Now Reading
स्वस्तातला सौदा

स्वस्तातला सौदा

Menaka Prakashan

गॅदरिन्गमधला नाच संपवून आलेले वीस तानाजी बिस्किटं खात नुकत्याच झालेल्या नाचाबद्दल एकमेकांशी जोरजोरात बोलत होते. चेहरे दमलेले होते, डोळे झोपाळले होते, पण उत्साह ओसंडून वाहत होता. लालचुटूक मावळी पगड्या, पांढरे अंगरखे, निळे-जांभळे शेले, कमरेला लटकणार्‍या तलवारी, पिळदार मिश्या, रेखीव गंध असे नटलेले ते शिवरायांचे सैनिक आत्ताच मोहीम फत्ते करून, टाळ्यांची लूट मिळवून परतले होते आणि पुढच्या मोहिमेचे बेत करत होते. पुढच्या वर्षीसुद्धा पुन्हा मावळे होऊन पावनखिंड लढवायचं त्यांनी नक्की केलं होतं. बाजी प्रभू म्हटल्यावर दोन्ही हातांत तलवारी घेऊन लढायचं होतं आणि ती वीरश्री आत्ताच त्यांच्या अंगात संचारली होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाचे शिक्षक त्यांना आवरत होते आणि एकेका तानाजीची आई येऊन आपापल्या तानाजीला हुडकून घरी घेऊन जात होती.
त्या गर्दीतून वाट काढत संगीता त्या खोलीत आली. तिच्या चेहर्‍यावर संताप, दुःख आणि अपमान असे संमिश्र भाव दिसत होते. त्या संतापाच्या भरात ती काहीतरी पुटपुटत होती. तिनं तिच्या मुलाला- संजूला- हुडकलं, त्याच्या बखोटीला पकडलं आणि त्याला दरादरा ओढत बाहेर घेऊन गेली. संजू तिच्याकडे बघत उत्साहात विचारत होता, ‘‘आई, बघितलंस आमचा नाच कसला मस्त झाला ते? मी दिसलो तुला? कसा दिसत होतो? सेम तानाजी ना? ’’
त्याच्या एकाही प्रश्‍नाला उत्तर न देता संतप्त चेहर्‍यानं ती तरातरा चालली होती. हाताला हिसका देत संजूनं परत विचारलं, ‘‘सांग ना आई… कसा दिसत होतो मी?’’
आधीच संगीताचा पारा चढला होता, त्यात ही भुणभुण तिला असह्य झाली. ती दातओठ खात खालच्या स्वरात खेकसली, ‘‘बास झालं कौतुक. शेकड्यानं पैसे मोजून कपडे आणा… चार-चार तास पोरं बसवा… शेवटी उपयोग शून्य… वशिलेबाजी सगळी…’’ तिचं बोलणं संजूला काहीच कळत नव्हतं, पण आई चिडली आहे, हे त्याला कळलं. तोही मुकाट्यानं चालायला लागला. त्याच्या डोळ्यांत झोप उतरली होती. अंग दमून गेलं होतं. तो कसेबसे पाय ओढायला लागला. केव्हा एकदा घर येतंय आणि आपण गादीवर पसरतोय, असं त्याला झालं होतं.
घरी आल्या आल्या त्यानं पायातल्या चपला भिरकावल्या आणि कॉटकडे मोर्चा वळवला. तो तसाच झोपणार हे लक्षात आल्यावर संगीता ओरडली, ‘‘आधी अंगातले कपडे काढा. ते बाद झाले तर आणि शंभरभर रुपये मोजावे लागतील. कपडे काढा, दोन घास गिळा आणि मग लोळा…’’ असं म्हणत संजूला पकडून तिनं त्याच्या अंगातले मावळ्याचे कपडे काढले. कसाबसा तिनं दिलेला दूधभात खाऊन संजू कलंडला आणि अंग टेकल्या टेकल्या गाढ झोपला. त्याच्या कपाळावरचं गंध, नाकाखाली रंगवलेल्या पिळदार मिश्या, कानांशेजारचे कल्ले अजून तसेच होते. त्याच्याकडे बघून संगीताला रडायला यायला लागलं. ‘एवढा छान दिसत होता, एवढा छान नाचत होता. मग असं का केलं त्यांनी?’ तिला पुन्हा पुन्हा उमाळे येत होते. तीही संजूशेजारी आडवी झाली आणि तिचाही डोळा लागला.
