Now Reading
हेमा मालिनीचा वाढदिवस!

हेमा मालिनीचा वाढदिवस!

Menaka Prakashan

हेमा मालिनीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस फिरू लागले. तिचं दिसणं, राहणं, स्वत:ची एक प्रतिमा जपून असणं… सौंदर्यपूर्ण आणि दिमाखाचं ते व्यक्तिमत्त्व असलं, तरी मनात तिच्याबद्दल आदर वाटावा अशी तिची सभ्यता, सुसंस्कृतपणा… सोबतच, तिच्या वेगवेगळ्या सिनेमांतल्या तिच्याबद्दलच्या नोंदी दिवसभर फिरत होत्या.

मला ‘दुल्हन’ आणि ‘खुशबू’चे दिवस आठवले. माझ्या लग्नापूर्वीचे. स्वप्नसुंदरी वगैरे विशेषणं घेऊन मिरवणारी हेमा मालिनीची ती छबी. तिचे काही गाजलेले चित्रपट पाहिले होते. ‘जॉनी मेरा नाम’मध्येही ती बेफाम आवडलेली होती त्या दिवसांत. अभिनयाच्या, आवाजाच्या तिच्या त्रुटी जाणवायच्या नाहीत, कारण तिचं दिसणं, तिचं वावरणं यातच दिपून जाणं व्हायचं. मात्र ‘दुल्हन’, ‘खुशबू’मधली हेमा मालिनी एवढी गुंतवून टाकायची, की त्या चित्रपटांतली हेमा मालिनी जवळची वाटली, चांगली वाटली, छान वाटली आणि …आपली वाटली! अन्य सगळ्या सिनेमांतली हेमा मालिनी केवळ ‘इंप्रेसिव्ह’ वाटली होती, याची कारणं ना सिनेमाच्या दर्जाबाबतची होती, ना तिच्या अभिनयाच्या दर्जाबद्दलची. तसं पाहिलं, तर तिच्या अभिनयाकडे म्हणावं तसं लक्ष असायचं का? तिचं दिसणं, तिचा वावर, तिचं हसणं-बोलणं… आणि हसण्या-बोलण्यात नसताना, दरम्यानचे तिच्या चेहर्‍यावरचे भाव; महत्त्वाचं म्हणजे, साध्या वेशभूषेत, नट्टापट्टा नसलेली, सुवर्णालंकारविरहित अवस्थेतली ती हेमा! हो, हेच खरं कारण होतं, हेमा मालिनी आपली वाटण्याचं.

