Now Reading
ए परफेक्ट डील

ए परफेक्ट डील

Menaka Prakashan

गेली पस्तीस वर्षं सतत धावताना तिची ती स्वत:पासून वेगळी झाली होती. इतके दिवस त्याचं घर, त्याचं सुख-दु:खं, त्याची माणसं, त्याची मुलं, त्याचा व्यवसाय या सगळ्याची तजवीज करताना ती आपली स्वत:ची ओळखच नाही, तर आपलं अस्तित्वही विसरली होती. घरात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, फोन, लॅपटॅाप तशी ती, एक चालतं-बोलतं मशिन. घरातली मशिन्स बिघडली तरच मंडळींना त्यांच्या अस्तित्वाची आठवण यायची. त्याकरता मेकॅनिक शोधताना त्या मशिनची, त्याच्या जडणघडणीची, गुणावगुणांची चर्चा व्हायची. तिच्या बाबतीत तीही शक्यता नव्हती…

ती तिच्या खुर्चीत स्तब्ध बसलीय. त्याच्या बेड जवळच्या खुर्चीत. तशी गेले तीन-साडेतीन वर्षं घरात असल्यावेळी ती त्याच जागी असते. जसा तो त्याच्या जागी बेडवर. अगदी नाइलाज झाला तरच ती इतरत्र जाते. घाईघाईनं हातातलं काम उरकून परत या खुर्चीत येऊन बसते. इतर कुठे बसायचा अधिकारच नसल्यासारखी. कारण तिला क्षणभर उशीर झाला तरी त्याच्या हाकांचा सपाटा सुरू होतो. त्याच्या बायकोच्या, अगं नावाचा. त्यांची मदतनीस तर गमतीनं त्याला ‘अगंबाबूच’ म्हणते. या घराला तिचं नाव माहीत नाही. ती अगं, आई, वहिनी, बाई, काकू, मॅडम फक्त आहे. आज मात्र तिला या उपनावांनीसुद्धा कोणी हाक मारत नाहीये. बारा दिवसांपूर्वीच चमचा त्याच्या ओठात ठेवूनही त्याला चहा पिता आला नव्हता, तेव्हाच डॉक्टरांनी आता ‘एनी टाइम’ म्हणून मान हलवली होती. तिनं लगेच फोन करून मुलांना तसं कळवलं होतं. दोघंही लागलीच आले होते… थोरल्याची बायकोही बरोबर होती. आल्याबरोबर त्या दोघांनीही चार्ज घेतला होता. आणि..!

गेले दहा दिवस ती तिच्या खोलीत नुसती बसून आहे. थोरल्याची बायको तिच्या खोलीत चहा किंवा जेवण ठेवायला येते किंवा दारावर फिरायला येणार्‍यांपैकी कोणी तिला भेटूनच जाण्याचा हेका धरला तरच खोलीचं दार किलकिलं होतं आणि ते माणूस जाता क्षणी लोटलं जातं.
घरात बरीच मंडळी आलेली असावीत. पण इतकी माणसं एकत्र जमली की दिसते तशी गर्दी, धांदल दिसत नाहीये. बोलण्याचे आवाजही हळू आहेत. पण गप्पा-गोष्टी, खाणी-पिणी व्यवस्थित सुरू आहेत. दिवसातून चार-पाचदा तरी कोणी न कोणी बाजारात जातो आहे. खर्च बराच होत असावा. कारण परवाच सुनेनं रात्री हळूच येऊन चेकवर तिची सही घेतली होती. एरवी तिनं कितीचा चेक आहे, कशाला हवा आहे हे विचारल्याशिवाय सही केली नसती. पण असं विचारणं बरं दिसणार नाही याची तिला जाणीव होती. तिला स्वत:लाही आता काही विचारण्यात स्वारस्य नव्हतं. तसं काही जाणून घेण्याची गरजही नव्हती. मनाला, शरीराला एक रिकामपण आलं होतं. गेली पस्तीस वर्षं सतत धावताना तिची ती स्वत:पासून वेगळी झाली होती. इतके दिवस त्याचं घर, त्याचं सुख-दु:खं, त्याची माणसं, त्याची मुलं, त्याचा व्यवसाय या सगळ्याची तजवीज करताना ती आपली स्वत:ची ओळखच नाही, तर आपलं अस्तित्वही विसरली होती. घरात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, फोन, लॅपटॅाप तशी ती, एक चालतं-बोलतं मशिन. घरातली मशिन्स बिघडली तरच मंडळींना त्यांच्या अस्तित्वाची आठवण यायची. त्याकरता मेकॅनिक शोधताना त्या मशिनची, त्याच्या जडणघडणीची, गुणावगुणांची चर्चा व्हायची. तिच्या बाबतीत तीही शक्यता नव्हती. म्हणून तिच्या अस्तित्वाची आठवण रोजच्या दिनचर्येच्या बाहेरचं काम उभं राहिलं तरच व्हायची. ते काम तिनंच करणं कसं अपेक्षित आहे, हे ठासून सांगण्यासाठी.

