Now Reading
हाक ना बोंब

हाक ना बोंब

Menaka Prakashan

मेन रोड म्हणावा, तर रुंदीला वीस-पंचवीस फूट. त्या मेन रोडवरून जाताना कैकाड्याच्या माडीपुढे डावीकडे वळायचं. टेम्पो आत जाण्याच्या लायकीचा होता; फक्त संसार उचलायचा होता, अवजड वाहतूक करायची नव्हती. मेन रोड वीसचा म्हटलं, तर हा आत फुटलेला अगदी पंधरा-वीस फूट. त्याला पुढे कोणताही रस्ता फुटत नाही. दोन्ही बाजूंनी चार-पाच घरं आणि दोन्ही बाजूंच्या घरांसमोरून छोटी गटारं. नंतर तोच रस्ता एक उजवीकडे वळण घेतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दोन गटारंही वळणं घेतात; त्यात पावसाळा म्हणजे दोन्ही गटारं तुडुंब होऊन रस्त्याच्या मधोमध सुद्धा घाण पसरलेली आहे.

उजवीकडे वळण आणि लगेच डावीकडे. पुढे पाच-पंचवीस फुटांत हा रस्ता आडव्या एका पंधरा फुटीला मिळतो आणि दोन्ही गटारं एका मोठ्या गटारीला. या गटार संगमावर डावीकडे वळायचं म्हणजे कसरत. हा सबंध कोपरा गायकवाड सरांच्या बंगल्याचा आडवातिडवा बांधलेला भाग आहे. गाड्या वळण घेताना त्या कोपर्‍याला घासून ती भिंत अर्धी पडलेली आहे. या कोपर्‍यावर गायकवाड सरांच्या बंटीची यामाहा इळान्चीमाळ उभी असते. अगोदर बंटी डी.एड. करून दिवसभर क्रिकेट खेळायचा. मागच्या वर्षी वशिला आणि नोकरी दोन्ही लागले. आजही गाडी वळत होती, तेव्हा यामाहा उभी होती. पण ‘गाडीला धक्का लागंन नीट किन्नर हाण,’ असं गुटख्याचा डोह तोंडातून खाली न टाकत म्हणतो. आज मात्र तो बेंबीच्या देठातून किंचाळला नाही. उलट आज तो खालीच जास्त बघत होता. कोपर्‍यावरून सुरक्षित लेफ्ट बसला, बंटीनं वर बघितल्यासारखं केलं आणि पुन्हा खाली पाहिलं. मुख्य गटारीवरून अजून डावीकडे आणि टेम्पो थांबला. टेम्पोच्या उजव्या बाजूनं दारात बराच रबराचा, चामड्याचा खच. हेच संपत चांभाराचं भाड्याचं घर. इथेच तो चपलांचा कारखाना चालवतो. दोन-तीन पावसात तुंबलेली गटारं, केसरनं भाजलेली मिसरी, गुटखा, रबर, चामडी आणि बरंच मिळून तयार झालेली, नरकात असेल अशी दुर्गंधी या कोपर्‍यावर आहे. सामान टेम्पोत जायला सुरुवात होते. संपत बायको यशोदाला शिव्या देतो. बायकोला शिव्या दिल्या, की तिचा वेग वाढतो, तिचा भांडी भरण्याचा आणि गाडीत टाकण्याचा आवाज वाढतो. त्याची आत्ताच दहावीला गेलेली मुलगी अंबिका मात्र एक-एक गाठोडं, किंवा एक-एक भांडं बळंच नेऊन तशीच आपटते. तिला कुणी काही बोलत नाही. तिचा बारका भाऊ चपळाईनं सामान आणतोय. लोक आपल्या माळवदावरून, स्लॅपवरून, किंवा दारातून हे पाहतायेत. काहीतरी कुजबूज सुरू आहे. केसरबाई गटाराच्या संगमाच्या डाव्या बाजूला मिसरी लावत बसलीये. आजही ती पायर्‍यांवर बसून हे पाहतेय. अर्ध्या तासात सगळा संसार टेम्पोत. भरलेला टेम्पो मागे घेतला आणि संगमावरून किन्नर हाणून टेम्पो गेला. पुढच्या एका सीटवर बायको आणि त्याची पोरगी बसली. मालकाकडे चावी दिली आणि ‘राम राम’ घालत संपत सायकल ढकलत पोराला घेऊन मागे निघाला. संपत आणि त्या गल्लीतल्या एकाचीही नजरानजर झाली नाही. तो पुढे गेल्यावर केसरनं आधीच काळ्या झालेल्या चिखलात अजून एक काळी पिचकारी मारली आणि आत गेली. टेम्पो जाताच नजरांची गर्दी पांगली.

