Now Reading
आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!

Menaka Prakashan

काही माणसं अचाट असतात, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आपण अचंबित होतो. त्यांपैकीच एक म्हणजे डॉ. लीला रानडे-गोखले. त्या उत्कृष्ट गायनॉकॉलॉजिस्ट तर होत्याच, विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं शिवाय मराठी, संस्कृत, इंग्रजी, रशियन भाषेच्या उत्तम जाणकार होत्या. वयाच्या नव्वदीनंतरही मोटार चालवायच्या आणि घरातली उपकरणंही दुरुस्त करायच्या. अशा व्यक्ती स्वतःचं आयुष्य एका उंचीवर नेऊन ठेवतातच पण इतरांसाठीही प्रेरणेचा धबधबा होतात.

‘‘आमच्या नेहमीच्या स्वयंपाकाच्या बाई रजेवर होत्या, बदली बाई चुलीवर स्वयंपाक करत होत्या, त्यांचं काम झालं, चुलीवर त्यांनी दुधाचं पातेलं ठेवलं. त्यांना चुलीच्यावर असलेल्या फळीवर डबा ठेवायचा होता. हात पोचत नव्हता म्हणून त्या चुलीच्या कोपर्‍यावर चढल्या. तोल गेला आणि त्या दुधाच्या पातेल्यात पडल्या. मोठं-मोठ्यानं ओरडू लागल्या. आई, आजी, काकू सगळ्या धावल्या. आम्ही सगळे खाली आलो, त्या ‘पाणी पाणी’ म्हणत ओरडत होत्या, मी फुलपात्र भरून पाणी देत होते, त्यांची तगमग पाहवत नव्हती. डॉक्टर आले त्यांना कसलंसं इंजेक्शन दिलं, त्या शांत झाल्या. तगमग थांबली, झोप लागली. या घटनेचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. डॉक्टर दुखणं थांबवू शकतात हे समजलं आणि मग आपण डॉक्टरच व्हायचं ठरलं!’’ अवघ्या एकशे तीन वर्षांच्या डॉ. लीला रानडे-गोखले हसतमुखानं सांगतात. त्यांच्याशी संवाद म्हणजे आपल्याच घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीशी साधावा असा, अगदी सहज. वयाचं शतक पूर्ण केल्याच्या खुणा ना त्यांच्या चेहर्‍यावर ना बोलण्यात! तल्लख स्मरण, सुहास्य वदन आणि कार्यमग्न वृत्ती, साक्ष देत होती, ‘‘एज इज जस्ट नंबर’’.

