Now Reading
काळू

काळू

Menaka Prakashan

काळूला आय नाय, बाप नाय अन् आता तर आजीबी नाय. त्याला जीव लावलाय तो एका कुत्र्यानी. आजूबाजूच्या लोकांनी तर त्याचं जगणंच अवघड केलंय. काळूला कशासाठी जगावं असा प्रश्न पडलाय. त्याला कोणी मदत करेल का, आधार देईल का, काय होईल काळूचं की कुत्राच त्याच्या जिवावर उठेल, तुम्हालाही असेच प्रश्न पडताहेत का, तर वाचा ही कथा…

‘काळू’चं खरं नाव पांडुरंग. तो रंगानं काळा म्हणून सर्वजण त्याला ‘काळ्या’ म्हणूनच चिडवायचे. आईविना पोर. बाप चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेला. त्यामुळे त्याचा सांभाळ त्याची आजीच करायची. ती होती तोपर्यंत काळू सुरळीत आयुष्य जगत होता.
काळूची आजी पांडुरंगाची (विठ्ठलाची) भक्त होती. वारीला न चुकता जायची. तिच्यामुळंच ह्या पांडुरंगाला त्या पांडुरंगाची गोडी लागली होती. त्याच्याही मनात ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर नेहमी चालू असे.
काळूला गोष्टी ऐकायला आवडतात म्हणून त्याची आजी नेहमी त्याला पुराणकथा सांगत असे. त्या गोष्टींतून होणारे संस्कार हळूहळू त्याच्या कोवळ्या मनात झिरपत होते.

आजी गेल्यापासून मात्र त्याचे हाल चालू झाले. कोणीच नातेवाईक, शेजारीपाजारी त्याच्या मदतीला धावून आले नाहीत.
सहावी-सातवीतला काळू चांगला हुशार असूनही त्याला शाळा सोडावी लागली. ही सल त्याच्या मनात खूप खोलवर रुतली होती.
तो नाइलाजानं फुटपाथवरच राहून बूट-पॉलीशचं काम प्रामाणिकपणे करू लागला. जेवढे पैसे मिळतील त्यात तो काही-बाही आणून खात होता. त्याचे वडील चोर असल्यामुळे आजूबाजूचे लोक त्यालाही चोरच समजत होते. त्याची चूक नसतानाही त्याच्यावर संशय घेत होते. सततच्या ह्या अपमानाला काळू कंटाळला होता.
एके दिवशी त्याला आजीची खूप आठवण येत होती. त्याचे डोळे भरून आले होते. रडून रडून तो झोपी जाणार इतक्यात तिथं एक काळं कुत्रं आलं. ते जोरजोरात काळूवर भुंकू लागलं. ते काही काळूला इथं थांबू देणार नव्हतं.

काळू वैतागून ओरडला, ‘‘ए हाड, हाड!’’ तरीही ते कुत्रं जोरजोरात भुंकतच होतं. त्यानं एक दगड उचलून जोरात त्या कुत्र्यावर भिरकावला व म्हणाला, ‘‘हाडऽऽऽऽ,च्यायला! मला हाकलतोस व्हय इथून? इथे सगळे मला हाड-हूड करत्यात अन् तू बी सुखानं जगू देईना! हाडऽऽ हाडऽऽऽ.. काळ्याऽऽ!’’
काळ्या त्याच्याही नकळत त्या कुत्र्याला ‘काळ्या’ म्हणून गेला.
त्या कुत्र्यामध्ये न् काळूमध्ये आता रोजच भांडणं होऊ लागली. त्यादिवशी पुन्हा ते कुत्रं अंगावर धावून आल्यावर काळू ओरडला, ‘‘ए काळ्या, जातोस का इथून?’’
तेवढ्यात तिथं एक म्हातारा माणूस आला व म्हणाला, ‘‘अरं अरं, कशाला उगा भांडता रे? हे घ्या, देवाचा प्रसाद हाय! दोघांनी खाऊन घ्या. भांडू नगा रे.’’ त्यांनी दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला व ते निघून गेले. पांढरा सदरा, पांढरं धोतर व टोपी घातलेला तो माणूस आला तसा निघूनही गेला.
दोघांनाही खूप भूक लागली होती. प्रसाद तोंडात कोंबून दोघंही कधी झोपी गेले त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच पाऊस लागून राहिला होता. पावसानं अक्षरशः सर्वांना झोडपून काढलं होतं. त्यामुळे दिवसभरात एकही गिर्‍हाईक काळूकडं आलं नव्हतं.

