Now Reading
लढा

लढा

Menaka Prakashan

दोन यंत्रं अमोरासमोर होती. माझा लॅपटॉप आणि मी. कितीतरी वेळ असेच स्थिर होतो. तो हलू शकत नव्हता आणि मी हलले नव्हते. तिकडे क्लाएंट खोळंबला होता. मेलची वाट पाहत होता. इकडे आम्ही दोघंही हरवलो होतो. वास्तविक, आम्ही अगदीच वेगवेगळे होतो. आमच्यात कसलीही तुलना होऊ शकत नव्हती, तरीही एक मात्र साम्य होतं आमच्यात. त्यालाही मेमरी होती आणि ती मलाही आहे. मेमरी! म्हणजे आठवणी. त्याची मेमरी प्रिय, अप्रिय अशी काही नसते, पण मी पडले मानवजात. माझ्या आठवणी सगळ्या प्रकारच्या होत्या. बरं, त्याच्या मेमरीला कमाल मर्यादा होती आणि मी त्या बाबतीत अमर्याद होते. रोजच्या नव्या आठवणी मेंदूत शिरायच्या, पण मेंदूनं कधीही तक्रार केली नाही. किंवा नवी आठवण साचवताना जुनी पुसून टाकली नाही. सगळ्या अद्ययावत जपल्या त्यानं. अगदी समजायला लागल्यापासूनच्या ते आजपावेतो, अगदी जशाच्या तशा. ‘अ‍ॅप्पल…, मेंदूसारखं यंत्र बनवायला तुला साक्षात भगवंताकडे चाकरी करावी लागेल. आणि तरीही तुला ते शक्य होणार नाही.’

‘आणि ही आमची शुभदा.’ आलेल्या-गेलेल्यांना आई माझा परिचय करून द्यायची. ‘शुभा, चल नमस्कार कर पोरी.’ मी बापडी, वाकायचे. वाकून ताठ झाले, की त्यांच्या डोळ्यांतले भाव मेंदूनं अजून सेव्ह केलेले आहेत.
‘‘आई, मी एवढी काळी आहे का?’’
‘‘कोण म्हणालं तसं?’’
‘‘शाळेत सगळे चिडवतात मला. म्हणतात, की ‘पाटी लिहून लिहून लई पांढरी झालीये, जरा तुझ्या अंगानं पुसून काढ म्हणजे पुन्हा काळी होईल.’ ’’
‘‘नाही गं राणी. तू उजळ नाहीस, इतकंच.’’
अगदी थेट तेव्हापासून कातडीच्या रंगाला किती किंमत असते, हे मेंदूनं स्टोअर करून ठेवलंय. शाळेच्या गॅदरिंगचा प्रोग्राम असो, कॉलेजची वक्तृत्व स्पर्धा असो, नोकरीचा साक्षात्कार असो, किंवा लग्नाचा बाजार असो. बुद्धी, कर्तृत्व आणि गुण गेले ग च्या गा त. रंग आधी महत्त्वाचा. चार महिन्यांनी तिसावं लागणार आहे मला. गेल्या एकोणतीस वर्षांत एका शब्दानं माझा पिच्छा कधीच सोडला नव्हता. तो म्हणजे ‘नकार’. ‘गिनेज बुक’मध्ये याची नोंद आहे का नाही, मला माहीत नाही. पण जर असली, तर ती नक्कीच खोटी असेल. कारण नकार मिळवण्याचा विक्रम माझ्याएवढा जगात नक्कीच कुणीही केला नसेल, याची साक्ष खुद्द परमेश्वरसुद्धा देऊ शकेल. तरीही, माझी त्याच्याशी कसलीही तक्रार नाही. बाकी सगळं सगळं दिलंय त्यानं मला. अगदी पहिलीपासून क्लासमध्ये पहिला नंबर माझा. त्या ‘थ्री इडियट्स’प्रमाणे. शुभदा म्हणजे पहिला नंबर, बाकी मग इतर. बरं, उंची पाच फूट सात इंच. अंगानं जेव्हा जेव्हा, जशी जशी भरायला पाहिजे अगदी तशीच भरलेली. म्हणजे मागून येणारा मला पाठमोरी बघून पुढे आला, की वळून पाहायचाच. मग मात्र लगेच नजर वळवायचा, तो भाग वेगळा. घराला नीटनेटकं कसं ठेवायचं, हे माझ्याकडून शिका. अगदी केर-वार्‍यापासून ते धुणं-भांडी, मी एकदा भिडले की भिडलेच. उरला तो स्वयंपाक! व्हेज-नॉनव्हेज, काय खायचंय ते बोला. पानं नंतर धुवावीच लागणार नाहीत एवढी चाटूनपुसून स्वच्छ करून जाल. पण रंगापुढे कशाचीच गणती झाली नाही. नकार हा कायमचा नशिबी.

