Now Reading
सॅलड ते डेझर्ट

सॅलड ते डेझर्ट

Menaka Prakashan

मध्यप्रदेशात नवीन सून म्हणून पहिली दोन वर्षं मला खूप हिंदी लोकांना भेटायला जावं लागायचं. तिकडे अनेक नवीन पदार्थ खायला मिळाले. जेव्हा काही आवडायचं, तेव्हा करणारीला मी विचारायचे,
‘भाभीजी, इस में क्या क्या पडता हैं?’
असं विचारल्यावर भाभीजी दोन पावलं पुढे सरकायच्या, आणि एक नाट्यमय पॉझ घेऊन, ‘इस में सौंफ पडती हैं,’ असं सांगायच्या. मध्यप्रदेशात कोणताही पदार्थ आवडला, की त्यातला महत्त्वाचा जिन्नस सौंफ, म्हणजेच बडीशेप असते. पोहे, बर्फी, कचोरी, आलूपुरी, लोणचं सगळ्यात बडीशेप असते. तरीही यात नक्की काय आहे, याचं उत्तर बडीशेप असंच असतं. एखादी गोष्ट तुपात तळून पाकात टाकायची भारतीयांना फार हौस आहे. त्यात उत्तर भारतात मालपुवा या प्रकाराचं फार कौतुक आहे लोकांना. साखरेच्या पाकाला ‘चाशनी’ असा शब्द तिथे वापरतात. कोणताही पदार्थ तळून झाला, की ‘अब हम इसको चाशनी में डुबो देंगे,’ असं वाक्य येतं. त्या चाशनी शब्दातच फार गोडी असते.

मालपुवा
साहित्य ः तीन कप दूध, दीड कप मैदा, बडीशेप भाजून पूड करून घेतलेली (आवडीप्रमाणे), तूप (तळण्यासाठी लागेल तेवढं), दोन कप साखर, पाणी (साखर बुडेल एवढंच), केशर, बदामाचे काप.
कृती ः दूध आटवून त्यात मैदा मिसळून फेटून घ्यावा. मिश्रण पळीवाढं असावं. यात आवडीप्रमाणे बडीशेपेची पूड घालावी. शुद्ध तुपात पळीनं हे पीठ टाकून त्याच्या पुर्‍या कराव्या. पळीनं एकदाच पीठ ओतायचं आणि पुरीला छिद्रं पडू लागली, की हलके उलटावी, किंवा वरून कढत तूप घालत राहावं. केशर घालून एकतारी पाक करावा. पुर्‍या जरा थंड करून पाकात टाकाव्या आणि नंतर निथळून घ्याव्या. वरून बदामाचे काप लावावे.

चिकन बेझल मेयो सॅलड
आहाराबद्दल जागरूक असणारे बरेचजण हल्ली जेवणातली कर्बोदकं कमी करण्याच्या प्रयत्नांत असतात.
रात्रीच्या जेवणात फक्त सूप, सॅलड, नुसते मासे, किंवा इतर मांसाहारी पदार्थ पोळी, किंवा भाताशिवाय खाण्याकडे अनेकांचा कल असतो.
आहारातली कर्बोदकं कमी करून मधुमेह आटोक्यात ठेवण्यासही मदत होते, कारण फक्त प्रथिनं आणि तेल/तूप यांच्यापेक्षा कर्बोदकांनी रक्तशर्करा अधिक वाढते. पण भारतीय आहार प्रामुख्यानं शाकाहारी असल्यामुळे अशा प्रकारच्या पाककृती आपल्याकडे सहज सापडत नाहीत.
रात्रीच्या जेवणासाठी चिकन-बेझल-मेयो सॅलड उत्तम पर्याय आहे. बेझल म्हणजे आपल्या तुळशीसारखंच, पण जरा मोठ्या पानांचं झाड आहे. पिझ्झा, पास्ता अशा इटालियन पाककृतींमध्ये याची पानं हमखास वापरली जातात. मंडईमध्ये रंगीत ढोबळी मिरच्या, बेबी कॉर्न, ब्रोकोली, झुकिनी मिळणार्‍या ठिकाणी हमखास बेझल मिळेल. बिया आणून एखाद्या कुंडीत लावल्या, तर फार कमी लक्ष देऊनही छान वाढणारं रोप आहे.
साहित्य : अर्धा किलो बोनलेस चिकन, चार-पाच लसूणपाकळ्या, एक कांदा मोठे तुकडे करून, अर्धा कप मेयोनेज, अर्धा कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची, अर्धा कप बेझल बारीक चिरून, चिकन उकळण्यासाठी पाणी, चवीनुसार साखर, मीठ आणि मिरी.
कृती : पातेल्यात पाणी घेऊन त्यात लसूण आणि कांदा ठेचून घालावा. यासोबत फ्रीजमध्ये काही उरलेल्या भाज्या असतील, तर त्याही तुकडे करून घालता येतील. त्यामुळे चिकनचा वास निघून जाऊन चांगला स्वाद येईल. उकळतानाच त्यात मीठ आणि मिरी घालावी. चिकन न कापता या पाण्यात उकळायला ठेवावं. झाकण ठेवून साधारण पाऊण तास मंद आचेवर शिजू द्यावं. शिजलं की पाण्यातून काढून निथळून घ्यावं. शिजलेल्या चिकनच्या काटाचमचा वापरून रेषा रेषा कराव्या. नीट शिजलेलं चिकन हातानंही कुस्करता येतं. एका बोलमध्ये उरलेले सगळे जिन्नस घेऊन नीट मिसळून घ्यावे. सॅलड तयार.
हे सॅलड थोडं जास्त मेयोनेज घालून सँडविचमध्ये भरण्यासाठीही वापरता येऊ शकतं, पण तसं केल्यास त्यात ब्रेडमधून कर्बोदकं येतात.

