Now Reading
अमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’

अमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’

Menaka Prakashan
View Gallery

अमेरिकेचं आकर्षण जगातल्या अनेक देशांतल्या अबालवृद्धांना आहे. म्हणूनच अमेरिकेत अनेक देशांतले, वंशाचे, संस्कृतीचे लोक मोठ्या संख्येनं बघायला मिळतात. या सगळ्यांची सरमिसळ अमेरिकन जीवनात तसंच खाद्यसंस्कृतीत बघायला मिळते. परिणामी अस्सल अमेरिकन पदार्थांना थोडं आपल्या पद्धतीनं बनवणारी अनेक अमेरिकन मंडळी, रेस्टॉरंट तिथं बघायला मिळतात…

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका- या देशाच्या उत्तरेला ऐसपैस पसरलेला कॅनडा, दक्षिणेला मेक्सिको, पश्चिमेला पॅसिफिक महासागर आणि पूर्वेला अटलांटिक महासागर आहे. पंधराव्या शतकात इंग्रजांचं लक्ष अमेरिकेकडे गेलं आणि तिथं इंग्रजांच्या तेरा वसाहती स्थापन झाल्या. पुढे जर्मनी, आयर्लंड, स्कॉटलंडमधून लोक स्थलांतरित झाले, याशिवाय आफ्रिकेतून आणलेले गुलाम, डच, स्पॅनिश आणि मोठ्या प्रमाणावर आशियाई लोकांची वस्ती अमेरिकेत झाली. हे सर्व आणि तिथले मूळचे रहिवासी यांचा संमिश्र समाज निर्माण झाला. १७७६ मध्ये देश स्वतंत्र झाला आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अस्तित्वात आलं. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेला प्रदीर्घ इतिहास आणि पुरातन संस्कृती यांची देणगी नाही तरीसुद्धा इतक्या अल्प काळात या देशानं घेतलेली झेप लक्षणीय आहे. आज अमेरिका ही जगातली पहिल्या क्रमांकाची महासत्ता म्हणून ओळखली जाते. आज ‘अमेरिका बोले आणि जग हाले’ अशी परिस्थिती आहे.

लाइफ, लिबर्टी आणि परर्सुट ऑफ हॅपिनेस ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातली तीन मूलतत्त्वं. जगातल्या वेगवेगळ्या देशातले, वेगवेगळ्या वंशाचे, विविध भाषा बोलणारे लोक समृद्धीच्या ओढीनं, नवी संधी-नवं जीवन देण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या या देशात दाखल झाले आणि अमेरिकन समाज निर्माण झाला. म्हणूनच हा देश स्थलांतरितांचा असला तरी ‘मेल्टिंग पॉट’ किंवा ‘सॅलड बाऊल’ म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या लोकांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धती, चालीरीती, भाषा वेगळ्या असणारच. त्यामुळे एकीकडे सगळ्या देशातल्या विविध संस्कृतींचा प्रभाव अमेरिकन समाजावर दिसतो आणि दुसरीकडे त्यातून निर्माण झालेल्या अमेरिकन संस्कृतीनं जगाला भारून टाकलेलं आहे, असंही आपल्याला दिसतं. इथला पोशाख, राहणी, खाणं-पिणं या साऱ्यांचा विलक्षण प्रभाव जगातल्या अनेक देशांच्या तरुण पिढीवर झालेला दिसतो. इथलं तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, प्रसारमाध्यमं आणि जीवनपद्धती इतरत्र पोचली आणि लोकप्रिय झाली. म्हणूनच इथल्या अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचं अनुकरण करण्याचा मोह सर्वांना होतो. कामाच्या वेळी भरपूर काम आणि फुरसतीच्या वेळात जीवनातला आनंद लुटायचा ही अमेरिकन संस्कृती. स्वावलंबन, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ही त्यांच्या प्रगतीची त्रिसूत्री आहे.

आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय. एका क्षणात कुठूनही, कुठेही संपर्क करणं, बोलणं, प्रत्यक्ष बघणं हे शक्य झालंय ते ‘व्हॉट्सॲप’ सारख्या चॅटिंगसाठीच्या वेगवेगळ्या मोबाईल ॲप्समुळे. त्यानंतर स्मार्ट फोन किंवा आयफोन, मोबाईल, इंटरनेट, वायफाय हे सगळे शोध इथेच लागले. आता परस्पर संपर्काचा वारू ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, इन्स्टाग्रॅम, व्हाट्सॲपवरून चौखूर उधळतो आहे. हे सगळं करणारं, ‘गुगल’, ‘ॲपल’ अमेरिकेतच आहे. वेग-वेग-आणखी वेग, सोयी-आणखी सोयी यासाठी अखंड धडपड चालू आहे. सहा इंची मोबाईलमध्ये इंटरनेट, जगभर चालू शकणारा फोन, कॅमेरा, कॅल्क्युलेटर, टायमर, टीव्ही अशी कित्येक उपकरणं सामावलेली आहेत. ही किमया अमेरिकेतल्याच कंपन्यांची आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातली कुठलीही घटना जगभर प्रसारित करणारा टेलिव्हिजन, सगळ्या भाषेतले चित्रपट, नाटकं, व्हिडिओ आणि बरंच काही दाखवणारी ‘यू-ट्युब’सारखी माध्यमं अमेरिकेत जन्माला आली. तंत्रज्ञानातली ही प्रगती अमेरिकेत झाली आणि अजूनही सुरूच आहे.
आपल्याला हव्या त्या पत्त्यावर बिनचूक नेणारी जीपीएस ही यंत्रणा, ‘आयओटी’ म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, कारला अपघात झाला तर कमीत-कमी हानी व्हावी म्हणून कारमध्ये बसवण्यात येणाऱ्या कार बॅग्स, ऑटोमॅटिक ट्रॅफिक लाईट्स, व्हिडिओ गेम्स, डिजिटल कॅमेरा, वस्तूची किंमत दाखवणारं बारकोड, किंडल, मायक्रोवेव्ह ओव्हन यांचा शोध तिथेच लागला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातही लेझर किरणांच्या शोधामुळे अनेक शस्त्रक्रिया सुलभ झाल्या. केमोथेरपी, एन्डोस्कोपी कॅप्सूल, पेस मेकर अशी कितीतरी तांत्रिक-वैद्यकीय उपकरणं आणि उपचारपद्धतींमुळे जगातल्या लाखो रुग्णांना दिलासा मिळतो आहे.

जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्रपिता. कृषी क्षेत्रात शेंगदाणे, रताळी अशांसारख्या पिकांवर महत्त्वाचं संशोधन करणारे जॉर्ज कार्व्हर, पहिलं विमान उडवणारे राईट बंधू, लाईट बल्बचा शोध लावणारे थॉमस एडिसन, टेलिफोनचा शोध लावणारे ॲलेक्झांडर बेल, ‘फेसबुक’चा निर्माता मार्क झुकरबर्ग, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध लावणारे संशोधक हे सगळे अमेरिकेतले.
अमेरिकेच्या पूर्व-पश्चिम विस्तारामुळे तिथं तीन टाईम झोन आहेत. त्यामुळे वेळातला कमाल फरक तीन तासांचा आहे. काही ठिकाणी सहा-सात महिने बर्फ, काही ठिकाणी सतत पाऊस, काही ठिकाणी वाळवंटी हवामान तर काही ठिकाणी सुखद हवामान असे विविध हवामानाचे प्रदेश अमेरिकेत असल्यामुळे पिकंही वेगवेगळी घेतली जातात. शेती हा अमेरिकेतला फार मोठा आणि महत्त्वाचा उद्योग आहे. पाण्याची कमतरता बहुतेक ठिकाणी नाही. मैलोन्‌मैल पसरलेली शेती यांत्रिक साधनांनी केली जाते. गहू, मका, सोयाबीन, कापूस, तंबाखू ही पिकं फार मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. निर्यातीचं प्रमाणही भरपूर आहे. याशिवाय बार्ली, ओट्स, बटाटे, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया यांची पिकं अनेक ठिकाणी घेतली जातात. कॅलिफोर्नियामध्ये सगळ्यात जास्त फळं आणि भाजीपाला यांचं उत्पादन होतं. संत्री, सफरचंद, द्राक्षं, स्ट्रॉबेरी, चेरी, ब्लूबेरी, पीच, पेअर, कलिंगडं इत्यादी फळं, बदाम, अक्रोड असे नट्स यांचीही शेती केली जाते. पिकांतली विविधता आणि विपुलता हे अमेरिकेच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे.

