडर, हळद, जिरे पावडर आणि तिखट घालून परतून शिजवावी. मग त्यात पाण्यासकट कमळकाकडी आणि मीठ घालून पाच मिनिटं भाजी शिजवावी.

वांगी-सफरचंद भाजी
साहित्यः चारशे ग्रॅम लहान वांगी, दोन आंबटसर सफरचंदं, दोन टी स्पून बडिशोपेची भरड पूड, अर्धा टी स्पून सुंठ पावडर, एक टी स्पून काश्मिरी लाल तिखट, पाव टी स्पून हळद, तेल, पाच-सहा लवंगा, दोन वेलची, पाव टी स्पून हिंग, पाव कप बदामाचे काप आणि मूठभर चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृतीः कढईत अर्धा कप तेल गरम करून वांग्याचे चार तुकडे करून तळून घ्यावे व बाजूला ठेवावे. पाव कप तेल कढईत घेऊन त्यात लवंगा, वेलची आणि हिंग घालावा. पाव वाटी पाण्यात हळद, तिखट, मीठ, बडिशोप आणि सुंठ पावडर कालवावी. हे मिश्रण कढईत घालून परतावं. त्यात सफरचंदाचे काप घालून, परतून एक कप पाणी घालावं, वांगी घालावी. झाकण ठेवून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. बदामाचे काप आणि कोथिंबीर घालावी.

मेथी चमन
साहित्यः तीन कप मेथीची पानं, एक कप पालकाची पानं, एक टी स्पून जिरे,
एक कप बारीक चिरलेला कांदा, एक टी स्पून आलं-लसूण पेस्ट, चार हिरव्या मिरच्या, अर्धा कप दही, एक कप दूध, दोन टी स्पून धने पावडर, एक टी स्पून बडिशोप पावडर, अर्धा टी स्पून सुंठ पावडर, पाव टी स्पून हळद, अर्धा टी स्पून लाल तिखट, दोन कप पनीरचे क्युब्ज, अर्धा टी स्पून साखर, अर्धा टी स्पून काश्मिरी गरम मसाला,
चार टे.स्पून तेल, केशराच्या चार काड्या, चवीनुसार मीठ
कृतीः मेथी आणि पालकाची पानं उकळत्या पाण्यात दोन मिनिटं ठेवावी आणि गार झाल्यावर दोन मिरच्या
घालून वाटून घ्यावी. वाटताना दूध घालावं. एक टे. स्पून तेलावर पनीर परतून घ्यावं आणि काढून घ्यावं. उरलेलं तेल कढईत घालून त्यात जिरे घालून ते तडतडलं की कांदा घालून परतावा. आलं लसूण पेस्ट घालून परतावी. पाव वाटी पाण्यात हळद, तिखट, बडिशोप-धने पावडर आणि सुंठ पावडर मिसळून ते मिश्रण घालून परतावं, दही घालून परतावं. वाटलेली मेथी आणि पालक घालावा. मीठ, साखर घालावी. गरम मसाला घालून एक मिनिटात गॅस बंद करावा. वर केशराच्या काड्या आणि कोथिंबीर पेरावी.

काश्मिरी दम आलू
साहित्यः दहा-बारा लहान बटाटे, अर्धा टी स्पून जिरे, एक दालचिनीची कांडी, चार हिरवी वेलची, दोन-तीन लवंगा, चिमूटभर हिंग, एक कप दही, एक टी स्पून काश्मिरी मिरच्यांचं तिखट, एक टी स्पून सुंठ पावडर, दोन टी स्पून बडिशेप पावडर, पाव टी स्पून काश्मिरी गरम मसाला, पाव कप चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृतीः बटाटे सगळ्या बाजूनं काट्यानं टोचून पाण्यात अर्धवट उकडून घ्यावे. उकडताना थोडं मीठ घालावं. आणि तळून घ्यावे. कढईत दोन टे. स्पून तेल गरम करून त्यात जिरे, दालचिनी, वेलची, हिंग आणि लवंगा घालून परताव्या. गॅस बारीक करून तिखट घालावं. अर्ध कप पाणी दह्यात घालून घुसळावं आणि ते कढईत ओतावं. ढवळत राहावं. सुंठ, मीठ आणि बडिशोप पावडर घालून शिजवावं. मग त्यात तळलेले बटाटे घालावे, गरम मसाला घालावा आणि दोन-तीन मिनिटं शिजू द्यावे. नंतर कोथिंबीर घालावी.

