Now Reading
अंतर

अंतर

Menaka Prakashan

‘‘पुढच्या वेळी चार दिवस राहायलाच ये. माहेरी आल्येस असंच समज. आणि सांगितलेलं लक्षात ठेव, कुणाच्या मनात काय असतं, लगेच कळत नाही. बोलणं गोड असावं पण वागायला ताठ असावं बाईमाणसानं. आपला आब आणि अंतर- दोन्ही राखून असावं. एकटी राहतेस, तरुण आहेस, जपून रहा.’’ मनापासून काळजीनं बोलल्या होत्या. तिच्या हातात त्यांनी साडी ठेवली. तेव्हा त्यांचा निरोप घेताना त्यांनी आपल्याला कुंकू लावलं नाही, याचं वैषम्य मग मितालाही वाटलं नाही…

उशिरा का होईना, दुरोंतो एक्सप्रेस नागपूर स्थानकात पोचता पोचता अविनाशचा फोन आला.
‘‘उशीर झाला गं खूप, मी वाट बघून शेवटी निघालो.’’
‘‘हो. अरे, मध्ये गाडी खूप रखडली. सिग्नल मिळेनात.’’
‘‘मी गाडी-ड्रायव्हर पाठवलाय. तो कधीच स्टेशनवर पोचलाय. तू डब्यातच बसून रहा. तो तुला घरी पोचवेल. जेवण तयार असेल. जेवून आराम कर. मी येतोच संध्याकाळी.’’
गणवेशातल्या ड्रायव्हरनं अदबीनं तिला सलाम केला. तिचं सामान घेऊन तो तिला स्टेशनबाहेर गाडीपाशी घेऊन आला. भलं मोठं स्टेशन, पण चकाचक होतं. ड्रायव्हरनं सराईतपणे गाडी बाहेर काढली. स्वच्छ मोठ्ठे रस्ते, मुद्दाम जोपासलेली हिरवाई, चौकाचौकात पुतळे, मेट्रोचं काम सुरू होतं, स्मार्ट बसेसही पळताना दिसत होत्या.
दुपारची वेळ असूनही चांगलंच गार वाटत होतं. इथली थंडी अनुभवायची म्हणून तर ती या ऋतूत आली होती. अवीच्या अधिवेशनाला जोडून. या वेळी तो नागपुरात असतो. दिवाळीला त्याचा फोन आला. ‘नक्की ये’ असं चारदा बजावलं. तोपर्यंत प्रोजेक्टचंही हस्तांतरण अंतिम टप्प्यात होतं, म्हणून तर बेत पक्का केला. एवढा मोठा अध्याय संपल्यावर आता जरा बदल – थकलेल्या शरीराला, चिडचिडलेल्या मनाला जरा सुट्टी!
आणि ती अवीशिवाय कुठे मिळणार?
नागपूरला ती प्रथमच येत होती. इंग्रजांची ही एकेकाळची राजधानी. शासकीय इमारती अजूनही आपला दिमाख टिकवून होत्या. आता महाराष्ट्राची ही हिवाळी राजधानी!

शहरापासून दूर, जरा टोकाला, पण फार दूर नाही, अशा एका बंगल्यांच्या वसाहतीत गाडी शिरली आणि त्या गल्लीतल्या शेवटच्या बंगलीपाशी उभी राहिली.
जरा जुनीच, पण छोटेखानी, अशी ती टुमदार बंगली तिला एकदम आवडून गेली. म्हटलं तर शहरातच. पण वस्ती चांगली दिसत होती. रहदारीपासून दूर, निवांत उभी ती बंगली!
अवीची मुलगी एम.डी. करायला नागपूरच्याच शासकीय महाविद्यालयात होती. त्या वेळी ती आणि तिच्या तीन मैत्रिणी इथंच राहत होत्या. रेसिडेन्सी संपवून नुकत्याच परत गेल्या. त्यामुळे बंगली वापरातली वाटत होती.
पार्वतीबाई वाटच बघत होत्या. हसतमुख वाटल्या. जवळच राहतात म्हणाल्या. मुलींना त्याच रांधून देत होत्या नि इथली साफसफाई – त्यामुळे बंगली त्यांना परिचित होती.
ड्रायव्हरनं तिचं सामान खोलीत ठेवलं नि तो सलाम करून निघून गेला. ‘इथून अर्ध्या तासावरच अधिवेशनाची इमारत आहे,’ असं म्हणाला.
मिता आंघोळ करून आली. तोपर्यंत पार्वतीबाईंनी गरमगरम वाढलं होतं. लालभडक रश्श्याची पतोडी, कढी, नि गरम फुलके, शेवटी खास नागपुरी गोड भात.
‘‘अहो बाई, मी आहे चार-पाच दिवस. आजच हे एवढं सगळं खिलवणार आहात का?’’
‘‘तसं न्हाय, दादा सांगून गेल्ते. आज काहीतरी खास बेत करा. पावण्या यायच्यात.’’
‘‘छान झालंय सगळं. पतोडी रस्सा कमी तिखट केलाय ते बरं झालं. पण चवदार झालाय अगदी.’’
‘‘मला पारुबायच म्हना. ताई, मी आता लगी जावन यावं का? दादा येतील सहानंतर. तोपतूर येते. तुमी आराम करा. फ्रीजमधी दूध हाय. इथं चापत्ती, साखर, बिस्कुट समदं ठिवलंय. फक्त बंगलीबाहर जाव नकासा हां.’’
‘‘चालेल, जा तुम्ही. मी आहे इथेच. जात नाही कुठे.’’ पारूबाई गेल्या नि मिता व्हरांड्यात आली. सुरेख, एकमजली बंगली, वर एक खोली नि गच्ची. खाली दोन खोल्या. स्वयंपाकघर, न्हाणीघर, व्हरांड्यात आरामखुर्ची नि झोपाळा. बाहेर राखलेलं लॉन नि छोटीशी बाग… आत्ता दुपारी तरी निवांत होतं सगळीकडे…
बरं झालं, अवीनं इथंच सोय केली ते. हॉटेलच्या खोलीत गुदमरलो असतो आपण… तिनं अवीला फोन केला.

‘‘मोकळा आहेस का बोलायला?’’
‘‘हो. हो बोल ना. आत्ता बाहेरच आहे सभागृहाच्या. झालं जेवण?’’
‘‘हो छान होतं – जेवण – पारूबाई नि ही बंगलीही!’’
‘‘ऐश्‍वर्या नि तिच्या मैत्रिणी राहत होत्या तेव्हापासून दोन-तीन वर्षं आहेत त्या. विश्‍वासू आहेत.’’
‘‘आणि ही बंगलीही छान हो. लॉन, झोपाळा… तू तुझं काम संपवून ये. खूप बोलायचंय.’’
‘‘मी येतो सहापर्यंत. फ्रीजमध्ये-कपाटात सगळं भरून ठेवलंय. आता आराम कर. आल्यावर बोलू.’’
मिता व्हरांड्यातच आरामखुर्चीत लवंडली. समोरचा परिसर समजून घेत असतानाच तिच्या डोळ्यांवर झापड येत गेली. इतक्या तासांचा प्रवास नि आता हे पोटभर जेवण… तिनं सगळी दारं बंद करून, तिच्या खोलीत जाऊन ताणून दिली.
संध्याकाळी पारूबाईंनी दिलेला मसाला चहा पीत मिता पायर्‍यांवरच टेकलेली. हिवाळ्यातलं सुखद ऊन गवतावर सांडलं होतं. चढता गारवा मधूनच अंगावर शिरशिरी उमटवून जात होता. पारूबाई नि तिच्या गप्पा चालल्या होत्या. तोच समोर अवी हजर! सोबत ड्रिंक्स नि चकण्याच्या पिशव्या.
‘‘चहा घेशील का रे? खूप थंडी आहे हं इथे – पण आवडतंय मला – छान वाटतंय.’’

‘‘छे, ही काय चहाची वेळ आहे? आत्ताच्या ऋतूला नि हवेला साजेसं ड्रिंक आणलंय मी. आंघोळ करून येतो थांब. पारूबाई आज रात्री झकास काहीतरी चमचमीत जेवण करा.’’
मग अवीनं व्हरांड्यातल्या छोट्या मेजावरच सगळा सरंजाम मांडला. भवताल हळूहळू काळोखात बुडत होतं. दोघंही आपल्या विचारात मग्न…
‘‘मेघना कशी आहे? लग्नानंतर आता सगळं स्थिरस्थावर झालं का? एकदम परदेश म्हणजे…’’
‘‘अगदी मजेत आहेत दोघं. सकाळी उठून कामाला जातात. रात्री येऊन दोघं मिळून स्वयंपाक करतात. नवीन लग्न. नवीन संसार. पण खूष आहे पोरगी…’’
‘‘नि तुझ्या प्रोजेक्टचं काय? सगळं निपटून आलीस?’’
‘‘हो, सगळ्या फायली-संदर्भ त्याला देऊन टाकले. गेला तो ऑफिस सोडून. आता माझा-प्रोजेक्टचा संबंध संपला.’’
‘‘संबंध संपला असं नव्हे, तुझं त्यातलं काम संपलं म्हण. तुझा ५०% वाटा आहेच ना त्यात. म्हणजे आता ऑफिस मोकळं झालं तर तुझं…’’
‘‘ मी एक तारखेपासून ऑफिस भाड्यानं दिलं.’’
‘‘अरे व्वा! हे छान झालं. तेवढीच तुझी स्वतःची मासिक प्राप्ती सुरू.’’
‘‘फार पूर्वीच हे करायला हवं होतं. पाच वर्षं त्याला माझ्या ऑफिसमध्ये ठेवून घेतलं नि त्यापायी गेली दोन वर्षं भोगतही राहिले. सरळ पुसून टाकावीशी वाटतात ती वर्ष आयुष्यातून आणि तरीही सगळं आठवत राहतं सारखं…’’
‘‘फार चांगुलपणा दाखवूनही चालत नाही हल्ली!’’
‘‘हम्म, सोड! तुमचं अधिवेशन कसं झालं आजचं? किती हाणामार्‍या केल्यात?’’
‘‘(हसून) त्यासाठी आमदार नि मंत्री असतात की. आम्ही फक्त त्यांना रसद पुरवतो. बस आता हे शेवटचे दोन दिवस. तेवढं तुला जरा सांभाळून घ्यावं लागेल.’’
‘‘अरे माहितेय मला. माझ्या जावेचं-नीलिमाचं माहेर आहे इथे धंतोलीमध्ये. तिथे उद्या जायचंय नि माझ्या सहनिवासमधली मैत्रीण – वर्षा माहीतेय ना तुला? ती लग्नानंतर इथेच आहे -तिच्याकडे एक दिवस. तू सुटलास की मग मात्र तुला सोडणार नाही.’’
‘‘बंदा हाजिर है!’’
‘‘मला तुझ्याबरोबर नागपूरमध्ये भटकायचंय.’’
‘‘कुठं कुठं जायचंय सांग. आख्खं नागपूर दर्शन घडवतो तुला.’’
पारूबाईच्या हातचं झणझणीत सावजीचं मटण खाऊन अवी गेला. तो सरकारी कर्मचारी, मोठ्या हुद्द्यावरचा. अधिवेशनाच्या काळात त्यानं सरकारी डाक बंगल्यातच राहणं अपेक्षित होतं. तशी त्यानं मिताला कल्पना दिली होती.

पारूबाई आवरत होती तोवर ती शाल लपेटून गल्लीच्या तोंडापर्यंत चालत गेली. भोवतालच्या बंगल्यातली जागा सोडली तर तो भाग शांत होता. आजूबाजूला मुद्दाम लावलेली झाडं होती. आकाश स्वच्छ निरभ्र होतं. आता थंडी वाढली होती. तिला आल्हाददायक वाटलं. भराभर चालत ती परत बंगलीत आली. पारूबाईंना घरी जायचं असेल….
‘‘न्हाय, दादा म्हनलेत, तुमी असेपर्यंत रातच्याला हिथंच र्‍हा. सोबतीला. अगदीच यकल्या नगत. म्या तसं माज्या घरी सांगून आलंय. सकाळच्या पारी चा-नाश्ता करूनशान जाईन घरी.’’
‘‘अरे, अवी बोलला नाही मला! पण हे छान झालं. सोबत नाही पण गप्पा मारायला बरं. उद्या मला जेवायला जायचंय एका ठिकाणी. तुम्ही एकदम सहा-सात वाजता आलात तरी चालेल. अवी येईल तेव्हा. तो असेल हं जेवायला रात्रीचा.’’
‘‘व्हय, काफी करू का ताई? वाईच ऊब धरेल. तुमाला सवय नाय ना इथल्या गारठ्याची.’’
‘‘चालेल. आणि मी जातेय गच्चीवर. दोघींची कॉफी घेऊन तुम्ही वरच या.’’
गच्चीतून आता लांबवरचं दिसत होतं. वाहनांचे लुकलुकते दिवे, रस्त्यावरच्या दिव्यांची ओळ. वरती चांदण्यांनी भरलेलं आभाळ – तिला आनंद आठवला. त्याला नक्की, या वेळेला साजेशी, एखादी कविता सुचली असती.
गरम वाफाळत्या कॉफीच्या वासानंच तिला तरतरी आली.

