Now Reading
अशीही पाखरे येती

अशीही पाखरे येती

Menaka Prakashan

‘‘योगी है क्या?’’ फोनवरून मुलीचा आवाज.
‘‘नही है। आप कौन?’’ पूर्ण बोलायच्या आधीच फोन कट झाला.
आज हे तिसर्‍यांदा झालं म्हणून केवळ संध्याकाळी आठवणीनं मुलाला विचारायचंच; असं ठरवून योगीची आई भाजी बाजाराला बाहेर पडली. पण आता मुलाचं वय आहे मुलांचे फोन येण्याचं. फार बाऊ करू नये. मुलांना समजतं काय करावं व कशी मैत्री ठेवावी. आपण फार लुडबूड करू नये. सोडून द्यावं झालं. भाजी घेऊन येईपर्यंत विचार बदलला.
एक आई व बदलत्या समाजाचा एक बदलू घातलेला घटक यांची वैचारिक मारामारी मात्र चालूच राहिली.

संध्याकाळी टीव्हीसमोर जेवतानाच काय ते योगी व त्या भेटायच्या. त्यात प्रश्‍न विचारायची आठवण राहावी कशी? आज ‘बालिका वधू’चं भविष्य ठरणार होतं. दादीसा काय निर्णय घेते? म्हातारी महाखट आहे. आख्ख्या घराची सर्व निर्णय घेण्याची सूत्रं स्वतःजवळ बाळगून आहे. इतर मुला-सुनांना आवाज पण काढू देत नाही. स्वतः सर्वांच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेते. आपण खर्‍या आयुष्यात असे निर्णय थोडेच घेऊ शकणार? जाऊ दे. टीव्हीच्या कथा व आपलं आयुष्य वेगळं असतं. बिछान्यावर पाठ टेकताना पुन्हा विचार बदलत गेला.
योगीचे वडील आता नाहीत. हा मुलगा व त्याच्या आयुष्याचे निर्णय आपल्यालाच घ्यायला हवेत. एकट्यानं निर्णय कसा घ्यायचा? कसं विचारायचं? अखेर सुनीलमामा किंवा कान्ही मावशी येतील तेव्हाच विषय काढू असं ठरलं. तेव्हा कुठे योगीच्या आईला झोप लागली.
आज जेवण वाढून झालं तरी योगी जेवायला येईना. तीनदा हाका मारल्या. तेव्हा बेडरूमचं दार उघडून, ‘‘आई, माझा फोन चालू आहे. तू थांबू नको. जेवून घे नं.’’ एवढं म्हणून पुन्हा दरवाजा बंद करून घेतला.
योगी घरात असताना त्याच्याशिवाय कसं जेवावं? मनाला पटायला हवं ना? एवढ्या वर्षांत कधी असं केलं नाही. पण झालं भलतंच.
अचानक दरवाजा उघडून शर्ट अडवकत योगी बाहेर आला.

‘‘आई, पैसे दे जरा शंभर-दोनशे.’’
‘‘कशासाठी?’’
‘‘हाँ, मैं बीस मिनट में पहुँच जाऊँगा। डोंट वरी. आय विल बी राईट देअर!!’’
ड्रॉवर हातानं ओढत त्यानं शंभरच्या पाच-सहा नोटा खिशात कोंबल्या. कानाला मोबाईल व खुर्चीवर बसून शु-लेस बांधता बाधता, ‘‘माझी वाट बघू नकोस. झोपून जा.’’ एवढंच म्हणाला. सोसायटीचा जिना उतरून गेलासुद्धा.
जेवून घे, झोपून जा, हे काय? नीट धड सांगणं नाही. कुठे जातो व पैसे कशासाठी? सार्‍या प्रश्‍नांचे गुंते सोडवण्यात योगीच्या आईची झोप उडाली.
गेली दहा वर्षं खूप कष्ट करून त्यांनी विशेष ध्यान ठेवून, मुलाला वाढवलं होतं. योगी त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. पण आता तो केंद्रबिंदू परिघाबाहेर निसटू पाहत आहे असं त्यांना वाटलं. पहाटे चार वाजता दोन मिस्ड कॉल.
संपूर्ण रात्र बेचैन विचारांचं वादळ. दुसरा दिवस उजाडला. रात्री काहीही झालं तरी रोजची बस गाठून मस्टर गाठणं थोडंच सुटणार आहे? ऑफिसमध्ये खुर्चीत टेकल्यावर योगीचा पुन्हा फोन आला, ‘‘आई, घरी आलोय. काळजी करू नको.’’
‘‘काय झालं ते सांगशील का? बोल नं, स्पष्ट काहीतरी.’’
‘‘सांगतो, माझ्या ऑफिसमध्ये एक ट्रेनी आहे. देविका मुदलीयार. ती होस्टेलवर राहते. मुंबईत नातेवाईक नाहीत. तिचे वडील मुंबईत आले होते. गेल्या आठवड्यात दादर स्टेशनवर उतरताना पडले होते. पायाच्या हाडाचे तुकडे झाले. परवा ऑपरेशन पण झालं, पण काही इन्फेक्शन झालं बहुतेक. गँगरीन झालं व ते काल रात्री गेले.’’
‘‘मग यातलं मला काहीच का सांगितलं नाही? उगाच माझं ब्लडप्रेशर वाढवतो. कुणाला मदत करणं चांगलंच आहे. मला दे तिचा नंबर. मी बोलून घेते.’’
‘‘नको आता. ते सर्व गावी गेले. काल तिचे नातेवाईक आले होते. सर्व विधी गावीच कर्नाटकला करणार आहेत.’’
सारा आठवडा उदास गेला. रोज तिचे फोन यायचे. फोनवर योगीची आईसुद्धा बोलली. अडल्या कुटुंबाला मदत करणं योग्यच आहे असंच त्यांनाही वाटत होतं, पण तेव्हा थोडंच माहीत होतं की, मदत करण्यामुळेच पुढे आयुष्य बदलणार आहे.

