Now Reading
‘अब’नॉर्मल होम

‘अब’नॉर्मल होम

Menaka Prakashan

मूल मोठं करणं सोपं अजिबातच नसतं, त्यातून ते मूल ‘विशेष मूल’ असेल तर मग आई-वडिलांच्या कष्टाला सीमाच नसते. अशा मुलांना वाढवताना, त्यांचा मूड सांभाळताना केवळ कुटुंबीय पुरेसे पडत नाहीत. समाजाचा वाटा अधिक महत्त्वाचा ठरतो. असे अनेक मदतीचे हात आपल्याकडे आहेत. अशा मुलांसाठी नवीन प्रयोगही केले जात आहेत. अशीच एक प्रयत्नशील संस्था म्हणजे ‘अब’नॉर्मल होम…

जगात सर्वत्र औपचारिक शिक्षण पद्धतीनं शिक्षण दिलं जात असलं तरीही हे शिक्षण सर्वांना उपयुक्त ठरतचं असं नाही. प्रत्येक मुलाची शिक्षणाची गरज ही वेगळी आहे. विशेष मुलांच्या बाबतीत तर हे विशेषत्वानं लागू होतं. ज्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणाला पूरक नसते, त्यांच्यासाठी अनुरूप असा अभ्यासक्रम बनवावा लागतो. त्यातूनच त्यांच्या विकासाची दिशा स्पष्ट होते. पारंपरिक पाठ्यक्रम नसताना प्रत्येक मुलासाठी वेगळा अभ्यासक्रम तयार करणं, परिणामी त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यात वारंवार बदल करून पराकोटीचा संयम बाळगून त्या मुलाला विकसित करणं हे मोठं आव्हानात्मक असतं, असं आव्हान व्रत म्हणून स्वीकारल्यानंतरच त्यात अपेक्षित असे सकारात्मक बदल दिसू लागतात. नेमकं असंच आव्हान घेऊन पुण्यातली एक संस्था गेल्या काही वर्षांपासून अशा विशेष मुलांना नवे पंख देण्याचे काम करते आहे, ‘अब’नॉर्मल होम असं या संस्थेचं नाव आहे. यातला ‘अब’ हा हिंदी शब्द आहे, म्हणजेच आता नॉर्मल असा त्याचा अर्थ आहे. संस्थेच्या या नावातूनच संस्थेच्या कामाबाबतीत सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.

विशेष मुलांना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणातून स्वतःच्या पायावर उभं राहता यावं या उदात्त हेतूनं पंकज मीठभाकरे, किशोरी पाठक, अनघा अडोणी यांच्या पुढाकारातून ही संस्था उभी राहिली. संस्थेची स्थापना १४ फेब्रुवारी २०१२ साली अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पुण्यात कोथरूड इथल्या गांधी भवन परिसरात ही संस्था विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत आहे. पंकज मीठभाकरे आणि किशोरी पाठक हे याआधी समुपदेशन क्षेत्रात कार्यरत होते. कालांतरानं विशेष मुलं ही शिक्षणात मागे पडू नयेत यासाठी उपचारात्मक शिक्षणपद्धती सुरू करावी हा विचार या दोघांच्या मनात आला. त्यातून ‘अब’नॉर्मल होम साकारलं गेलं. सुरवातीला फक्त तीन मुलांना घेऊन ह्या संस्थेचं काम सुरू झालं. नंतर मात्र गेल्या सात-आठ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी संस्था आता पूर्ण क्षमतेनं काम करते आहे. इतक्या वर्षांतून जवळपास पावणेतीनशे मुलं इथं शिकून बाहेर पडली आहेत. त्यातल्या काही जणांनी आता आपल्या करिअरमध्ये जमही बसवायला सुरवात केली आहे.

सध्या ‘अब’नॉर्मल होममध्ये अल्पमति/बौद्धिक अक्षम, गतिमंद, स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, अतिचंचल, डाऊन सिन्ड्रोम अशा गटात मोडणारी पंचेचाळीस मुलं-मुली आहेत. इथं दैनंदिन शाळेसारखी व्यवस्था आहे. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत ही शाळा असते. यात आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येकाचा अभ्यासक्रमच वेगळा असल्यानं यासाठी प्रत्येक तीन मुलांमागे एक शिक्षक आणि काही जणांसाठी तर प्रत्येक शिक्षकाला एक विद्यार्थी अशी इथं रचना आहे. हा तीन जणांचा गट करण्यामागेही एक विशेष कारण आहे, तीन वेगळ्या प्रकारे अक्षम असलेली मुलं एकत्र आली तर मुलांना त्यांची एकमेकांची ऊर्जा, बलस्थानं वापरून शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक होते. इथं वय वर्षे सहा ते सोळा या वयोगटाची मुलं शिकतात. प्रवेश प्रक्रियाही वेगळी आहे. प्रवेश देण्याआधी संबंधित विशेष मुलाला सलग तीन दिवस संस्थेत बोलावण्यात येतं. एकंदर त्याचं निरीक्षण करून त्याला प्रवेश देण्यासंबंधी निर्णय घेतला जातो, विशेष शिक्षक निवडीची प्रक्रियाही अशीच वेगळी आहे. या इच्छुक शिक्षकांनाही तीन दिवस मुलांसमवेत घालवावे लागतात. त्या शिक्षकाचा संयम, मुलाला हाताळण्याची हातोटी इत्यादी गोष्टी पाहिल्या जातात. त्यातून त्या शिक्षकाची नियुक्ती होते.