‘‘ओ मॅडम, विश्वसुंदरी! आधे घंटे से सो रही हो। यहाँ तुम्हे काम करने की पगार मिलती हैं।’’ सिन्हा. बिहारी बाबू. माझा टीम लीड. त्याला माझा कसला राग होता, हे तोही सांगू शकला नसता, कदाचित. किंबहुना, त्याला माझ्यावर ओरडायचाच पगार मिळत असावा बहुतेक.
मी भानावर आले, लगेच. सिन्हा पुन्हा चुकला होता. झोपले मी नव्हते, समोरच यंत्र होतं. मी त्याला जागं केलं. जाग येताच त्यानं माझ्यासमोर मी करत असलेला अर्धवट मेल दाखवला.
“Client is waiting. Solve his
queries. Keep me in the loop.” सिन्हा, जाता जाता.
मी गुमान सीसीमध्ये पीके (गिर के) सिन्हाला अ‍ॅड केलं आणि कामात लक्ष घातलं.

खाली येताना लिफ्टमधे भार्गवही होता, माझा मॅनेजर. अलीकडे हा योग अनेकदा घडत होता. मला डेस्कवरून उठायला साडेसात तरी व्हायचेच. एव्हाना लिफ्ट रिकामी असायची, म्हणून खाली येताना आम्ही दोघंच तीत असायचो. अंग चोरून पुढे उभी असताना मागून त्याची नजर मला चक्क स्पर्श करायची. तो एक मिनिट मला एका वर्षाएवढा वाटायचा. दार उघडताच मी बाहेर येऊन उजवीकडे वळले. हो, टू व्हीलर पार्किंग उजवीकडेच आहे. वास्तविक, त्यानं डावीकडे वळायला हवं होतं, कारण चार चाकी पार्किंग तिकडे होतं, पण तो माझ्या मागे मागे येऊ लागला.
‘‘शुभा, भला हमसे ऐसी क्या नाराजगी? कमसे कम देख के स्माईल तो किया करो।’’
‘‘अं… मैं जरा जल्दी में हूँ सर…’’
‘‘अरे, आज काहे की जल्दी। फ़्रायडे है। वीकएंड शुरू हो गया है।’’
‘‘वो… माँ घरपर अकेली होगी…’’
‘‘अरे छोडो, बहाने बनाना तो कोई तुमसे सीखें. बॉयफ्रेंड राह देख रहा हैं, है ना?’’
मी गाडीपाशी पोचले होते, ‘‘अं… गुड नाईट सर…’’
‘‘सुनो, घुमा फिराके बात नहीं करूँगा। सीधे पूछता हूँ, मेरे साथ चलोगी?’’
‘‘आपके साथ? कहाँ?’’
‘‘वेल फर्निश्ड फ्लॅट हैं। अकेला रहता हूँ। रात साथ बिताते है। जो बोलोगी, हाजिर हो जायेगा। क्या बोलती हो…?’’ भार्गव दिल्लीहून नुकताच बदली होऊन आला होता, एकटाच. फॅमिली दिल्लीलाच होती. मुलांच्या शिक्षणात खंड नको म्हणून. कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्या शरीराची मागणी करण्याचे अनेक प्रस्ताव मला आले होते, पण इतके धाडसी नव्हते. मला मात्र नकार पचवण्याची इतकी सवय झाली होती, की नकार देणं हे मला कधी जमलंच नाही. त्याचा माझ्या मनाच्या चिंध्याचिंध्या करण्यार्‍या प्रस्तावाला पण मला ठामेठोक नकार देता आला नाही. उलट मान खाली घालून मी काहीही न बोलता गाडी सुरू केली आणि अक्षरशः तिथून पळ काढला. राग एवढा अनावर झाला होता, की मी आपलाच ओठ चावून घेतला. रक्ताची आंबट चव जिभेला लागताच आवरलं मी स्वतःला.

