Now Reading
साज, ठुशी आणि टिका

साज, ठुशी आणि टिका

Menaka Prakashan
View Gallery

रत्नागिरी हापूस, सोलापुरी चादर, कोल्हापुरी चप्पल, दार्जीलिंग चहा यांच्या बरोबरीनं कोल्हापुरी पद्धतीचा साज, ठुशी आणि टिका यांसारख्या पारंपरिक दागिन्यांसाठीही भौगोलिक स्थाननिश्चिती (Geographical Indication) करण्याची आवश्यकता आहे. भौगोलिक स्थाननिश्चितीचा उपयोग ज्या त्या स्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या वस्तूंचं वैशिष्ट्य टिकून राहावं, त्यांच्या विशिष्ट सौंदर्यासाठी कारणीभूत असलेल्या कारागिरांना त्या वस्तूंच्या विनिमयाचे, तसंच त्यामध्ये बदल घडवण्याचे अधिकार मिळावेत आणि त्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, हा असतो. त्याचबरोबर त्या कलेची भ्रष्ट नक्कल केली जाऊ नये, हाही एक महत्त्वाचा उद्देश असतो.

सोन्याचे दागिने खरेदी करायला गेलं, की त्या झगमगत्या आणि भव्य दुकानांच्या शोकेसेसमध्ये ठेवलेल्या विविध डिझाईन्सच्या नाजूक दागिन्यांबरोबर पारंपरिक दागिनेही आपलं लक्ष वेधून घेतात. नाजूक दागिने मशीनवर बनवले जातात, तर बहुतांश पारंपरिक दागिने हातानं बनवले जातात. यातले वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असणारे कोल्हापुरी पद्धतीचे पारंपरिक दागिने म्हणजे साज, ठुशी, चिंचपेटी, टिका, चाफेकळी माळ, वज्रटीक, बेलपान टीक, गळसरी, चिताक, पुतळ्यांची माळ, बोरमाळ, कंठी असे जवळ जवळ पंधरा प्रकारचे गळ्यात घालायचे दागिने असतात. त्यातही सर्वाधिक मागणी असलेले आणि सरताज दागिने म्हणजे कोल्हापुरी साज, ठुशी आणि टिका.

या दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ‘९१६’ म्हणजे शुद्ध सोन्यात, तसंच अतिशय बारीक पोकळ मण्यांनी आणि पदकं पत्र्याच्या साहाय्यानं बनवलेले असतात. हे बारीक आणि पोकळ मणी तयार करणं हे कोल्हापुरातल्या कारागिरांचंच वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भारतात इतर कुठेही असे पोकळ मणी तयार केले जात नाहीत. पूर्वी हे मणी भरीवही करत असत, परंतु आजमितीस मात्र त्यामध्ये लाख भरलेली असते.

या अतिशय देखण्या आणि गळा भरून दिसणाऱ्या दागिन्यांचं आकर्षण अगदी सामान्यांपासून ते राजेरजवाड्यांच्या स्त्रियांमध्येही कायम आहे. हे सर्व पारंपरिक दागिने आपल्याला कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मीच्या गळ्यात पाहायला मिळतात. वस्तुतः हे दागिने सोन्यात बनतात, परंतु कालमानानुसार चांदी, बेन्टेक्स, किंवा अन्य धातूंमध्येही हे दागिने घडवले जातात.

सातवाहन कालापासून, म्हणजे जवळ जवळ इ. स. तिसऱ्या शतकापासून या दागिन्यांचे उल्लेख आढळतात. त्या वेळी त्याला ‘हेमसूत्र’ म्हणजे सोन्याच्या दोऱ्यात ओवलेला शृंगारसाज म्हणत असत. आजचं मंगळसूत्र हे हेमसूत्राचंच रूप आहे.