पंधरा दिवसांनी योगी व देविका मुदलीयार घरीच आले. प्रथमच पाहताना, तिच्याबद्दल कीव वाटली.
‘‘आन्टी’’ असं म्हणत ती बिलगली. नोकरीसाठी ती परत मुंबईत आली होती. ती गळामिठी खूप हवीशी वाटली.
थोडा वेळ गप्पा मारल्यावर कळलं, आता तिची आई तिला एकटीला मुंबईत राहण्यास परवानगी देत नव्हती व हॉस्पिटलचा खर्च पाहता नोकरी सोडून देणं वेडेपणाचं ठरलं असतं.
मुंबईची लठ्ठ पगाराची नोकरी न सोडता आयुष्याची गाडी पुढे काढायची होती.
‘‘आई, देविका आपल्याकडे राहू दे?’’
‘‘आन्टी, पेईंग गेस्ट बनके रहूँगी। होस्टेलसे ज्यादा मेरे लिये यहाँ बेहतर रहेगा।’’
जणू सर्व त्या दोघांनी पक्कं केलं होतं. पण निर्णयाचा शिक्का मारायचा होता योगीच्या आईला!

देविका व योगी दोघांचे नाश्ते, डबे आवरून योगीच्या आईचं ऑफिस सुरू झालं.
कान्ही मावशीनं कडक विरोध केला.
‘‘कोणाची कोण? तो बोलला व तू हो म्हणालीस?’’
सोसायटीत प्रश्‍न विचारले गेले.
‘‘कोण नवीन पाहुणे तुमच्या घरी?’’
देविकाला या सर्व प्रश्‍नांची सवयही झाली. योगीच्या आईला ऑफिसमधून येताना भाजी आणणं, गॅस बुक करणं, जाता जाता टेलिफोन बिल भरणं हे सर्व आवडू लागलं होतं.
देविकानं कधी गरम चहा हातात आणून दिला, तर आपल्याला एक मुलगी असती तर किती आराम वाटला असता, घरात एका मुलीच्या असण्याचं किती सुख असतं याचा अनुभव ती थोडेथोडके नाही, तर पुरती दोन वर्षं घेत राहिली.
या दोन वर्षांत देविका आपली पेईंग गेस्ट आहे, याचा विसर पडला. आपली पेईंग गेस्ट आता आपली सून होणार, याची हळूहळू खात्री होऊ लागली. योगीचं मन त्यांना वाचता आलं, मुलाचं मन राखायचं, त्याच्या आनंदात आपला आनंद शोधायचा, हेच उत्तम. आपले भविष्याचे ठरलेले प्लॅन त्यांनी सहज बदलले. नातेवाइकांचा विरोध बोथट झाला. घरच्यांनी स्वीकारलेला निर्णय इतर समाज स्वीकारतोच. नाहीतरी इतरांच्या परवानगी किंवा विरोधाचा विचार हल्ली कोण करतोय?

