Now Reading
ही माझी पायवाट

ही माझी पायवाट

Menaka Prakashan
View Gallery

मीरा आजही तशीच चुपचाप बसली होती. गरगरणाऱ्या पंख्याकडे बघत. शिकवणीची मुलं येऊन गेली होती. आता दुसरी बॅच थेट संध्याकाळीच होती. नेहमीप्रमाणे अख्खी दुपार तिला खायला उठणार होती. भाड्याच्या दुसऱ्या माळ्यावरच्या या घरात दुपारी चांगलंच उकडतं. सकाळपासूनच खिडकीचा जाड पडदा ओढून ऊन आत येणार नाही, याची खबरदारी ती घेते. मात्र कोंडल्यासारखं वाटलं, की खिडक्या उघडाव्याच लागतात, तेव्हा तिचा नाईलाज होतो. चोरटं ऊन पटकन आत शिरतंच शिरतं. वर गरगरणाऱ्या पंख्याकडे तिनं परत एकदा बघितलं. त्याचाही बहुधा नाईलाज होता. आणखी थंड हवा तो कुठून आणणार?

‘एफएम’वर लताबाई होत्या.

‘सासों में तुम आते जाते
एक तुम्ही से हैं सब नाते
जीवनवन के हर पतझर में रामा
एक तुम्ही मधुमास हमारें रामा’

तिनं डोळे मिटून घेतले. उकाड्यातला हा किमान गारवा! अवघे शब्दसूर ती सर्वांगातून अंतर्मनात झिरपवत बसली. चला, आयुष्य सुसह्य करायला निदान हे तरी सोबत आहे.

मागच्या आठवड्यात ती किमान तीन ठिकाणी मुलाखतींसाठी जाऊन आली होती. मात्र अनुभव नसल्याच्या कारणावरून सगळ्यांनी लवकरच कळवू म्हणत तिची बोळवण केली होती. सगळ्यांना आयतं, रेडीमेड हवं असतं. अगदी माणसंसुद्धा. ऑफिसमध्ये कधी कामच नाही केलं, तर तो अनुभव आणायचा कुठून?

तिनं एकाएकी उठून एफएम बंद केलं. नवीन चित्रपटांतली गाणी नाही ऐकवत. नव्यानं आलेल्या शांततेत तिची पावलं किचनकडे वळली. मात्र किचनच्या दाराशी जाताच तिच्या अंगात एकदम कंटाळा दाटून आला. आता काहीच करू नये, अशी प्रबळ ऊर्मी तिच्या मनाला एकाएकी वेढून आली. ती तशीच माघारी वळली आणि परत तिनं स्वत:ला खुर्चीत झोकून दिलं.

जाग आली तेव्हा अडीच वाजले होते. तिनं कपाळावरचा घाम पुसून घेतला. आपण बसल्या बसल्या उपाशीच झोपून गेल्याचं तिला जाणवलं. पोटातून भुकेची तीव्र जाणीव एकाएकी वरपर्यंत उफाळून आली. स्वत:ला ओढतच ती किचनमध्ये गेली. घटाघटा घशात दोन ग्लास पाणी रिचवल्यावर तिला जरा बरं वाटलं. खिचडीचा कुकर आणि चहाचं आंधण तिनं एकाच वेळेस ठेवलं. खिचडी शिजेपर्यंत गॅलरीत बसून निवांतपणे चहा पिता आला असता.

संध्याकाळी मुलं आली, तोपर्यंत मनानं ती स्थिरस्थावर झाली होती. आठवीच्या मुलांची इंग्रजीची शिकवणी. ती इंग्रजी बऱ्यापैकी लिहायला आणि बोलायला शिकवते, अशी तिची आजूबाजूला ख्याती होती. सध्यातरी तेच तिच्या उत्पन्नाचं साधन होतं. सकाळ-संध्याकाळ दोन-दोन बॅचेस असल्यामुळे पुरेसे नसले, तरी थोडेफार पैसे मिळायचे.

घरच्या घरी राहून, शिकवणी घेऊन पैसे कमवायचे, हे ध्येय मात्र तिचं कधीच नव्हतं. परंतु ध्येय ठरलं म्हणून साऱ्या वाटा तिकडेच नेऊन सोडतात, असं थोडंच होतं? वाटांच्याही मनात आणखी पोटवाटा असतातच की! त्यात भटकून प्रवासाची दिशा उलट-पालट होईस्तो वाटसरूला कळतसुद्धा नाही. लाटांनी नाका-तोंडात घुसून किनाऱ्यावर फेकून दिल्यावरच नाविकाला आपल्या निग्रहाच्या तोकडेपणाची जाणीव गडद होते, तसंच हेही. तेव्हाच उमगतं, सामना निष्ठूर काळाशी आहे!

शिकवणी आटोपल्यावर ती फिरायला बाहेर पडली, तेव्हा तिला जरा बरं वाटलं. दिवसातून एकदा तरी उगाच बाहेर पडायचा तिचा शिरस्ता होता. काहीच काम नसलं तरी बाहेरची हवा, वाहनांची वर्दळ आणि माणसांची चाललेली लगबग पाहून आपण अजून माणसांत आहोत, हे मन स्वत:हून समजून घेतं, असं तिला वाटायचं.

दादा नुकतेच पॅरालिसिसनं गेले. नुकतेच म्हणजे तरी झालंय त्याला दीडएक वर्ष. त्याच्या आधीची अडीच वर्षं त्यांच्या आजारपणातली. म्हणजे जवळपास चार वर्षं नुसती घरीच गेली. त्यांच्या आजारपणात काहीच नाही करता आलं. काही नोकरी नाही, की कसला उद्योग नाही. नुसत्या शिकवणीच्या बळावर घर चालत राहिलं. कसंबसं. होतं नव्हतं ते सारं आजारपणात लागलं. जरा हातपाय हलवायला आता उसंत मिळतेय, तर आता नोकरी मिळायचे हाल.