संगीताला जाग आली, तेव्हा बेल वाजत होती. तिनं घड्याळाकडे बघितलं. नऊ वाजायला आले होते. ‘अशी कशी अवेळी झोप लागली,’ असं म्हणत तिनं दार उघडलं. दारात शेखर उभा होता. ‘‘काय गं, झोपली होतीस वाटतं?’’ त्यानं जरासं हसतच विचारलं. तोपर्यंत संगीता पूर्ण जागी झाली होती. तिला संजूचं गॅदरिन्ग, त्याचा नाच सगळं आठवायला लागलं आणि पुन्हा एकदा संताप तिच्या डोक्यात नाचायला लागला. ती शेखरवर एकदम ओरडली. ‘‘झोपेन नाहीतर काहीही करीन. चिरंजीवांच्या गॅदरिन्गसाठी दुपारपासनं नाचतेय, त्याचं कुणाला काही नाही. आणि पडल्यावर डोळा लागला, तर तेवढं लगेच दिसलं…’’ असं म्हणताना तिला रडायला यायला लागलं. काहीतरी बिनसलंय हे शेखरच्या लक्षात आलं. तो तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, ‘‘काय झालं?’’
रडत रडतच ती म्हणाली, ‘‘अहो, आपला संजू किती छान दिसतो ना… आणि आज तो मावळ्याचा ड्रेस घातल्यावर तर एकदम तडफदार दिसत होता. पण काही उपयोग नाही. त्याची जागा कुठे, तर मागच्या रांगेत… कोपर्‍यात. गाड्यांतनं येतात ना, मग पहिली रांग त्यांचीच! आमच्याकडे कुठली गाडी? अहो, पोर मघापासनं सारखं विचारतंय, ‘आई मी कसा दिसत होतो?’ त्याला काय सांगू? का सांगू?… ‘बाबारे, तू मागच्या रांगेत होतास, तिथेच नाचलास… कुणालाही दिसत नव्हतास… मला अजिबात दिसला नाहीस.’ आता म्हणे कार्यक्रमाची सीडी पालकांना पन्नास रुपयांत देणार आहेत. आमचं लेकरू दिसत नसेल, तर कोण घेणार ती सीडी? आता एक मात्र मी ठरवलंय, पुढच्या वर्षीपासनं गॅदरिन्ग नको म्हणजे नकोच! म्हणजे भारंभार खर्च व्हायला नको आणि नंतरचा डोक्याला त्रास नको.’’
शेखरला काय झालंय त्याचा अंदाज आला. आत्ता काही बोलून उपयोग नाही, हेही त्याला कळलं. त्यामुळे तो काही न बोलता संगीताजवळ बसून राहिला. संजूच्या अंगावरनं हात फिरवत राहिला. त्याच्या हाताच्या स्पर्शानं संजूची झोप चाळवली. त्यानं डोळे उघडले. समोर शेखर दिसल्यावर झोपेतच तो म्हणाला, ‘‘बाबा, नाच मस्त झाला.’’ त्याला आणखी सांगायचं होतं, पण झोप अनावर होती. शेखरच्या हाताला घट्ट मिठी मारून तो दुसर्‍या क्षणी गाढ झोपला.
संजूची झोप सकाळी लवकर पूर्ण झाली. ताज्यातवान्या झालेल्या संजूनं शेखरच्या अंगावर उडी मारली आणि ओरडून विचारलं, ‘‘बाबा, काल आला नव्हतात ना?… का आला नाहीत कबूल करूनसुद्धा?’’ आणि तो शेखरला गुद्दे मारायला लागला. त्याला पकडून गुदगुल्या करत शेखर म्हणाला, ‘‘असं कसं… संजा, एकदा येणार म्हटलं की येणारच… काल पळत आलो होतो. मला वाटलं उशीर झाला, पण मी शिरलो आणि माईकवरनं सांगितलं, ‘इयत्ता तिसरी ‘क’ सादर करणार आहे, पोवाडा – ‘गड आला पण सिंह गेला’. म्हटलं, तिसरी ‘क’ म्हणजे संजाचाच वर्ग! आणि तू मला सांगितलंच होतंस, तू तानाजी आहेस ते. म्हणून मी गर्दीतनं मान काढून पाय उंच करून बघायला लागलो.’’
त्याचं बोलणं ऐकून संजूला खुदुखुदु हसायला येत होतं. त्यानं विचारलं, ‘‘तुम्ही पाय वर करून बघत होतात?’’ ‘‘तर काय…’’ शेखर सांगायला लागला, ‘‘तेवढ्यात पडदा उघडला आणि आले की सगळे तानाजी… आणि लागले नाचायला…’’
‘‘आणि बाबा, तुम्हाला मी दिसलो?’’ संजूनं उत्सुकतेनं विचारलं.
शेखरनं सागितलं, ‘‘म्हणजे काय? आणि त्याची पण एक गंमत झाली.’’