इराणी मावा केक
घराजवळच्या एखाद्या बेकरीच्या बाहेर येणारे वेगवेगळे वास भूक चाळवणारे असतात आणि कधीकधी लहानपणात घेऊन जाणारेही असतात. पण इराणी मावा केक तयार होत असताना जो वास येतो, तो भारतातल्या इराणी बेकर्‍यांची खासियत आहे. तो खमंग वास तसा असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यात वापरला जाणारा खवा. काही इटालियन केकमध्येही मस्कारपोने नावाचं चीझ वापरलं जातं. केकमध्ये कसल्याही प्रकारे आटवलेलं दूध घातलं, की केकचा पोत बदलतो. थोडासा जड असला, तरी हा केक एकदम श्रीमंती होतो. चहा-कॉफी, किंवा दुधात बुडवूनही छान लागतो. आणि मुख्य म्हणजे लहान मुलांचा लाडका होतो. कृती सोपी आहे. खवा नसल्यास कंडेन्स्ड मिल्क, किंवा दुधाची पावडर घालूनही हा करता येतो. दुधाची पावडर घालताना मात्र तिच्या गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
साहित्य : एक कप साखर, दीड कप मैदा, एक कप बटर वितळवलेलं, अर्धा कप खवा, दोन अंडी, बेकिंग पावडर, टुटीफ्रुटी, बदाम इसेन्स (किंवा व्हॅनिला).
कृती ः साखरेची पिठी करून घ्यावी. मग साखर, बटर आणि अंडी यांचं मिश्रण हलकं होईपर्यंत फेटून घ्यावं. त्यात हळूहळू खवा घालावा. इलेक्ट्रिक मिक्सर असेल तर सोपं होईल, नाहीतर खवा थोडा गरम करून पातळ केला, तरी चालेल. खवा या मिश्रणात एकदम एकजीव झाला पाहिजे. शेवटी यात इसेन्स घालावा. मैद्यात बेकिंग पावडर नीट मिसळून घ्यावी आणि हळूहळू मैदा वरील मिश्रणात टाकावा आणि पुन्हा फेटून घ्यावं. टुटीफ्रुटी फक्त वरती अलगद ठेवता येतात, पण संपूर्ण केकमध्ये सम प्रमाणात हवी असल्यास तिला आधी मैद्यात लोळवून घ्यावी. याला ड्रेजिंग म्हणतात. असं केलं नाही, तर ओव्हनमध्ये मिश्रण ठेवल्या ठेवल्या टुटीफ्रुटी खाली बुडतात. कागदी बेकिंग कप मफिन टिनमध्ये ठेवून त्यात मिश्रण काठोकाठ भरावं. म्हणजे सुंदर मफिन टॉप येईल. एकशे पन्नास-एकशे ऐंशी से.च्यामधे, ओव्हनचा अंदाज घेऊन तीस-चाळीस मिनिटं भाजावा.
टुटीफ्रुटी ऐवजी बदामाचे कापसुद्धा छान लागतात.