त्यांनी हळूहळू देविकाला लग्नाबद्दल विचारायला सुरुवात केली. खर्च कोणी कसा करावा? लग्न कुठे करावं? मुंबईत का मंगलोरला? असं विचारायचा प्रयत्न केला.
त्या दिवशी ऑफिसमध्ये जाता जाता देविकानं घरखर्चासाठी हातात पैसे दिले व म्हणाली, ‘‘आन्टी, केबलवाले को पैसे दिए। अगले महिने डीश टीव्ही लगायेंगे।’’
पण त्या दिवसाची संध्याकाळ भलतंच काही घेऊन आली.

योगी घरात शिरला तोच चेहरा पाडून.
‘‘काय झालं? तू एकटाच? देविकाला ऑफिसमध्ये उशीर होणार आहे का?’’
काही उत्तर न देता योगी बाथरूममध्ये शिरला. बराच वेळ बाहेर येईना. काय झालं? काय त्रास होत असावा त्याला? जेवणाची वेळ झाली तरी देविकाचा पत्ता नाही. काहीच नीट समजत नव्हतं.
‘‘दे फोन, विचारते कुठपर्यंत आली?’’
‘‘हा फोन माझ्याकडे देऊन गेली. सिमकार्ड तेवढं काढून नेलं.’’
‘‘का? तिच्या वाढदिवसाला आपण हा फोन घेऊन दिला होता ना!’’
‘‘कुठे आहे ती? अरे बोल नं काहीतरी…’’
‘‘तत्काळ रिझर्वेशन करून ती तिच्या आईकडे गेली. मीच स्टेशनवर सोडायला गेलो तेव्हा हा मोबाईलसुद्धा परत केला.’’
‘‘किती दिवसांसाठी गेली आहे?’’
‘‘आई, आता ती परत येणार नाही.’’
‘‘अरे, पण सारं सामान तर इथे आहे.’’
‘‘हो, ऑफिसमध्ये तिनं सर्वांना सांगितलं की, नोकरी सोडून गावी जात आहे. तिच्या आईनं तसं कळवलं.’’
‘‘काय? नोकरी सोडली?’’
‘‘हो. नोकरी सोडली. अगोदरच नोटीस दिली होती आपटेसाहेबांना.’’
‘‘पण दुसरी नोकरी करायची तर सांगायचं तर खरं!’’
‘‘आई, दुसरी नोकरी नाही. वडिलांचं लोन फेडायचं होतं, ते झालं. तोपर्यंत तिनं मुंबईत नोकरी केली. आता यापुढे आईसोबतच राहणार, असं तिनं साहेबांना सांगितलं.’’
‘‘हे सर्व कधी ठरलं?’’
‘‘गेली दोन वर्षांपासून हे ठरलेलंच होतं, असं तिच्या ऑफिसमधल्या इतर मैत्रिणी म्हणत होत्या.’’
याचा अर्थ जे आपण समजत आलो, तसं काही नव्हतंच? योगीचं तिच्यात गुंतणं व आपलंसुद्धा…
ते मॉलमधून योगीला शर्ट आणणं, रविवारी स्वयंपाकघरात शिरून जेवण बनवायला शिकणं, डिश टीव्ही लावण्याचा निर्णय घेणं… कसं काय? जर सोडून जायचं होतं तर इतका आपलेपणा का? आपण दोघंही फसवलो गेलो ही भीती हळूहळू खरी ठरू लागली.
‘‘सून बनवणं तर सोडाच, पण जाताना तुला सांगूनसुद्धा गेली नाही.’’ यंंंंंंंंंंोंगी काय सांगतो आहे याचेही त्यांना संदर्भ लागत नव्हते.
‘‘अशी अचानक ती कशी जाऊ शकते?’’ तिचं ठरलं होतं तर मला का सांगितलं नाही?’’
‘‘तू विचारलं का नाही, स्टेशनवर होतास नं तिच्यासोबत?’’
‘‘हो विचारलं. वडिलांचा बिझनेस बुडत आला. त्याची भरपाई करू न शकल्यामुळे तिला आईच्या मर्जीप्रमाणे तिच्याच नात्यात… आईनं ठरवलं तिचं लग्न… पण आपल्याला सांगू शकली नाही…’’
‘‘काय? मग इथे का? आपल्याकडे इतके दिवस?’’
‘‘होस्टेल व जेवणाचा खर्च वाचवण्यासाठी कदाचित.’’
‘‘नाही रे, तसं नसावं. तिचा फोन येईल.’’
‘‘नाही आई. तिचा ऑफिसमध्ये दिलेला पत्ता आता बदलला आहे आणि नंबरसुद्धा.’’
योगीची अवस्था बघवत नव्हती.