‘‘झक्कास झाल्ये कॉफी पारूबाई. अगदी या वेळी हवीच होती. मी नागपूरला प्रथमच येतेय. इथं पाहण्यासारखं काय काय आहे? तुम्ही इथल्याच ना?’’
‘‘देवळं म्हनता तर लई हायत बगा. टेकडी गणेश मंदिर, स्वामीनारायण, घोगर्‍या महादेवाचं, देवीचं आनि लांब जानार असाल तर मग आदासा गनपती, रामटेक. झालंच तर ते बुद्धमंदिर….’’
‘‘अहो थांबा थांबा. नुसती मंदिरं नव्हे. इतर काही, जाऊन बघावं असं?’’
‘‘म्हंजी तशा बागा नि तलाव बी भरपूर हायसा. झालंत तर ते तितं वाघ पाळलेत ना…’’
‘‘हां ते अभयारण्य?’’
‘‘व्हयं नि ते दुसरं प्राणी-पक्ष्याचं बी हाय. आनि हां, ती लता मंगेशकर हाय ना गानारी, तिची एक बाग बी हाय बगा. मस्त कारंजी अस्त्यात तितं. आमी गेल्तो यकदा.’’
‘‘तुम्ही इथल्याच ना हो?’’
‘‘व्हय. माझं माहेर सीताबल्डीत. आता हिथंच जवळ र्‍हाते रामनगरला. तुमी रामनवमीला यायचं होतं बगा. खूप मोठी जत्रा भरते. या पोरीबी जायच्या जत्रंला.’’
‘‘अहो, तुमचे अविनाशदादा आहेत ना, ते सरकारमध्ये मोठ्ठे अधिकारी आहेत. तो सरकारचं इथं अधिवेशन भरतं ना त्यासाठी इथं येतो.’’
‘‘व्हयं. दरवर्साला येतात, तेंच्या मुलीला भेटायला बी यायचे इथं.’’
‘‘हो, मग तो इथं असेल तेव्हाच त्यानं मलाही बोलावलनं न. माझ्या कॉलेजचा मित्र तो.’’
‘‘व्हय? मंजी लई वर्स जाली असतील.’’
‘‘हो. पण आमचं जाणं-येणं कायम आहे. तीन वर्षं बोलावतोय तो मला. आज मुहूर्त लागला. आता बघू तो मला काय काय दाखवतोय?’’
‘‘हां जाताना संत्र्याची करंडी नि संत्रा बर्फीबी घेऊन जातात दर सालाला. ताई, उद्या तर्री-पोहे करू का नाश्त्याला? त्ये बी खास असतात हिथले.’’
‘‘करा. पण जास्त तिखट नको हं.’’
‘‘व्हयं माहीतेय मला. तुमी जास्त तिकाट खात न्हाय. आज लक्षात आलं.’’
***

नीलिमा-तिची धाकटी जाऊ. विराज-नीलिमा बंगलोरला राहत; पण नीलिमा मूळची नागपूरची. तिचं वूटी घराणं म्हणजे पूर्वीचं सरदार घराणं. तिच्या कुटुंबाशीही मिताचा परिचय होता. नील गेला तेव्हा समाचाराला आणि मेघनाचं लग्न झालं तेव्हा नीलिमाच्या अक्का तिच्या घरी येऊन गेल्या होत्या.
धंतोलीत ती नीलिमाच्या माहेरी पोचली तेव्हा अकरा वाजले होते. तिनं पुण्याहून आणलेल्या मिठाया-फराळ-नमकीन अक्कांच्या स्वाधीन केलं. अक्का साठीच्या पुढच्या. पण पाच मुली होऊनही तब्येत खणखणीत. पूर्वी धंतोलीत नागपूरच्या राजाचा खजिना ठेवलेला असे. त्याचेच रक्षक-हे सरदार-वूटी! मुली सगळ्या लग्न होऊन गेल्या. दोन-तीन वर्षांपूर्वी अण्णाही गेले. आता घरात पुरुष-माणूस कुणीही नाही. शहराबाहेर काही शेकडो एकर शेतजमीन आणि संत्र्याच्या बागा. पण अक्का खमकेपणाने नोकरांकडून सगळं करून घेत असत. आताही घरात तिच्यासाठी, आचार्‍याला सूचना देत साग्रसंगीत स्वयंपाक रांधणं सुरू होतं.

‘‘आक्का, साठी झाली. आता निवृत्त व्हायचं तुम्ही. पण दर वेळी बघते तुमचा उत्साह आम्हालाही लाजवेल असा. कुठून आणता एवढी शक्ती?’’
‘‘निवृत्त कुठली गो होते? एवढा पसारा आहे, शंभर खंडी धान्य येतंय घरी. कडधान्य, भाज्या आहेतच. संत्र्यांच्या बागा वेगळ्याच – पण त्या मोसमी. पण पूर्वीपासूनची विश्‍वासू माणसं बांधून ठेवल्येत. नोकरमाणसं ढीगभर आहेत. पण आपली जातीनं देखरेख लागतेच.’’
‘‘अहो अक्का, हा एवढा वाडा, ही हंड्या-झुंबरं, सागवानी फर्निचर पाहूनच छाती दडपते. आम्हाला आमचं घर नाही आवरता येत!’’
‘‘तो राम करवून घेतो माझ्याकडून. सगळे पांगले, आता तो राम आणि मी – दोघंच!’’
‘‘कुणा मुली-जावयाला इथेच का नाही ठेवून घेत? मदतीला…’’
‘‘अगो, मदत कशाला लागते? कामं तर सगळी ही नोकर मंडळीच करतात की. मी फक्त लक्ष ठेवून असते. आणि मुली आपापल्या घरी राहिल्या तरच जीव लावतील. गळ्यात पडल्या तर त्यांनाही जाच नि मलाही काच! लांबच बरे सगळे.’’
‘‘सोबत म्हणून सुचवलं हो.’’
‘‘तशी भारती नि तिचे यजमान होते इथे. रिजर्व ब्यांकेच्या पोस्टिंगवर आले होते – तीन वर्षं. मग मुंबईला बदली झाली.’’
‘‘हो. इथे रिझर्व बँकेचं सगळं गोल्ड रिझर्व्ह आहे ना?’’
‘‘आणि मधल्या मीनाचाही मुलगा होताच की चार वर्षं. एम. आय. टी. ला त्याचं शिक्षण झालं नि तोही चालला गेला. पण कायमचं कुणी नाही इथं. चालले गेले सगळे.’’
‘‘खरंच नागपुरात शिक्षणसंस्था तरी कित्ती आहेत. येताना बघत आले ना मी, आणि तुमच्या या भागात तर सगळी हॉस्पिटलं. तीही मोठ्ठी नि औषधांची दुकान.’’
‘‘अगो, विंग्रजांच्या काळात महाराष्ट्राची राजधानी होती ही. आता फक्त हिवाळी अधिवेशनापुरतं महत्त्व उरलंय तिचं. तेही मंत्री लोकांना इथल्या थंडीत इथं राहायचं असतं ना, म्हणून इथं अधिवेशन भरवतात. उन्हाळ्यात कोण येतंय इथे?’’
‘‘हो तसंही असेल. मी नाही का थंडीच्या मोसमातच आले.’’
‘‘काय म्हणतेय मेघना? तुझी एकच मुलगी. तिलाही धाडलीस परदेशी. नीलभावोजी गेले त्यानंतर आले होते तुझ्याकडे. मग मेघनाच्या लग्नात गाठ पडली होती.’’

‘‘मेघना-जयेश दोघंही मजेत. दोघांनाही नोकर्‍या आहेत. आता तिथं रुळतेय चांगली. मी कसली धाडतेय तिला? ही पुढची पिढी. त्यांचं त्यांनी ठरवलं नि गेले. आपण फक्त आशीर्वाद द्यायचे. तिला जाताना घर बसवण्यासाठी एफ.डी. मोडून दिल्या. माझ्यानंतर माझं काय आहे ते सगळं तिचंच तर आहे.’’
‘‘आणि तुझ्यासाठी काही स्थावर-जंगम ठेवलंस की नाही? अगो तुझं वय काय? नीलिमापेक्षा तू थोडी मोठी. म्हणजे माझ्या मुलीसारखीच, म्हणून सांगते हो. सगेसोयरे सगळे उंबर्‍याबाहेर, कायमचा आत कुणाला प्रवेश नाही. आपलं आपण कुंपण घालून घ्यावं. म्हणजे लोकंही मर्यादेत राहतात. सीतामाईचं काय झालं, ते मोठ्ठं उदाहरण आहे समोर.’’
‘‘हो उंबर्‍याच्या आत लोकांना येऊ दिलं तर लोक कसे गैरफायदा घेतात तो अनुभव घेतलाय.’’
‘‘आता रावसाहेब नाहीत. तर तुझी तू घट्ट रहा. जी काय स्थावर-जंगम धन-दौलत असेल ती तुझ्यानंतर ठेव तिला. तरच तुझी किंमत राहील. ती आता लांबच आहे ते चांगलंच आहे. तुझी तू कामात रहा. तुझ्या त्या शेताचं काय झालं? प्रोजेक्ट होता ना – कसलासा?’’
‘‘त्यातलं माझं काम पूर्ण झालंय. सगळ्या खात्यांच्या सरकारी परवानग्या काढून दिल्यात. कागदपत्रं पूर्ण केलीत. आता पुढचं विकसनाचं काम माझा भागीदार करेल.’’
‘‘तरी तुझंही लक्ष असू दे. तो म्हणतोय म्हणून लगेच कुठेही सही करू नकोस.’’
अक्कांना सगळंच सांगावं असं तिला वाटलं. पण आवंढ्याबरोबर तिनं शब्दही गिळले. नील कार्डियाक अरेस्टनं गेला त्याला तीन वर्षं झाली. तेव्हा खरा आधार दिला नीलिमा-विराजनं. दोघंही महिनाभर तिच्याकडे येऊन राहिले होते. अवीनं बाकी मदत केली.
तिनं तेव्हा नुकतेच प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते. जमिनीची खरेदी झाली नि मग सगळं काम तिच्याच गळ्यात येऊन पडलं, इतकी ती त्या प्रोजेक्टमध्ये गुंतत-गुरफटत गेली! इतकं सगळं करूनही शेवटी….

आणि त्या म्हणतात ते खरंच… नील गेल्यावर मदतीच्या नावाखाली लघळपणा करणारे कितीजण होते? त्याच्या ऑफिसचे सहकारी, शेजारी, एलआयसीचे अधिकारी, अगदी बँक मॅनेजरसुद्धा…आणि काही मित्रही!
मितानं ते विचार झटकून टाकले. पानावर बसल्यावर सुग्रास अन्नाचा अपमान नको. पूर्णब्रह्माचा शुद्ध मनानंच आदर करायला हवा.
वर्‍हाडी आदरातिथ्याचा तिला आज पुरेपूर प्रत्यय येत होता. झणझणीत तडका दिलेला नागपुरी वडाभात, कढी, सावजीचं शाकाहारी जेवण नि शेवटी महाराजानं वाढलेली गरमागरम जिलब्यांची चळत! कितीतरी वेळ हात वाळवत दोघींच्या गप्पा सुरू राहिल्या.
जेवल्यावर अक्कांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली.
‘‘अक्का, अँबेसिडर? अजून वापरता?’’
‘‘चालतेय चांगली, भक्कम आहे. शेतातसुद्धा जाते.’’
‘‘कुठे जातोय आपण आता?’’
‘‘चार देवांच्या पाया पडून आणते तुला. तुझ्या निमित्ताने माझंही देवदर्शन होईल.’’
‘‘देवळं बरीच आहेत ना या भागात. आता कुठे? मार्कंडेश्‍वरला का? फार पुरातन देवालय आहे ना ते?’’
‘‘ते मंदिर जरा लांब आहे. गडचिरोलीत जावं लागतं. आता आपण जातोय अदासा गणपतीला. तासभरचा रस्ता…’’
ड्रायव्हरनं जोरात गाडी सोडली. रस्ता चांगला होता. दुपारच्या उन्हामुळे आत्ता एवढी थंडी जाणवत नव्हती.
‘‘तसं नागपूरला रामाचं फार प्रस्थ. पण मला मात्र हा गणपतीच आवडतो. स्वयंभू आहे. शमी गणेश म्हणतात याला.’’
‘‘बराच प्राचीन आहे का?’’
‘‘हो, मुद्गल पुराणात लिहलंय. पृथ्वीवर बळीराजा फार उन्मत्त झाला होता. तेव्हा आदिती मायेच्या पोटी श्रीविष्णूनं जन्म घेतला. तोच वामनावतार! बळीकडे तीन पावलं दान मागायला जाताना, वामनानं वाटेत याच ठिकाणी गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपती इथल्या शमी वृक्षांतून प्रकट झाला नि त्यानं वामनाला आशीर्वाद दिला. म्हणून तो स्वयंभू, आणि म्हणून – शमी गणेश.’’

– अक्कांनी स्थानमाहात्म्य सांगितलं!
‘‘प्रत्येक प्रसिद्ध मंदिरं, गड-किल्ले-प्राचीन वास्तू यांच्याभोवती अशा आख्यायिका असतातच ना अक्का?’’
‘‘हम्म्. आपण त्यातून योग्य तो बोध घ्यायचा…दानसुद्धा सत्पात्री द्यावं म्हणतात ते खोटं नाही. बळीराजानं वामनाला तीन पावलं जमीन दिली नि वामनानं त्याच्याच डोक्यावर पाऊल ठेवून त्यालाच पाताळात गाडला. कर्णानं आपली कवचकुंडलं दान दिली, त्यामुळे पुढे त्याचाच जीव गेला. राजा हरिश्चंद्रानं विश्वामित्र ऋषींना सगळं राज्य दान दिलं नि स्वतः स्मशानात चांडाळाचं काम करू लागला. म्हणून म्हणते दान जरूर द्यावं पण ते कोणाला देतोय – त्याचे परिणाम काय होतील, हा सगळा विचार करून द्यावं.’’
मिताला हसू आलं. अक्का मागच्या पिढीतल्या, पण त्या या आणि पुढच्याही पिढीत टिकून राहायला एकदम लायक होत्या.
तासाभरात मंदिर आलं. टेकडीवर वसलेलं मंदिर. वर जायला २५०-३०० पायर्‍या. विस्तीर्ण आवार – त्यात अनेक छोटी-मोठी मंदिरं. खाली उतरलं की गणेशकुंड, देवळाच्या बाहेरील भिंतीवर केलेली कलाकुसर नि मूर्तिकाम लक्षवेधी होतं. किती काळ उन्हाळे -पावसाळे झेलत उभ्या राहिल्या असतील या मूर्ती? देवाला मूर्तीमध्ये अडकवलं की त्याचेही भोग सुटत नाहीत हेच खरं!
अदासा गणपतीच्या दर्शनानं मात्र तिची छाती दडपली. दहा-बारा फूट उंच नि सात-आठ फूट रुंदीची गणेशमूर्ती-स्वयंभू! त्याला फक्त दूर्वा वाहायच्या. मग तो प्रसन्न होतो. लोक रांगेने दर्शन घेत होते. नवस बोलत होते.
आवारात अजूनही काही छोटी मंदिरं-खोल खाली वसलेलं पाताळेश्‍वर लिंग-तेही स्वयंभू. त्र्यंबकेश्‍वर, दुर्गा, उभा हनुमान, कालभैरव, शिवमंदिर. पण तिला खरी गंमत वाटली, ते झोपलेल्या हनुमानाचं मंदिर बघून. तोपर्यंत फक्त शेषशायी विष्णूच माहीत होता. हनुमान बहुधा द्रोणागिरी उचलून दमला असावा. देवांनाही विसावा लागतो म्हणायचा! पुण्यातली देवळं नाही का एक ते चार बंद असतात! तेव्हा देव झोपतात की ती पुजार्‍यांची सोय असते – ते त्या दोघांनाच ठाऊक…अदासा गणपतीच्या समोरच हात जोडून मोठ्ठी मूषक-मूर्ती उभी होती. असा मूषकही इथं प्रथमच बघितला.