हेमसूत्राच्या एका प्रकारालाच ‘साज’ असं म्हणतात. यामध्ये ताईत, कारलं, मासा, चंद्र, वाघनखं, बेलपान, चक्र, शंख, दांडका, नाग, कासव, गण्ड, भेरूण्ड, भुंगा, कीतिर्मुख, पानडी अशी बारा ते एकवीस पदकं आणि छोटे जवमणी. ही सर्व पदकं एका विशिष्ट पद्धतीनं रेशमी आणि भक्कम अशा सुती दोऱ्यात ओवलेली असतात. ही पदकं म्हणजे संपूर्ण सृष्टीतली मंगल आणि सौभाग्यचिन्हं, तसंच स्त्रियांसाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या धाडस, धैर्य आणि करुणा इत्यादी गुणांचं प्रतीक असतात.

ठुशी म्हणजे सोन्याचे एकसारखे अगर वेगवेगळ्या आकाराचे मणी, किंवा पेट्या रेशमानं गुंफलेल्या असतात. लाल किंवा हिरव्या सॅटिनच्या कापडाच्या गादीवर सोन्याच्या मण्यांनी गुंफलेली असते ती टीक किंवा टिका. विशेषतः अनिवासी भारतीय (एनआरआय) तरुण मुलींमध्ये ही टीक खूप आवडीनं घातली जाते.

साज आणि ठुशीमध्येही माणिक, पाचू, किंवा हिरे जडवलेले असतात. तसंच आवडीनुसार मध्यभागीही लाल मोठ्या खड्यांचे लोलक, किंवा सोन्याच्या निरनिराळ्या डिझाईन्सची पदकंही केली जातात.

हे सर्व दागिने साधारण वीस ते दोनेशे ग्रॅम सोन्यात घडवले जातात. दागिने बनवताना केला जाणारा सोन्याच्या जरीचा, तसेच रेशीम आणि सॅटिन कापडाचा वापर हा मुसलमानी कारागिरीचा प्रभाव आहे.

प्रत्यक्ष दागिने घडवणारा तो सुवर्ण कारागीर किंवा सोनार. ज्यांच्या घरात जुन्या डाईज् आहेत, असेच कारागीर हे दागिने बनवू शकतात. या डाईज कांसं या धातूपासून बनवलेल्या आणि लोखंडाच्या रॅकेटमध्ये बसवलेल्या असतात. उत्तर कर्नाटकातल्या गोकाक इथल्या कारागिरांमार्फत या डाईज केल्या जात असत. आता असे कारागीरच उपलब्ध नसल्यामुळे नव्या डाईज तयार होणंच बंद झालेलं आहे. त्यामुळे जुन्या उपलब्ध डाईजच्या साहाय्यानं बनलेल्या पदकांच्याच विविध रचना करून नवी डिझाईन्स तयार केली जातात. दैवज्ञ आणि देशस्थ सोनार, तसंच मराठा समाजातले लोक हे दागिने घडवण्याच्या व्यवसायात आहेत. याशिवाय पॅालिश करणारे, लाख भरणारे आणि दागिने गाठवणारे पटवेगार अशा अनेक राजस्थानी, बंगाली कारागिरांचाही त्यामध्ये समावेश असतो. पटवेगारांमध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापुरामध्ये पंधरा ते वीस कुटुंबं आणि अन्य कामगार मिळून सुमारे सातशे पन्नासजण या व्यवसायात कार्यरत आहेत.

