Now Reading
शाल

शाल

Menaka Prakashan
View Gallery

रात्रीचे साडेदहा वाजले होते. औरंगाबाद स्टेशनच्या नव्या विस्तारित भागात आमची ‘ज्ञानप्रकाश माध्यमिक विद्यालया’ची सहल बस येऊन थांबली होती. सहल प्रभारी तिडकेसर आणि कॅप्टन असलेला विद्यार्थी यांनी जाऊन वाहतूक नियंत्रकामार्फत डेपो प्रमुखाची रात्रभर बसस्थानकावर झोपण्यासाठीची परवानगी मिळवली. त्यांनी परत येताच गाडीला बाहेरून ठोकून पेंगुळणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीबाहेर येण्यास सांगितलं. फक्त अंथरूण-पांघरूण घेऊन या, अशी सूचना दिल्यामुळे आळसावलेली मुलं-मुली आपापली अंथरुणं-पांघरुणं घेऊन धीमेपणानं गाडीखाली उतरून तिडकेसरांनी दाखवलेल्या बस स्थानकातल्या रिकाम्या जागांमध्ये आणि दगडी बेंचावर जाऊन आपापल्या पथाऱ्या टाकून झोपू लागली.

नुकतीच साडेआठ-नऊ वाजता औरंगाबाद शहराच्या बाहेर शिर्डी रोडवरच्या एका मोठ्या धाब्यावर आम्हा साऱ्यांची भरपेट जेवणं झाली असल्यामुळे सारेचजण पेंगुळले होते. दुसऱ्या दिवशी वेरूळ-अजिंठ्याला जायचं असल्यामुळे आणि वेरूळला रात्री उशिरा पोचल्यावर मुक्कामाची व्यवस्था असेल, नसेल म्हणून आम्ही ती रात्र औरंगाबाद बस स्थानकावर काढण्याचं ठरवलं होतं. गाडीतली सारी मुलं उतरली आणि पटापट झोपी गेली. रावतेसर, भडांगेसर, हजारेमॅडम आणि मी मुलांसह बस स्थानकात झोपायचं ठरलं. हजारेमॅडम मुलींचा ग्रुप करून एका बाजूला पडल्या. तर त्यांच्या पलीकडे इतर सारी पंचवीस-तीस मुलं घेऊन भडांगे आणि रावते यांनी अंग टाकलं. मीही त्यांच्याच अलीकडे एका रिकाम्या बेंचवर सतरंजी टाकून पडलो.

फेब्रुवारीची ती उतरती थंडी असल्यामुळे जवळच्या अंथरुणा-पांघरुणात मुलं पटापट झोपेच्या गुहेत शिरून गडप झाली होती. आम्हा शिक्षकवर्गांपैकी रावतेंनी लगेच डोळे लावले. भडांगे आणि मी गप्पा ठोकत बसलो. पण थोड्या वेळात भडांगेही झोपेच्या अधीन झाले. मला मात्र झोप येईना. नवख्या ठिकाणी पटकन झोप न येण्याची माझी सवय तिथेही आडवी आली. या सवयीमुळे मी नेहमीप्रमाणे झोप येईपर्यंत वाचनासाठी म्हणून एक पुस्तक बाहेर काढलं अन् वाचू लागलो. दोन-तीन पानं वाचून होत नाहीत, तोच त्या नीरव शांततेत दोघींचा अस्पष्ट बोलण्याचा आवाज माझ्या कानांवर आला. दुपारच्या कोलाहलात त्यांचा आवाज कानी आलाच नसता. पण संपूर्ण दोनशे-तीनशे मीटरच्या तेवढ्या मोठ्या आवारात चिटपाखरूही बोलत नसल्यामुळे त्या दोघींचा तो दबका आवाज उमटून फुटला. त्या आवाजानं माझी तंद्री भंगली.

कोण असावं म्हणून मी पुस्तक मिटवून कानोसा घेऊ लागलो. पण शब्द नेमके कानांवर येत नव्हते. उत्सुकता म्हणून मी पुन्हा जागचा उठलो. अन् आवाजाच्या दिशेनं थोडा पुढे सरकून हळुवारपणे कानोसा घेऊ लागलो. आता मात्र मला जवळपास स्पष्ट ऐकू येऊ लागलं.