बाहेर येऊन आवारात फिरताना मात्र तिला हनुमान मंदिरासमोर भंगलेल्या-तुटलेल्या काही मूर्ती नि समाधी दिसल्या. देव मूर्तीत नसतो हे मान्य केलं तरी मूर्ती भंगली की विषाद वाटतोच. मूर्ती ही देवाची प्रतिमा – खरं आहे – प्रतिमा; मग ती कुणाचीही असो, भंगली की खंत वाटतेच!
परतताना अक्कांनी तिला मार्कंडेश्‍वराची महती सांगितली. ‘‘बाराशे वर्षांपूर्वीचं मंदिर-तीर्थक्षेत्रच ते! दक्षिणवाहिनी असलेली वैनगंगा नदी तिथं अचानक पूर्ण वळण घेऊन उत्तरवाहिनी होते.’’ हेही नवलच! याआधी तिनं नर्मदा नदी सोडून सर्व नद्या पूर्वेकडे वाहत असलेल्या ऐकल्या होत्या. एकटी नर्मदा पश्‍चिमवाहिनी, त्याचीही एक कथा आहेच!
मिताला देवदर्शनापेक्षा, तिथलं स्थापत्यशास्त्र नि कथा-आख्यायिकांमध्येच जास्त रस होता.
‘‘मार्कंडेश्‍वराच्या मंदिरात शिवलिंगासोबतच देवीचीही जोडीनं पूजा होते. खूप पुराणकालीन मंदिर. तिथल्या मूर्ती, कोरीवकाम, भिंतींवरची कलाकुसर – हे सगळं खजुराहोच्या तोडीचं आहे. पुन्हा आलीस की घेऊन जाईन तुला.’’ अक्कांनी आश्‍वासन दिलं.
अक्कांच्या घरचा खास मसाला चहा पिऊन निघताना मिता अक्कांसमोर नमस्कारासाठी वाकली तेव्हा – तिला पुडाच्या वड्या, बुंदीचे लाडू आणि संत्र्यांची करंडी देत त्या म्हणाल्या, ‘‘पुढच्या वेळी चार दिवस राहायलाच ये. माहेरी आल्येस असंच समज. आणि सांगितलेलं लक्षात ठेव, कुणाच्या मनात काय असतं, लगेच कळत नाही. बोलणं गोड असावं पण वागायला ताठ असावं बाईमाणसानं. आपला आब आणि अंतर-दोन्ही राखून असावं. एकटी राहातेस, तरुण आहेस, जपून रहा. रघू सोडील तुला बंगलीवर.’’ त्या मनापासून काळजीनं बोलल्या होत्या. तिच्या हातात त्यांनी साडी ठेवली. तेव्हा त्यांचा निरोप घेताना त्यांनी आपल्याला कुंकू लावलं नाही, याचं वैषम्य मग तिला वाटलं नाही…
रघूनं गाडीनं तिला बंगलीवर सोडलं, संत्र्यांची करंडी नि तिला दिलेलं सामान तो खोलीत ठेवून आला तेव्हा त्याला पारूबाई काम करताना दिसली. तोपर्यंत अवी तिथे पोचला नव्हता हे बघून तिला हायसं वाटलं!
***

दुपारचं जेवण अजूनही उतरलं नव्हतं. अवीला यायला वेळ होता. पाय मोकळे करायला मिता गच्चीवर गेली. संध्याछाया पसरत होत्या. गुलाबी थंडीनं तिचा मूड एकदम छान झाला होता. कुठेतरी बंगल्यातून गझलचे सूर ऐकू आले. गझल-गुलजारची गाणी आनंदच्या खास आवडीची. आनंदच्या का आपल्यासुद्धा! त्याच्या-आपल्या बर्‍याच आवडी जुळतात. तो आपल्या शाळेच्या वर्गातला. पण तेव्हा मुला-मुलींनी मोकळेपणी बोलायचे दिवस नव्हते. त्याची भेट झाली पंचवीस वर्षांनी रियुनियनमध्ये. आपला मार्केटिंग-इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय, त्यामुळे त्याला स्वतःहून मदत केली. पंचवीस वर्षांनी सगळेच वर्गमित्र प्रथमच भेटत होते. पनवेलच्या एका रिसॉर्टचं तीन दिवसांचं बुकिंग-भरगच्च कार्यक्रम. ते सगळं मितानंच ठरवलं.

त्या रियुनियनच्या निमित्तानं फक्त ओळख झाली. पण पुढे मात्र छोट्या भेटी-गाठींतून सूर जुळत गेले. आपला शाळेचाच आठ-दहा जणांचा छोटा ग्रुप जमला. त्यांची छोटी गेट-टुगेदर्स, सहली, कुणाचे वाढदिवस-समारंभ-या ना त्या निमित्तानं मग सगळे भेटत राहिले. वाचन, कविता, नाटक, ट्रेकिंग, प्रवास हे दोघांचे आवडते विषय. नुकताच नील गेला होता. तेव्हा निर्माण झालेली पोकळी या ग्रुपनं भरून काढली. एकमेकांच्या समान आवडीतून एक खास मैत्री. एक लोभसवाणा जिव्हाळा आकार घेत होता. एक कुतूहल-नवल म्हणून दोघंही एकमेकांना प्रथम जोखत राहिले होते. व्यक्त होण्याअगोदर दुसर्‍याचा अंदाज घेत राहिले.
तसा तोही कधी काही बोलून दाखवायचा नाही. पण एक-दोन भेटीनंतर त्यानं मुद्दामून तिच्या दिसण्याचा उल्लेख तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर खासगीत केला. मग तेव्हापासून त्याला आवडेल, तो दखल घेईल अशी केश-वेषभूषा, माफक मेकअप करणं, तिच्याहीकडून आपसूक घडू लागलं. तो आपल्याला निरखत असतो ही जाणीव तिला ग्रुपच्या प्रत्येक भेटीत होत राहिली.
बरेच महिने तिला हेच ठरवता येत नव्हतं की तो खरंच आपल्याला आवडतोय, की ‘त्याला मी आवडते’ – हीच गोष्ट मला आवडतेय? प्रौढ वयातली ही भावना किती निराळी असते ना? आता यापुढे कुठल्याच बंधनात बांधून घेणं शक्य नसतं पण ‘आधी भेटला असता तर?’ हा प्रश्‍न मनात येऊन जातोच. या वयात दिसण्याचं खास कौतुक नसतं पण तिथे नजरअंदाजही करता येत नाही. आनंद देखणा, गोरा, उंच, तब्येतीनं उत्तम! आणि स्वभावानं लाख! नम्र, मृदुभाषी, संयमी, विचारी, काळजी घेणारा, मदतीला तत्पर आणि वर हौशी नि रसिकही…दोघांना निश्‍चितच एकमेकांची ओढ वाटत होती खरी!

एकदा एका नाटकानंतर तो मिताला जेवायला घेऊन गेला. हॉटेलमधून दोघं बाहेर येतात तो हलकीशी सर येऊन गेलेली. बाईकवरून फिरायला जावं, हे दोघांच्याही मनात होतं – पण सुचवलं कुणीच नाही. मग एक-दोनदा लांबच्या प्रवासात त्याने कळवळून काढलेली आठवण, त्यांचं लांबलेलं व्हॉट्सअ‍ॅपवरचं चॅट… एक-दोनदा त्याच्या तोंडून निसटून गेलेली त्याच्या ‘मन की बात!’ ‘पहाटे उठल्यावरचा तुझा निरागस चेहरा बघायचा होता’ म्हणून जॉगिंग करत तिच्या घरापाशी येऊन, त्यानं फोन केला न् तेव्हा…मग दोन-तीनदा घरी जेवायला आला होता, तेव्हा आपणही खपून त्याच्या आवडीचं मालवणी फिश केलं होतं, नि एकदा मेथी चिकन नि एकदा… गेल्या दोन वर्षात दोघांचीही मैत्री अशी फुलत गेली. या वयात ठोकरही खायची नसते नि चालतही जायचं असतं. दोष रस्त्याचा नसतो. आपल्या पावलांनाच मग जपावं लागतं….
‘‘कधी आलीस परत? बराच वेळ झाला का?’’
‘‘नाही रे. अक्कांच्या ड्रायव्हरनं सोडलं मला. खूप आग्रहानं काय काय खाऊ घातलं अक्कांनी. आज जरा उशिरानेच जेवू.’’
‘‘चालेल. ही बघ, आज खास वाईन आणलीय.’’
‘‘वा. तू तर रोज रतीबच घालतोयस की!’’
‘‘मग इतकी वर्षं बोलावतोय तुला. तू आज मेहेरबान झालीस.’’
दोघं आज गच्चीतच बसली. वाईन सुरेखच होती. आधी किंचित मिरमिरणारी, पण नंतर जिभेवर रेंगाळणारी चव… आनंदसारखी?
‘‘मग आता तू खरंच मोकळी झालीस की! आणि आता तुझं ऑफिसही भाड्यानं दिलयंस. म्हणजे पैशाचा प्रश्‍न तर आता नाही… पण पुढे काय करणारेस?’’
‘‘तेवढा वेळच मिळाला नाही अजून, विचार करायला. मागच्या आठवड्यात सगळी कामं हातावेगळी झाली. मग काय आले उठून! नीलिमा-विराजला सांगून आलेय फक्त.’’
‘‘आणि तुमच्या भगिनी?’’
‘‘भगिनी नावापुरत्याच आहेत. नील गेल्यानंतर अनुजाने हात झटकलेन ‘‘तुझं तू बघ, तू तेवढी सक्षम आहेस’’ म्हणून. ताई तर काय – तीस वर्षं परदेशातच आहे. तिनं तोंडदेखलं विचारलं. रक्ताच्या कुणी काही मदत केली नाही पण सख्ख्या मित्रानं मात्र कायम साथ-सोबत केली.’’
‘‘जाऊ दे. विसर. मुख्य चिंता गेलेय तुझ्या डोक्याची. खूप मनस्ताप दिला तुला श्रीरंगनं. तू मोकळी झालीस ते आज साजरं करू चल – चीअर्स.’’
‘‘मला खरंच स्वतःचं आश्‍चर्य वाटतं. मी इतकी वर्षं स्वतंत्र व्यवसाय करत होते. मी कशी श्रीरंगच्या गोड बोलण्याला आणि भूलथापांना फसले?’’
‘‘आपलं काम साधून घेईपर्यंत तो नेहमीच गोड बोलत आलाय.’’

‘‘पैसे घालताना म्हणाला होता, तू फक्त पैसे घाल आणि मग निवांत रहा. मी बाकी सगळं काही करतो. तुला काहीही काम करावं लागणार नाही. फक्त बसून पैसे मोजायचेस नंतर.’’
‘‘आणि मग तो बेदम आजारी पडला. बीपी, शुगर, बी १२, डी ३ सगळंच उलटंपालटं झालं. डॉक्टरनी बायपासचा सल्ला दिला. मी घाबरले. याच्या जिवावर पैसे तर घातले. आता काय?’’
‘‘आणि मग तो त्याचं ऑफिस सोडून तुझ्या ऑफिसमध्ये आला.’’
‘‘हो.’’ तेव्हा म्हणाला, ‘‘मी माझी कंपनी बंद करतो. फक्त आपला प्रोजेक्ट चालू ठेवू. आपण पार्टनर ना. तुझ्या नावावरती आधी एक सात-बारा आहे तर आता सगळी खरेदी तूच कर. तुझ्या इतक्या ओळखी आहेत. सगळ्या खात्यांच्या एनओसी तू आणू शकशील.’’
‘‘आणि मग सगळंच तुझ्या गळ्यात पडत गेलं…’’
‘‘अरे-अरे हे कितवं पाकीट काजूचं. शेव-मूगडाळ आहेच की इतकी.’’
‘‘तू इतकं काही मजेदार काहीतरी सांगत्येस. त्याला साजेसा मसालेदार चकणा नको का? तू बोलत रहा….’’
‘‘अरे पैसे तर घातले होते. मी म्हटलं, तो बरा होईपर्यंत आपणही लावू हातभार. घरी कुणी नव्हतं. मग मी तेव्हा सलग पाच-सहा दिवस अलिबागला राहायची.’’
‘‘पण त्यामुळे इथे त्याची सोय झाली ना! तुझं ऑफिस पूर्णपणे बळकावलंन त्यानं.’’
‘‘मला ते फार उशिरा समजलं. मी त्या वेळी फार तर एक-दोन दिवसच असायची पुण्यात. बाकी सर्व दिवस महाड, रोहा, माणगाव, अलिबाग – मी तेव्हा अख्खा रायगड पिंजून काढला.’’
‘‘खूप मेहनत घेतलीस. तू या क्षेत्रात नवखी असूनही, जिद्दीनं एकेक करत सर्व खात्यांच्या एनओसी मिळवल्यास.’’
‘‘अवी, खरं सांगू या सर्व एनओसी मी फक्त न फक्त तुझ्या जोरावर मिळवल्या. कुठेकुठे ओळख काढलीस. संदर्भ दिलेस. सावलीसारखा सतत सोबत करत होतास. तेव्हा मला तुझा फार फार आधार वाटला.’’
‘‘ते सोड. पण एक सांगू का, त्या वेळी तुझ्या हाताला काम आणि डोक्याला असे भुंगे हवेच होते. त्याशिवाय नीलचं अचानक जाणं पचवून तू उभी राहिली नसतीस. अजूनच खचली असतीस. एकटी पडली असतीस.’’

‘‘मी एकटी तर आयुष्यभर होते. नील कायम बोटीवर. सहा महिन्यांनंतर दोन महिने घरी की परत चालला. माझा एकटीचाच संसार झाला. पण तो अचानक गेला नि जाणवलं की तो आता कधीच परत येणार नाहीये. एकाकीपणा घेरून टाकायला लागला. तेव्हा हाताला काम आणि जरा लांब, वेगळ्या वातावरणात, कामात झोकून देऊन मी सगळं विसरायचा प्रयत्न केला.’’
‘‘तुझ्यासाठी ते काम नवीन होतं; पण पुरती रमली होतीस तू त्यात. अलिबागहून परत यायला राजी नसायचीस.’’
‘‘खरं आहे. परत येऊन घरी काय बघू? चार भिंती? आणि सलग राहिलं तर एकटाकी कामं तरी व्हायची ना. सारखं जा-ये करावं लागायचं नाही.
तेव्हा श्रीरंग पुण्यात होता, माझ्याच ऑफिसमध्ये. पैशाची जमवाजमव, फायनान्सरशी बोलणी करणं, आर्किटेक्टकडून प्लॅन बनवणं यात गुंतला होता. आणि तसे आमचे रोज फोन चालायचे ना. सगळी कामं, त्यातले अडथळे, त्यावर उपाय काय, रोज फोनवर चर्चा व्हायची. दोघं लांब असली तरी एकाच प्रोजेक्टसाठी जोडीनं काम करत होतो. मला ते बरं वाटत होतं. मीही जीव ओतून काम करत धडपडत राहिले. मी तिथे काही काम करतेय – ते पसंत असेल त्याला असंच वाटत होतं – पण – तेही गैरसमजच ठरले शेवटी.’’
‘‘लार्ज बनवू ना आता तुझ्यासाठी? जरा ऊब येईल. मस्त थंडी आहे ना? एन्जॉय.’’ अवीनं तिसरा पेग भरला नि म्हटलं, ‘‘खरं बोलू का? तू जोखलं नाहीस त्याला बरोबर. जणू काय झापडं लावली होतीस.’’