त्यात मनाची ही अशी चलबिचल. बऱ्याचदा सुचत नाही काहीच. तासन् तास डोकं रिकामं राहतं. काहीच करावंसं वाटत नाही. शरीराचा अवजडपणा नाही, मात्र मनाचा जडपणा ठसठशीतपणे जाणवतो. डॉक्टरकडे झाल्यात चार चकरा. तोही म्हणतो, ‘बाहेर पडत चला, लोकांत मिसळा, आनंदी राहा, छोटी-मोठी कोणतीही असू देत नोकरी करा, नाहीतर नैराश्य येईल.’ इथे हवं आहे का स्वत:हून कुणाला नैराश्य? नोकरी मिळतच नाही; करणार तरी काय?

सुबोधच्या शिफारशीनं एक आलीये ऑफर. उद्या त्याचाच इंटरव्ह्यू. बघू, काय होतंय ते. सुबोध म्हणजे दिगंतचा अंकल. दिगंत शिकवणीला येतो. त्याला घ्यायला-सोडायला सुबोध येतो म्हणून त्याची ओळख जुजबी. त्यानं स्वत:हूनच म्हटलं, ‘एका ठिकाणी ऑफिस स्टॉफची गरज आहे, तुम्हाला जमेल तर बघा’ म्हणून. सुबोध बरा आहे. मोकळा आणि मदतीला तत्पर. त्याचे डोळे सुंदर आहेत मुलीसारखे. पाहत राहावंसं वाटतं त्याच्या डोळ्यांकडे.

घराच्या पायऱ्या चढताना बऱ्याच दिवसांनंतर तिला बरं वाटत राहिलं. बाहेर वेळ छान गेला होता.

बसस्टॉपवर विशेष गर्दी नव्हती. ढगाळ वातावरणामुळे हवेत उकाडाही नव्हता. मुलं-मुली शाळा-महाविद्यालयाला निघाली होती. रंगीत पाखरंच जणू. जोमात चिवचिवाट करत चाललेली. काहींचे कान मोबाईलला चिपकलेले. सगळ्याच महाविद्यालयांनी बहुधा मुलींसाठी स्लीव्हलेस टॉप आणि जिन्स युनिफार्म म्हणून आणि मुलांसाठी वेगवेगळ्या रंगाचं झुडपी जंगलासारखं वाढवलेल्या केसांचं डोकं ट्रेडमार्क म्हणून एकदाचं मान्य करून टाकलं असावं, असं तिला अचानक वाटून गेलं. आपल्याच या नोंदीची तिला गंमत वाटली. तेवढ्यात बसस्टॉपच्या अगदी समोर एक सडपातळ, बॉबकट मुलगी धावत आली आणि तिनं दुसऱ्या एका गुटगुटीत मुलीला सरळ मिठी मारली. दुसरीनंही तेवढ्याच रसरशीनं तिला मिठीत घेतलं. त्यांची मिठी मात्र लगेच सुटली नाही, तेव्हा कुठे सारेजण तिकडे बघतच राहिले. दोन मुलींची दीड-दोन मिनिटांची ती दीर्घ मिठी पाहून तिच्या बाजूच्या बाईला अगदीच राहवलं नाही.

‘रस्त्यावर हेच प्रकार बघायचे राहिले होते आता.’ ती तिच्याकडे बघून कुजबुजली. दोन्ही मुली मात्र अत्यानंदानं चिवचिवाट करत एकमेकींच्या खांद्यावर हात टाकून काहीच न घडल्यासारख्या निघून गेल्या.

बसमध्येही गर्दी नव्हती. तिच्या डोक्यात मात्र इंटरव्ह्यूच्या प्रश्नांच्या ऐवजी त्या दोन मुलींची मिठी नाचत होती. का कोण जाणे, तिला दोन्ही मुली अचानक एकदम आवडून गेल्या. त्यांच्यातला हिरवट रसरशीतपणा मनापासून भावला. कुणाची ना फिकीर ना कसली लाज. काय झालं रस्त्यात मैत्रिणीला मिठी मारली तर? दोघी किती आनंदी वाटत होत्या. कुजबुजणाऱ्या त्या कुजकट बाईचा तिनं मनातल्या मनातच धिक्कार करून टाकला.

इंटरव्ह्यू बऱ्यापैकी गेला. नेमके दोन-तीनच प्रश्न विचारले. स्वत:बद्दल ती आत्मविश्वासानं बोलली.

ती एकुलती एक. आठवीत असतानाच आई कॅन्सरनं गेली. का कुणास ठाऊक तिच्या बाबांनी दुसरं लग्न वगैरे नाहीच केलं. कंपनीतली नोकरी आणि घर यातच त्यांनी मग स्वत:ला बांधून घेतलं. तिचं खाणं-पिणं, तिची तयारी, तिचा अभ्यास यावर ते स्वत: लक्ष ठेवत. आईविना मुलीची कोणतीही आबाळ होऊ नये याची कसोशीनं खबरदारी घेत. तिची आवड-निवड लक्षात ठेवत. सकाळ-संध्याकाळ एकट्यानं फिरायला जायचा शिरस्ता मात्र ते कसोशीनं पाळत. त्या शिरस्त्यानंच त्यांचा घात केला. एके सकाळी रस्त्याच्या बाजूनं फिरताना कोणती गाडी त्यांना उडवून त्यांचा प्राण घेऊन गेली ते कळलंसुद्धा नाही. ती नुकतीच बारावी पास झाली होती तेव्हा.

