Now Reading
सिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)

सिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)

Menaka Prakashan
View Gallery

‘सिंधुआज्जी कोण आहेत?’ हा प्रश्न थोडा जटील आहे.

सिंधुआज्जी अर्क आहेत. तरुण तुर्क म्हातारे अर्क या अर्थी नाही; तर जगरहाटीची फारशी तमा न बाळगता आपल्या लॉजिकनं आपलं आयुष्य जगायच्या इच्छेचा अर्क. त्यांचा आवडता पाळीव प्राणी आणि सहकारी अस्वल आहे; आणि त्या स्लॉथ बेअरचं नावही त्यांनी ‘स्लॉथ्या’ असं ठेवलं आहे. मनात येईल तेव्हा त्या प्रवासाला बाहेर पडतात आणि तेही विमानानं/ ट्रेननं/ कारनं नव्हे, तर तराफ्यावरून. त्यांना शेतीची, शिकारीची, मासेमारीची माहिती आहे; आणि पीटर ड्रकर आणि हेन्री फेयॉलसारख्या मॅनेजमेंट कन्सल्टंट्‌सच्या थिअरीसुद्ध्या त्या कोळून प्यायल्या आहेत.

तर हा अर्क दाखण्यासाठी सिंधुआज्जी हे वयस्कर पात्र का? आपण सर्वजण बहुधा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यामोहऱ्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधतो; आणि व्यक्तिमत्त्वावरून चेहऱ्यामोहऱ्याचाही. स्वत:च्या मनाप्रमाणे जगणारी व्यक्ती ही बहुधा एखादा जीन्स-जॅकेटमधला रिबेल युवक (किंवा फारतर तशाच पहिरावातली रिबेल युवती) असेल, असं चित्र सहसा मन:चक्षूंसमोर उभं राहतं. पण पेस्टल कलरची नऊवारी पातळं नेसणारी, मराठी कविता (आणि त्यांचे अपभ्रंश) गाणारी, थोडंफार प्राज्ञ, किंवा गटणीय मराठी बोलणारी एक आज्जीबाईसुद्धा आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगू शकते; ‘Mah life, mah rules’ हा वाक्प्रचार माहीत नसला, तरी त्या धारणेनं जगू शकते, अशी गोष्ट त्यांच्यासारखं (म्हणजे अस्वलाच्या सान्निध्यात नव्हे, पण स्वत:च्या इच्छेनुरूप) जगायची सुप्त इच्छा बाळगणाऱ्यांना हुरूप देऊ शकते.

तर अशा जगावेगळ्या सिंधुआज्जींचं व्यक्तिमत्त्व असं कसं झालं, याच्या शोधात त्यांचं आगळं बालपण आणि तरुणपण यांचा शोध घ्यावा लागला. व्हेटरनरी डॉक्टरांच्या घरात जन्मल्यानं पशु-पक्ष्यांची आवड, कराची बंदरावर बालपणी भरपूर वेळ टाईमपास केल्यानं निर्माण झालेली समुद्राची आवड हे सर्व ‘सिंधुआज्जींची उगम-कहाणी’च्या पहिल्या भागात आलंय. आता हा दुसरा भाग आहे तो त्यांच्या तरुणपणाचा, coming of age चा. या भागानंतर सिंधुआज्जींच्या गोष्टीत त्यांच्या आई-वडलांचं फारसं स्थान नाही; म्हणून १९४४ मध्ये मुंबईच्या ‘व्हिक्टोरिया डॉक’मध्ये झालेल्या भीषण स्फोटाचा आणि त्यानंतर भडकलेल्या आगीचा आधार घेऊन त्यांची एक्झिट योजता आली.

