Now Reading
अमेरिकेतलं कोविड दर्शन

अमेरिकेतलं कोविड दर्शन

Menaka Prakashan

काविडनं माणसाच्या जीवनात एक पॉझ आणला आणि सतत धावपळ करणार्‍या माणसाला काही काळ तरी स्वतःकडे, कुटुंबीयांकडे, स्वतःच्या आवडी-निवडींकडे बघण्याची संधी दिली. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये जगाच्या पाठीवर सगळीकडे साधारण असंच चित्र होतं. अगदी महासत्ता म्हणवून घेणार्‍या अमेरिकेतही! अमेरिकेत काय चाललंय, हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. त्याचाच ‘आखों देखा हाल!’

मार्च २०२० उजाडला. आमची अमेरिकेला जाण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली, कारण आठ तारखेला निघायचं होतं. हितचिंतकांपैकी कुणीतरी ई-मेल पाठवून सावध केलं की कोरोनाची साथ सुरू झालीय, विमानतळावर टेस्ट करतील, क्वारन्टाइन व्हावं लागेल वगैरे. पण नातवंडांना भेटायची ओढ इतकी की तिकडे दुर्लक्ष करून विमानात बसलो आणि सुखरूप अमेरिकेतल्या घरी पोचलो. म्हटलं, कुठला कोरोना आणि कुठलं काय? तो असलाच तर असेल तिकडे चीनमध्ये. आमचा येण्याचा मार्ग मुंबई-पॅरिस-अटलांटा असा होता. मुंबई विमानतळावर सर्व कर्मचार्‍यांनी मास्क लावले होते, पण पुढे पॅरिस आणि अटलांटाला मात्र नव्हते हे लक्षात आलं. आम्ही नऊ तारखेला म्हणजे सोमवारी संध्याकाळी अटलांटा मुक्कामी पोचलो. पुढचे चार दिवस नेहमीप्रमाणे पार पडले. म्हणजे ऑफिस, नातीची शाळा, पाळणाघर सर्व काही सुरळीत. आणि बातमी आली सोळा तारखेपासून शाळा, ऑफिसेस सगळं बंद. कारण अमेरिकेत कोरोनाच्या केसेस वाढू लागल्या. मग काय? सोळा तारखेपासून सगळे घरात. ऑफिसचं काम घरातून सुरू- वर्क फ्रॉम होम. शाळा, पाळणाघर बंद म्हणजे नाती घरात. त्यांना आणि आम्हालाही आनंदी-आनंद. बंदची व्याप्ती वाढू लागली. हॉटेल्स, प्रार्थनास्थळं, सहलीची ठिकाणं, मोठे मॉल्स, थिएटर्स हे सगळं बंद. मग मात्र हे सगळं अचानक अंगावर आलं.

आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट घडली. आमचा पुण्यातला मुलगा निपुण सपत्निक तिथं सतरा मार्चला आला. चार वर्षांनंतर थोडे दिवस आम्ही सगळे एकत्र राहणार होतो. पण आल्याच्या रात्रीच त्याला विमान कंपनीकडून त्याची रिटर्न फ्लाइट कॅन्सल झाल्याचा फोन आला. त्यानं दुसरं तिकीट पंचवीस तारखेचं मिळवलं. पण तेवढ्यात टीव्हीवर बातमी आली की बावीस तारखेपासून भारतात आंतरराष्ट्रीय विमानं उतरण्यास बंदी करण्यात आली होती. त्यांनी लगेच विमानतळ गाठलं आणि एकोणीस तारखेला मिळेल त्या विमानानं निघून एकवीस मार्चला भारतात पोचले. आम्ही सगळे एकत्र जाणार होतो ती डिस्नीलँडची ट्रीप आधीच रद्द करावी लागली होती. मात्र मुंबई विमानतळावर तसंच पुण्यात पोचण्यासाठी आणि घरी पोचल्यावरही कोविडसाठी अत्यंत चोख आणि चांगली काळजी घेणारी व्यवस्था निपुणनं अनुभवली. असो, तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल.