तो होता तोवर त्याला विचारून त्याच्या सोयीनं सगळं चालायचं. खरं म्हणजे गेली तीन वर्षं तो अंथरुणाला खिळलेला होता. स्वत:चे व्यवहार स्वत: करू शकत नव्हता. पण बोलणं आणि विचार स्पष्ट होते. सर्व व्यवहार तो सांगेल तसे ती पार पाडत होती. त्याच्या आजारपणाच्या सुरवातीच्या दिवसांत तिची मुलं आली होती. आठ-दहा दिवस राहिली होती. त्याच वेळी थोरल्यानं व्यवसाय विकून टाकून वाटण्या करून टाकायची सूचना केली होती. एक-दोन जणांशी बोलणीही केली होती, पण त्याला कल्पना येताच त्यानं ठामपणे नकार दिला होता. तो जिवंत असेपर्यंत व्यवसाय बंद होणार नाही. तिच्याकडून तो कामं करवून घेईल असंही सांगितलं होतं. थोरला रागवून दुसर्‍याच दिवशी निघून गेला होता. पण तो बधला नाही.

त्यानंतर एक नवीन काम तिच्या गळ्यात पडलं. रोज सकाळी त्याचं सगळं आवरल्यावर त्याच्याकडून सूचना घ्यायच्या, व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन आवश्यक ती सर्व कामं उरकून घरी यायचं, आणि आल्यावर त्याला दिवसभरात केलेल्या सगळ्या कामांचा अहवाल द्यायचा. दिवसभरातही तो अनेक वेळा नर्सकडून फोन लावून घ्यायचा. विचारत राहायचा, ती सगळं सांगत राहायची. विरोध कशाला असं वाटून.

आता निष्क्रिय, निर्हेतुक, निर्विकार एका जागी बसलेल्या तिला वाटलं, आपण पूर्वी अशा नव्हतो. नेहमी खळाळत्या उत्साहानं, असोशीनं जगायचो. घरची परिस्थिती सामान्यच होती. पण ती आनंदाच्या आड येत नव्हती. बुद्धी होती, जोम होता आणि सगळं छान छान हवं ते मिळवण्याचा ध्यास होता. तिच्या सामान्य रूपामुळे आणि बापाच्या त्याहून सामान्य परिस्थितीमुळे आजूबाजूला कोणी तिच्या प्रेमात पडायचा संभव नव्हता. तिच्या घरचेही बहुधा यामुळेच तिच्या लग्नाचं नाव काढत नव्हते. त्यामुळे ती निश्चिंत होती. शेजारीपाजारी, नातेवाईक आडून आडून चौकशी करत होते. लाडू कधी देणार अशी विचारणा करत होते. ‘जमलं की सांगीनच तुम्हाला, बोलावणं करायला येईनच’ असं सांगून ती बाजूला होत होती. एखादी खमकी शेजारीण ‘लग्न नोंदणी पद्धतीनं करणार की कसं’, विचारायची. ‘चांगला बँडबाजा लावून करीन, आहेराची तयारी करून ठेवा काकू…’ ती हसून म्हणायची.

