Now Reading
हुरहुर

हुरहुर

Menaka Prakashan

ती जन्माला आली तीच भाग्यरेखा माथी घेऊन. मा-पपांसारख्या सुबुद्ध, सुसंस्कृत आणि जणू केवळ तिच्यासाठी समर्पित असलेल्या घरात तिनं जन्म घेतला होता. पपा सीए होते आणि त्या मध्यम आकाराच्या शहरात बर्‍यापैकी मान, प्रतिष्ठा यश कमावून होते. धंद्यात बर्‍यापैकी जम बसलेला. पैसा गडगंज नसला, तरी त्यांच्या सार्‍या हौशीमौजी पुरवूनही बर्‍यापैकी गाठीला उरणारा होता. कुशाग्र बुद्धी, व्यवहारचातुर्य, जिव्हाळ्याची माणसं गोळा करण्याची अंगभूत कला… यशस्वी जीवनाला आणखीन काय लागतं? त्यात बायको-पोरीवर जिवापाड प्रेम…

मा देखील सोशल सर्कलमध्ये खूप आदरार्थी आपुलकीचं नाव कमावून होत्या. पोरगीही जसजशी मोठी होत चालली होती, तसतशी मा-पपांची मान उंचावत चालली होती. दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांची घरी ये-जा होती.

अशा सर्व बाजूंनी ठीकठाक जात असलेल्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट खटकणारी होती. म्हटलं तर छोटी, म्हटलं तर भुवई उंचावणारी. त्या शहरात एक सुसज्ज, अद्ययावत साधनसामग्री असलेलं, विश्वसनीय नाव कमावलेलं, मेडिकल शिक्षणाची सोय असलेलं, अव्वल युनिव्हर्सिटीला संलग्न असलेलं हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलच्या वार्‍याला ही पोरगी उभी राहत नसे. आत्ताच नव्हे, तर अगदी छोटी असल्यापासून रेवा त्या हॉस्पिटलच्या परिघातही फिरताना मा-पपांना नको जीव करायची. अगोदर तर यांच्या ते नीटसं लक्षातही आलं नव्हतं, पण एकदा रस्त्याच्या या फुटपाथवर बेंबीच्या देठापासून आक्रंदत असलेली रेवा समोरच्या दुकानातून पाणी आणायला म्हणून हे लोक गेले, तशी रस्ता क्रॉस केल्याबरोब्बर थांबली, आणि याची पुनरावृत्ती दोन-तीन वेळा झाली, तेव्हा यांना शंका आली. आणि जसजशी ती मोठी होत गेली, आणि व्हॅक्सिनेशन नेहमीचे डोस वगैरे घ्यायला गेले असताना तिनं जो काही पायरी चढल्याबरोब्बर धुमाकूळ घातला, त्यानंतर खात्रीच पटली. तरीही जबरदस्तीनं आत नेलं, तशी ती जी लालबुंद झाली आणि श्वास रोखती झाली, तशी पपांच्यातल्या बापाच्या हृदयानं कमावलेली सारी ओळखदेख वापरत त्या सार्‍या व्हॅक्सिनेशनची वगैरे सोय फॅमिली डॉक्टरच्या डिस्पेन्सरीत करवून घेतली.
तिचा हा हॉस्पिटल फोबिया नातेवाईक, फ्रेंड सर्कलमध्ये बर्‍यापैकी पसरला होता. बरं, ही हॉस्पिटललाच घाबरते म्हणावं, तर एकदा इंदूरहून मामाचा फोन आला, आजोबांना हॉस्पिटलमध्ये हलवलंय म्हणून तशी ही दोघं लगबगीनं तिथे धावली. बरोबर रेवा होतीच. कार सुरू झाली आणि सहज स्वरात रेवानं विचारलं,
‘‘कधी पोचणार आपण आजोबांकडे?’’
‘‘दुपार होईल गं, आपण मधेच जेवू आणि मग संध्याकाळी मी अन् पपा आजोबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ… चालेल?’’
‘‘मी पण येते ना आजोबांना भेटायला.’’
दोघंही दचकून वळले.
‘‘ठीक आहे. आजोबांना विश्राम हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. जवळ आहे हॉस्पिटल मामाच्या घरापासून, तिथे जायचं ना मग?’’ तिच्याकडे एकटक पाहत पपांनी विचारलं.
‘‘हो, चालेल.’’ अगदी शांतपणे बाहेर पाहत रेवा उद्गारली. ‘‘आपण जाताना केळी आणि ताडगोळे घेऊन जाऊया… आजोबांना आवडतात.’’
‘‘केळी नेऊ. ताडगोळे या सीझनमध्ये मिळत नाहीत बेटा.’’
‘‘ठीक आहे.’’

