Now Reading
रोझ व्हिला

रोझ व्हिला

Menaka Prakashan

दुपारचे दोन वाजले होते. विखे गार्डनचा वॉचमन गेटसमोरचं गेट लॉक करून गेला होता. दुपारचं जेवण-वामकुक्षी आटोपून तो आता पाचलाच येणार होता.
मिहीर जोरात सायकल चालवत आला आणि त्यानं सायकल बागेच्या समोर लावली. बाग बंद असली, तरी कोपर्‍यात एका बाजूनं तारेचं कुंपण मोडलं होतं. त्या लहानशा भगदाडातून मिहीर आत शिरला.
समोर छोटासा कमानदार रस्ता होता. पांढर्‍या-गुलाबी बोगनवेलींनी भरलेल्या रस्त्यानं चालत मिहीर बागेच्या मध्यभागी आला. समोर एक छोटासा तलाव होता. उन्हाळ्यामुळे त्यातलं पाणी आटलं होतं आणि मधे असलेलं कारंजं बंद होतं.
दोन्हीकडे कोयनेलची झुडपं असलेल्या एका पायवाटेनं चालत मिहीर बागेच्या मागच्या तारेच्या कंपाऊंडजवळ आला. कंपाऊंडच्या लगत अगदी जवळ एक दगडी बाक होता. मिहीर बाकावर बसला, मग पटकन परत उठला. बाक उन्हानं चांगलाच तापला होता. मिहीरनं खिशातून रुमाल काढून बाकावर अंथरला आणि तो परत बाकावर बसला.

कंपाऊंडच्या पलीकडे समोर एक छोटासा निर्मनुष्य रस्ता होता आणि रस्त्याच्या पलीकडे शंभर-दोनशे मीटर अंतरावर थोड्या उंचीवर ‘रोझ व्हिला’ होता. बागेतून घराचं समोरचं गेट, छोटीशी बाग आणि समोरचा व्हरांडा दिसत होता.
मिहीरनं घराकडे नजर टाकली. ‘येईलच ती आता. स्वाती!’ स्वाती दिसणार, या कल्पनेनं त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. आनंदानं शहारलेल्या अवस्थेत तो बाकावर स्वातीची वाट बघत बसून राहिला.
बागेत त्याच्यासमोर डावीकडे एक ऑरेंज गुलमोहर होता. दोन लहान मुलं पळत पळत रस्त्यावर बाहेरून उड्या मारत त्याची डहाळी तोडायचा प्रयत्न करायला लागली.
मिहीर उठला आणि त्यानं एक डहाळी तोडून मुलांच्या दिशेनं बाहेर रस्त्यावर भिरकावली. मुलं एकदम खूष झाली आणि डहाळी उचलून उंच हवेत धरून पळाली.
मिहीर पँटच्या खिशात हात घालून त्यांच्याकडे बघत उभा राहिला. खाली वाकून त्यानं एक दगड उचलला आणि लांब भिरकावला. मग परत येऊन बाकावर बसला. रस्त्यापलीकडे अजून ‘रोझ व्हिला’ शांत होता. ‘आज कोणता ड्रेस घालून येईल ती?’ डोळे मिटून स्वातीचा विचार करत तो बसून राहिला.
‘‘साब…’’ अचानक त्याच्या कानाशी आवाज आला आणि तो दचकला. चणे-शेंगदाणे-फुटाणे विकणारा एक माणूस समोर येऊन उभा होता. ‘‘साब, सिंगदाणा…’’ तो मख्ख चेहर्‍यानं मिहीरसमोर उभा राहिला. मिहीर त्या बाकावर का बसला आहे, हे चांगलं माहीत असूनही त्याच्या चेहर्‍यावर काहीच एक्स्प्रेशन नव्हतं. ‘‘नहीं चाहिये कुछ…’’ मिहीर त्याची नजर टाळत म्हणाला.

