Now Reading
हरवले ते गवसले…

हरवले ते गवसले…

Menaka Prakashan

दचकून जागी झाली सरोज. ‘‘हरवली… माझी मुलगी हरवली… नीरजा… नीरजा… कुठे आहेस तू?’’ असं पुटपुटत ताड्कन उठून बसली सरोज. आपण घरात बिछान्यात आहोत आणि पाहिलं ते स्वप्न होतं, हे समजायला अजून थोडा वेळ लागला तिला. मग समजूनही किती तरी वेळ तिचं हृदय धडधडत होतं. ते स्वप्न- पहाटेचं- खरं तर होणार नाही ना, या धास्तीनं झोपही लागेना. सकाळ होण्याची वाट पाहत ती तशीच पडून राहिली. नीरजाला फोन करून तिचा आवाज ऐकेपर्यंत स्वस्थता लाभणार नव्हतीच आणि सुहासला, किंवा आईंना सांगायची सोय नव्हती.

सकाळची रोजची कामांची गडबड सुरू झाली. त्यातही सरोज ते स्वप्न आठवून बेचैन होत होती. तिची अस्वस्थता सुहासच्या आणि आईंच्या लक्षात आली नाही, हे बरंच झालं. सुहास ऑफिसला गेला, तशी निवांत बसली ती, पण ते स्वप्न पुन्हा दिसू लागलं तिला. ती आणि नीरजा बाजारात खरेदीला गेल्या होत्या. बाजारात खूप गर्दी. दोघी मजेत शॉपिंग करत होत्या. तेवढ्यात गडबड-गोंधळ, ढकलाढकली सुरू झाली. दोघींचे धरलेले हात सुटले. दोघी वेगळ्या झाल्या. सरोज नीरजाला हाका मारत शोधतीये… धावतीये… पण ती कुठेच दिसेना. सरोज रडवेली झाली. ‘माझी मुलगी हरवली… कुठे आहे… निरू… नीरजा…’ असं ओरडतीये… आणि दचकून जागी झाली सरोज.

‘नीरजाला फोन लावतेच आता’ म्हणत सरोज मोबाईल शोधू लागली. नीरजा दूर चेन्नईत एका संस्थेत वाईल्ड लाईफसंदर्भात कसलासा कोर्स करायला गेली होती. पहिल्यांदाच घरापासून दूर. सरोजनं फोन लावला, पण ‘आपण संपर्क क्षेत्राबाहेर आहात,’ असा मेसेज आला. सरोजनं पुन्हा फोन लावला. पुन्हा तोच मेसेज. ‘काय करावं आता? आत्ता दहा वाजलेत, म्हणजे लॅबमध्ये असेल का ती? तिथे रेंज नसेल बहुतेक.’ तिनं पुन्हा फोन लावला. पुन्हा संपर्क क्षेत्राबाहेर… सरोज बेचैन झाली. नीरजाशी बोलल्याशिवाय तिला काही सुचणारच नाही आता. तिला विचित्र भीती वाटू लागली. ‘कशी असेल निरू? तिला काही झालं तर नसेल? परक्या ठिकाणी, एवढ्या लांब, एकटी तरुण पोरगी… कुणी काही केलं तर नसेल? कुणी फसवलं तर नसेल? देवा रे… लक्ष ठेव रे बाबा! काय करावं? सुहासला सांगावं का? नको, तो कामात असेल. आईंनाही नको. त्यांचा विरोधच होता तिला तिकडे पाठवायला. फोन लागेपर्यंत जीव जाईल माझा…’ सरोजनं पुन्हा फोन लावला. खूप वेळ टुक… टुक… ऐकत बसली. तोच रिंग वाजली… वाजली… वाजतीये… जीव कानांत गोळा झाला सरोजचा. एकदाचा फोन उचलला गेला.

‘‘हॅलो आई…’’
‘‘हॅलो निरू, कशी आहेस तू? फोन का लागत नव्हता? कुठे आहेस?’’
‘‘अगं आई, ठीक आहे मी. अगं, लॅबमध्ये आहे. इथे रेंज नसते ना बर्‍याचदा. काय झालं?’’
‘‘अगं, काही नाही, सहजच…’’
‘‘बरं, मी तुला नंतर करते फोन. बाय!’’