मी धडपडत डेस्कवर गेले. मोबाईलवर मी फक्त एवढंच बघितलं होतं, की गुगलचा रिाय आला होता. लगबगीनं मेल उघडला. डेव्हलपरसाठी अर्ज केला होता. माझ्या ग्रेड्स, माझा अनुभव आणि माझं ज्ञान, गुगल तरी नक्कीच यांची किंमत करेल, याची मला खात्री होती. पण घोर निराशा हाती आली. गुगलनं नकार दिला होता. सुन्नऽऽ… बसून राहिले. विश्वासच बसेना. नाही म्हणजे, नकाराची भरपूर सवय असूनही मला अतोनात वाईट वाटलं. कारण मला फक्त माहीतच नव्हतं, तर ठाम विश्वास होता, की गुगल ज्या व्यक्तीला शोधत आहे, ती मीच आहे. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे जे काही लिहिलं होतं, ते सारं मला फक्त येतंच नव्हतं, तर ते माझं वैशिष्ट्य होतं. मी डोळे बंद केले. नकार मिळाला, की मी हेच करत होते. लढायचं स्वतःशी. स्वतःच स्वतःला धीर द्यायचा आणि म्हणायचं, ‘शुभा, अजून तयारीची गरज आहे.’

रात्र बरीच उलटून गेली होती, तरीही मी भान हरपून कोडिंगमध्येे जुंपले होते. प्रोग्राम अतिशय कठीण होता. गेला महिनाभर मी जीव तोडून प्रयत्न करत होते. अनेकदा प्रोग्रामिंग करून झालं होतं, पण रन केल्यावर हाती निराशा यायची. ढीग अभ्यास करत होते. नोट्स लिहून घेत होते. मग पुन्हा सुरू करायचे. सुरुवात छान जमायची. वेगानं पुढे जायचे, पण शेवट आला, की बिघडायचं सगळं. आजही अगदी शून्यापासून सुरुवात केली होती. प्रत्येक टप्प्यावर मिळणारा डेटा तपासून घेत होते. जे अपेक्षित आहे तेच मिळतंय का नाही, याची खात्री करून घेत होते.
तोच आई आली. कपाटात काहीतरी ठेवून का घेऊन परत बाहेर गेली. केव्हापासून ती आतबाहेर करत होती. मी थांबले. वेळ पाहिली. १२.२०. आई झोपत का नाहीये? आणि आठवलं, आपण अजून जेवलो नाहीये. जेव्हा केव्हा जेवायला उठू, तेव्हा ती अन्न गरम करून प्रेमानं जेवू घालेल, मगच झोपेल. या प्रोग्राममुळे हल्ली मी स्वयंपाक करतच नव्हते. तीच बिचारी जमेल तसं करायची काहीतरी. मला भरून आलं. कसली भाग्यवान होते मी. एकीकडे माझं कमकुवत नशीब होतं, तर दुसरीकडे आई होती, माझ्या जमेची सगळ्यात भक्कम बाजू. मी उठले. हात धुवू लागले. नळाचा आवाज येताच ती लगबगीनं आली.
‘‘वाढू का गं?’’
‘‘होय. काय केलंय?’’
‘‘पिठलं-भात. छान गरम करते.’’
मी हात पुसून किचनमध्ये आले. तोवर तिनं कुकर गॅसवर ठेवला होता. दुसरीकडे पिठलं गरम होत होतं. कांदा चिरून झाला होता. आणि ती ताट पुसत होती. मी जाऊन तिला मिठी मारली.
‘‘अगं अगं…’’
‘‘तू नसतीस तर माझं काय झालं असतं गं?’’
‘‘वेडी! हे तर मी म्हणायला पाहिजे. चल, बस.’’ मी आसन घेऊन ऐसपैस बसले. तिनं वाढलं आणि समोर बसली. पहिला घास जाताच जाणवलं, की जोराची भूक लागली होती.
‘‘किती काम करतेस गं.’’
‘‘काम नाही, तपस्या करतेय.’’ तिनं विषय पुढे नाही वाढवला. पुढ्यात मेथी होती ती निवडू लागली आणि मला समजलं. तिला काहीतरी बोलायचंय.
‘‘बोल…’’ मी तिला खो दिला.
‘‘शुभे, मुलंवाल्यांचा पुन्हा निरोप आलाय गं.’’
‘‘काय?’’
‘‘अगं, मुलाचे आत्तोबा आलेत बघ नाशिकहून. त्यांना म्हणे तुला एकदा बघायचंय.’’
‘‘आई, काय चाललंय हे? मी काही प्रदर्शनात मांडलेली वस्तू नव्हे.’’
‘‘अगो पोरी, नको गं एवढी रागावू. जरा नमतं घे गो.’’
‘‘आत्तापर्यंत तीनदा बघून झालंय त्यांचं. त्यांना म्हणावं…’’
‘‘अगं, मी तुला सांगते, ते तुला होकार देणार म्हणजे देणार. बघच तू.’’
‘‘काही उपकार नाही करणार. मी धडधाकट आहे, हुशार आहे. नोकरी करतेय. आणि मुलगा एका पायानं अधू आहे. शिक्षण पूर्ण झालेलं नाही आणि काहीच करत नाही.’’
‘‘अगं पण बाई, घरचं घर आहे. शेती आहे. लोक चांगले आहेत… बास झालं आपल्याला. तीस लागेल आता तुला.’’
मी गप्प बसले. काय उत्तर देणार होते.