गावाकडे राहणाऱ्या बाबांच्या म्हाताऱ्या वडलांना मग तिच्यासोबत राहायला यावं लागलं. त्यांनी तिला सांभाळण्याऐवजी तीच त्यांना सांभाळत कशीबशी बी.ए. झाली. मधल्या काळात त्यांच्या आजारपणामुळे तिला घरीच राहावं लागलं होतं.

तिच्या इंग्रजी बोलण्यातला प्रवाहीपणा तिथल्या मालकांना आवडलेला दिसला. तरुण, गोमटेसे मालक अगदी हुशार वाटले, पण जरा चालूपणाकडे झुकणारे. तिला ते विशेष काही भावलं नाही. रिसेप्शनिस्ट, किंवा सेक्रेटरीचं काम करायचं नाही, हे तिनं स्पष्टच सांगून टाकलं. दहा ते पाच अशा वेळेतलं सुटसुटीत ऑफिसकाम मिळाल्यास तिला शिकवण्याही सुरू ठेवता येणार होत्या. ज्या शिकवण्यांनी तिला तिच्या कठीण काळात तारलं होतं, ते काम नोकरी मिळाली म्हणून सोडून द्यायची तिची मुळीच इच्छा नव्हती. मात्र मालकांनी आणखी काही न विचारता सरळ पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून रुजू व्हायलाच सांगितलं.

ती बाहेर निघाली, तेव्हा नोकरी मिळाल्याचा आनंद कसा साजरा करायचा, हेही तिला कळेना. कुणाला सांगायचं आणि कुणाचं तोंड गोड करायचं, हा प्रश्नच होता. तरी कुठल्याशा दुकानातून तिनं पेढ्यांचा डबा घेतलाच. संध्याकाळी मुलांना आणि दिगंतला सोडायला आला, तर किमान सुबोधला तरी देता येतील.

पायऱ्या चढून घरात येताच तिनं नेहमीची तीन बटणं दाबली. एकाच वेळेस पंखा, दिवा आणि ‘एफएम’ला जीव फुटला.

‘दिन ने हाथ थामकर इधर बिठा लिया
रात ने इशारे से उधर बुला लिया
सुबह से शाम से मेरा दोस्ताना
मुसाफिर हूँ यारो’

खुर्चीवर रेंगाळत ती गुणगुणत राहिली. आता दिनक्रम बदलणार होता. घरकामाचा वेग वाढवणं जरुरी होतं. सकाळी उठून तयार होणं, स्वत:साठी टिफीन करणं, दररोज बस पकडणं, ही कामं वाढणार होती. तिच्या मनात वेळापत्रक तयार होऊ लागलं होतं. गाणं संपून बातम्या सुरू झाल्या.

‘सहा वर्षांपूर्वी अभिनेता विक्रांत यानं ‘चंद्राच्या साक्षीने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपली छेड काढली होती, असा खळबळजनक आरोप अभिनेत्री स्वरदानं आज पत्रकार परिषद घेऊन केला.’ ‘एफएम’वरच्या बातम्या नकळत कानांवर पडताच मीरा थबकली. ती अवघं लक्ष एकवटून बातम्या ऐकायला लागली.

‘तेव्हा आपली बोलायची हिंमत झाली नाही, मात्र सगळं सोडून काही काळ अमेरिकेत सत्संगात घालवल्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली पाहिजे आणि विक्रांतसारख्यांच्या विकृत वृत्तीचा चेहरा जगासामोर उघडा पाडला पाहिजे, म्हणून मी आता या प्रकरणाबद्दल बोलतेय, असं त्या म्हणाल्या. आरोप करून प्रसिद्धी मिळवायची, किंवा चित्रपट मिळवायचे, असा कोणताही हेतू माझ्या आरोपामागे नाही, कारण मला आता चित्रपट उद्योगात काम करायचीच मुळी इच्छा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.’

मीरानं पटकन रेडिओ बंद केला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. किचनमध्ये जायच्या ऐवजी मटकन ती खुर्चीतच बसली. तिनं ऐकलं ते खरं होतं? तिचं तोंड कडवट झालं. एकाएकी तिची चहा प्यायची इच्छाच मरून गेली. तिचे हात-पाय थंड पडले. अंगाला दरदरून घाम फुटला. काय करावं ते तिला कळेना. सर्वांगावरचा घाम पुसायचंही तिला भान नाही राहिलं. नको; त्या गोष्टीचा विचारच नको. ती स्वत:ला बजावत राहिली. तिनं पंख्याकडे पाहिलं. जणू काही तो तिच्या मदतीसाठी धावणार होता. तो आधीच गरगर फिरत फुलस्पीडनं स्वत:च्या रिंगणात वारा रिचवत होता. तिचा नाईलाज झाला. तिनं असाहाय्यपणे डोळे मिटून घेतले.

दारावर जोरात टकटक झाली, तेव्हा तिचे डोळे उघडले. ती लगबगीनं उठून उभी झाली. कधीतरी डोळा लागला होता. दारावर कोण होतं कुणास ठाऊक. तिनं घड्याळाकडे बघितलं. बापरे! पाच वाजले होते. आता या वेळेस कोण आलं असेल? शिकवणी तर सात वाजता असते.

स्वत:ला नीट करून तिनं दार उघडलं. बाहेर कुणीच नव्हतं. तिला आश्चर्य वाटलं. दारावर खरोखरच कुणी होतं, की तिला भास वगैरे झाला? ती क्षणभर तशीच उभी राहिली. समोरच्या फ्लॅटचं दार नेहमीप्रमाणे बंद होतं.