या coming of age भागातल्या घटना घडतात त्या मुख्यत्वे आग्नेय आशियात. सिंधुआज्जींचा जन्मच ब्रिटिश मलायामधला असल्यानं या प्रदेशाबद्दल त्यांना ममत्व असणं स्वाभाविकच. १९४१ ते १९४७ या कालावधीत या प्रदेशात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी सिंधुआज्जींच्या साहसांना आहे. दुसऱ्या महायुद्धात जपाननं आग्नेय आशियावर केलेला हल्ला, जपानच्या सहकार्यानं ‘आझाद हिंद फौजे’ची स्थापना आणि सिंगापूरमध्ये सैन्यभरती, पुढे जपानचा पराभव, हा इतिहास आपल्याला माहीत आहेच. बोर्निओ बेटाच्या उत्तर भागात असलेल्या – आणि युद्धात मारलेल्या शत्रूंची मुंडकी जपून ठेवणाऱ्या हेडहंटर्सचा अधिवास असलेल्या – सारावाक प्रांतात १८४१ ते १९४६ या काळात असलेलं ब्रूक कुटुंबाचं राज्य (सारावाकचा श्वेत राजा – White Rajah of Sarawak) आणि दुसऱ्या महायुद्धानंतर हे राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन होणं, हा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आढळत नसला, तरी प्रचंड रोचक आहे. तसंच, आजच्या इंडोनेशियामधल्या दर्यावर्दी शूरवीरांनी शेकडो वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जवळच्या मादागास्कर बेटावर वसाहत उभारली होती आणि आजही मादागास्करची भाषा ही इंडोनेशिया-मलेशियाच्या भाषांशी मिळतीजुळती आहे, हा या प्रदेशाच्या इतिहासातला दुसरा एक रोचक पैलू. भौगोलिकदृष्ट्या आग्नेय आशियाजवळ असलेली निकोबार बेटं भारताचा भाग आहेत. या बेटावरच्या निकोबारीज आणि शॉम्पेन जमातींबद्दल आपल्या मीडियात फारसं काही छापून येत नसलं, तरी सिंधुआज्जींनी मात्र तिथे मित्र जोडले आहेत.

नित्य आयुष्याच्या चौकटीत न रुळणाऱ्या सिंधुआज्जी या विलक्षण इतिहास-भूगोल पटलावर मजा मजा करतात, हे स्वाभाविकच नाही का?

तर, आता दुसरा भाग…

मलायामधल्या निष्क्रिय जीवनाला कंटाळून सिंधु सिंगापूरला गेली आणि ‘आझाद हिंद सेने’त दाखल झाली, हे आपल्याला इतिहास सांगत नाही. एखाद्या उत्तम मायक्रोब्रुअरीत नेऊन उत्तम बिअरची पार्टी दिल्यास सिंधुआज्जी मात्र ही कहाणी तुम्हाला सांगतील. पण ‘आझाद हिंद सेने’त त्यांनी कोणती भूमिका बजावली, हे मात्र त्या सांगणार नाहीत. ‘टॉप सिक्रेट’ एवढंच सांगून त्या आपलं लक्ष बिअरकडे वळवतील. तुम्ही अगदीच पाठपुरावा केलात, तर त्या ‘ज्लखिण्न्ठप्थॉभ्री! ज्लखिण्न्ठप्थॉभ्री!’ असं वारंवार म्हणून तुम्हाला गप्प बसवतील.

पुढच्या काही वर्षांच्या गॅपनंतर सिंधुची गोष्ट पुन्हा सुरू होते ती दोस्तराष्ट्रांनी सिंगापूर पुन्हा ताब्यात घेतल्यापासून. काही महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे सिंधु अजूनही सिंगापुरातच होती. शत्रूच्या सैनिकांच्या हातावर तुरी देऊन सिंधु एका मोटारबोटीतून निसटली आणि ‘टाळ मृदंग दक्षिणेकडे, मी तर जाते पश्चिमेकडे’ असं गाणं गात वायव्येच्या निकोबार बेटांवर पोचली.