‘‘बाई, तुमचं पार्सल आलंय.’’ उमेश. सवयीप्रमाणे लक्ष माझ्या छातीकडे.
‘‘कुठून?’’
‘‘फ्लिपकार्ट.’’
‘‘फ्लिपकार्ट…? पण मी काहीच ऑर्डर केली नाहीये.’’
‘‘तुमच्याच नावानं आलंय.’’
मी लगेच रिसेप्शनवर गेले, तर खरंच माझंच नाव होतं पार्सलवर. चकितच झाले. मी तर काहीच मागवलं नव्हतं, पण पेमेंट झालेलं होतं. घ्यावं लागलं. परत डेस्कवर आले. काय करावं? इथेच उघडून पाहावं का? पण कामाचा पसारा होता म्हणून नंतर बघू, असं ठरवलं. कामाला लागले, पण विचारही सुरू होते, की कुणी पाठवलं असेल हे पार्सल आपल्याला. शेवटी लंचमध्ये हळूच उघडलं आणि जिवाचा संताप संताप झाला. आत खूप महागडी टू पीस लाँजरी होती. हे नक्कीच भार्गवचं काम असणार. लक्षात आलं, की तो मघाशी आपल्याला पाहून मिश्कील हसत होता. वाटलं की सरळ जाऊन त्याच्या कानफटीत मारावी. सार्‍या ऑफिससमोर त्याला जाब विचारावा. पण नाही केलं तसं, कारण हा त्याचा उपद्व्याप आहे, हे मला सिद्ध करता आलं नसतं. जळफळाट झाला, पण गप्प बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. हम्म…! कसलं स्वातंत्र्य… नुसत्या गप्पा आहेत. म्हणायला अनेक कायदे झालेत, पण प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत काहीच बदल नाही. स्त्रीला निमूट सहन करावंच लागतं. काय करावं? तो सिन्हा काय कमी होता, की हा भार्गव आणखी आला लचके तोडायला. नोकरी बदलावी. पण तीही मनासारखी मिळत नाहीये दुसरी. घरी परतताना पण हेच थैमान सुरू होतं डोक्यात. तोच एक चमत्कार घडला. सिग्नलवर थांबून होते तो एक आजीबाई आल्या.
‘‘पुढच्या चौकात जायचंय. नेशील का गं पोरी?’’
मी लगेच ‘हो’ म्हटलं. त्या बसू लागल्या, पण त्यांना काही जमेना. ठेंगण्या होत्या. स्कूटर त्यांना उंच पडत होती. आधी कोणता पाय ठेवायचा, कुठे ठेवायचा, त्यांना कळत नव्हतं. आणि प्रयत्न करता करता शेवटी पडल्या त्या. लगेच कुणीतरी धावून आलं आणि त्यांना आधार देऊन व्यवस्थित बसवलं.