इकडे अटलांटात लवकरच आमचं बाहेरच्या लोकांना भेटणंही बंद झालं. सुरक्षिततेसाठी घरातच रहा, वारंवार हात धुवा हे सांगणं सुरू झालं. हा शेवटचा बंद मात्र त्रासदायक ठरू लागला. कारण मुलांचं मित्र-मंडळींकडे जाणं-येणं किंवा बाहेर एकत्र खेळणं तसंच मोठ्यांचंही वीकेंडला भेटणं बंद झालं. मग सर्वांनी वेळ ठरवून ग्रुपवर व्हीडिओ कॉल करून गप्पांची सत्रं सुरू केली. सुरवातीला सगळ्यांनाच छान मजा वाटत होती. पण थोड्याच दिवसांत यात भेटून बोलण्याची मजा नाही हेही जाणवलं. त्या काळात वाढदिवस कसे साजरे केले? तर घराच्या गॅरेजसमोर जमून केक कापायचा, मोठ्यांनी लांबूनच थोड्या गप्पा मारायच्या, मुलांना एकमेकांच्या जवळ जाऊ द्यायचं नाही.

ग्रोसरी, औषधांची दुकानं उघडी होती, पण कोविडची दहशत इतकी पसरू लागली की बाहेर जाण्याचं धाडस होईना. त्यामुळे ऑनलाइन ऑर्डर देऊन सामान मागवणं, आलेलं सामान नीट सॅनिटाइझ करून घरात घेणं असं करावं लागत होतं. बर्‍याच दुकानांनी घरून ऑर्डर दिलेलं सामान आपण गाडी घेऊन पार्किंगमध्ये गेल्यावर डिकीत ठेवण्याची सुविधा सुरू केली. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिला एक तास राखून ठेवण्यात आला. इथं (आता आपल्याकडेही) ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र राहतात. घरं खूप मोठाली असली तरी सज्ञान मुलं आणि आई-वडील एकत्र राहण्याची पद्धत नाही. प्रत्येकाला ज्याचं-त्याचं स्वातंत्र्य अतिशय प्रिय. त्यामुळे म्हातारे आणि म्हातार्‍या, तोंडाला मास्क लावून गाडी चालवत सकाळीच दुकानात जात. बाहेरचं खाणं बंद, त्यामुळे नवनवीन रेसिपीजना ऊत आला. सोशल मीडियावर खाद्यपदार्थांच्या फोटोंचा पूर आला.
रोज संध्याकाळी पाच वाजता टीव्हीवर प्रेसिडेंट ट्रम्प, डॉक्टर फौसी आणि टीमचं प्रेझेंटेशन असे. ते घरोघरी न चुकता बघितलं जाई. त्यात गंमत अशी व्हायची की डॉक्टर सांगायचे मास्क लावणं महत्त्वाचं आहे, तर ट्रम्प बरोबर उलटं सांगायचे आणि तसंच वागायचे. समोर बसलेले पत्रकारही बिन मास्कचेच असायचे. अर्थात पुढे काही महिन्यांनी ट्रम्पनाच कोरोना झाला. पण हा निवडणुकीसाठीचा स्टंट आहे असं लोक म्हणू लागले.

घरात बसून-बसून कंटाळलेल्या अवस्थेत दिवस चालले होते. कोरोना काही कमी होण्याचं नाव घेत नव्हता. पण देशाची अर्थव्यवस्था ढासळू लागली, बेरोजगारी वाढू लागली, सरकारला मोठं पॅकेज द्यावं लागलं. अवघ्या दीड महिन्यात अडीच कोटी बेरोजगारांची भर पडली. तशात एप्रिलमध्ये ईस्टरचा सण आला आणि अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी हॉटेल्स आणि चर्च उघडण्याचं ठरवलं गेलं. अर्थात हॉटेल्समध्ये बसून खायला परवानगी नव्हती तर अन्न घरी घेऊन जायचं. कोविडपूर्वी बर्‍याच मोठ्या हॉटेल्समध्ये ही सोय नव्हती, पण आता मात्र त्यांना ही सेवा सुरू करावी लागली. कालाय तस्मै नम:। त्यामुळे बाहेरचं जेवण मागवणं शक्य झालं. मात्र बर्‍याच लोकांनी तसं करणं टाळलं. कारण अन्नातून बाधा होईल की काय अशी शंका होतीच. मे अखेरीस एक लाखाच्या वर मृत्यू कोरोनामुळे झाले. केसेस तर वीस लाखांच्या आसपास होत्या. पण अशातच काही राज्यांच्या राज्यपालांनी सोशल डिस्टन्सिंग थोडं शिथिल केलं. आम्ही ज्या जॉर्जिया राज्यात राहत होतो त्या राज्यपालांनी सक्ती काढून लोकांना आपापल्या जबाबदारीवर सुरक्षित राहण्यास सांगितलं. बर्‍याच लोकांनी मास्क वापरणं सोडून दिलं.

