Now Reading
विचित्र विघ्न

विचित्र विघ्न

Menaka Prakashan

अनुज साप पकडायला गेला, की गुड्डीला प्रचंड रागच यायचा. ‘‘लग्नाआधी ठीक होतं रे, पोरवय होतं. आता कशाला ते नागोबा आणि अजगर? गारुडी आहेस का तू?’’ ती लाडक्या ‘अनु’ला रागे भरायची.
अनुज तिला म्हणायचा, ‘‘गुड्डी, तुला माहेरचं हे नाव शोभतं. लहानच राहिलीस तू. ‘सर्पमित्र’ असणं हा पोरखेळ नाही. साप वाचवणं, घरात चुकून आलेला नाग रानात सोडणं, हे महत्त्वाचं काम आहे. मला ते करू दे. उगाच आड येऊ नकोस. मनुष्यरूप घेणारी नागकन्या मला पळवेल, असं वाटतं का तुला? मी तिला आणि तुला दोघींनाही मॅनेज करेन. मग झालं?’’असं म्हणत अनुज देशमुख खो खो हसायचा.

‘‘गप्प बस’’ म्हणत गुड्डी हार पत्करायची. नवर्‍याचा छंद तिला आवडत नव्हता आणि अनुज काही छंद सोडायला तयार नव्हता. साप मात्र जंगलात नेऊन सोडायचा. लखलखीत गोरा, देखणा नवरा गुड्डीला तिच्या प्राणांपेक्षा प्रिय होता. देशमुखांच्या बंगल्याचं नाव ‘प्राणनाथ’ असं होतं. ते अनुजच्या आजोबांचं नाव. त्यावरूनही गुड्डी बोलली, ‘‘तुझा नेम नाही! ती नेमप्लेट बदलून ‘नागराज’ नाव ठेवशील बंगल्याचं. आलाय मोठा सर्पमित्र! तेव्हाच तुझ्या मम्मीनं तुला रोखलं नाही. कुठेही साप निघाला, तर आपण कशाला त्याला वाचवायला धावायचं? आणि कुठे कुठे जाशील? ज्यांना मारायचाय, ते सर्प मारणारच. इतकी गावं आणि इतक्या वाड्या आहेत…’’ गुड्डीची एकूण भूमिका नवर्‍याच्या छंदाच्या बाबतीत नकारात्मक होती. म्हणूनच कदाचित तिला स्वप्न पडलं. रानात अनुला अस्सल जनावर डसलंय. तो तळमळतोय. घामाघूम झालाय. आणि ‘गुड्डी लवकर ये’ म्हणत त्याला सरकारी इस्पितळात अ‍ॅडमिट करायला सांगतोय… शेवटची हाक मारतोय, असं विचित्र स्वप्न. ती दचकून उठली. झोपेत ओरडलीसुद्धा. अनुजसुद्धा जागा झाला.

‘‘काय झालं?’’
‘‘तुला मी सांगते ना, नेहमी सापाचा नाद बरा नाही. भीती वाटते रे. वाईट स्वप्न पडलं मला.’’
‘‘सर्पदंशाचं?’’ अनुजनं हसत विचारलं आणि तिला एक प्रेमळ चापट मारली.
‘‘हसतोस काय? काही कळतंय का तुला? नुसती जिम केली म्हणजे झालं का?’’ खरंतर व्यायाम करून कमावलेलं अनुजचं सौष्ठव हा तिचा वीकपॉईंट होता. त्याच्या संगसहवासाला तिचा कधीच नकार नसायचा. तिची वात्रट मैत्रीण प्रथमी तर तिलाच म्हणाली,
‘‘तुझा शर्टलेस नवरा काय मस्त वाटत असेल गं? आय अ‍ॅम जेलस ऑफ यू! माझ्या नशिबी आलाय बारीकराव!’’ आणि मग हसतच सुटली.
एकदा तर अजगराचं पिल्लू बरणीत भरून अनु घरीच घेऊन आला. ‘‘बिचारं इथेच, जवळच्या मैदानात पडलं होतं. घारीनं वगैरे उचललं असतं. मी वाचवलं त्याला.’’
‘‘वा रे वा! सापाला वाचवण्यासाठी घारीच्या तोंडचा घास पळवायचा का? हे बरं आहे. अन्नधान्य वाचवण्यासाठी उद्या रेशन बंद करायला सांगशील…’’ म्हणत गुड्डीनं नाक मुरडलं.
‘‘गुड्डी, नाक मुरडलंस, की तू जास्त चिकणी वाटतेस.’’ अनु विषयाला बगल देत जवळीक साधू लागला.
‘‘घरात अजगर ठेवलाय म्हटल्यावर रात्रभर झोप लागणार नाही मला. कळलं का भल्या माणसा?’’ गुड्डीनं तक्रारीचा सूर कायम ठेवला.
‘‘मग मजाच आहे माझी. आपली नाईट मॅच आज जास्तच रंगणार.’’
‘‘आचरट!’’ म्हणत तिनं त्याला ढकलत अंघोळीसाठी न्हाणीघराकडे ढकलत नेलं. त्याच्या चावटपणामुळेच तो तिला जास्त आवडायचा. ठोंबी माणसं, अरसिक तरुण तिला अजिबात आवडत नसत.