‘‘आम्ही शाळेत असताना सत्याग्रहाची चळवळ सुरू होती. आम्ही मुलींनी सत्याग्रह करून शाळेवर तिरंगी झेंडा लावला होता. ‘गांधी-नेहरू लढती मिठगिरी, स्वातंत्र्यासाठी लढता लढता दोघेही पडले शत्रूच्या हाती’ अशी गाणी म्हणून ‘वंदे मातरम’ घोषणा देत असू. मला बर्‍याच कविता आवडायच्या. मी घरी कधीच अभ्यास करायचे नाही, पण शाळेत मन लावून शिकत होते. ते छान लक्षात राहायचं. ज्याला आपण इंग्रजीत ‘बॉर्न विथ अ सिल्व्हर स्पून इन द माऊथ’ म्हणतात तशी मी होते, मला ते माहीत नव्हतं. इतरांना ते माहीत असावं पण मला कोणी निराळं वागवलं नाही. दारात मोटार उभी असायची पण घरी वातावरण साधं होतं. डब्यात खायला पोळी-भाजीच असायची. माझे परकर रेशमी, बंगलोरी, धारवाडी खणाचे असायचे पण मला मैत्रिणींचे चित्राचे, छापलेले आवडायचे. हस्ताक्षर, पाठांतर, जॉमेट्री रायडर्स सोडवण्याच्या माझ्या हातोटीमुळे मी शिक्षकांच्या लक्षात राहू लागले. पुण्यातल्या सेवासदन आणि हुजूरपागेत शालेय शिक्षण झालं. मॅट्रिकला ‘बरे’ मार्क होते. सायन्समध्ये डिस्टिंक्शन होतं, फर्ग्युसनमध्ये नाव घातलं. मी कॉलेजमध्ये स्मार्ट होते. आम्हा तिघी मैत्रिणींना मुलांनी ‘सासरा’ असं नाव दिलं होतं. थ्री ब्युटीज ऑफ एफ वाय, साठ्ये, समर्थ, रानडे. कॉलेजमध्ये असताना जातीनिहाय बक्षिसं असत. मला ते काही माहीत नव्हतं पण मला ते मिळालं पण तेव्हा जातीनिहाय बक्षीस देणं मला काही आवडलं नव्हतं. पुढे कळलं विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा मोठ-मोठ्या स्कॉलरशिप्स असतात. कॉलेजमध्ये लाल शेरा आला की राग यायचा. त्यावर चिडून इतका अभ्यास करायचे की, युनिव्हर्सिटीमध्ये केमिस्ट्री प्रॅक्टिकल्समध्ये पहिली आले. बायोलॉजीला चित्र काढताना रडकुंडीला आले. मग जे दिसेल ते काढायला लागले. नंतर त्यात इतकी तरबेज झाले की इतर विद्यार्थी माझं जर्नल बघायला नेत असत. ‘केल्याने होत आहे रे’ हा विचार कायम ठेवला. कॉलेजमध्ये लेक्चर्स मन लावून ऐकायची, नोट्स घ्यायचे, पुस्तक वाचून अभ्यास करायचे. त्या वयातली मैत्री, भांडणं, हॉस्टेलचे दिवस, जिद्द, इरेला पेटून अभ्यास करणं सगळ्या टप्प्यातून गेले. वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईत सरकारी ग्रँट मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. वय होतं अठरा वर्षं! एकट्यानं राहणं, अनोळखी परिसर, मुंबईची हवा मानवली नाही. तरी या सगळ्याच्या उपर डॉक्टर व्हायची माझी जिद्द मोठी होती. त्या जिद्दीनं एप्रिल १९४१ मध्ये एमबीबीएस झाले. माझे शिक्षक माझा ‘गर्ल विथ इंटेलिजन्ट आय’ असा उल्लेख करत. त्यानंतर कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झिराडांच्याकडे जे शिकले ती शिदोरी मला जन्मभर पुरली आहेच. मी पुण्याची, नऊवार ओचा-कासोटा घालून साडी नेसणारी, कुंकू लावणारी, त्यावर डॉक्टरचा पांढरा कोट घालून वावरत असे. त्या काळी वारंवार दंगे होत, पण मला सगळं इतकं अंगवळणी पडलं होतं की, आम्ही तिघी न घाबरता इराण्याच्या हॉटेलमध्ये जेवायला जात असू.’’ तल्लख स्मरणशक्ती असलेल्या लीलाताई सगळा प्रवास सहज उलगडत होत्या.