समाजात कोरोना पसरत असला तरी निसर्गाला त्याची झळ बसली नव्हती. बहरलेली झाडं, बहुरंगी फुलं, तर्‍हेतर्‍हेचे पक्षी यातून वसंतऋतूचं चैतन्य पसरलं होतं. सूर्य पहाटेच उगवायचा आणि रात्री मावळायचा. सकाळ -संध्याकाळ हवा अत्यंत सुखद, दुपारी मात्र कडक ऊन. इकडे हा ऋतू कुणाला घरी बसू देत नाही. पण यंदा नाही म्हटलं तरी मनात धाकधूक होती. त्यामुळं लोक सहली काढायला धजत नव्हते. पण लोकांनी तीन गोष्टी जोरात सुरू केल्या. बागकाम, सायकलिंग आणि ग्रील. बागकामाचं साहित्य, सायकली आणि ग्रीलचा खप इतका वाढला की मोठ-मोठ्या दुकानांतून त्याची टंचाई जाणवू लागली. एव्हाना शाळांना उन्हाळी सुट्टी लागली होती. सगळ्या नाही पण काही-काही कुटुंबांनी मुलांना एकत्र खेळायला परवानगी दिली. काही लोक मात्र अगदी कठोरपणे एकटे राहिले. आता सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ काही ठराविक लोकांना भेटणं, त्यांच्यात मिसळणं असा झाला. आम्ही ज्येष्ठ मंडळींनी आपापला ग्रुप करून कॉलनीतच चालायला सुरवात केली. अर्थात अंतर ठेवूनच. दिवस मोठा असल्यानं कधी-कधी रात्रीचं जेवण झाल्यावरही जाता यायचं, रात्री नऊपर्यंत छान उजेड असायचा. घराबाहेर पडून समवयस्क लोकांशी बोलणं होऊ लागलं. आयुष्य थोडं सुकर वाटू लागलं. पण काही-काही गोष्टीत ही नेहमीचीच मित्र-मंडळी भलतीच आग्रहीपणा करायची. उदाहरण द्यायचं तर आमच्या घरी बाहेरगावाहून एक पाहुणा राहायला आलाय हे कळल्याबरोबर नेहमी घरी येणं-जाणं असलेल्या मित्रांनी सांगितलं, ‘आता आपण भेटायचं नाही. तुमच्याकडे नवीन माणूस आलाय.’ त्या पाहुण्यानं कोविड टेस्ट करून स्वतःला लागण झाली नसल्याचा रिपोर्ट आणल्यावरच पुन्हा भेटणं चालू झालं. कोविडनं आणखीनच हातपाय पसरायला सुरवात केली तशी काही राज्यांनी परत बंधनं वाढवायला सुरवात केली. चार जुलैच्या अमेरिकन स्वातंत्र्य दिनानंतर लगेचच केसेस खूप वाढल्या. आता प्रेसिडेन्टची निवडणूकही तीन-चार महिन्यांवर आली होती. दोन्ही पार्टीचे उमेदवार ठरले होते. रिपब्लिकचे ट्रम्प तर डेमोक्रेटचे जो बायडेन. इथल्या पद्धतीनुसार टीव्हीवर चर्चा वादविवाद (डीबेट) चालू झाले. सगळ्या जगभरातले राजकारणी सारखेच. दोघंही आपापल्या पद्धतीनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोविडचा उपयोग करून घेत होते. ट्रम्पनी ‘मास्कची गरज नाही’ म्हणताच बायडेननी ‘मास्क वापरणं आवश्यक आहे’ असं सांगायला सुरवात केली.