”काय थंडी व्हय हा काय व्हय बाई…! आन् तुहया तं अंगावर पांघरून बी नायी…”

”व्हय काकी, पर काय करता… देवानं येळच तशी आणली आपल्यावर! तं काय करावं…”
”आवं, पर मी मंते… कुणाला मागायचं व्हतं की. कुण्या बी एखाद्या धरमवाल्यानं दिलं असतं पांघरायला…”

”कसले धरमवाले बाई? सर्वेच तशे नसतात. कायी कायी तर एवढे हरामी, की धरम करन्याच्या नावावर अंगाला भिडतात… छेडखानी करतात. बाईचं जिनं मोठं कठीन बाप्पा… त्यातई मांगनाऱ्या बाईचं तं निस्तुकच कठीन…”
”व्हय ना गं. मपलं बी तसंच व्हतं. आता हे एक वय झालं म्हनूनशानऽऽऽ”

”व्हय काकी. लई तरास व्हतोय बघ. कवा कवा तर असं वाटतंया… जीव देवाव, एखांद्या इहिरीत नायी तं तयात… पण पुन्यांदा वाटतं, लेकरू भेटन कवा तरी. त्याच्या भेटीसाठी जीव आसुसतो… लेकराला बघायसाठी जगणं हाय! न्हाय तो वळखणार, माय म्हनून मला… पन डोळेभरून एक डाव पाईन अन् मंग हे डोळे मिटीन… लेकरासाठी मरूशा नायी वाटत काकी… मनून हे असं… कुत्र्याचं जगनं.”
”मंग जावावं की तिकडे पोराले भेटाला… कुठं असतं ते?”

”तेच तं… जमंना झालं काकी…! त्यो बुवा कसला, निरा राकीस हाये… निरा राकीस! मला पाह्यल्यावर निसती तोडून ठेवल थो… मांगल दिवसा अंगावर फोड येईपर्यंत झोडपली मला अन् माहेराकडे आणून सोडून दिलं. लेकरू बी दिलं नाही कसाबानं. त्येला सोडून आज दोन वर्षं होतंया. वर्षभराचं बी नसंल तवा… लेकरासाठी जीव लई तुटते काकी. कवा लेकराला पाहीन असं वाटतंय…” ती स्फुंदू लागली. तशी तिच्यासोबतची म्हातारी पुढे सरकली असावी. बहुधा तिच्या अंगावर हात फिरवत ती म्हणाली,

‘गप… गप रावा! गप गं माझी बाई! आगं, हे नशिबाचे भोग हायेत. थे भोगावेच लागतात. देवादिकाला नायी चुकलेत हे, तर आपन कोन कुठल्या? आता माहाच बघ, की दोन-दोन तुरून पोरं असतांनी मला भीक मागून खावं लागतंया…” आता दोघीही एकमेकींना समजावू लागल्या. थोडा वेळ गेला आणि तिकडे शांत झालं. मी जिथे उभा होतो, तिथून त्या मला दिसत नव्हत्या आणि त्यांना मी दिसत नसावा. त्यामुळे माझं अंदाज बांधणं सुरू झालं. त्या दोघीही मागून खाणाऱ्या होत्या, हे तर नक्की. पण त्या इथेच का झोपल्या असाव्यात? त्यांच्यासोबत आणखी कुणी, की त्या दोघीच फक्त? कुठल्या असतील? काय खात-पीत असतील? पाणी-पावसात कुठे थांबत असतील? आजारी पडत नसतील काय? आजारी पडल्यावर त्यांचं कोण करत असेल? अशा अनेक प्रश्नांचं मोहोळ माझ्या मनात घोंघावू लागलं.

मी अस्वस्थ झालो. जागेवर परत येऊन हातातलं पुस्तक मिटवून ते बाजूच्या बॅगेत ठेवलं. अन् थोडा वेळ विमनस्क स्थितीत जागीच उभा राहिलो. बस स्थानकाच्या त्या अंधुक प्रकाशात सारे यथाशक्य थंडीपासून आपला बचाव करत आपापल्या झोपेत गुंतले होते. सारे झोपलेले मला दिसत होते. पण त्या दोघी बुक स्टॉलजवळ असल्यामुळे मला दिसत नव्हत्या. मला शक्य असल्यास त्यांच्यासाठी काही करायचं होतं. पण काय करावं? काय नाही? अन् तेवढ्यात पुन्हा तिकडून आवाज आला.

”झप येईना व्हय गं?”