ध्यानीमनी नसताना एका मध्यस्थानं स्थळ आणलं आणि एका सकाळीच मध्यस्थ मुलाला घेऊन घरी हजर झाले. ती कामावर जायचं म्हणून बरीशी साडी घालून. बाकी सगळं घर अस्ताव्यस्त. आई घरी नसल्यानं फक्त चहा घेऊन ती बाहेर आली. ‘चला, मी कांदापोहे न खाता लग्न केलं असं मला सांगता येईल,’ मुलाचा घीसापिटा विनोद. सगळेच हसायचं म्हणून हसले. जुजबी बोलणं झालं. मंडळींच्या पाठोपाठ ती बाहेर पडली. जाताना तो सांगून गेला म्हणे, या पत्त्यावर फोटो आणि पत्रिका पाठवा म्हणून. वडिलांनी तसं केलं असावं, तिनं विचारलं नाही. आठव्याच दिवशी मुलाच्या वडिलांनी सोयीचे मुहूर्त आणि जागा कळवली. तिला होकार-नकाराचा हक्क आहे, असं दोन्ही घरांना वाटलं नाही. तिनं त्याचं अचानक घरी येणं फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. त्यामुळे तिनं त्याचा चेहराही नीटपणे पाहिला नव्हता. पत्रोपत्री लग्न ठरलं आणि लग्नाच्या गावी मुहूर्ताच्या चार दिवस आधी ती मोजक्या मंडळींबरोबर कार्याच्या गावी हजर झाली. दरम्यान दोघांच्या वडिलांचा अत्यावश्यक पत्रव्यवहार झाला असेल तेवढाच.

ती आपली बॅग लावत होती, तेवढ्यात आईचे विचित्र शब्द कानावर पडले, ‘हा मुलगा तुमच्या मुलीला नांदवणार नाही.’ झालं असं की साक्ष गंधाच्या विधीच्या वेळी तिच्या आईनं मुलाला प्रथम प्रत्यक्ष पाहिलं आणि ती हादरलीच. नाही, मुलात काही व्यंग वगैरे नव्हतं, तर मुलगा तिच्या मते देखणा, तिच्या सामान्य रूपाच्या मुलीपुढे तर असामान्य देखणा वाटत होता म्हणून. ‘काहीतरीच काय बोलतेस? उचलली जीभ लावली टाळ्याला!’ अर्थात तिचे वडील. ‘हा मुलगा एवढा सुंदर आहे हे तुम्ही दोघांनी सांगितलं नाही. पण तुम्ही फोटो पहिला होतात की. हे त्या फोटोवरून मला कल्पनाच आली नाही. लग्न दोन दिवसांवर आलं. मुलगी त्यांनी पसंत केली आहे. झालं. आता उगाच काही नाट लावू नका.’ तिनं चमकून त्या दोघांकडे पाहिलं अन् प्रथमच तिच्या लक्षात आलं, आपण मुलाला नीट बघितलाच नाही, ओळख करून घेण्याचा तर संभवच नव्हता. त्यानं तरी आपल्याला नीट बघितलं आहे का? पण त्या दिवशी तो आपण होऊनच बघायला आला होता. मध्यस्थ त्याच्या नात्यातले होते. त्यांनी त्याला कल्पना दिलीच असणार. बरं, ती चहा घेऊन आल्यावर तो सहजपणे गप्पा मारत राहिला. पण त्या गप्पा आपली ओळख व्हावी, वाढावी अशा स्वरूपाच्या नव्हत्या. कदाचित मध्यस्थानं ठरवलेली लग्नं अशीच पार पडत असतील. कदाचित आजी म्हणायची तसं या देवाघरच्या गाठी असतात.