पावसात भिजल्यामुळे काळू तापानं फणफणत होता. त्याला खूप भूक लागली होती. पण हातात पैसेच नसल्यामुळे त्याला उपाशीच रहावं लागणार होतं. कसंबसं फुटपाथवरच्या टपरीजवळ तो कुडकुडत बसला होता.
नेहमीप्रमाणे ते कुत्रं आलं न् काळू वर जोरजोरात भुंकू लागलं. पण आज त्याला काळूकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. ना काळू दगड भिरकवत होता ना ‘हाड काळ्या’ म्हणून ओरडत होता. हळूहळू ते कुत्रं भुंकायचं बंद झालं, व कितीतरी वेळ ते काळूकडे पाहत राहिलं.
नंतर ते कुत्रं निघून गेलं व काही वेळानं परत आलं. या वेळी त्याच्या तोंडात पोळीचा तुकडा होता. ते कुत्रं काळू जवळ गेलं व त्याच्या समोर पोळी ठेवली न् त्याला प्रेमानं चाटू लागलं. मुक्या प्राण्यानं आज माणुसकी दाखवली होती.

काळूला खूप गहिवरून आलं. त्यानं पोळी खाल्ली व तो कुत्र्याला गोंजारू लागला. प्रेमळ स्पर्शानं ते कुत्रही आनंदानं शेपटी हलवू लागलं. आज दोघांमध्ये अनपेक्षितपणे मैत्री निर्माण झाली होती. आता ‘काळ्या’मुळेच काळूला जगायचा हुरूप आला होता.
नेहमीप्रमाणे त्यादिवशी काळू बूटपॉलीशचं काम करत होता. काम झाल्यावर काळूनं त्या गिर्‍हाइकाकडे पैसे मागितले. पण तो माणूस म्हणाला, ‘‘अरे, मी तुझे पैसे दिले की.’’
‘‘कवा?’’ काळूनं विचारलं.
‘‘अरे आत्ताच दिले की. मी काय दोन-दोनदा पैसे देऊ का तुला?’’
‘‘तुम्ही माझे पैसे दिले नाय. उगा खोटं बोलू नका.’’ काळू ओरडून म्हणाला. तसा तो माणूसही भांडू लागला. त्यानं आजूबाजूचे लोक गोळा केले व म्हणाला, ‘‘बघा, चोराचा पोरगा तो चोरच. त्याचे पैसे मी दिले, तरी नाही दिले म्हणतोय. मारा ह्याला!’’
तसे सर्वजण त्याला मारू लागले. एकजण म्हणाला, ‘‘हा पण ह्याच्या बापासारखा चोरच होणार. ह्याला असाच सोडला तर उद्या अजून कट्टर चोर होईल. असली घाण आपल्या समाजात नको.’’
सर्वांनी त्याला बेदम मारलं.
तेवढ्यात ते काळं कुत्रं धावत आलं व जोरजोरात भुंकू लागलं. ते काळूला त्यांच्या तावडीतून सोडवू पाहत होतं. एक-दोन जणांना तर त्यानं चावेसुद्धा घेतले.
तितक्यात तिथं त्या दिवशीचा म्हातारा माणूस आला. त्यानं काळूला जमावापासून सोडवलं.