आपापल्या सीटवर वळताना दोघांनी एकमेकांकडे नवलपूर्ण कटाक्ष टाकले.
त्या दिवशी ती मजेत हॉस्पिटलमध्ये गेली. त्या दिवशीच नव्हे, तर नंतरचे सलग तीन दिवस ती आरामात जात राहिली.
तिच्याबरोबर आलेली व्यक्ती कुठे डॉक्टरकडे वा पेपर वर्कसाठी इकडे तिकडे गेली, तर ती आजोबांच्या शेजारी बसून राहायची आणि ती असताना नर्सेसनी येऊन सलाईनमधून इंजेक्शन्स दिली, बीपी वगैरे चेक केलं, तर तेही एकटक कुतूहलानं पाहत राहायची.
मा-पपा हैराण, मामा-मामीही चकित.
‘‘गेली असेल अगं भीती, पोर मोठी झालीये आता.’’ पपांची आई मा-पपांना समजावत म्हणाली.
साशंक मनानंच त्या दोघांनी मान डोलवली. तिच्या या हॉस्पिटल फोबियाबद्दल त्यांच्या वर्तुळातल्या काहींचं मत ‘हूँ! नसते लाड आहेत नुसते, दुसरं काहीही नाही. त्यांच्या जागी मी असते, तर फरफटवत नेली असती. मोठी झाल्यावर येत नाही म्हणजे काय? आमची मुलं काय आनंदात नाचत जातात काय ट्रीटमेंट घ्यायला? मुलांना धाकदपडशाही करावीच लागते. सगळ्यांना थोडीच जमणार आहे घरी सारी ट्रीटमेंट करवून घ्यायला,’ असंही होतं.
चुकीचं थोडीच म्हणता येणार? फक्त ज्या लोकांनी एरवीच्या शांत, समंजस गोड पोरीच्या अंगात वेळोवेळी संचारलेली त्या हॉस्पिटलच्या दारातली हबकवून टाकणारी महाकाली प्रत्यक्ष पाहिली होती, त्यांनाच त्यातल्या वैचित्र्याची कल्पना यावी.
आजोळघरी असलेला हा ‘हॉस्पिटल फ्रेंडलीनेस’ सर्वांना वाटला, तसाच घरी पोचल्यावर लुप्त झाला होता.
‘‘रेवा, शेजारच्या शेरीलआंटीकडे बाळ आलंय, माहीत आहे ना? जाऊयाना तिला आणि बाळाला भेटायला हॉस्पिटलमध्ये. तुला खूप आवडलं होतं ना बाळ फोटोमधलं?’’
‘‘उंम, मी घरी आल्यावर पाहीन.’’
‘‘अगं, खूप दिवसांनी येणार आंटी घरी.’’
‘‘नाही. दीदी सांगत होती, परवाच येणार आहे आंटी घरी.’’
‘‘अगं, पण तू चल ना माझ्याबरोबर आज. आज काय करणार तू दुपारी.’’
एव्हाना माचा आणि माबरोबरीनं रेवाचा आवाज चिडीला आला होता, अंग कडक…
‘‘नाही, मी घरी थांबणार मा!’’ उजव्या हाताची तर्जनी वर करत ओठांचा चंबू करत बाहेर चालती होत रेवा… जणू ‘बस ममी आता’ असा चढेल स्वर. लाल चेहरा.
संतापत तिच्या पाठी चाललेल्या माला पपांनी थांबवलं.
‘‘काय हे खूळ?’’
मा करवादली. ‘‘खरंच, आता काय लहान आहे का ही? खरंच लाडावलीये का रे आपण हिला? इतकं काय अगदी आणि गेली होती ना तिकडे आजोबांना भेटायला चार-पाच वेळा. इथेच काय धाड भरते मग हिला?’’
पपांची एकटक तीक्ष्ण विचारमग्न नजर बाहेर रेवा खेळताना दिसत होती तिच्यावर…
‘‘एरव्ही कधी कसला असा विचित्र हट्ट धरते का ती?’’
‘‘अरे, पण म्हणून?’’
‘‘असूदे… हॉस्पिटलमध्ये नाही गेली, तर बिघडलं कुठे?’’ आणि वर हसत, ‘‘नाहीच केलं पुढे मेडिकल, तर करेल ना सीए किंवा एमबीए, काहीही… माझ्या व्यवसायात येईल. काय प्रॉब्लेम आहे?’’
‘‘अहो, विषय काय, नेताय कुठे? अजून तिसरीत नाहीये ती… आणि तुम्ही पोचले सीए, एमबीएपर्यंत…’’
पण बोलता बोलता मा सुद्धा शांत झाली. सुस्कारत आपल्या कामाकडे वळली. ओठांवर किंचित उमलतं हसू…
जाऊदे… पोर एरवी खरंच गुणांची होती. गोड, समंजस, चटकन दुसर्‍याला आपलंसं करणारी आणि बुद्धीनं तेज.

गंमत म्हणजे पोरगी खरंच सायन्सला गेली. आणि गेली ती अगदी ठामपणे. जणू तिच्यासाठी दुसरा काही पर्यायच नसावा अशी. तीही जसजशी मोठी होत होती, तसतसं तिच्याही लक्षात स्वतःतला त्या एका विशिष्ट हॉस्पिटलविषयी असलेला विचित्र आकस आणि त्यातलं आगळंपण आलं होतंच. बरं, त्याला आकस तरी कसं म्हणावं? त्या हॉस्पिटलच्या परिघात आलं, की ती द्वंद्वातच असायची. आतून तिला तिकडे काहीतरी खेचत आहे आणि त्याचवेळी आत्ता तिकडे अजिबात जाऊ नये, असं निक्षून बजावणारा आतला आवाज. ती घुसमटून जायची. सायन्स निवडतानाही तिला उगीचच ते हॉस्पिटल आठवलं होतं. कारण काहीच नाही. उगीच, पण ती बोलली नव्हती. पपांकडेही. त्या हॉस्पिटलसंदर्भात आपण काहीही बोलूच नये. काहीही बोललो, किंवा वागलो, तर मा-पपांना त्रास होतो, हे तिला चिमुरड्या वयातच कळून चुकलेलं.
बरं, हे हॉस्पिटलही तिला कुठल्यातरी अनपेक्षित क्षणी अचानक आठवे. काही हास नाही की भास नाही, संदर्भाशिवाय, संबंध नसताना. शिळा बनलेल्या अहल्येचा रामाच्या पदस्पर्शानं उद्धार झाला, ही गोष्ट पहिल्यांदा ऐकली आणि असंच ते हॉस्पिटल आठवलं. का माहीत नाही, पण अगदी प्रकर्षानं. मान झटकून तिनं मग तो विषयच मनावेगळा केला होता.
‘‘नक्की का बेटा? कॉमर्स घेतलंस, तर मी आहे काही अडलं तर, आणि पुढे जाऊन मला जॉईन करू शकशील बघ.’’
नाकाचा शेंडा थोडा उडवून तिनं डोळे बारीक केले, एकच क्षण… पण मग लगेच
‘‘ना पपा, नो… सायन्सच!’’
‘‘ओके, तुझी मर्जी…’’ तिनं मान डोलवली. पपांच्या बोलण्यातली किंचित नाराजी तिच्यापर्यंत पोचलीच नाही.