पैशानं आपण फसलो, यापेक्षा योगीचा एकटेपणा त्यांना सहन होईना. आता योगीला समजवायचं कसं? ऑफिसमध्ये तर ही फसवणूक अगदी चर्चेचा विषय झाला. योगीचं अस्वस्थ राहणं, अबोल राहणं, दारं बंद करून एकटंच घरात थांबून राहणं त्यांना सहन होत नव्हतं. ऑफिसात रोज नवी महिती बाहेर येत होती. कोणी म्हणे, या मुली मुंबईत नोकरीला येतात व राहण्यासाठी कशा भोळ्या मुलाची व आईची निवड करतात. म्हणजे ते गरम डोसे करून वाढणं खोटं होतं? ऑफिसमधून येताना घरसामान आणणं खोटं होतं?
कशी समजूूत घालू? आज योगीला एखादी बहीण असती तर तो मोकळेपणानं तिच्याशी बोलला तरी असता.
माझ्याजवळ तो रडतसुद्धा नाही. सारं दुःख स्वतःच भोगतो आहे. नातेवाईक, सोसायटीतले लोक व ऑफिसचे मित्र सार्‍यांचा सामना एकट्यानं करतो आहे.
‘देविका, काय चुकलं आमचं?’ असा प्रश्‍नही विचारायचा राहून गेला.

दिवस कंटाळवाणे झाले होते. रोज उठून ऑफिसमध्ये जाणं, दिवसभर कामात स्वतःला झोकून देणं, पण सर्व कसं निर्जीव, बेचव. हसणं नाही, फिरणं नाही, टीव्हीत बघत जेवायचं. काही प्रश्‍नच नको, कारण उत्तराची अपेक्षा केली तर योगी जेवण सोडून उठेल, याची काळजी.
योगी झोपला तेव्हा त्याच्या उशाशी बसून डोक्यावरून हात फिरवत योगीची आई शांत बसूनच राही. आपण फसवले गेलो नाही. तिनं दर महिन्याला ठरल्याप्रमाणे पैसे दिले. शिवाय हौसेनं स्वतःहून खर्च करायची ती. मग हे फसवणं कसं? काहीतरी कारण असावं, अडचण असावी, तिला तुझ्या मदतीची गरज लागेल.’’
‘‘तू कर्नाटकात जाऊन पाहतो का?’’
‘‘ते झालं आई. आमच्या बंगलोर ब्रँचच्या स्टाफला आपटेसाहेबांनी देविकाचा पत्ता शोधायला पाठवलं होतं, पण तो ऑफिशियल पत्ताच खोटा होता. त्या नावाची इमारत नव्हतीच.’’

‘‘आपण तुझ्यासाठी दुसरी नोकरी शोधू. जाऊ दे त्या आठवणी..’’
‘‘उद्याच नेटवर शोधू आपण.’’
‘‘आई, नोकरी काय मिळेल, पण तू येशील माझ्याबरोबर?’’
‘‘हो राजा, तू प्रयत्न कर. मीसुद्धा बदली मिळते का पाहीन.’’
नव्या आशेनं नवा रस्ता दाखवला. आईचा पाठिंबा त्या क्षणी मोलाचा ठरला.
‘गुगल’चं नवं सॉफ्टवेअर येणार होतं. त्यातच पुढे काम करायचं असं ठरलं. नेटवरून माहिती काढून ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला. पंधरा दिवसांत कंपनीत जॉईनही व्हायचं होतं.
आयुष्याला गती आली. पासपोर्ट, व्हिसा असे सर्व सोपस्कार करण्यात दहा दिवस गेले. योगी विमानतळावर पोचला.
‘‘आई, नीट राहा. माझं घर तयार झालं की तुला बोलवून घेईन. रजा टाकून ये. नाहीतर नोकरी सोडूनच दे.’’
‘‘बघू. काळजी करू नको. तू प्रवासात सतर्क राहा. मोबाईल सुरू ठेव.’’
योगी नजरेआड होईपर्यंत त्या हात हलवत राहिल्या. आज दिशा बदलल्या. पुन्हा ताजा चेहरा व खूप उत्साह यांची शिदोरी बांधून योगीनं देश सोडला.
परतीचा प्रवास एकटीनं करताना, पावलं जड वाटू लागली. स्वतःहून मुलाच्या सुखासाठी ओढवून घेतलेला हा एकटेपणा आपण मुकाट्यानं खुशीनं पत्करायचा असं ठरवलं.
आपण स्वतःपासून दूर पळत आहोत का? असंही वाटू लागलं.
‘‘वा! आता काय मजा आहे! मुलगा डॉलरमध्ये पैसे कमावणार.’’ या व अशा अनेक टोमण्यांना सहन करत दिवस सरकू लागले. दोन-चार दिवसांत योगीला तिकडे ऑफिसमधून जागा मिळाली. आणि योगीचं आयुष्य धावू लागलं.