”कसली झप येतंय काकी, या थंडीत. पर ही थंडी काईच नायी. येच्यापेक्षाही जास्ती थंडीत दिवस काढले हायेत मी. करायेचं काय? लेकराच्या वाटीकडं आस लावून बसली. मनून ही सारं सहन करतीय… नायतर कवाच जीव देल्ला असता…”

”थे जाऊ दे माय! जीव द्याचं राहू दे. पर पांघरायला काईच नायी तुह्याजवळ मंग कशी रात काढशील व्हय? अंगावरच्या थ्या फाटक्या लुगड्यानं काय व्हतंय व्हय? माह्यजवळ बी ह्या फाटक्या धुश्याशिवाय काही नायी. नाहीतर दिलं असतं तुले…”

”न्हाय काकी, तू झप पांघरून घेऊन… माहा काय, मले आता संवेय झाली. बस्ती अशीच कशीतरी हातपाय गुंडून…” त्यातली तरणी म्हणाली. आता मात्र मी सगळ्या बाकांवर आणि बाकाखाली मोकळ्या जागेत जमेल तिथे, जमेल तसं काहीबाही अंथरून आणि पांघरून झोपेच्या अधीन झालेल्या मानवी देहांना यथाशक्य सांभाळत त्या दोघींकडे जाऊ लागलो. मनात विचार आला, सारे सारे झोपले असताना मी एकटाच इकडे तिकडे फिरतोय, हे कुणी उठून पाहिलं तर? त्यांच्या मनात काय येईल? माझ्या अंगावर भीतीनं काटा उठला. एखाद्या गस्तीवरल्या पोलिस शिपायानं मला असं फिरताना पाहिल्यास? पुन्हा शंकेचा काटा माझ्या मनाला टोचू लागला. मात्र या साऱ्यांना बाजूला सारून मी पुढे सरकू लागलो. मुत्रीघराला लागून असलेल्या मोकळ्या जागेत त्या अंधुक प्रकाशात दोन मानवी आकृत्या चळवळ करत होत्या. त्यातली अलीकडली एक सारखी बसत, उठत आणि सित्कारत होती. तिलाच थंडीचा त्रास होत असावा.

त्या दोघींकडे जाण्यासाठी दोन पावलं मी टाकणार तोच माझं लक्ष समोरच्या गाड्या उभ्या असलेल्या मैदानाकडे गेलं अन् मी प्रचंड हादरलो. कुठल्याशा दोन गाड्यांच्या मधल्या रिकाम्या जागेतून डोक्यावर पांघरूण घेतलेली आणि चेहरा जवळपास झाकून असलेली एक मानवी आकृती माझ्याकडे माझ्या दिशेनं चालत येत होती. आता माझ्या ठिकाणच्या भीतीची, संभ्रमाची, संकोचाची अन् धास्तीची जागा प्रचंड धसक्यानं घेतली. मी हादरलो. कोण असावं? मी मागे सरकू लागलो. भलतीसलती शंका जरी नसली, तरी कुणी का असेना, तिनं मला या दोन स्त्रियांकडे जाताना पाहिलं असल्यामुळे तिच्या मनात माझ्याविषयी काय उभं राहिलं असेल, याचा अंदाज येऊन तिनं विचारल्यावर काय सांगावं, याची मनाशी उजळणी करण्याकरता मी किंचित मान खाली घातली. अन् दुसऱ्या क्षणी पाहतो तो ती व्यक्ती माझ्या पुढ्यात उभी. डोक्यावरचं पांघरूण काढून माझ्याकडे, माझ्या इतक्याच घाबरलेपणानं ती मला विचारती झाली. ”काय झालं सर, का बरं इथे उभे तुम्ही?” तो माझा नवव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी मनोज मैकलवार होता. माझा अत्यंत लाडका आणि जवळचा विद्यार्थी. लघुशंकेला म्हणून उठलेला तो, मी त्याला दिसल्यामुळे माझ्याविषयीच्या काळजीनं माझ्याकडे आला होता. त्याला म्हणालो, ”अरे मनोज, ते बघ, पलीकडे त्या दोन गरीब बाया बसल्या आहेत. थंडीमुळे त्यांना झोप येत नाहीये. त्यातल्या एकीच्या अंगावर तर पांघरायला काहीच नाही. मी केव्हापासून त्यांचं दोघींचं बोलणं ऐकतोय. पांघरूण नसलेल्या त्या बाईची स्थिती पाहून मला झोप येत नाहीये. माझ्या अंगावरची ही गरम शाल तिला पांघरायला द्यावी, असा विचार करून मी इथपर्यंत आलो. परंतु तिच्याजवळ जाऊन मी स्वतः शाल दिल्यास तिला कदाचित भलताच संशय यायचा, म्हणून मी केव्हाचा इथे घुटमळतोय. आता तू उठलास, फार बरं झालं. आता तू असं करं, ही माझ्या अंगावरची शाल घे आणि त्यातल्या त्या अलीकडल्या बाईला नेऊन दे. म्हणावं, आमच्या सरांनी दिली. तुमच्या अंगावर काहीच नाही म्हणून. ही तुम्ही कायमची ठेवून घ्या. जा, लवकर जा.” म्हणत मी झटकन माझी शाल काढली आणि त्याच्या हातात दिली.