काळूचा चेहरा चांगलाच सुजला होता. तो हुंदका देत रडू लागला. त्या माणसानं दिलेलं पाणी पिऊन तो जरा शांत झाला. त्याच्या मायेनं काळूला भरून आलं. काळूनं स्वतःच्या मनातली खदखद बोलून दाखवली, ‘‘माझा बा चोर म्हणून मला बी चोर ठरवत्यात. काळा रंग म्हणून काळू, काळ्या म्हणून हिणवत्यात. नुसती हिडीस-फिडीस न् अपमान! आय नाय, बाप नाय अन् आता तर आजीबी नाय. मला जीव लावला तो ह्या कुत्र्यानी. तरीबी इमानदारीनं जगावं म्हणून धडपडतोय… अन् ही लोकं मला चोर बनवाया निघालीत. आता दावतोच इंगा. न्हाय मोठा दरोडेखोर होऊन सळो की पळो करून सोडलं ह्यांना तर बघाच!’’
काळू असं म्हणताच तो म्हातारा माणूस खळखळून हसू लागला.
‘‘अरं येडा का खुळा तू? ती लोकं ठरवणार व्हय तू कोण होणार ते? तुला चांगला माणूस व्हयचंय नव्हं? मग हो की! ती लोकं कोण तुझं नशीब ठरवणारे? असं सोताचं नशीब इतरांच्या हातात देतात व्हयं?’’
‘‘मग काय करू म्हातारबा? रोजचाच अपमान, रोजचाच तमाशा! शांतपणे कोणी जगू देई ना! असलं दरिद्री नशीब आलंय वाट्याला की सर्वांवरच सूड उगवावासा वाटतोय.’’ काळू रागानं म्हणाला.

‘‘अरं लेकरा, अरं हा समाज हाय. त्रास होणारच. पण म्हणून आपला लगाम असल्या लोकांच्या हाती द्यायला निघालास? काळ्या म्हणून समदे चिडवत्यात म्हणतोस? मग तू तरी त्या कुत्र्याला दुसरं काय म्हणतोस रे? काळ्याच नव्हं? अरं… ह्या लोकांनी आपल्या विठ्ठल माउलीलादेखील ‘काळ्या’ म्हणायला कमी केलं न्हाय. हा त्ये प्रेमाने म्हणतात ही गोष्ट येगळी! तिथं तुझी माझी काय कथा रं?’’ म्हातारबा त्याला समजावत म्हणाले.
‘‘म्हातारबा, लई झाक बोलता बगा तुम्ही! आजून ऐकत रहावं वाटतं तुम्हाला!’’
‘‘असं म्हणतोस? मग ऐक! आज मी तुला कृष्ण आणि कर्णाची गोष्ट सांगतो. माहिती हाय नव्हं कृष्ण कोण हाय ते?’’
‘‘व्हयं! माहिती हाय! माझी आजी मला नेहमी कृष्णाच्या गोष्टी सांगायची. अन् तो कर्णदेखील मला खूप आवडतो. विशेषतः त्याची कवचकुंडलं!’’
‘‘अस्सं व्हय? छान! मग आज मी तुला त्या दोघांमधला एक महत्त्वाचा संवाद सांगतो. नीट ऐक. महाभारतात कर्ण कृष्णाला आपल्या दुःखांचा पाढा वाचून दाखवताना म्हणतो, कृष्णा, जन्मतःच माझ्या आईनं मला सोडलं. मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आलं नाही. मी परशुरामांकडून जी विद्या शिकलो; तीच विसरण्याचा शाप मला त्यांच्याकडूनच मिळाला. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये मला अपमानित करण्यात आलं. अशा कितीतरी गोष्टी माझ्या आयुष्यात मला भोगाव्या लागल्या; ज्यात माझा काहीच दोष नव्हता.