काही दिवसांसाठी देविका आपल्या आयुष्यात आली व आपलं आयुष्य उसवून गेली. आता तिची आठवणसुद्धा नको. एका आठवड्यात देविकाचे कपडे, पुस्तकं, इतर सामान त्यांनी घराबाहेर काढलं.
इतके दिवस योगीसमोर ओढून घेतलेला धैर्याचा मुखवटा त्यांना झुगारून दिला व एकट्यानंच खूप रडून घेतलं. पण माझा योगी हा नवा बदल कसा सहन करेल? त्याचं जेवण, आरोग्य, नवा देश नवी नोकरी… या सर्व चिंता त्यांना पोखरत राहिल्या.
एक धोकादायक वळण झालं व आपण ते अतिशय समजूतदारपणे पार पाडलं एवढंच.
नातेवाईक व ऑफिसमधले सर्वजण थोड्याच दिवसांत सर्व काही विसरले. कोणाचंच दुःख दीर्घकाळ टिकत नाही. आयुष्यात येणार्‍या व दुःख देऊन जाणार्‍यास विसरणंसुद्धा सोपं असतं, हेच खरं.

नाही, पण खरं तसं नव्हतंच. उद्ध्वस्त झालं ते घर किंवा पैसा नाही. उद्ध्वस्त झालं ते भविष्य. मैत्री या शब्दावरचा विश्‍वास. नशिबावरचा भरवसा. जगणं चालूच राहतं, पण जगण्याची इच्छा? ती तर आटत गेली.
डोळ्यासमोर केवळ मोकळा, न दिसणारा भविष्यकाळ दिसत राहिला. जे ठरवलं होतं ते सगळं वादळाबरोबर उडून गेलं. आता उरले होते ते प्रश्‍न.
आता नोकरी तर नेटानं पूर्ण करायला हवी. या ओनरशिप ब्लॉकचं काय करायचं? योगी परत येईल की नाही? आपलं म्हातारपण व एकटेपण? एक तुफान भविष्याची शकलं करून गेलं. मुख्य म्हणजे, योगीचं आयुष्य पुन्हा सुरळीत व्हायला हवं. जखमा ताज्या होत्या, त्यावर खपली धरण्याची वाट बघावी की फुंकर घालावी? त्यांना समजत नव्हतं.

एक गोष्ट योगीच्या आईनं ठरवली व पार पाडली. आपल्या दुःखाची कुठेही वाच्यता केली नाही. लोकांना चघळायला कोणतेही विषय चालतात, पण आयुष्य म्हणजे काही टी.आर.पी. वाढवण्यासाठी क्लायमॅक्स वाढवणं नाही.
रोज योगीशी संवाद चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करताना, आपला मुलगा पुन्हा नव्या उमेदीनं उभा राहत आहे, नवे प्रकल्प, नवी स्वप्नं, जबाबदार्‍या यावर सांगत आहे, हे त्यांना जाणवत होतं. त्याच्या आवाजातला फरक, आत्मविश्‍वास जाणवत होता. लहानपणी ‘आई, आई’ करत मागे लागणार्‍या आपल्या मुलाला आधार देणं आपलं कामच आहे. या नव्या पिढीला बहीणभावंड नाही. आता मनाचा ताणतणाव कुणासमोर मोकळा करावा? आपणच त्याचा आधार व्हायला हवं.

नेमका तो एकटेपणाचा काळ, मनाची उभारी पुन्हा तयार होण्याचा काळ आपण त्याच्यासोबत राहिलो. हेच बरंच झालं. जेव्हा योगीचे वडील अचानक गेले तेव्हा, ‘योगीकडे बघ व स्वतःला सावर’ असंच तर सारे म्हणायचे.
आयुष्यात कधी मी त्याच्यासाठी जगले व आज तो माझ्यासाठी जगण्याचा प्रयास करतो आहे. आई व मुलाच्या नात्यात जी ताकद होती, त्याच्याच बळावर तर सारं निभावून नेता.
रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना योगीच्या आईला आपल्या मातृशक्तीचा, दिव्यशक्तीचा हा साक्षात्कार जाणवत होता. देवीकडे संकटं सहन करण्याची शक्ती आपण मागत राहिलो व देवीनं ती दिली याबद्दल त्यांनी आजही देवीसमोर मनापासून आभार मानण्यासाठी दोन्ही हात जोडले आणि आशीर्वाद मागितले.

– ज्योत्स्ना सोनाळकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.