Now Reading
लिव्ह इन का लड्डू!

लिव्ह इन का लड्डू!

Menaka Prakashan

‘हम जिते एक बार हैं, मरते एक बार हैं
प्यार भी एक ही बार होता है, शादी भी एक ही बार होती है’

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातला शाहरूख खानचा हा डायलॉग कितीही टाळीफेक असला, तरी त्याच चित्रपटात मध्यंतरानंतर दुसर्‍यांदा प्रेमात पडून त्यानं स्वतःलाच खोटं ठरवलं होतं. हे सांगायचा मुद्दा इतकाच, की मानवी भावभावना या भयंकर गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे अमुक एक वागणं बरोबर आणि तमुक एक चुकीचं, असे शिक्के समाज मारत असला, तरी ते दरवेळी बरोबर असतातच असं नाही. प्रेमात अगदी आकंठ बुडालेली जोडपीही वर्ष-दोन वर्षांत फटकन वेगळी होतात, तेव्हा त्यांच्या नात्याचे साक्षीदार असलेल्यांना काही केल्या ते झेपत नाही. यामागे अनेकदा ‘आम्ही एकमेकांना अनुरूप नाही’, याची जाणीव दोघांपैकी एकाला, किंवा दोघांनाही झाल्यानं त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला असतो. आजच्या जगात ब्रेकअप ही सर्रास होणारी, किंवा होऊ शकणारी गोष्ट झाली आहे. त्यामुळेच प्रेम ही भावना म्हणून कितीही उत्कट असली, उदात्त असली, तरी प्रेमात पडताना आपलंही नातं तुटू शकतं, याची जाणीव प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी असतेच. पण प्रेम आणि लग्न या दोन ध्रुवांच्या मधे काही असतं का बरं? सुदैवानं या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं आहे आणि त्याला शुद्ध मराठीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असं म्हणतात.

आपल्या जोडीदारासोबत लग्नापूर्वी, किंवा लग्न न करता कायमचं ‘लिव्ह इन’मध्ये राहावं का? हे खरंतर व्यक्तिसापेक्ष आहे. आणि आपल्या आधीची पिढी, नातेवाईक, समाज लग्नाशिवायच्या अशा नात्यांमधली भावनिक आणि शारीरिक जवळीक मान्य करायला तयार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही पुण्या-मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचं प्रमाण वाढतं आहे. आपण आपल्या जोडीदारासोबत खरंच भावनिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अनुरूप आहोत का, हे जोखण्यासाठी अनेक जोडपी हल्ली ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. पण योग्य पूर्वतयारी न करता अशा नात्यांमध्ये पडल्यास वरवर साधी सरळ वाटणारी ही गोष्ट खूप गुंतागुंतीची होऊ शकते. ‘लिव्ह इन रिलेशन’ म्हणजे नक्की काय? अशा प्रकारच्या नातेसंबंधांना कायद्याची काय बाजू असते? भारतातली या बाबतची सद्यःस्थिती काय? इतर देशांत ‘लिव्ह इन’कडे कशाप्रकारे पाहिलं जातं?
कोणत्याही सज्ञान जोडप्यानं एकमेकांच्या संमतीनं लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेत लैंगिक नातं प्रस्थापित करण्याला ढोबळमानानं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणता येईल. यात कायदेशीर प्रक्रियेशिवाय त्या जोडप्याला सोबत राहून एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळते. त्यामुळेच काही कारणानं वेगळं होण्याचा निर्णय जरी त्यांनी घेतला, तरी दोघांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांची विनाकारण होणारी लुडबुड, किंवा कोर्टकचेर्‍या टळू शकतात.
आपल्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेत आजही लग्न झाल्यावर बायकोनं करायची कामं, कर्तव्य यांची भलीमोठी अदृश्य अशी यादी असते. ‘लिव्ह इन’मध्ये मात्र एकत्र राहण्यापूर्वीच दोघंही एकमेकांच्या संमतीनं घरातली सगळी कामं वाटून घेऊ शकतात. यामुळे स्वयंपाक कुणी करायचा, किंवा भाजी कुणी आणायची, अशा वरवर किरकोळ वाटणार्‍या गोष्टींवरून होऊ शकणारी संभाव्य भांडणं टळतात.