वेगवेगळ्या देशांतले अनेकविध अन्नपदार्थ पिकवण्यासाठी लागणारी बहुतेक सामग्री इथे उपलब्ध होऊ शकते. या देशात असलेल्या संमिश्र समाजामुळे अमेरिकन खाद्यसंस्कृतीसुद्धा संमिश्र प्रकारची आहे. स्थानिक अमेरिकन पदार्थांपेक्षाही इटालियन, मेक्सिकन, थाई, चायनीज, आफ्रिकन, व्हिएतनामीज, टर्कीश, मेडिटेरिनिअन अशा अनेक देशांतल्या पाककृती खिलवण्यासाठी शहराशहरांतून अनेक रेस्टॉरंट्स बघायला मिळतात. अर्थात त्यातल्या बहुतेक पदार्थांना अमेरिकन स्पर्श झालेलाही जाणवतो. त्यातूनच इटालियन अमेरिकन, चायनीज अमेरिकन अशा प्रकारच्या पाककृती तयार झाल्या. प्रत्येक समाजाच्या घराघरातून त्यांचे त्यांचे पारंपरिक पदार्थ बनतात आणि त्याचबरोबर इतरही संमिश्र पाककृती आवडीप्रमाणे केल्या जातात. पण वाढदिवस म्हटला की केक- पिझ्झा- चिप्स- ड्रिंक हा ठराविक मेनू बहुतेक असतो. चॉकलेट चिप कुकीज सगळ्या मुलांना अतिशय प्रिय असतात. हॅम्बर्गर, पोटॅटो फ्राईज, हॉट डॉग, पास्ता हे लोकप्रिय पदार्थ आहेत. त्यातही खूप विविधता आहे. उदाहरणार्थ एक पिझ्झा घेतला तर डीप डिश पिझ्झा, थिन क्रस्ट पिझ्झा, स्टफ्ड पिझ्झा, पिझ्झा पफ, डीप फ्राईड पिझ्झा असे अनेक प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी, त्या त्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणून खायला मिळतात. मोठ्या लांबट किंवा गोल ब्रेडमध्ये चीज, मांसाहारी पदार्थ घालून केलेलं सॅंडविच, हॅश ब्राऊन्स म्हणजे बटाट्याचा परतलेला कीस, हॉट डॉग हे लोकप्रिय प्रकार.

या खाद्यसंस्कृतीत मांसाहाराचं प्रमाण भरपूर आहे पण ते टाळून इथे फक्त शाकाहारी (फक्त गोड पदार्थात अंड्याचा वापर केलेला आहे) पदार्थांची निवड केलेली आहे.

अमेरिकन फ्राईज
साहित्यः एक किलो बटाटे, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल
कृतीः बटाटे सोलून त्यांचे लांबट बोटाएवढे तुकडे करून पाण्यात टाका. पाण्यातून काढून फडक्यावर पसरून कोरडे करा. तेल तापत ठेवा. ते चांगलं गरम झाल्यावर बटाट्याचे काप तळणीत सोडा. तीन-चार मिनिटांनी निथळून बाहेर काढा आणि पेपर नॅपकिनवर ठेवा. सगळे काप तळून झाले की परत गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा. बाहेर काढून त्यांच्यावर मीठ पेरा.