आणखी एक कारण होतं, ते माझंच. माझ्या साधेपणाचं. ऐश्वर्य, श्रीमंती न अनुभवलेलं निमशहरी, खेड्यात व्यतीत झालेलं माझं शालेय जीवन, तरुणपण अन् नोकरीतले दिवससुद्धा. डोळे दिपवून टाकणारं काहीही असलं, की त्यातून बाहेर पडल्यावार धूसर वर्तुळं फिरायची, दैनंदिन विचलित व्हायचं, हाती काही लागायचं नाही… अशी ती चलबिचल अवस्था. आणि नेहमीच सिनेमाचा, हेमा मालिनीचाच विचार असायचा, असं थोडंच असतं? नोकरीची धडपड, नोकरीचे दिवस… आपलं ते असणं-दिसणं… नोकरीच्या चार पैशांनी त्या दिसण्या-असण्या-वागण्याला पालवी फुटायला लागलेली… बरेपणाची. बरेपणा… त्यात कसला आलाय ‘रोमँटिक मूड’ अन् कसली आलीये धडाडी?
पण या बरेपणातच छान चाललेले ते दिवस होते. वाचन-लेखनाच्या नादाला लागलेलं माझं मन. हातून काही लिहून झालं, की एकटेपणातच हरखून जायचं, मुरकुत मुरकत पुन्हा लेखन वाचायचं. खेड्यातल्या हेमा मालिनीनं बिंदी लावून भिंतीतल्या आरशात पाहत राहावं तसं.
कथालेखनाच्या अगदी पहिल्या टप्प्यात लिहिलेली माझी कथा ‘सिम्प्टम्स’ ही होती. त्या वेळी माझं लग्न झालेलं होतं. लग्नाचा नवखेपणा, ती चमक, ती लगबग जाऊन संसार सुरू झालेला होता. माझ्यातला ‘राव’ निघून गेला होता, तर बायकोचं वधूपण निघून ती संसाराला लागली होती.
कथा ही लेखकाला जिथे सुचली, तिथेच लिहायला तो घेतो, असं थोडंच आहे! वार्‍यानं, पशुपक्ष्यांच्या मदतीनं ते बीज इतस्त: पसरतं, कुठेतरी रुजतं, मूळ धरतं. कथाकल्पना अशीच असते. त्याची खबरही लेखकाला नसते. ‘सिम्प्टम्स’चंही असंच झालं होतं. नटलेल्या अशा स्वत:च्या बायकोकडे पाहताना भरकटणार्‍या आणि नंतर तिच्याकडे पाहूनच भानावर येणार्‍या नवर्‍याची ही लघुकथा- ‘बाहेर’ न घडता, नायकाच्या मनातच घडलेली.
त्या दिवसांत र. वै. शिरवईकर यांचं, मनोविकारांचं विश्लेशण करणारं एक पुस्तक आवडलं होतं. चालत्या बोलत्या माणसाचं ओळखीचं वाटणारं बोलणं-चालणं- उन्हामुळे त्वचेचा रंग पाहता पाहता रूपांतरित व्हावा, तसं मनोविकारात रूपांतरित होतं, त्रासदायक होत जातं. अनेक उदाहरणं, मनोव्यापार आणि अनेक रूपं त्या मनोविकारांची. गुंतून गेलेलो होतो त्या स्वाभाविक आणि समजावून सांगणार्‍या लेखनशैलीनं.

माझं लग्न. आयुष्यात पहिल्यांदाच सॉक्स-बूट घेतलेले. पहिल्यांदाच दुप्पट भावात घेतलेले, शिवलेले ते कपडे… आणि तेच कपडे सतत वापरून रुळलेले. बूट तसेच कोपर्‍यात पडून राहिलेले. त्याउलट, बायकोच्या त्या भारीच्या साड्या, हमखास सणाला-समारंभाला बाहेर काढल्या जायच्या. त्या साड्या- त्या नटण्यातून बायकोचा स्तर मला हमखास जाणवायचा- माझ्या पातळीवरून थोडा वर उचललेला तिचा स्तर. तिचं दिसणं, तिचा वावर.
कधी कुण्या समारंभाला जायचं असलं, की अर्थातच माझं तयार होणं म्हणजे पाच-दहा मिनिटांचं, तर बायकोला लागणार्‍या वेळात मी खोळंबलेला, रिकामा. आणि त्या रिकामपणात विनाकारण मनात तयार होणारा माझा तो नाराजीचा सूर, चुळबूळ. यातूनच मग बायको ‘तयार’ झाली, की तिच्यासोबत निघताना वरून तर खुषी असायची, बोलायचो, पण मनात एक परतणारी अशी मन:स्थिती तयार व्हायची… कुठे परतायची? त्या समारंभात दाखल झालं, की बायको वेगळी व्हायची, इतर नटलेल्या बायकांच्या समूहात मिसळून जायची. मी मात्र इकडे वेगवेगळ्या वयांच्या माणसांत बसून असायचो. पुरुषांची ही वेगवेगळी वयं… चेहर्‍यावरून, कपड्यांवरून, बोलण्यावरून आणि हालचालींवरून पटकन लक्षात येणारी, तर तिकडे सगळा महिलावर्ग सजलेला, एकाच वयाचा असा वाटायचा.

माझ्या मनातल्या अशा आंदोलनानं असंच कधीतरी कथारूप घेतलं. कथा लिहून काढली. कथेत मुख्य मुद्दा हाच होता- नटलेल्या आपल्या बायकोकडे पाहून मनात कमीपणाच्या भावनेनं बहकलेला नवरा. पण कथा पुढे न्यायची कशी… त्यासाठी दोन कारणं मिळाली. एक, म्हटलं तर कृत्रिम, बळेच आणलेला मुद्दा असावा तसं कारण आणि दुसरं मात्र अनिवार होऊन आलेले, अत्यंत स्वाभाविक असं, कथेचा आशय स्पष्ट करणारं मनाला कथालेखनाचा आनंद मिळवून देणारं असं ते कारण.