त्याच विचारात दार बंद करून ती आत आली. चहा करून घेतला. आजही उपवास घडला होता. मात्र गॅलरीत बसून चहा प्यायल्यावर तिला तरतरी वाटायला लागली.

संध्याकाळी मुलांना शिकवताना तिला फार बरं वाटलं. सरळ आणि सोपे प्रश्न विचारणारी निरागस मुलं, बाईंनी उत्तराला ‘बरोब्बर’ म्हटलं, की चेहऱ्यावर आनंद पसरवणारी मुलं, तिनं वाटलेले पेढे खाऊन खूष झालेली मुलं!

का कोण जाणे, आज दिगंत मात्र आला नव्हता. तो नाही म्हणून सुबोधसुद्धा नाही. आपल्यासमोर नेहमी परिपूर्ण ताट कधीच का येत नाही, हा प्रश्न राहून राहून तिला डिवचत राहिला. मुलं आपापल्या घरी निघून गेल्यावर आधीचंच मळभ परत दाटून आलं. ती गॅलरीत येऊन बसली. आभाळ अवेळीच काळंनिळं झालं होतं. तिचं मन सैरभैर झालं. काहीतरी खाऊन ती पडून राहिली. वेगवेगळे चेहरे, घडलेले प्रसंग आणि वरच्या पट्टीतले आवाज तिच्या डोक्यात थैमान घालत राहिले. झोपेनं तिला केव्हा ताब्यात घेतलं, हे तिलाही कळलं नाही.

सकाळी जोरानं बेल वाजली, तेव्हा कुठे तिचे डोळे उघडले. घड्याळाकडे लक्ष जाताच ती दचकलीच. सात वाजून गेले होते. नेहमीच्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त वेळ ती झोपून राहिली होती. परत एकदा बेल ओरडली, तेव्हा ती सावध झाली. इतक्या सकाळी कोण असेल? पटकन उठून चेहऱ्यावर पाणी मारून तिनं दार उघडलं. दारात दोन अनोळखी माणसं. तिनं प्रश्नार्थक चेहरा केला. काही कळायच्या आत समोरचा इसम भळभळ बोलायला लागला, ”मॅडम, ‘चंद्राच्या साक्षीने’च्या सेटवर विक्रांतनं आपली छेड काढली होती, असा आरोप स्वरदानं काल केल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. आम्हाला कळलंय, की तुम्ही तेव्हा तिकडे डायरेक्टरच्या असिस्टंट म्हणून काम बघायच्या आणि त्या प्रसंगाच्या वेळेस तुम्ही स्वरदासोबतच होता. याबद्दल कृपया टी चॅनेलला खरं काय ते सांगा ना.” अचानक समोरून आलेल्या प्रश्नानं ती गांगरलीच. प्रश्न विचारणाऱ्यानं तिच्या तोंडासमोरच माईक धरला होता. दुसरा हातातल्या कॅमेऱ्यानं तिचे भाव टिपत होता. क्षण-दोन क्षणांनंतर आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर आणि सगळं काही लक्षात आल्यावर तिच्या डोक्यात या आगळिकीमुळे संताप दाटला. मात्र समोरच्या व्यक्ती संताप काढण्याच्याही लायकीची नाहीत, हेही तिला लगेच उमगलं. तिनं काही न बोलता त्यांच्या तोंडावर दार धाडकन बंद करून टाकलं.

अखेर प्रकरण तिच्या दारापर्यंत आलंच तर. काल बातमी ऐकल्यापासून ज्या भीतीनं मनाला घेरलं होतं त्याचा धक्का सकाळी सकाळीच बसला होता. ती आपल्या खुर्चीवर येऊन बसली. कालपासून डोक्यात भिरभिरणारे प्रसंग संगतवार तिच्या डोळ्यांसमोर यायला लागले.

बारावी झाल्यानंतर कॉलेजात जाताच तिचं सुरवंटाचं अगदी फुलपाखरू झालं होतं. तिथल्या मोकळ्या वातावरणात तिला काय करू आणि काय नाही, असं होऊन गेलं होतं. चित्रपटाची आवड तिला कॉलेजातच लागली. तिच्या अख्ख्या ग्रुपला सिनेमे बघायचा नाद. बघून झाल्यानंतर त्यावर ढीगभर चर्चा. रश्मीला- तिच्या मैत्रिणीला- फोटाग्राफीची आवड. त्यामुळे ती नेहमी लो अँगल, वाईड शॉट असल्या तांत्रिक शब्दांत बोलायची. समजावूनसुद्धा सांगायची. ते तिला फारच आवडायचं. हळूहळू तिला सिनेमे बनवणं, हाच प्रकार जाम आवडायला लागला. आपणसुद्धा दिग्दर्शन शिकलं पाहिजे, असं तिच्या मनानं घेतलं. रश्मीमार्फत तिच्या पप्पांना गळ घालून त्यांच्या ओळखीच्या एका दिग्दर्शकाकडे ती शिकाऊ साहाय्यक म्हणून जायला लागली.

तिच्यासाठी हे वेगळंच जग होतं. पडद्यावर बघितलेले सुप्रसिद्ध चेहरे खरेखुरे बघायला मिळत होते. मात्र शूट काय होतंय आणि पडद्यावर दिसणार काय, याचा तिला ताळमेळच लागत नव्हता. पोस्ट-प्रॉडक्शनमधल्या गमती जेव्हा तिला दुसऱ्या असिस्टंटनी समजावल्या, तेव्हा कुठे हळूहळू प्रत्येक गोष्टीमागचा कारणभाव कळायला लागला. तिला शिकायचा हुरूप मोठा होता. दिग्दर्शक रविकांतच्याही लक्षात तिचा चुणचुणीतपणा आलाच होता. हळूहळू त्यानं महत्त्वाची कामं तिच्यावर सोपवायला सुरुवात केली होती. अभिनेत्री स्वरदाच्या सीन्सच्या वेळेस तिच्या आसपास थांबायची परवानगीही म्हणूनच त्यानं तिला दिली होती.