व्हेजी बर्गर
साहित्यः एक ब्लॅक बीन्सचा कॅन, अर्धा कप चिरलेली हिरवी भोपळी मिरची, एक कप चिरलेला कांदा, तीन-चार लसूण पाकळ्या, एक टी स्पून जिरे पावडर, अर्धा कप ब्रेड क्रम्ब्स, चवीला काळी मिरी पावडर आणि मीठ, एक टी स्पून चिली सॉस, सात-आठ टोमॅटो स्लाईस, सात-आठ लेट्यूसची पानं, कांद्याचे स्लाईस सात-आठ, सात-आठ चीज स्लाइस, तेल, सात-आठ मोठे बन्स
कृतीः भोपळी मिरची, कांदा आणि लसूण एकत्र करून फूड प्रोसेसरमध्ये घालून बारीक करावं. त्यात ब्लॅक बीन्स कुस्करून, मीठ, जिरेपूड, मिरपूड आणि ब्रेड क्रम्ब्स मिसळा. तव्यावर तेल घाला आणि मिश्रणाचे सात-आठ पॅटीस करून ते दोन्ही बाजूंनी परतून घ्या. भाजून झाल्यावर प्रत्येकावर एक चीज स्लाईस ठेवा म्हणजे थोडासा वितळून चिकटेल.
बन आडवा कापून दोन भाग करा. खालच्या भागावर चिली सॉस लावा. त्यावर पॅटीस ठेवा, त्यावर टोमॅटोचा स्लाईस ठेवा, वर मिरपूड आणि मीठ भुरभुरवून त्यावर लेटसचं पान ठेवा आणि बनचा वरचा भाग ठेवून दाबा.

चीज मॅक्रोनी
साहित्यः साडेचारशे ग्रॅम एलबो पास्ता, अर्धा कप बटर, अर्धा कप मैदा, तीन कप दूध, एक कप क्रीम, चार कप चेडार चीज, एक कप किसलेलं चीज, चवीला मीठ आणि काळी मिरी पावडर, एक टी स्पून रेड चिली फ्लेक्स
कृतीः एका मोठ्या पातेल्यात चार लिटर पाणी उकळत ठेवा. त्यात एक टे. स्पून तेल आणि एक टी स्पून मीठ घाला. पाणी उकळलं की पास्ता घाला. पास्ता बोटचेपा झाला की निथळा. चेडार चीज किसून दोन्ही चीज एकत्र करा. एका भांड्यात बटर गरम करा. त्यात मैदा घालून परता. त्यात सावकाश दोन कप दूध घालत ढवळत रहा. क्रीम घाला. गुठळ्या होणार नाहीत अशा रीतीनं उरलेलं दूध घालत ढवळा. सॉस घट्ट झाला की मीठ, मिरी पावडर घाला. चीजचे तीन भाग करा. तिसरा भाग सॉसमध्ये घालून ढवळा. चीज वितळलं की गॅस बंद करा. निथळलेल्या पास्त्यामध्ये सॉस मिसळा. एक खोलगट आयताकृती बेकिंग डिश घ्या. डिशला खाली बटर लावा, निम्मा पास्ता ओता, त्यावर चीजचा दुसरा भाग पसरून वर पास्ता घाला. त्यावर उरलेलं चीज पसरवा. १७० अंश से. तापमानावर ओव्हनमध्ये चीज मॅक्रोनी पंधरा-वीस मिनिटं भाजा.
भाज्या घालायच्या असतील तर भोपळी मिरची, गाजर, ब्रोकोली, मशरूम्स, पातीचा कांदा बारीक चिरून परतून अर्धवट शिजवा आणि सॉसमध्ये मिसळा.

ग्रीट्स
आपल्याकडचा मऊ भात किंवा रव्याच्या लापशीसारखाच हा प्रकार आहे. भाज्या किंवा मांसाहारी पदार्थांबरोबर दक्षिणेकडे विशेष करून लोकप्रिय आहे.
साहित्यः अर्धा कप मक्याचा रवा (ग्रीट्स), एक कप दूध, अर्धा कप पाणी, एक हिरवी मिरची, पाव कप चीज, दोन टी स्पून तेल, तीन-चार लसूण पाकळ्या, एक कप कॅन्ड ब्लॅक बीन्स, अर्धा टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून ओरेगॅनोचा चुरा, अर्धा टी स्पून धने पावडर, अर्धा कप ताजे मक्याचे दाणे, एका अव्होकॅडोचे काप, चवीला मीठ आणि काळी मिरी पावडर
कृतीः दूध आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. उकळी फुटली की ग्रीट्स घालून ढवळत राहा. झाकण ठेवून शिजू द्या. नंतर त्यात चीज, मीठ आणि मिरपूड घाला. तेल तापवून त्यात चिरलेली लसूण परता. जिरे, ओरेगॅनो, धने पावडर घालून परतून पाव कप पाणी घाला. बीन्स आणि मक्याचे दाणे घाला. दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घाला. चवीला मीठ आणि मिरी पावडर घाला. पाणी आटलं की हे मिश्रण आणि अव्होकॅडो काप ग्रीटसवर घालून खा.