‘‘कसली गंमत?’’ संजूचा चेहरा उत्सुकतेनं ओसंडून वाहत होता. शेखर म्हणाला, ‘‘तर… बरं का, मी तानाजी बघत होतो. माझ्याशेजारी एक बाबा उभा होता. बरं का, तो नाचावर एकदम खूष. मला म्हणाला, ‘काय नाचतात बघा पोरं… एकदम बेस्ट! आणि ते बघा, ते बघा ते… मागच्या लायनीतल्या कोपर्‍यातलं पोरगं बगटलं का कसलं फक्कड नाचतंय… आणि दिसतंय तर काय एकदम गोड… देखणं पान!’ मी बघितलं तर काय, आमचा संजा!’’
संजूचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर लख्ख दिसत होता. त्याचे डोळे मोठे झाले होते. त्याचं सगळं शरीर दाबलेल्या स्प्रिन्गसारखं झालं होतं. ‘‘संजा, लेका कसला भारी दिसत होता राव तू… एकदम डिट्टो तानाजी!’’ शेखरचं बोलणं ऐकून संजा उसळला. ‘तानाजी… तानाजी…’ असं ओरडत नाचत सुटला.
शेखर आणि संजू बोलत होते, तेव्हा स्वयंपाकघरात संगीताची पुटपुट सुरूच होती. ‘‘कसला तानाजी आणि कसला नाच… काही दिसलं तर बघणार ना? कशाला पोराशी खोटं बोलायचं? न येता थापा मारायला बरं जमतं. इकडे आम्ही नाचतोय! ड्रेस आणा, प्रॅक्टिससाठी शाळेत सोडा… आणायला जा… बाहेरचं महागडं खाणं घेऊन द्या… उपयोग काय झाला… मागच्या रांगेतला कोपरा…’’
तेवढ्यात संजू तिथे येऊन तिच्यासमोर नाचायला लागला. ओरडत ओरडत म्हणाला, ‘‘बघ, बाबांनीसुद्धा बघितलं, काल सेम तानाजी दिसत होतो मी…’’ ते ऐकून संगीता उपहासानं म्हणाली, ‘‘बाबांना काय, दिव्य दृष्टी आहे! ते कुठूनही बघतील. अगदी ऑफिसातसुद्धा! मलाच मेलीला मागच्या रांगेतनंसुद्धा दिसत नाही.’’
बोलणं वेगळं वळण घेतंय, हे बघून शेखर आत येत म्हणाला, ‘‘संजा, लेका आज काय आहे गॅदरिन्गमध्ये?’’
संजू नुसता उसळत होता. त्या उड्या सुरू ठेवतच तो म्हणाला, ‘‘आज ना, जेवण आहे… जेवण…’’ नाचणार्‍या संजूला पकडत शेखरनं विचारलं, ‘‘मग काय भूक लागावी म्हणून नाचतो आहेस काय? जा की पटापटा आवर आणि जा जेवायला. जिलब्या, गुलाबजाम जे असेल ते हाणून ये.’’ मागनं संगीता म्हणाली, ‘‘म्हणजे तेवढे तरी पैसे वसूल होतील. आणि तुम्ही हो… सकाळी सकाळी तो मावळ्याचा ड्रेस परत करा, नाहीतर आजचंसुद्धा भाडं द्यावं लागेल.’’
चहा पिता पिता शेखर म्हणाला, ‘‘हो, बरी आठवण केलीस. सकाळीच जातो. पण काय गं, काल फोटो काढला का आमच्या तानाजीचा?’’ आंबट चेहर्‍यानं संगीता म्हणाली, ‘‘नाही काढला. तो आणि पन्नास रुपये खर्च कशाला?’’
सगळं आवरून संजू गॅदरिन्गचं जेवायला निघाला, तेव्हा शेखर म्हणाला, ‘‘संजा, मस्त जेवण करून ये. मग ढाराढूर झोप काढ. संध्याकाळी पुन्हा तानाजीचा ड्रेस चढवून तानाजी हो. मग आपण जाऊन तुझे मस्त फोटो काढूया… आणि नंतर मग तू, रागावलेली आई आणि मी हॉटेलात जाऊन मस्त चापूया. तुझा तानाजी बेस्ट झाल्याबद्दल आणि आई दमल्याबद्दल माझ्याकडून पार्टी.’’
आसपासच्या पोरांबरोबर संजू रिक्षातून जेवायला शाळेत गेला आणि संगीताच्या संतापाचा स्फोट झाला. ‘‘काय हो, माझ्या डोक्याचा एवढा संताप होतोय आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही? आणि काय हो, आता हे फोटोचं काय काढलंत? पैसे घालवायचे धंदे… आणि मी दमले म्हणून पार्टी! काही नको मला पार्टीबिर्टी…’’ तिचा स्वर रडवेला झाला.