काश्मिरी राजमा
साहित्यः एक कप काश्मिरी राजमा, एक कप चिरलेला कांदा, दीड कप चिरलेला टोमॅटो, अर्धा टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून शहाजिरे, एक दालचिनीची कांडी, दोन हिरवी वेलची, तीन लवंगा, एक मसाला वेलची, थोडीशी जायपत्री, पाव टी स्पून जायफळ पावडर, एक टी स्पून आलं-लसूण पेस्ट, अर्धा टी स्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टी स्पून धने पावडर, तीन टे.स्पून तूप, चवीपुरतं मीठ
कृतीः राजमा आठ ते दहा तास भिजत घालावा, दुप्पट पाणी आणि अर्धा टी स्पून मीठ घालून कुकरमध्ये मऊ उकडून घ्यावा.
चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सर्व खडा मसाला एकत्र करून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. कढईत तूप वितळवावं आणि ते गरम झालं की त्यात वाटलेली पेस्ट घालून परतावी. सतत ढवळत राहावं. आलं-लसूण पेस्ट घालून परतावं. तिखट, धने पावडर घालून परतावं. तूप सुटू लागलं की शिजलेला राजमा घालावा, मीठ घालावं, थोडंसं पाणी घालावं आणि उकळून एक-दोन मिनिटांत गॅस बंद करावा.

काश्मिरी पनीर
साहित्यः एक किलो पनीर, दोन टे.स्पून बडिशोप पावडर, एक टी स्पून हळद, एक टी स्पून सुंठ पावडऱ, एक टी स्पून जिरे पावडर, तीन मसाला वेलची, तीन हिरवी वेलची, अर्धा टी स्पून शहाजिरे, चिमूटभर हिंग, दोन तमालपत्र, एक कप दूध, चार टे.स्पून तेल, चवीनुसार मीठ
कृतीः गार पाण्यात हळद आणि थोडं मीठ घालून त्यात पनीरचे तुकडे घालावे आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे. बडिशोप, जिरे, सुंठ या पावडरी एकत्र कराव्या. तेल तापवून त्यात पनीरचे तुकडे परतावे आणि त्यावर मसाला पेरावा. पनीर ठेवलेलं पाणी त्यात घालावं. उरलेलं तेल तापवून त्यात तमालपत्र, वेलची आणि शहाजिरे घालावे त्यात पनीरचं मिश्रण घालावं. दूध घालावं आणि पाच मिनिटं शिजवावं.

लौकी याखनी
साहित्यः चारशे ग्रॅम दुधी, एक कप दही, दीड टी स्पून बडिशोप पावडर, दीड टी स्पून सुंठ पावडर, अर्धा टी स्पून गरम मसाला, चार-पाच लवंगा, दोन मसाला वेलची, एक टी स्पून जिरे, पाव टी स्पून हिंग, अर्धा टी स्पून हळद, एक टी स्पून लाल तिखट, एक टे.स्पून तेल, चवीनुसार मीठ
कृतीः दुधी सोलून मोठे तुकडे करावे आणि तेलात तळून घ्यावे. कढईत एक टे.स्पून तेल तापवून त्यात जिरे, हिंग, लवंग, वेलची घालून परतावं. अर्धा कप पाणी घालावं, बडिशोप, सुंठ पावडर, तिखट आणि मीठ घालावं. दही घुसळून घालावं, मसाला घालावा आणि त्यात दुधीचे तुकडे घालून दोन-तीन मिनिटं मिश्रण शिजवावं.