शूटिंग सोडून इतर गोष्टीत ती मुळीच पडत नसे. मात्र आजूबाजूला शूटिंगव्यतिरिक्त आणखी बरंच काही चालत असतं, हे एव्हाना तिच्या नजरेत यायला लागलं होतं. परंतु तशा गोष्टींकडे लक्ष दिलं, तर आपल्यालाही त्यात रस आहे असा अर्थ काढल्या जाईल, हे समजायला तिला वेळ लागला नाही. त्यातल्या त्यात विक्रांत आणि स्वरदा या दोन्ही अभिनेत्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्याबद्दल तिच्या मनात विशेष आपलेपणाची भावना कधी दाटलीच नाही.

विक्रांतसोबत स्वरदाचा चाललेला लाळघोटेपणा तर तिला बघवायचा नाही. सर्वांदेखत स्वरदा कित्येकदा बिनधास्तपणे विक्रांतच्या मांडीवर जाऊन बसायची.

मात्र पुढे घडणाऱ्या ‘त्या’ घटनेनंतर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल, असं तिला मुळीच वाटलं नव्हतं.

सेटवरच्या इतर स्टाफसाठी तो कदाचित नेहमीचाच प्रसंग असावा. मात्र तिच्यासाठी तो प्रसंग लज्जास्पद वाटावा इतका वाईट होता. बापाच्या वयाच्या विक्रांतचं स्वरदासोबत गाण्याच्या सीनचं शूटिंग सुरू होतं. विक्रांतनं स्वरदाला दोन्ही हातांनी उचलून घ्यायचा सीन ‘ओके’ झाला, तरी विक्रांतनं स्वरदाला खाली सोडलंच नाही. रागारागात स्वरदानं विक्रांतला धक्का दिला आणि ती व्हॅनकडे पळाली. ती गेली ती बराच वेळ परत आलीच नाही. दिग्दर्शक रविकांतनं व्हॅनमध्ये जाऊन खूप समजावल्यावर कुठे ती परत शूटला आली.

नंतरचा सीन ‘ओके’ झाल्यावर मात्र पुढचं रामायण घडलं. सीन झाला म्हणून स्वरदा आपल्या व्हॅनकडे निघाली. मात्र विक्रांतनं मधेच तिची वाट अडवली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या धक्क्यानं तिचा ब्लाऊज खाली घसरला. ते बघून स्वरदा त्याच्यावर जोरात ओरडली. मीरा हे सगळं बघतच होती. ते सगळं तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. ती सरळ विक्रांत आणि स्वरदाच्या मधे गेली आणि खंबीरपणे स्वरदाचा हात पकडून तिला व्हॅनकडे घेऊन गेली. विक्रांत ते बघतच राहिला. मीराच्या आवेशापुढे काय करावं, हे त्याला क्षणभर कळलंच नाही. अख्खं युनिट स्तब्ध झालं होतं.

मीरा स्वरदाला व्हॅनच्या आत घेऊन आली, तेव्हाच कुठे तिनं स्वरदाचा हात सोडला. स्वरदानं स्वतःला धप्पकन खुर्चीत लोटून दिलं. सिगारेट शिलगावली आणि मोठ्ठा कश घेतला. तिरीमिरीत तिनं मीराकडे पाहिलं आणि तिच्यावरच मोठ्यानं ओरडली, ”कशाला थांबली आहेस आता! पळ इकडून.”

मीराला धक्काच बसला. तिला हे अपेक्षित नव्हतं. तिनं मागचा पुढचा विचार न करता स्वरदाची अडचणीतुन सुटका केली होती आणि तिचे आभार मानायचे सोडून ती तिच्यावरच ओरडत होती! मीराही तावातावात खाली उतरली. ती उतरताच स्वरदाची व्हॅन वेगानं तिथून निघून गेली.

ती आपल्या जागेवर परतली, तेव्हा सेटवर शांतता पसरली होती. कुणीच तिच्याशी बोललं नाही. विक्रांत आणि रविकांत निघून गेले होते. पर्स उचलून तीसुद्धा बाहेर पडली.

ठरल्याप्रमाणे इतरांसारखं ती दुसऱ्या दिवशी स्टुडिओत आली. मात्र विक्रांत, किंवा स्वरदा तिकडे फिरकलेसुद्धा नाहीत. एवढंच काय, रविकांतसुद्धा स्टुडिओत आला नाही. शूटची सगळी तयारी झाली होती. विक्रांत आणि स्वरदाचेच एकत्रित शॉट्स होते. मात्र फर्स्ट असिस्टंट काहीच सांगत नव्हता. तो नुसताच फोनवर चिपकला होता. कुणाशी बोलत होता कुणास ठाऊक. दुपारपर्यंत शूट काही झालंच नाही. हे तसं नेहमीचंच. मात्र संध्याकाळी स्वरदानं चित्रपट सोडल्याची कुजबुज सुरू झाली, तेव्हा सेटवरचं वातावरण गंभीर झालं. कुणीच नीट बोलत नव्हतं. संध्याकाळी फर्स्ट असिस्टंटनं ‘उद्या यायचं की नाही ते रात्री फोनवर कळवू’ असं जेव्हा सर्वांना सांगितलं, तेव्हा मात्र प्रकरण गंभीर झाल्याची सर्वांनाच खात्री पटली.

