Now Reading
शिकार

शिकार

Menaka Prakashan

वाकोला बुकक्लबमध्ये यापूर्वी बर्‍याच पुस्तकांबद्दल चर्चा झाल्या होत्या, पण अशा तीव्र प्रतिक्रिया गेल्या कित्येक महिन्यांत आल्या नव्हत्या. डेव्हिड ऑसबर्नचं ‘ओपन सीझन’ हे पुस्तक वाचायलाच नको होतं असंही काहींना वाटत होतं.
‘‘त्या बिचार्‍यांना जंगलात सोडून त्यांची जनावरासारखी शिकार केली त्या दुष्टांनी! माणसाचं माणूसपणच संपवलं,’’ सोफी उद्विग्न होऊन म्हणाली.
‘‘हो ना, त्यापेक्षा सुरुवातीलाच खून केला असता तरी परवडलं असतं.’’ तनुजा म्हणाली.
‘‘असं कसं म्हणतेस? त्यांना स्वतःला वाचवायचा प्रयत्न तरी करता आला की!’’ अनघानं आपलं मत मांडलं, पण निधी चवताळून म्हणाली, ‘‘काहीही बोलू नकोस. आपली जणू एखाद्या पशूप्रमाणे शिकार होणार हे कळल्यावर कोणीही गलितगात्रच होईल. स्वतःला वाचवायचा प्रयत्न वगैरे दूरची गोष्ट.’’
अनघा शांतपणे म्हणाली, ‘‘मला नाही तसं वाटत. शक्य आहे तोवर कोणीही प्रयत्न करेलच.’’
सोफीनं घसा खाकरला आणि ती म्हणाली, ‘‘अनघा, हे इथे सोफ्यावर बसून बोलणं ठीक आहे. पण तू तशा परिस्थितीत असतीस तर तुझाही धीर खचला असता.’’

अनघाला आताही माघार घेता आली असती, पण तसा तिचा स्वभावच नव्हता. ‘‘बेट लावता?’’
तनुजा हसली. ‘‘कसली बेट? इथे कोणीच तसं दुष्ट किंवा क्रूर नाहीये तुझ्यामागे बंदुका घेऊन यायला!’’
अनघानं आवंढा गिळला आणि ती म्हणाली, ‘‘मला पकडलंत तर माझा तीन महिन्यांचा पगार तुम्हांला देईन.’’
‘‘माझ्यासाठी ही काही लहान बाब नाहीये.’’
‘‘आणि नाही पकडलं तर?’’ निधी म्हणाली.
‘‘तर काही नाही. शिकार करता आली नाही तर शिकारी हरणाला कुठे काय देतो?’’
तनुजानं चहाचा कप बाजूला ठेवला, आणि ती म्हणाली, ‘‘जाऊ दे यार. हे जरा जास्त इन्टेन्स व्हायला लागलंय.’’
‘‘त्यात तर थ्रिल आहे ना!’’ निधी म्हणाली. ‘‘मी सांगते काय करायचं. पेंटबॉलच्या बंदुका आणायच्या. आमच्या फार्महाऊसजवळच्या डोंगरावर जायचं. आणि अनघाला पळायला किंवा लपायला अर्धा तास देऊन मग आपण पाठलाग सुरू करायचा.’’
तनुजानं आवंढा गिळला, पण अनघा म्हणाली, ‘‘डील!’’