कॉर्नब्रेड
साहित्यः अर्धा कप बटर, एक कप मैदा, एक कप कॉर्नमील (मक्याचं जाडसर पीठ), पाव कप साखर, एक टी स्पून बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून बेकिंग सोडा, पाव टी स्पून मीठ, एक कप घट्ट ताक, पाव कप मध, दोन अंडी
कृतीः बटर वितळवून घ्या. ओव्हन २०० अंश से. तापमानावर तापत ठेवा. ज्यात ब्रेड करायचा तो पॅनही ओव्हनमध्येच ठेवा. मैदा, कॉर्नमील, मीठ, बेकिंग पावडर, सोडा, साखर एकत्र करा. मध्ये खळगा करून त्यात फेसलेली अंडी, मध आणि ताक घाला. सगळे जिन्नस एकत्र करा. हे मिश्रण तापलेल्या ओव्हनमधल्या पॅनमध्ये ओता आणि हा कॉर्नब्रेड वरून सोनेरी रंग येईपर्यंत पंधरा ते वीस मिनिटं भाजा.

नेटीव्ह अमेरिकन भटुरे
(नव्हाजो टाको)
साहित्यः दोन कप गव्हाचं पीठ, दोन टी स्पून बेकिंग पावडर, एक टी स्पून मीठ, अर्धा कप कांद्याचे काप, पाव किलो लाल भोपळ्याच्या फोडी, एक कप ताजे मक्याचे दाणे, एक टी स्पून जिरे पावडर, दोन टी स्पून लाल तिखट, अर्धा टी स्पून मीठ, अर्धा टी स्पून काळी मिरी पूड, अर्धा टी स्पून गार्लिक पावडर, एक टी स्पून रेड चिली फ्लेक्स, एक कॅन रेड बीन्स, अर्धा किलो टोमॅटो, दहा-बारा कमी तिखट मिरच्या, एक कप बारीक चिरलेला कांदा, एक कप बारीक चिरलेला टोमॅटो, दोन टी स्पून लिंबाचा रस, चवीला मीठ, तेल
कृतीः पीठ, मीठ, बेकिंग पावडर एकत्र करून त्यात लागेल तसं कोमट पाणी आणि दोन टे. स्पून तेल घालून सैलसर पीठ भिजवून, दहा मिनिटं झाकून ठेवा. नंतर त्याचे आठ-दहा गोळे करून त्याच्या जाड पुऱ्या लाटा. दहा-बारा मिनिटं पुऱ्या झाकून ठेवा. तेल तापवून या
पुऱ्या तळा.
एका कढईत दोन टे. स्पून तेल तापवून त्यात कांदा परता. भोपळ्याच्या फोडी घालून परता. उकळीच्या पाण्यात टोमॅटो घालून सालं काढा. नंतर टोमॅटो चिरून फोडी त्यात घाला. भोपळ्याच्या फोडी शिजत आल्या की कॉर्न, मसाले, रेड बीन्स, मिरच्यांचे बारीक तुकडे, मीठ, मिरपूड घालून दहा मिनिटं शिजवा. तळलेल्या पुरीवर ही भाजी, कांदा, टोमॅटो आणि लिंबाचा रस घालून खायला द्या.