‘‘एक गंमत सांगते’’ असं म्हणत लीलाताई म्हणाल्या, ‘‘यांचा म्हणजे बाळकृष्ण लक्ष्मण गोखलेंचा जन्म रामनवमीचा पण तरी यांचं नाव होत बाळकृष्ण! यांची मोठी बहीण गोदावरीताई परुळेकर त्यांना बंडू म्हणायची. ते ऐकून मीही त्याच नावानं हाक मारायचे, माझे सासरे म्हणजे वकील लक्ष्मण रघुनाथ गोखले यांना ते काही रुचलं नाही, आणि मग मी यांना ‘बाबा’ अशीच हाक मारायला लागले. बाबा बी.एस्सी.डिस्टिंक्शन, एम.एस्सी.करत होते, तरी बरोबरीनं कम्युनिस्ट पार्टीचं कामही जोरात करत होते. देवावर विश्वास नव्हता. त्यांना संगीत मात्र आवडायचं.’’ लीलाताई आठवणींचे एकेक कप्पे उलगडत गेल्या.
लीलाताईंनी पहिल्या प्रयत्नात ‘एमडी गायनॉकॉलॉजिस्ट’ ही पदवी मिळवली. तो काळ फार वेगळा होता, त्यामुळे, शिक्षण पूर्ण होइपर्यंतचा तो काळ म्हणजे त्यांच्यासाठी धैर्य, शौर्य, अभ्यास, कणखरपणा असा काहीसा होता. पण ‘मी काही वेगळं करते आहे असं त्या वेळी त्यांना काही वाटत नव्हतं’ असं त्या म्हणतात. प्रत्येक वेळी कृतीत विवेकबुद्धी जागरूक ठेवून लीलाताई कृतिशील होत्या. डॉक्टर म्हणून सतत विविध अभ्यासपूर्ण प्रयोग करत होत्या.
लीलाताई सांगतात, ‘‘गर्भधारणा झाल्यावर सर्वसाधारणपणे तीन टक्के बाळांनाच काहीतरी विकृती निर्माण होते. निसर्ग तेव्हा गर्भपात करतो, पण हे त्या स्त्रीला किंवा डॉक्टरला माहीत नसतं म्हणून फीमेल हार्मोन्स दिली जातात. त्यामुळे गर्भपात होत नाही पण काही वेळा विकृत मूल जन्माला येतं. मी माझ्या संशोधनाद्वारे विकृती ही गरोदरपणात फीमेल हार्मोन्स देण्यामुळे निर्माण होत नाही हे सिद्ध केलं. जगात दुसर्‍या कुणीही हे केलेलं नाही. मी इंग्लंडमधल्या दहा वर्षांत जन्मलेल्या मुलांची संख्या मिळवून त्यात हार्मोन्स न वापरलेल्या विकृत मुलांची संख्या घेतली आणि हे शोधून काढलं. त्यात काहीही फरक झालेला नव्हता. म्हणजेच विकृतीचं कारण, गरोदरपणात वापरलेली फीमेल हार्मोन्स हेही नव्हतं, हे सिद्ध होतं.’’

लीलाताई पुढे त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या संशोधनाबद्दल सांगताना म्हणाल्या, ‘‘१९९१ च्या नोव्हेंबरमध्ये पुण्याला एक ‘ऑल इंडिया अ‍ॅडोलसन्ट ऑब्स्टॅट्रिक अँड गायनॉकॉलॉजिकल कॉन्फरन्स’ भरली होती. त्यात मी महिलांच्या मासिक पाळीच्या वेळची पोटदुखी या विषयावर एक निबंध सादर केला. मी त्यासाठी जे औषध देत होते ते जगात कुठेच कोणी देत नाही असं आढळलं. १९२५ साली पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी ही, गर्भाशयाच्या मज्जातंतूंना आलेल्या सुजेमुळे होतं असं सिद्ध झालं होतं. त्यावर पोटाची शस्त्रक्रिया करून ते मज्जातंतू मधेच तोडून टाकणं हा उपाय सुचवलेला होता. तशा बाराशे शस्त्रक्रियांचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. मीसुद्धा सुरवातीच्या काळात तशा शस्त्रक्रिया करत होते. १९२९ साली मज्जातंतूत आलेली सूज जीवनसत्त्व ‘ब-१’ बरी करते असं सिद्ध झालं होतं. या शोधाला त्या वर्षीचं ‘नोबेल पारितोषिक’ही मिळालं होतं. पण पाळीच्या वेळी पोटदुखी बरी करायला हे जीवनसत्त्व उपयुक्त असेल असं न वाटल्यानं जगभर शस्त्रक्रिया सुरूच राहिल्या. पुढच्या प्रगतीमुळे आता दुर्बीण आणि लेझर किरण वापरून ही शस्त्रक्रिया करतात. पोट उघडत नाहीत. तसंच विविध प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात, त्यानं पोट दुखत नाही पण त्याचे दुष्परिणाम होतात आणि हे उपाय तात्पुरतेच असतात. माझ्याकडे १९५७ च्या सुमारास पाळीच्या वेळी पोटदुखीची तक्रार असणारी एक केस आली तेव्हा तिला नियोजनबद्ध पद्धतीनं जीवनसत्त्व ‘ब-१’ देऊन बघितलं. ती पूर्णपणे बरी झाली. मी पुढे तीस वर्षं हाच उपचार करत राहिले. अशा दोनशे आठ केसेस जमल्या. माझे निष्कर्ष पडताळून पाहण्यासाठी भरपूर वैद्यकीय पुस्तकं वाचली. तेव्हा हा उपाय माझ्याशिवाय कुणाला सुचला नाही, असं लक्षात आलं आणि फारच आश्चर्य वाटलं. मग हा प्रयोग ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे’च्या साधारण सात-आठ शाळा आणि चार बोर्डिंग्ज इथं राबवला. शाळांमध्ये व्याख्यानं देऊन विविध केसेस अभ्यासल्या. रुग्णांच्या विविध टप्प्यांवर प्रतिक्रिया आजमावल्या तेव्हा, ‘आपण माझी महामारीतून सुटका केलीत’, ‘तुम्ही मला असह्य दुखण्यातून सोडवलंत’ अशा आशयाची पत्रं आली. जवळपास सत्त्याऐंशी टक्के स्त्रिया या त्रासातून पूर्ण बर्‍या झाल्या, आठ टक्के रुग्णाची तक्रार कमी झाली आणि पाच टक्के स्त्रियांमध्ये काहीच फरक पडला नाही. ‘भारतीय वैद्यकीय संशोधन अनुसंधान संस्थे’च्या मासिकात याविषयीचा लेख प्रसिद्ध झाला होता.