माझ्या वाट्याला सतत अवहेलनाच आली. माझ्या या प्रवासात मला फक्त दुर्योधनाचीच साथ मिळाली. तुमच्या दृष्टीनं जरी तो चुकीचा असला; तरी मी त्याची बाजू घेऊन लढलो, तर यात माझं काय चुकलं?
ह्यावर कृष्णानं काय उत्तर दिलं ते बघ. कृष्ण म्हणाला, कर्णा, माझा जन्म तुरुंगात झाला. माझ्या जन्माच्या आधीच मृत्यू माझी वाट पाहत होता. माझा जन्म होताच मला माझ्या पालकांपासून दूर करण्यात आलं. तू लहानपणापासूनच तलवारी, घोडे, धनुष्य-बाण यांचे आवाज ऐकत आलास. मला मात्र गोठ्यात जगावं लागलं. माझ्यावर नेहमी जीवघेणे हल्ले होत राहिले. ना कुठलं सैन्य ना विद्या. मला लोक त्यांच्या संकटांना जबाबदार धरत होते.
जेव्हा तुम्ही तुमच्या गुरूंकडून तुमच्या कर्तृत्वासाठी प्रशंसा ऐकत होतात, तेव्हा तर मला विद्यादेखील प्राप्त झाली नव्हती. मी वयाच्या सोळाव्या वर्षी ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षणासाठी गेलो.

मला जरसंधापासून माझ्या कुळाला वाचवण्यासाठी यमुना काठावरून दूर जावं लागलं, तेव्हा सर्वांनी मला पळपुटा म्हणून हिणवलं. जर दुर्योधनानं युद्ध जिंकलं तर त्याचे श्रेय तुला मिळेल. परंतु जर धर्मराजानं हे युद्ध जिंकलं तर सर्वजण या युद्धाचं खापर माझ्यावर फोडतील.
एक गोष्ट लक्षात ठेव कर्णा, आयुष्यात संकटं सर्वांवरच येत असतात, परंतु आपला धर्म कधीच सोडायचा नसतो.’’
म्हातारबा पुढं म्हणाले, ‘‘बरं का काळू, तुझा धर्म प्रामाणिकपणे जगण्याचा आहे; तो कधीही सोडू नकोस. आयुष्य सतत आपली परीक्षा पाहत असतं. निसरड्या वाटेवरून चालायला लावत असतं. पण तेव्हाच आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून तोल सांभाळायचा असतो.
आयुष्यात अन्याय सर्वांवरच होत असतात. म्हणून त्याचा राग देवावर किंवा समाजावर काढायचा नसतो. आता तूच ठरव की प्रामाणिकपणे जगून लढायचं की दरोडेखोर होऊन मरायचं?’’
काळू म्हातारबाचं बोलणं कान देऊन ऐकत होता. तो त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींची सांगड ह्या गोष्टीशी जोडू पाहत होता. गोष्टीतलं मर्म त्याला चांगलंच कळलं होतं.

तो म्हणाला, ‘‘म्हातारबा, तू जे सांगतोयंस ते पटलं बघ मला. मी तुला नक्कीच एक चांगला माणूस बनून दाखवीन. मी तसं वचनंच देतो बघ तुला.’’
म्हातारबा त्याची पाठ थोपटत म्हणाले, ‘‘आत्ता कसं? शाब्बास रं माझ्या लेकरा!’’ असं म्हणून ते उठून जायला निघाले.
तसा काळू म्हणाला, ‘‘म्हातारबा, तू नक्की हायस तरी कोण रं? न् तू येतोस कुठून न् जातोस तरी कुठं रं?’’
म्हातारबा हसले आणि म्हणाले, ‘‘तुझ्या आजीची न् माझी दर वारीला भेट व्हयची. माझ्या नातवाची काळजी घे म्हणाली मला; म्हणून म्या तूला भेटलो. म्या हिथंच असतो. कुठून बी येत नाय न् कुठंबी जात नाय.
तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, लोक मला बी ‘काळ्या’च म्हणत्याय!!!’

– मेघा कदम

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.