माणूस पुसट हसला. मग बाजूूला वळून थुंकला आणि निघून गेला.
मिहीरनं रागानं त्याच्या दिशेनं बघितलं. मग तो खिशात हात घालून उभा राहिला. पायानं एक दगड बाजूला मारून तो परत बेचैन होऊन खाली बसला. काल दुपारपासून स्वाती दिसली नव्हती.
मिहीर चालत समोर कंपाऊंड भिंतीजवळ जाऊन उभा राहिला. मान वर करून त्यानं घराकडे नजर टाकली. अचानक घराचं दार उघडलं. मिहीर एकदम एक्साईट झाला. ‘स्वाती!’ मिहीरच्या अंगावर शहारा आला.
घरातून एक म्हातारे गृहस्थ बाहेर आले. गेट उघडून ते बाहेर आले आणि रस्त्यानं निघून गेले.
मिहीर एकदम निराश झाला. स्वाती दिसणार की नाही? धडधडत्या छातीनं तो वळला.
समोरून त्याचा मित्र राकेश बॅकपॅक घेऊन येत होता. त्यानं पाठीवरची बॅग काढून बाकावर ठेवली. ‘‘व्हूऽऽ!’’ तो म्हणाला आणि त्यानं मिहीरच्या पाठीवर थाप मारली.
मिहीरनं वैतागून त्याच्याकडे बघितलं.
‘‘टिंग्या कुठे आहे?’’ रमेश म्हणाला.
‘‘मला काय माहीत? तुम्ही दोघं येणार होतात ना?’’ मिहीर जोरात म्हणाला.
‘‘हो अरे, तो भेटला नाही आज.’’
‘‘मग मी काय करू?’’
रमेशनं मिहीरकडे बघितलं. मग त्यानं रस्त्यापलीकडे घराच्या दिशेनं बघितलं. काही न बोलता तो मिहीरच्या शेजारी बसला. दोघं मुलं काही न बोलता बाकावर बसून राहिली.

मिहीरचा फोन अचानक वाजला. मिहीरनं दुर्लक्ष केलं. फोन वाजत राहिला. मिहीरनं वैतागून फोन खिशातून बाहेर काढला. ‘‘आई…’’ तो म्हणाला.
‘‘घे, बोल.’’ रमेश म्हणाला.
‘‘हॅलो…’’ मिहीर फोनवर म्हणाला.
‘‘मिहीर, कुठे आहेस तू?’’ त्याच्या आईचा जोरात आवाज आला. मिहीरनं रमेशकडे बघत मान हलवली. तो उठला आणि बाजूला जाऊन उभा राहिला. ‘‘अरे मिहीर, कुठे आहेस तू? एकटा सायकल घेऊन गेलास. किती वेळ झालाय. भेटली का तारामावशी? आणि डबा नेलाच नाहीस. घरीच विसरलास.’’ मिहीरची आई जोरजोरात बोलत होती. ‘‘हो, गडबडीत विसरलो.’’ मिहीर मधेच म्हणाला.
‘‘अरे, पण मग परत यायचं. घेऊन जायचा पटकन. किती वेळ लागतो. कुठेतरी फिरत बसतोस.’’ मिहीरची आई बोलत होती.
मिहीर फोन कानापासून थोडा लांब धरून आईचं बोलणं अर्धवट ऐकत समोर बघत होता. स्वाती अजून आली नव्हती.
‘‘पण तू आहेस कुठे आता?’’ त्याची आई एकदम म्हणाली.
‘‘मी… मी… रम्याबरोबर आहे.’’
‘‘कुठे? क्लासला नाही गेलास?’’
‘‘आई, तू सारखी माझ्या मागे लागू नकोस. कुठे आहेस? काय करतो आहेस?’’ मिहीर एकदम भडकला. ‘‘मी कामात आहे. झालं की येतो.’’
‘‘अरे, तसं नाही.’’ त्याची आई नरमाईच्या स्वरात म्हणाली, ‘‘न जेवता गेलास. बराच वेळ झालाय.’’
‘‘आई, मी कामात आहे. झालं की येतो. ओके?’’ मिहीर म्हणाला आणि त्यानं फोन बंद केला.
रमेश बाकावर बसून त्याच्याकडे बघत होता. ‘‘बोअर करतात!’’ मिहीर वैतागून म्हणाला.
रमेशनं सहानुभूतिपूर्वक मान हलवली.