पण पोर हुशार खरीच, बारावीला पोचेपर्यंत ती अशी काही तयार होत गेली होती, की खरोखरच तिनं कुठला कोर्स निवडावा, हा केवळ तिचा चॉईस राहिला होता, तिच्या मार्कं मिळवण्याच्या क्षमतेचा नाही. ती वादातीत. आतापर्यंतच्या एकंदरीत अनुभवावरून मा-पपा आणि सारेच इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर आणि फार्मसी वगैरेची चौकशी करायला लागले होते. पण पुन्हा एकदा सार्‍यांना अचंब्यात टाकून तिनं मेडिकल निवडलं.
पपा-मा स्तिमित होते. परिसरात सर्वात चांगल्या शिक्षणाची सोय असलेलं कॉलेज तर त्या हॉस्पिटलशी निगडित होतं.
…मग आता? …जाणार ती तिथे, त्या हॉस्पिटलमध्ये?
घरात आणि परिवारात ते दिवस अत्यंत खळबळीचे, धुमश्चक्रीचे गेले. म्हणजे खळबळ बाकीच्यांची, वादविवादाची झाडाझडतीही बाकीच्यांचीच, मा-पपा आणि इतर परिवार.
कारण हिचा निश्चय ठाम, निर्णय तिच्यासाठी वादातीत. तिला मेडिसिनलाच जायचं होतं. पण त्या कॉलेजला पर्यायानं त्या हॉस्पिटलमध्ये नव्हे, नव्हेच… तर जवळ जवळ दीडशे किलोमीटर दूर असलेल्या या कॉलेजच्या स्टँडर्डच्याच, तशा आणि जवळपास तेवढ्याच सोयीसुविधा असलेल्या हॉस्पिटल संलग्नित त्याच युनिव्हर्सिटीच्या दुसर्‍या कॉलेजमध्ये. आणि तेही मा-पपांसह.
नेहमीचे अविचल पपाही त्या काळात विक्षोभित झाले होते. इतक्या वर्षांचं सारं बस्तान गुंडाळून दुसरीकडे जायचं? गंमत म्हणजे त्या तिघांच्याही मनात तिला मेडिकलला जायचं असेल, तर त्या कॉलेजला, किंवा पर्यायानं त्या हॉस्पिटलला न जाण्यातल्या अपरिहार्यतेबद्दल तिळमात्र शंका नव्हती. आणि याचंच आश्चर्य बाकीच्यांना. अशा वेळी कुणी समजावू लागलं, की रेवा समोर एक शब्द तोंडातून न येऊ देता लाकडासारखी ताठ होऊन उभी राहायची. समोरच्याचं बोलणं संपेस्तोवर. हताश भोवताल मग तिच्या आडमुठेपणापुढे शरणागत…
पण तेही आता अंगवळणी पडलेलं. पपांना एवढं सगळं बाड गुंडाळून दुसरीकडे प्रस्थापित होण्याच्या टेन्शनबरोबरच लेकीला आडमुठेपणाचा शिक्का लागतोय, याचीही चिंता होती. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून एकदा तिला समजावण्यासाठी त्यांनी तो विषय निर्वाणीचा म्हणून छेडला, मात्र समोरच्या ताठ होण्याच्या प्रयत्नात कसंबसं उभं राहिलेलं थरथरणारं कोकरू दिसलं, तशी पपांनी त्या कोकराला मिठीत घेतलं आणि आवरासावर सुरू केली.

नवीन शहरात परत बस्तान बसवणं वाटलं त्यापेक्षा खरंच सोपं गेलं. एकतर या डिजिटल जमान्यात पपांचं कौशल्य आणि विश्वासार्हता याची ख्याती तिथेही पोचली होतीच. ते आणि सर्वाना आपलंसं करणारा स्वभाव यामुळे परत थोड्याच दिवसांत घर नांदतं झालं. मा आणि रेवा आपापल्या विश्वात रमून गेल्या.
पाहता पाहता वर्षं निघून गेली. रेवा एमबीबीएस झाली, इंटर्नशिप पार पडली आणि पाठोपाठ एमडी. आतापावेतो मा-पपांच्या पावलावर पाऊल टाकत रेवानंही आपले जिव्हाळ्याचं, अतूट स्नेहानं, आपुलकीनं बांधलेलं विश्व तयार केलं होतंच.
त्यामुळे कॉलेज संपून मित्रमैत्रिणींची दिशा पांगायची वेळ आली, तेव्हा अपरिहार्यपणे एकत्र राहण्याची धडपड सुरू झाली. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जॉब अ‍ॅप्लिकेशन्स एकत्र पोस्ट होऊ लागली. तेव्हा अधिकारानं एखादा अ‍ॅप्लिकेशन पुढे करून ‘यावर सही कर’ अशी हुकमी आज्ञा जाऊ लागली आणि नजरही न टाकता ती मैत्रीत मान्य होऊन न पाहता साईन होऊन परस्पर पोस्टही होऊ लागली.