ऑगस्टमध्ये शाळा सुरू झाल्या. आमची नात सरकारी शाळेत (ज्याला इथं पब्लिक स्कूल म्हणतात) जाते. त्यांनी तीन पर्याय दिले. एक तर दररोज शाळेत या किंवा आठवड्यात दोनदा शाळेत या किंवा दररोज घरूनच शाळा करा. आम्ही घरून शाळेचा पर्याय निवडला. त्यासाठी तिच्या खोलीतच लॅपटॉप, टेबल वगैरेची व्यवस्था केली. अधून-मधून ब्रेक्स असायचे, त्यात खाणं वगैरे करायचं. चाचणी परीक्षा ऑनलाइन. एकंदरीत शाळा चांगली चालू आहे. पण ज्यांची मुलं शाळेत जातात त्या कुटुंबाशी संपर्क वर्ज्य केला.

या काळात कोविडवर निरनिराळ्या दृष्टिकोनातून सातत्यानं संशोधन सुरू होतं. एकतीस जानेवारीला WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी आणि अकरा मार्चला कोविड महामारी जाहीर केली. तेरा मार्चला ट्रम्प सरकारनं अमेरिकेत कोविड महामारी जाहीर केली, कोट्यवधी डॉलर्सचं पॅकेज जाहीर केलं, विमान प्रवासावर बंधनं आणली. पंचवीस मार्च रोजी एका सांख्यिकी संशोधनानुसार कडक सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास कोविड आटोक्यात राहील असा निष्कर्ष निघाला. एकतीस मार्चला कोविड अश्रूतून पसरू शकतो असं एक अनुमान निघालं. मे महिन्यात लाळ तपासणीवर आधारित चाचणी मान्य झाली. रेमडीसिव्हिर औषधाची उपयुक्तता मान्य झाली. ऑगस्टमध्ये एकेका दिवसात हजारच्या वर मृत्यू तर एकूण केसेस पंचावन्न लाख झाल्या. कोरोना हे मृत्यूचं तिसरं सर्वांत मोठं कारण ठरलं. हृदयविकार आणि कर्करोग ही पहिल्या दोन क्रमांकावर आहेतच. ऑक्टोबर महिन्यात रक्तगट आणि कोविडची लागण यात संबंध आहे असं संशोधन प्रसिद्ध झालं.
ऑक्टोबर महिना आला आणि निसर्गातली रंगपंचमी सालाबादप्रमाणे सुरू झाली. आत्ता-आत्तापर्यंत फक्त हिरवाई ल्यालेली झाडं पूर्ण पिवळी, लाल, तपकिरी केव्हा झाली ते कळलंच नाही. काही झाडं तर पानगळ लागून चक्क खराट्यासारखी दिसू लागली. थंडी पडू लागली, तापमान शून्यपर्यंत खाली जाऊ लागलं. दिवस दहा तासांचा होऊन गेला. आम्ही संध्याकाळी सहाच्या आत घरी परतू लागलो.

तीन नोव्हेंबरला मतदान होतं. यंदा कोविडमुळे तब्बल दहा कोटी मतदारांनी पोस्टल पद्धतीनं आपलं मत नोंदवलं. नोव्हेंबरमध्ये थँक्स गिव्हींग हा मोठा सण असतो. हल्ली महिन्याच्या चौथ्या गुरुवारी तो साजरा होतो. अब्राहम लिंकनच्या काळात तो शेवटच्या गुरुवारी (चौथा किंवा पाचवा)साजरा होत असे. यंदा तो दिवस सव्वीस नोव्हेंबरला होता. त्यादिवशी मुलं, नातेवाईक एकत्र जमतात. टर्कीचं जेवण असतं. पण नोव्हेंबरच्या सुरवातीलाच दिवसाला केसेसची संख्या लाखाच्या वर गेली, एकूण केसेस एक कोटीच्या वर गेल्या. ह्याच महिन्यात ‘नेचर’ मासिकात हे वाढलेलं प्रमाण हॉटेल्स, जिम्स, दुकानं इथं मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाल्याचा परिणाम असल्याचं प्रसिद्ध झालं, तसं मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येण्यावर बंधनं घातली गेली. तरीही लोकांनी जोरात सण साजरा केला, सहली काढल्या. परिणामी दिवसाला दोन-दोन लाख केसेस, दोन हजार मृत्यू सुरू झाले. सध्या केसेस दीड कोटीच्या वर तर मृत्यू तीन लाखांच्या घरात गेले आहेत. अमेरिकेची लोकसंख्या आहे तेहतीस कोटी. हे विचारात घेतलं तर हे प्रमाण खूप मोठं आहे.