संपत या खोलीत भाड्यानं राहायला येण्याचंही चित्र वेगळं नव्हतं. मागच्या पावसाळ्यात पोरीची नववीची शाळा सुरू झाली तेव्हाची गोष्ट. केसर तिच्या दारातल्या पायरीवर बसून रस्ता काळा करत बसली होती. असाच बारीकसा टेम्पो संपतचा संसार घेऊन आला होता. वळणावर यामाहा होती. तिला धक्का लागला आणि बंटी त्या वेळेस गुटखा ओकला आणि खेकसला होता,
‘‘डोळे झवले काय मदरचोद!’’
केसरचा दिवस दोन-तीन मर्दानी शिव्या ऐकून सार्थकी लागला. तसा तिनं अजून एक बकाणा तोंडात भरला. सगळंच लोंबलंय, असं म्हणून तिच्याकडे जाणारे आता कमी झाल्यानं समागमी सुख तिला यातच जास्त मिळतं. त्या टेम्पोच्या आवाजात त्या ड्रायव्हरला ऐकू गेलं नाही, किंवा ऐकू गेल्याचा तोटाही त्यालाच झाला असता. डोळे झाले; पुढे आई, बहिणी झोपल्या असत्या आणि ड्रायव्हर सोडून सगळी गल्ली करमणूक करून घेत जिंकली असती. संसार खाली करताना नवरा-बायको जास्त बोलत नव्हते. त्या गटार संगमावरच्या दोन-तीन दारांतून आणि दोन-तीन स्लॅप-माळवदावरून सगळ्यांनी करमणूक म्हणून बघायला सुरुवात केली. बंटी त्याच्या दारात खुर्ची टाकून बसला होता. नंतर तो संगमावर आला, त्यानं एक गुटख्याची पुडी काढली. तिला बरंच चोळलं आणि फोडून तोंडात खाली केली. संपत आणि त्याच्या बायकोचं लक्ष नव्हतं. बंटी मात्र निव्वळ रिकामटेकडा असल्यासारखा एक-एक गोष्ट निरखून पाहत होता. त्यात संपतची यंदा नववीत जाणारी अंबिका मुख्य आकर्षण होतं. स्कर्टखालचे अर्धे पांढरेशिपीत पाय आणि छातीवर तुटेस्तवर ताणलेलं झंपर कुणाच्याही नजरेतून सुटत नव्हतं. अंबिका बळंच गाडीतल्या एकेक गोष्टीला रोजंदारीवर कामाला आल्यासारखी हात लावत होती. संपत जे काही बोलत होता, ते फक्त तिला उद्देशून आणि तिरसटसारखं. ती मात्र जास्त मनावर घेत नव्हती. बंटीनं तोंडात टाकलेली पुडी चावण्याची मजुरी केली. तोंडात गोळा झालेला सगळा मैला गटारीत खाली केला आणि अंक्या वस्तादला हाक मारली.