व्हेज पिझ्झा
साहित्यः दोन टी स्पून साखर, दीड कप कोमट पाणी, दोन टी स्पून यीस्ट पावडर, तीन कप मैदा, अर्धा कप जाडसर मक्याचं पीठ, दीड टी स्पून मीठ, दोन टे. स्पून ऑलिव्ह ऑईल
सॉससाठी : चारशे ग्रॅम टोमॅटो, एक टी स्पून इटालियन सीझनिंग, अर्धा टी स्पून गार्लिक पावडर, अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर, चवीला मीठ
तीन कप भाज्यांचे काप (कांदा, भोपळी मिरची, बटाटे, झुकिनी, मशरूम्स), एक टे. स्पून ओरेगॅनो, बेसिल आणि थाईमची एकत्र पावडर, दोन कप मोझेरेला चीज
कृतीः पाव कप कोमट पाण्यात अर्धा टी स्पून साखर आणि यीस्ट विरघळवून झाकून ठेवा. दहा मिनिटांत ते फुगेल. मैदा, मीठ, तेल एकत्र करून त्यात फुगलेलं यीस्ट, लागेल तसं कोमट पाणी घालून सैलसर पीठ भिजवून तासभर झाकून ठेवा.
टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून पाच मिनिटं झाका, सालं काढा आणि मिक्सरमध्ये जाडसर प्युरी करा. टोमॅटो प्युरी, गार्लिक पावडर, इटालियन सीझनिंग, मिरपूड आणि मीठ घालून उकळायला ठेवा. सॉस घट्ट झाला की गॅस बंद करा.
ओव्हन २०० अंश से. तापमानावर तापत ठेवा. फुगलेलं पीठ मळून घ्या. पिठाचे दोन गोळे करा. प्रत्येक गोळ्याची पोळी लाटा. लाटताना मक्याचं पीठ वापरा. पोळीला काट्यानं टोचे मारून त्यावर सॉस लावा. त्यावर भाज्यांचे काप पसरवा, ओरॅगनो-बेसिलची पावडर पसरवा, वर चीज पेरा आणि तापलेल्या ओव्हनमध्ये पंधरा ते वीस मिनिटं पिझ्झा भाजा.
पिझ्झा क्रस्ट पातळ हवा असेल तर याच पिठाच्या तीन पोळ्या लाटा. टॉपिंगमध्ये हवा तसा बदल करता येईल.
स्टफ्ड पिझ्झा हवा असेल तर एका क्रस्टवर भाज्या, चीज वगैरे घालून वर दुसरी पातळ पोळी बसवून कडा बंद करा, वरच्या पोळीवर सॉस आणि चीज पसरून पिझ्झा भाजा.
पिझ्झा सॉसऐवजी पेस्टो सॉस लावून त्यावर भाज्या घालून पिझ्झा भाजा.

अमेरिकन ग्रॅनोला
साहित्यः चार कप ओट्स, दोन टे. स्पून बटर, एक कप मध, पाव कप जवस, पाव कप बदामाचे काप, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, पाव कप अक्रोड, पाव कप वाळलेल्या क्रॅनबेरीज, पाव कप सूर्यफुलाच्या बिया, एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स
कृतीः क्रॅनबेरी सोडून बाकीचे सर्व जिन्नस एकत्र करा आणि एका बेकिंग ट्रेवर पसरवा. ओव्हन १६० अंश से. तापमानावर ठेवून त्यात हा ट्रे ठेवा. अधूनमधून ट्रेमधलं मिश्रण खाली-वर करा. साधारण वीस मिनिटांनंतर कुरकुरीत झालं आणि खमंग वास आला की बाहेर काढा, क्रॅनबेरीज मिसळा, गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

See Also

चॉकलेट चिप ओट्स कुकीज
साहित्यः दीड कप गव्हाचं पीठ, पाव टी स्पून मीठ, एक टी स्पून बेकिंग सोडा, एक कप बटर, दीड कप साखर, दोन अंडी, दीड कप ओट्स, एक कप चॉकलेट चिप्स, अर्धा कप अक्रोड, दोन टी स्पून व्हॅनिला इसेन्स
कृतीः गव्हाचं पीठ, मैदा, मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र करा. बटर फेसा, त्यात व्हॅनिला आणि साखर घालून फेसा. एकेक अंडं घालून आणखी फेसा. त्यात पीठ, ओट्स, चॉकलेट चिप्स आणि अक्रोडाचे तुकडे मिसळा. लागल्यास थोडं दूध घाला. या पिठाचे लहान चपटे गोळे करून ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रे वर ठेवा. ओव्हन १८० अंश से. तापमानावर ठेवून त्यात या कुकीज आठ ते दहा मिनिटं भाजा.