सिंधुनं पुढचे काही आठवडे निकोबारीज आणि शॉम्पेन जमातींच्या विविध पुढाऱ्यांसोबत राजनैतिक संबंध निर्माण करण्यात व्यतीत केले. त्यांच्या पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिंधुनं अनेक मौल्यवान सूचना दिल्या. नत्र-स्फुरद-पालाश खतांनी शेती कशी करावी, मासेमारीसाठी ठिबक सिंचनाचा वापर कसा करावा, शिकारीसाठी भाले न वापरता धनुष्यबाण आणि रणगाडे कसे वापरावेत, मांस शिजवण्याऐवजी धुरावलं तर चव कशी बदलते, अशा अनेक सल्ल्यांनी सिंधुनं निकोबारीज आणि शॉम्पेन जमातींचं आयुष्य सुखकर बनवलं. आजही शॉम्पेन लोक सिंधुआज्जींना ‘निकोबारच्या पीटर ड्रकर’ असं प्रेमयुक्त आदरानं म्हणतात. (निकोबारीज त्यांना ‘निकोबारच्या हेन्री फेयॉल’ असं आदरयुक्त भीतीनं म्हणतात.) तर, या सल्लेगारीमुळे सिंधुच्या निकोबारमधल्या वास्तव्याबद्दल कुणीही निकोबारीज, किंवा शॉम्पेन ब्रिटिशांकडे कागाळी करणार नाही, हे निश्चित होतं.

या काळात, निकोबारच्या विविध बेटांना भेट देण्यासाठी सिंधु तराफ्याचा वापर करत असे. तराफा बनवण्याची कला ती इतकी उत्तमरीत्या शिकली, की तराफे बनवण्याचे क्लासही तिनं सुरू केले होते. लहानथोर शॉम्पेन तिच्या व्हेकेशन बॅचला येण्यासाठी अहमहमिका करत असत. पण लवकरच तराफे बनवणं आणि मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करणं याला ती कंटाळली, आणि तिनं निकोबार सोडायचा निर्णय घेतला.

निकोबार सोडायचं; पण जायचं कुठे? जपानचा युद्धात पराभव झाला होता; आणि आग्नेय आणि दक्षिण आशियातल्या ब्रिटिश वसाहतींमध्ये सिंधुला अटक होऊ शकली असती. सयाम किंवा कोचीनचायना इथे जाण्यात सिंधुला स्वारस्य नव्हतं. सिंधुुनं शक्कल लढवली. एका प्रसन्न सकाळी एका सुबक तराफ्यावर बसून ती निघाली, खुल्या समुद्रात पोचली आणि व्यापारी वाऱ्यांच्या मार्गात नांगर टाकून वाट पाहत थांबली.

सिंधुचा कयास बरोबर होता. मादागास्करवरून आपल्या भाषेचा उगम शोधण्यासाठी डच ईस्ट इंडीजला निघालेल्या भाषिक यात्रेकरूंचं एक जहाज तिला दिसलं. जहाजाचा कप्तान सोमाली होता. त्याच्याशी वाटाघाटी करून सिंधुनं तराफ्याच्या बदल्यात जहाजावरून प्रवास करण्याचं नक्की केलं.

मजल दरमजल करत जहाज डच ईस्ट इंडीजला पोचलं. सुमात्रा, जावा इथली भाषिक तीर्थक्षेत्रं पाहून झाल्यावर सिंधुनं सोमाली कप्तानाचा निरोप घेतला; आणि प्रवासात बांधलेल्या नव्याकोऱ्या तराफ्यावर आरूढ होऊन ती यथावकाश बोर्निओ बेटाच्या उत्तरेला स्थित सारावाकला पोचली.

आपलं जहाज फुटल्यावर या तराफ्याचा आपण आसरा घेतला आणि सुदैवानं या दयाळू लोकांच्या देशात पोचले, अशी बतावणी करून सिंधुनं सारावाकच्या साध्याभोळ्या हेडहंटर्सची मनं जिंकली. तिचा यथोचित सन्मान आणि पाहुणचार करून त्यांनी तिला सारावाकच्या श्वेत राजाच्या दरबारी नेलं. राजा परगावी होता; पण त्याचे सरदार-दरकदार यांनी सिंधुला सारावाकमध्ये कितीही काळ राहायला परवानगी दिली.

सिंधु लवकरच सारावाकमध्ये रुळली. विस्तीर्ण नद्यांमध्ये मासेमारी करणं, हेडहंटर्सच्या सामायिक घरांचा स्थापत्यशास्त्रीय अभ्यास करणं, जुन्यापुराण्या डोक्यांचं निरीक्षण करणं, अशा अनेकविध गोष्टींमध्ये ती आनंद घेई. सारावाकच्या श्वेत राजाच्या परिवाराशी तिचा पत्रव्यवहार सुरू झाला. इतक्या लहान वयात सिंधुनं प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे सारावाकच्या श्वेत राजाचा परिवार प्रभावित झाला.

