Now Reading
आधुनिक ‘सावित्री’

आधुनिक ‘सावित्री’

Menaka Prakashan

स्त्री-पुरुष आणि सामाजिक स्थिती या सगळ्याची घुसळण आपण अनुभवत असतो. त्याचीच मनोसामाजिक चिकित्सा करणं आणि माणूस म्हणून आपल्या जाणिवा अधिक प्रगल्भ करणं हा या लेखमालेचा मुख्य उद्देश आहे…

आपल्या अंतर्मनाचा ठाव जेव्हा आपल्याला लागतो, तेव्हा खर्‍या अर्थानं आयुष्याचा सूर सापडतो, असं म्हणतात. हा ठाव घेण्याचं काम पूर्वीपासून होतंय. सत्यवानाच्या सावित्रीला हा ठाव सापडला आणि म्हणूनच तिनं आपल्या जिद्दीच्या जोरावर आपल्याला जे हवं ते घडवून आणलं. आपणही नववर्षाच्या निमित्तानं सावित्रीकडून ही प्रेरणा घेत, अंतरीचा दीप जागवू या, स्वतःला ओळखू या आणि स्वतःवर प्रेमही करूया!

वटपौर्णिमेला वडाला सुताचे फेरे देत नवर्‍याची सात जन्म सोबत मागणार्‍या सावित्रीची कथा व तिची मांडणी आपली आजी, आई, काकू, मामी, मावशी यांनी पिढ्यान्पिढ्या जपली आहे. देवळात, पारावर पुराणिकांकडून ती सातत्यानं ऐकली जात आहे अन् अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचं व्रत या एकविसाव्या शतकाची वीस दशकं संपत असतानाही तेवढ्याच श्रद्धेनं, पारंपरिकतेनं पार पाडलं जात आहे. पुरुषप्रधान समाजातल्या स्त्रियांना ‘पतिपरायण’ असं बिरुद मिळवण्यासाठी शतकानुशतकं केली जाणारी कर्मकांडंही काही नवी नाहीत. स्त्रीवर लादलेली बंधनं, पुरुषाला महत्त्व देणारी पारंपरिक व्रत-वैकल्यं यांनी स्त्रियांना निकृष्ट अवस्थेत ठेवलेलं आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकातलं एकविसावं दशक उजाडत असतानाही स्त्री साक्षरतेचं प्रमाण हे दहा टक्केही नाही आणि एकीकडे करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करत जाणारी स्त्री दिसत असताना व ‘मी टू’ सारख्या चळवळींचा प्रसार होत असतानाही घरगुती हिंसाचार व लैंगिक छळवणुकीचे प्रकारही काही कमी होताना दिसत नाहीत.

स्त्रियांच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिकीकरणामुळे ‘इतरांसाठी त्याग करणं हेच स्त्री जीवनाचं सार्थक’ हे मिथक समाजात घट्ट रुजलेलं असल्यामुळे इतरांवर अवलंबून राहणं (लहानपणी वडील, मोठेपणी नवरा, वृद्धपणी मुलगा) व इतर पुरुष नात्यांमधून म्हणजे अमक्या तमक्याची मुलगी/बायको/आई असं स्त्रीला ओळखण्याचं शिकवलं जात असल्यामुळे सध्याच्या काळात अर्थार्जन (भले कुटुंबासाठी असो) करण्याची परवानगी (स्वातंत्र्य???) असली तरी कमवत असलेल्या पैशांचा विनियोग, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य व जोखीम घेण्याची वृत्ती या गोष्टी स्त्रियांमध्ये सामाजिक दबावाशी संबंधित दिसून येतात. या वेळी प्रकर्षानं महाभारतात व्यासांनी सांगितलेली सावित्रीची गोष्ट- सावित्रीची एक वेगळीच जाणीव करून देते.

महाभारतातली सावित्री ही अश्‍वपती राजाला लक्ष्मीच्या कृपाप्रसादानं झालेली मुलगी. अत्यंत तेजस्वी, समजूतदार व प्रगल्भ. ती लग्नायोग्य वयाची झाल्यावर तिचं व्यक्तिमत्त्व तेजस्वी व तीव्र बुद्धिमत्तेनं झळाळतं. तिच्या या तेजाची धास्तीच आजूबाजूच्या राजकुमारांना वाटत राहते. मग तिला लग्नासाठी मागणी कोण घालणार? मग अश्‍वपती राजा, सावित्रीचे वडील तिलाच तिचा पती शोधून काढण्याची परवानगी देतात. प्राप्त परिस्थितीचा विचार करता स्वयंनिर्णयाचं स्वातंत्र्य त्यांनी सावित्रीला देणं हे खरंच नवल आणि मग सावित्रीला सत्यवान भेटतो. राज्य गमावून वनवासी झालेला ऐश्‍वर्यहीन, सत्ताहीन, डोक्यावर म्हातार्‍या आई-वडिलांची जबाबदारी असलेला उमदा तरुण. सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल ठाऊक होऊनसुद्धा ती सत्यवानाची निवड करते तेव्हा नवल व कौतुक वाटतं ते सावित्रीच्या आंतरिक जागेपणाचं. सावित्रीनं सत्यवानात काय पाहिलं या प्रश्‍नापेक्षा महत्त्वाचं ठरतं ते आपल्याला काय हवं हे सावित्रीला नीट समजलं होतं. तिला आपल्या आवडीचे, निवडलेल्या जोडीदाराबरोबर जगण्याचे अग्रक्रम पक्के करता आले. त्यासाठी तिचा स्वतःवरही खूप विश्‍वास असला पाहिजे. त्यामुळेच अल्पायुषी सत्यवानाशी लग्न करून स्वयंनिर्णयाची जबाबदारी ती जाणतेपणानं स्वीकारते आणि आपल्या तेजस्वी, ठाम, आत्मविश्‍वासपूर्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर सत्यवानाला मृत्यूपासून खेचून त्यावर तिनं केलेली मात हा विलक्षण चमत्कार ठरतो. मृत्यू आणि अमरत्व, स्वतःवरचा विश्‍वास, जोखीम घ्यायची वृत्ती याविषयीचं चिंतन म्हणजे ‘सावित्री.’

