Now Reading
हात धरून चाल(व)ताना…

हात धरून चाल(व)ताना…

Menaka Prakashan

‘कोविड-१९’च्या भीतीनं जग जवळपास थांबलं असताना, जूनमध्ये दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यात सुमारे त्र्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण आहेत. त्यातलीच एक आमची विश्रुता. तिला ९०.६ टक्के गुण मिळाले. निकालामुळे आमचं चौकोनी कुटुंब हरखून गेलं.
विश्रुताचं पास होणं, एवढे मार्क मिळणं, हे काही आनंदाचं कारण नव्हतं. कारण काय ते सांगतेच. यशाची खात्री होतीच. अन्य पालकांप्रमाणेच आमच्यासाठीही ही परीक्षा तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक. तिनं मिळवलेल्या यशाबद्दल, इथपर्यंत पोचण्यासाठी केलेल्या वाटचालीबद्दल सांगावं वाटतं.

महाराष्ट्रात एवढी गुणवंत मुलं असताना एकट्या विश्रुताच्याच यशाची कहाणी मी का सांगायची नि तुम्ही तरी ती का वाचायची? कारण विश्रुता ‘विशेष मूल’ (special child) आहे. सोळा वर्षांच्या छोट्या आयुष्यातली अनेक आव्हानं पार करत ती इथवर आली. काय-कसं केलं, आम्हाला आधार कसा मिळाला, हे सांगायलाच हवं. त्यातून विशेष मुलांच्या आई-बाबांना रस्ता सापडेल!

विश्रुता आमचं पहिलंच मूल. तिचा जन्म २००३ चा. जन्मानंतर दुसर्‍याच दिवशी लक्षात आलं, की काही तरी वेगळं आहे. पुण्याच्या के. ई. एम. रुग्णालयातल्या तपासणीनंतर स्पष्ट झालं, की तिच्या मेंदूवर आघात झालेला आहे. मस्तिष्क पक्षाघात (Cerebral Palsy) झाल्यामुळे खास काळजी घेऊनच तिला वाढवावं लागणार. माझे पती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शंकर शेळके यांनी सांगितलं, ‘‘आपलं बाळ वेगळं आहे. विशेष काळजी घेऊन त्याला वाढवावं लागेल. आयुष्यातलं हे मोठं आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे.’’ परिस्थिती स्वीकारून पुढे जायचं आम्ही ठरवलं. आशावादी होतो, राहिलो. प्रवासातली महत्त्वाची गोष्ट हीच तर आहे.

मस्तिष्क पक्षाघातामुळे चालणं, फिरणं, उभं राहणं, बसणं इत्यादी क्रिया खूप कठीण होऊन जातात. वाचादोष, कर्णबधिरपणा, तिरळेपणा वा अंधत्व, झटके येणं इत्यादी समस्याही – आयएसीपी (IACP) निर्माण होतात. याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. त्यामुळे बहुविध पद्धतीनं (Multidisciplinary) पुनर्वसन करणं गरजेचं असतं. त्यात स्नायू बळकट करणारे व्यायाम आणि उपचार, वाचादोषावर उपचार, विशेष शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण यांचा समावेश होतो. डॉक्टर असूनही मला आधी एवढ्या तपशिलानं माहिती नव्हती. विश्रुताला वाढवताना माझा हा अभ्यास झाला. या प्रवासात ‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सेरेब्रल पाल्सी’चा (आयएसी) मोठा आधार मिळाला.

नेमके उपचार माहीत नव्हते. अनुभवांतून निवडत गेलो आम्ही. स्नायूंना बळकटी आणणारे व्यायाम आवश्यक होते. छोट्या विश्रुताला बोटॉक्स इंजेक्शन देऊन सहा वेळा प्लॅस्टर करावं लागलं. हे प्लॅस्टर असतानाच व्यायाम सोडून चालणारं नव्हतं. हे खूपच आव्हानात्मक होतं. तिच्यावर एकदा सात-आठ तासांची दीर्घ शस्त्रक्रिया झाली.

मुंबईचे नामांकित बाल अस्थिशल्यविशारद डॉ. अशोक जोहारी यांचं नाव समजलं. तिथे रुग्णांची तोबा गर्दी असते. पहिल्यांदा सकाळी नऊच्या दरम्यान गेले. मध्यरात्र उलटल्यानंतर तीन वाजता नंबर लागला. वेगवेगळ्या भागांतून रुग्ण आलेले होते. वेदनेचा जणू पूर उसळला होता. रुग्णांना त्यांच्याबद्दल वाटणारा विश्वास तेव्हा जाणवला. तेव्हापासून त्यांच्याशी जुळलेले स्नेहबंध कायम आहेत. सुरुवातीचा काळ कष्टप्रद होता. महागडे उपचार, बोटॉक्स इंजेक्शनं सुरू असताना कधी तरी प्रश्न पडायचा, उपयोग होईल ना? विश्रुता पाच वर्षांची होईपर्यंतचे दिवस फार अस्वस्थतेचे होते. तिला पटकन संसर्ग व्हायचा. सर्दी तर लगेच मुक्कामाला यायची. प्रत्येक आजाराचे वेगवेगळे डॉक्टर, त्यांची औषधं.