साधारणपणे ज्या घरात एखादं विशेष मूल असतं, त्या घरात व्यक्तींचं पूर्ण लक्ष हे त्या मुलाभोवतीच एकवटतं. त्या पालकानांही सातत्यानं दक्ष असावं लागतं. त्यांचं जीवन इतर सामान्य पालकांसारखं नसतं. अनेकांना आपलं करिअर सोडावं लागतं. कारण त्या विशेष मुलाची सातत्यानं काळजी घ्यावी लागते. अशा पालकांसाठी ही संस्था जणू एक वरदानच ठरली आहे. इथल्या एका बोलक्या उदाहरणाचा इथं आवर्जून उल्लेख करावाच लागेल. एक मूल जे आज या संस्थेत शिकतं आहे, त्याच्या जन्मापासून बारा वर्षांपर्यंत त्याच्या आई-वडिलांना बाहेर निवांत जेवायलाही जाता आलं नव्हतं. ते इथं आपल्या पाल्याला शिकण्यासाठी पाठवल्यानंतर आपलं आयुष्य निर्धास्त जगू लागले. यामुळे पालकांना दररोज किती वेळ द्यावा लागत असेल याची स्पष्ट कल्पना येते. प्रत्येकाला शिकवण्याची पद्धत वेगळी असली तरी इथं जो शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवला जातो, त्याला राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आधार असतो. त्या अनुषंगानं तयारी करून घेतली जाते. आतापर्यंत पंधरा जणांनी इथून प्रशिक्षित होऊन इयत्ता दहावीचा अभ्यास पूर्ण करून उत्तम गुणांनी ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे.

सर्वसाधारण शाळांमध्ये पारंपरिक शिक्षण पद्धती वापरली जाते आणि त्यामध्ये भाषिक व गणिती अभ्यासक्रम केंद्रस्थानी असतो. इथे मात्र शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर कला, संगीत, खेळ, बागकाम, वस्तू बनवणे यावरही तेवढाच भर दिला जातो. यासाठी बहुविध बुद्धिमत्ता थिअरीजचा पाया वापरला जातो. मुलं या सर्व कृतींमध्ये आनंदानं सहभागी होतात आणि यातूनच त्यांची विचारशक्ती तसंच कल्पनाशक्ती विकसित होत जाते. संस्थेच्या आवारात तीन गायी आणि वीरा नावाचं श्वान आहे. यांच्या सोबतही मुलं खूप रमतात. या प्राण्यांच्या दृष्टीनं ही मुलं फक्त मानव आहेत, त्यात विशेष व्यक्ती वगैरे असा त्यांच्यात भेद नसतो. त्यामुळे ही मुलं या प्राण्यांमध्ये रमतात. हा प्राणी उपचार पद्धतीचा भाग आहे. मुले या प्राण्यांना खायला देण्यापासून त्यांची स्वच्छता करण्यापासून सर्व करतात. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचं एक घट्ट नातं विकसित झालं आहे.

यातल्या काही विकसित झालेल्या मुलांची गोष्ट सांगायची झाल्यास एक संगीतकार झाला आहे, एकानं अमेरिकेत घेतल्या जाणार्‍या ‘आयर्नमॅन’ या स्पर्धेत भाग घेतला होता. एक जण आपलं एक दुकान चालवतो. हॉटेल व्यवस्थापन आणि पर्यटन या क्षेत्रात एक जण कार्यरत आहे.
स्वतःच्या नसलेल्या क्षमता विकसित करण्यापासून ते व्यवसाय शिक्षणापर्यंत संस्था काम करते. सॅनिटरी नॅपकिनच्या रेड डॉट बॅगेपासून, उटणं, गोड सुपारी इत्यादी वस्तू मुलंच बनवतात आणि त्याची विक्री करतात.