मग आजच्या काळातल्या सावित्रींनी नक्की काय करायला हवं? उच्चशिक्षित, नोकरी करणारी असो, गृहिणी असो वा अल्पशिक्षित असो; सगळ्यात उत्तम म्हणजे पुरुषसत्ताक या जगात स्त्रीनं आधी स्वतः स्वतःचा स्वीकार करायला हवा. स्वतःला जाणून घेण्याचा व स्वतःला स्वीकारण्याचा प्रयत्न हा प्राचीन काळापासून सुरू आहे. ‘बायबल’मध्ये ‘नो द सेल्फ’ असं वचन आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये, वेदांमध्ये आणि शांकरभाष्यातही ‘स्व’ओळख व ‘स्व’स्वीकार याबाबत विस्तृत विवेचन दिसून येतं. ‘स्व’चे स्वतःला होणारं संवेदन आणि त्याचा स्वीकार करून स्वतःला विकसित करणं ही मानवी जीवनातली निरंतर प्रक्रिया आहे आणि स्त्रियाही त्याला अपवाद नाहीतच. स्वतःला प्रश्‍न विचारत उत्तरं शोधायला लागलो की आपोआप ‘स्व’ स्वीकारण्याची वाटचाल सुरू होते. स्त्रियांचे सामाजिकीकरण हे बहुधा नकारात्मक स्वरूपात होतं. अगदी नको असताना झालेल्या मुलीचं नावसुद्धा ‘नकोशी’ ठेवलं जातं. त्यामुळे नकारात्मक अनुभव, नकारात्मक विचार यांमुळे ‘स्व’ची प्रतिमा नकारात्मक स्वरूपात तयार होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त दिसतं. सिंक्झेट महाली आणि फिगरस्की (१९८४) यांनी केलेल्या संशोधनानुसार स्त्रिया या बहुतेक वेळा स्वतःविषयी समाधानी नसतात. स्वतःला मोलाची, महत्त्वाची समजत नाहीत. स्वतःविषयी प्रतिकूल मत तयार करतात. त्यांची स्वप्रतिष्ठा ऋणात्मक असते. अर्थातच स्वप्रतिष्ठा जर ऋणात्मक असेल तर स्वतःमधल्या क्षमतेवर विश्‍वास नसतो, किंबहुना स्वतःमधल्या क्षमतांची योग्य जाणीवच नसते. अशा वेळी स्वअपंगत्वाचा वापर केला जातो. स्त्रियांमध्ये स्वअपंगत्व सामाजिक संस्कारांतून रुजवलं जातं. त्यामुळे कित्येकदा स्वतःकडे कमीपणा घेऊन, दुसर्‍याला मोठेपणा देऊन स्वतःचं अवमूल्यन करण्याची वृत्ती स्त्रियांमध्ये जास्त आढळते. त्यामुळे दुसर्‍यांनी/इतरांनी आपल्याला स्वीकारणं हे स्त्रियांसाठी म्हणून खूप महत्त्वाचं ठरतं.

सत्यवानाच्या सावित्रीनं आणि जोतीबाच्या सावित्रीनंही ‘स्त्री’च्या स्त्रीत्वावरच्या सुप्त ज्वालेला, आत्मबलाला खरं तर फुंकर घालून प्रज्वलित केलेलं आहे आणि शिक्षणाची वाट दाखवली आहे. स्वनिर्भरतेचा मार्गदीप दिला आहे.
‘अ मॅन कॅन नॉट बी कम्फर्टेबल विथआऊट हिज ओन अप्रुवल ’- मार्क ट्वेन.
यानुसार इतरांनी आपला स्वीकार करणं महत्त्वाचं असलं, तरी मुळात आपण आपला स्वीकार सकारात्मक रीतीनं करणं, स्वतःवर विश्‍वास ठेवणं, निर्णयावर ठाम राहणं हे स्त्रियांनी आत्मसात करणं आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर ते व्यवहारातसुद्धा ठामपणे वापरता यायला हवं तरच शिक्षणाचा उपयोग होईल. भले आपण सत्यवानाची सावित्री नसू, पण ज्योतीची सावित्री आणि सावित्रीच्या लेकी निश्‍चितच आहोत. त्यासाठी प्रत्येकानं स्वतःवर प्रेम करणं, स्वतः स्वतःसाठी आनंदी राहणं, सतत अपराध गंड न बाळगता स्वतःचा अभिमान बाळगणं आणि ‘मी ही अशी छान माणूस’ हे स्वतःशीच किमान कबूल करणं हीच माणूसपणाची जाणीवरेखा आहे…

तर या पुरुषसत्ताक पद्धतीला बाजूला ठेवून स्वतःसाठी म्हणूया-
‘भलेबुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर
आणि भरारी घेऊ स्वबळावर…’

– डॉ. सुषमा भोसले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.