Now Reading
हुरैना आणि तिचं अंगण

हुरैना आणि तिचं अंगण

Menaka Prakashan

हुरैना सुंदर आहे, की तिची अंगणातली बाग, याचा निवाडा करण्यासाठी लोक तासन्तास चर्चा करत. आता खरंतर या काही तुलना करायच्या बाबी आहेत का, पण रिकामटेकड्यांना कोण सांगणार…
हुरैना बदामी डोळ्यांची, गुलाबी गालाची, पिंगट मऊ लांब केसांची, उंच, शिडशिडीत आणि प्रचंड उत्साही अशी फक्त सोळा वर्षांची मुलगी होती.
तिच्या त्या अंगणात दोन छोटी तळीही होती, त्यात कमळं डुलत. घराच्या मागे धबधबा होता आणि त्यामागे डोंगरावरचं घनदाट जंगल.
हुरैनाच्या वडलांनी त्या अंगणात नाना प्रकारची औषधी झाडं लावलेली होती. काहीतर अंधारातही हिर्‍यासारखी चमकत. तर तिच्या आईनं तर सफरचंद, अक्रोड, बदाम, पीच, पेअर, चेरी अशी किती फळझाडं लावावीत!

एवढंच नाही, तर छोट्या छोट्या वाफ्यात भाज्या, टोमॅटो आणि बटाटेही लावलेले होते. कुंपणाभोवती द्राक्षाच्या आणि रानगुलाबांच्या वेली सोडलेल्या होत्या.
फुलाफळांनी लगडलेलं सुगंधी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे गाणारं आणि तिथे बागडणार्‍या हुरैनामुळे ते नाचणारं अंगण वाटे. म्हणूनच त्या रस्त्यावरून जाणारा प्रत्येकजण तिथे थबकल्याशिवाय आणि हुरैना जर अंगणात झोके घेत असली… मग तर तिथे काही वेळ रेंगाळल्याशिवाय जात नसे.
हुरैनाला अर्थातच ते माहिती होतं. अशा लोकांना ती फुलांचे गुच्छ आणि परडीभर फळं देऊन, गोड बोलून वाटेला लावी.
हुरैनाची आई, तिचे बाबा आणि हुरैना हे छोटंसं कुटुंब होतं. ही मुलगी त्यांना अगदी उतारवयात झालेली. हुरैनाला स्वतःचं असं भावंड नव्हतं.
अंगणातली झाडंच जणू तिचे खेळगडी. हुरैना आईला घरकामात मदत करेच आणि वडलांनाही औषधं तयार करण्यासाठी डोंगरावर जाऊन अधिकचा झाडपाला घेऊन येई.

तिच्या बाबांच्या हाताला चांगला गुण होता. बाजाराच्या दिवशी तर इतके लोक येत, की जेवायला संध्याकाळ होई.
अशा संध्याकाळी मग गरमागरम पाव आणि कॉफी हाच रात्रीच्या जेवणाचा मेनू. मग रात्री अंगणात गप्पा मारताना ती वडलांच्या हातापायांना तेल लावून देई. आईची पाठ दाबून देई. अगदी अस्सल गुणी पोरगी होती.
आता या गुणी मुलीला नवरा कुठला शोधायचा? तसे गावातले कित्येक होतकरू तरुण इच्छूक होते. तिच्या वडलांना त्यापैकी तीन मुलं फार आवडत. अलाई श्रीमंत शेतकर्‍याचा मुलगा, गरवीन सावकाराचा मुलगा आणि जोची गायकाचा मुलगा… तीनही मुलं तशी गुणी होती.
हुरैनाला मात्र गुला आवडे. गुला भराभर डोंगर चढी, झाडावर चढण्यात तर तो माकडांपेक्षा वाकबगार होता. फळांच्या करंड्या तर त्याच्यासारख्या कुणालाच विणता येत नसत. मासोळीसारखा पोहत जाई. रात्री नाच करताना तर अशी काही पावलं थिरकवे, की गावातल्या सगळ्या पोरी त्याच्यावर जीव ओवाळत. त्याचं कुणाकडेही लक्ष नसे. तो स्वतःवरच खूष असे आणि त्याच्या मस्तीत जगे. त्याची ती सोनेरी झुलपं, त्याचा आवाज… हुरैनाला सगळं खूप आवडे.
पण तो एकटाच गावकरी असा होता, की तो तिच्या अंगणाकडे कधीही रेंगाळायचा नाही, तिनं कधी त्याला फुलं देऊ केली, तर मंदपणे हसून तो ती तिलाच परत देई आणि फळं मात्र घेऊन जाई.