सकाळचे नऊ वाजले होते. अनघाला काही खाववलं नव्हतं, पण तरी तिनं टोस्ट आणि कपभर चहा संपवला होता. हिरवे-करडे जंगल कॅमोफ्लाज टीशर्ट आणि कार्गो, आणि तशाच रंगाचे कॉम्बॅट बूट्स असा पेहराव तिनं केला होता.
‘‘रेडी?’’ सोफीनं विचारलं, आणि अनघानं मानेनंच होकार दिला.
‘‘चल तर. आम्ही बरोब्बर साडेनऊला शिकार सुरू करणार. साडेअकरा वाजेपर्यंत तू आम्हांला हुकवू शकलीस तर वाचलीस. क्लीअर?’’ निधी म्हणाली.
‘‘क्लीअर,’’ अनघा पुटपुटली आणि ती फार्महाऊसच्या गेटबाहेर पडली आणि जॉग करत टेकडीवर जाऊ लागली. त्या भागाचा नकाशा आठवत ती बरोबर बारा मिनिटं धावत राहिली, आणि मग एका खडकामागे जाऊन तिनम आपल्या कपड्यांवरचे कॅमोफ्लाज स्टिकर्स ओरबाडून काढले. आता तिचे कपडे वाळक्या गवतासारख्या पिवळट रंगाचे दिसू लागले. त्याच रंगाचा बॅन्डाना बांधून तिनं आपले केसही काळजीपूर्वक झाकले. स्टिकर्स काळजीपूर्वक पुरून ती पुढे जाऊ लागली. अजून पाच मिनिटं धावून तिनं पायवाट सोडली आणि टेकडीच्या एका बाजूनं उतरून ती पठारासारख्या माळरानावर पोहोचली. तिच्या फिटबीटवर साडेनऊ वाजल्याचा अलार्म वाजला आणि ती माळरानातल्या झुडपांमागे जमिनीलगत आडवी झाली.
जीपच्या इंजिनचा आवाज आला आणि अनघा स्वतःशी हसली. जीप ऑफ-रोड आली तरी खाचखळग्यांत येऊ शकली नसती. तिचा ॅन सोपा होता – शक्य तेवढा वेळ लपून बसायचं, आणि गरज लागेल तशी झुडपांत आणि खडकांमागे जागा बदलायची.
टेकडीच्या माथ्याजवळचा थोडा भाग अनघाला दिसत होता. झुडपाच्या आडोशामुळे तिथून ती दिसणार नाही याची मात्र तिला खात्री होती. जीप टेकडीच्या माथ्याकडे जाऊन थांबली हे तिला दिसले. तनुजा आणि सोफी जीपच्या बॉनेटवर उभ्या राहिल्या आणि दुर्बीणींतून तिला शोधू लागल्या तेव्हाही तिला काळजी वाटली नाही. पण तिला एकदम जाणवलं – निधी कुठे आहे?
अनघानं टेकडीचा टोपोग्राफिक नकाशा डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. टेकडीच्या दुसर्‍या बाजूनं उतरून एका ओढ्याच्या आटलेल्या पात्रातून माळरानावर येणं शक्य होतं. निधी तशीच येणार अशी अनघाला खात्री पटली. तनुजा आणि सोफी फक्त नजर ठेवणार, आणि शिकारीचा प्रयत्न निधी करणार हे नक्की होतं.

अनघानं आवंढा गिळला आणि अंतराचा अंदाज घेतला. टेकडीच्या माथ्यापासून ती सुमारे दीडशे फूट दूर होती. पेन्टबॉल गनची रेंज साधारण तेवढी होती. म्हणजे अजून मागे जाऊन ती रेंजबाहेर जाऊ शकली असती, पण तिची हालचाल दिसताच सोफी-तनुजानं मोबाईलवरून निधीला तिच्या ठिकाणाची माहिती दिली असती. अनघानं जागीच थांबायचा निर्णय घेतला.
दहा वाजले. तनुजा जीपच्या बॉनेटवरून उतरली आणि मागच्या सीटवर ठेवलेलं एक पोतं खेचत घेऊन आली. सोफी मात्र दुर्बीणीतून पाहतच होती. तनुजानं पोतं उघडलं आणि त्यातला एक दगड नेम धरून अनघाच्या सुमारे तीस फूट डावीकडच्या झुडपात फेकला. नंतर, दुसरा दगड थोडा अलीकडे फेकला.
अनघाच्या अंगावर काटा आला. दगड डोक्यात लागता तर इजा झाली असती. ती हळूहळू मागे सरकू लागली. झुडपाच्या आडोशामुळे ती दिसणार नाही असा तिचा कयास होता. पण अचानक सोफीचा आवाज आला, देअर शी इज! आणि तनुजाने फेकलेला पेरूएवढा मोठा दगड सण्णकन अनघाच्या कानाजवळून गेला.
अनघानं उडी मारली आणि नागमोडी धावत ती टेकडीच्या माथ्यापासून दूर जाऊ लागली. तनुजानं दगडांचा मारा चालू ठेवला होता, आणि सोफीचा निधीला माहिती देतानाचा आवाज ऐकू येत होता.
अनघानं ओढ्याच्या रिकाम्या पात्रात उडी मारली. आता तनुजाच्या दगडांची तशी भीती नव्हती; पण पेन्टबॉल गन घेऊन निधी कधीही येऊ शकली असती. अनघा वाकली आणि तिनं ओढ्याच्या पात्रातले दोन दगड उचलून आपल्या कार्गोच्या खिशात कोंबले.