‘‘अवी प्लीज, तू तरी असं म्हणू नकोस. मी जन्मात प्रथमच या वेळी भागीदारी केली. मी आयुष्यभर व्यवसाय केला पण त्यात एकटी होते. श्रीरंगला मी तशी चार-पाच वर्षं ओळखत होते पण मित्र म्हणून. आम्ही एकत्र काम नव्हतं केलं. आता या भागीदारीत लांब राहूनही का होईना मी त्याच्यात एक आधार शोधला.
धंद्यातले सगळे चढ-उतार, तणाव, झोके – सगळं काही वाटून घेणारा साथी. तो आहे. मी या क्षेत्रात नवखी असले तरी मला तो अनुभवी आहे हा दिलासा होता.
हो मी विश्‍वास टाकला त्याच्यावर. एक मित्रच जेव्हा भागीदार होतो, तेव्हा आपण इतकं तोलून-मापून नाही बघू शकत दर वेळी.’’
‘‘पण शेवटी तो त्याच्या वळणावर गेलाच ना… मूळ स्वभाव जाईना…!’’
‘‘अगदी आतल्या गाठीचा. ओठात एक नि पोटात एक. सगळी माहिती, बातम्या काढून घेईल पण स्वतः तोंड उघडणार नाही. पण कामाला वाघ, झपाटा मोठा आहे त्याचा.
पण तेवढाच गोडबोल्याही. विश्‍वास पैदा करणार, गोड बोलून पैसे उकळणार. पण तेवढाच स्वार्थी, मतलबी नि कृतघ्नही आहे – ते पुण्याला आल्यावरच समजायचं होतं मला.’’
‘‘तसा दिलदार आहे तो. पार्ट्या काय, भेटवस्तू काय…’’
‘‘तो दिलदार आहे, लागेल ती मदत करतो, पण केव्हा? तुम्ही त्याचे गुलाम असाल तेव्हा. तुम्ही सतत त्याची मर्जी राखत बसलात, त्याच्या हो ला हो म्हणत बसलात तरंच! मग राजा आपल्या प्रजेला पंखाखाली घेतो तसा तो तुमच्यावर ‘कृपा’ करतो. पण त्या देण्यातही एक गर्व असतो. ‘मी’ पोसतोय हिला. ‘माझ्यामुळे ती उभी आहे’ त्या कैफासाठी असते ती मदत.’’
‘‘पण तू मिंधी नव्हतीस त्याची. पन्नास टक्के भांडवल घातलं होतंस. तूही झपाटून काम करत होतीस.’’

‘‘अवी, माझ्या कामाची कधी दखलही घेतली नाही त्यानं- मग कौतुक तर सोडाच, रिपोर्टिंग घ्यायचं फक्त, पुढचे आदेश द्यायचे नि मग फोन बंद करायचा. प्रचंड राजकारणी नि पाताळयंत्री. त्याच्या डोक्यात काय काय बेत शिजत असत – पत्ताही लागू द्यायचा नाही. चेहर्‍यावर असे तो फक्त कोरा भाव पण थंड क्रूरता – जी त्याच्या चेहर्‍यावर नव्हे पण मी डोळ्यात पाहिली नंतर.’’
‘‘चेहर्‍यावरून तरी वाटत नाही. देखणा आहे तो आणि तू राग मानू नकोस पण मला तेव्हा तरी वाटलं होतं की तू…’’
‘‘बरा आहेस का तू? त्याची कीर्ती माहीत नाहीये तुला. अर्थात मलाही कल्पना नव्हती. हो खूप देखणा आहे तो. पण किती त्याचा गर्व, किती घमेंड करावी माणसानं? अख्ख्या जगात माझ्याइतका देखणा नि हुशार कोणीही नाही-अशा मस्तीत राहतो तो. तीच नशा असते त्याच्या डोक्यात कायम. पैजा लावून कितीतरी पोरींना नादी लावलंय त्यानं. आणि वर त्याबद्दल बढाया मारायच्या मित्रांच्यात.

मी त्याला याविषयी खूप वेळा समजावलं. पण आता त्याला चटक लागलीय. मला ते आवडत नसे. शेवटी कामाशी-काम इतकाच संबंध ठेवला मी.’’
मी अलिबागला गेले तेव्हा सगळं चांगलं होतं. पण मग मी शेतकर्‍यांना आपलंस केलं. त्यांना विश्‍वास देऊन जमिनी खरेदी केल्या. मला साईटवरही मजूर-सुपरवायझर मान द्यायचे. सरकारी अधिकार्‍यांशीही माझ्या चांगल्या ओळखी झाल्या होत्या – तेच त्याला खटकत गेलं.
जो हक्क, जे अधिकार फक्त त्याच्यासाठी होते, ते आता माझ्या पदरात पडत होते. त्याचा पुरुषी अहंकार पदोपदी दुखावला जात होता. मला खरंच जाणीव नव्हती की तो या प्रकाराने नाराज असेल नि त्याच्या मनात काही कट-कारस्थानं शिजत असतील.
पण तो आजारी होता. पुण्याबाहेर जायला त्याला सक्त मनाई होती. म्हणून माझं काम संपेस्तो मला सहन केलं त्यानं आणि मग-मग मात्र त्याच्या नख्या बाहेर आल्या.’’
‘‘आता बोलतंच बसनार दादा, की जेवायला बी येनार? चलाना बे, गरम गरम वाढून राहिले ना मी.’’
‘‘माय गॉड अवी, दहा वाजले. चल जेवून घेऊ. तुलाही परत जायचंय. ऊठ आता. पुन्हा नको ते ग्लास भरूस.’’
‘‘अहो मॅडम, आज फक्त तुम्ही बोलत होतात. माझ्याकडे फक्त ऐकायचं नि प्यायचं काम होतं. ते मी इमाने-इतबारे केलं.’’
***

अवी जेवून सरकारी डाक-बंगल्यावर गेला नि आनंदचा फोन आला.
‘‘सॉरी आत्ता निघतोय ऑफिसमधून. उशीर झाला का? झोपली होतीस की काय?’’
‘‘नाही रे, आत्ताच जेवणं झाली आमची.’’
‘‘आहेस कुठे तू? व्हॉट्सअप बंदच करून ठेवलंयस. शेवटी वाट बघून फोन करावा लागला. पत्ता काय तुझा?’’
‘‘सध्या पत्ता नागपूर.’’
‘‘माय गॉड, तिथे काय करत्येस तू?’’
‘‘आलेय माझ्या एका मित्राकडे. प्रोजेक्टमधलं माझं काम संपलं म्हणून माझ्या पार्टनरला सगळा चार्ज दिला आणि जरा बदल म्हणून आलेय इथे चार दिवस.’’
‘‘ओह-मित्र! जवळचा दिसतोय?’’
‘‘हो, कॉलेजचा आहे. तीस वर्षांपासूनची मैत्री. मंत्रालयात मोठ्या हुद्द्यावर आहे. आत्ता इथे अधिवेशन भरलंय ना, तो कधीपासून बोलवत होता. आत्ता हवा चांगली असते तेव्हाच ये.’’
‘‘मग झालं का नागपूर दर्शन?’’
‘‘व्हायचंय अजून. अधिवेशन उद्या संपेल. तोपर्यंत इथल्या नातेवाइकांना भेटतेय.’’
‘‘आमची आठवण तरी ठेवायची. काहीही न सांगता एकदम गायबच झालीस.’’
‘‘अरे कधीपासून ठरवत होते. आज इथे यायचा मुहूर्त मिळाला इतकंच, आणि आठवण तर असतेच ना!’’
‘‘हं! मला वाटलं काही अडचण आली की काय? तीन-चार दिवस फोन नाही. व्हॉट्सअ‍ॅप बंद. परत कधी येत्येस?’’
‘‘अजून चार दिवसांनी.’’
‘‘मग व्हॉट्सअ‍ॅपवर तरी दिसत जा ना! आम्ही सुकलोय इथे.’’
‘‘(हसत) मी हे खरं मानू म्हणतोय?’’
‘‘लवकर ये आणि तोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप सुरू कर. वाट बघतो. काळजी घे. अच्छा. ठेवतो.’’

श्रीरंगच्या मनस्तापांच्या नकोशा आठवणींनी कोमेजलेली मिता पुन्हा उल्हसित झाली. आपणही कुणाला हवेसे वाटतो. आपलीही कुणी आवर्जून आठवण काढतं आणि ते सांगतंही – मनावरून हलकेच एक मोरपीस फिरून गेलं. पहिल्या दोन वर्षांत मनाला अशाच गोड गुदगुल्या होत. एक मनपसंत साथी-सहचर मिळाल्याचा दिलासा मिळे. आनंद विचारांनी, संस्काराने चांगलाच होता. बाळबोध घरातला. शिस्त-शिक्षण-संस्कारांचा मजबूत पाया! रसिक-हौशी! टेनिस, पोहणं, जिम, ट्रेकिंग, जॉगिंग – त्यानं स्वतःला तंदुरुस्त ठेवलं होतं. स्वभावानं तर लाख होता. मिताचा गैरफायदा तर त्याने कधीच घेतला नसता. मैत्रीही अखंडच राहिली असती, इतका विश्‍वास तर आता तिला आला होता. नील गेल्यावर एक रिकामपणं, एक पोकळी जाणवत होती. तिचं आवडतं माणूस तिच्या आयुष्यात चपखल बसत होतं…! पण आता इथे लांबवर येऊन, तटस्थपणे-अलिप्तपणे विचार केल्यावर त्यात काही रिक्त जागा तिला खटकत राहिल्या…
त्याचं प्रेमलग्न. बायको सुशिक्षित, सुसंस्कृत. त्याची सीएची प्रॅक्टिस उत्तम जम बसलेली, गाडी-शोफर, कोकणात स्वतःचं घर-वाडी! – या कशालाही तो धक्का लागू देत नव्हता.
त्याच्या शाळेच्या ग्रुपमध्येही त्याच्या वैयक्तिक संपर्कातल्या इतरही मैत्रिणी होत्या. त्यांच्याशी घरगुती संबंध होते. इतर क्षेत्रांतल्या त्याच्या मैत्रिणीही तिला माहीत होत्या. ती काही त्याची ‘एकमेव खास मैत्रीण’ नव्हती.
मात्र कुणालाच तो बाहेर एकटा भेटत नसे. भेटायचं तर कायम कुटुंबकबिला सोबत, नाहीतरी घरी भेटायचं. स्वतःच्या प्रतिमेला कायम जपत! पण पुरुषी स्वभावानुसार तो इतर मैत्रिणींबाबत कधी बोलत नसे. खोलात जाऊन मितानं कधी काही विचारलं नाही, त्यानंही सांगितलं नाही!
मिता त्याला आवडत असली, तरी तो ते लोकांच्या डोळ्यांवर येऊ देत नव्हता. मितानं एकदा त्याला विचारलं होतं, ‘‘तू खासगी व्हॉट्सअ‍ॅपवर इतका मोकळा असतोस. माझी प्रशंसा करतोस पण प्रत्यक्ष भेटलास की ते जाणवूही देत नाहीस. नजर चोरतोस असं का?’’
‘‘हम्म…. संस्कार असावेत.’’ त्यानं मोघम सांगितलं.

गुलझार दोघांचा आवडता. एकदा मिता गुलझारच्या गाण्यांच्या मैफिलीला गेली असताना ‘इजाजत’ सिनेमातली माया-अनुराधा पटेल-तिथं प्रमुख पाहुणी म्हणून आली होती. तिनं तिचा फोटो काढून आनंदला पाठवला. सोबत शेरा – ‘‘तुझी माया, अजूनही तशीच गोड आणि तरल दिसते.’’ त्याचं उत्तर तिची अपेक्षाभंग करणारं होतं. ‘‘मला माया आवडत नाही. पण पुरुषाच्या आयुष्यात एक कविता बनून आलेली, त्याची स्फूर्ती, त्याला सगळं सुख देणारी फॅन्टसी (पण त्याच्या संसारात लुडबूड न करणारी) म्हणून आवडते.’’ तिला सगळा उलगडा झाला.
तिच्यामुळे आनंदच्या फॅन्टसीला एक चेहरा मिळाला होता. आणि फॅन्टसी ही स्वप्नात-मनोराज्यातच बरी असते. ती वास्तव जगात उतरली तर तिला तिचं आयुष्य उरत नाही. म्हणूनच-आनंद तिला कायम काठावरूनच निरखत राहिला. पाण्यात खोल बुडी मारण्याचं धारिष्ट्य त्याच्यात नव्हतं.
असाच एक सल अजूनही होता. ग्रुपमध्ये एकदा ‘बकेट लिस्ट’विषयी बोलताना आनंद बोलून गेला होता, ‘‘आता काही वर्षांनी तारुण्य ओसरत जाईल. म्हातारं होण्यापूर्वी एकदा तरी ‘अफेअर’ करून बघायचंय. ती एक इच्छा राहून जायला नको. बघूया तरी-वेगळी चव’’ असं म्हणून एक सूचक कटाक्ष त्याने मिताकडे टाकला होता.
मिता स्वतःशीच चरफडली. ‘‘म्हणजे मी – ‘मी’ म्हणून नाही आवडतेय त्याला? मी म्हणजे त्याच्या ‘बकेट लिस्ट’मधला एक ‘आयटेम’? शेवटी हाही एक ‘पुरुषच’ निघाला तर!’’
आनंदचा संसार सुखा-समाधानाचा होता. बायकोशी तो प्रामाणिक होता. जम बसलेली प्रॅक्टीस होती. या दोन्हींत त्याने कधीही तडजोड केली नव्हती. त्यांना कायम प्राधान्य दिलं होतं. मग वेळ उरला, एकटा असला की त्याला आठवण यायची!
त्याचे वेगवेगळे छंद, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या भरपूर मित्र-मैत्रिणींमध्ये तो रमत होता – हे सर्व खरं होतं, आणि हेही खरं होतं – की मितासाठी तो यातलं काहीही सोडणार नव्हता! प्रेम आणि आवडणं यातली रेषा फार धूसर असली तरी त्यातला फरक अशा वेळी प्रकर्षानं जाणवतो ना!
तो लग्न-कुटुंबसंस्थेला मानत होता. तीही या गोष्टींचा आदर करत होती. अर्थातच हे नातं पुढे जाऊन त्याच्या घटस्फोटात बदलणार नव्हतं. असं काही झालं असतं तरीही नंतर ‘अपराधी’ वाटून तो तिथे कायमचा परत गेला असता. तेव्हा मितालाही नुसतं अपमानितच नव्हे, तर अगदी ‘उष्ट-खरकटं’ वाटलं असतं. आणि म्हणूनच पायात पाय घालून गुंतणं ही दोघांसाठी पुढे फक्त एक फरपट ठरणार होती.

पण शारीर आकर्षणात, मनोराज्यात मैत्रीचा एक सच्चा धागाही होताच की! त्याच्या लाखमोलाच्या स्वभावाला, चांगुलपणाला नजरेआड करता येत नव्हतं. दोघांत एक कळे न कळेलसं द्वैत होतं – ज्यात काही देणं होतं नि काही घेणंही होतं. पण आता इतकी वाटचाल करून त्यांची मैत्री एका कड्यापर्यंत आली होती. आता झोकून द्यायचं की मागे फिरायचं हे तिचं तिने ठरवायचं होतं. तिने पुढे पाऊल टाकलंच तर त्याच्या स्वभावानुसार तो हात नक्कीच देणार होता. पण तो आधार आता तिला पुरेसा शाश्‍वत वाटत नव्हता…
त्यापेक्षा मैत्री ही चिरंजीवी होती. त्यात मात्र शंभर टक्के योगदान होतं. निखळ नातं होतं; की जे चारचौघांत अगदी मिरवता आलं नाही, तरी लपवावंही लागत नव्हतं.
नील गेल्यानंतर दोघांच्या अनेक मित्रांतून गळत गळत आता फार सच्चे मित्र उरले नव्हते.
आनंद ही तिची जगाकडे बघायची एक खिडकी होती. फक्त तिच्या झडपा मात्र आता आतून उघडणार होत्या… बाहेरून नव्हे!
***

वर्षानं पाठवलेल्या आलिशान गाडीतून ती वर्षाच्या तीन मजली भव्य बंगल्यात पोचली. वर्षा ही मिताच्या सहनिवासामधली मैत्रीण. त्यांच्या ग्रुपमध्ये सर्वांत आधी तिचं लग्न झालं. नि ती नागपूरला निघून गेली, ती आज भेटत होती. तेव्हा मात्र – ‘‘नागपूर? इतक्या लांब, पुण्या-मुंबईतला मुलगा मिळाला नाही का तुला?’’ असं वाटलं होतं. पण आता तिचं वैभव बघून तिनं हेच स्थळ का निवडलं याचा उलगडा झाला.
पिढीजात श्रीमंती, वडिलोपार्जित कारखाना, नवरा-अमितही खूप देखणा नि कर्तबगार होता. मुलंही हुशार-गुणी निघाली. मुलीनं एमडी केलं. मुलगा इंजिनीअर. एमबीए करून आता वडिलांची गादी चालवत होता. अमितने स्वतःच्या बळावर एकाचे चार कारखाने केले होते.
वर्षा जे. जे. कॉलेजची कमर्शियल आर्टिस्ट. ती आता तिच्या पेंटिंगची प्रदर्शनं अवघ्या महाराष्ट्रात भरवत असे. ऐश्‍वर्य तिच्या अंगाखांद्यावर दिसत होतं. पण मिताचं स्वागत मात्र बालमैत्रीण म्हणूनच झालं.