लग्न तसं व्यवस्थित पार पडलं. रीतसर थट्टा-विनोद झाले. त्यानंही पाठ केलेले उखाणे, घास भरवणं सगळं मजेमजेनं केलं. म्हणून मग ती सोडून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पण लग्नात सजून नटून आलेला तो जास्तच देखणा दिसत होता. यानं आपल्याशी का लग्न केलं? हा विचार राहून राहून टोचत होता. त्याला बघितल्यावर आईनं काढलेले उद्गार आठवत होतेच. तिनं वारंवार आपल्या मनाला दटावून जागेवर आणण्याचा प्रयत्न केला. पण हट्टी मन हाकलून लावलेल्या पाखरागत परत त्याच प्रश्नावर चोच मारत होतं. तिच्याच लग्नात ती सोडून सगळे मजेत होते. अगदी तिची आईसुद्धा. ती त्याच्या घरी आली. रीतीची पूजा झाली. त्याचे मित्र आले. थट्टा-विनोद झाले. वरवर तरी सगळे छान वागत होते. बोट ठेवण्यासारखं काही दिसत नव्हतं. पण तिच्या मनातला प्रश्न तिला सुख लागू देत नव्हता. त्या वास्तव्यात तिला एवढंच कळलं की, सध्या तो बेरोजगार होता आणि कोणता तरी व्यवसाय करणार होता, पण जवळच्या शहरांत राहून. तिची त्या शहरांत बदली झाली की त्यांचा स्वतंत्र संसार सुरू होणार होता. तिच्या भाग्यानं बदलीचं लवकर जमलं. तोवर त्याचा व्यवसाय सुरू झाला होता. त्यामुळे तो बिझी होता. तिनंच भाड्याचं घर घेतलं. आवश्यक ते सामान विकत घेतलं. घर लावलं. एकदा तिनं त्याला विचारलं, ‘अमुक एक सामान घेऊ का?’ ‘तुझं घर, तू मालकीण. तुला हवं ते घे’ सांगून तो बाहेर. ‘या सर्व वेळात तुला पैसे हवेत का?’ हे एका अक्षरानं त्यानं विचारलं नव्हतं. पण तो हे सगळं मुद्दाम करत होता असं वाटत नव्हतं. परत एकदा आपण त्याला अजिबात ओळखत नाही, हे जाणवलं. रात्री छान होत्या.. शरीराचे चोचले पुरवले जात होते. मन वेगळं काढून सुखात रंग भरता येतात हे तिनं ओळखलं होतं. तो खूप खूश होता. पण त्याला आपण आवडतो किंवा त्याचं आपल्यावर प्रेम आहे का नाही आणि मुळात त्यानं आपल्याशी का लग्न केलं हा प्रश्न कायम तिला छळत राहिला.

त्याचा व्यवसाय जरा जमत आला, तेव्हा तिनंही त्याच्याबरोबर दुकानात यावं असा त्याचा लकडा सुरू झाला. त्याच्या मते तिची नोकरी काय अगदी फालतू आहे आणि सरकारी नोकरीत तसंही कोण काम करतं? तेव्हा तिथं पाट्या टाकून झाल्यावर त्याच्याबरोबर दुकानात यावं. ती दुकानात जाऊ लागली. हळूहळू त्यानं सर्वच काम तिच्या गळ्यात बांधायला सुरवात केली अन् केव्हा ती पूर्ण व्यवसाय सांभाळू लागली, हे लक्षातच आलं नाही. एक-दोनदा ती त्याला म्हणाली, ‘महत्त्वाच्या कस्टमरला त्यानं भेटावं म्हणून का!’ ‘तू छान संभाळतेस की सर्व.’ ‘पण काही वेळा पुरुष बरोबर असला की बरं असतं.’ ‘हे! माझ्यापेक्षा तूच छान कन्व्हिन्स करतेस.’ पण तिचा मुद्दा त्याच्या लक्षात आला आणि मार्केटिंग करता विनायकची नियुक्ती झाली.