हे दागिने घडवण्याच्या प्रक्रियेत सोनं वितळवणं, आवश्यक प्रमाणात चांदी, किंवा तांब्याचं मिश्रण करणं, सोन्याच्या पट्ट्या काढणं, तारा काढणं, डाईजप्रमाणे एम्बॉसिंग करणं, एम्बॉस केलेल्या चित्राला उठाव देण्यासाठी प्रक्रिया करणं, पोकळ पेट्या किंवा जव मणी तयार करणं, त्यामध्ये लाख भरणं, त्यांना खाली घस किंवा घुंगरू लावणं, फासे लावणं, पॉलिश करणं आणि डिझाईनप्रमाणे पटवेगाराकडून गाठवून घेणं यांसारख्या कामांचा समावेश असतो. यापैकी सोनं वितळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक भट्टी, तसंच सोन्याचा तारा आणि पत्रा काढण्यासाठी मशीनचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे घट अर्थातच कमी होते. परंतु सोनारकाम करणाऱ्या एका कारागिराला या मशीनच्या किमती परवडण्यासारख्या नसतात. याशिवाय बाकीची इतर सर्व कामं हातानं केली जातात. या कामांमध्ये कुटुंबातल्या स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यांना अर्थातच ‘स्वतंत्र कारागीर’ अशी ओळख आणि दर्जा दोन्हीही नसतं. लाख भरणं आणि दागिने गाठवणं ही कामं नगावर केली जातात. कुटुंबातल्या प्रत्येकाचा या कामात सहभाग असतो. या अर्थानं हा ‘कुटिरोद्योग’ म्हणायला हवा. एक दागिना तयार करण्यासाठी पाच ते सहा कारागीर, तसंच तितकेच दिवस लागतात. एका महिन्यामध्ये चार ते पाच हजार दागिन्यांचे नग बनतात. सुवर्ण पेढ्यांमध्ये, किंवा दुकानांमध्ये जे दागिन्यांची विक्री करतात, त्यांना ‘सराफ’ असं संबोधलं जातं.

सराफांकडे या पारंपरिक दागिन्यांची किमान किंमत लाखाच्या घरात असते. यावरून या व्यवसायातल्या आर्थिक उलाढालीची कल्पना यावी. इतर अनेक हस्तव्यवसायाप्रमाणे याही क्षेत्रातल्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि हातात कलाकौशल्य असणाऱ्या कारागिराला एकंदर नफ्यातला अत्यल्प वाटा मिळतो. तरीही यामध्ये ‘मौल्यवान सोनं’ अंतर्भूत असल्यानं यामधला प्रत्येक समाविष्ट घटक अन्य हस्तोद्योगाच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत दिसतो. दर ग्रॅममागे कारागिरांचे मजुरीचे दर ठरवलेले असतात. ते बहुतेक घासाघीस करून कमीत कमी ठरवलेले असतात, किंवा अंगावर पैसे देणं, नाहीतर गरजेनुसार लागेल तसे पैसे देणं, यामुळे प्रत्यक्ष मजुरी कमीच मिळते. याशिवाय सोनाराला म्हणजे प्रत्यक्ष दागिना घडवणाऱ्याला सोन्यातला आठ टक्केही वाटा मिळतो. पण त्यामध्येही कामगार, पॉलिश करणारे, लाख भरणारे आणि पटवेगार यांचे वाटे असतात.

याशिवाय त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह असतो, त्यामुळे त्या सोनाराला या व्यवसायासाठी लागणारं सोन्याचं भांडवल उभारणं कधीच शक्य होत नाही. यासाठी ‘आयसीआयसीआय’ बँकेची सोनं कर्ज योजना आहे. परंतु त्यासाठी किमान पाच किलो सोनं कर्ज म्हणून घ्यावं लागतं. एवढं कर्ज घेणंही सुवर्ण कारागिरांना आर्थिकदृष्ट्या शक्यच नसतं. त्यामुळे ही मर्यादा कमी केली, तर कारागीर स्वतः दागिन्यांची विक्री करू शकेल.

पारंपरिक साज आणि ठुशी घडवणारे कोल्हापुरातले सुप्रसिद्ध कारागीर प्रशांत कारेकर यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मागच्या वर्षी कोल्हापुरातल्या गुजरीमध्ये दुकानगाळा घेऊन आठ कामगारांच्या साहाय्यानं स्वतःचं वर्कशॉप सुरू केलं. ज्यूडोमधल्या ‘छत्रपती पुरस्कार’ विजेत्या प्रशांत कारेकरांना नोकरी-व्यवसायाच्या अनेक संधी असूनही त्यांनी वडलोपार्जित व्यवसाय स्वीकारला. पारंपरिक साज, ठुशी आणि टीक प्रकारांत त्यांनी अनेक नवीन डिझाईन्स आणलेली आहेत.