अन्या कॉलेजमध्ये असल्यापासून चपळ, चंचल, स्मार्ट होता. हँडसम तर असा, की खरंतर तो मॉडेल म्हणूनही चमकला असता. त्याला प्रसिद्धी अजिबात आवडत नसे. पैशांचीही गरज नव्हती. गुड्डीनं मॉडेलिंगचा विषय काढताच कुणीतरी त्याचा टी शर्ट सक्तीनं ओढून काढावा, तसं त्याला वाटलं. तो विषय झिडकारत तो म्हणाला, ‘‘छे! मला अजिबात इंटरेस्ट नाय! बनियन आणि अंडरवेअरच्या बॉक्सवर मला छापून देशभर पाठवतेस का सगळ्यांनी बघायला? तुझा… फक्त तुझा आहे ना मी?’’ तिनं कपाळावर हात मारत म्हटलं.
‘‘अनु, अरे फक्त तेवढंच असतं का मॉडेलिंग? तू पण ना… यूू आर जस्ट इंपॉसिबल.’’
अनुची नोकरी छान चालली होती. बंगला, गाडी, नोकर सगळं नीट झेपण्याइतपत पगार होता. गुड्डीला नोकरी करण्याची गरजच नव्हती. तिची संसाराची घरगुती भातुकली ती छान खेळत होती. सुगरण तर होतीच.
संध्याकाळी ताजं जेवण बनवण्याचा तर तिनं कधीच कंटाळा केला नाही. अगदी ताज्या, गरम चपात्या नसतील, तर अन्या जेवत नाही. आमटीही अगदी उकळती लागते स्वारीला, हे सगळं तिला आता पाठ होतं. जेवण शाकाहारीच असायचं, पण तिनं बदल म्हणून, गंमत म्हणून काटे कमी असलेलं भारी फ्राय फिश केलंच, तर अनुजचा नकार नव्हता. तेही तिनं शेजारच्या बंगल्यात राहणार्‍या सामंत वहिनींकडून शिकून घेतलं. ‘‘चालतं माझ्या नवर्‍याला. मी नाही खात. पण त्याच्यासाठी बनवून देईन कधीतरी’’ म्हणाली.