पाळीच्या वेळी होणार्‍या असह्य वेदनेवर शस्त्रक्रियेशिवाय मात करण्याचा हा मोठा शोध डॉ. लीला गोखले यांनी लावला. त्यांनी आपल्या अनुभव आणि अभ्यासानं तो वारंवार तपासून अमलात आणला आणि अनेक जणींना त्याचा मोठा लाभ झाला असं त्यांनी नोंदवलं आहे.
डॉ. लीला गोखले यांनी ‘वार्धक्य आणि वृद्धावस्था’ यावरचा एक शोध निबंध जागतिक परिषदेत मांडला होता. त्यानुसार, ज्येष्ठांनी काय करावं आणि काय करू नये जेणेकरून उतारवयात निरोगी, कार्यक्षम, त्रासरहित आयुष्य लाभेल ते लिहून ठेवले आहे. त्यात अनेक मुद्दे अतिशय बारकाव्यानं मांडले आहेत, थोडक्यात मथितार्थ असा आहे की, वयाच्या पंचावन्न वर्षानंतर दात खराब झाले तर उपटून कवळी बसवावी, साठीच्या पुढे पोटात अपचनानं अस्वस्थता आली तर पातळ पाचक औषध घ्यावं. जीवनसत्त्वं योग्य प्रमाणात घ्यावीत आणि मुख्य म्हणजे आपल्या डॉक्टरांना वेळच्या वेळी प्रकृती दाखवावी. त्याचबरोबर त्यांनी साठीनंतर जड पदार्थ, तेलकट, चमचमीत, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळावं. एक ना अनेक मुद्दे यात बारकाईनं नोंदवून ठेवलेले आहेत.
या लेखाचं काम सुरू असताना दुर्दैवानं डॉ. लीला गोखले यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. निवर्तण्याच्या चार दिवस आधीपर्यंत शब्दकोडं सोडवणं, सगळ्यांबरोबर डायनिंग टेबलवर येणं, ऑनलाइन पद्धतीनं संस्कृत भाषा शिकणं असा त्यांचा दिनक्रम शांतपणे सुरू होता.
लीलाताईंना तीन मुलं आहेत. प्रत्येकानं आपल्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि लीलाताई म्हणायच्या त्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रात अव्वलतेचा ध्यास ठेवला आहे.

लीलाताईंच्या ज्येष्ठ कन्या अनीता बेनिंजर ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड अ‍ॅक्टिव्हिटीज’ या संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्या सांगतात, ‘‘माझी आई सुपरवूमन, अत्यंत वक्तशीर, परफेक्शनिस्ट बाई! वयाची नव्वदी उलटेपर्यंत ती मोटार चालवत होती. भाषा शिकणं ही आईची आवडती गोष्ट! पन्नाशी ओलांडल्यावर रशियन भाषा एम.ए.च्या पातळीपर्यंत शिकली. संस्कृत उत्तम होतं, वयाच्या ब्यांशीव्या वर्षी ती ‘मराठी प्राज्ञ’ झाली. याशिवाय कोणतीही गोष्ट करताना त्या गोष्टीत प्रावीण्य मिळेपर्यंत ती ते करत राही. ‘जे करशील त्यात जगातली सर्वोत्तम हो’ हे तिचं पालुपद असायचं. तिचं दुसरं म्हणणं म्हणजे, ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’, तिसरं पालुपद म्हणजे ‘अजिबात पळपुटेपणा करायचा नाही’. आईचा तिनं आम्हाला लावलेल्या वळणावर पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळे तिनं आम्हा भावंडांवर अवास्तव बंधन घातली नाहीत. अतिशय प्रेमळ, कडक शिस्तीची, कर्तृत्ववान, धीराची बाई म्हणजे आमची आई!’’

