Now Reading
आफ्रिकेतला आनंदयात्री

आफ्रिकेतला आनंदयात्री

Menaka Prakashan

यशोधन घरत, जन्मानं अमेरिकन नागरिकत्व पण कुटुंब कोकणातलं, वाढला डोंबिवलीत, पदवीपूर्व शिक्षण अमेरिकेत, पदव्युत्तर शिक्षण इंग्लंडमध्ये, पण या सार्‍या प्रगत ग्लॅमरस पाश्चात्त्य जगात न रमता यशोधन गेली सात वर्षं आहे आफ्रिकेत… तेही शेतकी व्यवसायातल्या नोकरीत… आणि खरं तर ही नोकरी कमी आणि झोकून देऊन आवडीनं केलेलं सामाजिक काम जास्त. या वेगळ्या वाटेनं जाणार्‍या तरुणाशी केलेल्या गप्पांचा हा लेखाजोखा.

प्रश्न : उच्च शिक्षणानंतर नवनवीन क्षेत्रांत काम करण्याची संधी असूनही तू ठरवून शेतीकडे वळलास की अचानक या क्षेत्रात ताम करावंसं वाटायला लागलं?
यशोधन : मी २०१३ मध्ये अमेरिकेतल्या नामांकित ‘कॉर्नेल विद्यापीठा’त ‘एन्विरॉन्मेंटल पॉलिसी आणि कॉन्सर्व्हशन’ या विषयात पदवी घेतली. अमेरिकेत शिक्षणक्रमात साधारण सत्तर टक्के ठराविक म्हणजे कोअर विषय पण तीस टक्के आपल्या आवडीचे इलेक्टीव्हस विषयही घेऊ शकतो. त्यामुळे मी, विकसनशील देशातली शेती, जंगलातले प्रथमोपचार, जंगलातलं जीवन, फोटोग्राफी वगैरे असे विषयही घेतले. त्यानंतर मास्टर्ससाठी दोन-तीन उत्कृष्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळत होता. पण पदवी करत असताना एका सेमिस्टरला ‘स्टडी अब्रॉड’ या अंतर्गत मी एक सेमिस्टर आफ्रिकेत केनिया, टांझानियाला गेलो होतो. मुळात मी निसर्गप्रेमी, जी पाहिली ती आफ्रिका मनात घर करून होती. मास्टर्स नंतर करू, आधी फिल्डचा अनुभव घेऊ असं मनात होतं. या द्विधा मन:स्थितीत असताना एक सुवर्णसंधी चालून आली. मी ‘प्रिन्स्टन इन आफ्रिका’ या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या कॉम्पिटिटिव्ह फेलोशीपसाठी अर्ज केला आणि मला ती मिळाली. याअंतर्गत एक वर्षासाठी झाम्बियात मला जॉब करायचा होता. मी ज्या संस्थेसाठी (ओलाम इंटरनॅशनल) साठी काम करायला गेलो, ते शेती क्षेत्रात लोकप्रिय होती. पण त्यांना शाश्वत शेतीमध्ये फार इंटरेस्ट होता. माझं पोस्टिंग झाम्बियातल्या एका दुर्गम भागात होतं. ‘तुला शेतीत काय नवीन प्रयोग करता येतील, जंगलांचं जतन कसं करता येईल यावर काम कर,’ असं सांगितलं गेलं. खरं तर त्यामुळे मी शेतीमध्ये आलो. म्हणजे मी थोडा अपघातानं आणि थोडं ठरवून या क्षेत्रात आलो, असं म्हणता येईल.