दूर कुठेतरी डोंगरात त्याच्या आईबरोबर तो राहत असे. ते लोक त्या गावातले नव्हते. त्याचे वडील फिरता फिरता तिथे येऊन स्थायिक झाले, पण गावात काही त्यांना राहायला जागा मिळेना, तेव्हा ते लोक एका डोंगरावरच्या जंगलात एक छोटं घर बांधून राहिले. पण थोड्याच दिवसांत कसल्याशा आजाराचं निमित्त होऊन त्याचे वडील वारले.
त्या वेळी गुला लहान होता, तो तिच्या वडलांकडे औषधासाठी येई. एकदा तिचे वडीलही त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्याकडून तिनं त्या घराचं वर्णनही ऐकलं होतं. तिच्या बाबांमुळेच खरंतर गावातल्या सगळ्या कार्यक्रमांना गुला आणि त्याच्या आईला आवर्जून निमंत्रण दिलं जाई. पण म्हणून काही तिचं लग्न कुणी परक्या गुलाशी लावून दिलं नसतं.
तसा गुला कुणाच्या अध्यातमध्यात नसे, पण गावच्या पोरी… मुद्दाम त्याच्या समोरून पिंगा घालत. गावातल्या विघ्नसंतोषी लोकांना त्याचा राग येई, ते त्याच्याशी भांडणं उकरून काढायचा प्रयत्न करत. सगळ्या गावात गुला फक्त त्यांच्याच घरी येऊन तिच्या वडलांशी बोले. त्यानं तिच्या बाबांना त्या लोकांबद्दल पूर्वकल्पना दिली होती.
एकदा बाजारात गुलाला कुणीतरी उगीचच शिव्या दिल्या, त्यानं दिल्या त्यांना दोन ठेवून. पण मारामारी केली म्हणून गावप्रमुखाच्या माणसांनी त्यालाच पकडलं.

बिचारा गुला कारण नसताना त्यांच्या कचाट्यात सापडला. गुलाचे दोस्त होते एक वानर आणि अस्वल, ते गुलाची काळजी घेत.
वानर धावत उड्या मारत हुरैनाकडे गेलं आणि तिला गावप्रमुखाकडे घेऊन आलं. तिचं सौंदर्य पाहून गावप्रमुख आणि त्याच्या बायकोला त्या मुलीचं लग्न त्यांच्याच मुलाशी झालं पाहिजे, असं वाटायला लागलं. इकडे बिचारा गुला त्यांच्या कोठडीत आणि हे इथे लग्नाच्या बाता मारत बसले होते.
अस्वलाला तर इतका संताप आला, की ते मुसंडी मारून त्यांच्या घरात घुसलं आणि त्या प्रमुखाला लोळवून गुदगुल्या करायला लागलं.
आता तो खदाखदा हसत असल्यामुळे अस्वलाला हुसकावून लावावं, हेही कुणाला सुचेना. वानरानं हुरैनाला कोठडीचं दार उघडायला लावलं. नशीब! अजून तिथे कुलूप घातलेलंच नव्हतं.