मीरा जड पावलांनी घरी आली. स्पष्टपणे तिला कुणी काही बोललं नाही. मात्र काही लोकांच्या नजरेनं झाल्या प्रकाराला तीच जबाबदार असल्याची जाणीव करून दिली होती. झाल्या प्रकारामुळे शूट होत नाही आणि त्यासाठी आपल्याला जबाबदार धरलं जावं, हे गणितच तिला उमजेना. त्या वेळेस तिला जे योग्य वाटलं ते तिनं केलं होतं. कुणीतरी आपल्यासमोर कुणाची छेड काढतोय आणि आपण ते नुसतंच बघत बसावं, हे तर तिच्या तत्त्वातच बसणारं नव्हतं.

‘उद्या येऊ नका’ असा स्पष्ट संदेश रात्री मोबाईलवर झळकल्यावर मात्र झाल्या प्रकरणाची गडदता तिला जाणवली. सहजतेनं मिळालेली शिकायची संधी हातातून गेली होती. तिनं ओळखीच्या एक-दोघांना फोन केले. सारखाच संदेश सगळ्यांना गेला होता. एकजण तर चिडून उलट तिलाच बोलला. तिच्यामुळे काम थांबल्याचा आरोपच त्यानं तिच्यावर केला. त्याचं म्हणणं होतं, ‘या असल्या गोष्टी सेटवर चालतच राहतात, त्यात तिनं पडायची गरज नव्हती. ही कलाकार मंडळी दिवसा आपल्यासमोर भांडतात आणि रात्री एकमेकांच्या गळ्यात पडतात. त्यांचं काहीच जात नाही, किंवा गेलंही तरी त्यांना फरक पडत नाही. फरक पडतो तो आपल्यासारख्या सामान्य स्टाफला. आता लगेच नवीन काम मिळणार नाही आणि कुटुंबाचे खाण्याचे वांधे होतील.’

ती स्तब्धच झाली. इतका विचार तिनं केलाच नव्हता. डोळ्यांसमोर घडणारी वाईट गोष्ट तिनं थांबवली होती. हे चुकीचं होतं?

दुसऱ्या दिवशी रविकांतला भेटायचं म्हणून ती स्टुडिओवर गेली. रविकांतची गाडी स्टुडिओतच होती. मात्र त्यानं तिला भेटायचं स्पष्टपणे नाकारलं. यापुढे स्टुडिओत यायचं नाही, असं त्यानं फर्स्ट असिस्टंटकरवी तिला कळवलं. तिला वाटलं, रविकांतलासुद्धा या सगळ्या प्रकरणासाठी तीच जबाबदार आहे, असं वाटत असावं बहुधा.

स्वरदानं चित्रपट सोडल्याची घोषणा केल्याचं तिला बातम्यांतून कळलं. चित्रपटाचं भवितव्य आता अंधारात होतं. दोन-चार दिवस थांबून दुसरीकडे काम मिळेल, या आशेवर ती वेगवेगळ्या स्टुडिओत भटकली. मात्र आता तिची कीर्ती कर्णोपकर्णी झाली होती. असल्या बातम्या पसरतातही फार वेगानं. लोकांनी तिला स्पष्टपणे तोंडावर ‘नाही’ म्हणून सांगितलं. एका ठिकाणी तर ‘इथे तू आमचंही काम बंद पाडशील’ असं तिला थेटच सुनावलं.

इंडस्ट्रीचे अवघे रस्ते बंद झाले होते. त्यात फोन करून काही स्पॉटबॉईज्‌नी तिला अर्वाच्य शिव्या घातल्या. त्यामुळे ती आणखी घाबरली. तिनं घराबाहेर पडणंच बंद केलं. टीव्हीवर चित्रपट बघायची तिची आवड मरून गेली. तिला ते चित्रपटांचं फसवं जगच नकोसं वाटायला लागलं. चित्रपटांची आठवणसुद्धा नकोशी झाली.

त्यात दादांचं सुरू झालेलं आजारपण. त्यानं तिचा जगाशी संबंधच तोडून टाकला. शिकवण्यांचाच काय तो आधार!

दादांच्या मृत्यूनंतर आता कुठे ती त्या गडद कोषातून बाहेर बघायचा प्रयत्न करायला लागली होती, तोच हे जुनं भूत परत अंगावर आलं.
परत एकदा तिला त्या फसव्या जगात शिरायचं नव्हतं. मात्र भविष्याचे संकेत कुणाला ठाऊक असतात?

दुपार भकास गेली. बाहेर सूर्य चांगलाच तळपत होता. त्यामुळे संध्याकाळी बाहेर पडायचा बेत तिनं रद्द करून टाकला. वेळ जावा म्हणून उगाच पुस्तक उघडून बसली.

दारावरची बेल अवचित वाजली. दारात सुबोध होता. हसतच तो बोलला,

”अभिनंदन! तुम्हाला नोकरी लागली, असं कळलंय आम्हाला.”
”अरे व्वा! तुमचा शब्द आहे म्हटल्यावर का नाही लागणार?” तिनं हसतच उत्तर दिलं, ”या ना आत. पेढे तुमची वाट बघतायेत.”
”आमचा कसला शब्द अन् काय? तुमच्या सफाईदार इंग्रजीनं तर त्यांची बोलतीच बंद केली.” तो आत येत म्हणाला.
त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकायला तिला फार बरं वाटलं. ती आतून पेढा आणि पाणी घेऊन आली.

तिला वाटलं, बरं झालं, तो या वेळेस आला. आता निवांत बोलता येईल. ती सोफ्यावर बसतेच आहे तो दारावरची बेल वाजली. खरं तर सुबोध आल्यामुळे तिनं दार उघडंच ठेवलं होतं. दारावरच्या उंच, मजबूत माणसाकडे तिनं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. त्याच्या एका हातात सूटकेस आणि दुसऱ्या हातात कोट होता.