प्रश्न : पण सारं जग प्रगत, श्रीमंत देशांकडे धावत असताना तू अमेरिकेत पुढचं शिक्षण किंवा नोकरी दोन्ही शक्य असताना इतक्या दूरवर मागास अशा आफ्रिकेत गेलास. मग हे तुझ्या घरच्याना पचलं का?
यशोधन : या प्रश्नाच्या उत्तरासाठी खरं तर मला माझ्या बालपणपासून सुरवात करावी लागेल. लहानपणापासून माझ्या वेगळ्या आवडी-निवडींना आई-बाबांनी खूप प्रोत्साहन दिलं. मी भरपूर वाचन करायचो. इंग्लिश आणि हो मराठी पुस्तकंही वाचायचो, इंग्लिश माध्यमाच्या शाळेत असूनही मराठी वाचायचो! मला लहानपणी पक्षी निरीक्षण, जंगलात भटकणं याची आवड लागली. प्रत्येक सुट्टीत कोकणात आणि सांगलीला, दोन्ही आजी-आजोबांकडे जायचो. समुद्रकिनारे, नदीकाठ, तळी, डोंगर, आमराया असं भटकणं व्हायचं. डोंबिवलीतली विद्यानिकेतन शाळा, ‘न्यास’ ही निसर्गवाचन करायला प्रोत्साहन देणारी संस्था, सारं पोषक वातावरण होतं. मी अगदी लहान असल्यापासून ‘न्यास’, ‘बीएनएचएस’, आत्माराम परब यांच्या ‘इशा टूर्स’सोबत जंगलात ट्रिप्स केल्या. ‘बर्ड रेस’ ना नेहमी जायचो, आई-बाबा सोबत उत्तराखंड, भूतान, कर्नाटक, कच्छ अशा ट्रिप्स केल्या. अनेक ठिकाणी प्रत्येक वेळी आम्ही टिपिकल टुरिस्ट स्पॉटला न जाता जंगलात, हटके जागी पक्षी निरिक्षणासाठी जायचो. वाचन आणि जोडीला असं हे भटकणं, समान आवड असणारी मित्रमंडळी माझं जग समृद्ध करत गेली. मी सहावी-सातवीत असताना ‘सँच्युरी क्लब’ या सुप्रसिद्ध मासिकात लेख लिहिले. निसर्ग आणि निसर्गाच्या विशासंबंधी हे लेख होते. पर्यावरणाचे प्रश्न मला अस्वस्थ करत होते. मी नववीला असताना होमी भाभा परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात ‘डिझेल प्रदूषण’ या विषयात प्रोजेक्ट केला. त्या परीक्षेत मला सुवर्णपदकही मिळालं. तसंच शाळेत असताना राष्ट्रपतींना ‘सेव्ह टायगर्स’ यासंबंधी पत्रही लिहिलं होतं आणि त्यांचं उत्तरही आलं होतं. एकंदर खूप जग विस्तारत गेलं. हा अनुभव खूप महत्त्वाचा ठरला. मी माझं अवांतर वाचन दहावीला वगैरेसुद्धा अभ्यासाचा बाऊ न करता सुरू ठेवलं होतं. मी कधीही व्हिडिओ गेम किंवा तत्सम हट्ट केले नाही, हट्ट फक्त पुस्तकांचाच असायचा असं मला आठवतं. पुढे बारावीनंतर काय करायचं हा प्रश्न होता. मला इंजिनीअरिंग-मेडिकल वगैरे आवडी नव्हत्या. ‘सॅट’ च्या परीक्षा दिल्या. पर्यावरण क्षेत्रात शिकावं असं वाटलं. शोध सुरू केला आणि ‘कॉर्नेल’चा प्रोग्रॅम आवडला. स्कॉलरशिप मिळाली, अन्यथा अमेरिकेतलं पदवीपूर्व शिक्षण प्रचंड खर्चिक आहे. मी २००९ मध्ये, सतराव्या वर्षी ‘कॉर्नेल’ला गेलो. तिथं खर्‍या अर्थाने जगाची ओळख झाली. अनेक देशांच्या मित्रमंडळींमुळे विविध संस्कृती, भाषा, राजकारण यांची माहिती झाली.