कोल्हापुरातल्या सुवर्ण कारागिरांनी घडवलेले विविध डिझाईन्सचे साज, कर्णभूषणं, ठुशी, टीक, कंठी इत्यादी पारंपरिक डिझाईन्सचे दागिने अनेक मोठमोठ्या पेढ्यांच्या जाहिरातींवर दिसतात. या पेढ्या अर्थातच स्वतःच्या नावानंच या दागिन्यांची विक्री करतात. यावर ज्यानं ते डिझाईन निर्माण केलं आणि घडवलं त्या कारागिराचं नावही नसतं. त्याला स्वतःच्या सर्जनशीलतेचं श्रेय केवळ अत्यल्प पैशांच्या स्वरूपात मिळतं आणि त्यावरच त्या कारागिरांना समाधान मानावं लागतं.

या सुवर्णकारीमध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिड आणि नायट्रिक अ‍ॅसिडसारखे रासायनिक पदार्थ हाताळावे लागतात. काही अपवाद वगळता सोनं वितळवण्यासाठी मोठे स्टोव्ह, किंवा गॅसच्या शेगड्या वापरल्या जातात. सततचं उष्ण तापमानाचं सान्निध्य आणि दिवसाकाठचे दहा-बारा तास बसून बारीक काम करून पाठ आणि डोळ्यांच्या आरोग्याचीही हानी होते.

त्यामुळे सोनारकामाचं आयुष्य जास्तीत जास्त साठ वर्षांपर्यंतच असतं. याशिवाय सोनं, चांदी, तांबं, निकेल यांसारख्या जड धातूंच्या सतत संपर्कात असल्यामुळे होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांचा कुठे अभ्यास झालेला नाही. यांच्यामध्ये दारूच्या व्यसनाचं प्रमाणही मोठं आहे. आरोग्य विमा तर नसतोच, पण कोणत्याही प्रकारची भविष्य निर्वाह निधी योजनाही लागू नाही.

हातानं करण्यात येणाऱ्या वस्तू मशीनवर उपलब्ध व्हायला लागल्या, की हस्तोद्योग ‘म्युझियम पीस’ बनून राहतो. त्यामुळे अनेकदा कारागिरांचं काम कमी होतं. परिणामी हातात कौशल्य असूनही कारागीर कोणत्या तरी जोडधंद्याकडे वळतात. शिक्षणाचाही अभाव आहे, त्यामुळे पूर्णपणे वेगळ्या प्रकारची आणि ऑफिसबॉयसारखी कमी प्रतीची नोकरी स्वीकारली जाते.

कारागिरांचा संबंध सराफांशी आणि सराफांचा संबंध बाजारपेठेशी असल्यामुळे सर्वसामान्य कारागीर बाजारपेठेला अनभिज्ञ राहतो. ग्राहकही एखाद्या स्थानिक कारागिराकडे जाण्याऐवजी सोन्याच्या मोठमोठ्या पेढ्यांमध्ये शुद्धतेची खात्री असल्यामुळे तिथे गर्दी करतात. त्यामुळे बाजारातल्या बदलत्या मागण्यांशी कारागिराचा प्रत्यक्ष संबंध येत नाही.

अनेक सोनार कारागिरांना त्यांनी दागिने घडवणं आणि सराफांनी विकणं ही व्यवस्थाच बरी वाटते. यात त्यांना स्वतःचं भांडवलही गुंतवावं लागत नाही आणि दागिने विकण्याचा ताणही झेलावा लागत नाही. दागिने घडवताना मिळणाऱ्या सोन्याच्या कणांमधून घरातले दागिनेही घडवता येतात. त्याचबरोबर अनेकदा छोट्या प्रमाणात चांदी आणि तांब्यासारखे अन्य धातू मिसळून दागिने तयार करून विक्रीही केली जाते.