लीलाताईंचे चिरंजीव डॉ. अतुल गोखले हे न्यूयॉर्क शहराजवळ लाँग आयलँड इथे मेटालर्जिस्ट आहेत. ते सांगतात, ‘‘सतत वर्तमानात जगण्याची जिद्द, सद्य परिस्थितीबद्दल जागरूक, थेट अर्जुनाच्या नेमबाजीची आठवण करून देणारी एकाग्रता, निर्धार, कार्य धसाला लावण्याची क्षमता, कल्पकता, तल्लख बुद्धिमत्ता, अद्भुत स्मरणशक्ती, लीलया पंचाग वाचन इथपासून ते टोस्टर, गाडीचा टप दुरुस्त करणं असं आईचं प्रत्येक बाबतीत सर्वज्ञ असणं अचंबित करणारं होतं. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू निरीक्षण करताना आपल्याला यातले दोन-चार गुण तरी का नाही आले असं काहीसं गमतीनं वाटून जातं. आईची दोन पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध आहेत. तिच्या आयुष्यावर असलेलं ‘माझी गोष्ट’ आणि वैद्यकीय अनुभवावर आधारित, ‘अनुभवाचे बोल’. ’’
व्यावसायिक असलेल्या लीलाताईंच्या कनिष्ठ कन्या अनुपमा ओक सांगतात, ‘‘बागकाम, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, स्वयंपाक एक ना अनेक बाबबींत आई पारंगत होती. प्रत्येकाशी तिचा एक खास बाँड होता. ‘दुसरा कसा का वागेना आपण योग्य तेच करावं’, ‘आळस हा माणसाचा शत्रू असतो’, असे एक ना अनेक तिचे विचार दिशादर्शक आहेत. ती सगळ्यांना हवीहवीशी वाटायची. तिच्या विचारांना एवढी खोली आहे की, ती जे करते त्याच्या मागे अभ्यास असतो. त्यामुळे आम्हीच काय, सगळेच तिचं ऐकायचे. वयाच्या ब्याणव्या वर्षी तिच्या गाडीचा परवाना नूतनीकरण करायला आम्ही गेलो तेव्हा तिथले अधिकारी तिच्या ‘फॅन क्लब’मध्ये सहभागी झाले. तिच्यामुळे आमच्या घरात एक ऊब जाणवायची.’’

डॉ. लीलाताई गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू आहेत, लहानपणी वाटणार्‍या भीतीचं त्यांनी स्वतःच्या मनानं विश्लेषण केलं, ‘होणारे न चुके जरी ब्रह्मा तया आडवा।’ मग का आणि कशासाठी भ्यायचं, काय होणार आहे, भिऊन काही साध्य होणार का?’ अशा अनेक बाबी त्या विचारसरणीत होत्या आणि मग भीतीवर मात साध्य झाली. तसंच डावखोरी आहे म्हणून घरातल्या ज्येष्ठांनी चापटी मारली की उजवा हात वापरला जायचा. या बाबीकडे अतिशय सकारात्मकतेनं बघत डॉ. लीलाताई म्हणायच्या, ‘‘मी दोन्ही हात वापरू शकते, शस्त्रक्रिया करतानाही दोन्ही हातांनी कात्रीनं कापू शकते.’’ भविष्यात ते त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य ठरलं. अगदी वैद्यकीय तज्ज्ञांनीही नावाजलेलं!
डॉ. लीलाताई यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेतल्यावर असं वाटतं, त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण होतं.

– पल्लवी मुजुमदार

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.