इंदिरा शर्मा विरुद्ध व्ही. के. व्ही शर्मा या केसच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे चार प्रमुख प्रकार स्पष्ट केले आहेत. यामध्ये पहिल्या प्रकारात सज्ञान अविवाहित पुरुष आणि सज्ञान अविवाहित स्त्री एकमेकांच्या संमतीनं एकत्र राहतात. ‘लिव्ह इन’मधलं हे सगळ्यात सहज-सोपं नातं ठरतं.
यानंतर पुढच्या दोन प्रकारांत जोडीदारांपैकी एकजण विवाहित, तर दुसरा अविवाहित असतो आणि तरीदेखील ते स्वखुषीनं एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. मात्र या प्रकारच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप्स’ गुंतागुंतीच्या ठरू शकतात. विशेषतः अशा प्रकारच्या नात्यांमध्ये संबंधित पुरुष विवाहित आहे, हे अविवाहित बाईला माहिती नसेल आणि महिलेकडून तशी तक्रार आली, तर ‘भारतीय दंड संहिते’नुसार तो गुन्हा ठरतो.

‘लिव्ह इन’च्या चौथ्या प्रकारात दोन समलिंगी व्यक्तींनी स्वखुषीनं एकत्र राहण्याच्या निर्णयाचा विचार होतो. आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयानं ६ सप्टेंबर २०१८ रोजी ऐतिहासिक निर्णय देत समलिंगी संबंध गुन्हा असण्याचा एकशे अठ्ठावन्न वर्षं जुना कायदा रद्दबातल ठरवला. त्यामुळे समलिंगी व्यक्तींना ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी अजूनही अशा जोडप्यांना लग्नाचा, किंवा मूल दत्तक घेण्याचा अधिकार आपल्या देशात नाही.
दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये परस्पर संमतीनं ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. बरेच दिवस ‘लिव्ह इन’मध्ये असणार्‍या एका डॉक्टरनं आपल्या साथीदार नर्सशी लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा त्या डॉक्टरविरोधात संबंधित नर्सनं बलात्काराची तक्रार दाखल केली होती. बलात्कार आणि परस्पर संमतीनं ठेवलेले लैंगिक संबंध यात महद अंतर असल्याचं न्यायालयानं स्पष्ट करत नर्सनं डॉक्टरवर केलेले आरोप फेटाळून लावले आणि अशा केसेस काळजीपूर्वक हाताळण्याचे निर्देश पोलिसांना आणि खालच्या न्यायालयांना दिले.
‘लिव्ह इन’ नातेसंबंध हे भारतात वैध आहेत, असा महत्त्वाचा निकालही सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी एका केसमध्ये दिला होता. एखाद्या सज्ञान जोडप्याला एकत्र राहायचं असेल, तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे, त्यामध्ये गुन्हा कसला, असा सवाल न्यायालयानं त्या वेळी उपस्थित केला होता. दुसरीकडे एखादं जोडपं नवरा-बायकोप्रमाणे अनेक वर्षं एकत्र राहत असेल आणि त्यांना मुलंही असतील, तर कायदेशीरदृष्ट्या ते विवाहित आहेत, असं गृहीत धरत त्यांना सर्व कायदे लागू होतात.