अंक्या केसरच्या घराच्या वरच्या मजल्यावर पत्र्याच्या खोलीत त्याच्या भावासोबत राहतो आणि बळंच बी.ए. करतो. अंक्याचा भाऊ लव्ह्या बी.एस्सी.नंतर एम.पी.एस.सी करतोय. लव्ह्याला सगळी गल्ली तिसर्‍यांदा एम.पी.एस.सी.ला नापास झाल्यापासून ‘पीएसआय’ म्हणून चिडवते. तो चिडून अजून जोमानं अभ्यास करतो. जेवढा चिडून अभ्यास करतोय, तेवढाच त्याचा एम.पी.एस.सी. क्लीअर होण्याचा विश्वास ढळत चाललाय. केसर जाता-येता त्याला मान देते. त्याला उघड उघड गल्लीत तिनं दिलेला मान मान्य नाही आणि ‘पीएसआय’ म्हटलेलंसुद्धा. त्यात टवाळीचा वास येतोय. ती अधेमधे त्याला चहासाठी बोलावते. तो जात नाही. तो वरून खाली येताना ती पायर्‍यांवर रवंथ करताना पाठमोरी बसलेली असते. तिच्या ब्लाऊजच्या वरून बाहेर आलेले मरणाचे मांसल भाग आणि त्या दोन्हींच्या मधली खोल जागा त्याला चाळवते. ते सगळं हाताखालून घालावं, अशी इच्छा होते. पण खाली उतरला, की मिश्रीनं पडलेलं काळं तोंड पाहून तो लगेच एम.पी.एस.सी.च्या विचारात भलं आहे, असं मानतो. तो एक-दोनदा अर्ध्या जिन्यावरून केसरची छाती न्याहाळत परत वर जाऊन थेट बाथरूममध्ये शिरून मोकळा झालेला आहे. तो दिवसभर घरी नसतोच. लायब्ररीत गेलं, की एम.पी.एस.सी. होतं या अंधश्रद्धेत त्याची श्रद्धा आहे आणि संगमावरची एकूण जमात त्याला किळसवाणी वाटते. अंक्या दिवसभर एकटाच वर-खाली करतो. बंटी आणि गँगसोबत अंक्या गावभर फिरून पाच वाजता त्याच्यासोबतच शाळेच्या ग्राऊंडवर क्रिकेट मॅच खेळायला जातो. तिथेच दोन तास कडक जोर-बैठकांचा व्यायाम आणि खाणावळीवर पोटभर खाऊन संध्याकाळी साडेनऊच्या शोला पोस्टर न बघताच घुसतात. बंटी, अंक्या वस्ताद, रामजाने राजा आणि वडार्‍याचा हिरामन ही गँग. लहू अंक्याला सांगतो, ‘‘त्यांच्या नादी नकू लागू.’’ अंक्या म्हणतो, ‘‘परीक्षा देऊन नापास होण्यापेक्षा बरं.’’ तो म्हणतो, ‘‘बी.ए. नसलं करायचं, तर गावाला जा. पैसे नको घालवू.’’ अंक्या म्हणतो, ‘‘तू पण नापास होऊन पैसेच वाया घालवतोस, मी दुसरी रूम घेऊन राहतो.’’ लहू दोन ठिकाणी पैसे घालवण्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याच्यासोबत राहतो.
बंटीनं अंक्याला हाक मारली, तसा अंक्या बाहेर आला. दोघांची खाणाखुणी झाली. अंक्या अंबिकाकडे बघत राहिला. साधा शर्ट घातला होता.
बंटीनं खालून विचारलं, ‘‘चल रे, मॅच लावली शंभरची.’’

अंक्या खाली येताना एकदम अंगाला घट्ट बसणारा हाफ भायांचा टीशर्ट घालून आला. बंटीनं केसरकडे पाणी मागितलं. पाण्यानं तोंड हिसळून काढलं. तेवढ्यात गल्लीच्या आतल्या बाजूनं राजदूतचं फायरिंग ऐकू आलं. बंटीनं तांब्या केसरकडे दिला आणि लगेच यामाहाला किक मारली आणि दोघं पसार झाले. केसरसुद्धा सरांना बुजते. ती सुद्धा तांब्या घेऊन आत गेली.
गायकवाड सरांनी शिस्तीत राजदूत दारासमोर लावली. तोपर्यंत टेम्पोतला संसार घरात गेला होता आणि टेम्पो निघत होता. गायकवाड सर टेम्पो जाईपर्यंत आतून लुंगी गंडाळून बाहेर आले. गेल्या अर्ध्या-एक तासात संपतला एक माणूस दिसला, बाकी सगळी गर्दी होती. सरांनी संपतला ‘राम राम’ घातला. चौकशी केली. सरांनी मंडळीला चहा टाकायला सांगितला. दोघांनी समोरासमोर उंबर्‍यावर बसून घेतला. सरांच्या घराला दोन दरवाजे आहेत. एक संगमावरून उजवीकडे गेलं, की केसरच्या दारासमोर आणि दुसरं संपतच्या दारासमोर. विचारपूस करून गप्पा मारून सर आत गेले. संपतला गायकवाड सरांचा थोडा उबदार आधार वाटला.