”मी ओळख करून देतो,” त्यानं सभ्यपणे सुरुवात केली, ”मी अभिनेता विक्रांत यांचा पी.ए. मी आत येऊ?”

तिला त्याला आत घ्यायचं नव्हतं, परंतु सुबोध आत बसला होता आणि त्याच्यासमोर इतक्या सभ्यपणे वागणाऱ्या माणसाला हाकलून लावणं मुळीच योग्य दिसलं नसतं. तिला काय बोलावं, याचा पेच पडला. मात्र तेवढ्या वेळात तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला मूक संमती समजून तो आत येऊन सुबोधसमोर बसलासुद्धा.

”मॅडम, थेट मुद्द्यावरच येतो.” तो गळा साफ करत म्हणाला, ” ‘चंद्राच्या साक्षीने’च्या सेटवर जे काय झालं ते तुम्हाला माहीत आहेच. स्वरदामॅडमनं केलेले आरोप धादांत खोटे आहेत आणि विक्रांतसरांचा या आरोपांशी काही संबंध नाही, ते निरपराध आहेत, असं आपण जाहीर पत्रकार परिषदेत सांगावं, अशी खुद्द विक्रांतसरांनी आपल्याला विनंती केली आहे. हेच मी आपल्याला सांगायला आलेलो आहे.” एवढं बोलून तो मीराकडे उत्तराच्या अपेक्षेनं पाहायला लागला. पी.ए.च्या त्या अनाहूत आगळिकीचा आणि चोंबडेपणाचा तिला धक्काच बसला. त्याहून धक्का बसला तो विक्रांतच्या खेळीचा, स्वत: गुन्हा केला असूनही त्याला निरपराध घोषित केलं जावं यासाठी पी.ए.ला पाठवण्याच्या त्याच्या हुशारीचा.

मीरानं सुबोधकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं भलंमोठं प्रश्नचिन्ह तिला स्पष्ट वाचता आलं. तिला काय उत्तर द्यावं ते कळेना. सुबोधला यातलं काहीएक माहीत नव्हतं. त्याचा नक्कीच गैरसमज होईल. नेमकं झालंही तसंच.

”मला उशीर होतोय.” सुबोध तिच्याकडे बघत एकदम उठून उभा झाला. ”मी निघतो आता. तुमचं चालू द्या.” त्याचा चेहरा अगदीच रिकामा झाला होता. मीरानं त्याच्यापासून या गोष्टी लपवल्यामुळे त्याला वाटलेल्या नापसंतीचा कोरडेपणा त्याचा डोळ्यांत तिला स्पष्टच दिसला.

ती काही बोलायचा आत सुबोध बाहेर पडला. मात्र तिचा मूड गेला तो गेलाच. तिनं तिचा सगळा राग त्या पी.ए.वर काढला.

”निघा इथून. लगेच निघा. नाही ओळखत मी कुणालाच. तुमच्या विक्रांतला आणि त्या भवानीलासुद्धा!”

तो ‘मॅडम, मॅडम’ म्हणत राहिला, मात्र मीराचा आविर्भावच असा होता, की त्याला आणखी पुढे काही बोलताच नाही आलं. तरी जाता जाता मीरानं दार आपटायच्या आधी ”सरांनी पंचवीस लाख पाठवलेयत, तेवढे प्लीज ठेवून घ्या” एवढं म्हणायला मात्र तो विसरला नाही.

ती तडक सोफ्याजवळ ठेवलेल्या सूटकेसजवळ आली. तिला हे सगळं नको होतं. ती सूटकेस घेऊन परत दारावर आली. मात्र पी.ए. तेवढ्यात पसार झाला होता. तिनं डोक्याला हात मारून घेतला.

काय चाललंय हे सगळं? तिला कळेचना. हे आता खूप जास्त व्हायला लागलं होतं. आपलं डोकंच काम करेनासं झालंय, असं तिला वाटायला लागलं.

स्वत:च्या लफड्यांवर पांघरूण घालण्यासाठी पैशांच्या राशी पाठवणाऱ्या विक्रांतचा तिला प्रचंड राग आला. तो पी.ए. तरी नेमका अशा वेळेस कडमडावा? सुबोधशी निवांतपणे बोलता आलं असतं. त्याच्या मनातल्या भावना जाणून घेता आल्या असत्या. आता सुबोधला कसं आणि कोणत्या तोंडानं समजावून सांगायचं? ती विचार करत राहिली.

तिचं डोकं दुखायला लागलं. ‘बरं झालं आज रविवार होता. शिकवणीला सुट्टी. नाही तर ही नाटकं मुलांसमोर झाली असती.’

खोलीत अंधार दाटला होता. दिवे लावायचंही तिला भान राहिलं नाही. बराच उशीर झाला होता. रात्रीचे दहा वाजत आले होते. ती बेडरूमकडे वळली, तोच परत दारावरची बेल वाजली. ‘नाही उघडायचं दार.’ तिनं स्वत:ला बजावलं. बेल परत वाजली. दुखणाऱ्या डोक्याला तो कर्कशपणा नकोसा वाटला.

दार उघडून मागचा पुढचा विचार न करता ती ओरडली, ”क्काय?”