काश्मिरी पुलाव
साहित्यः एक कप बासमती तांदूळ, एक दालचिनीची कांडी, एक टी स्पून शहाजिरे, एक तमालपत्र, तीन-चार लवंगा, दोन मसाला वेलची, अर्धा टी स्पून सुंठ पावडर, एक टी स्पून बडिशोप पावडर, दोन चिमूट केशर, चार टे.स्पून तूप, एक कप कांद्याचे पातळ काप, दहा-बारा बदाम, मूठभर अक्रोड, दहा-बारा काजू, एक कप सफरचंदाचे काप, एक कप द्राक्षं, अर्धा कप डाळिंबाचे दाणे, अर्धा कप अननसाचे काप, चवीनुसार मीठ
कृतीः तांदूळ धुवून अर्धा तास भिजत घालावे आणि निथळावे. कढईत दोन टे.स्पून तूप गरम करावं. त्यात तमालपत्र, लवंगा, दालचिनी, मसाला वेलची आणि शहाजिरे घालून परतावं. मग त्यात सुंठ आणि बडिशोप घालावी. तांदूळ, केशर, मीठ आणि दोन कप पाणी घालून भात शिजवावा.
उरलेल्या तुपात कांदा परतावा. मीठ घालून लालसर होईपर्यंत परतावा आणि काढून घ्यावा. त्यातच काजू, बदाम, अक्रोड परतून घ्यावे. भात शिजून वाफ जिरली की भात काट्यानं मोकळा करावा आणि त्यात कांदा आणि बदाम, काजू, अक्रोड मिसळावे. वाढताना फळांचे काप मिसळावे.

कमळकाकडी चिप्स
साहित्यः कमळकाकडीचे दोन देठ, अर्धा टी स्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टी स्पून लसूण पावडर, अर्धा टी स्पून कांदा पावडर, एक कप दह्याचा चक्का, पाव कप क्रीम, दोन टी स्पून ठेचलेला लसूण, चवीनुसार मीठ
कृतीः कमळकाकडीच्या देठाचे लांबट पातळ तुकडे करावे. वीस मिनिटं पाण्यात घालून ठेवावे आणि निथळून टिश्यू पेपरवर कोरडे करावे. गरम तेलात हे चिप्स तळून घ्यावे. चक्क्यात मीठ, क्रीम, लसूण-कांदा पावडर, तिखट घालून कालवावे आणि त्यात बुडवून चिप्स खावे.

काश्मिरी शुफ्ता
साहित्यः तीन टे.स्पून तूप, अर्धा कप पनीरचे क्युब्ज, तीन टे.स्पून डेसिकेटेड कोकोनट, तीन टे.स्पून काजू, दोन टे.स्पून बेदाणे, पाव कप बदाम आणि अक्रोड, दहा खारका, अर्धा कप साखर, चिमूटभर केशर, एक टे.स्पून वेलची पावडर, तीन टे.स्पून दूध, दोन टे.स्पून गुलाबपाणी
कृतीः खारका गरम पाण्यात भिजवून काप करावे. तूप गरम करून त्यात पनीर परतून घ्यावं आणि काढून ठेवावं. नंतर त्यातच बदाम, अक्रोडाचे काप परतून बाजूला काढावे. खारकांचे तुकडे परतावे. मग खोबरं भाजून घ्यावं. साखरेत निम्मं पाणी घालून उकळत ठेवावं, वेलची, केशर आणि तूप घालावं, दूध घालावं आणि गुलाबपाणी घालून पाक पक्का होईपर्यंत उकळत ठेवावं. भाजून ठेवलेले सर्व जिन्नस घालून ढवळत राहावं. पाकाची साखर होऊन मिश्रण कोरडं व्हायला लागलं की गॅस बंद करावा.

बाकरखानी
बाकरखानी म्हणजे खुसखुशीत अशी बिस्किटासारखी रोटी. हल्ली ती पफ पेस्ट्रीपासून बनवतात पण पूर्वी भरपूर तूप किंवा यीस्ट घालून बनवत असत.
साहित्यः चार कप मैदा, पाव कप रवा, अर्धा कप तूप, एक टी स्पून मीठ, एक टी स्पून वेलची पावडर, एक अंडं, एक टे.स्पून खसखस किंवा तीळ, दोन टी स्पून यीस्ट पावडर, पीठ भिजवण्यासाठी दूध
कृतीः मैदा, रवा, तूप (पाव कप वगळून), मीठ, वेलची पावडर, खसखस, अंडं आणि यीस्ट एकत्र करावं. त्यात कोमट दूध घालत सैलसर पीठ भिजवावं. चांगलं मळून एक तास झाकून ठेवावं.
नंतर त्याचे दहा-बारा गोळे करावे. एक गोळा लाटून तूप लावून मधोमध घडी घालावी. पुन्हा तूप लावून घडी घालावी. आणखी एकदा तूप लावून घडी घालावी आणि मग त्याची गोल जाडसर पोळी लाटावी. त्यावर खसखस पेरावी आणि काट्यानं टोचे मारावे. दोनशे अंश से. तापमानावर ओव्हन तापवून या पोळ्या दहा-बारा मिनिटं भाजाव्या. भाजल्यावर परत तूप लावावं.