संपत आधी महादेव गल्लीत राहत होता. भाडं वाढलं, स्टँडपासून घर लांब, किंवा घरापासून पोरांच्या शाळा लांब म्हणून संपत या खोलीत आला. संपतला नवीन जागा, जुनी जागा याचा जास्त फरक पडत नव्हता. दुसर्‍या दिवशी त्याला सकाळी चामडं कापायला सुरू करायचं होतं, त्यानं सुरू केलं. गायकवाड सर सकाळी उठून ‘राम राम’ घालून थेट बाहेर गेले. सर शाळेत आणि ‘पीएसआय’ लायब्ररीत गेला, की संगमावर गटारी सोडून काही उरत नाही. केसरचा अंदाज आणि किळस यायला एक आठवडा संपतला पुरेसा होता. बंटी आणि त्याची गँग येऊन एकतर वर लहू आणि अंक्या उस्तादच्या रूमवर धिंगाणा घालतात, नाहीतर गटार संगमावर टवाळी. काही दिवसांत गायकवाड सरांनी खासगी संस्थाचालकाला दोन लाख रुपये देऊन कसाबसा बंटीला प्राथमिकला चिकटवला. त्याच्या नोकरीपेक्षा सरांना वाहत चाललेल्या इभ्रतीची काळजी होती. तो नोकरीला लागला आणि अजून आळा सुटला. गँगला आता पैशांची कमी नसणार होती. शाळा सुरू झाल्या. सर राजदूतवर आणि बंटी यामाहावर एकाच वेळी गल्लीबाहेर. नंतर अंबिका चालत चालत शाळेत. संपत आणि त्याचं घर या कशाच्याही अध्यातमध्यात आलं नाही. अंबिकाला दोन-तीन महिन्यात कुणी एक शब्दही बोललेलं पाहिलं नाही.

एक दिवस संपत संगमाकडे तोंड करून दारातच चहा पीत उभा होता. चांगला पाऊस पडून गेला होता. केसर गल्लीतल्या सगळ्या उभ्या बसलेल्या आल्यागेलेल्या पुरुष-बायकांकडे बघायची. संपत नजर चुकवत संगम ते त्याचं दार असं फिरत चहा पीत होता. एका फेरीत त्याच्या दारासमोरून तो फिरला आणि केसर हसताना दिसली. त्यानं दुर्लक्ष केलं आणि संगमाकडे दोन-तीन पावलं, गेला तशी समोरून अंबिका आली. तिचे हसलेले गाल जागेवर यायला अजून काही क्षण असताना संपत दोन-तीन पावलं पुढे झाला. ते पाहून संपतनं पहिल्यांदा केसरकडे रोखून पाहिलं आणि लगेच लाल होऊन आत गेला. उरलेला चहा त्याला कडू लागला, तसा तो कप जोरात खिडकीत आदळला आणि ती पडदीच्या मागे कपडे बदलायला निघाली, तसा संपतचा आवंढा गिळत आवाज निघाला,
‘‘खाली बघून येत जावा जरा शाळेतून. लई धडयत व्हय लोक…’’
सगळं कानांमागे टाकत अंबिका पडदीमागे निघून गेली. गुपचूप खाली मान घालून गेल्यानं अंबिका संपतच्या डोक्यात एक आळी सोडून गेली. त्याच्या डोक्यात ती कमी जास्त वळवळ करत राहिली. काही दिवसांतच बंटी केसरकडे तोंड करून बसण्याऐवजी थेट संपतच्या घराकडे तोंड करून बसू लागला. अंक्या वस्ताद अजून फिट्ट टीशर्ट घालून फेर्‍या मारू लागला. गाडीचं फायरिंग जास्त वेळा वाजू लागलं. पुढे अजून एक दिवस तर थेट केसर अंबिकाशी बोलताना दिसली. अंबिका बोलत नव्हती, पण एका ठिकाणी गप उभी राहून ऐकत होती. त्या दिवशी तिनं या घरात पहिल्यांदा कुत्रीच्या आईसारखा मार खाल्ला. तिचं लोळून लोळून रडणं सगळ्या गल्लीला ऐकू गेलं, करमणूक म्हणून सगळ्यांनी सोडून दिलं.