समारंभातला जो कोणता तो सोहळा असतो, तो पुरा होईपर्यंत पुरुषवर्गाला काही काम राहायचं नाही. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो, पण तोपर्यंत पुरुषांनी नुसतं बसून करायचं काय? आपापसातल्या त्यांच्या गप्पा. मग कथेत हा नायक सोबतच्या एका दूरच्या नात्यातल्या माणसाशी बोलायला लागतो. गप्पांत अनाहूतपणे मनोविकाराचा संदर्भ येतो (शिरवईकरांच्या पुस्तकाचा हा परिणाम). मनाला होणारे भास, स्किझोफ्रेनिया अशा विषयांवर ती चर्चा, जी नवोदित लेखक म्हणून ‘जाणीवपूर्वक’ कथेत योजलेली, त्या वेळी ती चपखल वाटू लागलेली, आता ती ‘चापलुसी’ वाटते आहे, इतक्या दिवसांनंतर!
याच दिवसांत मी चक्क पुण्याला डॉ. शिरवईकरांना पत्र लिहिलं होतं! ती कथा त्यांना पाठवून थेट प्रश्न विचारायची हिंमत केली होती. कथेतल्या नायकाला बायकोबद्दल असं वाटणं, भास होणं याला कोणता मनोविकार म्हणावा? हा स्किझोफ्रेनिया असतो का? कथालेखनानं झपाटलेलं ते वय, त्या वयात लेखक किती उत्साही असतो, काय काय हिंमत करत असतो! आता या दिवसांत मनोविकारांचे कोणतेही सिम्प्टम्स दिसले, तरी ते मनातच उगाळायचे, समजूत घालायचे प्रयत्न, अन् त्या दिवसांत कथेतल्या नायकाला पेशंट ठरवून त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचा, ते सगळे मनोव्यापार जाणून घ्यायचा माझा तो उत्साह!

हिंमत तर केली होती, पण पत्रोत्तराची निश्‍चित खात्री नसताना, शिरवईकरांचं आंतरदेशीय आलं होतं! केवढा आनंद झाला होता! डॉक्टरसाहेबांनी कथा वाचली होती, ती चांगली असल्याचं नमूदही केलं होतं, शिवाय सांगितलं होतं, की नायकाचं हे वागणं स्किझोफ्रेनियामध्ये मोडत नाही. अशा प्रकारच्या भावना कोणत्याही संवेदनशील माणसाच्या होऊ शकतात. त्याला सरळ विकार म्हणणं चुकीचे आहे. आपला…
असो. कथा पुढे न्यायचं दुसरं कारण, जे स्वाभाविक असं- जे कथालेखकाच्या नियोजनाच्या बाहेरून आपोआप येणारं असं होतं. ते म्हणजे, घरी आल्यावर बायको जेव्हा कपडे बदलते, दोरीवरची कॉटनची नेहमीच्या वापरातली-स्पर्शातली साडी नेसून चहाच्या कामाला लागते, तेव्हा नायकाला आनंदाच्या सूक्ष्म संवेदनातून वाटतं, की अरे! ही तर आपलीच बायको!