‘‘ए, माझ्याकडे का नाही गं उतरलीस? कुठे त्या बंगलीत एकटीच राहत्येस?’’
‘‘पुढच्या वेळी नक्की तुझ्याचकडे मुक्काम. म्हटलं, बाईसाहेब लहानपणीच्या मैत्रिणीला ओळखतात की नाही! लग्न होऊन जी गायब झालीस ती आज भेटत्येस.’’
‘‘तूही गर्कच असतेस ना कामात. तुम्ही काय बिझनेस वुमन!’’
‘‘आणि तुम्ही काय कमी आहात? माझ्या नि तुमच्या व्यवसायाची तुलनाच करू नकोस.’’
भरपेट नाश्ता करून दोघी निघाल्या. आज वर्षाच्या आलिशान मोटारीतून नागपूर दर्शन होतं.
‘‘इथे बघण्यासारखं खूप काही आहे असं ऐकलं.’’
‘‘अगं नुसते तलावच दहा-बारा आहेत. म्हणजे मोठ्ठाले हं! आणि बागाही भरपूर आहेत. पेंच टायगर रिझर्व, नागझिरा वाईल्ड लाईफ सँक्चुरी, महाराजा बाग झू, बोटॅनिकल गार्डन अशा खूप मोठ्ठ्या बागा आहेत. एक-दोन दिवस तिथं रहायलाच जायचं. कॉटेज-तंबूची सोय असते. तुमची पेशवेपार्क शंभरपट मोठी कर नि कल्पना कर…’’
‘‘सारखे पुण्यावरून टोमणे नको मारूस. आधी तो इथे झिरो माईल स्टोन आहे ना, तो मला बघायचाय.’’
‘‘चल जाऊ तिथंच. इंग्रजांनी भारताचा सर्व्हे करताना नागपूरला मध्यवर्ती मानून चारी दिशांचा सर्व्हे केला. त्याची मोजणी-झिरो माईल मार्क-इथून सुरू झाली.’’

दोघी थोड्याच वेळात तिथं पोचल्या. एक ‘झिरो माईल’ असं लिहिलेला दगड, भोवती चार उधळलेल्या घोड्यांचे शिल्प.
– ‘‘हे घोडे म्हणजे चार दिशा हं. आणि हा दगड म्हणजे मार्कर! वर्तुळाचा परीघ मोजताना जसा आधी एक केंद्रबिंदू धरतात ना तसा. आणि हा खांब त्याचं स्मारक म्हणून उभा केलाय.’’
‘‘म्हणजे आपण आत्ता भारताच्या केंद्रभागी उभं आहोत असं म्हण की.’’
‘‘आपण ब्रिटिश काळात असतो तर म्हटलं असतं. पण फाळणी नंतर देशाच्या उत्तर नि ईशान्य सीमाही बदलल्यात ना!’’
‘‘इथे सीताबर्डी किल्लाही आहे ना?’’
‘‘हो. १८१७ मधल्या युद्धात ब्रिटिशांनीच बांधलाय तो. आता तिथं आपलं मिलिटरी ट्रेनिंग केंद्र आहे. लोकांसाठी वर्षातून फक्त तीनदा तो किल्ला उघडला जातो. आज नाही बघता येणार. गांधीजींना कैदेत ठेवलं होतं ती कोठडीही आहे तिथे.’’
‘‘ओह्! म्हणजे मला नाही बघता येणार?’’
‘‘अगं, इतर खूप ठिकाणं आहेत की. नागपूरला आधी फार महत्त्व होतं. इथे देशाचा संपूर्ण गोल्ड रिझर्व्हर-रिझर्व बँकेच्या देखरेखीखाली साठवलेला आहे.’’
‘‘तो मिळेल का मला बघायला? तुझ्या ओळखीनं?’’
‘‘तू रिझर्व बँकेची गव्हर्नर हो. मग मलाच दाखव तू तो खजिना. आता जाऊ वाकी वूड्सला. सुंदर तळं आहे नि रिसॉर्टही. तोपर्यंत तुला नागपूरचा इतिहास सांगते.’’
‘‘गौंड राजे बुलंद यांनी फार पूर्वी नागपूर वसवलं. मुधोजी राजे भोसले यांनी त्याची नंतर भरभराट केली. ब्रिटिश काळात नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी होती. स्वातंत्र्यानंतर तर नागपूर मध्य प्रदेशचीही राजधानी होती… काही काळ! मग भाषावार प्रांतरचना करताना मध्य प्रदेश नि विदर्भ इथले, मराठी भाषिक घेऊन नागपूर जिल्हा आकाराला आला.

फार पूर्वी महाभारत काळी, हे विदर्भ राज्य-बलरामाचं होतं. कौरव-पांडव युद्धात न पडता, बलरामानं आपलं राज्य तटस्थ राखलं नि विदर्भातल्या प्रजेचे प्राण राखले. इथं रिझर्व बँकेची तिजोरी आहे. आर.एस.एस.चं मुख्यालय आहे. शिक्षणसंस्था नि नावाजलेली हॉस्पिटल्स यामुळेही नागपूर प्रसिद्ध आहे.’’
मिता गाडीतून बाहेर बघत होती. ‘महाराष्ट्रातलं सर्वांत स्वच्छ, सुंदर नि हिरवं शहर’ – हे किताब मिळवणारं शहर आता स्मार्टही बनत होतं. मोठाले रस्ते, फ्लायओव्हर्स, प्रशासनानं राखलेली हिरवाई, चौकाचौकात पुतळे यांनी शहर सजलं होतं. स्वच्छ चकचकीत ई-बसेस पळत होत्या. मेट्रोची तयारी सुरू होती. आणि मोनोरेलही… वर्षानं माहिती पुरवली.

तासाभरात वाकी-वुड्स आलं. तिथलं तळं-वनराई, निसर्ग आणि मानवाची कल्पकता, याचा सुंदर मिलाफ बघून मिता थक्क झाली. तिथं जंगलातली भटकंती होती. पक्षी संग्रहालय होतं, घोडेस्वारी होती. धनुष्यबाणाचं शरसंधान होतं. तळ्याकाठी गर्द हिरवाईमध्ये रहायला तंबू होते. नि बोटिंगही होतं.
सगळीकडे भटकंती करून येईपर्यंत भूक कडकडून लागली होती. वर्षानं तिला एका प्रसिद्ध ढाब्यावर नेलं. दोघी समोरासमोर निवांत बसल्या. मिताचं कुतूहल शमलं नव्हतं.
‘‘कसं वाटलं गं इथे? मुंबईहून एकदम नागपूर म्हणजे – किती लांब – एकदम दुसरं टोक.’’
‘‘तू समजतेस तसा त्रास नाही झाला. एकतर अमितचं कुटुंब इथे बरीच वर्षं आहे. धंदा-बंगला-सगळं बस्तान इथे छान बसलेलं. सासर्‍यांचाच कारखाना पुढे अमितनं बराच वाढवला. तेव्हा इथे मेट्रो नि फ्लायओव्हर्स-सिटीबस नव्हती. पण आमची तर स्वतःचीच वाहनं होती ना.’’
‘‘पण एकूणच राहणीमान- मुंबई-पुण्याच्या तुलनेत…’’
‘‘अगं, तेव्हाही नागपूर पुण्यापेक्षाही शिक्षणाच्या बाबतीत वरचढच होतं. एमआयटी तर आहेच पण आंबेडकर युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी विद्यालय, वैद्यकीय नि इंजिनीअरिंग कॉलेजं तर चिक्कार. तेव्हाही तलाव नि बागा होत्याच.’’
‘‘पण इथला उन्हाळा…’’
अगं, आता एसी नि कूलर सर्रास असतातच ना. तेव्हाही होते. आणि खरं सांगू? लग्नानंतर आपला नवरा, कुटुंब हे महत्त्वाचं. परिसर मग दुय्यम ठरतो!
‘‘कसा आहे गं अमित? टिपीकल कारखानदार का?’’
‘‘नाही गं! त्याचा कारखाना तो ठेवतो घराबाहेर. तो एकुलता एक म्हणून मी आधी घरीच बसले. सासू-सासरे होतेच. त्यात दोन्ही मुलंही झाली पटापट. मग त्यांना वाढवणं.’’
‘‘पण आम्ही दर शनिवार-रविवारी फिरायला जायचो. अमितचा मित्रपरिवार अफाट. सर्वांच्या भेटी-गाठी, नाटक, सिनेमा कायम चालतं. त्यामुळे मी रुळले इथे पटकन. कधी एकटं नाही वाटलं. उलट मला सगळं शेअर करायला एक हौशी जोडीदार मिळाला. अमित खूप रसिक आहे. वाचन दांडगं, प्रवासाची आवड…. भेटशीलच तू त्याला संध्याकाळी!’’

मिताच्या मनात आलं, ‘‘हेच तर शोधत होतो आपण! मिळत होतं पण तुकड्या-तुकड्यात. तेव्हा ते तेवढंच पुरेसं नाही वाटायचं. नील परत गेला की, परत हातातून निसटून जायचं. तो जवळच राहिला असता तर एवढी ओढ, एवढी असोशी वाटली असती?’’
वर्षा सांगत होती, ‘‘आणि मग मुलं शाळेत जायला लागल्यावर मी माझी पेंटिंग सुरू केली. सरावातून स्वतःला सुधारलं-घडवलं. त्याबाबतीत अमितनं कायम प्रोत्साहन दिलं मला. आम्ही अगदी पॅरिसला केवळ लूव्र म्युझियम बघायलाच कित्येकदा गेलो. आताही माझी बरीच पेंटिंग इथे नि अजूनही कुठे कुठे विकली जातात. मला माझी ओळख नि स्पेसही मिळाली इथे.’’
‘‘पण माहेर लांब. तू आलीच नाहीस राहायला तिथं नंतर…’’
‘‘अगं आई-बाबांनाच बोलावून घ्यायचे. वर्षातून पंधरा दिवस राहत होते ते इथे. सासू-सासरे खूप प्रेमळ नि आतिथ्यशील होते. नागपुरी पाहुणचाराविषयी ऐकलं असशील ना तू? पण म्हणून आई-बाबांना संकोच नाही वाटला कधी.
इथली यांनी जोडलेली माणसंही दिलदार आहेत. लग्न करून माझं कुटुंब विस्तारलं.’’
‘‘खरं आहे. भाग्यवान आहेस! मुंबईत हरवून गेली असतीस. घामाच्या धारा, लोकलचा प्रवास, बारमाही उन्हाळा, लांबच लांब अंतरं, सगळीकडे गर्दी, गिचमिड!’’
‘‘बापरे, ते सगळं केव्हाच मागे टाकलं मी! आता मुंबई म्हटलं तरी अंगावर काटा येतो.
तुझं सांग, तू बरी आहेस ना? नील गेल्यावर कसं सावरलंस? एकटीच असतेस? काही मदत लागली तर हक्कानं सांग.’’
‘‘नाही गं. आत्ताच एक प्लॉटिंगचा प्रोजेक्ट संपवलाय. त्याआधी बरीच वर्षे मार्केटिंगच्या व्यवसायात होते. तेव्हा खूपच व्यग्र होते. हा प्रोजेक्ट आहे अलिबागला. त्यामुळे मी मागची दोन-तीन वर्षं कोकणातच काढली.’’

‘‘आता पुढे काय, परत मार्केटिंग?’’
‘‘नाही गं, आता पन्नाशी आली. त्या धंद्यात फार दगदग-धावपळ-ताणतणाव. आता इतकी दमणूक नाही झेपणार. बघू आता तर सुट्टीवर आलेय. ठरवीन लवकरच काहीतरी.’’
‘‘कोण कोण भेटतं आपल्या वेळचं?’’
‘‘संतोष हिंदुस्थान पेट्रोलियमला घट्ट धरून आहे. माधवी एलआयसीमध्ये पूर्ण रमलेय. आणि तुला कळलं का गं, आपली उमा गेली कॅन्सरनी. फार हाल झाले तिचे!’’
‘‘माय गॉड उमा! गोरी गोरी-गोबर्‍या गालांची, माऊ म्हणायचो तिला आपण. मराठीमधली हुश्शार मुलगी.’’
‘‘हं. तेव्हा किरणचा फोन आला होता. फार हळहळत होता. तसा तो भावूकच पहिल्यापासून.’’
‘‘किरण? तुझ्या संपर्कात आहे?’’
‘‘मध्यंतरी बरीच वर्ष संपर्कात नव्हता. आता आहे. पहिलं लग्न मोडलं त्याचं.’’
‘‘काय सांगतेस? का पण?’’
‘‘लग्न करून परदेशात गेला. दोन वर्षांत बायकोच्या बाळंतपणासाठी इथे आला. तुला माहितेय तो किती श्रावणबाळ होता. सतत आई लागायची त्याला. पण परदेशात असताना दोन वर्षं बायकोला देव्हार्‍यात बसवलेलं. बायकोला तीच सवय लागली. इथे आल्यावर तो आईच्या मागेमागे. तिला खपलं नाही ते. बाळंतपणानंतर माहेरून आलीच नाही परत.’’
‘‘हं. मी समजू शकते. फार टोकाच्या भावना होत्या त्याच्या.’’
‘‘आता दुसरं लग्न केलंय. बायको चांगली आहे त्याची. एक मुलगीही आहे. परवा मला म्हणाला, ‘मला आता वैराग्य आलंय.’’’
‘‘इतक्यात? आणि ते का?’’
म्हणाला, ‘‘आज श्रीखंड-पुरी खाल्ली काय नि उद्या पिठलं-भाकरी खाल्ली काय, मला आता काहीही फरक पडत नाही.’’
मी म्हटलं, ‘‘म्हणजे निरीच्छ झालोय म्हण. आणि आता हा दुसरा मांड मांडलायस तर नीट संसार कर. हिचा काय दोष?’’
‘‘हं! आमचाही घटस्फोटच झाला असता!’’