फ्रेंच पाईनॅपल टार्ट (अननसाचा केक)
फ्रान्समधल्या गोड पाककृती जगभरात नावाजल्या जातात. साखरेची अनेक रूपं या पाककृतींमध्ये बघायला मिळतात. क्रेम ब्रुलेमध्ये साखर सरळ विस्तवानं जाळून वरून टणक केलेलं कवच, किंवा फक्त अंडी आणि साखर फेटून केलेलं नाजूक मेरिंग, अनेक केक आणि टार्टमध्ये वापरलं जाणारं साखरेचं पातळ कॅरॅमल, ब्रीओशसारख्या हलक्या ब्रेडमध्ये लपून येणारी भरमसाठ साखर, अशा अनेक प्रकारे फ्रेंच पाककला साखर वापरते. काही पाककृती अगदी काटेकोरपणे वजनं घेऊन कराव्या लागतात, पण काही मात्र एखाद्या खेड्यातल्या आजीनं घरातली अनेक कामं बघता बघता केल्यात अशाही असतात. अशीच ही पाककृती. हा टार्ट बनवायला आधी पेस्ट्री बनवावी लागते. हे काम थोडं किचकट वाटू शकतं, पण करताना ते तितकं वाटत नाही.
साहित्य ः पेस्ट्रीसाठी : एक ते दीड कप मैदा, पाऊण ते एक बटर थिजलेलं छोटे छोटे तुकडे करून, फ्रीजमधलं थंड पाणी.
सारणासाठी ः दोन कप अननस चौकोनी साधारण एक इंच तुकडे केलेला, एक ते दीड कप साखर (आवडीप्रमाणे).
कृती ः पेस्ट्री एखादा दिवस आधी तयार करून फ्रीजमध्ये ठेवणं जास्त उत्तम.
एका पसरट भांड्यात पीठ आणि बटरचे तुकडे घेऊन हाताच्या बोटांनी एकजीव करावे. बटर आणि मैद्याचे छोटे छोटे कण झाले, की त्यात थंड पाणी घालून हलक्या हातानं मळून घ्यावं. कणीक जास्त तिंबू नये, कारण आपल्याला पोळीसारखं त्यात ग्लुटेन तयार व्हायला नको. जितकी कमी तिंबू तितका टार्ट खुसखुशीत होतो. आपण शंकरपाळ्यांचं मोहन घालून पीठ मळतो तसंच. कणीक ॅस्टिकच्या फॉईलमध्ये गुंडाळून फ्रीजरमध्ये दोन तास ठेवावी, किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल. कणीक गार होतेय तोपर्यंत एका कढईत अननस आणि साखर शिजवून घ्यावं. फळ मऊसर झालं आणि मिश्रण घट्ट झालं, की गॅस बंद करावा. कणीक बाहेर काढून थोडी सैल होऊ द्यावी. मग एका बटर पेपरवर गोळा ठेवून वरूनही बटरपेपरनं झाकून घ्यावा. अशा स्थितीत ती जमेल तशी लाटावी. आकार वेडावाकडा असला तरी काही हरकत नाही. वरचा बटर पेपर काढून, लाटलेल्या कणकेवर अननस मिश्रण ओतावं. आजूबाजूनं कणकेची वेडीवाकडी जमेल तशी घडी करावी. बटर पेपर ओव्हनच्या रॅकवर ठेवून पंचवीस मिनिटं एकशे साठ-एकशे ऐंशी अंश से.ला भाजून घ्यावी. पेस्ट्री सोनेरी दिसेपर्यंत भाजावी.

गरम बीट-भोपळा सॅलड
लाल भोपळा आणि बीट आवडणारे लोक तसे कमीच. भोपळ्याच्या अनेक पाककृती आपल्याला माहिती असतात. भरीत, भाजी, घारगे, खीर असे काही पदार्थ सर्रास केले जातात. पण बीट आणि भोपळ्याचं वैशिष्ट्य असं, की त्यांच्यात अंगची गोडी असल्यामुळे, ते भाजून घेतलं की ती आपसूक खुलतं. पाण्याचं प्रमाण उष्णतेमुळे जसं जसं कमी होतं, तशी तशी भाज्यांची चव खुलते. भोपळा उकडण्यापेक्षा तो ओव्हनमध्ये भाजून मऊ केला, तर त्याचं भरीतही अधिक चविष्ट होतं. भोपळा आणि बीट यांचं गरम सॅलड करण्याची कृती, ही सतत थंड पानं असलेलं सॅलड, कोशिंबिरी खाऊन कंटाळा आल्यामुळे तयार केली आहे. भाजून झाल्यावर भाज्यांची सालं काढावी. यामुळे भाजताना त्यांचे तुकडे केल्यामुळे, किंवा साल काढल्यामुळे त्यांचा चिखल होत नाही.
साहित्य ः पाव किलो लाल भोपळा (पाठ न काढलेला), एक बीट (सालीसकट), दोन टे. स्पून ऑलिव्ह तेल, एक टी स्पून लाल मिरचीचा चुरा, पनीर (आवडीप्रमाणे), बारीक चिरलेली बेझल/पार्स्ले, मीठ, मिरी.
कृती ः बीट आणि भोपळा ओव्हनमध्ये भाजून घ्यावा. सुरी खुपसली की ती सहजी आत गेली पाहिजे इतपत भाजावा. पनीर तव्यावर अगदी थोड्या तेलात दोन्हीकडून परतून घ्यावं. सबंध मोठा तुकडा ग्रील करून नंतर त्याचे छोटे चौकोनी तुकडे करावे. पनीर आणि भाज्यांचे एकसारख्या आकाराचे काट्यावर सहज बसतील अशा आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या. एका भांड्यात हे एकत्र करून ऑलिव्ह ते, मिरची, बेझल/पार्स्ले आणि मीठ-मिरी घालून हलक्या हातानं हलवून घ्यावं.
हे सॅलड एखाद्या सूपबरोबर खाता येतं. यात पनीरच्या ऐवजी फेटा चीझही छान लागतं. ते मात्र न तळता घालावं.

– डॉ. सई केसकर, पुणे. मोबाईल ः ८३८००९३४४२
saeekeskar@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.