हे सगळं जरी असलं, तरी ‘लिव्ह इन’ नातेसंबंधांची कोणतीही कायदेशीर व्याख्या नसल्यानं कायद्याच्या पातळीवर अशा प्रत्येक नात्याला वेगळी चौकट लागू होते. त्यामुळेच ‘लिव्ह इन’मध्ये असताना काही कारणानं संबंधित जोडप्यात वाद झाले आणि ते प्रकरण न्यायालयात गेलं, तर त्या ठरावीक केसचं स्वरूप तपासत न्यायालय आपला निकाल देतं. विशेष म्हणजे, ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या स्त्रियांचंही ‘कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्या’नं रक्षण होतं. घटस्फोटीत स्त्रियांना पोटगीचा अधिकार असला, तरी आपल्या देशात कोणत्याच मॅरेज अ‍ॅक्टमध्ये ‘लिव्ह इन’ला मान्यता नाही. परिणामी ‘लिव्ह इन’मधल्या स्त्रियांना कोणतीही नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद नसल्यानं, भारतीय न्यायव्यवस्थेनं ‘क्रिमिनल प्रोसिजर कोड’च्या कलम १२५ मध्ये अविवाहित स्त्रियांना नुकसान भरपाईची कायदेशीर तरतूद केली आहे.
बराच काळ सोबत राहणारी ‘लिव्ह इन’ जोडपी स्वतःचं मूल होऊ देण्याचा विचार करू शकतात. अशा वेळी होणारं ते मूल नैसर्गिकपणे दोन्ही जोडीदारांच्या संपत्तीचं वारस तर ठरतंच, शिवाय आधीच्या पिढीच्या संपत्तीचा वारसही ‘लिव्ह इन’ संबंधांतून झालेलं हे मूल ठरतं. थोडक्यात, कोणतीही चूक नसताना मुलांची विनाकारण फरफट होऊ नये, याची पुरेशी काळजी आपल्या कायद्यानं घेतलेली दिसून येते.
पाश्चात्त्य देशांचा विचार करता अनेक युरोपियन देशांमध्ये ‘लिव्ह इन’ नातेसंबंध कायदेशीर गणले जातात. फ्रान्सनं १९९९ मध्ये या संदर्भातला कायदा करत केवळ भिन्नलिंगीच नाही, तर समलिंगी ‘लिव्ह इन’ जोडप्यांनाही लग्नासारखेच सर्व अधिकार बहाल केले आहेत. ज्या जोडप्यांना ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे असते, ते केवळ कोर्टात या संदर्भातील एक अर्ज दाखल करून आपलं नवीन आयुष्य सुरू करू शकतात आणि कोणत्याही क्षणी एका डिक्लरेशनद्वारे या नात्यातून बाहेरही पडू शकतात.

लिव्ह इन रिलेशन्स ही अमेरिकेत सर्वसामान्य गोष्ट असून, २०११ च्या जनगणनेनुसार एक्याऐंशी लाख अविवाहित जोडपी ‘लिव्ह इन’मध्ये राहत होती. असं असलं, तरी अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ‘लिव्ह इन’संदर्भात वेगवेगळे कायदे आणि धोरणं असल्याचं दिसून येतं. इंग्लंडमध्येही ‘लिव्ह इन रिलेशन्स’चं प्रमाण खूप मोठं आहे. सन २०११ मध्ये तिथे जन्मलेल्या मुलांपैकी जवळपास निम्मी मुलं विवाहबाह्य संबंधातून जन्मलेली होती. ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या जोडप्यांचं प्रमाण इतकं मोठं असल्यानं गेल्या काही वर्षांत इंग्लंडमध्ये या कायद्यांमध्ये अनेक कालसुसंगत बदल करण्यात आले आहेत. इग्लंड, वेल्स, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये अविवाहित वडलांवर पालकत्वाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. असं असलं, तरी लग्नाचं कमालीनं घटणारं प्रमाण हा इंग्लंडमध्ये चिंतेचा विषय झाला आहे. विवाहबाह्य संबंधांतून आणि मुख्यत्वे ‘लिव्ह इन रिलेशन्स’मधून होणारी मुलं हा तिकडे मध्यंतरी राजकीय मुद्दा झाला होता. सरकारनं विवाहसंस्थेला प्रोत्साहन द्यावं की नाही, याबद्दल तिकडे दोन परस्परभिन्न मतप्रवाह आहेत.