सिनॅमन रोल्स
साहित्यः दोन कप मैदा, अर्धा कप दूध, एक अंडं, तीन टे. स्पून बटर, दीड टी स्पून यीस्ट पावडर, अर्धा टी स्पून मीठ, दोन टे. स्पून दालचिनी पावडर, एक कप बारीक साखर, ग्लेझसाठी एक कप आयसिंग शुगर आणि दूध
कृतीः पाव कप कोमट पाण्यात यीस्ट आणि एक टी स्पून साखर विरघळवून दहा मिनिटं झाकून ठेवा. यीस्ट फुगेल. मैदा, मीठ, दोन टे. स्पून बटर, पाव कप साखर एकत्र करून त्यात फुगलेलं यीस्ट आणि कोमट दूध घालून पीठ सैलसर भिजवा आणि मळून उबदार जागी झाकून ठेवा. उरलेली साखर आणि दालचिनी पावडर एकत्र करून ठेवा.
तासाभराने पीठ दुप्पट होईल. पीठ मळून त्याची आयताकृती जाड पोळी लाटा. या पोळीवर बटर लावून दालचिनीचं मिश्रण पसरवा. पाव कप मिश्रण वगळा. पोळी गुंडाळून त्याचा रोल करून रोलचे दोन इंचाचे काप करा. सर्व काप दालचिनी-साखरेच्या मिश्रणात घोळवून ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेवर दोन इंच अंतरावर ठेवा हे रोल झाकून तासभर दुप्पट होईपर्यंत ठेवा आणि १९० अंश से. तापमानावर सेट केलेल्या ओव्हनमध्ये अठरा ते वीस मिनिटं भाजा. आयसिंग शुगरमध्ये चमचा-चमचा दूध घालत पेस्ट तयार करा आणि ती गरम रोल्सवर पसरवा.

बनाना ब्रेड
साहित्यः दोन कप मैदा, एक टी स्पून बेकिंग पावडर, पाव टी स्पून मीठ, अर्धा टी स्पून सोडा, दोन तृतियांश कप बटर, दीड कप साखर, तीन अंडी, अर्धा कप दही, दीड कप केळ्याचा गर, दोन टी स्पून व्हॅनिला इसेन्स
कृतीः मैदा, बेकिंग पावडर, मीठ, सोडा एकत्र करा. बटर आणि साखर फेसा. व्हॅनिला घाला. एकेक अंडं घालून फेसा. दही, केळ्याचा गर आणि मैद्याचं मिश्रण एक आड एक घालत मिश्रण एकत्र झालं की ग्रीस केलेल्या केक पॅनमध्ये ओता आणि ब्रेड १८० अंश सेे. तापमानावर सेट केलेल्या ओव्हनमध्ये पस्तीस-चाळीस मिनिटं भाजा.