थोडक्यात, माझ्या अशा जडणघडणीमुळे बहुधा आई-बाबांना मी नेहमीच्या वाटेनं जाईन असं वाटलं नसावंच. पण मी पहिल्या एक वर्षाच्या झाम्बियातल्या फेलोशीपनंतर जेव्हा आफ्रिकेतच पुढची नोकरी बघायला लागलो तेव्हा आमच्या बर्‍याच चर्चा, मतभेद व्हायचे, मी अजून शिकावं असंही त्यांना वाटायचं. त्यांना माझी सुरक्षितता, आरोग्य याचीही काळजी वाटायची. तसंच माझे बाकी मित्र भारतात पदवी घेऊन जीआरई देऊन आता अमेरिकेत जात होते आणि मी अमेरिकेतून आफ्रिकेत. कॉर्नेलमध्ये शिकलेले मित्र तर पुढे शिकत होते किंवा मोठमोठ्या आयटी, सॉफ्टवेअर कंपनीत न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियात नोकरी करत होते. पण आई-बाबांनी मला कधी जबरदस्ती केला नाही किंवा तुलना केली नाही. बाबा इंजिनीअर कार्पोरेट क्षेत्रात, आई प्रोफेसर आणि फार्मसी क्षेत्रात. आपल्या क्षेत्रात नामांकित आणि प्रखर सामाजिक जाणीव असलेले, दोघंही पूर्वी अमेरिकेत राहिलेले, (ते अमेरिकेत असताना माझा जन्म झाला, त्यामुळे माझं नागरिकत्व अमेरिकन). खूप जग फिरलेले, त्यामुळे त्यांची क्षितिजंही चांगलीच रुंदावलेली. केवळ लठ्ठ पगाराची नोकरी वगैरे असं कधी आमच्या डोक्यात नव्हतं. पण मी पॉलिसी मेकिंगमध्ये ‘युनो’सारख्या ठिकाणी, अधिक मोठ्या स्तरावर काम करत असायला हवं ज्यामुळे आपण उत्तम परिणाम साधू शकतो असं त्यांना मनापासून वाटायचं. मी २०१३ मध्ये कॉर्नलची पदवी झाल्यावर युनोतर्फे श्रीलंकेत तीन महिने इंटर्नशिप केली होती. पण अशा ठिकाणी नोकरी शोधायची म्हणजे सोपं नाही. संधी कमी, स्पर्धा प्रचंड आणि मी करिअरच्या सुरवातीला अशा ठिकाणी जाऊ इच्छित नव्हतो. माझा जास्त कल फिल्ड वर्क, सोशल इम्पॅक्ट याकडे होता. मी माणसांत आणि निसर्गात रमणारा आहे. माझ्यासारख्या विचार असलेल्या आणि शिक्षण घेतलेल्याची गरज विकसनशील, अविकसित देशात जास्त आहे, ते मला समजून घेऊ शकले. फेलोशिपनंतर लगेचच २०१४ मध्ये मला मनासारखी नोकरी ‘वन एकर फंड’ (ओएएफ) या शेती क्षेत्रातल्या संस्थेमध्ये मिळाला आणि मी युगांडा, झाम्बिया, रवांडामध्ये आणि नंतर मलावी या पूर्व आफ्रिकेतल्या छोट्या देशात काम करू लागलो. मी कामात रमलो. आई-बाबा आफ्रिकेत येऊन गेले. माझ्या कामाचं सामाजिक महत्त्व, मला कामातून मिळणारा आनंद यामुळे सुरवातीला होणार्‍या आमच्या चर्चा, मतभेद नंतर फारसे राहिले नाहीत.

प्रश्‍न : तुझं पदव्युत्तर शिक्षण इंग्लंडमध्ये झालं, ते नेमकं कशात होतं?
यशोधन : दोन वर्षं ‘ओएएफ’मध्ये आणि आधीचं एक वर्ष ‘प्रिन्स्टन फेलोशिप’ या आफ्रिकन अनुभवाची शिदोरी घेऊन मी २०१७ मध्ये ब्रायटन इथल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’ (आयडीएस) मध्ये ‘ग्लोबलायझेेशन, बिझनेस अँड डेव्हलपमेंट’ हा एक वर्षाचा मास्टर्स प्रोग्रॅम करायचं ठरवलं. मी या मास्टर्स प्रोग्राममध्ये खूप काही शिकलो. आणि हा अभ्यासक्रम संपताना ‘ओएएफ’नं परत जॉईन होण्यासाठी ऑफर दिली, आणि अशा प्रकारे मी परत आफ्रिकेला परतलो.

