Now Reading
‘शाळंत मातर रोज बसायची सक्ती करू नगासा…’

‘शाळंत मातर रोज बसायची सक्ती करू नगासा…’

Menaka Prakashan

सण्णू आणि गुणा चुलत भावंडं कोल्हापूरजवळच्या करवीर तालुक्यातल्या इस्पुर्लीला राहायची. इस्पुर्ली हे गारगोटी रस्त्यावरचं अगदी छोटंसं गाव.
सण्णूचे आई आणि बाबा दूर कर्नाटकात रस्ताबांधणी कामाचे मुकादम म्हणून राहायचे. तिथे शाळा नव्हती म्हणून सण्णूला त्याच्या काकांकडे शिकायला ठेवलं होतं.

त्याच्या काकाची थोडी शेती होती, शिवाय तो बिद्री साखर कारखान्यातला हंगामी कामगार, इतर वेळी पडेल ते दूध संघाचं काम करायचा. त्याला एकच मुलगी गुणा. गुणा खरंतर चौथीतच… पण आईला घरकामात सगळी मदत करायची. मैत्रिणींचा तर गोतावळा भारी तिचा. सगळ्या मैना ‘गुणा… गुणा…’ करत चिवचिवायच्या. गुणाची आई चांगली नववी पास असल्यानं तिला शिक्षणाची कदर होती.
ती गुणाला एक दिवसही शाळा चुकवू देत नसे आणि अभ्यास नाही केला, नंबर खाली गेला, तर मग… विचारायलाच नको…
तिचा तो त्या वेळचा रुद्रावतार बघून आयाबाया म्हणत, ‘‘पोरीला काय डॉगदरबाई करती की काय गं… आनशे!’’ त्यावर ती म्हणायची, ‘‘पोरगी शिकत्याल तर नाव काढत्याल.’’ यावर गुणाचा बाप म्हणे, ‘‘हो… तुझ्या घराचं नाव पार कोल्हापूर-बेळगावपर्यंत पोचंल का न्हाई…’’ पण आनशी त्याचं काही वाटून घेत नसे.
तिनं गुणाला शिकवायचं ठरवलेलंच होतं. त्यासाठी तिनं पैसे साठवून एक म्हस बी घेतली होती. ‘दुधाचं पैकं पोरगीच्या शिक्षणासाठी. लग्न तिचं ती बघंल…’ तिचे असे विचार ऐकून तिचा आटा थोडा ढिला असल्याबद्दल गावच्या लोकांची खात्रीच होती.

एक दिवस गुणाचा बाबा, त्याच्या भावाचा पोरगा- सण्णय्याला- बायकोला न विचारताच, शिक्षणासाठी इस्पुर्लीला घेऊन आला.
बायकोचं शिक्षणाचं वेड माहिती असल्यानं ती काय ‘नाही’ म्हणायची नाही, याची त्याला खात्रीच होती आणि झालंही तसंच.
सण्णू आल्याबरोबर गुणा तर नाचायलाच लागली, तर आनशी म्हणाली, ‘‘ह्ये बघ सण्ण्या, खायाच्या वेळंला खा… आनि खेळायच्या वेळी खेळ…पण अब्यास न्हाई केलास, तर… तू हाईस आनि म्या हाय!’’ असा तिनं त्याला सज्जड दम भरला होता.
सण्णू आणि गुणात फारतर महिनाभराचं अंतर, त्याचं वय बघता आणि मास्तरांचं मत विचारात घेऊन त्याला चौथीतच बसवायचं ठरलं.
खरंतर सण्णूला फारतर अक्षर ओळख होती. त्याला दुकानाची पाटी काय वाचायला यायची नाही. रोज शाळेत जाणार्‍या बहुसंख्य पोरांची परिस्थितीही फार वेगळी नव्हती, त्यामुळे सण्णूचा चौथीतला प्रवेश पक्काच झाला.
शिवाय त्याची आनशीकाकी त्याला महिन्या-दोन महिन्यांतच वाचायला तयार करेल, अशी मास्तरांनाही खात्री होती.
नाही म्हणायला सण्णू गणिती हिशेबात पक्का होता, पण ते तोंडी… मुकादम बापाबरोबर राहून त्यानं ते ज्ञान मिळवलं होतं.
त्याला शाळेत एका जागी बसायला मुळीच आवडत नसे. वर्गात गेला, की त्याला पाटी घासायची आठवण येई, मग तो मास्तरांना विचारून दगड आणायला जाई. मग पाटी घासायचा आवाज येतो म्हणून मास्तरच त्याला वर्गातून बाहेर जायला सांगत.