‘‘पण का? वर्षा? तू का त्याला नकार दिलास? किती सतत तुम्ही एकत्र असायचात. आम्ही तर तुमची जोडी ठरवूनच टाकली होती. कायम दोघं बरोबर….’’
‘‘हम्म्! तरीही… किंवा म्हणूनच!’’
‘‘म्हणजे….अगं, तो किती प्रेमात होता तुझ्या. काहीही केलं असतं ना तुझ्यासाठी. तुलाही तो आवडत होता ना!’’
‘‘आवडत होता गं. पण रोज पंचपक्वान्न खाऊ शकतो का आपण? शेवटी अजीर्ण होतं त्याचं. अति भावूक होता. अगदी टोकाच्या भावना होत्या त्याच्या. प्रचंड पझेसिव्ह होता. एक मिनीट सोडायचा नाही मला. मित्र सोड- मैत्रिणीतसुद्धा मिसळू द्यायचा नाही.’’
‘‘अगं पण तुमची इतकी घट्ट मैत्री? आणि तोही तर कमर्शियल आर्टिस्ट. दोघं एकाच क्षेत्रात. श्री व सौ. चित्रकार.’’
‘‘म्हणून काय सत्यनारायणाच्या जोडीसारखं सतत एकत्र फिरायचं? प्रेमाच्या नुसत्या बादल्या ओतायचा माझ्यावर, म्हणूनच गुदमरले मी. उबग आला होता त्याचा. मित्र झाला म्हणून काय झालं? मला माझं वेगळं आयुष्य नसावं का? की याचे संशय नि आरोप सुरू…’’
‘‘आम्ही खूप हळहळलो तेव्हा. इतकं चांगलं द्वैत होतं तुमचं…’’
‘‘अगं, द्वैत राधा नि कृष्णाचंही होतं गं. म्हणून ते सारखं चिकटून बसायचे का एकमेकांना. शरीरातही अंतर असलं की मनांमध्येही ओढ राहते बघ. लांब राहत असलं तरी, मला तो आणि त्याला मी आहे – इतकं एकमेकांना समजलं ना तरी पुरेसं असतं ते.’’
‘‘हम्म्! अति भावूक होता माहीत होतं. पण हं संशय-आरोप याची कल्पना नव्हती मला. बोलायचा अगदी मिठ्ठास!’’
‘‘आणि इतकं गुलकंदासारखं सतत गोड बोलून गोड वागून माणसं धरून ठेवता येतात का? माणसांच्या नात्यात सगळे रस असतात बाई – थोडं तिखट, थोडं तुरट, थोडं आंबट नि थोडं कडूसुद्धा!’’
‘‘म्हणून नकार दिलास नि इतकी लांब नागपूरला आलीस?’’
‘‘नाही गं. मित्र म्हणून आवडत असला तरी हा कायमचा जन्माचा साथीदार नको-इतकं कळत होतं. काय नको आहे, ते समोर दिसत होतं. काय हवं आहे ते बाबांनीच समोर आणलं. अमित स्थळ म्हणून लाखात एक! आणि बाबा काही करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल ना, म्हणून मग होकार दिला.’’
‘‘पण खरंच भाग्यवान तू. तुमचा जोडा अगदी लक्ष्मी-नारायणासारखा शोभतो. दोघंही सुंदर, हुशार.’’
‘‘हो दिवसभर तो कारखान्यात आणि मी माझ्या व्यापात असते. दोघांतलं अंतरच आम्हाला जोडून ठेवतं बघ!’’
‘‘कमाल आहे!’’

‘‘चल. आपल्याला दीक्षाभूमी बघून मग एका खास बागेत जायचंय. तिथे वेळेवर पोचायला हवं.’’
मिता गाडीत बसून विचार करत होती. म्हणजे शेवटी माणसांतलं अंतरच महत्त्वाचं? कधी हे अंतर कुंपण बनून येतं. कधी ते खिडकी-झरोक्याचं रूप घेतं. तर कधी अंतरच दोघांना जोडून ठेवतं. खरं काय, आपल्याला कधी कळेल?
दीक्षाभूमी, हा आशियातला सर्वांत मोठा स्तूप. आतल्या विस्तीर्ण परिसरात, अतिभव्य घुमटाखाली प्रार्थनाक्षेत्र-बास! इथे काही देवळं, किल्ले नि प्रेक्षणीय स्थळांसारखी कलाकुसर नव्हती. माणसानं इथे नतमस्तक होऊन आपल्या अंतर्मनाचा शोध घ्यायचा.
भारताची कायदेसंहिता लिहिणारे आंबेडकर यांची ही कर्मभूमी. इथेच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. जगाला धर्माचं-जीवनाचं सार सांगणार्‍या गौतम बुद्धांचं हे स्मारक!
ती थरारून गेली. दोघंही ज्ञानी-महामानव! एकाने भारतवर्षाला कायद्याचं ज्ञान दिलं. दुसर्‍यानं अवघ्या विश्‍वाला दया-क्षमा-शांतीचा मार्ग दाखवला.
मिताच्या मनात आलं, इतक्या लांब प्रवास करून आपण काहीतरी शोधत इथपर्यंत आलो. आपल्याला कोण दीक्षा देईल? दीक्षा मिळते तेव्हाच त्यातलं अभिप्रेत ज्ञानही मिळतं का? की नंतरच त्या ज्ञानाचं आकलन होत जातं? काळोख व्हायच्या सुमाराला दोघी लता मंगेशकर बागेत पोचल्या. विस्तीर्ण आखीव-रेखीव बाग, ठिकठिकाणी कलात्मक कारंजी, अडीच हजार लोक बसू शकतील असं अ‍ॅम्फी थिएटर. पुरेसा अंधार झाल्यावर बागेतले एकेक दिवे उजळू लागले. संगीताच्या तालावर कारंजी रंग उधळीत नाचू लागली. प्रकाश, रंग, सूर आणि जलधारा – यांचा हा चौपदरी गोफ. अलौकिक नृत्य करत होता. लताच्या आवाजासारख्याच तिथल्या सुरावटी कधी झेप घेत होत्या तर कधी शांतवत होत्या. दमली होती, तरी त्या जल-संगीत-प्रकाशाच्या मोहिनीनं मिताचं मन प्रसन्न झालं.

हॉस्पिटल्स, उद्यानं, नाट्यगृहं, पुरस्कार, शिष्यवृत्ती – या बाईनं केवळ आपल्या आवाजाच्या जोरावर कुठे कुठे काय उभं केलं होतं! तिच्यावरचे आघात, अपमान या सर्वांना मागे टाकून प्रचंड मेहनत नि गानसाधनेच्या अखंड तपश्‍चर्येच्या जोरावर कमावलेलं एकमेवाद्वितीय, असं स्थान!
तिला होती का कुणाची सोबत? ती फक्त चालत राहिली होती निष्ठेनं. ही निष्ठा सर्वांत महत्त्वाची – जीवन जगण्यातली; आपण जे काम करतोय त्यात झोकून देण्याची.
माणूस जातो पण दोनच रूपांत मागे उरतो. त्याने केलेली कामं नि जोडलेली माणसं…
भारावलेल्या अवस्थेत ती वर्षाच्या गाडीनं बंगलीत परतली तेव्हा अवी केव्हाचा तिची वाट पाहत होता.

‘‘येऊ का आत? थोडा वेळ आहे?’’
‘‘हूं. काय काम आहे?’’
‘‘काम असं नाही. पण जरा बोलायचं होतं.’’
‘‘लवकर बोल – मला वेळ नाहीये.’’
‘‘आपल्या साईटवरती तुम्ही ती भिंत बांधताय ना, ती जागा खरं तर वनविभागाची आहे. त्या खात्याची आधी एनओसी घ्यावी लागेल. नाहीतर ते सरळ केस करतात.’’
‘‘ते मी बघीन.’’
‘‘आणि प्लॉट आत्ताच बांधायला हवेत का? आधी प्लान तर पास होऊ देत. प्लानमध्ये जर त्यांनी काही बदल केला तर केलेलं सगळं बांधकाम नंतर पाडायला लागेल. उगाच नुकसान…’’
‘‘सांगितलं ना, तू लक्ष घालू नकोस. मी करतो काय ते.’’
‘‘आणि तुला माहितीय का, राजूला तू मजुरांचं कंत्राट दिलंयस पण अरे मजूर साईटवर उगवतात बारा वाजता. परत जेवण झाल्यावर त्यांची विश्रांती. मग पाच नाही वाजले की हे चालले. चार तासात कितीसं काम होणार? पगार घेताहेत दिवसभराचा. तू जरा लक्ष घाल.’’
‘‘तू लुडबूड करू नकोस. राजूला मी नेमलंय.’’
‘‘राजू तुझ्या मर्जीतला आहे, म्हणून तर मी राजू किंवा मजूर-कुणालाच काही बोलले नाही. काम द्यायला हरकत नाही रे, पण ते योग्य प्रकारे व्हावं ना.’’
‘‘तुझा काय संबंध? तुझी खरेदी-परवानग्या सगळं झालंय ना! मग आता गप्प बस.’’
‘‘हो सगळी कामं झाली म्हणून तर आता मी इथे ऑफिसमध्ये बसते ना. चुकला फकीर मशिदीत! पण आपल्याला भुर्दंड होतोय-दिसतंय…’’
‘‘झालं का तुझं? मला कामं आहेत. पवार-जाधव येतायत आत्ता.’’
‘‘ओह. नवीन कामं, नवीन पार्टनर-त्यांच्यासाठी वेळ असतो तुला. आणि मी ऑफिसला असते तर तू दिवसदिवस साधं बोलतंही नाहीस.’’
‘‘हो, त्यांचे नि माझे नवीन प्रोजेक्ट चालू झालेत. तुझा काय संबंध?’’
‘‘अरे, आपल्या प्रोजेक्टविषयी बोलले, तरी तुला ती लुडबूड वाटते.’’
‘‘अलिबाग प्रोजेक्ट फक्त माझा आहे. समजलं? तू फक्त एक इनव्हेस्टर आहेस.’’
‘‘अरे व्वा, मग मी तीन वर्षं तिथे राहून, माझ्या ओळखी काढून, मरमर मरून कामं केली तेव्हा? तेव्हा मी पार्टनर होते ना!’’
‘‘तेव्हा तू नोकर होतीस माझ्या दृष्टीनं. फक्त नोकर. जसा राजू, तशी तू! आणि मी तुला कुठलीही उत्तरं देणार नाही. तुला कुठलंही ‘रिपोर्टिंग’ मिळणार नाही. समजलं?’’
‘‘मग मी तीन वर्षांपासून नोकर आहे. पार्टनर नाही, हे तेव्हाच का नाही स्पष्ट केलंस?’’
‘‘योग्य वेळेची वाट बघत होतो. आणि आता जा इथून. माझ्याकडे लोकं यायच्येत.’’

मग हाच प्रकार ऑफिसमध्ये नित्यनेमानं होऊ लागला. विषय वेगळे-संवाद तेच. ती कायद्यानं भागीदार होती. पण चर्चा सोडा, सल्ले नाहीतच. नुसतं सावध जरी केलं तरी श्रीरंगचा भडका उडत असे. तीन वर्षं ती अलिबागमध्येच होती, ते त्याच्या पथ्यावर पडलं होतं. ऑफिसवर त्याने पूर्ण कब्जा मिळवला होता. आणि प्रोजेक्टमध्येही त्याला ती आता खुपायला लागली होती.
त्याची आता पुण्यात दुसरीही कामं चालू झाली होती. त्या कामातले लोक, पार्टनर सतत ऑफिसला येत. तासन्तास चर्चा करत. जेवणंही होत. पण तिच्याशी कुणीच बोलत नसे. आणि श्रीरंग तर तिला फक्त टाळत-दुर्लक्ष करतच राही-मुद्दाम!

‘‘श्रीरंग, तुझा गैरसमज झालाय. मी शेतकरी किंवा तिथल्या अधिकार्‍यांना कधीच सांगितलं नाही की, ‘तुम्ही फक्त मला फोन करत जा.’ मी तिथे खरेदीसाठी, कामासाठी राहिलेय म्हणून सरपंचापासून ते तहसीलदारापर्यंत सगळे ओळखतात मला-इतकंच.’’
‘‘मी तुला सांगितलंय – तू साईटवर जायचं नाहीस.’’
‘‘अरे पण मी तुझ्या कामात लुडबूड नाही करते. तिथे जाऊनही मी कुणालाही काहीही विचारत नाही. नुसती एक चक्कर मारून येते. तरी तुला वाटतं की मी गेले म्हणून तुझं महत्त्व लगेच कमी होतंय.’’
‘‘हे बघ, मी या प्रोजेक्टचा सर्वेसर्वा आहे. इथे दुसरं कुणीही असलेलं मला खपणार नाही. मी काय करायचं-काय नाही ते तू मला शिकवायला नकोस.’’
‘‘श्रीरंग मी फक्त एक फेरी मारून येते. कुणाशीही काहीही बोलतसुद्धा नाही.’’
‘‘तू कुणाशी बरोबरी करत्येस? स्वतःचं शिक्षण काय-अनुभव काय नि माझ्यावर पाळत ठेवत्येस? तुला पार्टनरशिप दिली म्हणून फार हक्क दाखवायला लागलीस की!’’
‘‘मी हक्क अधिकार काहीही दाखवत नाहीये. इतर सर्व लोकांना मी तुझा – ‘पार्टनर’ म्हणूनच उल्लेख करते. आणि ज्या गोष्टी मला धोकादायक वाटतात त्या मी फक्त तुला सांगते. बाकी कुणाकडे विषयही काढत नाही. मी फक्त साईट बघून आले म्हणून तू नाही ते संशय घेऊ नकोस.’’
‘‘रुबाब करायला जात असशील साईटवर.’’