‘‘नेहमी हे असं होतं बघ माझं. पहिलंच पाऊल चुकतं आणि पडते मी.’’ त्यांनी दिलखुलास हसून म्हटलं. व्वा! क्या बात है। ताडकन मला उमगलं. जे आहे ते आहे. त्याला रडून उपयोग काय. हसावं उलट. नाही का? आणि लगेच चित्त शांत झालं. त्यांना चौकात नाही, तर घरापर्यंत सोडलं मी. वाटेत थांबून मस्त मिसळही खाल्ली आम्ही. दात नव्हते, पण मोठ्या आनंदानं ताव मारला त्यांनी. आईसाठी पण मिसळ घेतली आणि घरी आले. आल्या आल्या तिला मिसळ गरम करून दिली आणि म्हटलं, की तू आज झोप म्हणून. आज माझं काही खरं नाही. आणि गेले खोलीत. पुन्हा आम्ही अमोरासमोर बसलो. माझा लॅपटॉप आणि मी. पहिलंच पाऊल चुकतंय आपलं. काहीतरी वेगळं करायला हवंय, हे मनाशी ठरवून नव्यानं सुरुवात केली. मग वेळ-काळ सगळं थांबलं. आजूबाजूचं विश्व नाहीसं झालं. फक्त आम्ही दोन यंत्रं उरलो. टप्पा दर टप्पा कोडिंग होत गेलं. शेवटी आईनं सकाळचा चहा आणला, तेव्हा माझा प्रोग्राम तिसर्‍यांदा रन करून झाला होता. मनाला असीम समाधानाची अनुभूती होत होती. अखेर चहाचे घोट घेता घेता मी प्रोग्राम सबमिट केला.

माझ्यात आपोआप एक बदल झाला होता. आता मला कशाचाही त्रास होत नव्हता. सिन्हाच्या बोलण्याचा नाही आणि भार्गवच्या आचरणाचा नाही. सर्वांगाचा शोध घेणार्‍या नजरांचाही नाही. खूप बरं वाटत होतं. बंद गळ्याचे, पूर्ण बाह्यांचे सैल कपडे सोडून मी आता मला हवे ते कपडे घालू लागले होते. गळ्याखाली ज्याला कुणाला जेवढी नजर न्यायची असेल ती नेऊ दे. इकडे, घरी पण मी आईला काही करू देत नव्हते. स्वतः करायचे. तिनं माझं लक्ष ठेवण्याऐवजी मी तिचं लक्ष ठेवू लागले. गेल्या दहा-बारा दिवसांत अनेकदा तिला घेऊन भटकंतीसाठी गेले. मॉलचं, बाजाराचं चमचमीत विश्व बघून हादरली ती. एकशे ऐंशी रुपयांची पाव-भाजी खाताना डोळे फिरवायची बाकी होती ती. मल्टीेक्सच्या पुशबॅक सीटवर अंग चोरून बसली होती ती. पण एक मात्र होतं, माझ्यातला बदल पाहून अतिशय खूष होती ती, याची ग्वाही तिचा चेहरा स्पष्ट देत होता.