बंटी ड्युटीवरून येऊन क्रिकेट मॅचला जात होता. रविवार दिवसभर अंक्याच्या रूमवर बसत होता. त्याच्या दरवाजातून संपतच्या घराच्या दारात नजर जात होती. अंक्याचा भाऊ लव्ह्या आता कधीकधी रात्री झोपायलासुद्धा बाहेर जात होता. त्याचा बाहेरगावी बी.एस्सी. अ‍ॅग्रीला गेलेला मित्र आनंद आता गावात परत आला. आनंदसुद्धा एम.पी.एस.सी.च्या भलता नादी लागला होता. त्याची रूम मागच्याच गल्लीत होती. दोघं आनंदच्याच रूमवर अभ्यास करायचे आणि तिकडेच झोपायचे. लव्ह्याबरोबर आनंद अधूनमधून त्याच्यासोबत संगमावर येत होता. संगमावर येऊन त्याला लव्ह्याइतकी संगमाची किळस वाटली नाही. त्यात त्याचा क्रिकेटमध्ये जीव! एक-दोनदा तो बंटीच्या क्रिकेट मॅचला गेला आणि बंटीला क्रिकेट खेळताना पाहून त्याचा चाहता झाला. दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी क्रिकेट असा त्याचा नित्यनेम ठरला. लव्ह्यालाही तो बळंच घेऊन जायचा. लव्ह्या सुरुवातीला गेला, पण संगम आणि तिथली माणसं दोघांचीही किळस येत असल्याने नंतर आनंद एकटा जायला लागला. बंटीनंही आनंदला एक-दोनदा चहा पाजला आणि यामाहावर बसवून त्याच्या खोलीवर सोडलं. एवढं केल्यानं त्यांची मैत्री चांगली होत गेली. त्याच्या खोलीकडे जास्त लोकांची ये-जा नसल्यानं आनंद आणि लव्ह्याचा अभ्यास जसा जास्त होत होता, तशी बंटीला झोपही चांगली येत होती. बंटी अधूनमधून भेळ, वडापाव आणि रविवारी चिकन आणत होता. या पार्टीत कधीमधी रामजाने राजा आणि हिरामनही असायचा. सुट्टीला बंटी आनंदच्या रूमवर करमवू लागल्यानं रविवारी लव्ह्या स्वतःच्या रूमवर एम.पी.एस.सी. करायचा. लव्ह्यानं एकदा आनंदला ‘हे बरोबर नाही’ असं सांगितलं, पण आनंदनं ‘जाऊदे रे, भारीये बंट्या,’ असं म्हणत टाळलं.

पुढच्या महिन्यात एक दिवस शाळा सुटायच्या वेळेनंतर दोन-तीन तास अंबिका घरी पोचली नाही. तिला बघायला जाण्याइतकं मोकळं कुणी घरात नव्हतं, म्हणून उंबर्‍यावर संपत वाट बघत बसला आणि त्याची बायको आत बाहेर करत राहिली. संपत पहिले एक-दोन तास काम करत होता. नंतर त्याचा हात कापायला सुरू झाला आणि त्यानं चामडं बाजूला ठेवलं. गायकवाड सर आले आणि गाडी लावली आणि संपतला ‘राम राम’ घालून आत गेले. एक-दोन वेळा केसर आणि संपतची नजरानजर झाली. आज तो नजरेला नजर न देतानासुद्धा इरमल्यासारखं वाटून घेत होता. डोळ्यांत भीती होती. तो तसंच बघत बसण्यापेक्षा रागंरागं उठून सायकल घेऊन गेला. पुन्हा अर्ध्या तासात परत आला. सायकल स्टँडला न लावता तशीच भिंतीला बळंच खेटून उभी केली आणि आत गेला. आता अंबिकाचा धाकटा भाऊ बाहेर येऊन बसला. चार-पाच वाजता बंटी आला. त्यानं गाडी लावली, एक गुटख्याची पुडी फोडली आणि थेट अंक्याकडे गेला. बराच वेळ गुटखा चावत केसरच्या घरावरून संपतच्या घराकडे बघत राहिला. काही वेळात अंबिका चोरपावलांनी केसरसमोरून खाली मान घालून गेली. ती आलेली पाहून तिचा भाऊ आत गेला. नंतर संपतच्या घरात कुणी कुणाला बोललेलं बाहेर ऐकू आलं नाही. फक्त अंबिकाच्या किंचाळण्याचे आवाज. बंटी अंक्याला घेऊन खाली आला, गाडीला किक मारली आणि फायरिंग सोडत क्रिकेट मॅचला निघून गेले.