तब्बल तीन वर्षांची झाल्यावर विश्रुता बोलू लागली. कानांवर जेवढं जास्त पडेल, तेवढं मुलं लवकर बोलायला शिकतात. त्यामुळे तिला नातेवाइकांचं बोलणं, बडबडगीतं कॅसेटवर ऐकवत होतो. बोटांनी पकडणं जमत नसल्यानं रेघा मारणं, गोलं काढणं अवघड जाई. तिच्या बाबांनी खेळणी आणली ती याचा विचार करूनच. मजा वाटेल आणि त्याच वेळी बोटं वापरण्याचं कौशल्य विकसित होईल, अशीच खेळणी होती सगळी. पुढे लिहायला शिकवताना हस्ताक्षरतज्ज्ञ शंतनु संत यांची मदत घेतली.

विश्रुता सहा महिन्यांची असल्यापासून फिजिओथेरपी सुरू आहे. ‘शक्य तेवढा व्यायाम करत राहणं’ हाच या मुलांसाठी एकमेव मंत्र! जिम्नॅशियम, स्नायूंना ताण देणारे, त्यांची ताकद वाढवणारे व्यायाम, आयुर्वेदिक पद्धतीचं मालीश यात कोणतीही हयगय होणार नाही, ही काळजी घेतली. प्रत्येक दिवसाची आखणी नियोजनबद्ध असेल, तरच योग्य ते परिणाम दिसू लागतात. त्यासाठी बाळाकरता पूर्ण वेळ वाहून घेणारा एक माणूस हवा.
विश्रुताची शाळा सुरू झाल्यावर प्रत्येक सुट्टीत आम्ही फिजिओथेरपीसाठी पुण्यात जात होतो. ती सातवी-आठवीत असताना तिथे घर घेतलं. तिथेच तिला पोहायला शिकवलं. या आजारात हायड्रोथेरपीही महत्त्वाची आहे. पुण्यात विश्रुताला खूप मैत्रिणी मिळाल्या. स्वतःचं घर झाल्यावर त्या तिथे येऊ लागल्या. त्यातून त्यांचं शेअरिंग होऊ लागलं. व्यायामाला आम्ही कधीही दांडी मारली नाही. विश्रुता शिस्तबद्ध आहे. वेळापत्रकातला एखादा व्यायाम राहिला, तर तीच त्याची आठवण करून देते. तिच्या शांत, प्रामाणिक, कष्टाळू स्वभावाचं फिजिओथेरपिस्ट मॅडम कायम कौतुक करत आल्या.

विशेष मुलांच्या संगोपनात महत्त्वाचे असतात सहा ‘एफ’ – Fun, Family, Friends, Future, Fitness, Function.. आमचं विस्तारित कुटुंब असेल, हे मी पाहिलं. सुरुवातीचा काही काळ तिला घेऊन माहेरी राहिले. मामा, मामी, मामेभावंडं यांनी आम्हा दोघींना संभाळून घेतलं. तिच्या फिटनेसची नेहमीच काळजी घेतली. भविष्याचाही आम्ही पूर्ण विचार केला, करत असतो. तिला काय करता येईल, तिचा कल कुठे आहे, हे आम्ही जाणून आहोत. तिला टाळून आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नाही. एवढ्या वर्षांमध्ये आम्ही चौघं एकदाच सहलीसाठी आठ दिवस काश्मीरला गेलो. ती ‘विशेष मूल’ आहे, याचं कधी कानकोंडं वाटून घेतलं नाही. या मुलांबाबत Acceptance (आपुलकीनं स्वीकार), Advocacy (पाठबळ) आणि Accessibility (चालण्या-फिरण्यात अडथळे नसणं) या तीन ‘ए’कारांनाही फार महत्त्व आहे.

हे सारं करताना माझ्या ज्ञानात, माहितीत भर पडत गेली. विशेष मुलांच्या पालकांच्या ओळखी होत होत्या. मला मिळणारं मार्गदर्शन सगळ्या पालकांना मिळत नाही, याची खंतही वाटत होती. हे लक्षात घेऊन ‘पेएरेंट्स असोसिएशन ऑफ सेरेब्रल पाल्सी चिल्ड्रन’ अशी संघटना सुरू करण्यात पुढाकार घेतला. संघटनेच्या माध्यमातून मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ लागलो, कार्यशाळा आयोजित करू लागलो. आपण एकटे नाहीत, हा मोठा दिलासा विश्रुता आणि तिच्यासारख्या अन्य मुलांना मिळाला!

विश्रुताचा आतापर्यंतचा प्रवास असा आहे. तिनं अकरावीसाठी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. स्पर्धा परीक्षा देण्याची तिची इच्छा आहे. तिला ज्यात रस आहे, ते करण्यासाठी आम्ही दोघं तिला सगळं साहाय्य करू. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते उत्तम नागरिक बनणं. विश्रुताची त्या दिशेनं वाटचाल नक्कीच सुरू आहे.

– डॉ. शीतल शेळके
– शब्दांकन : सतीश कुलकर्णी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.