आज आईचा वाढदिवस होता. तिला छानशी साडी घेऊ आणि जेवायला बाहेरच जाऊ कुठेतरी. कुठे जायला पाहिजे, हाच मनाशी विचार करत होते, की सिन्हानं एंट्री घेतली.
‘‘ओ हेमामालिनी, आज डिलिव्हरी है, प्रोडक्ट की क्या तैयारी है?’’ सिन्हा, नेहमीप्रमाणे.
‘‘रेडी हैं।’’ मी, बेफिकिरीनं.
‘‘कोई इशू तो नहीं?’’
‘‘एक कोड काम नहीं कर रहा।’’ मी. थंडपणे.
‘‘क्या मतलब? फिर डिलिव्हरी कैसे होगी?’’
‘‘मुझे क्या पता। आप टीम लीडर हो। उधर वो मॅनेजर है। आप लोग जानो।’’ मी सिस्टीम बंद करत म्हणाले.
‘‘क्या बकवास है ये? डेव्हलपर तुम हो। वो कुछ नहीं। कोड को देखो, जल्दी से जल्दी। जब तक प्रोडक्ट तैयार ना हो जाये, घर नहीं जाना है। समझी तुम।’’
‘‘सात बज चुके हैं। मैंने सिस्टम बंद कर दिया है।’’
‘‘बंद कर दिया है? क्यों?’’
‘‘क्यों कि मै घर जा रही हूँ।’’ मी निघायची तयारी केली.
‘‘घर जा रही हो…! फिर मैं…’’ आता भीती उमटली होती त्याच्या चेहर्‍यावर.
थहरींर्शींशी… मी खांदे उडवले आणि निघाले सुद्धा. तो अविश्वासानं मला जाताना बघतच राहिला.
‘‘म… मेरा… मेरा मतलब है, शुभा… शुबदा.. सॉरी, श… शुभदा…, हमें आज किसी भी कीमत पर ये काम करना ही पड़ेगा…’’ तो जवळ जवळ धावतच आला.
‘‘तो कीजिये ना।’’
‘‘मतलब… तुम… नहीं करोगी…?’’
‘‘नाऽऽ! गुड नाईट!’’

लिफ्ट भरधाव खाली जात होती. आज मी एकटीच होते. भिंतीला पाठ टेकून दोन्हीकडे आरशात स्वतःला न्याहाळून पाहिलं. गळा जरा जास्तच मोठा आहे आज. तरी छान वाटलं. मुक्त वाटलं. खाली आले आणि गाडीकडे वळले, तर अचानक समोर आला तो, भार्गव.
‘‘गुड इव्हिनिंग…’’ त्याच्या हातात चक्क गुलाबाचं फूल होतं.
‘‘व्हेरी गुड इव्हिनिंग.’’ मीही प्रत्युत्तर दिलं.
‘‘तुम, मैं, मेरा फ्लॅट और ढेर सारा मजा। क्या कहती हो…’’ अजिबात वेळ न गमवता थेट विषयाला हात घालणं त्याच्यापासून शिकण्यासारखं होतं.
‘‘बस, इतना ही…! या और कुछ कहना है?’’
‘‘अब तो जवाब सुनना है, जी।’’ भरपूर आत्मविश्वास होता त्याच्या आवाजात.
‘‘मेरा जवाब है, नहीं। पहली बार, आखरी बार, हर बार. सुनाई दिया? की और जोर से बोलू?’’ त्याच्या जवळ जाऊन, त्याच्या नजरेला नजर भिडवून मी उत्तर दिलं. तो उघडपणे दचकला. काही बोलताच आलं नाही त्याला. त्याला नकाराची अपेक्षाच नव्हती, बहुतेक.
‘‘ऊपर जाओ। प्रोडक्ट डिलिव्हर करना है आज। वो सिन्हा परेशान हो रहा है, अकेला।’’ आणि मग त्याला तसाच सोडून मी गाडीकडे निघाले.
‘‘और सुनो…’’ मी गाडीची डिकी उघडत त्याला हाक दिली. त्याचं पार्सल हातात घेतलं आणि जोरात म्हटलं, ‘‘ये अपनी वाईफ को दो जाकर!’’ त्याला दाखवत मी पार्सल त्याच्या दिशेनं फेकून दिलं.