या सगळ्याच जंजाळात जेव्हा हिच्या हाती त्या हॉस्पिटलचं जॉब ऑफर लेटर पडलं, तेव्हा खटका दाबल्यासारखी ती उडाली. त्या एका क्षणात कितीतरी गोष्टींचा, विचारांचा काला होता. आजवरचं तिचं सर्वशक्तीनिशी तिथे जायचं टाळणं, एकाच वेळी तिला तिथे खेचणारी ती अनाकलनीय ओढ, त्याच वेळी त्या ओढीला तितक्याच प्रकर्षानं विरोध करणारी आंतरिक प्रेरणा, असं बरंच काही आणि अचानक ते परस्परविरोधी द्वंद्व आठवता आठवता आतून प्रखर जाणीव झाली, की आजवरचा हा अनाकलनीय गुंता उलगडण्याची वेळ आता आली आहे… तो क्षण जवळ आला आहे… हे जॉब ऑफर लेटर, हे बोलावणं आहे. त्यासाठीच… हे असं का वाटावं, यालाही काही कारण नाहीच. पण हेच खरं.
अचानक बर्‍याच गोष्टींचा गुंता जणू सुटत होता, किंवा सुटणार होता. आत्तापर्यंत ज्या कारणासाठी ती त्या हॉस्पिटलपासून दूर पळून जात होती, तेच कारण तिला आता तिथे खेचत होतं. त्या पलायनामागची, दूरस्थ होण्यामागची जी मेख होती, तिला सामोरं जायची, भिडायची वेळ आली होती. तिचं डॉक्टरच होणं हीदेखील त्यासाठीची एक आंतरिक गरज होती.
ती शहारली. काय आहे हे? हाच तो प्रत्येक माणसाच्या अंतरंगी असणारा एक आतला न टाळता येण्याजोगा आवाज का, की ज्याचा बिनचूक निर्देश पाळल्यावर तो प्रत्येकाला हमखास चकित करणारी अचंबित करणारी अशी काही रोमांचकारी अनुभूती देतो, की जी कधीकधी जणू आयुष्य पालटवण्याची हमी ठासून देत असते? तर त्या आवाजाला ‘ओ’ देण्याची वेळ आली होती. आतापर्यंत हा आवाजच तर तिला त्या हॉस्पिटलपासून दूर ठेवत होता, तिला आसपास भटकू देत नव्हता.
ती पुन्हा एकदा शहारली. काही आगळ्यावेगळ्या अनुभूतीच्या अपेक्षेनं. जायचा विचार कधीच पक्का झाला होता, निर्धार कधीच झाला होता, पण हे मन स्थिर करणं आवश्यक होतं. एखाद्या ठिकाणी जायची ओढ असावी, पण जायची वेळ आली, की मात्र त्याआधीची धाकधूक…

या वेळेला पपांना काही सांगावंच लागलं नाही. काहीतरी कारणासाठी तिचा ड्रॉवर ओढलेल्या पपांच्या हातात ते लेटर पडलं. फोल्डरमध्ये व्यवस्थित ठेवलेलं आणि त्याला लागणारी सारी डॉक्युमेंट्स व्यवथित पिनअप केलेलं. दोन मिनिटं पपांनी डोळे बंद करून विचार केला. कारण पुढे काय करायचं, जॉईन कुठे व्हायचं या सुरू असलेल्या जोरदार चर्चेला या एक-दोन आठवड्यात अकारण लगाम लागला होता, विचारलेल्या प्रश्नांना येणारी उत्तरं अचानक तुटक आणि गुळमुळीत येऊ लागली होती. मन प्रश्नांकित होऊ लागलं होतंच. आणि तेव्हाच हे लेटर सापडलं,
पपांनी ते लेटर पुढे केलं, तेव्हा रेवा शांत होती.
‘‘जॉईन करणार आहेस?’’
‘‘हो, जावं म्हणतेय तिथे.’’
या विषयात बारीक स्पंदनंही टिपू शकणार्‍या पपांच्या ध्यानातून प्रश्नाचं उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ असं सुस्पष्ट आलं नाही, हे सुटलं नाही.
‘‘ओके. आणि…?’’
‘‘आणि?’’ रेवाचं सावध प्रश्नांकन. सुज्ञ पपांचा आश्वासक स्वर.
‘‘आणि आम्ही? आम्हीही यायची गरज आहे? हवे आहोत तिथे बरोबर?’’
तिला दहा वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. त्या वेळी धरलेला हट्टही आठवला.
‘खरंच, पण आता हवे आहेत का ते बरोबर? अ‍ॅक्चुअली नाही. नव्हती गरज.’
‘‘नाही. गरज नाही…’’ पपांची रोखलेली नजर तशीच.
‘‘‘खरंच गरज नाही पपा, खरंच नाही, पण… तुम्ही या, गरज म्हणून नाही, पण असेच हवेत बरोबर म्हणून. राहायला यायची जरूर नसावी, जास्त तयारीही नको. काही वेळासाठी, बरोबर म्हणून?’’
पपांशी बोलता बोलता स्वगत बोलत असल्यासारखी ती.
पपांच्यातला आणि तिच्यातला तो आश्वासक बंध. त्यांचं अस्तित्व आजूबाजूला असावं म्हणून केवळ.
या वेळेला कुणालाही न सांगता ती तिघं रवाना झाली. ज्या कुणी तिचा अ‍ॅप्लिकेशन स्वतःच्या बरोबर पाठवला होता, त्याचा शोधही तिनं घेतला नाही. कुणालाच न सांगता ती तिघं निघाली.
जाताना रेवा अगदी नॉर्मल होती, संयमी.
ज्या दिवशी रेवा हॉस्पिटलमध्ये जॉईन व्हायला गेली, तेव्हाही ती अशीच होती. शांत अविचल, स्थिरचित्त. आणि निर्धारित. इतक्या वर्षांची प्रक्षुब्धता पूर्णपणे निमाली होती.