कथेमध्ये मात्र आपोआप आलेला एक मुद्दा होता, जो कथेला बळकटी आणणारा होता. तो म्हणजे, सगळ्या कथेत बायको अबोल आहे, कारणाशिवाय काही न बोलणारी, अधिक उत्साह न दाखवता, नवर्‍याशी बोलण्यापेक्षा त्या समारंभाचा विचार, तो सहभाग त्यात गुंतून गेलेली दाखवली. त्यामुळेच तर नवर्‍याला ती अधिक दूरची वाटणारी, अधिक सुंदर, पण आपली नाही, अशी भावना निर्माण करायला कारण झालेली अशी त्याची ती बायको! असो.
मनातल्या, त्या दिवसांतल्या मानसिक आंदोलनाचा मागोवा आता घेताना असं वाटतं आहे, की बायकोला अशा रूपात पाहताना आणि तशा रूपात पाहताना मनात जे चढ-उतार झाले होते, त्या चढ-उताराचा मार्ग ‘खुशबू’, ‘दुल्हन’च्या हेमा मालिनीकडे पाहूनच सुचला होता की काय! …नक्कीच. नक्की? हेमा मालिनीचं ते साधं राहणं, विस्कटलेले केस, साध्या कॉटनच्या साडीतलं, घरातलं, मेकअप नसलेलं ते रूप; त्या रूपानं माझ्यावर केलेली ती जादू होती, की माझ्या प्रकृतीला, माझ्या स्वभावाला अनुरूप ती होती, म्हणून?
‘सिम्प्टम्स’ ही माझी कथा त्या वेळी एका मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्या कथेचं कथाचित्र आजही डोळ्यांसमोर आहे. त्या कथेचं कात्रणही फाईलमध्ये कुठेतरी असेल. मात्र जवळपास सगळ्या कथा या कथासंग्रहात जाऊन बसल्या आहेत आणि ही कथा…

एखादी स्त्री समारंभापुरती बाहेर जाऊन घरी यावी, संसाराला लागावी तशी माझी ही कथा, मासिकात प्रसिद्ध होऊन तर आली, मात्र कोणत्या संग्रहात जाऊन बसली नाही. ती घरीच राहिली, गृहिणीसारखी. माझ्याचसाठी असावी तशी. -आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास ती ‘हाऊसवाईफ’ आहे, त्याची मला खुषी आहे!
आता मात्र एक वाटतं आहे, बायकोनं साडी बदलली, की मला कितीतरी वेळा वाटायचं, तिच्या साडीच्या पदरानं आपलं तोंड पुसावं! …हेसुद्धा मला ‘खुशबू’ पाहताना वाटलं असणार नक्कीच.
हेमा मालिनीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनात आठवणींचा तयार झालेला हा चित्रपट मात्र मी व्हॉट्अ‍ॅसप केला नाही. अर्थात, तसं करणारच
नव्हतो मी.

कथालेखनाच्या जन्माच्या मागच्या छोट्या छोट्या घटना मनात रुंजी घालतात. तशीच ही एक वेगळी आठवण पुढेमागे कदाचित कथेचं बीज ठरावं, अशी!
आईची आठवण ही भक्तिगीताशी निगडीत आहे. जशी तिची भक्ती, तशीच तिची भक्तिगीते आणि पूजापाठ. आणि तिचा आवाजसुध्दा. बिनआवाजाच्या टाळ्या देत ती जेव्हा पदं म्हणायची तेव्हा वाटून जायचं, की तिची ही आराधना देवालाच पोचते आहे, ऐकायला येते आहे. मी लहान असताना, तिच्या ईश्वरभक्तीला मोठी उभारी होती, ती दोन कारणांमुळे, एक तर तिचं तरुण वय आणि दुसरं म्हणजे, बदलापूरसारख्या नवख्या ठिकाणी तिला नवीन ओळखी झालेल्या नव्हत्या. गुरूवार असायचा, वडील अद्याप ऑफिसमधून यायचे असायचे. आणि आईचा तो पंचपदीचा एकटीचा सोहळा. मी शाळेतून आलेलो, जेवून खेळून आलेलो असायचो. बैठकीत डालडाच्या डब्याला दत्त्तात्रयाची तसबीर लावून दत्ताच्या रचना गाणारी, पोथी वाचणारी आई कधीही स्वप्नात येऊन जाते. दत्ताला प्रदक्षिणा घालण्यासाठी तिचे हे नेपथ्य असायचे, बैठकीत मांडलेल्या पूजेचे. त्यावेळी चांगला मोठा आवाज होता तिचा आणि आता लक्षात येतं, काही पदं तर तिच्या आवाजातलीच मला आवडायची. काही पदं रेडिओवर लागायची नाहीत किंवा त्या पदांची गाणी झालेली नसायची. बसूनिये हंसावरी… हे त्यापैकी एक. ‘शांत हो श्री गुरु दत्ता…’ ऐकताना असं वाटायचं, की ती स्वत:वरच नाराज आहे की काय.