‘‘मला कुठलेही रुबाब करायचे नाहीत. गेले वर्षभर मी इथे ऑफिसमध्येच शांत बसून आहे- कामाशिवाय! तू माझ्याशी बोलत नाहीस. दुर्लक्ष करत-टाळत राहतोस-तरीही-लोचटासारखी!’’
‘‘तू साईटवर तर जाऊच नकोस आणि मग ऑफिसमध्येही नाही आलीस तरी चालेल. नाहीतरी तुझं आता इथे काही काम नाही.’’
तणतण करून श्रीरंगचा उद्धार करून अगरवाल शेवटी ऑफिसमधून बाहेर निघून गेले. मिता हादरून गेली. अजून प्लान पास झाला नाही, तरीही हा साईटवरती धडाक्यात कामं करतोय – नि तेही तीन टक्क्यानं कर्ज काढून? आणि हे त्याने मला सांगूही नये? मिता सुन्न होऊन बसून राहिली.
अर्ध्या-एक तासानं, नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये येऊन श्रीरंग तडक त्याच्या केबिनमध्ये गेला. त्याचं चहापाणी झाल्यावर, थोडा वेळ जाऊ देऊन ती त्याच्या केबिनमध्ये गेली.
‘‘कामात आहेस? थोडा वेळ आहे का तुला?’’
‘‘…..’’
‘‘बोलू का मी? अगरवाल येऊन गेले मघाशी.’’
‘‘समजलं मला. फोन आला होता.’’
‘‘इथेही तमाशा करून गेले. श्रीरंग, प्लॅन पास होईपर्यंत साईटवरचं काम थांबवूया का आपण?’’
‘‘आता तू मला शिकवत्येस? मला?’’
‘‘शिकवत नाहीये रे – माझं मत…’’
‘‘कोणी विचारलंय तुझं मत? कोण तू?’’
‘‘शांत हो श्रीरंग. आज अगरवाल आलेत, उद्या जैन येतील, परवा…’’
‘‘तुझ्यापर्यंत येतंय का कुणी? मी ठरवेन ना काय करायचं ते.’’
‘‘केस करणारेत ते. धमकी देऊन गेलेत. दोन वर्षांपूर्वी तू त्यांच्याकडून तीन टक्के व्याजानं पैसे घेतलेस नि अजून परत…’’
‘‘हे बघ, यात तू लक्ष घालू नकोस. तुझ्यापर्यंत…’’
‘‘त्यांनी केस केली तर ते प्रकरण माझ्यापर्यंत येणार नाही? तेव्हा कायद्यानं मीही जबाबदार असेन ना? एक डायरेक्टर मीही आहे.’’
‘‘अच्छा, म्हणून रुबाब करून दाखवत्येस.’’
‘‘हा रुबाब नाहीये. सावध करतेय तुला. झालं ते झालं. आता तरी यापुढे आणखी कर्ज नकोत. अंगाशी येईल.’’
‘‘मला उलट बोलत्येस? मला विरोध करत्येस? तुझी तेवढी लायकी आहे का? एकदा आरशात बघ. माझ्या चुका काढत्येस?’’
‘‘श्रीरंग प्लीज समजून घे. तुला मी साईटवर जायला नको होतं-ते मी थांबवलं. कुठल्याही कामात लुडबूड केली नाही. सल्ले सूचना दिल्या नाहीत. पण आता हे गळ्याशी आल्यावरही मी गप्प बसू? पैशाची सोंगं आणता येत नाहीत. हे पुढे तुला आणि मला दोघांनाही भोगावं लागणारे.’’
‘‘मला धमक्या देत्येस? हिम्मत कशी झाली तुझी? याच्यापुढे प्रोजेक्टमध्ये एक तर तू राहशील किंवा मी.’’
‘‘श्रीरंग मी हात जोडते. गैरसमज न करता कृपा करून शांतपणे ऐकून घे. हे तुझ्या-माझ्या-प्रोजेक्टच्या-सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. यापुढे कर्ज काढून साईटवर बांधकाम करणं खूप धोकादायक आहे. अगरवाल, मि. जैन…’’
‘‘त्यांचं काय करायचं ते मी बघून घेईन. प्रोजेक्ट फक्त माझा आहे आणि मला उलट बोललेलं, विरोध केलेला मी खपवून घेणार नाही.’’
‘‘श्रीरंग उद्या केस झाली तर…’’
‘‘मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. तुझं तोंडही पाहायचं नाहीये मला. चालती हो इथून- आत्ताच्या आत्ता…’’

मिता गप्प बसली. आता समजावून वाद घालून काहीही अर्थ नव्हता. पैशाच्या बाबतीत त्याने तिला कधीच लक्ष घालू दिलं नव्हतं. आणि आता तिनं काहीही विचारलं, तर तो थयथयाट करून दाखवत होता. तिच्यावर बिनबुडाचे संशय, आरोप करत होता. तिनं कितीही पोटतिडकीनं कळवळून सांगितलं, तरी त्याला त्याचेच गैरसमज कुरवाळत बसायचं होतं. याला काही अंत नव्हता. ‘मीच सर्वश्रेष्ठ’ हा अहंकार, गर्व नि घमेंड – एक दिवस त्याचा घात करणार होते.
हे सगळं चिघळतच चाललं होतं. या सगळ्याचाच आता तिला उबग आला होता. श्रीरंगची जी काही एक प्रतिमा तिच्या डोळ्यांसमोर होती ती दरदिवशी भंगत चालली होती. एकेकाळच्या देखण्या श्रीरंगकडे, आता तिला पाहवतही नव्हतं…
श्रीरंगनं आदळआपट केली. मग जैनचा फोन आला. त्यानेही फोनवर तमाशा केला. धमक्या दिल्या. मिता समोरच बसून ऐकत होती. नेहमीप्रमाणे ती उठून बाहेर गेली नाही.
श्रीरंगला आपल्या चुका समजत नव्हत्या असं नव्हे – पण त्या आता मितापर्यंत आल्या होत्या. जी या क्षेत्रात नवखी होती, तिने यात यशस्वीपणे काम केलं होतं. शेतकरी, गावकरी, मजूर, सरकारी अधिकारी तिचा आदर करत असत. तिचे अंदाज आडाखे अचूक ठरत होते, आणि श्रीरंगचं, काहीही-कामाचं, पैशाचं कुठलंच प्लॅनिंग न करता धावत सुटणं, आता जाहीर होत होतं. आता अंगाशी आल्यावरती ते मिताला समजत होतं. श्रीरंगची नाचक्की होत होती – मितासमोर… एका स्त्रीसमोर!
पण तिच्या एका सहीशिवाय तो काहीही करू शकत नव्हता. प्रोजेक्टमध्ये ५० टक्के वाटा तिचा होता. त्याला नको असलं तरी कायदा तिच्या बाजूनं होता.
आणि हे ऑफिसही तिचंच होतं…
चारच दिवसांत श्रीरंगने स्वतःचं वेगळं ऑफिस बघितलंय हे तिला समजलं. ऑफिसमधल्या पोर्‍याबरोबर तिने प्रोजेक्टच्या सार्‍या फायली तिथं पाठवून दिल्या.
एक अध्याय आता संपला होता…
***

घामाघूम होऊन मिता जागी झाली. स्वप्न पडलं, की तिचं अंतर्मन जे घडलं होतं त्याचा पिच्छा पुरवीत होतं? काहीही असो, आता तिला त्या सगळ्याचा विचारही करायचा नव्हता. तिची झोप मग उडालीच. पार्वतीबाईंना उठवायला नको म्हणून, स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन स्वतःकरता कॉफी करून घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसली.
जे विसरायला ती इथे आली होती त्या कटू आठवणीच तिला सोडत नव्हत्या. निर्हेतुकपणे ती समोर बघत बसली; पण तिला दिसत काही नव्हतं. बाहेर नुकतंच फटफटत होतं. मंद प्रकाश उजळत, फाकत होता. आजूबाजूच्या बंगल्यांना आत्ताशी जाग येत होती. तिचा पहिला कप संपेस्तो अवी उठून बाहेर आला.

‘‘काय गं? मला वाटलं आज ताणून देशील उशिरापर्यंत. काल दमली होतीस बरीच. उशीर झाला तुला यायला. मला वाटलं मैत्रिणीने ठेवून घेतलं की काय?’’
‘‘तू नसतास तर राहिलेही असते वर्षाकडे. पण काल तू काम संपवून येणार होतास म्हणून उशिरा का होईना परत आले.’’
‘‘संपलं एकदाचं अधिवेशन. आता सुट्टी. चार दिवसांनी गेलो कामावर तरी चालेल. चल, आज लवकरच बाहेर पडू. काय काय बघायचंय तुला? रामन सायन्स सेंटर, म्युझियम, टायगर रिझर्व, बोटॅनिकल गार्डन, बर्ड सँक्चुरी, महाराज बाग झू….’’
‘‘नको नको. बागा खूप झाल्या बघून नि ते सायन्स सेंटर नि म्युझियम नको बाई. त्यापेक्षा रामटेकला जाऊ.’’
‘‘ये हुई ना बात! काल वर्षानं दमवलं नं तुला, आज मी पिट्टा पाडतो की नाही बघ तुझा. पारूबाई, फक्कड चहा करा. नाश्ता करून आम्ही निघतोय. आज दोन्ही वेळेला बाहेरच जेवू. आज तुम्हाला सुट्टी. पण उद्या सकाळी या हं.’’
अवीने इथल्याच एका मित्राकडून गाडी मिळवली होती. ड्रायव्हिंगला तो स्वतः बसला. पोटभर नाश्ता करून दोघं निघाली. गाडी आता शहर सोडून बाहेर धावत होती.
‘‘रस्ते छान आहेत रे इथले. मोठे, रुंद नि गुळगुळीत आणि ट्रॅफिकही फारसं नाहीये. आणि बागा-तलाव तरी कित्ती आहेत. तेही खुद्द शहरातच. मुंबई-पुण्याला बघायलाही मिळत नाहीत. खरंच नागपूरनं पुरतं आश्‍चर्यचकित केलंय मला.’’
‘‘वर्षा काय म्हणत होती?’’
‘‘तुझ्याबद्दल विचारत होती. किती वर्षांची मैत्री आहे वगैरे.’’
‘‘मैत्री वर्षांत मोजतात का? काय सांगितलंस मग?’’
‘‘मैत्री वर्षात नाहीत पण, आठवणीत, हक्कात, एकत्र हसण्यात नि एकत्र रडण्यातही मोजतात. तसं बघितलं तर मग शंभरी भरल्येय आता आपल्या मैत्रीची.
– तिला सांगितलं, कॉलेजमध्ये त्रिकूट होतं आमचं. तू, मी नि किरण सतत बरोबर असायचो. काय काय नाही केलं. ती पाच वर्षं पूर्णपणे जगलो आपण.’’
‘‘हं, पण लग्नानंतर बरीच वर्षं मात्र…’’

‘‘हो रे, लग्नानंतर संसार, करियर, मुलं, त्यातच सारखी घरं बदलणं, पहिली काही वर्षं माझा कुणाशीही संपर्क राहिला नव्हता. पण गेल्या दहा वर्षांत सर्वांत जास्त तुझ्याशीच.’’
‘‘बरं झालं ना आलीस ते. जरा बदल-जागा-माणसं-विचार.’’
‘‘हम्म! विचारांपासून आपण फार दूर नाही जाऊ शकत, पण हो, आले ते छान झालं. तुझ्याशीही निवांत गप्पा झाल्याच नाहीत. तुझी पुण्याला कायम धावती भेट. बोलणं असं होतच नाही.’’
‘‘अगं मंत्रालय हा एक असा भुलभुलय्या आहे ना, त्यात शिरलं का माणूस हरवूनच जातो. इथली नोकरी पक्की आहे गं, पण जबाबदार्‍या फार. कुटुंबालाही मी फार वेळ देऊ शकत नाही.’’
‘‘अवी, तुझ्या या नोकरीचा सर्वांत जास्त फायदा मलाच झाला बघ. अगदी तुझ्या कुटुंबापेक्षाही. वेळोवेळी वेठीस धरलं मी तुला – हक्कानं! कधीही तुला फोन करताना, तुला जमणार नाही, तू नाही म्हणशील – हा विचारसुद्धा माझ्या डोक्यात आला नाही. सॉरी, मी तुला गृहीतच धरलं कायम!’’
‘‘ए काय, आभारप्रदर्शन आहे का? सोड- गाणी लाव बघू छान. गुलजारची लाव हं- तुझ्या आवडीची.’’
तासाभरातच रामटेक आलं. डोंगरावरचा किल्ला न् त्यात बांधलेलं हे मंदिर. किल्ल्याचं प्रवेशद्वारच प्रचंड मोठ्ठं होतं.
अवीला रामटेकचा इतिहास मुखोद्गत होता. ‘‘आईची आज्ञा प्रमाण मानून राम-सीता-लक्ष्मण वनवासाला गेले नि फिरत फिरत इथे आले. पावसाळ्याचे चार महिने तिघांनी इथे आश्रय घेतला. इथेच अगस्त्य मुनींकडून रामाला ब्रह्मास्त्र प्राप्त झालं. मुनींनी रामाला वनवासाचं प्रयोजन सांगितलं. नि त्या वेळी रामानं सर्व दुष्ट राक्षसांचा संहार करण्याची प्रतिज्ञा केली. खरं रामायण त्यानंतरच घडलं.’’

‘‘म्हणजे रामाला वनवासाला जाताना ‘तो का जातोय’ हे माहीत नव्हतं तर! ते त्याला अगस्त्य मुनींनी सांगावं लागलं?’’
‘‘अगं प्रत्येक गोष्टीला, घटनेला – कार्यकारण भाव असतोच. फक्त त्यामागचं कारण, ती पुढची घटना घडेपर्यंत आपल्याला समजत नाही. अर्थात नंतरही दोन घटनांचा संबंध आपल्याला जोडता येतोच असंही नव्हे. पण तो असतोच. तोच तर शोधणं महत्त्वाचं प्रयोजन!
असं म्हणतात की, वाल्मीकींनी रामायण, रामजन्माच्या कितीतरी आधी लिहिलं होतं. त्यानंतर बरेच वर्षांनी लव-कुशांनी ते रामाला गाऊन दाखवलं.’’
‘‘म्हणजे वाल्मीकींना पुढे काय काय घडणार ते सगळं माहिती होतं?’’
‘‘हो, राम अयोध्येतच सुखात राहिला असता तर सर्व दुष्ट राक्षसांचा संहार कसा बरं झाला असता? त्यासाठीच मग वनवासाचं हे प्रयोजन!
राजा रामदेवरायाच्या काळात इथं फक्त पादुकापूजन होत असे. नागपूरचे राजे रघूजी भोसले यांनी सहाशे वर्षांपूर्वी हा किल्ला बांधला. चल आधी सगळं फिरून बघून घेऊ.’’
भव्य, लांब-रुंद तटबंदी, आखीव बुरूज, एकसंघ दगडातले मुख्य राममंदिर. नक्षीदार कमानी, भिंतीवर कोरलेल्या मूर्त्या, अनेक खांबांच्या ओवर्‍या, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! विस्तीर्ण फरसबंदी आवारात एकमेकांना खेटून असलेली इतरही छोटी मंदिरे – लक्ष्मण, कौसल्या, सुमित्रा, हनुमान, गणेश, शिवलिंग आणि नरसिंहसुद्धा. पायर्‍या उतरून खाली गेलं की रामकुंड आणि सीताकुंड. गंमत म्हणजे इथे जिवंत वानरसेनाही होती. जणू पिढ्यान्पिढ्या वानरांना रामाचा इथला वावर माहिती होता.
बाहेर एका चौथर्‍यावर एका वराहाचा पुतळा. लोक एका बाजूनं सरपटत त्याच्या पोटाखालून जाऊन, दुसर्‍या बाजूनं बाहेर पडत होते. देवासमोर आपण नम्र असल्याची ही अशी कबुली का? एखादी गोष्ट मनाला पटली की निदान मनाशी तरी त्याची कबुली द्यावी लागतेच. दोघं फिरत बुरुजापाशी आले. शेजारून नदी वाहत होती. लांबवर दोन छोटे तलाव नि छोटं गाव वसलं होतं. तिला तिथे जवळच कालिदास स्मारक दिसलं.