जून महिन्यात नियोवाइज (Neowise) नावाचा धूमकेतू इथल्या आकाशात दिसत होता. पण शहरात बरेच अडथळे असल्यामुळे आकाश नीट दिसेल की नाही असं वाटलं. म्हणून आम्ही एक तास प्रवास करून एका डोंगरावर गेलो. त्या रात्री आकाश निरभ्र होतं. दर्शन छान झालं. तिथं काहीच गर्दी नव्हती. मात्र नंतर एक-दोन वेळा आम्ही इथल्या स्टेट पार्क्सना गेलो, तिकडे मात्र तुफान गर्दी. अगदी पार्किंगलाही जागा नाही अशी परिस्थिती. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे सात तारखेला इथं लेबर्स डे ची सुट्टी होती. वीकएंडला लागून सुट्टी आली की लोक हमखास फिरायला बाहेर पडतात. बरंच आधी बुकिंग करावं लागतं. ती गर्दी टाळण्यासाठी आम्ही एक आठवड्यानंतरचं बुकिंग करून फ्लोरिडातल्या नवार बीच ह्या सुंदर ठिकाणी गेलो. कुणाशी संपर्क नको म्हणून अगदी समुद्राकाठचं स्वतंत्र घर भाड्यानं घेतलं होतं. आम्ही तेरा तारखेला संध्याकाळी पोचलो. घराच्या बैठकीत बसलं की अगदी समोर समुद्र होता. पायर्‍या उतरून गेलं की आपण त्याच्या पुढ्यात. प्रायवेट बीच असल्यानं माणसं अगदी कमी. बीचवर खुर्च्या टाकून छान संध्याकाळ घालवली. दुसर्‍या दिवशी दुपारपासून बातम्या धडकू लागल्या हरिकेन वादळ मार्ग बदलून इकडे येऊ घातलं आहे. शेजारच्या समुद्रकिनार्‍यांना इव्हॅक्युएशन म्हणजे समुद्रकिनारे रिकामे करण्याची ऑर्डर आली. धाकधूक सुरू. तरी धाडस करून बसलो. संध्याकाळी मोठ-मोठ्या लाटा, पाऊस चालू झाला. काल संध्याकाळी जिथं बसलो होतो त्यातला बराच भाग पाण्यानं व्यापला. असंच चालू राहिलं तर रात्री घर पाण्याखाली जाऊ शकेल असं वाटलं. अजून सोडून जाण्याची वॉर्निंग नव्हती. पण जिवाला घाबरून शेवटी किनारा सोडलाच. आठवडाभर मुक्काम करायला आलो होतो, पण अमेरिकेच्या लहरी हवामानापुढे माघार घेतली.

दुसर्‍या दिवशी आम्ही वाट पाहत होतो ती ऑर्डर आली आणि जीव भांड्यात पडला. कारण तशा ऑर्डरमुळे भरलेले डॉलर्स विमा कंपनीकडून परत मिळाले. अमेरिकेचं हवामान लहरी आहे ह्याचा आधी बर्‍याचदा प्रत्यय आलाच होता. म्हणजे सकाळी बघावं तर छान कडक ऊन, पण तासाभरात आकाशात काळ्या ढगांची दाटी होऊन दुपारी जोरदार पाऊस आणि संध्याकाळी पुनः स्वच्छ हवा. कोविडनं माणसांना शिस्त लावायचा प्रयत्न केला असेलही कदाचित, पण निसर्गानं काही दाद दिलेली नाही. तसा अमेरिकन माणूसही कायद्याचा धाक असला तर शिस्तीत वागतो. आर्थिक ताकदीच्या जोरावर अमेरिका सगळ्या जगावर फौजदारी जरूर करते, पण कोविडपुढे त्यांची डाळ शिजलेली नाही. मात्र पाश्चात्त्य जगाला अध्यात्म आणि सर्वसमावेशकतेची देणगी देणार्‍या भारतानं उपलब्ध साधनं आणि मनुष्यबळ ह्यांचा कौशल्यपूर्वक वापर करून ह्याबाबत बर्‍यापैकी यश मिळवलंय असंच समाधानानं म्हणावंसं वाटतं.

– डॉ. अमिता अ. धर्माधिकारी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.