हातातले पेपर्स तिनं काऊंटरवर दिले. जॉईन होण्यासाठीच्या फॉरमॅलिटीसाठी, पण त्या दिवशी नेमके तिला जॉईन करून घेणारे मेडिकल ऑफिसर आले नव्हते. डीनही बाहेरगावी होते, तिचं जॉइनिंग त्या दिवशी होऊच शकत नव्हतं… आतल्या आवाजानं पुन्हा आश्वस्त केलं. बरोबर. हे असंच असायला हवं होतं, ती जॉईन होण्यासाठी आली नव्हतीच. आणि आज ती पूर्णपणे तिच्या त्या आतल्या आवाजावर निःशंक निष्ठा ठेवून होती. काही दिवसांच्या बाळानं मातापित्यावर निःशंक अवलंबून राहावं तशी… आज तिला तिची अंतःप्रेरणा दगा देणार नव्हतीच. अगदी शंभर टक्के. तिचीच मागणी पूर्ण करायला तर ती तिथे आली होती पूर्ण तयारीनं, निर्धारानं तिच्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून.
त्या दिवशी हॉस्पिटलमधल्या हेड नर्सची नजर तिच्यावर गेली आणि खिळली. त्या वयातल्या तिच्यातला तो स्थिरचित्त प्रशांत डौल तिला मंत्रमुग्ध करून गेला.
‘‘काय प्रॉब्लेम आहे? कॅन आय हेल्प?’’
रेवा वळली.
‘‘मी आज जॉईन व्हायला आले, पण डॉ. पारीख आणि डॉ. लेले नसल्यामुळे आज होऊ शकत नाहीये.’’
‘ओह!’’ प्रसन्न हसत, हात पुढे करत हेड नर्स उद्गारली,
‘‘रजनी हियर. मी हेड नर्स आहे इथे.’’
मुक्त हसत रेवानं हात हातात घेतला.
‘‘ओह! मी रेवा, रेवा ठाकूर…’’
‘‘या क्षणी मी मोकळी आहे काही वेळासाठी. जॉईन होण्याआधी हॉस्पिटल बघायचंय? आय कॅन शो यू अराऊंड.’’
‘व्वा, आवडेल मला…’’
‘‘कुठून आलात डॉक्टर तुम्ही?’’
चटकन मराठीवर येत रजनी वळली. तिच्याबरोबर रेवाही.
रजनी हेड नर्स खरीच, पण इतकी वर्षं या फिल्डमध्ये राहून ती माणसंही उत्कृष्टपणे वाचू लागली होती. मानवी मन, त्यांची स्पंदनं, त्यातला विरोधाभास, एकाच वेळी त्याग आणि स्वार्थ अशा दोन टोकाच्या प्रवृत्ती… यांचा अभ्यास करायचा असेल, तर खरंच हॉस्पिटलपेक्षा दुसरी चांगली जागा नाही.
डिपार्टमेंट्समागून डिपार्टमेंट्स पाठी जात होते. रेवा संभाषणात पूर्णपणे भाग घेत होती, पण तिची सजग चेतना कानोसा घेत होती. इथेच कुठेतरी तो क्षण तिची वाट पाहत होता. इथेच कुठेतरी तिला पोचायचं होतं.

गायनॅक डिपार्टमेंट पाठी पडलं आणि त्या एकसारख्या दिसणार्‍या पॅसेजमधून रजनी बोलत उजवीकडे वळली आणि रेवानं तिचा खांदा घट्ट दाबत तिला थांबवलं. डावीकडे निर्देश करत ती उद्गारली,
‘‘तिथे काय आहे?’’
आणि उत्तर येण्याआधी झपाझप चालूही पडली. गोंधळलेल्या रजनीनं तिला गाठेपर्यंत रेवानं अर्धा पॅसेज पार केला होता.
‘‘इथे? इथे फक्त व्हेंटिलेटर सेक्शन आहे.’’
‘‘ओह! व्हेंटिलेटर? किती पेशंट्स असतात नॉर्मली आत?’’ बोलता बोलता रेवानं दार ढकललं, तर ते अडकलं. आतमधून टेक्निशिअन्सचा ड्रेस चढवलेले दोन युवक बाहेर डोकावले.
‘‘पाचच मिनिटं प्लीज. मशीनची दुरुस्ती सुरू आहे.’’ त्यांनी रजनीला सांगितलं.
‘‘ओह! इट्स ओके, वि विल वेट.’’ रजनीऐवजी रेवा.
दोघी बाहेर थांबल्या.
‘‘ऑफ कोर्स तसं काही फिक्स नसतं, पण सर्वसाधारणपणे चार-पाच असतात. कधी तरी आठदहा पण.’’
‘‘ऑफ कोर्स. आणि सगळ्यात जुना पेशंट किती काळापासून आहे?’’ रेवा.
या प्रश्नावर रजनीच्या ओठांवर सूक्ष्म स्मित. जणू रेवाची प्रतिक्रिया काय असेल, याची पूर्ण कल्पना असल्यागत.
‘‘तीस वर्षं.’’ तीस शब्दांवर अपरिहार्य जोर.
‘‘काऽऽऽय?’’ अनाहूतपणे रेवा. ‘‘तीस वर्षं? पण कसं?’’
रजनीला त्या हॉस्पिटलमध्ये हल्लीच पस्तीस वर्षं पूर्ण झाली होती. पुढच्या वर्षी तिची निवृत्ती होती.