थोड्या वेळानं त्याला मरेस्तोवर तहान लागे.
मग तो म्हणे, ‘आता पोटात दुखायलंय, जरा घरी जाऊन येतो.’ म्हणून दोन बोटं दाखवून नाचायला लागे. तो एकदा घरी गेला, की चारनंतरच उगवे. विचारलं तर म्हणे, ‘‘काकीच्या म्हशीला चारापाणी करायला नगं?’’ मास्तर कपाळावर हात मारत.
पण गुणाच्या आईनं त्याचा चौथीपर्यंतचा अभ्यास सहामाहीच्या अगोदरच करून घेतला होता. शिवाय कधी वर्गात असलाच, तर तो अभ्यासाची थोडी फार उत्तरंही देई, त्यामुळे मास्तर दुर्लक्ष करत.
बाकीची पोरंही थोड्या फार फरकानं तसलीच होती. गुणासारखी काही पोरं मात्र घरच्यांच्या धाकानं दिवसभर शाळेत बसत. पुस्तकातलं वहीत उतरवून काढून वह्या भरवत.
तर एकदा काय झालं, इन्स्पेक्शन निमित्तानं शाळेतल्या प्रत्येक वर्गात मुलांनी अगदी स्वतंत्रपणे मास्तरांच्या मदतीशिवाय सुशोभन करायचं ठरलं. त्यासाठीच्या आयडियाही पोरांनाच लढवायच्या होत्या. त्यासाठी घरूनच पानं, फुलं, कणसं, गवत, पिसं असं काहीबाही घेऊन यायचं होतं.
सण्णू आणि गुणानं तर त्या सुशोभनाच्या निमित्तानं शाळा चुकवून चांगले चार दिवस रान हुंदडून घेतलं होतं. पोरं रोज हाराभर गवत, फुलं, बिया, पानं काय काय जमा करून आणत. शिवाय कासाराच्या घरासमोरच्या बांगड्यांच्या काचा, रिबनीचे तुकडे, फुटके बल्ब, रंगीत दोरे, खडूचे तुकडे, गोट्या, रंगीत दगड, सिगारेटच्या चांद्या हेही जमा होई. सुशोभनासाठी ते सगळं आवश्यकच होतं.