विनायक सर्वच दृष्टींनी अगदीच सामान्य वाटत होता. त्यानं एवढा बावळट दिसणारा माणूस का निवडला हे प्रारंभी तिला कळलं नाही. पण आपल्याला तरी त्यानं का निवडलं हा प्रश्न होताच? एकदा काम करू लागल्यावर विनायक वेश असावा बावळा पण अंतरी नाना कळा वर्गातला होता हे लक्षात आलं. त्याचं अफाट वाचन, मुद्देसूद, नेमकं आणि ठाशीव बोलणं लक्षात आलं… तो पटकन शिकायचा. त्यामुळे सहा महिन्यांत तो तिच्या बरोबरीनं काम करू लागला. त्या दोघांचं काम सुरू असायचं आणि तो मालक म्हणून आरामात केबिनमध्ये बसल्या बसल्या हुकूम सोडत असायचा.

तिला आणि विनायकला क्लायंट मीटिंग्ज असायच्या, हिशेब पहायचे असायचे. मार्केटमध्ये नवीन ट्रेंड काय आहे, त्यानुसार दुकानात माल आहे का नाही, कामच काम. त्याकरता ती आणि विनायक बरोबर खूप हिंडायचे. खूपदा लंच बाहेर घ्यायचे. पण त्याचं सगळं व्यवस्थित झाल्यावर. बाहेर उशीर झाला आणि लंच बाहेर घ्यायचं ठरलं तर विनायकच विचारायचा, ‘सरांचं जेवण झालं?’ त्यानंतर तो एकदम मजेत असायचा. नवीन काय वाचलं विचारायचा. एखादं नाटक, सिनेमा तुम्ही बघायलाच हवं म्हणून सजेस्ट करायचा. तो नुकताच त्यांच्याबरोबर कामाला लागला होता, तेव्हा असंच बोलता बोलता तिच्या लक्षात आलं होतं, तिच्या आणि त्याच्या आवडी-निवडी खूप मिळत्याजुळत्या आहेत. आवडलेल्या पुस्तकाबद्दल बोलताना त्याचा चेहरा उजळून निघतो. त्या वेळी एकदम तो आवडून जातो, त्याचं बोलणं, दिसणं सगळंच.

लग्न झाल्यापासून असं भरभरून ती कोणाशी बोललीच नव्हती. त्यामुळे होता होईल तो ती अशा बाहेरच्या मीटिंग्ज लंच अवर्स नंतर ठेवायची. त्या आधी मीटिंगबद्दल चर्चा. विनायकला लगेच हे लक्षात आलं होतं. न बोलता. तोही हटकून न जेवताच मीटिंगला यायचा आणि त्यानंतर गाडी हॉटेलसमोर पार्क करायचा. तिला या गोष्टीची पण अपूर्वाई वाटायची. साधंसं जेवण आणि मन भरून गप्पा. बिल आल्याक्षणी तो पाकीट काढायचा, त्याचीही. खरं म्हणजे हॉटेल जेवण तिला नवीन नव्हतं. दुकान छान चालू लागल्यावर नवरा खूपदा तिला रात्री बाहेर घेऊन जायचा. मोठ-मोठ्या हॉटेलला जेवण द्यायचा. पण त्याच्याबरोबर असताना ती मोकळी नसायची. एखाद्या सेक्रेटरीनं साहेबाबरोबर जावं तशी ती तो नेईल तिथं जायची. बिल आल्यावर ते चेक करून पेमेंट करणं तिचंच काम असायचं. त्या वेळी तो मात्र बडीशेप चघळत उठून चालता व्हायचा. एकदा असंच तो उठू लागला तेव्हा मित्र म्हणालाच, ‘बिल यायचंय अजून अरे!’ ‘बिल मालकीणबाई देतील.’ ‘मी कोण देणार?’ मित्र चमकलाच तेव्हा तो थट्टेच्या सुरात म्हणाला, ‘माझी बायको काय साधारण आहे काय? संस्कृत नाटकातल्या अष्टनायिकांच्या योग्यतेची आहे ती.’ म्हटलं तर थट्टा म्हटलं तर वास्तव. हवा तो अर्थ लावावा.