प्रश्‍न : सध्या तुझ्या कामाचं स्वरूप काय?
वन एकर फंड (ओएएफ) ही छोट्या शेतकर्‍यांसाठी काम करणारी संस्था आहे. पूर्व आफ्रिकेतल्या साधारण दहा लाख शेतकर्‍यांसोबत काम करते. मी संपूर्ण मलावी देशातल्या ऑपरेशन्सचा प्रमुख म्हणून काम बघतो. सत्तर हजार शेतकरी, तीनशे स्टाफ असा कामाचा परीघ आहे. प्रत्यक्ष फिल्डमध्ये आणि ऑफिस दोन्हीकडे काम असतं. शेतकर्‍यांना एक-दीड एकर अशा छोट्या का होईना पण जमिनीवर शेती करण्यासाठी त्यांना कर्ज देतो, रोकड नाही पण बी-बियाणे, खते, तांत्रिक माहिती त्यांच्या उत्पन्नासाठी बाजारपेठ बघायची, सोलर वीज, शेती विमा, स्मार्ट फोन्स, अशा प्रकारे सर्व सपोर्ट देतो. शेतकर्‍यांशी थेट संवाद साधतो, अडचणी असल्यास समजून घेतो. नंतर त्यांनी अकरा महिन्यांत कर्ज फेडायचं. अशा प्रकारे त्यांना स्वयंपूर्ण करायचं की जेणेकरून ते कायम व्यवस्थित शेती करतील, आणि उपाशी राहणार नाहीत. उत्पादन अधिकाधिक वाढून पैसे हातात राहतील. राहणीमानाचा दर्जा उंचावेल, आफ्रिकेत गरिबी आणि अज्ञान भरपूर आहे, त्यामुळे शेतीसाठी अशी मॉडेल्स राबवणं गरजेचं आहे. या वर्षी पाच हजार पाचशे मेट्रिक टन उत्पन्न झालं, असं हे शाश्वत विकासाचं (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) काम मला अर्थपूर्ण वाटतं. कामात अनेक आव्हानं आहेत पण मी लोकांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवू शकतोय, ही बाब खूप समाधान, आनंद मिळवून देते.
या कामात आमचा ‘वर्ल्ड बँक’, ‘यूएसएआयडी’ सारख्या संस्थांशी संबंध येतो. त्यांचा सपोर्ट असतो.

प्रश्‍न : अनेक आफ्रिकन देशांतल्या शेतीचा तुला अनुभव आहे. तिथं काम करताना कसं वाटतं? आपल्यापेक्षा काय फरक जाणवला ?
यशोधन : पूर्व आफ्रिकेत मुख्यत: मका शेती करतात. सामान्यत: अजूनही पारंपरिक शेती आहे, हातानं सगळी कामं करतात. खूप लहान शेती असते. ट्रॅक्टर वगैरेसुद्धा नाही आणि कामगार खूप उपलब्ध आहेत.
भारतात शहरं वाढताहेत. नोकरीच्या संधी खूप, म्हणून लोक गावाकडची शेती सोडून शहरात जातात. आफ्रिकेत हा पर्याय अजून फारसा नाही. त्यामुळे लोक शेती सोडून अजून जात नाहीयेत. शेती करणंच सामान्य आहे. अर्थात जगात कुठंही शेतकर्‍यांच्या मनावर जे ओझं असतं. पाऊस पडेल का, पीक नीट येईल ना, हाती काय किती पडेल, कष्ट वाया जाणार का अशी सर्व अनिश्चितता इथंही त्यांना सतावते.
आपल्याकडे शेतकर्‍यांचं कर्ज वाढत राहतं. आफ्रिकेत हे हळूहळू विकसित होताहेत. पहिल्यांदाच अनेकजण कर्जं घेताहेत. शेतीसंबंधी बर्‍याचशा संस्था या सामाजिक मूल्यं ठेवून काम करताहेत, आमचा म्हणजेच ‘ओएएफ’चा ही उद्देश केवळ नफा नसून शेतकर्‍यांना मानानं जगायला शिकवणं, त्यांची भरभराट आणि कायमस्वरूपी अन्नसुरक्षा हे आमचे उद्देश आहेत.
झाम्बिया, केनिया या देशांमध्ये कमर्शियल शेती कॉमन आहे. जिथं पाणी साठवण करू शकतात तिथं मशिननं इरिगेशन आहेत, एकंदर शेतीचा मोठा व्यापार आहे. शेतकर्‍यांना फायदा कमी, मधल्या लोकांना जास्त, असंही दिसतं.
छोटा-मोठा शेतकरी असला तरी ट्रेडर्स, प्रोसेसर्सनी हा व्यवहार व्यापला आहे हे चित्र मला वाटतं जागतिक आहे. यासाठी धोरणं बदलायला हवीत.