इतिहासाची पावलं थोडी वेगळी पडली असती, तर सिंधु सारावाकमध्येच राहिली असती; कदाचित सारावाकची सम्राज्ञी झाली असती; कदाचित डायनासारखी लोकांच्या गळ्यातली ताईत बनली असती. पण इतिहासाची पावलं तशी पडली नाहीत. लवकरच सारावाकचं स्वातंत्र्य संपुष्टात येऊन तिथे ब्रिटिश कॉलनी होणार, हे निश्चित झालं. सिंधुनं दीर्घ नि:श्वास सोडला, आपल्या तराफ्याचं सर्व्हिसिंग करून घेतलं, आणि ती जगाच्या पाठीवर आपल्या पुढील घराच्या शोधात निघाली.

पुन्हा कराचीत जाण्याची तिची इच्छा नव्हती. १९४४ मध्ये मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये झालेल्या स्फोटात जलसमाधी मिळालेल्या एका जहाजावर तिचे आई-वडीलही होते. कराचीला- किंवा कौलालंपूरला- गेल्यास सिंधुला त्यांच्या आठवणीनं दु:ख अनावर झालं असतं.

आपल्या तराफ्याचा मार्ग वाऱ्यावर सोपवून सिंधु विचार करत बसली होती. अचानक एक जहाज दृगोचर झालं. तिच्या ओळखीच्या सोमाली कप्तानाचंच ते जहाज होतं! पण आता त्यात भाषिक यात्रेकरू नव्हते. त्याऐवजी सुमात्रन वाघ, बोर्निअन ओरांगउतान, जावन गेंडे वगैरे विविध पशु-पक्षी पिंजऱ्यांमध्ये होते. सोमाली कप्तान हे पशु-पक्षी पकडून विविध प्राणिसंग्रहालयांना विकत होता.

प्राणिप्रेमी सिंधुला परमानंद झाला. तिनं तत्काळ जहाजावर नोकरी पत्करली; आणि पशु-पक्ष्यांची निगा राखू लागली. रोज मासेमारी करून मांसाहारी प्राण्यांना अन्न देणं, प्लॅन्क्टन आणि सागरी वनस्पती गोळा करून शाकाहारी प्राण्यांच्या आहाराची काळजी घेणं, वेळप्रसंगी प्राण्यांना औषधोपचार करणं, काव्य-शास्त्र-विनोदानं त्यांचं मनोरंजन करणं अशा विविध जबाबदाऱ्या ती लीलया पार पाडू लागली.

सिंधुचा उरक आणि कामावरची निष्ठा यांमुळे सोमाली कप्तान प्रसन्न झाला. तो गुणग्राहक होता, रत्नपारखी होता. त्यानं लवकरच सिंधुला आपल्या व्यवसायात सहा आणे भागीदारी दिली. भागीदारीचे हिशोब नीट ठेवण्यासाठी सिंधु डबल एन्ट्री अकाउंटिंग शिकली आणि लवकरच त्यातही पारंगत झाली.

आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, आफ्रिका, अरेबिया, श्रीलंका आणि मालदीव इथे ‘सोमाली-सिंधु पशु-पक्षी ट्रेडिंग कंपनी’च्या कार्यासाठी सिंधु वारंवार जात असे. हिंदी महासागराचा इंचन् इंच तिला तळहातावरच्या रेषांसारखा ठाऊक झाला. गोड्या पाण्याचे साठे असलेली बेटं, व्यापाराला अनुकूल वारे इत्यादी गोष्टी तिला मुखोद्गत असत.
या दरम्यान भारत स्वतंत्र झाला होता. सिंधुचं लाडकं कराची मात्र पाकिस्तानमध्ये गेलं होतं. आपल्या आई-वडलांच्या काही चीजवस्तू तिथे असल्या, तर त्या आपण ताब्यात घेतल्या पाहिजेत, हा विचार सिंधुच्या मनात घोळू लागला; आणि सोमाली कप्तानाचा निरोप घेत तिनं आपला तराफा कराचीकडे लोटला.
***

देवदत्त राजाध्यक्ष (वॉम्बल)
९८१९३०६५८२
devadatta_r@yahoo.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.