इथल्या प्रत्येक मुलाचा अभ्यासक्रम वेगळा असला तरीही त्यात लवचिकता असते. ठराविक काळानंतर चर्चा आणि चिंतन करून त्यात काही बदल करता येतात. या मुलांना प्रत्यक्ष कृती शिक्षणाद्वारे शिक्षण देण्याची पद्धती असल्यानं सध्याच्या ऑनलाईन काळात मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यात मर्यादा आहेत. हा काळ ही मुलं, त्यांचे पालक आणि शिक्षकांसाठीही आव्हानात्मक आहे. या मुलांना ऑनलाईन माध्यमाद्वारे नियंत्रित करणं अवघड असतं, तरीही अनेक नवनवीन कल्पना आणि रंजकता आणून मुलांचं शिक्षण सुरळीत सुरू ठेवण्याचं आव्हान संस्थेनं पेललं आहे. यात पालकांचीही भूमिका महत्त्वाची ठरली आहे. रोज दीड-दीड तासांच्या दोन सत्रांमध्ये हे शिक्षण सुरू आहे. यात गोष्टीरूपानं आणि विषयांचे व्हीडिओ दाखवून हे शिक्षण होत आहे. या सबंध प्रक्रियेत ‘अब नॉर्मल होम’चं महत्त्व या पालकांनाही खर्‍या अर्थानं समजलं आहे. या मुलांना ही शाळा हे सर्वस्व असल्यानं या टाळेबंदीच्या काळातही त्यांना शाळेत यायची तीव्र इच्छा होती. मात्र ते शक्य नसल्यानं अनेकांना ‘ऑनलाईन व्हीडिओ टूर’द्वारे कँपसची सैर घडवून आणली. अक्षर ओळखपासून ते आपल्या चालीत गाणी सादर करणं हे सर्व ऑनलाईनच्या माध्यमातून केलं. आता मुलंही या ऑनलाईन शिक्षणाला सरावली आहेत. या दरम्यान या मुलांनी एका आंतरराष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेत तसंच एका लाईव्ह कार्यक्रमात सादरीकरणही केलं.

संस्थेच्या स्थापना दिनाच्या विविध कार्यक्रमाअंतर्गत प्रत्यक्षपणे सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, एका वर्षी विविध पद्धतीनं उपक्रम राबवण्यात आले होते. या अंतर्गतच पुण्यातल्या युद्ध स्मारक आणि दिघी इथल्या संरक्षण संस्थेला भेट देण्यात आली होती.
मुलांना दैनंदिन शिक्षणासोबतच व्यवहार शिक्षणही शिकवलं जातं. कार्यानुभवाच्या माध्यमातून ज्या विक्रीयोग्य वस्तू बनवल्या जातात. त्या प्रत्यक्ष विकताना कशा प्रकारचे व्यवहारचातुर्य असावे याचाही प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.
आजवर संस्थेनं मुलांना शिकवलंच नाही तर या विश्वात प्रत्यक्ष भरारीही घ्यायला शिकवलं. त्यामुळे आज इथून शिकून गेलेली मुलं आपल्या आवडीच्या क्षेत्रात जम बसवत आहेत. त्यांच्या परिवर्तनात संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. यातल्या एकानं आपला पहिला पगारच संस्थेला देणगी म्हणून दिला. यातून त्यांच्या जीवनात संस्थेचं महत्त्व किती आहे याची सहज कल्पना येते. आज इथं आलेल्या इवल्याशा रोपांचं झाडांत परिवर्तन होत आहे. उद्या हीच मुलं आपल्या कर्तृत्वानं वटवृक्ष होतील.

सध्या ज्या ठिकाणी ही संस्था आहे, ती जागा भाड्याची आहे. ही जागा रम्य आहे, मात्र तरीही या जागेला तशा मर्यादा आहेत. त्यात ही संस्था निवासी असावी अशीही मागणी असल्यानं भविष्यात स्वतःच्या जागेत मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभारण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.
या मुलांच्या विकासात संस्था आणि इथल्या शिक्षकांचं जसं योगदान आहे, तसंच शाळेव्यतिरिक्तच्या वेळात मुलांकडून संयमानं काम करवून घेणं यात पालकांचा मोठा सहभाग असतो.

विशेष मुलं, त्यांचे पालक आणि ‘अबनॉर्मल होम’ सारख्या संस्था या त्रिकोणात आणखी एक कोन आहे, तो कोन म्हणजे आपला समाज! होय समाज. ‘अब’नॉर्मल होम एक संवेनशील समाज उभारण्यासाठी हातभार लावत आहे. तसंच समाजानं या विशेष मुलांना स्वीकारावं यासाठी संस्था विशेष आग्रही आणि प्रयत्नशील आहे. या संस्थेत काम करणारे शिक्षक आणि स्वयंसेवक हे स्वतःचं जीवन समर्पित करून आपलं काम पुढे नेत आहेत. ते स्वतःच्या जीवनात आणि कुटुंबात तडजोडी करून संस्था उभ्या करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत. या मुलांच्या जीवनात आनंद फुलावा हाच हेतू त्यामागे असतो. ही जबाबदारी जितकी या स्वयंसेवकांची आहे, ती तितकीच आपल्या या समाजाची आहे. या मुलांना इतर मुलांसारखीच वागणूक देऊन त्यांना आपल्यात सामावून घेतलं तर आत्मविश्वास वाढून ते इतरांप्रमाणे फुलतील आणि त्यातूनच खर्‍या अर्थानं आपली समतोल अशा समाजाकडे वाटचाल सुरू होईल.

– संतोष गोगले

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.