प्रश्‍न : काम करताना भाषेचा अडसर येतो का?
पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत पूर्वी आपल्यासारखेच ब्रिटिश राज असल्यानं इंग्लिश ही मुख्य भाषा आहे. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. तसंच मला अनेक स्थानिक भाषा, जसं की स्वाहिली, चचेवा समजतात. जुजबी बोलू शकतो. त्यामुळे मी संवाद साधू शकतो. लोक सहकार्य करतात. तसंच शंभर-दीडशे वर्षांपूर्वी अनेक भारतीय इथं व्यापाराला, नोकरी करायला आले. तो सांस्कृतिक दुवाही आहे.

प्रश्‍न : तुझी सहचरी याच क्षेत्रात आहे, बरोबर? एकंदर तिथं जीवन कसं आहे?
यशोधन : हो, केटलीन अमेरिकन आणि अमेरिकेत वाढलीये. ‘अग्रो इकॉनॉमिक्स’मध्ये मास्टर्स झालीये. तिनं ‘टेक्सास’ मधून, शेती, खते, अवजारे या क्षेत्रात मलावीत काम केलंय, अलीकडे तिनं पण ‘ओएएफ’ जॉईन केलं आहे. आम्ही दोघंही लोकांशी सहज कनेक्ट होतो, फिल्ड वर्क एन्जॉय करतो. आमच्या घर कुत्री-मांजरांचं गोकुळ आहे. जंगलात फिरणं, मित्र मंडळी, भेटी-गाठी खूप आहे. आमच्या गरजा कमी आहेत, टीव्ही आम्ही घेतलेला नाही, मी सर्व जागतिक आणि मराठी वृत्तपत्रं फोनवर वाचतो.
मलावी देश छोटा, गरीब आहे, पण मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. रस्ते व्यवस्थित आहेत. मी कारपासून मोठमोठ्या जीप्स, पिक अप्स सर्व वाहनं चालवतो. नॅशनल पार्कला गेलात तर उत्तम ुळश्रवश्रळषश आहे. अजून टुरिस्ट मॅप वर नसल्यानं गर्दी नसते. डोंगर, सुंदर हिरवेगार आहेत. हवा शुद्ध, प्रदूषण नाही. लेक मलावी समुद्रासारखा आहे .निळंशार अथांग पाणी. ताज्या पाण्यातल्या माशांची विविधता सर्वांत जास्त आहे. अर्थात आरोग्यसुविधा वगैरे कमी आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत पण डेंटिस्ट किंवा मोठी हॉस्पिटल्स दूर दूर आणि कमी आहेत. डासांपासून खूप सांभाळावं लागतं.

तू पुढच्या पिढीला काय सांगशील?
मळलेल्या वाटेनं जात ‘कम्फर्ट झोन’मध्ये जाणं सोपं असतं. पण युवा वर्गानं अशी वेगवेगळी क्षेत्रं ट्राय निवडायला हवीत. मुलांना वेगळ्या आवडी असतील तर पालकांनी पण प्रोत्साहन द्यायला हवं. त्यांचं कुतूहल मारायला नको. डोळस पाठिंबा द्यायला हवा. स्वत:ची मतं लादणं टाळावं. वेगळे मार्ग सोपे सरळ नाहीत. नोकरीच्या संधी कमी आहेत. पण आता नोकरीच्या संधी वाढत आहेत. नवीन स्टार्टअप आहेत. संघर्ष प्रत्येक करिअरमध्ये असतो, इथे थोडा जास्त आहे. मानसिक तयारी हवी की, लगेच लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या नाहीत, सामाजिक दृष्टीनं काम, ध्येय ठेवलं तर मग धडपड सुसह्य होते. नुसती नोकरी करण्यापेक्षा त्यातून समाजासाठी, मानवतेसाठी काही करायला मिळेल, ही आंतरिक ओढ हवी.

भारतात परत येऊन इथं काम करण्याची इच्छा आहे का?
भारतात येण्याची तीव्र इच्छा आहे.. संधी शोधतोय. भारतातही मी परिणामकारक काम करू शकेन का, हा प्रश्‍न आहे. पण प्रयत्न आहेत. व्यापक दृष्टिकोनातून विचार केला, तर भारतात काम करायला नक्कीच आवडेल!

(वरील मुलाखत ही, ‘फेसबुक’वर श्री आत्माराम परब यांनी यशोधनची घेतेलेली मुलाखत आणि त्यांनतर त्याच्याशी ई-मेलद्वारे साधलेला अधिक सविस्तर संवाद यावर आधारित आहे.)
yashghar92@gmail.com

मुलाखत : मंजिरी घरत

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.