आपल्या भक्तीचा, भक्तीगीताचा-पूजेचा कुणाला व्यत्यय येणार नाही, असं तिचं सगळं असायचं, स्वैपाकघरतल्या छोट्या वर्तुळाच्या कक्षेत तिच्याशिवाय असायचा तो देवच फक्त. घराच्या बाहेर जसा वर्दळीचा वावर, तसा तिच्या स्वयंपाकघराच्या बाहेर आमच्या गाण्यांचा. शास्त्रोक्त संगीताच्या वातावरणातून आलेली आमची आई आयुष्यभर रांगोळीच्या ठिपक्यांप्रमाणे केवळ भक्तिगीतातूनच उमटत राहिली. तिच्यामुळे मलाही भक्तिगीतं पाठ झालेली होती. किंवा असंही म्हणता येईल, की मनाच्या एका कोपर्‍यात आईच्या भक्तिगीतांचा नंदादीप सदैव तेवत असलेला.

आता असं वाटत आहे, की आई मोठ्या लोकांत कधी रमली नाही,बुजायची. मात्र गावाकडचा वाटेकरी आला, मजूरीण आली की त्यांच्यासोबत तिच्या बोलण्याला बहार यायची. भल्या भल्यांची चौकशी करायची, त्याचं उत्तर पूर्ण व्हायच्या आधीच दुसरं काही विचारायची. कंधारला असताना शरीराचा पापोडा झालेली एक म्हातारी घरी यायची. तिचा आईवर फार भरवसा असायचा. उंचीनं चांगली असलेली ती बाई उखळाभोवती पाय पसरून काही तरी कांडत असायची आणि मधेच ती तिथेच लवंडायची, झोपीही जायची. ओसरीवरून भांडी घासणार्‍या नागाबाईला चहासाठी आई जेव्हा आवाज द्यायची, तेव्हापासून प्रत्येक टप्पा माझ्या चांगलाच ध्यानात आहे. ‘आलो आलो’ असे पुरुषी शब्द वापरीत ती घंगाळातल्या पाण्यात हात खंगाळायची. बांगड्यांचा आणि पायातल्या जोडव्यांचा- कड्यांच्या आवाजासहीत नागाबाई पायर्‍या चढून ओसरीवर यायची. गुळाच्या त्या अर्धा-पेला चहाची अपूर्व चव घेणारी, कोवळ्या उन्हाच्या वेळेतली नागाबाई, माझी आई ही या सगळ्या वातावरणातून मनात कायम आहे. माझ्या लग्नाच्या आधी आईची सोबतीण होती, ती माझी बहीण. लग्नानंतर ती सासरी गेल्यावर आईच्या शेवटच्या आजारात नववी दहावीत असलेली माझी पल्लवी. तिनं आपल्या आजीचा ताबा घेतला होतं. माझा एक कथासंग्रह आईला अर्पण करताना मी आईला म्हटलं आहे, ‘आई, तू असताना ती गाय घासासाठी गेटवर येऊन थांबायची बघ, …आता आम्हाला हाक मारावी लागते.’
लता मंगेशकरचं ‘विठठल तो आला आला, मला भेटण्याला…’ हे भक्तिगीत तिला फार आवडायचं. रेडिओवर लागल्यावर तिचा झालेला उत्स्फुल्ल चेहरा आजही आठवतो. आणि ती गंमतसुध्दा- आनंदाच्या भरात आईच्या ओळी लताच्याही पुढे जायच्या. लताची ती ओळ… ‘पंढरीला नाही गेले,’ पुन्हा जेव्हा म्हटली जाते, तेव्हा ‘नाही’चा जसा उच्चार होतो, लताच्या त्या उच्चारात मला आईच तर जाणवत असते. पंचपदीच्या त्या दिवसांपासून मी हे गाणं अगदी डोळे झाकून पूर्ण म्हणतो.

अनुभूतीच्या निमित्तानं सुरू झालेल्या या छोट्या कार्यक्रमाच्या सुरूवातीपासूनच आईची हाक येत होती, मी आता प्रतिसाद देतो आहे…

– मधुकर धर्मापुरीकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.