तो तिकडे ती शाल द्यायला निघाला. अन् काही क्षणांतच विझल्या चेहऱ्यानं परत आला. मी त्याला कारण विचारणार, किंवा तो काही सांगणार तोच, पलीकडून मोठ्या आवाजातले शब्द कानांवर आले. ”कोण व्हय ते? लई उपकार करावे वाटतात तं उपकारासाठी का बाईच दिसते का? एकटीदुकटी बाई दिसली, की लोकायला मोठा पाझर फुटते. मले नको म्हणा असं कुणाचं कायी! शालीच्या मागं काय दडलं असंन कुणास ठाव! ठेवा म्हणा तुमची तुमच्या जवळ. मोठ्ठे चालले उपकार करायला.” एखाद्या कार्यक्रमाच्या निवेदकानं लोकांनी अमलात आणाव्या म्हणून भराभर कळकळीच्या सूचना मोठ्या आवाजात द्याव्या, तसा तो सूर होता. आता माझ्यावर डोकं फोडून घ्यायचीच पाळी होती. मनोज आणि मी दोघंही थंडगार झालो होतो. मनोज काही बोलणार तोच पलीकडून पुन्हा आवाज आला. तो म्हातारीचा असावा.

”कोण व्हय गं? काय झालंय?”

”बघ ना काकी, तिकडल्या कुण्या मानसानं माह्यासाठी शाल पाठवली. एक पोरगं घेऊन आलं. तुमच्यासाठी दिली म्हणं. पर का? एवढी माही माया दाटून आली काय त्याला? मी एकटीदुकटी बाई दिसली मनून ना?”

”अगं, काय बोलतेस हे! ऐकंल ना त्यो माणूस…. बिच्याऱ्यानं तुही कीव येऊन दिली आसंल… अन् तू त्याचा अनमान करून शाल घेतली नाहीस. आन् वरून काहीबाही बोलतेस… व्हय.”

”पर काकी, कशी घ्यावं? कुणाच्या मनातलं काय सांगावं? माहा चुलत दीर… परलाद नावाचा. मायाशी पिरमानं बोलाचा, वागाचा. भाभी मनून मायी थट्टा कराचा. मी बी त्याच्यासंग साध्या पाटानं बोलायची. देर मनून त्याची वरवर कराची. त्याच्या मनातलं मी काय सांगू? पन माहा मन साफ होतं. नवऱ्याशिवाय माया मनात कुनाचाच इचार नव्हता. एक डाव अशीच हसी-मजाक करता करता त्यान माह्या खंद्याले भाभी मनून हात लावला… नवऱ्यानं तिथं येऊन ते पाहिलं अन् त्याच्या मनात संशयाचा ईचू शिरला. तो सारखा त्याचे डंख मारू लागला. उठता बसता तो मले शिव्या देऊ लागला. मी परलादशी बोलली, की मले मारू लागला. परलादचं नाव घेऊन मले जोरजोऱ्यानं बोल लावू लागला. परलादनं एक दिवस त्याले हटकलं. तं तो त्याच्या अंगावरच गेला. मी परलादले हात जोडले. त्याच्या पाया पडली, पन त्यानं माया संग बोलाचं, हासाचं सोडलं नायी. एकडाव त्यानं पार तिकडून नागपूरहून चांगली भारीची शाल आणली अन् भाभीच्या नात्यानं मले दिली. म्याही थे साध्या मनानं घेतली. अन् झालं! शालीनंच इस्तू टाकला. बुवानं त्याचा भलताच अर्थ काढला. काहीच नसताना बुवानं आंगाचा खकाना केला. मले पार आंग फुटेपर्यंत मारलं. अन् वर्षभरच्या लेकराले मायापासून तोडून त्यानं मले मायेराच्या गावी ईस्टानावर आणून सोडलं. माय-बापानं, भावानं जाऊ जाऊ त्याले समजावून सांगाची कोशिश केली. पन त्यानं कोनाचं ऐकलं नाही. चार-सहा महिने गेले अन् मंग मले कयलं, का थो दुसऱ्या एका विधवा बाईच्या मागं लागला हाये. आमच्या घरावर ईज पडली. त्याच्यात माय गेली. भावजईनं मले तरास द्यायले सुरुवात केली. अन् भावजयीच्या तरसाले कटाऊन म्या घर सोडलं. आता एकटी रायतो. पन कुन्या मानसाची सावली घेत नायी… एक डाव लेकराले पायीन अन् मंग जीव देईन…” पुढे नुसते हुंदके येऊ लागले.

***

– विनय मिरासे ‘अशांत’
९४२०३६८२७२
vinaymiraseashant60@gmail.com

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.