आनंदच्या रूमची एक चावी आता बंटीनं बनवून घेतली आणि आनंदच्या परस्पर तो आता रूमवर येऊन झोपू लागला. एका रविवारी बंटीनं आनंदकडून वेगळीच मागणी केली. बंटी म्हणाला, ‘‘दोन-तीन तास जरा रूमवर येऊ नका. एक कामय. झालं की संध्याकाळी पार्टी देतो चांगली.’’ आनंदला हा व्यवहार तितकासा रुचला नाही, पण ‘नाही’ म्हणण्याची ताकद गेल्या महिनाभरात बंटीनं विकत घेतली होती. आनंद लव्ह्याच्या रूमवर येऊन अभ्यास कमी आणि विचार जास्त करत बसला. आपली वस्तू कुणाच्या तरी हातात देऊन आल्यासारखा. एका शांत निवांत रूमवर बंटीचं काय काम असेल हे न कळण्याइतका आनंद भोळा नव्हता. इतकंच की तो ‘नाही’ म्हणू शकला नाही. ते दोघं रूमवर आले, तेव्हा संपत दारासमोर काम करताना दिसत नव्हता, पण दरवाजाला कुलूपही नव्हतं. संपत आणि त्याचा मुलगा हे दोघंच नेहमी घराबाहेर दिसायचे. आज दिसत नव्हते म्हणजे दोघं घरी नव्हते. त्याची बायको आणि अंबिका काम असलं तरच बाहेर, नाहीतर त्या दोघी आहेत की नाहीत कळायला मार्ग नाही. बंटी आनंदच्या रूमवर. केसरही गर्दी नसल्याने बाहेर जास्त बसली नाव्हती. जेवण करून दोघांनी संगमावरच झोप काढली. झोपेतून उठले तेव्हा दिवस मावळायला आला होता. अंबिका एकटीच दारात बसली होती. केसर आणि तिच्या समोर यामाहावर बंटीही बसला होता. आनंद बाहेर येताच बंटीनं जोरात हाक मारली,
‘‘अय… पीएसआय जोडी… या खाली… चहा पिऊन येऊ.’’
या एका हाकेत बंटी आनंदला त्याच्या जगात घेऊन गेला. त्याचं काम झालं आणि असं दिसत होतं आणि असं काम पुन्हा निघू शकतं, ही एक शक्यता आलीच. त्यानं काळजीतच चहा प्याला. चहाबरोबर वडापाव चारला आणि रात्रीच्या मटण पार्टीसाठी एक किलो मटण एका घरगुती हॉटेलात कालवण करायला देऊन आले. संध्याकाळी जेवायला निघताना लव्ह्या पार्टीला ‘नाही’ म्हणत होता, पण बंटीनं जोर लावला.
बंटी जोरात म्हणाला, ‘‘चल रे पीएसआय!’’
‘ओ पीएसआय पासून ए पीएसआय’पर्यंत आल्याने लव्ह्या अजून वरमला आणि गाडीवर बसला. अजून एका गाडीवर अंक्या वस्ताद, रामजाने राजा आणि हिरामन सुद्धा होते.
बंटीने दोन-दोन घोट घ्यायलाही लावले. लव्ह्या नाही प्याला. आनंद पिताना या एका-एका घोटाची किंमत काय असेल, किंवा काम काय केलं, हे विचारण्याची हिंमत होईल का, याचा विचार करत होता. बाकी चौघं भाकरी रश्शात चुरून खात होते. ग्लासवर ग्लास भरत होते. अंक्या लव्ह्याला बुजायचं सोडून लव्ह्याच दुर्लक्ष करत होता. बंटी लव्ह्याला ज्या पद्धतीनं तुच्छ लेखत बोलत होता, त्याला एम.पी.एस.सी. करण्यापेक्षा अंक्यासारखं बंटीच्या गोटात सामील होण्यात हाशील आहे, असं वाटत राहिलं. आनंद बंटीचं मीठ खाऊन गुलाम झाला होता. एका दिवसात आनंदनं चार-पाच वेगळ्या प्रकारचा बंटी पाहिला आणि लव्ह्या काय सांगत होता ते कळलं.