गुला तिला म्हणाला, ‘‘पळ…’’ हुरैनाला कुठे त्याच्यासारखं पळायला जमतंय. तसं त्यानं तिला खांद्यावर घेतलं आणि त्याच्या डोंगरावरच्या घरी आल्यावरच खाली ठेवलं.
हुरैनाला पाहून त्याची आईही खूष झाली, ‘‘त्या सुंदर अंगणात झोके घेणारी ती तूच आहेस ना!’’ हुरैनानं मान डोलावली. ‘‘माझ्या मुलाला अशीच नवरी हवी होती.’’ गुला जाम वैतागला. अगोदरच त्या गावात त्याला परका म्हणून त्रास देत, त्यात त्या गावातल्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न केलं, तर गाव जिवावरच उठलं असतं त्यांच्या.
पण आईनं हुरैनाच्या डोक्यावर तेल घालून तिच्या लांब केसांच्या वेण्या घातल्या. तिला खायला गाडक्यामडक्यात वाळवलेली फळं आणि गरम दूध दिलं. एवढंच नाही, तर चक्क स्वयंपाकघराचा ताबाच देऊन टाकला.
हुरैनानंही तिच्या आईसारखे मऊ आणि लुसलुशीत पाव तयार केले. गुला सोडून सगळ्यांनी आनंदानं खाल्ले.
इकडे गावभर काय झालं असेल, याची तुम्ही कल्पनाच करू शकता. गुलानं ओरडून सांगितलं… ‘‘गावकरी वर येत आहेत, त्यांनी पाहिलं तर काय…’’
गावातली मंडळी धापा टाकत डोंगर चढत होती आणि त्यामागून तिचे वडील.
वानर आणि हुरैनानं एक गलोल तयार करून बरोबर नेम धरून त्या विघ्नसंतोषी लोकांना फळांच्या अणकुचीदार बिया आणि खडे मारायला सुरुवात केली, ते आपले कपाळ चोळत तिथेच बसून राहिले, त्यांना वर चढताच येईना.

गुला आपला हताशपणे त्यांच्याकडे पाहत होता. अखेरीला ती वरात गुलाच्या अंगणात पोचली, सगळी एकाच वेळी हुरैनाला पळवल्याबद्दल गुलाला देहदंडाची शिक्षा केली पाहिजे म्हणून ओरडायला लागले. हुरैना म्हणाली, ‘‘गप्प बसा! मला एकटीला पळता येईना, म्हणून त्यानं मला पळवलं आणि त्यानं मला पळवलं, कारण आम्ही देवदाराच्या झाडाखाली लग्न केलं आहे, आता तो माझा नवरा आहे.’’ आणि म्हणून तिनं चाफ्याची अंगठी घातलेलं तिचं बोट पुढे केलं.

आता लोक तिच्या वडलांकडे वळले… ‘‘काय हो, माहिती होतं का हे तुम्हाला?’’ त्यांना ‘‘हो’ म्हणावं तरी पंचाईत, ‘नाही’ म्हणावं तरी पंचाईत…
हुरैना डोळ्यांत प्राण आणून वडलांकडे पाहत होती. केवढं प्रेम होतं त्यांचं तिच्यावर. त्यांनी तिचा विश्वास सार्थ ठरवला.
ते सावकाश चालत तिच्यापाशी आले. तिला आणि गुलाला त्यांनी जवळ घेतलं. म्हणाले, ‘‘मला माहिती नसलं, तरी माझी मुलगी वावगी निवड करणार नाही. गुला हाच तिला शोभणारा वर आहे.’’

आता ते रागवलेलं गाव एका क्षणात आनंदून गेलं आणि त्यांचं अभिनंदन करायला लागलं, कारण ती विघ्नसंतोषी मंडळी मुळी तोपर्यंत तिथे पोचलेलीच नव्हती…
मग गावात मोठा उत्सव झाला. मेजवान्या, नाच-गाणी काही, विचारायलाच नको…
आता तुम्ही त्या गावात कधी पोचलात, तर तुम्हाला सुंदर अंगणांच्या दोन घरांबद्दल सांगतील. यथावकाश हुरैना अधिकाधिक सुंदर झाली आणि तिच्या अंगणात खेळणारे ते तिचे चार बछडे रूपानं आणि गुणांनीही त्या दोघांसारखेच…
आता तुम्हीही जर रिकामटेकडे असाल, तर त्यापैकी कोणतं अंगण अधिक सुंदर, की ती बागडणारी मुलं अधिक सुंदर, याबद्दल चर्चा करत राहाल…
(युक्रेनिअन लोककथेवर आधारित)

– मंजूषा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.