‘‘हुं!’’ निःश्वास सोडत ती उद्गारली, ‘‘हा एक पेचच आहे या ठिकाणी. ही पेशंट इथे आली, तेव्हा क्रिटिकलच होती. व्हेंटिलेटरवर चढवायचं, नाही चढवायचं, या द्वंद्वात ती व्हेंटिलेटरवर चढली. तेव्हा नुकताच एक निवाडा आला होता कुठल्यातरी केसमध्ये कोर्टाचा, की नातेवाइकांनी परवानगी दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवरचा पेशंट काढायचा नाही म्हणून. त्यात ही व्हेंटिलेटरवर चढली. उम्मीद काही नव्हतीच, तरी मातृभक्त मुलानं तिला उतरवायला नकार दिला. आजूबाजूच्या नातेवाइकांनी, गोतावळ्यानं बिचकत का होईना, चार समजुतीचे शब्द सांगायचा प्रयत्न केला. त्यात कधी या बाजूनं, तर कधी त्या बाजूनं अशी दोलायमान स्थिती झालेल्या मुलानं कधीतरी कंटाळून घट्ट निर्णय घेऊन टाकला. ‘मला शक्य नाही अपराधीपणाच्या जाणिवेबरोबर जगणं… जोपर्यंत मी आहे तोपर्यंत, किंवा त्याअगोदर ती बरी झाली तर तोपर्यंत, आता हे असंच सुरू राहणार. हळूहळू कश्मकशची जागा ‘मी मरेपर्यंत…’ या काहीशा उद्धट रूक्ष उत्तरानं घेतली. बरं, त्यात वृद्धाश्रमांची संख्या अपरिमित वाढण्याच्या आणि तरीही ती अपुरी पडण्याच्या काळात याचं वर्तन गौरवलं जाऊ लागलं. एक लोकल वृत्तपत्र मग दुसरं अशा काही ठिकाणी ही बातमीही छापून आली. मग तर मानसिक दबावाबरोबर हा गौरवांकित सामाजिक प्रतिष्ठेचा दबावही नडू लागला, तसे फेरविचाराचे सारे दरवाजे आपोआपच बंद झाले. परतीचे दोर अगदीच अधू झाले. वर्षांमागून वर्षं गेली. बघाल ना डॉक्टर, तर सारं काही आहे. यश, पैसे, समृद्धी सारं काही. म्हणून तर इतकी वर्षं हे हॉस्पिटलायझेशन झेपू शकलं. पण घर, माणसं कशी आक्रसलेली. एक घट्ट तणाव सार्‍यांना करकचून बांधून घेणारा. आता तर कुणी बोलतच नाही यावर. मॅनेजमेंट गप्प, त्यांच्यापैकी काहींचे दृढ संबंध यांच्याशी. बरं, आदरही आहेच ना भरपूर. मग तर काय, आता दोन-तीन वर्षांपूर्वी तो मुलगाही गेला. तेव्हा एकदा परत फेरविचाराचा प्रयत्न झाला. पण आता नातूही वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून. उदात्ततेचीही एक नशा असते डॉक्टर. आणि नशा म्हटलं, की सारासार बुद्धी गायब. त्यांचं सारं व्यवस्थित सुरू आहे. नातवाचा एक पाय भारतात, एक बाहेर. पण भारतात असला, की महिन्यातून दोन फेर्‍या असतात इथे. जवळपास असला, की आठवड्याला एक. जगभर भरारी मारणारी माणसं, पण तरीही कुठेतरी बांधून घेतलेली, मोकळा श्वास विसरलेलीच आयुष्यं सारी. पूर्वी असे व्हेंटिलेटरवर पेशंट्स जास्त काळ राहूच शकत नव्हते, तेच बरं होतं. काही वेळा सायन्सची प्रगतीही नकोशी वाटू लागते.’’

रेवाचा श्वास रोधलेला… केव्हाचाच. इतक्यात दरवाजा उघडला. टेक्निशिअन्स बाहेर आले. आणि दार लोटून रेवा आत गेली, ती पेशंटच्या कॉट्सच्या मधून रास्ता काढत बरोब्बर त्या पेशंटच्या खोलीत अचूक पोचली. कुणीही न सांगता. रजनी धडपडत पाठी.
दरवाजा उघडला…
आत ती होती. बिछान्यात रुतलेली, चिपाड शरीरात असंख्य नळ्या आणि त्या पेशंटकडे पाहताना, किंवा त्याआधीच कधीतरी रजनी बोलत असताना, किंवा दरवाजा उघडतानाच कधीतरी रेवाला झणत्कार झाल्यासारखा साक्षात्कार झाला होता…
ही तीच. गतजन्मीची… किंवा नेमके शब्द वापरायचे, तर हे तिचंच शरीर, गेल्या जन्मीचं.
रेवाला क्षणभर आपल्याला काय होतंय, हे कळलंच नाही. अचानक श्वास गच्च पकडला गेला, छाती कोंडलेली, शरीराच्या जणू सार्‍या नसा एकदम आखडलेल्या, शरीर एकाच वेळी शुष्क आणि थंड, आत लाव्हा उकळत असल्यासारखी उष्णता आणि बाहेर दरदरून घाम… डोळे ओढलेले, डोकं गच्च… बाजूचं टेबल आधारासाठी गच्च पकडलेलं… इतकी वर्षं का इथे यावंसं वाटत नव्हतं आणि काय इथे नक्की खेचत होतं, याचा क्षणात उलगडा झाला.
आतापर्यंत तिला पुनर्जन्माची थिअरी नक्कीच माहीत होती. काही छोट्यांना आपल्या गतजन्मीच्या गोष्टी आठवल्याच्या कहाण्याही तिनं पाहिल्या, वाचल्या होत्या. त्याचा अचंबाही वाटला होता, पण अशा अनेक गोष्टी आपण मनावेगळ्या करतो, तशा त्याही तिनं केल्या. काय संबंध तिचा? …तरी तिला एकदा अशी युट्युब पाहताना उगीचच हे हॉस्पिटल आठवलं होतं. उगीचच कारण नसताना.