अंबिका एक-दोन दिवसांत दुसर्‍यांदा गायब झाली. आल्यावर पुन्हा तोच कल्लोळ. शाळा काही दिवस बंद झाली. बाहेर येणं-जाणं बंद झालं. संपत बाहेर आता थोडा धीरानं चामडी कापत बसत होता. सरांच्या घरचे सोडून संगमावरचे सगळे संडासला बाहेर जात होते आणि सकाळीच जायचे. हागणदारीच्या शेजारी एक टीम क्रिकेट खेळायची आणि वर्दळ व्हायची, त्यामुळे दिवसभर संडासला जाता यायचं नाही. अंबिका आता दिवसातून एक-दोनदा डबा हातात घेऊन एकटीच जायला लागली. एक-दोनदा लवकर आली आणि नंतर अर्धा तास आणि नंतर एक तास असा वेळ वाढत गेला. संपतला चामड्यातून, चपला ठोकण्यातून आणि तालुक्यातले बाजार करून एवढा वेळ नव्हता, की तो तिच्या मागे जाईल. तो बाजारला गेला, की ती संधी सोडत नव्हती. आई या भानगडीत पाडण्याइतकी डोळस नव्हती. संपतनं सांगितल्यावर आईसोबत जाऊ लागली, पण दिवसातून एखाददुसर्‍या वेळेला. तिसर्‍या आणि चौथ्या वेळी तिला जायला जमत नव्हतं. आता तिघांचं युद्ध सुरू झालं होतं. गल्ली गंमत बघत होती.

एकदा संपत कैकाड्याच्या माडीकडून संगमावर न येता त्याच्या विरुद्ध बाजूनं येत होता. घराच्या मागे अंबिका संडासचा डब्बा मोकळा करताना दिसली आणि तशीच घराच्या मागच्या बोळीतून निघाली. संपतच्या हातातून सायकल गळून पडली. तो तिच्या मागे निघाला. ती दबकत दबकत शफिक मटण शॉपपर्यंत आली. एकदा मागे वळून पाहिलं आणि मग सरळ न घाबरता आत्मविश्वासानं चालत निघाली. तिनं मागे बघताच संपत थोडा एका पत्र्याच्या मागे लपला आणि नंतर जोरात मागे गेला. ती थेट दोन-तीन वळणं घेऊन आनंदच्या खोलीत शिरली. संपत गारद झाला. पुढे काय वाढून ठेवलं आहे, त्याला माहीत होतं. अगदी पहिल्यांदा अंबिका उशिरा आल्यावर, किंवा काही वेळापूर्वी डब्यातलं पाणी ओतून देताना पाहिल्यावर. मनाशी बांधलेलं अंतिम सत्य त्याला समोर बघायचं होतं. त्याला फार वेळ काहीच सुचत नव्हतं. नंतर धीर एकवटून त्यानं पुढे जाऊन दरवाजाची कडी वाजवली. बराच वेळ हालचाली ऐकू येत होत्या, पण दरवाज्याकडे कुणी येत नव्हतं. संपत आता दगड झाला होता.
धाडकन दरवाजा उघडला आणि समोर बंटी.

एवढं सगळं उद्ध्वस्त झालेल्या संपतचा जीव निघून गेला आणि बंटी पटकन नजर खाली घेऊन आत गेला. अंबिका बाहेर आली. तो तिला काही बोलला नाही. सरळ चालत येऊन घरात गेला. अंक्या वरून बघत थोडा चरकला. आज आतून कसलेच रडण्यापाडण्याचे आवाज आले नाहीत. संपत न जेवताच पाय उराशी घेऊन झोपी गेला. त्यानं टाकून दिलेली सायकल त्याचा पोरगा रात्री उशिरा घेऊन आला. संपत काहीच न सांगता सकाळी बाजाराला निघून गेला. संध्याकाळी आला, तेव्हा गायकवाड सरांची गाडी दारासमोर लागली होती. तो हातपाय धुऊन दारात येऊन पाणी पीत राहिला. कडवट लागत होता, पण एक कप चहाही त्यानं प्याला. केसरच्या घरासमोर आज बंटी काही दिसत नव्हता. संपत चहा पिऊन गायकवाड सरांच्या दारात जाऊन उभा राहिला. दरवाजा वाजवला. मॅडम बाहेर आल्या. ‘सर आत्ताच आले आहेत’ म्हणून आत गेल्या आणि दार लावून घेतलं. तेवढ्यात बंटी आला, सरांचा अंदाज घेतला आणि अंक्याकडे वर गेला. संपत तसाच उभा राहिला, परत आला. उंबर्‍यात बसला. त्याला गप्प बसवेना. पुन्हा उठला आणि जाऊन दरवाजा वाजवला. पुन्हा मॅडम आल्या. पुन्हा तेच. या वेळी संपत एक-दोन शब्द पुढे बोलला आणि मॅडम थेट आत गेल्या. सर बाहेर आले. त्यांनी संपतला आत घेतलं. चहा दिला. चहा झाला. संपतला शब्द फुटेना. थेट डोळ्यांत पाणी आलं आणि फक्त ‘बंटीसाहेब’ हा शब्द बाहेर आला. आकांतानं तो रडायला लागला आणि पुन्हा एकदा ‘अंबिका’ म्हणाला. बराच वेळ गेला. सरांनी मुद्देसूद ऐकून घेतलं. मॅडम ‘बंटी असं काही करणार नाही’ वगैरे म्हणत राहिल्या. गायकवाड सर संगमाच्या बाजूच्या दरवाजातून बाहेर आले आणि बंटीची गाडी बघून त्यांनी बंटीला हाक मारली. बंटी खाली आला, त्याच क्षणी सरांनी एक जोरात कानफटात मारली आणि बंटी पडक्या कोपर्‍याला धडकला. नंतर दोघंही आत गेले. पुन्हा काहीबाही आवाज येत राहिले. बंटीनं कसलीही ‘हो नाही’ म्हणण्याची तसदी घेतली नाही. त्याला हे लपवण्याइतका बिनलाजेपणा सरांपुढे करता आला नाही.