एवढ्यात पाचोळ्यावर बुटांचा आवाज आला. अनघा पटकन पात्राच्या दुसर्‍या बाजूला वर चढली आणि स्तब्ध बसून राहिली. मिनिटभरातच निधी पात्रातून धावत आली. अनघानं तिच्या पाठीवर उडी मारली आणि लाथेने पेन्टबॉल गन ढकलून दिली. निधी उठून उभी राहायच्या आतच अनघानं उडी मारून गन उचलली, आणि तिच्या दट्ट्यावर दगड मारून दट्ट्या मोडला आणि गन निकामी केली.
‘‘यू बिच!’’ किंचाळत निधी धावून आली. अनघानं गन जोरात फिरवली आणि निधीच्या पायावर आदळली. निधी वेदनेनं किंचाळली. तिच्याकडे लक्ष न देता अनघा पळाली. सोफी आणि तनुजा कधीही तिथे पोचतील अशी भीती होतीच.
एका खडकामागे लपून अनघा दीर्घ श्वास घेत विचार करू लागली. पावणेअकरा वाजले होते. अजून फक्त पाऊण तास काढायचा होता. तिनं आजूबाजूला पाहिलं. तिच्या मागे टेकडीच्या एका बाजूला उभा कडा होता. पुढे पन्नासएक फूट अंतरावर ओढ्याचं पात्र होतं. डावीकडे एके ठिकाणी उघडा कातळ होता. शत्रूंची पुढची चाल काय असेल याचाच ती विचार करत होती.

इतक्यात अनघाला उग्र वास आला. खडकावर हळूच डोकं उंचावून तिनं पाहिलं आणि ती भयंकर घाबरली. सोफी आणि तनुजा ओढ्याच्या पात्राजवळ उभ्या होत्या आणि त्यांनी गवताला आग लावली होती. झळा हळूहळू वाढत होत्या आणि उतारामुळे तिच्या दिशेनं येत होत्या.
अनघा थिजून जागीच बसून राहिली. पण झळांची धग जाणवू लागली तेव्हा तिला काही पर्याय शिल्लक नव्हता. उडी मारून ती उघड्या कातळाच्या दिशेनं धावू लागली. तिथे गवत नसल्यानं झळा पोचल्या नसत्या.
अनघा जीव खाऊन कातळाचा चढ चढू लागली, आणि अचानक तिच्या कोपरावर काहीतरी लागलं आणि चिकट लाल द्रव वाहू लागला. मग मानेजवळ काहीतरी लागलं. भयचकित होऊन अनघानं मानेला हात लावला. पेन्टबॉलचा छर्रा होता, आणि त्यातला रंग ओघळला होता. अनघानं नि:श्वास सोडला आणि पुढे पाहिलं. दहाबारा फुटांवर निधी आणि सोफी पेन्टबॉल गन्स घेऊन उभ्या होत्या. निधीनं अजून एक छर्रा मारला, आणि मग गन उलटी धरून ती अनघावर चाल करून आली.
‘‘प्लिज, नो!’’ अनघानं हुंदका दिला आणि ती खाली कोसळली.

सोफी कॅनडाला बहिणीकडे निघून गेलीये. तनुजाचं काऊन्सेलिंग मी गेली तीन महिने करतोय. आत्ता कुठे तिला जरा बरं वाटू लागलंय. अनघा माझ्या एका मित्राकडे ट्रीटमेन्ट घेतेय; तिला बरं वाटायला किती वेळ लागेल ते सांगणं कठीण आहे. निधीचा थांगपत्ता कोणालाच ठाऊक नाही.

– देवदत्त राजाध्यक्ष (वॉम्बल)

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.