एक दिवस मीटिंग अपेक्षेपेक्षा लवकर संपली. खरं म्हणजे लंच टाइम झाला नव्हता. पण सवयीनं ते हॉटेलात शिरले. तिनं दोघांकरता बिअर मागवली. विनायकनं फक्त तिच्याकडे पाहिलं आणि ‘चिअर्स’ म्हणत मग उचलला. बिअरच्या सोबतीनं इतक्या गप्पा रंगल्या की वेळेचं भान उरलं नाही. दोन तास उलटले हे ऑफिसमधून फोन आला तेव्हा लक्षात आलं. तिनं सहजपणे नवर्‍याला सांगितलं, ‘मीटिंग झाली. एक-दोन मुद्दे क्लीअर करायचे होते म्हणून थोडं थांबावं लागलं. आता थोडे खाऊनच ऑफिसला येते.’ आणि एकदम तिला लक्षात आलं, प्रथमच प्रेमात पडलेल्या मुलीसारख्या आपण खोटे बोलतो आहोत आणि एकदम तिला हसूच फुटलं. विनायक समजून हसला आणि ती एकदम लाजलीच.

लग्न होऊन इतकी वर्षं झाली, सगळं करून, भोगून झाल्यावर अशा नवथर प्रेमानं आपल्याला भुरळ घालावी याची मजा वाटत होती. संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते बरोबर जेवण आणि गप्पांचा आनंद लुटायचे. विनायकचं लग्न झालं होतं. त्याची बायको अगदी साधी गृहिणी होती. ते दोघंही आपल्या संसारात सुखी होते. विनायक त्यांच्याकडेच नोकरी करत असल्यामुळे त्याचं बरोबर फिरणं गृहीतच होत. तिला तिच्या नवर्‍याचंच आश्‍चर्य वाटायचं. तो कधीही त्यांच्या एकत्र फिरण्याचा किंवा जेवण घेण्याचा विचार करत नव्हता. त्याबद्दल काही हरकत घेत नव्हता. हे थोडं विचित्र वाटत होतं. एक-दोनदा इन्कमटॅक्स ऑफिसची क्वेरी आल्यावर त्यानं संपूर्ण फायनान्सची जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. ती त्याला दाखवत असलेले हिशेब तरी तो नीटपणे समजून घेतो का नाही याचीही तिला शंका होती. विनायक एकदा म्हणालाही, ‘सरांचा तुमच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास आहे.’ ती फक्त हसली होती. कारण हे सर्व जरी खरं असलं तरी लग्नापासून पडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरितच होता. विनायक भेटल्यावर आता तसाही काही फरक पडत नव्हता.

एकदा अशीच त्याची लाडकी धाकटी बहीण नवर्‍यासह माहेरपणाला आली होती. तिघांच्या खूप गप्पागोष्टी व्हायच्या. ती नेहमीप्रमाणे कामात. आता तिच्याबरोबर विनायकसुद्धा. एकदा मेहुणा म्हणाला, ‘काय वहिनी! आजकाल तुमचं आमच्या सालेसाहेबांकडे सुद्धा लक्ष नसतं. मग आमचं काय बोलणार? आमच्यापेक्षा तुम्ही आपल्या सहकार्‍याला जास्त वेळ देता. सांभाळ रे बाबा.’ पण नवरा तडकून म्हणाला, ‘काय वाटेल ते काय बोलतोस! तिची सात जन्मांची पुण्याई म्हणून माझ्यासारखा देखणा नवरा मिळालाय. अगदी देखण्या हिरोकडेसुद्धा ती वळून बघणार नाही. आणि तू बोलतोय कुणाबद्दल तर त्या बावळट विनायकबद्दल. ते दोघं कामातच असतात. एकदाही ते दोघं एकांतात भेटलेले नाहीत.’ म्हणजे त्याच्या मते शरीरसंबंध म्हणजेच लग्न. लग्नाचं पावित्र्य फक्त शरीरापुरतंच आणि त्याच्या स्वत:च्या बाबतीत त्याच्याशी लग्न झाल्यावर तिला कोणी आवडणं शक्यच नव्हतं. ‘जावई झालास म्हणून माझा इतका अपमान! एकदा क्लबमध्ये येऊन बघ. झाडून सगळ्या सुंदर बायका माझ्यापुढे कसं गोंडा घोळत असतात ते. मी घास टाकत नाही कोणालाच म्हणून बरं.’ त्या दिवसापासून ती विनायक बरोबर जास्तच मोकळी झाली.