‘‘असं म्हणतात की, कालिदासानं इथंच बसून मेघदूत आणि शाकुंतल या रचना लिहिल्या. त्याच्या ग्रंथात वर्णन केलेली ती रामगिरी – ती हीच. इथे कालिदास महोत्सवही भरतो.’’
ती थरारून गेली. इथं साक्षात कालिदासाचे पाय लागले होते? काळाच्या कसोट्यांवर लखलखीत उठून दिसणारी ती महाकाव्यं – आणि त्याची साक्ष देणार्‍या या वास्तू…
‘‘तुला याचा इतिहास आणि भूगोलही पाठ दिसतोय.’’
‘‘मी दर वर्षी येतोच इथे. दर्शनाला म्हणून नव्हे. इथे जिवाला खूप शांत वाटतं म्हणून. इतिहासाशी आपलीही नाळ जोडली जाते असं वाटतं. नेहमी इथे आलो की ठरवायचो, एक दिवस तुलाही इथे घेऊन यायचं. आणि आज तू आलीस.’’
‘‘तू इतिहास म्हणतोयस अवी, पण मी माझा भूतकाळ विसरायला आलेय इथे.’’
‘‘मितू, भूतकाळ काय किंवा काळाचा असा कुठलाच तुकडा आपण तोडून नाही टाकू शकत. काळ हा अखंडच असतो. आपण आपल्या सोयीसाठी त्याचे छोटे छोटे तुकडे करतो. अखंड काळ समजेल हा आपला आवाकाच नव्हे. तेवढी आपली समजही कमीच पडते. पण तुकडे केले तरी भूतकाळ असतोच. फक्त आपण तो दडपून लांब ठेवू शकतो. त्यावर पडदा टाकू शकतो – आपल्या दृष्टीआड, म्हणजे मग तो आपल्याला खुपत नाही.
मग योग्य तेवढा काळ मध्ये गेला, जाणिवा बोथट झाल्या तर मग त्या नकोशा भूतकाळाकडे आपण पाहूही शकतो… अंतर राखून. मग त्याचा त्रास नाही होत. खरं ना?’’
‘‘अवी तू, माझ्या एवढाच. पण तुझी समज किती मोठी! पहिल्यापासून तू असाच – शांत, समंजस, विचारी, संयमी, कुणाशी कधी भांडण नाही. झालाच वाद, तर हसून सोडून देणार आणि मी बरोब्बर उलट – सतत वाद घालणारी, आपलं मत दुसर्‍याला पटवून देणारी, कधीही हार न मानणारी… आपण अगदी दोन टोकांचे आहोत बघ!’’

दोघं किल्ला उतरून खाली आली. जवळच खिंडसी तलावाजवळ एका ढाब्यावर दोघांनी जेवण केलं नि दोघं परत गाडीपाशी आली.
‘‘आता कुठे मजल मारायचीय राजे?’’
‘‘आता एक छान ठिकाण आहे. माझं आवडतं. बघंच तू. आज जायलाच हवं तिथे – चल चल.’’
गाडीत दोघांच्या परत खूप गप्पा झाल्या. दोघांना विषय पुरत नव्हते. तासाभरात गाडी अंबाझरी तलावापाशी आली. दिवस मावळतीला झुकला होता. प्रशस्त शांत जलाशय, तलावाच्या भोवती आंब्यांची पुष्कळ झाडं, शेजारी छानशी बाग… त्या निसर्गचित्राला बाधा न आणणारी. काळोखी होतं जाणारं निळं आभाळ, पक्ष्यांचा किलबिलाट, घनदाट झाडी, गार वारा… दोघं निवांत… निःशब्द झाली!
तिला आता आतून खूप शांत वाटत होतं. हा अवीच्या संगतीचा परिणाम! त्याच्यासारखं आपणही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. अट्टहासानं काही धरून ठेवायला गेलं तर त्रासच जास्त होतो. मग सारखं खदखदत, धुमसत राहतं. तिला अवी फोनवरून हेच तर सांगायचा ना, ‘‘जाऊ दे. त्याच्याकडून चुका होतायत कबूल आहे. तू चांगल्या भावनेनंच सांगतेस. त्याला, सावध करतेस हेही खरंय, पण आता त्याचं त्यालाच ते सगळं कळून येईपर्यंत तू फक्त शांत रहा. धीर धर.’’ तो तिच्या तापल्या मनावर फुंकर घालत राहायचा.

खरं होतं ते. श्रीरंग ऑफिस सोडून गेल्यानेच त्याला ते वेळेवर कळून येणार होतं. तो मग तशी-आवश्यक ती-पावलंही उचलणार होता. पण ती समोर असताना, अट्टहासानं, ती सांगेल त्याच्या बरोबर उलट करायचं असे त्याला. मुद्दाम-आडमुठेपणाने! तिचं आपण काही मानतंच नाही, तिला भीक घालत नाही – हे तिला दाखवायला.
यात ती काही करू शकत नव्हती. हा त्याचा ‘पुरुषी अहंकार’ सगळ्याच्या आड येत होता.
तो लांब जाणं आवश्यकच होतं!….. ती निवळत गेली….
‘‘अवी, तू माझा इतक्या वर्षांचा सख्खा मित्र. मी तुला गृहीत धरते, वेठीस धरते, हक्क गाजवते. नील गेला तेव्हा सर्वांत प्रथम तूच धावून आलास. त्याचं पेन्शन, ग्रॅच्युटी सगळं मार्गी लावून दिलंस. आणि जाताना माझ्या पर्समध्ये नोटांचं पुडकं ठेवून गेलास. अजूनही अर्ध्या रात्री कुणाला फोन करू असं वाटलं तर फक्त न् फक्त तुझं नाव समोर येतं. नाही, आभार नाही मानते मी, पण, मी तुला कधीच नाही विचारलं, तू कुणाकडे असं मन मोकळं करतोस? तुझा आहे असा कुणी मित्र-मैत्रीण?’’
‘‘नाही. मैत्रीण तू एकटीच मला – इतकी जवळची. मित्र खूप आहेत पण….’’
‘‘बरोबर, तू तर अबोलच, मितभाषी. मनातलं उघडून कुणाला कधी सांगणार नाहीस. वाद घालशील? कुणावर रागवशील? – शक्यच नाही! बायको भाग्यवान आहे तुझी.’’
‘‘झालाय एकदा वाद – सुलभाशीच, तुझ्यावरूनच!’’
‘‘अवी, ती दहा वर्षांपूर्वीची घटना – इतकं मनाला लावून घेतलंस?’’

मिताला आठवलं, लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी ती प्रथमच अवीला भेटणार होती. मग दोघं बाहेर जेवायला जाणार होते. तो तिला रात्री घरी सोडणार होता.
ती त्याच्या घरी पोचली तेव्हा त्याच्या बायकोनं, सुलभानं तिला त्याचा निरोप दिला- त्याला थोडा उशीर होणार होता. मितानं त्याच्या घरीच थांबायचं होतं.
सुलभाही अबोल, बुजरी. मितानं तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण तिच्याशी जुजबी बोलून, तिच्या हातात सरबत ठेवून ती आपल्या कामाला लागली. दोघींत संभाषण असं झालंच नाही. अवी तासाभरानं उगवला. मग त्याची आंघोळ – त्यानंतर दोघं जेवायला गेले.
दीड तास ताटकळणं, सुलभाचं न बोलणं, एक प्रकारची उपेक्षा-यानं मिता धुमसत होती. पण त्यांची बर्‍याच वर्षांनी पहिली भेट म्हणून ती त्या दिवशी गप्प राहिली. पण दोन दिवसांनी तिनं फोनवरून अवीचा समाचार घेतला.

अवी प्रथम हडबडूनच गेला. त्यानं सुलभाला जाब विचारला. तिला, मिता इतकी रागावली असेल याची कल्पनाच नव्हती. तरी तो तिला खूप बोलला. त्याने मिताच्याही खूप मिनतवार्‍या केल्या. दोन वेळा केवळ तिला भेटण्यासाठी तो तिच्या घरी पुण्याला येऊन गेला. पण ती त्याला मुद्दाम भेटली नाही – घरी असून!
‘‘माझंच चुकलं अवी. ती इतकी बुजरी, अबोल असेल असं मला माहीत नव्हतं. त्यातून आपण दोघंच जेवायला जाणार म्हणून ती नाराज असेल, मुद्दाम बोलत नसेल. तिला मी-माझं येणं पसंत नसेल, असा मी समज करून घेतला नि उखडले. पण शेवटी राग निघाला तो तुझ्यावरच! पण तू सांभाळून घेतलंस. मला आणि तिलाही.’’
‘‘आधी रागावलो खूप तिच्यावर. वर्षभर तू बोलत नव्हतीस माझ्याशी – तोपर्यंत आमच्यातही…..’’
‘‘अवी मी चुकले रे. फार बालीशपणे वागले तेव्हा.’’
‘‘इतक्या वर्षांनी भेटलीस, मला परत गमवायची नव्हती तुला.’’
‘‘किती समजूतदार तू अवी, अगदी आदर्श. काल बुद्धाचा चेहरा बघितला मी. तू त्याच्यासारखाच आहेस-शांत, संयमी, विवेकी, समंजस.’’
‘‘बास बास इतकी विशेषणं नकोत. मी शांत आहे; कारण कोण चूक कोण बरोबरचा न्याय-निवाडा मी करत बसत नाही. दोघांचीही टाळकी भडकलेली असताना एकाने तरी शांत, गप्प बसताच योग्य ठरतं. ताबडतोब, ‘तू-का-मी’ करत करत बसलं तर प्रत्येकालाच न्यायाधीश बनायचं असतं. आणि आरोपीच्या पिंजर्‍यात उभं राहायला कुणीच तयार नसतं. म्हणून मग मी तेव्हा संयम ठेवतो.

पण मी निर्विकार नाहीये. राग मलाही येतो. पण स्वभाव भिडस्त. तुला माहीतेय घरची खूप गरिबी होती. बाबांचा धंदा कधी चालायचा, कधी नाही. आई शाळेत शिवणकामाची शिक्षिका. तिचा पगार तो काय असणार? तेव्हापासून मग मन मारून जगायची सवय लागली. बोलून नाही दाखवता येत काहीच म्हणून मग….’’
‘‘म्हणून काय अवी?’’
‘‘काही नाही चल, भूक लागल्ये मला. काय खाणार? ‘वर्‍हाडी थाट’मधली थाळी?’’
‘‘नको नको, आता थाळी नाही जायची मला. त्यापेक्षा थोडंसं…’’
‘‘चल मग आज नागपूरचं चटपटीत खाणं खिलवतो तुला. जन्मात विसरणार नाहीस.’’
आणि खरोखरच अवीने तिला नागपूरच्या गल्ल्यांमधून हिंडवलं. लोकमत चौकातला चाट, शंकरनगर मधला सामोसा, धरमपेठमधली गरम जिलेबी आणि नंतर कबाब-बिर्याणी. येताना हल्दीरामच्या संत्र्याच्या नि सुक्यामेव्याच्या मिठायांची पुडकी घेऊन दोघं घरी आली तेव्हा मिताचं पोट जड नि मन हलकं झालं होतं.

मिता रात्री बॅग भरत होती. अवी तिच्या खोलीत आला.
‘‘चार दिवस आलीस तर किती हे कपडे? मी बघ इथे महिनाभर येतो. पण तीन शर्ट नि दोन पँट पुरतात मला.’’
‘‘अरे त्यासाठी बायकांच्या जन्मालाच यावं लागतं. म्हणूनच आपल्यात फरक आहे.’’
‘‘काय?’’
‘‘तू पुरुष आहेस नि मी बाई आहे.’’
‘‘ही तिकिटं – उद्याची.’’
‘‘कितीचं विमान आहे?’’
‘‘१२ वाजता चेक इन करायचंय. ११ वाजता निघू.’’
‘‘तुझंही विमान तेव्हाच आहे?’’
‘‘हो.’’
‘‘मग मला पुण्याच्या विमानात बसवून दे आणि मग जा तू मुंबईचं विमान पकडायला.’’
‘‘कॉफी करू का रे? थंडी म्हणजे कहर आहे आज.’’
‘‘कॉफी? वेडी की काय? ही बघ, शॅम्पेन ठेवलंय – जपून आजच्यासाठी.’’
‘‘अरे काय हे? तू म्हणजे आख्खा दारूगोळा जमा करूनच ठेवला होतास की काय?’’
‘‘मग? मॅडम काय रोज रोज येतायत? दहा वर्षं मनधरणी करतोय तेव्हा आज प्रसन्न झाल्यात.’’
‘‘बरं बरं…. समजलं!’’
अवीनं गच्चीत सगळा सरंजाम मांडला. चिअर्स करून दोघं आरामात बसली – आपापल्या विचारात हरवून…
‘‘अवी, किती छान गेले हे दिवस. आता कधी भेट?’’
‘‘इतक्यात निरोप नको घेऊस. उद्या विमानात असेन मी, तुझ्या शेजारी.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘मीही येतोय पुण्याला, आणि आपली विमानं एकाच वेळेची नाहीत तर – ती एकच आहेत.
श्रीरंगला भेटतो. नाही-तू नको येऊस. त्याला जेवायला घेऊन जातो. मॅन टू मॅन टॉक यू नो! त्याला माझ्या पद्धतीनं सांगून येतो. अजून एम.ए. व्हायचंय तुमचं. काही मदत लागली तर मी आहे.
त्याला एम.ए. करायला मदत तर लागेलच. पण तेव्हा तो तुझ्याकडे नाही येणार – म्हणून… मधे मी!’’
‘‘अवी-ग्रेट.’’ मितानं आनंदानं त्याचा हात पकडला.
‘‘मला सुचलंच नसतं हे कधी.’’
‘‘तू तशी पहिल्यापासून बुद्दूच!’’
(हसत) ‘‘ते आहेच, तरी तुझ्यासारखा मित्र मिळवला की नाही? अवी, किती करशील रे माझ्यासाठी? आणि मी फक्त घेत बसते तुझ्याकडून…..’’
‘‘तूही देतेच आहेस ना- तुझी मैत्री!’’
‘‘वा वा! माझी मैत्री म्हणजे अगदी गुलाबकवलीचं फूल असल्यासारखं बोलतोयस.’’
‘‘तशीच आहे – माझ्याकरता तरी!’’
‘‘अवी…’’
आणि तिचा हात सोडवून, ग्लास घेऊन कठड्याशी जाऊन उभा राहिला. तिच्याकडे पाठ करून म्हणाला, ‘‘खूप आवडायचीस तेव्हापासून. पण आपल्यात फरक होताच ना – परिस्थितीत, स्वभावात… कधी व्यक्तच होऊ शकलो नाही.’’
‘‘अवी…’’
मिता आपला ग्लास घेऊन त्याच्यापाशी गेली. त्याला सन्मुख झाली.
‘‘मितू, आता भेट कधी? आपली घरं इतकी लांब-लांब-दोन शहरांत…’’
मितानं आपला ग्लास त्याच्या ग्लासात रिकामा करून म्हटलं, ‘‘आत्ता तर इतकी वाटचाल करून आलोत. आता तर भेटतच राहू ना, कधी मी येईन मुंबईला, कधी तू ये पुण्याला, कधी असंच बाहेर जात जाऊ. शेवटी अंतर म्हणजे काय? दोन ठिकाणांना, दोन माणसांना जोडणारा दुवाच तर असतो ना!’’
रात्र चढत होती. आज गारठा जरा जास्तच होता. पण मिताला तो आता जाणवला नाही. अवीची आश्‍वासक ऊब तिला पुरेशी होती.

– अवनी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.