अमेरिकेच्या ‘दी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंट’च्या अहवालानुसार १९९० ते १९९४ दरम्यान झालेल्या लग्नांपैकी चौपन्न टक्के ‘लिव्ह इन’नंतर झाली होती. अमेरिकेतली बहुतांश तरुणाई काही काळ तरी ‘लिव्ह इन’मध्ये घालवते, असं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं आहे. असं असलं, तरी अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये लग्नापूर्वी ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या जोडप्यांच्या घटस्फोटाचं प्रमाण हे ‘लिव्ह इन’मध्ये न राहणार्‍या जोडप्यांपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं आहे. तसंच ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या जोडप्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी देण्याचं प्रमाण हे विवाहित जोडप्यांच्या तुलनेत पाच पट अधिक असल्याचं निरीक्षण आहे. ‘अमेरिकन कॉलेज ऑफ पिडिअट्रिशन्स’नं प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्येही कुमारवयीन मुलं-मुली लग्नापूर्वी ‘लिव्ह इन’मध्ये राहिले, तर त्याचा त्यांच्या भावी आयुष्यावर आणि लग्न केल्यास वैवाहिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतो, असं निरीक्षण नोंदवलं आहे.
‘लिव्ह इन’संदर्भात जगभरातलं वास्तव अशा प्रकारे संमिश्र असलं, तरी असा निर्णय सारासारपणे घेणं गरजेचं आहे. ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय अनेकदा केवळ जोडीदाराच्या हट्टावरून, मित्रांच्या दबावामुळे, किंवा केवळ एक नवीन प्रयोग म्हणून घेतला जाण्याची शक्यता असते. पण उद्या फारकत झाली, तर त्याचे व्रण पुढचा बराच काळ त्या जोडप्याच्या मनावर राहू शकतात. आजचं जग कितीही व्यवहारी असलं, तरी दिवसरात्र आपण ज्या व्यक्तीबरोबर राहतो, तिचं नसणं आणि एकाएकी आपल्या आयुष्यातून कायमचं निघून जाणं, हे पचवायला सोपं नाही. त्यामुळेच वाटेल तेव्हा विभक्त होता येणं, ब्रेकअप करता येणं, ही ‘लिव्ह इन’ची सगळ्यात मोठी जमेची बाजू, सर्वात मोठी वजेची असू शकते.

ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरीकडे काही काळ आपल्या जोडीदारासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यानं भविष्यातले अनेक घोटाळे टळू शकतात. कोणत्याही जोडप्यात प्रेम आणि लैंगिक नातेसंबंध खूप महत्त्वाचे असतात. दुर्दैवानं बघून केलेल्या, अथवा प्रेमविवाहातही लैंगिक अनुरूपतेचा काडीचाही विचार केला जात नाही. विवाहपूर्व लैंगिक संबंध हा कोणत्याही ‘लिव्ह इन’चा अविभाज्य भाग असल्यानं आपल्या जोडीदारासोबत आपण भावनिकदृष्ट्या आणि शारीरिक-लैंगिकदृष्ट्या अनुरूप आहोत का, हे वेळीच कळू शकतं. थोडक्यात, ‘लिव्ह इन’च्या लिटमस टेस्टनंतर लग्न करायचा, किंवा सामंजस्यानं वेगळं होण्याचा निर्णय ते जोडपं घेऊ शकतं. पण इथे आवर्जून लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेताना किमान वर्षभर त्या जोडप्यानं सोबत राहायला हवं. तर आणि तरच एकमेकांचे स्वभाव, चांगल्या-वाईट सवयी, महत्त्वाकांक्षा आणि दोषही कळू शकतील. केवळ महिनाभर सोबत राहून आपलं छान जमतंय, किंवा अजिबात पटत नाही, अशा कोणत्याही निष्कर्षाप्रत येणं खूप घाईचं ठरू शकतं.