‘वाळा’ नावाचा अगदी चिपुकला साप तळहातावर घेऊन अनुज स्वयंपाकघरापर्यंत आला, तेव्हा ती संतापली. ‘‘टाक आधी तो. हात धुऊन घे. सारखं आपलं बघावं तेव्हा साप साप! मी मांजर पाळायला बघते, ते नको! माऊ किती क्यूट असते. तिला पिटुकली पिल्लं होतात. गंमाडी गंमत, जंमाडी जंमत असते सगळी.’’ गुड्डी काही क्षण अगदी लहान झाली. आणि मग पुन्हा संसारभान येऊन म्हणाली, ‘‘काल कुठे गेला होतास दिवसभर? सुट्टी फुकट घालवलीस ना? सापांच्या मागेच गेलास तू…’’
‘‘नाही गं, मी खरंच सापांच्या मागे गेलो नव्हतो.’’
‘‘मग कुठे होतास?’’
‘‘तेच आठवतोय.’’
‘‘काय भंकस चालवली आहेस? कालचं आज आठवावं लागतं तुला?’’
‘‘गुड्डी, तुला मी सांगणार नव्हतो. तू टेन्शन घेतेस.’’
‘‘म्हणजे?’’ ती घाबरून पटकन त्याच्या शेजारी येऊन बसली.
‘‘मधूनच कधीतरी असं होतंय…’’
‘‘काय होतंय?’’
‘‘मी कुठे होतो, काय केलं… ते नंतर आठवत नाही मला. एका वेगळ्याच गुंगीत असतो मी. माझं स्मरण जात असावं. काल मी दिवसभर कुठे होतो, कुणाबरोबर होतो, तेच मला आता आठवत नाही.’’
‘‘तू खरं सांगतो आहेस का?’’
‘‘तुझी शपथ! मी भटकत दूर कुठे जातो आणि मी कुठे जातोय ते मला माहीत नसतं. नंतर तर मी आहे की नाही ते पण मला आठवत नाही.’’
‘‘माय गॉड! किती वेळा झालं असं?’’
‘‘दोन-तीनदा घडलं. कालही तसंच झालं. एक मात्र आठवतंय. कळसकर नाक्यावर कुणीतरी मला हाक मारली, तर मी त्याला ओळखलं नाही. मी म्हणालो, ‘कोण अनुज देशमुख? मी देशमुख नाही…’ त्या विस्मरणाच्या अवस्थेत एखादा क्षण नंतर आठवतो. स्वप्नाचा तुकडा आठवावा तसा…’’
‘‘तू आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे चल. आपण ब्रेन स्पेशालिस्टची अपॉईंटमेंट घेऊ. आपल्याला काय कमी आहे.’’

काही कमी नसलं, तरी विचित्र विघ्न उगवलं होतं. गुड्डीची छाती धडधडत होती.
डॉ. साठ्येंची अपॉईंटमेंट मिळाली. त्यांनी काही औषधांची शिफारस केली. लिहूनच दिली. ‘‘रजा घेण्याचं कारण नाही. रूटिन सुरू ठेवा. जिमला जात जा. आपल्याला काही आजार झालाय, असं मानू नका.’’ साठ्ये गोड औषधासारखं बोलत राहिले. गुड्डीला जरा धीर आला. अनुजलाही तरतरी आली. डॉक्टरांच्या बोलण्यातच जादू होती. मुख्य म्हणजे डॉ. प्रणव साठ्ये तरुण होते. सातार्‍याहून मुद्दाम कोकणात यायचे. सेवा द्यायचे. नवं ज्ञान त्यांच्यापाशी होतं.
‘‘यापुढे स्नेककॉल घ्यायचा नाही. साप पकडायला जायचं नाही. कळलं?’’ ही पुरवणी गुड्डीनं जोडली.
गुड्डी घरी नसताना छोट्या गावातून फोन आला. ‘‘देशमुखसाहेब ना? कातळवाडीतून बोलतोय साहेब. कांडर खिडकीतून बाथरूममध्ये आलीये. लवकर या भाऊसाहेब. प्लीज… मला तुमचं भाषण पटलं होतं. साप मारायचा नाही, पण तुम्हीच येऊन तो धरा.’’ त्या गावात अनुजचा कार्यक्रम झाला होता.
अनुज बायकोची पर्वा न करता निघाला खरा, पण कातळवाडीकडे गेलाच नाही.