फोन बंद झाला आणि सरोजचा जीव जरा निवांतला. पोरीचा आवाज ऐकला, ती ठीक आहे. हुश्श! मन स्वस्थ झालं. तशी ती पुढच्या कामाला लागली, पण ते स्वप्न काही तिच्या डोक्यातून जाईना. ‘हे स्वप्न म्हणजे आपल्याच मनाचे खेळ की काही संकेत, भविष्यसूचक? ती माणसांची गर्दी, चेंगराचेंगरी, निरूचं दिसेनासं होणं, आपलं घाबरणं, धाव धाव धावणं…’ तिच्या डोळ्यांपुढून हटत नव्हतं. आणि भलभलत्या विचारांचं मोहोळ घोंघावणंही थांबत नव्हतं. याचा काय अर्थ असेल? हल्ली निरू फार एककल्ली झाली आहे. हट्टी तर आहेच. स्वतःला वाटेल तेच करायचं, कुणाचं ऐकायचं नाही, दुरुत्तरं करायची, सतत मोबाईलमध्ये रमायचं, नाहीतर मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर भटकायचं… हे प्रमाण वाढलं होतं. तरुण, स्वप्नाळू वय, नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम, पगडा, शिवाय दोन पिढ्यांतला विचारातला फरक… चालायचंच, असं म्हणत सरोज तिला समजून घेण्याचा प्रयत्न करते, कायम. सुहास तर पहिल्यापासून फक्त लाडच करतो. ती म्हणेल ते द्यायचं, ती म्हणेल त्याला याचा पाठिंबा, विरोध नाही, चर्चा नाही. फक्त लाड. त्यामुळे निरू कधीकधी टोकाचं वागते. एकदा ती सरोजला म्हणाली, ‘‘मला इथे राहायला नाही आवडत, तू सारखी कटकट करतेस, बोअर करतेस…’’ तेव्हा सरोजला धक्काच बसला होता आणि वाईटही वाटलं. ‘इतकं प्रेमानं, काळजीनं वागतो आपण, वेळच्या वेळी खाणं पिणं सांभाळतो, घरातलं एकही काम सांगत नाही, सर्व सुखसोयी… तरी ही अशी कशी म्हणते? हिला काही प्रेम, आदर, भावना आहेत का नाहीत?’ सरोज विचार करून खिन्न व्हायची. त्यातच एक दिवस निरूनं जाहीर केलं, ती चेन्नईतल्या संस्थेत एक कोर्स करायला जाणार आहे. त्याची फी इतकी, तिथला राहण्याचा-जेवणाचा खर्च इतका, या तारखेला निघणार… सगळं फायनल झाल्यावरच सरोज-सुहासला कळलं. आधी कानांवर घालणं, परवानगी मागणं, असलं काहीही नाही. एकदम निर्णय! नेहमीप्रमाणे सुहासचा पूर्ण पाठिंबा. मुलगी कशी स्वतंत्र विचार करते, निर्णय घेते, याचाच अभिमान. पण बाकीच्या गोष्टींचं काय? तिथे एकटी राहणार, संस्था कुठली, ओळखीचं कुणी आहे का, मैत्रीण वगैरे, राहायची सोय – होस्टेल की पेईंग गेस्ट, बरोबर कोण… सगळ्या चौकश्या करायला नको का? चालले लगेच… सरोजची चिडचिड झाली. पण नीरजानं आपलंच खरं केलं आणि पुढच्या आठवड्यात सुहास तिला पोचवून, सगळी व्यवस्था लावून आलासुद्धा. त्या दिवसापासून सरोजची झोप कमी झाली. एकतर लेकीची चिंता आणि दुसरं म्हणजे तिचं अलिप्त, कोरडं वागणं.