एका कारागिराला पूर्णपणे तयार होण्यासाठी किमान दोन वर्षं तरी घरातल्या व्यवसायात, किंवा अन्य कारागिराकडे उमेदवारी करावी लागते, नंतरच यातलं कौशल्य अवगत होतं. तरीही संपूर्ण कौशल्य मिळवायला खूप वर्षं झगडावं लागतं. हे दागिने तयार करण्यासाठी हस्तकौशल्याबरोबर नजर आणि गणितही पक्कं असावं लागतं. कष्ट करण्याची फारशी तयारी नसलेली कारागिरांची सुशिक्षित तरुण पिढी या व्यवसायात अनिच्छेनं आलेली असते. त्यांनाही नवीन काही करावं यासाठी प्रेरणा मिळावी अशी स्थिती नाही. बदलत्या बाजारपेठेनुसार डिझाईनमध्ये, किंवा दागिन्यांमध्ये बदल घडले पाहिजेत, अशी मानसिकताही नाही. त्यामुळे कारागिरांच्या घरातली मुलं अन्य नोकरी आणि व्यवसाय पत्करताना दिसतात. बऱ्याच अन्य हस्तोद्योगांप्रमाणे हेही कारागीर त्यांच्या व्यवसायाकडे केवळ कला म्हणून पाहतात आणि त्यांच्यामध्ये व्यावसायिकतेचा अभाव दिसतो.

परिणामी कारागिरांची संख्याही दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. आज सोन्याचे भाव चाळिशीच्या पार पोचलेले आहेत, तरीही मुहूर्तावर दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. यावरून या व्यवसायाची वाढती मागणी लक्षात येते.

कारागिरांचा विकास साध्य करण्यासाठी काय करता येईल?
वास्तविक पिढीजात हस्तकौशल्य, ते सुद्धा सुवर्णकारासारखं कौशल्य असणारे हे कारागीर देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या कारागिरांना राष्ट्रीय स्तरावरच्या डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये डाईज् बनवायला, तसंच निरनिराळ्या डिझाईन्सची तंत्रं शिकण्याची संधी मिळायला पाहिजे. या इन्स्टिट्यूट्‌समध्ये शिकायला जाण्याची ‘शैक्षणिक प्रवेश पात्रता’ या कारागिरांकडे अर्थातच नसते आणि व्यवसाय सोडून शिकायला जाणंही त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. यासाठी या संस्थांमार्फत ‘कमी कालावधीच्या उद्‌बोधन वर्गां’चं आयोजन व्हायला हवं. आताही प्रदर्शनं आयोजित केली जातात, परंतु कारागिरांकडे प्रदर्शनातल्या स्टॉल्सवर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येनं दागिने तयार करण्याची आर्थिक क्षमता नसते. यासाठी त्यांना कमी दरानं भांडवल, किंवा सोनं उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

मोठ्या प्रमाणावर दागिने तयार होण्यासाठी हस्तव्यवसायाचा बाज कायम ठेवून कोणत्या प्रक्रियांचं यांत्रिकीकरण करता येतील, याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. एका कारागिराला सर्व यंत्रं विकत घेणं परवडण्यासारखं नसल्यामुळे सर्वांसाठी अल्पदरातलं ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ही उभं करता येईल. बाजारपेठेची माहिती आणि तंत्र अवगत होण्यासाठी शासनामार्फत कार्यशाळांचं आयोजन करण्याची आवश्यकता आहे.

या अतिशय सुंदर घडणावळ आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य असणाऱ्या पारंपरिक कलेचं वैशिष्ट्य जपण्यासाठी आणि या व्यवसायातल्या प्रत्येक कारागिराला त्यानं घडवलेल्या दागिन्यांचं श्रेय मिळावं आणि देशभरातल्या, तसंच निर्यातीच्या व्यापारी नकाशावर हे कोल्हापुरी पारंपरिक दागिनेही यावेत, यासाठी भौगोलिक स्थाननिश्चिती करून घेणं, ही काळाची गरज आहे.
***

– मंजूषा देशपांडे
dmanjusha65@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.