Now Reading
सिंधुआज्जी आणि सणासुदीची पक्वान्नं

सिंधुआज्जी आणि सणासुदीची पक्वान्नं

Menaka Prakashan

सिंधुआज्जी तशा उत्सवप्रिय आहेत. त्यातल्या परंपरेचा आणि त्यांचा फारसा संबंध नसतो, पण विविध सणांना खास पक्वान्नं बनवायला आणि खायला मात्र सिंधुआज्जींना फार आवडतं. अशा काही पक्वान्नांबद्दल सिंधुआज्जींनी आपलं मनोगत विशद केलं, त्याची ही नोंद – त्यांच्याच शब्दांत.

थँक्सगिव्हिंगची टर्की
नोव्हेंबर महिन्यातला चौथा गुरुवार हा तसा बोअरिंग दिवस असतो. अशा धकाधकीच्या दिवसांत काही विरंगुळा हवा म्हणून मी थँक्सगिव्हिंग साजरा करते. खरंतर कुणाला धन्यवाद द्यायचे आणि कशासाठी, हे काही मला ठाऊक नाही. पण मजा येते, तर उगीच अधिक चिकित्सा कशाला करा, म्हणत्ये मी?
थँक्सगिव्हिंगच्या जेवणात टर्की ही हवीच. तर, चांगली टर्की बनवायची, तर मुळात टर्की चांगली असणं अत्यावश्यक आहे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे टर्कीपालन करणं. परसदारी, किंवा माजघरात टर्कींचा अख्खा कळप पाळता येतो. त्या उडुगणांचं सुयोग्य संगोपन केलं, तर थँक्सगिव्हिंगला उत्तम प्रतीची चवदार आणि पौष्टिक टर्की मिळू शकते.
टर्की साफ केल्यावर ओव्हनमध्ये बेक करत ठेवा. ओव्हनचं तापमान आणि बेक करायची वेळ चवीनुसार ठरवा. (उदा. टर्की रेअर म्हणजे कच्ची आवडत असल्यास दहा डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटांसाठी शिजवा.) टर्की बेक होते तोवर तींत भरण्यासाठी मसाला ऊर्फ स्टफिंग बनवून घ्या. त्यासाठी बेकन, बेसन, कांदा, कुंदा यांचं मिश्रण वापरा. बेक झालेल्या टर्कीमध्ये स्टफिंग भरा आणि ती टर्की पुन्हा गरजेनुसार बेक करा.
तयार टर्कीवर तुटून पडा.
(टीप : हा पदार्थ क्रॅनबेरी सॉससोबत अधिक चांगला लागतो. क्रॅनबेरी उपलब्ध नसल्यास स्ट्रॉबेरी, रासबेरी, किंवा बेरीबेरी या पर्यायांचा विचार चुकूनही करू नका.)
(महत्त्वाची टीप : घरातलं अस्वल आणि तरसांना टर्कीपासून दूर ठेवलंत, तर तुम्हाला अधिक प्रमाणात टर्की खाता येईल.)
(त्याहून महत्त्वाची टीप : एवढे श्रम करायचे नसल्यास टर्की पोपटी करा. यासाठी एक खड्डा खणून त्यात लाकडी कोळसे न पेटवता ठेवा. नंतर कॅम्लिनच्या पोपटी खडूनं टर्कीला रंग द्या आणि टर्की खड्ड्यात ठेवा. कणकेचा लेप देऊन खड्डा बंद करा. एका तासानंतर कणकेचा लेप काढून घ्या, पोपटी टर्की तय्यार. ही तुम्ही स्वत: न खाता घरातलं अस्वल आणि तरसांना द्या. त्यांचा दुवा लाभेल. तुम्हीही आजारी पडणार नाही.)