इन्स्पेक्शनच्या चार रोज अगोदर गावच्या सरपंचाच्या पोराचं लगीन होतं, माळांची लायटिंग केलेली होती. गावातली पोरं तर दिवसरात्र तिकडंच होती. मंडपात तर तसल्या फारच गोष्टी प्रत्येकानंच जमा केल्या होत्या. सण्णूला तर एक चांगला चार हात लांबीचा बारके लाईट्स असलेला तुकडाही मिळाला होता. गावातल्या पोरांनी तिथे वाजंत्री वाजवून आणि ढोलही बडवून घेतले होते. ते सगळं पाहून ‘च्या मायला! हे सुशोभन का काय करत्याल का न्हाय?’ असं मास्तरांच्या मनात येऊन गेलंच असणार.
पाहता पाहता इन्स्पेक्शनचा आदला दिवस उजाडला. पोरांनी शाळा झाडून पुसून लख्ख केली, खळीनं पताका लावल्या. मास्तरलोकांनी तयार केलेले चाटर्स लावले.
मग सुरू झालं सुशोभन… पहिलीच्या पोरांनी जमा केलेल्या सगळ्या वस्तू अर्धवर्तुळाकार पण लायनीत मांडल्या. दुसरीच्या पोरांनी गवताच्या पात्याचं एक शेत उभं केलं आणि त्यात गुर्‍हाळ पण केलं, त्यासाठी मातीच्या गुळाच्या ढेप्या पाडलेल्या होत्या. तिसरीच्या पोरांनी लग्नाचा मांडव, नवरा-नवरी, पाहुणेमंडळी, आहेर… फार काय काय तयार केलं होतं.
शेवटी चौथीच्या वर्गात सण्णूच्या नेतृत्वाखाली पोरांनी बिद्री कारखाना तयार केला होता. कारखान्याचा भोंगा, समोरच्या शाळेत खेळणारी पोरं, उसाचं वजन मोजणारे कामगार… अगदी हुबेहूब.
मुख्याध्यापक आणि इन्स्पेक्टरना घेऊन मास्तर प्रत्येक वर्गात फिरत होते. इन्स्पेक्टर खूष झाल्यानं मुख्याध्यापकही खूष. मास्तरांची छाती तर अभिमानानं फुलून आलेली.
शेवटी ती सगळी चौथीच्या वर्गात आली. तो कारखाना आणि बारीकसारीक तपशील पाहून इन्स्पेक्टरनी अक्षरशः तोंडात बोटंच घातली. सण्णू म्हणाला, ‘‘थांबा मास्तर…’’ आणि त्यानं लायटीचा खटका दाबला, तसे कारखान्यात लाईट लागले, भोंगा सुरू झाला, वजनकाटा फिरायला लागला. एवढंच नाही, तर कारखान्याच्या आवारातल्या घरासमोर मोरपिसाची टोपी घातलेला वासुदेव नाचायला लागला, शाळेत जाणारी पोरं चालायला लागली. मुख्याध्यापकांनी चौथीच्या मास्तरांना आश्चर्यानं विचारलं, ‘‘ह्ये तुमी केलंसा?’’ मास्तर म्हणाले, ‘‘न्हाय वो… म्या न्हाय. त्ये सण्ण्या पोरगं मस्त कलागतीचं हाय. त्येनंच समद्या शाळेचं सुशोभन तयार करून घ्येतलंया. त्यो आणि त्याची भैन गुणा लई आयडियाबाज हाईती!’’
इन्स्पेक्टर तर काय खूषच झाले. त्यांनी स्वतःच्या खिशातून शंभर रुपये काढून सण्णूच्या हातावर ठेवले. असं तर कोणत्याही शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल. सण्णू आणि गुणाचं तर कौतुक झालंच, त्याबरोबर आनशीचं बी झालं.
शाळेला अख्ख्या तालुक्यात चांगला शेरा मिळाला ते सांगायलाच नको.

शाळेतून इन्स्पेक्टर बाहेर पडल्यावर मुख्याध्यापकांनी पहिली ते चौथी वर्गप्रमुखांचा गलाट्याचे गुच्छ देऊन सत्कार केला आणि सण्ण्याला चार शब्द बोलायला सांगितलं. सण्ण्या म्हणाला, ‘‘मुख्य सर आणि मास्तर, मला एकच बोलायचं हाय…. शाळंत त्येवढं रोज बसायची सक्ती करू नगासां… भायेर रानात लई मन रमतं. पाखरं, झाडं…लई शिकाया घावतं…’’
मास्तर अवाक् झाले. त्यांनी तसं केलं का नाही, ते मला माहिती नाही.
सण्णू आणि गुणाचं शिक्षण त्यांच्या हुशारीमुळे कोल्हापूर, पुणे, नेदरलँड आणि अमेरिका इथे पूर्ण झालं.

आज सण्णय्या अमेरिकेत उच्चपदस्थ इंजिनीअर आहे आणि गुणाबाई एम.पी.एस.सी. देऊन अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्राध्यापक बनल्यात… लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना, इस्पुर्लीच्या रानात पतंग्या उडवणारी पोरं दिसली आणि मन तीस वर्षांपूर्वी मागे गेलं. त्या इन्स्पेक्शनच्या दिवशी योगायोगानं मी तिथेच होते आणि सण्णूचा उद्योग मी पाहिला होता. त्याचं भाषण ऐकलं होतं. मुलांना शाळेत जाण्याची सक्ती न करता, त्यांच्या बुद्धीला धार लावता येईल का, असल्या कोरड्या चर्चा करून मी ते विसरूनही गेले होते…
आज त्या करोनामुळे का असेना, तशी परिस्थिती आली आहे आणि मुलांना आणि त्यांच्या पालकांना सण्णू आणि गुणासारखी मुलं घडवण्याचीही संधीही…

– मंजूषा देशपांडे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.