”मॅडम, आम्ही स्वरदामॅडम कडून आलोय. कृपया, बोलू नका, फक्त ऐकून घ्या. तुमच्याकडे विक्रांतचा पी.ए. येऊन गेलाय, हे आम्हाला माहिती आहे. खाली टीव्ही चॅनेलची माणसं घुटमळत आहेत म्हणून आम्ही जास्त नाही बोलू शकत. परंतु एवढंच सांगतोय, सेटवर त्या दिवशी काय झालंय, ते तुम्हाला सगळं खरं खरं ठाऊक आहे. वेळ पडल्यास तुम्ही स्वरदामॅडमची बाजू घ्यावी, हेच आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. तुम्हाला कितीही पैशांची गरज लागल्यास निःसंकोचपणे या नंबरवर केव्हाही फोन करायला स्वरदामॅडमनी सांगितलंय. आम्ही निघतोय आता. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हो, काही दिवस घराबाहेर निघू नका प्लीज. त्या विक्रांतचं काही सांगता नाही येत. एखाद्या वेळेस कार, किंवा ट्रकनं उडवून लावेल तुम्हाला तो रस्त्यात. गुड नाईट मॅडम.” भसाभसा बोलून तिच्या हातात कार्ड कोंबून ती माणसं निघून गेलीसुद्धा.

त्यांचं बोलणं तिला समजून आतपर्यंत पोचायला थोडा वेळ गेला. मात्र ते एकदा उमगताच एक थंड शहारा तिच्या मणक्याच्या वरपासून खालपर्यंत वाहत गेला. तिनं धाडकन दार आपटलं.

तिच्या घराभोवती लोक घुटमळतायेत? तिला मारायला मारेकरी पाठवले जातील? हे काय चाललंय? एवढं काय केलंय तिनं? आता काय करायचं? बाहेर निघायचंच नाही? मग करायचं तरी काय?

प्रश्न, प्रश्न सगळीकडे प्रश्नच प्रश्न. तिनं त्या वेळेस मधे पडून स्वरदाला मदत केली होती. आता तिला कोण करेल मदत? गर्भगळीत होऊन ती खुर्चीत कोसळली. आशेचा एकही कवडसा तिच्या दृष्टिक्षेपात येत नव्हता.

‘विक्रांत काय, स्वरदा काय, दोघंही एकाच मुशीतली जनावरं. लबाड आणि वासनांध. काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय स्वरदाला इतक्या वर्षांनंतर असा शहाणपणा नक्कीच सुचणार नाही. दोघंही मदत करायच्या लायकीची नाहीत. एकदा स्पष्ट भूमिका घेऊन अख्ख्या करीअरचं नुकसान करून घेतलंय. आता आणखी कशाला त्या भानगडीत पडायचं?’

‘सुबोध करेल मदत? अचानक तिला सुचलं. पण त्यानं तरी का करावी मदत? तो तर दुखावला गेलाय. मुळात आपल्याबद्दल त्याच्या मनात काय भावना आहेत, हे तरी कुठे माहितंय आपल्याला? आणि परत परत त्याची मदत तरी का घ्यायची?’

अख्खी रात्र तळमळीत गेली. पहाटे पहाटे मात्र अचानक तिचा चेहरा खुलला. तिच्या डोक्यात काहीतरी पक्कं झालं होतं. कोण वाईट, कोण चांगलं या निर्णयात ती आता अडकणार नव्हती. मुख्य रस्ते बंद झाले, की पायवाटा निर्माण होतातच की? ती तशीच बिछान्यावरून उठली. हॉलकडे निघाली. तिला फोन करायचा होता.

काल घातलेला तिचा ड्रेस तिला खुर्चीवरच अस्ताव्यस्त पडलेला दिसला. कालच्या गडबडीत तिनं तो तसाच ठेवून दिला होता. व्यवस्थित घडी करून तिनं तो आलमारीच्या तळाशी ठेवून दिला, यापुढे न घालायच्या कपड्यांत.

ती फोनजवळ आली.

”मीरा स्पीकिंग,” आत्मविश्वासानं सफाईदार इंग्रजीत तिनं सुरुवात केली.

”बोल मीरा, मला खात्री होती तुझा फोन येईल म्हणून.” पलीकडच्या आवाजात अधीरता होती.

”माझ्या काही अटी आहेत…”

”मला मान्य आहेत तुझ्या अटी.”

”आधी ऐकून तर घे. तुझ्या पुढच्या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शकाला मी असिस्ट करेन आणि तुझ्या तिसऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन मी करेन, स्वतंत्रपणे.” पलीकडे शांतता पसरली. ”विक्रांत, आपल्यात तसा करारनामा झाल्यानंतरच मी पत्रकार परिषदेत तुझा निरपराधपणा जाहीर करेन. तुझ्यासाठी ही शिक्षा काहीच नाही, हे कळंतय मला. सध्या तू फॉर्मात आहेस, त्यामुळे माझ्यासाठी तुला हे असं करायला काहीच अवघड नाही, हेही कळतंय मला. एकदा तुझ्या प्रकरणात नाक खुपसल्यामुळे ऑलरेडी माझ्या करीअरचे बारा वाजले. आता मात्र मला इंडस्ट्रीत उभं व्हायचंच आहे आणि त्यासाठी माझी पायवाट मला आता गवसली आहे. तुमच्या दोघांच्या भानगडीत आता यापुढे मी माझी होरपळ होऊ देणार नाही. इनफ इज इनफ! हे मान्य असेल तर बोल, नाहीतर स्वरदाची माणसं दारातच उभी आहेत.”

तिनं फोन ठेवला. गॅलरीतून बाहेर पाहिलं. बाहेर तांबडं फुटू लागलं होतं. सकाळची कोवळी ताजी हवा तिनं श्वासात भरून घेतली. लवकरच पिवळाधम्म् सूर्य तिच्या गॅलरीत येणार होता.

विवेक घोडमारे
vivekg1234@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.