शिरमल
साहित्यः तीन कप मैदा किंवा कणीक, सव्वा कप दूध, एक टी स्पून साखर, पाऊण कप तूप, पाव टी स्पून मीठ, चिमूटभर केशर
कृतीः दोन टे.स्पून दूध गरम करून त्यात केशर घालून ठेवावं. मैदा, मीठ, साखर आणि वितळलेलं तूप एकत्र करावं. त्यात दूध घालून मऊसर पिठाचा गोळा तयार करावा आणि झाकून दोन तास ठेवावा. नंतर परत मळून दोन तास झाकून ठेवावा. जाडसर पोळ्या लाटून तव्यावर भाजाव्या. ब्रशनं दूध लावून परत भाजाव्या.

गर्डा ( ब्रेकफास्ट बन )
साहित्यः दोन कप मैदा, एक टी स्पून साखर, एक टी स्पून यीस्ट पावडर, पाव टी स्पून मीठ, अर्धा टी स्पून बेकिंग सोडा, दोन टे.स्पून तूप, एक टे.स्पून दही, अर्धा कप कोमट पाणी, एक टे.स्पून खसखस
कृतीः कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट मिसळून दहा मिनिटं झाकून ठेवावं. मैदा, मीठ, सोडा एकत्र करावा. तूप आणि दही मिसळावं. फुगलेलं यीस्ट आणि लागेल तसं पाणी घालून सैलसर पीठ भिजवावं आणि दोन तास झाकून ठेवावं. पीठ दुप्पट झाल्यावर पाच-दहा मिनिटं मळावं, त्याचे चार-पाच गोळे करावे. प्रत्येक गोळ्याची जाडसर पोळी लाटावी. पोळीवर बोटानं खळगे करावे, पोळीला कडा करावी. पोळीला ब्रशनं दूध लावावं, त्यावर खसखस पेरावी आणि या पोळ्या तव्यावर कडा वर येतील अशा ठेवून एक बाजू भाजावी. त्यानंतर ओव्हनमध्ये ब्रॉईल वर 1-2 मिनिटं भाजाव्या.

काश्मिरी तोशा
साहित्यः सव्वा कप मैदा (किंवा कणीक), चिमूटभर मीठ, एक कप तूप, एक टे.स्पून खसखस, अर्धा कप खोबर्‍याचे बारीक तुकडे, काजू-बदामाचा चुरा आणि बेदाणे, अर्धा कप पिठीसाखर, चिमूटभर केशर
कृतीः मैद्यात मीठ, एक टे.स्पून तूप, केशर आणि लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवावं आणि झाकून अर्धा तास ठेवावं. त्याची एक मोठी जाड पोळी लाटून ती तव्यावर खमंग भाजावी. कोमट असतानाच तिचा चुरा करावा. या चुर्‍यात तूप, सुक्या मेव्याचा चुरा, भाजलेली खसखस घालून कुस्करावं आणि त्याचे लांबट गोळे करावे.

केशर फिरनी
साहित्यः तीन टे.स्पून बासमती तांदूळ, अर्धा कप साखर, एक लिटर दूध, अर्धा टी स्पून वेलची पावडर, चिमूटभर केशर, एक टे.स्पून तूप, सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप
कृतीः तांदूळ धुवून तासभर भिजत घालावे आणि नंतर निथळून बारीक वाटून घ्यावे. कढईत तूप घालून त्यावर दूध ओतावं आणि उकळत ठेवावं. त्यात केशर घालावं. वाटलेले तांदूळ घालून ढवळत रहावं. दूध आटून तांदूळ शिजले आणि मिश्रण घट्ट होऊ लागलं की साखर घालावी. वेलची घालावी. मिश्रण कस्टर्ड सारखं घट्ट झालं की लहान सटात ओतावं, बदाम पिस्त्यांचे काप वर घालून फिरनी थंड करावी.

– वसुंधरा पर्वते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.