‘‘आई, आई, आई…’’ तिनं दार उघडताच मी तिला करकचून मिठी मारली.
‘‘अगं अगं…’’
आधी तिचे दोन्ही हात धरून फुगडीसारखं गोल गोल फिरवलं. मग तिच्या हातात साडीचं पाकीट दिलं.
‘‘नेस ही साडी. ब्लाऊज कोणतंही चालेल. मग मस्तपैकी बाहेर जाऊ जेवायला.’’
‘‘अरे वा! महागडी साडी, जेवायला बाहेर! आज काय बोनस मिळालाय का?’’
‘‘नाही. उलट नोकरी जाण्यात आहे माझी.’’
‘‘बापरे…! मग…?’’
‘‘मग हे, की आज तुझा वाढदिवस आहे.’’
टचकन डोळ्यांना पाणी आलं तिच्या. आपोआप हात मायेनं माझ्या केसांमधून फिरू लागला. आणि जवळ घेऊन छातीशी लावलं तिनं. बस, मला जणू जग पावलं.
नंतर, तयार होता होता तिनं संवाद सुरू केला.
‘‘शुभे, मी नव्हते सांगत तुला, की त्यांच्याकडून होकार येईल म्हणून. आज निरोप आला त्यांचा. होकार आहे, पण…’’
‘‘पण काय?’’
‘‘बस, मुलाला एकदा बोलायचंय तुझ्याशी. मी सांगितलं त्यांना, की घरी आल्या आल्या करेल ती फोन. चालेल ना तुला?’’
‘‘आई, एक खरं सांगशील?’’
‘‘इश्श! मी कशाला खोटं बोलेन.’’
‘‘तुला आवडलंय हे स्थळ?’’ ती लगेचच निरुत्तर झाली. बराच वेळ खोलीत फक्त पंख्याचा आवाज होत राहिला.
‘‘हे असंच होतं बेटा. तडजोड करावी लागते. वय होत चाललंय ना तुझं.’’
‘‘आता तडजोड नाही आई. ठरवलंय मी. मी फोन लावते आणि नकार कळवून देते.’’
पुन्हा तिचे डोळे पाणावले. पुन्हा जवळ घेतलं मला.
‘‘तू माझा माज आहेस गं.’’

विस्फारित डोळ्यांनी मी तिसर्‍यांदा मेल वाचला. वाचून विश्वास बसेना. चळलीेीेषीं नं माझा प्रोग्राम सिलेक्ट केला होता. सार्‍या जगातून आलेल्या प्रोग्राम्समद्ये सर्वात निर्दोष प्रोग्राम म्हणून मला पहिला क्रमांक मिळाला होता. दहा लाख डॉलर्सचं बक्षीस पण जाहीर केलं गेलं होतं. शिवाय सीनिअर डेव्हलपर म्हणून मला नोकरीही देण्यात आली होती. अश्रूंचा धूम पाऊस सुरू झाला डोळ्यांतून, आपोआप. तीस वर्षं लागली होती मला जग जिंकायला.

– संदीप सरवटे

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.