पण ही तीच. हे त्रिकालाबाधित सत्य… आणि गंमत म्हणजे तिला अजूनही तिचा पुनर्जन्म आठवत नव्हताच. म्हणजे एवढं निश्चित होतं, की हे तिचंच शरीर… गेल्या जन्मीचं… हे इतकं आणि असं वादातीत सत्य की जितकं आणि जसं समोरच्या आरशातलं शरीर हे या जन्मातलं तिचं शरीर, तेवढं आणि तितकंच सत्य, हे समोचं निश्चल शरीर तिचं गतजन्मीचं… पण बस… बाकी तिला आठवत काहीच नव्हतं. म्हणजे हेड नर्सनं सांगितल्यावरही तिचा मुलगा, नातू किंवा इतर कुणी, तिचं आयुष्य, अगदी त्या हॉस्पिटलमधला तिचा शेवटचा श्वास… काहीही नाही. त्या अव्याहत वाहणार्‍या काळानं कालगर्भाच्या करार काळ्या अवकाशाच्या आत केवळ हिच्या अंतःदृष्टीसाठी टाकलेला तो एक जणू प्रखर प्रकाशझोत. तिच्या अंतःचक्षूच्या खात्रीसाठी… काळाचा पडदा थोडा उचललेला, केवळ हिच्या तेवढ्याच नेणिवेसाठी…
की हे तिचंच शरीर, गतजन्मीचं.
गतजन्मीची फक्त तेवढीच मर्मदृष्टी. मर्मदृष्टीच्या दृष्टीचा आरंभ आणि सीमा तेवढीच आणि तितकीच… पुढे मागे परत सारा काळाचा गूढगर्द गाढ पडदा.
ती अशी रोबोटसारखी खिळलेली, रजनीची सराईत नजर खोलीभर भिरभिरती… सारं काही व्यवस्थित सुरू आहे ना?
त्या दोघी अशा स्वतःतच व्यग्र असतानाच खोलीचा दरवाजा उघडला. एक पन्नाशीची आहे हे सांगून खरं न वाटणारी रुबाबदार सुदृढ व्यक्ती आत आली.
रेवा वळली. हा तिचा नातू हे रेवाला कुणी सांगण्याची आवश्यकता नव्हतीच. तो आता इथे यायलाच हवा होता. त्या क्षणालाच क्षण भिडला होता.
आतमध्ये येताक्षणीच त्याची नजर रेवावर गेली आणि खिळली. अचानक त्याच्या सार्‍या चित्तवृत्ती जागृत झाल्या होत्या. अंगावर एक अनामिक शहारा. केसांपासून पायापर्यंत.
‘कोण ही? एकाच वेळी खंबीर खमकी तरीही विकल, कुठल्याही क्षणी चुरडली जाऊ शकेल अशी कोमल वाटणारी? एकदम इतकी आपलीशी वाटणारी काया अपार मायेनं ओतप्रोत भरलेली?’
बारा गावचं पाणी प्यायलेल्या त्याच्या चाणाक्ष नजरेतून तिची विद्ध अवस्था सुटली नव्हती, तरीही तिच्या भोवतीचं ते आश्वस्त आधार देऊ पाहणारं वलय… तो भांबावला.
आणि काहीही हासभास नसताना रेवाचा खोल शांत स्वरातला प्रश्न सणसणत गेला…
‘‘काय आहे हे? आणि किती दिवस अजून हे असं सुरू राहणार?’’ हातानं निर्देश अर्थात कॉटवरच्या तिच्याकडे, परखड रोख गंभीर स्वरात प्रगाढ समजूत होती, अपार माया आणि त्याच्या निर्णयामागच्या मनःस्थितीबद्दलची उमजही.
हे सारं त्याच्यापर्यंत पोचलंही आणि नाहीही…
तो भांबावला, एकतर हा प्रश्न बर्‍याच काळानं कुणी विचारला होता. विचारत होतं… प्रश्नासाठी तो तयार नव्हताच. अजाणत्या अनवधानानं त्याच्या तोंडून नेमकं त्याच्या वडलांचं करारी उत्तर गेलं, त्याच अविर्भावात, त्याच बेपर्वा रूक्ष औद्धत्त्यात
‘‘मी मरेपर्यंत.’’
पण… पण त्या एवढ्या छोट्या वाक्याच्या सुरुवातीचा जोश, ठसका शेवटपर्यंत टिकलाच नाही.
आवाजातली प्रक्षुब्धता तिच्याकडे पाहता पाहता निवत गेली.
त्या क्षणी समोर पंचविशीची तरुणी नव्हतीच. स्वर, आवाज व्यक्तित्वातली ही गाढ उमज ही इतक्या छोट्या वयातली नव्हेच. हिच्याशी असं आपण बोलूच शकत नाही. कोण ही?
त्याचक्षणी ती पुढे झाली. टेबलाला स्वतःच्या आधारासाठी गच्च पकडलेला हात त्याच्या हातावर हळुवार पडला… फुलावर फुलपाखरू बसावं तसा, पण पूर्ण अधिकारानं… त्याच्या सार्‍या चित्तवृत्ती शांतवणारा प्रशांत स्पर्श.
‘‘जाऊदे हे… सोडा आता, काही राहिलं नाही आहे आत… नुसतं शरीर आहे. बस…’’