त्यात ते स्वप्न! सरोजचा जीव धास्तावला. ‘खरंच, पोर तुटणार का आपल्यापासून? दूर जाणार का? खरंच हरवेल का ती या अफाट जनसागरात? आपली माया तिला आणेल का परत? कळेल का तिला आपली चिंता, प्रेम? रक्ताचं नातं कमकुवत कसं असेल? तिला आमची आठवण येत असेलच की. माझं, सुहासचं प्रेम तिला जाचक वाटतंय का? तिकडे तिला मुक्त, स्वतंत्र वाटत असेल का? देवा, माझी पोर माझ्याजवळ परत येऊ दे. मनानं तरी ती जवळ असू दे…’
एक दिवस संध्याकाळी सरोज सामान आणायला बाजारात गेली होती. दुकानात असताना मोबाईल वाजला. बघितला तर नीरजाचा फोन. अनपेक्षितच. सहसा आपणहून ती फोन करत नाही. मग आज? सरोजं घाईघाईनं फोन उचलला. ‘‘हॅलो निरू, बोल गं…’’
‘‘हॅलो, आई…’’ निरूचा आवाज… पुढे शांतता…
‘‘हां, बोल…’’ सरोजला फारच आनंद झाला. लेकीला आठवण आली आपली. हेच सांगायचं असेल तिला, पण निरू गप्पच. ‘‘अगं, बोल ना… काय झालं? बरी आहेस ना?’’ सरोज काळजीत पडली.
‘‘हो, बरीये… ठीक आहे…’’ निरूचा तुटक, उदास स्वर.
‘‘निरू, काय झालंय? बोल अगं… तब्येत ठीक आहे ना?’’
‘‘तू बाहेर आहेस का? ठेवते फोन…’’
‘‘बरं, घरी गेल्यावर करते मी फोन…’’
सरोज धास्तावली. ‘काय झालं हिला? बरं नाही का? कुणी काही केलं तर नाही? कुणाशी भांडण? अरे देवा…’ भलतेसलते विचार डोक्यात गर्दी करू लागले. अंतर पण इतकं आहे ना, की पटकन जाताही येत नाही. घाईघाईनं खरेदी उरकून सरोज घरी परतली. आधी थंडगार पाणी प्यायली. खुर्चीत बसून जरा मनाला स्थिर केलं आणि मग तिनं लेकीला फोन लावला. ‘‘काय झालं, बरं नाही का, ताप आलाय का, कुणी बोललं का, पैसे हवेत का…’’ छळणारे सगळे प्रश्न विचारून झाले, तरी निरू ‘हो, नाही, तसं नाही…’ यापेक्षा जास्त काही बोलेना. पण तिचा आवाज रडवेला, निराश होता. आता मात्र सरोजचा धीर खचला. काहीतरी अघटित घडलं तर नाही ना? तेवढ्यात निरू म्हणाली, ‘‘आई, तू इकडे येतेस का?’’

‘‘काय? तिकडे येऊ? काय झालंय? नीट सांगतेस का? असं उठून लगेच कसं येता येईल मला तिकडे? काय झालंय ते सांग ना… काळजी वाटते बाळा तुझी…’’
‘‘आई, अगं… तसं काही नाही… पण अगं… अं… खूप पिंपल्स आलेत अगं चेहर्‍यावर माझ्या… काय करू मी? कसंतरीच वाटतंय आरशात पाहिल्यावर… कुठे जावंसं वाटत नाही, इन्स्टिट्यूटमध्येही नाही… तू सांगायचीस ना, हे लाव, ते लाव… ते सांग परत…’’ निरू रडवेल्या आवाजात सांगत होती आणि ते ऐकताना सरोजला हसावं की रडावं, तेच कळेना. मनावरचं ओझं हलकं झालं आणि हसूच आलं तिला. तिचं हसणं ऐकून निरू चिडलीच.
‘‘तू हसू नकोस हं आई… आधी सांग मला तुझे ते घरगुती उपाय…’’ रडवेला आवाज आता जरबेचा झाला, नेहमीसारखा.

‘‘बरं, बरं. सांगते ऐक…’’ हसू आवरून सरोज म्हणाली. मग तिनं घरगुती उपायांची यादीच उभी केली – ‘‘आयुर्वेदिक काढा घे; दोन-तीन वेळा स्वच्छ तोंड धू; दुधात लिंबू, मध घालून चेहर्‍याला लाव; काकडी लाव; मांसाहार जास्त नको; मसालेदार पदार्थ, जंक फूड नको; रात्री केसांना तेल लाव; रात्री लवकर झोप; सकाळी उठून प्राणायाम, सूर्यनमस्कार घाल…’’ नेहमी ती जे जे सांगत असते आणि निरू दुर्लक्ष करत असते, ते ते सांगत बसली सरोज आणि कधी नव्हे ते निरू मन लावून ऐकत होती.
‘‘ ठीक आहे? आलं ना लक्षात? काळजी घे गं. नीट राहा. पैसे आहेत ना? आजी आठवण काढत असते, तिलाही फोन करावा बाळा… अजून काही? बरं, बरं… ठेवू फोन आता? लक्षात ठेव सांगितलेलं आणि कळव मग. चल… बाय…!’’ फोन ठेवल्यावर पुन्हा हसू आलं सरोजला. मनाशीच पुटपुटली, ‘सापडली गं बाई, हरवलेली पोर सापडली!’

– स्वाती दाढे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.