पंपकिन पाय
साहित्यः क्रस्टसाठी दीड कप मैदा, अर्धा कप थंड बटर, अर्धा टी स्पून मीठ, तीन-चार टे. स्पून थंड पाणी
सारणासाठीः दोन कप लाल भोपळ्याचा शिजवून केलेला लगदा, आटवलेल्या दुधाचा एक कॅन (आटवून निम्मं केलेलं दूध, यात साखर नसते) दोन अंडी, पाऊण कप साखर, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर, अर्धा टी स्पून सुंठ पावडर, अर्धा टी स्पून जायफळ पावडर, पाव टी स्पून लवंग पावडर, अर्धा टी स्पून मीठ
कृतीः मैदा आणि मीठ एकत्र करून त्यात थंड बटर मिक्स करा. त्यात थोडं थोडं थंड पाणी घालत बोटानं एकत्र करा. मळू नका. पिठाचा गोळा करून त्याच्या दोन पोळ्या लाटा. पोळी सगळ्या बाजूंनी थोडीशी बाहेर येईल एवढ्या मोठ्या पाय प्लेटमध्ये बसवा. अशा दोन प्लेट तयार करा. भोपळ्याचा गर, आटवलेलं दूध, साखर, दालचिनी, लवंग, सुंठ, जायफळ, मीठ एकत्र करून घ्या. त्यात फेटलेली अंडी घालून सर्व मिश्रण फेटा. हे मिश्रण पायप्लेटमध्ये बसवलेल्या पोळ्यांवर ओता. प्लेटच्या बाहेर आलेल्या पोळीचा जास्त भाग कापून कडेला मुरड घाला. १९० अंश से. तापमानावर सेट केलेल्या ओव्हनमध्ये हे दोन पाय साधारण चाळीस ते पन्नास मिनिटं भाजा. प्लेट मोठी असेल तर एकाच प्लेटमध्ये पोळी बसवून सर्व मिश्रण ओता.

अॅपल पाय
साहित्यः अडीच कप मैदा, एक टी स्पून मीठ, पाऊण कप बटर (थंड बटर लहान तुकडे करून), सात-आठ टे. स्पून थंड पाणी
सारणासाठी : एक किलो सफरचंदं, पाऊण कप साखर, दोन टे. स्पून मैदा, अर्धा टी स्पून मीठ, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर, पाव टी स्पून जायफळ पावडर, दोन टे. स्पून लिंबाचा रस, एक अंडं
एका भांड्यात मैदा, मीठ एकत्र करा. त्यात थंड बटर मिसळा. थोडं थोडं थंड पाणी घालत बोटांनी पीठ एकत्र करा. साधारण गोळा झाला की प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा.
सफरचंदं सोलून त्याचे पातळ काप करून घ्या. एका भांड्यात सफरचंदाचे काप, साखर (एक टे. स्पून वगळा), मैदा, दालचिनी, जायफळ आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवा. ओव्हन १९० अंश से. तापमानावर गरम करत ठेवा. फ्रीजमधलं पीठ काढून त्याचे दोन भाग करून घ्या. एक भाग थोडा मोठा ठेवा. मोठ्या भागाची पोळी लाटून ती पाय प्लेटमध्ये बसवा. पोळी सर्व बाजूंनी बाहेर यायला हवी. त्यात सफरचंदाचं मिश्रण ओता. दुसरी पोळी लाटून त्यावर ठेवा. कडा बंद करून अतिरिक्त भाग कापून टाका. कडेला मुरड घाला किंवा फोर्कने डिझाईन करा. पोळीवर फेसलेलं अंडं ब्रशने फासा आणि त्यावर उरलेली साखर पेरा. पोळीला वरून काट्यानं टोचे मारा. तापलेल्या ओव्हनमध्ये हा पाय पन्नास ते साठ मिनिटं भाजा.

ब्लूबेरी कॉबलर
साहित्यः चार कप ब्लूबेरीज, दीड कप साखर, एक टी स्पून किसलेली लिंबाची साल, एक कप मैदा, सहा टे. स्पून बटर, दोन टी स्पून बेकिंग पावडर, पाऊण कप दूध, पाव टी स्पून मीठ, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर
कृतीः बटरचे लहान लहान तुकडे करून एका मोठ्या बेकिंग डिशमध्ये घाला, ओव्हन १८० अंश सेे. तापमानावर गरम करत ठेवा आणि तो तापेपर्यंत पॅन ओव्हनमध्ये ठेवा, म्हणजे बटर वितळेल. बटर वितळलं की पॅन बाहेर काढून त्यात ब्लूबेरी, एक कप साखर आणि लिंबाची साल घालून ढवळा. एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, उरलेली साखर आणि लिंबाची साल एकत्र करा. त्यात दूध मिसळा. हे मिश्रण ब्लूबेरीवर ओता, वर दालचिनी पावडर भुरभुरा आणि पॅन ओव्हनमध्ये ठेवून पस्तीस ते चाळीस मिनिटं, वरून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.

वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.