स्वतःला काय होतंय त्याला क्षणभर कळलंच नाही. इतक्या वर्षांचं मणामणांचं ओझं कुणा कोवळ्या हातांनी जणू अलवार काढून घेतलं होतं. तिथल्या दुखर्‍या जागी शांतवणारी फुंकरही एकाच वेळी पडत होती, इतक्या वर्षांची कोंडी फुटत होती… आणि हे सारं कुणी दुसरंच स्वतःच्या अधिकारात करत होतं, त्याला निवडीचं, त्या निवडीच्या जबाबदारीचं ओझं ना देता… त्याच्यासाठी.
शक्तिपात झाल्यासारखा तो उभा कोसळला. तिचा हात दोन्ही हातांत गच्च पकडत त्यात आपलं मस्तक घुसवून तो हमसाहमशी रडला… पूर्ण शरीर गदगदत होतं, बेकाबु थरथरत होतं… पण तोंडातून आवाज फुटत नव्हता. मोठ्या कष्टानं तिनं दुसरा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. गळू फुटत होतं… जखम वाहत होती… आतून तीही हलली होती… स्वतःच्याच हातातली मृदू मुलायम ऊर्जा तिला जाणवत होती. तीही श्रांत क्लांत होत होती, एकाच वेळी थकलेली आणि अतीव समाधानानं पुनर्जीवित होत चाललेली…
रजनी स्तब्ध. चकित. असा किती काळ गेला कुणालाच कळलं नाही… गोठलेला, वितळत वाहत जाणारा काळ.
एका विवक्षित क्षणी तिनं त्याच्या डोक्यावरचा हात हळुवार काढला आणि व्हेंटिलेटर ऑफ केला…
पूर्ण शांतता पसरली. जणू काळानं सुस्कारा सोडल्यासारखी. अनेक पातळीवरच्या सृजनाची बीजं सामावलेली. आवाज फक्त त्याच्या दबलेल्या आणि निवांत होत चालेल्या उसाशांचा आणि रजनीच्या रोखलेल्या श्वासोच्छ्वासाचा…
रेवा स्तब्ध शांतचित्त उभी होती. त्यानं हळूहळू तिचा हात सोडायला सुरुवात केली तशी तिनं नवजात बालकाच्या जावळावर आईच्या मायेनं हळुवार हात फिरवावा तसा त्याच्या केसांवरून हात फिरवला.
हळूहळू सावरलेल्या रजनीनं वॉर्डबॉयला रजिस्टर आणायच्या, कन्सर्न डॉक्टरना बोलवायच्या सूचना द्यायला सुरुवात केली, तशी रेवा वळली.
‘‘मी गेल्यावर प्लीज…’’
रजनी थांबली. त्या क्षणी रेवाची कोणतीही आज्ञा मान्य केली असती तिनं.
त्यांच्यापैकी कुणाचीही कुठलीच माहिती तिला अवगत करून घ्यायची नव्हती. काळाचती जन्माला आली तीच भाग्यरेखा माथी घेऊन. मा-पपांसारख्या सुबुद्ध, सुसंस्कृत आणि जणू केवळ तिच्यासाठी समर्पित असलेल्या घरात तिनं जन्म घेतला होता. पपा सीए होते आणि त्या मध्यम आकाराच्या शहरात बर्‍यापैकी मान, प्रतिष्ठा यश कमावून होते. धंद्यात बर्‍यापैकी जम बसलेला. पैसा गडगंज नसला, तरी त्यांच्या सार्‍या हौशीमौजी पुरवूनही बर्‍यापैकी गाठीला उरणारा होता. कुशाग्र बुद्धी, व्यवहारचातुर्य, जिव्हाळ्याची माणसं गोळा करण्याची अंगभूत कला… यशस्वी जीवनाला आणखीन काय लागतं? त्यात बायको-पोरीवर जिवापाड प्रेम…

त्यांच्यापैकी कुणाचीही कुठलीच माहिती तिला अवगत करून घ्यायची नव्हती. काळाचा पडदा आहे तसाच आणि तितकाच अंधारा गडद ओढून ठेवायचा होता.
हळूहळू पूर्वपदावर येत चाललेल्या त्याच्याकडे एक नजर टाकली आणि रेवा बाहेर पडली.
जन्माला आल्यापासून पूर्वजन्म मागत असलेलं देणं तिनं समर्थपणे फेडलं होतं. तृप्त झाली होती ती आणि ती मागणीही…

तशीच सरळ जाऊन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधल्या त्या मेडिकल ऑफिसरला भेटली, अजून कुठेही फॉरवर्ड न झालेलं जॉब ऑफर लेटर तिनं परत मागितलं.
त्या ऑफिसरच्या सांगण्यावरून तसं रिक्वेस्ट लेटर लिहून दिलं. त्याच्या शुभेच्छा घेतल्या आणि बाहेर पडली. श्रांत, क्लांत तरीही तुष्ट तृप्तशी ती न सांगताही तिची वाट पाहत लाऊंजमध्ये बसलेल्या मनकवड्या पपांना दिसली. ओठांवर गाढ समाधानाचं सूक्ष्म स्मित.
पपा दिसताच प्राजक्ताची फुलं उधळलेलं प्रसन्न हसू ती हसली.
‘‘चला, जाऊया… नॉट जॉइनिंग हियर. आणि नो क्वेश्चन्स प्लीज.’’
‘‘ऑफ कोर्स.’’
ती दोघं बाहेर पडली. कार एंट्रन्सवरून वळताना रेवाला तिच्यासाठीच तिथे आलेली रजनी दिसली. परत एकमेकांना कधीही न भेटणार असणार्‍या त्या दोघींनी हृदयस्थ मैत्रिणीला निरोप दिल्याप्रमाणे हात हलवला… ते सारंच विश्व हळूहळू मागे पडत गेलं…

पडदा आहे तसाच आणि तितकाच अंधारा गडद ओढून ठेवायचा होता.

– दीपलक्ष्मी परुळेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.