तो दिवस लोटला. पुन्हा अंबिकाची शाळा सुरू झाली. संपतला ज्याची भीती होती ते सगळं होऊन गेलं. आता फक्त यातून मार्ग काढायचा होता, किंवा पुन्हा हे होऊ नये यासाठी प्रयत्न. हे सगळ्या गल्लीत आणि आजूबाजूच्या गल्लीतही गेलं म्हणून मान थोडी जास्त खाली जात होती, हाच काय तो फरक.
गल्लीत बंटी, अंक्या यांच्यासाठी पुन्हा खेळ सुरू करणं भाग होतं. आनंद आणि लव्ह्या यांना संपतची दया येणं, अंबिकाच्या गूढ वागण्याबद्दल आणि एका मर्यादेनंतर बंटीच्या मुलगी फितवण्याच्या कौशल्याबद्दल असूया वाटणं एकत्र सुरू होतं. अंबिकाच्या या प्रकारापेक्षा तिच्या गप्प राहण्याबद्दल सगळ्यांना विशेष वाटत होतं. बंटी गँगला हे चांगलंच वाटत होतं, की ती जास्त किंवा काहीच बोलत नाही.
अंक्या वस्ताद एकदा म्हणाला, ‘‘चांगलंय की मायझो, मुकी झवली, हाक ना बोंब.’’

आनंदनं आता त्याची रूम बंटीला द्यायला नकार दिला आणि ‘चावी दे’ म्हणाला. बंटी ‘‘आता जवळ नाही, उद्या देतो,’’ म्हणाला. त्या एका दिवसात बंटीनं त्याची आणखी एक चावी बनवली आणि त्याच्या बाहेर जाण्याच्या वेळेत रूम वापरणं सुरू ठेवलं. नंतर ते आनंदला कळलं आणि शेवटी तो रूम सोडून गेला. पुढचे चार-पाच महिने संपत जमेल तसं रेटत राहिला. अंबिकाच्या वेळांवर लक्ष ठेवत राहिला. आनंदच्या रूमजवळून जाताना त्याच्या पोटात कालवून जागेवर बसण्याची त्याची इच्छा होत होती. शेवटी अंबिकाच्या परीक्षा संपल्या आणि त्यानं दुसरी रूम शोधली. तीही याच गावात. शाळेच्या पलीकडून मोरे वस्तीवर.
गाडी गल्लीबाहेर जाताना गायकवाड सर आणि सगळी गल्ली खाली बघत होती, फक्त एम.पी.एस.सी. लव्ह्या काहीतरी गहन विचार करत होता. शेवटी काही वेळानं रामजाने राजा आणि अंक्या वस्ताद परत आले आणि बंटीला जवळ घेऊन म्हणाले, ‘‘मोरे वस्ती. जगतापच्या खोल्या हैत ना. त्यातली लास्टची. आपला ओपनिंग बॉलर तिथेच अलीकडच्या लायनीत राहतोय. जमतोय खेळ.’’
‘‘मुकी झवली…
बंटी तिरकं हसत म्हणाला, ‘‘हाक ना बोंब भेन्चो!’’

– भीमराज पालकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.