लग्नापूर्वी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ‘मला जर हे आधी माहिती असतं ना, तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं’, हे वाक्य म्हणायची वेळ दोघांपैकी कुणावरच येत नाही. कारण तुम्ही जेव्हा चोवीस तास एखाद्या माणसासोबत राहता, तेव्हा कितीही लपवायचं म्हटलं, तरी छोट्या छोट्या सवयींतून तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. अगदी दोघांपैकी एकाला रात्री पंखा लावून झोपायची सवय असेल आणि दुसर्‍याला नसेल, तर सुरुवातीलाच अशा छोट्या छोट्या गोष्टींवर तोडगे काढता येतात. जेवणाच्या आणि खाण्यापिण्याच्या सवयी हादेखील अतिशय दुर्लक्षित पण तितकाच महत्त्वाचा विषय आहे. दोघांपैकी एकाला सतत बाहेरचं खाण्याची सवय असेल आणि त्याउलट दुसर्‍याला घरी केलेलं जेवणच आवडत असेल, तर सोबत राहताना सुवर्णमध्य गाठावाच लागतो. तीच गोष्ट मांसाहार, मद्यपान आणि त्याच्या प्रमाणाच्या बाबतीत. आपला जोडीदार कधीतरी पितो, धूम्रपान करतो की तो व्यसनी आहे, हे ‘लिव्ह इन’मध्ये सोबत घालवलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला कळू शकतं. आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेकांच्या बाबतीत पिणं आणि धूम्रपान या सर्वसाधारण गोष्टी झाल्या असल्या, तरी त्यांचा अतिरेक हा तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर गंभीर परिणाम करू शकतो. याउलट आपल्या जोडीदाराला व्यायामाच्या, फिटनेसच्या आणि डाएटच्या चांगल्या सवयी असतील, तर त्यामुळे तुम्हीही प्रेरित होऊ शकता.

‘लिव्ह इन’मध्ये राहताना अनेक जोडपी गुपचूप निर्णय घेतात. तसं केल्यास नकळत सतत ताण, दडपण येऊ शकतं. आपल्या आधीच्या पिढीनं ‘लिव्ह इन’च्या निर्णयाला मान्यता देणं जरी अशक्यप्राय वाटत असलं, तरी त्यांना या बाबतची पूर्वकल्पना देणं आवश्यक असतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुढेमागे अशा नात्यात काही कायदेशीर गुंतागुंत उद्भवली, तर जवळची माणसं मदतीसाठी धावून येऊ शकतात.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट अपत्यांबाबत! काहीही झालं तरी मूल होऊ द्यायचं नाही, यावर दोघंही ठाम असतील, तर त्यासाठीची काळजी घेण्याची दोघांचीही तयारी हवी. पुढेमागे एका कुणाला वाटलं, तर मुलाचा विचार करू, असं मत असेल, तर त्याचीसुद्धा जाणीव दोघांनाही असणं आवश्यक आहे. बर्‍याचदा आधी छान असलेलं नातं मूल झाल्यावर आलेल्या नवीन जबाबदार्‍यांमुळे विस्कटू शकतं. अशा वेळी मुलाची जबाबदारी कोणत्या तरी एकाच जोडीदारावर आली, तर ती व्यक्ती आणि कोणतीही चूक नसणारं ते मूल विनाकारण भरडलं जाऊ शकतं. त्यामुळेच ‘लिव्ह इन’कडे विवाहपूर्व शारीरसंबंधांचा परवाना म्हणून पाहिलं न जाता त्यासोबत येणार्‍या संभाव्य सर्व परिणामांची जबाबदारीही येते, याचं भान हवं.

– निरंजन मेढेकर

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.