ऑडिट जवळ आलं होतं म्हणून रविवार असूनसुद्धा ती आणि विनायक अभ्यासिकेत बसून काम करत होते. तहान लागली म्हणून ती आत आली, तर त्याचं बोलणं कानावर आलं, ‘काय छोटी! मस्त माहेरपण केलं ना दादानं! त्या दिवशीही म्हणत होती तुमच्या दोघांची गिफ्ट आणून ठेवते म्हणून. पण मी बजावलं तिला छोटीची आणि संदीपची भेट त्यांच्याच पसंतीनं आम्ही घेऊ. तिच्या दादाकडे तिला बेस्ट तेच मिळेल. आणि तू काहीतरी फालतू भेट आणशील, तसं नको. वहिनीला राग नाही आला?’ ‘छे! उलट ती म्हणाली, तुमची निवड बेस्टच असते. मला कुठे जायचं असलं तर ती दोन-तीन सेट बाहेर काढून ठेवते. मी त्यातून निवड करावी म्हणून. मला विचारल्याशिवाय ती श्वाससुद्धा घेणार नाही. म्हणून तर व्यवसाय इतका वाढला. तुमच्या सगळ्यांच्या मताला डावलून मी हिची निवड केली. एखाद्या राजासारखा थाट आहे माझा. एखादी सुंदर कचकड्याची बाहुली आणली असती तर एवढं सगळं जमलं असतं? उलट तिचेच नखरे सांभाळताना पुरेवाट झाली असती.’ पुढचं त्यांचं बोलणं तिला ऐकूच आलं नाही. इतके दिवस तिला उगाचच काचत असलेला प्रश्न म्हणजे तद्दन मूर्खपणा होता… कारण त्याचं फक्त स्वत:वर खूप प्रेम होतं. एखादी सुंदर स्त्री बायको म्हणून आली असती तर त्याचं महत्त्व कमी झालं असतं. आणि ते त्याला सहन झालं नसतं. सुंदर स्त्रिया त्याला आवडायच्या. त्यांच्याकडे तो पाहायचा. पण त्या स्त्रीनं त्याची दखल घेतली, त्याच्या देखणेपणाचं कौतुक केलं तरच.. तिच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यावर मग तिला त्याच्या वेळोवेळी काढलेल्या उद्गारांचा संदर्भ कळत गेला. तो देखणा होता. त्याला त्या बळावर सर्वांकडून कोडकौतुक करून घ्यायचं होतं. मोठेपणा हवा होता. पण त्याकरता कष्ट मात्र तिनं करायला हवे होते. सगळं पाहून, विचारपूर्वक ठरवूनच त्यानं तिच्याशी लग्नाचं डील केलं होतं. या जाणिवेनंतर तिचा लग्नापूर्वीचा आत्मविश्वास परत आला होता. नंतरच्या दिवसात तिनं विनायकच्या मदतीनं व्यवसाय खूप वाढवला होता. त्या निमित्तानं विनायकच्या सहवासाचं सुखही पुरेपूर उपभोगलं होतं. त्याबद्दल पूर्वी वाटणारी अपराध भावना मनात नव्हती. तिचं सामान्य रूप हाच तिचा प्लस पॉइंट होता. तिच्या सामान्य रूपाचं आणि स्वत:च्या देखणेपणाचं कोष्टक त्याच्या डोक्यात घट्ट बसलं होतं. त्यामुळे अगदी सामान्य दिसणारा विनायक तिला आकर्षित करू शकेल अशी शंकासुद्धा त्याच्या मनाला शिवली नाही. त्याच्या आजारपणी सोय म्हणून सगळी कागदपत्रं त्याच्या संमतीनं तिच्या नावावर करून घेतली होती. त्याच्यानंतर तो व्यवसाय आता तिचा एकटीचा होता. ती खर्‍या अर्थानं मालकीण झाली होती.