रशियन नववर्षाची मेजवानी
१ जानेवारीपासून डाएटवर जायचं असल्यानं मी ३१ डिसेंबरला माफक आहार घेते. पण नववर्षाची मेजवानी मिळाली नाही अशी चुटपूट, खंत, चडफड, तळमळ, रुखरुख, हुरहुर लागल्यामुळे त्या माफक आहाराचा वचपा रशियन नववर्षाला काढते.
१४ जानेवारी रोजी ज्युलियन कालगणनेनुसार नवीन वर्षाला आरंभ होतो, त्यामुळे १३ जानेवारीला मेजवानी करणं क्रमप्राप्त असतं. जेवण बेताचं नसलं, तरी जेवणाचा बेत असतो. यात सर्वात महत्त्वाची डिश म्हणजे ऑलिव्हिये सॅलड.
एका मोठ्या भांड्यात बटाटे आणि गाजरं उकडत ठेवा. दुसर्‍या लहान भांड्यात कोंबडीची अंडी उकडून घ्या. (परसदारी कळप असला म्हणून काय झालं, टर्कीची अंडी चुकूनही वापरू नका.) उकडलेली अंडी, बटाटे, गाजरं यांचे तुकडे करा. चिकन शिजवून घ्या आणि त्याचेही तुकडे करा. (माजघरात एखादी टर्की शिल्लक असेल, तर चिकनऐवजी तीही वापरू शकता. सम प्रमाणात बटाटे, गाजरं, अंडी इत्यादींचं प्रमाण वाढवा. या गोष्टी पुरेशा नसतील, तर अधिकची टर्की घरातल्या अस्वलाला आणि तरसांना द्या. त्यांचा दुवा लाभेल.) कांदा आणि काकड्या स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यांचेही तुकडे करा. मूठभर हिरवे वाटाणे घ्या आणि त्यांचेही तुकडे करा. शेपू चिरून घ्या.
सर्व सामग्री एकत्र करा. त्यात कणभर कापूर आणि मणभर मेयॉनीज मिसळा. शेपू विसरला असालच. तो आता चिरून घ्या आणि सॅलडवर त्याची पखरण करा.
ऑलिव्हिये सॅलड आवडत नसेल, तर पर्याय म्हणून नववर्षाच्या मेजवानीत पिरोगी नावाचं पाय नावाचं पक्वान्न ठेवा. तेही आवडलं नाही, तर (किंवा आवडलं तरीही) दुसरा उपाय आहेच. दुसर्‍या, किंवा तिसर्‍या दिवशी संक्रांत असल्यानं घरी तिळगूळ केले असतीलच. तिळगूळ खा, गोड गोड बोला.

संडे रोस्ट
कुणी तरी म्हटलं आहे –
‘स्वर्ग म्हणजे ब्रिटिश घर आणि चायनीज अन्न
नरक म्हणजे चायनीज घर आणि ब्रिटिश अन्न’
पण हे चुकीचं आहे. ब्रिटिश जेवणसुद्धा चांगलं लागू शकतं. चिकन टिक्का मसाला ही पारंपरिक ब्रिटिश डिश चांगली असतेच. (ब्रिटिश लोक परंपरांचे पाईक होण्याची पात्रता त्यांच्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करतात, त्यामुळे चिकनऐवजी टर्की वापरू नये. असो.) पण ब्रिटिश संस्कृतीमध्ये नंतरच्या काळात शिरकाव करणार्‍या इतरही डिशेस चांगल्या असू शकतात.
संडे रोस्ट हा खास रविवारच्या मेजवानीसाठीचा घाट. यासाठी सर्वप्रथम कॉलिफुलं, मटार आणि गाजरं विकत आणा. ब्रसेल्स स्प्राऊट्स, ब्रॉकोली, पार्सनिप, पर्सिमॉन इत्यादी अगम्य नावांच्या वस्तूदेखील विकत ऑनलाईन मागवून घ्या. तुळशीवृंदावनातून बरेचसे बटाटे खणून काढा. तुळशीवृंदावन नसेल, तर तुळशीबागेतून बटाटे आणा.
आवडतं मांस रोस्ट करून घ्या. (हत्तीचं मांस टाळा – ते वातड असतं. तुम्ही शाकाहारी असाल, तर मांसाऐवजी सुरण किंवा सोया चंक्स वापरा.)
उपलब्ध भाज्या उकडून, किंवा रोस्ट करून घ्या. रोस्ट केलेल्या भाज्या पुन्हा उकडू नका.
कांदा परतून त्याची गोड ग्रेव्ही बनवा. ग्रेव्ही गोड लागली नाही, तर खडीसाखरेचा मुबलक प्रमाणात वापर करा. ग्रेव्ही गोड लागली, तरी मुळापासून खाऊ नका.
मोठ्या ताटात रोस्ट केलेलं मांस (किंवा सुरण, किंवा सोया चंक्स), रोस्ट केलेल्या आणि/किंवा उकडलेल्या भाज्या, कांद्याची गोड ग्रेव्ही आणि यॉर्कशायर पुडिंग्ज घ्या. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी गिनेसचे दोन-तीन ग्लास रिचवा. (तुम्ही अपेयपान करत नसाल, तर द्राक्षासवाचे दोन-तीन ग्लास रिचवा.) जेवण बरं लागेल.

– देवदत्त राजाध्यक्ष (वॉम्बल)

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.