त्याची शोधाशोध सुरू झाल्यावर फोन करणारा कातळवाडीचा बाबू म्हणाला, ‘‘होय, फोन माझाच होता. साहेब येणार होते, पण आलेच नाहीत. कुठे गेले, आम्ही काय सांगू?’’ अनुजची बाईक पालगडकडे जाणार्‍या रस्त्यावर कडेला नीट सापडली. उभी करून ठेवावी तशी. पण मग अनु कुठे गेला?
गुड्डीवर संकटच कोसळलं. स्वतःची आयडेंटिटी विसरल्यावर तंद्रीत तो कुठे भटकत गेला असेल? जंगल दाट होत जावं तसं दुःख गच्च होत गेलं. गुड्डीला रडायला यायचं आणि कुणाचाही फोन आला, तरी तिला आशा वाटायची, की पोलिसांचा असेल. ‘तुमचा नवरा सापडलाय’ म्हणतील, अशी आशा तिला वाटायची. अनुज एसटीतून पुढे कुठे गेला असावा, असा एक अंदाज होता. त्याचं दुखणं तिनं पोलिसांना सांगितलंच. सासू, सासरे, दीर वेगळे राहत असले, तरी संकटात आले. येतच राहिले. अनुज मात्र आला नाही. ‘वाट पाहण्यात अर्थ नाही म्हणावं इतके दिवस, महिने लोटले. ऋतू बदलले. दोन वर्षं सरली. कुठे असेल माझा अनु? बुवामहाराजांच्या मठात मिसळला असेल? वाळवंट तुडवत असेल? ऊनपावसात काळासावळा पडला असेल?’ पत्र नाही, मेल नाही, फोन नाही, मेसेज नाही. तसा कुणीतरी मामीला बडोद्याला दिसला होता, पण ओळख दाखवली नाही. मामा तर म्हणाले, ‘तो अनुजच होता.’ त्यांनी हटकलं, पण तो म्हणाला, ‘कौन अनुज? मेरा नाम तो पवन है।’

गुड्डीच्या मनात अनेक पोकळ ढग सरकत होते. तसे आणखी मळभाचे काही ऋतू जावे लागले. पण झालं काय? कसलाच संबंध न उरलेल्या अनुजला तिनं मनातूनही उपटून टाकायचं ठरवलं. जणू तो या जगात नव्हता. जणू तो आता माणसांत जमा नव्हता. पण तरी एका हळव्या, दुखर्‍या क्षणी तिला वाटलं, ‘जे घडलं, खरंतर बिघडलं, त्यात अन्याचा काय दोष? यंत्र नादुरुस्त होतं त्यात यंत्राचा दोष असत नाही. मेंदू हेसुद्धा यंत्रच नाही का?’ गुड्डीचं लग्न वय वाढलेल्या योगेशशी झालं. योगेशही दिसायला चांगला, पण तंबाखूचं व्यसन होतं. जॉब मात्र भारी होता. आपलं त्याचं जमेल, जमवून घ्यावं लागेल, असं गुड्डीनं मनाशी पक्कं केलं. त्यांचा संसार सुरूही झाला. संसारसुख तिला मिळू लागलं. योगेश अनुसारखा भरदार नसला, तरी अशी तुलना आता करणं योग्य नाहीच, असं तिला वाटलं. ती योगेशची एकदा वाट बघत असताना बेल वाजली. गुड्डीनं दार उघडत ‘आज लवकर आलात?’ म्हटलं आणि दुसर्‍या क्षणाला ती दचकली. दारात अनुज उभा होता.

‘‘गुड्डी, हे मी काय बघतोय? तू लग्न करून मोकळी झालीस? तू… दुसर्‍या माणसाची होऊन बसलीस?’’
तिला काय बोलावं तेच कळेना. योगेशचं घर अनुजच्या बंगल्याला अगदी जवळ. चौकशी करतच तो तिथपर्यंत आला होता. आता त्याचं स्मरण, त्याची ओळख त्याला परत आली होती, पण कोणतीही सहानुभूती, किंवा प्रेम न दाखवता गुड्डी म्हणाला, ‘‘गुड्डी? कोण गुड्डी? तुमचा गैरसमज होतोय. माझं नाव प्रज्ञा योगेश धारप आहे. सौ. धारप… चुकीच्या घरात आलाहात तुम्ही. माझ्यासारखी कुणी दिसत असेल तुमची गुड्डी…’’
अनुज अवाक् झाला. थरथरू लागला आणि गुड्डीनं दार बंद केलं. घराचं आणि मनाचंसुद्धा!

– माधव गवाणकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.