तिचं बोलणं ऐकता ऐकता शेखरनं मस्त चहा केला. एक कप तिच्यासमोर ठेवून चहाचा घोट घेत तो म्हणाला, ‘‘चहा घे. एकदम बरं वाटेल. कालपासून तुला त्रास होतोय, चिडचिड होतेय… तुला राग आला, कारण संजूवर तुझं जिवापाड प्रेम आहे. तो सगळ्यांना दिसावा, सगळ्यांनी त्याचं कौतुक करावं, असं तुला मनापासनं वाटत होतं. पण एक सांगू, गॅदरिन्गमध्ये आपलं मूल सोडून दुसरं कोणतंच मूल कुणालाच दिसत नाही. प्रत्येक आई, प्रत्येक बाप, आजी-आजोबा, काका-काकू, मामा, मावशी; जे कुणी तिथे आलेले असतात ना, ते फक्त स्वतःच्या घरचं मूल बघायला आलेले असतात. ते पोर पहिल्या रांगेत असेल, तर सगळे त्याच्याकडे बघणार म्हणून खूष होतात आणि मागच्या रांगेत असेल, तर कुणालाच दिसणार नाही, म्हणून नाराज होतात. संतापतात, चिडतात, शिक्षकांना नावं ठेवतात. मी तुला म्हणत नाही, सगळे तसेच असतात. अगं, या वयात सगळीच मुलं गोड दिसतात. म्हणजे दिसली तर, आणि हे सगळं आई-बापांचं असतं. मुलांचं काहीच नसतं. त्यांच्या दृष्टीतून गॅदरिन्ग म्हणजे मजा असते. पुढच्या रांगेत की मागच्या… त्याचं त्यांना काहीच वाटत नसतं. आपण कुणाला दिसलो की नाही दिसलो, याची त्यांना पर्वा नसते. फक्त आपल्या आई-वडलांना आपण कसे दिसलो, हे त्यांना हवं असतं. त्यांनी केलेल्या कौतुकानं ती खूष होतात, नाचतात, ओरडतात. आयुष्याच्या सुरुवातीला होणारं हे गॅदरिन्ग म्हणजे त्यांच्यासाठी… आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण होऊन राहते. कधीही शाळेचा विषय निघाला, की ही आठवण निघते.’’ त्याचं बोलणं ऐकताना संगीताचा चेहरा बदलत होता.
‘‘तुला तुझ्या आठवणी आहेत की नाही मला माहिती नाही,’’ शेखर म्हणाला, ‘‘पण मला लहानपणची मस्त आठवण आहे. संजूएवढाच असताना मी शाळेच्या नाटकात शिवाजी झालो होतो. दाढीमिश्या चिकटवलेला, जिरेटोप-अंगरखा घातलेला, मोठाल्या मोत्यांचे कंठे, कानांतली कुंडलं घातलेला, हातात तलवार घेऊन जरासा अवघडून बसलेला, आता स्टेजवर जायचं या कल्पनेनं थोडा घाबरलेला, अंगावर रोमांच आलेला मी मला आजही पक्का आठवतोय. स्टेजवरच्या झगमगीत प्रकाशासमोरची गर्दी आठवते आहे. माझं पहिलं वाक्यसुद्धा माझ्या लक्षात आहे. शेवटचं वाक्यही माझंच. ‘अरेरे, माझा ताना गेला. गड आला, पण सिंह गेला.’ मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट… पण तेव्हा मी कसा दिसत होतो, ते मला ठाऊकच नाही. कारण तिथे मोठा आरसाच नव्हता. वडलांनी, आईनं केलेलं कौतुक आठवतंय. फोटो काढायला हवा होता. पण तेव्हा फोटो काढणं एवढं स्वस्त नव्हतं. आता आठवतंय, पण ते रूप हरवून गेलं. संजूच्या बाबतीत तसं नाही होऊ द्यायचं. म्हणून तर ड्रेस ठेवून घेतलाय.’’
त्याला जमिनीवर आणत संगीता म्हणाली, ‘‘अहो, पण पैसे किती खर्च होतील?’’ तिचं बोलणं हातानं उडवून लावत शेखर म्हणाला, ‘‘नको विचार करूस पैशांचा. सगळं सोडून आजचा दिवस मजेत घालव. होतील, जास्तीत जास्त हजारभर रुपये खर्च होतील, पण संजूचं हे वय, त्याचा आनंद, हे दिवस, हे क्षण एकदा निसटले की निसटले.

जनार्दन लिमये, सांगली
मोबाईल : ९४२३२६८२३२

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.