थोरल्याची बायको आत आली तेव्हा क्षणभर आपण कुठे आहोत हेच कळेना. झोपला होतात? या तिच्या प्रश्नावर तिनं कळे न कळेशी मान हलवली. ‘चेकवर सही हवी होती, उद्या प्रसादाचं जेवण आहे.’ तिनं आकडा न पाहताच सही केली. सुनेनं पुढे केलेल्या चेकवर ही शेवटची सही होती. उद्यापासून ती मालकीण म्हणून व्यवसाय सांभाळणार होती. विनायक सोबत असताना आणखी कोणी नकोच होतं.
प्रसाद घेऊन पाहुणे गेले आणि त्या रात्री दोघे लेक आणि सून तिच्या खोलीत आले. कोणतीही प्रस्तावना न करता थोरला एकदम म्हणाला, ‘‘आई बापूसाहेब गेले. तेव्हा दुकान कोण सांभाळणार? मी एक-दोघांशी बोललो आहे. आम्हा दोघांना इथं राहण्यात रस नाही. तू एकटी, तुला एवढं मोठं घर खायला येईल. तेव्हा दुकान आणि घर दोन्ही विकून वाटे करून टाकू. तुझ्या वाट्यातून तुझ्याकरता एक छोटं घर किंवा सदनिका विकत घेऊन टाकू. खूप रजा झाली. आता आम्हाला जायला हवं.’’ थोरला अगदी त्याच्याचसारखं बोलत होता. तिला खिजगणतीत न धरता. ‘बरोबर, तुम्ही तिकिटं बुक केली का?’ ‘अगं पण दुकान?’
‘‘दुकान नको म्हणूस. तुमच्या लहानपणी होता तसा छोटासा व्यवसाय नाही. आता खूप व्याप वाढला आहे. जास्त माल एक्स्पोर्ट होतो. असा एकदम नाही विकता येणार. आणि गेली कित्येक वर्षे मीच सगळा व्याप सांभाळते आहे. पुढेही सांभाळेन. तेवढीच मला करमणूक.’’

‘‘पण मग आमचा वाटा?’’ आता धाकट्यानं विचारलं. ‘‘बापूसाहेबांच्या प्रॉपर्टीतला आमचा हिस्सा आम्हाला मिळायला हवा.’’ ‘‘तुम्ही इथं राहू शकता. इथं राहिलात तर सगळं घर मीच चालवीन. आजपर्यंत चालवत आले आहे तसं.’’
‘‘पण कायद्यानं आमचा हक्क आहे, बापूसाहेबांच्या पैशांवर आणि इस्टेटीवर. तू कोण रोखणारी?’’
तिला परत एकदा जाणवलं. पस्तीस वर्षांनंतरही तिचं त्यांच्या मते इथं काहीच नव्हतं. पण आता ती पस्तीस वर्षांपूर्वीची स्वत:च्या सामान्यपणाची जाणीव असलेली, आक्रसलेली, अबोध मुलगी नव्हती. ‘‘कोणता पैसा? कोणती इस्टेट? घर आणि व्यवसाय माझ्या नावावर आहे. माझ्या एकटीच्या. मी गेल्यावरच तुम्ही त्यावर हक्क सांगू शकता. तेव्हा तुम्हाला तुमचा वाटा मिळेल.’’ ती शांतपणे म्हणाली. ‘‘तू बापूसाहेबांना फसवून सगळं आपल्या नावावर करून घेतलं असेल. आम्हाला डावलून बापूसाहेब असं सगळं तुझ्या नावावर करणं शक्य नाही.’’
‘‘बापूसाहेबांना फसवणं शक्य नाही, हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. आणि तरीही शंका असली तर आपल्या वकिलांचा नंबर ऑफिसमधून घेऊन खात्री करून घ्या.’’ आणि चौदा दिवसांनंतर प्रथमच ताठ चालत ती आपल्या ऑफिसच्या खोलीत आली आणि तिनं विनायकला फोन लावला..

– मंजिरी दाते

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.