दोन्ही मुलं थोडा वेळ शांतपणे बसून राहिली. मिहीर एकदम बेचैन होऊन उठला आणि समोर येरझार्‍या घालायला लागला.
‘‘रम्या…’’ तो म्हणाला.
‘‘हं? काय?’’ रमेश म्हणाला.
‘‘अजून दिसली नाही रे.’’
‘‘येईल रे. थांब.’’
‘‘इतका उशीर होत नाही.’’
‘‘अरे, काहीतरी काम असेल.’’
‘‘काल रात्रभर झोप नाही.’’ मिहीर बेचैन होऊन केसांतून हात फिरवत म्हणाला.
‘‘दिसेल, थांब थोडा वेळ. डोंट वरी.’’ रमेश म्हणाला.
रमेशनं एक सिगारेट पेटवली. एक-दोन झुरके घेऊन त्यानं ती मिहीरसमोर धरली. ‘‘हं…’’ तो म्हणाला. मिहीरनं सिगारेट घेतली आणि तो भराभर झुरके घ्यायला लागला. दोन्ही मुलं आलटून पालटून सिगारेट ओढत बसून राहिली.
‘‘साल्यांनो, लाज नाही वाटत? एकटे ओढता काय?’’ मागून आवाज आला.
एक बुटका मुलगा मागून उडी मारून बाकावर बसला. रमेशच्या हातातली सिगारेट काढून त्यानं आपल्याकडे घेतली आणि डोळे मिटून एक मोठा झुरका घेतला. ‘‘काय चाललंय मूर्खांनो?’’ तो म्हणाला.

‘‘टिंग्या, जातोस का? फूट!’’ मिहीर चिडून म्हणाला.
टिंग्यानं भुवया उंचावून रमेशकडे बघितलं. रमेशनं रस्त्याच्या पलीकडे कटाक्ष टाकला आणि मान हलवली.
‘‘आज अजून आली नाही.’’ तो म्हणाला, ‘‘नोट्स आणल्यास का?’’
‘‘हो.’’ टिंग्या म्हणाला आणि त्यानं बॅगेतून एक झेरॉक्स कागदांचं बंडल काढलं आणि रमेशकडे दिलं.
‘‘कधी आहे टेस्ट?’’ मिहीर म्हणाला.
‘‘सतरा…’’ टिंग्या म्हणाला.
‘‘बोंबला! मागचा आठवडा असाच गेला. काही सुचतच नाही यार.’’ मिहीर म्हणाला, ‘‘तिच्याशिवाय काही दिसत नाहीये.’’
‘‘अरे, तसंही इथे खपून काय करायचं. पुढचं एक वर्ष- बारावी- मग झूऽऽम- यूएस- बास!’’ रमेश म्हणाला.
‘‘टेन्शन आलंय यार.’’ मिहीर म्हणाला, ‘‘माझं काही खरं नाही.’’
रमेश आणि टिंग्या बोलायचे थांबले.
‘‘मिहीर…’’ तो म्हणाला. मिहीर काही न बोलता बाजूला जाऊन उभा होता.
‘‘किती वाजले?’’ तो म्हणाला.
‘‘साडेचार.’’ रमेश म्हणाला.
‘‘अरे यार, विसरलोच.’’ टिंग्या म्हणाला आणि त्यानं खिशातून एक पेनड्राईव्ह बाहेर काढला. ‘‘हे बघ, सगळं विसरशील.’’ तो डोळा मारत म्हणाला. रमेशनं पेनड्राईव्ह पटकन ओढून घेतला.
‘‘तू बघितलीस?’’ तो म्हणाला. टिंग्यानं दोन्ही कानांना हात लावला. ‘‘बॉस! बघ तू.’’ तो जीभ बाहेर काढत म्हणाला.
‘‘मिह्या…’’ रमेशनं हाक मारली. मिहीरचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं.
‘‘मिह्या…’’ रमेश जोरात म्हणाला. मिहीर वळला. ‘‘तुला आधी पाहिजे का?’’ रमेश म्हणाला.
‘‘गप्प बसा रे.’’ मिहीर एकदम भडकला. ‘‘काल दिसली नाही ती. रात्रभर झोप नाही. इथे आलो तरी पत्ता नाही. साला…’’ तो चिडून एका दगडाला लाथ मारत म्हणाला. ‘‘तुम्ही एंजॉय करा लेको. बघा, आणखीन बघा.’’

पुढे कंपाऊंडजवळ जाऊन तो उभा राहिला. थोडा वेळ घराकडे बघत तो उभा राहिला. मग केसांतून हात फिरवत तो वळला आणि परत बाकावर येऊन खाली मान घालून बसला.
दोन्ही मित्र सहानुभूतीनं त्याच्याकडे बघत उभे राहिले. दोन महिन्यांपूर्वी बागेत स्वाती दिसल्यापासून त्यांच्या मित्राची अवस्था ते बघत होते. बागेत ऐकलेलं तिचं नाव आणि तिचं घर त्यांनीच मिहीरला सांगितलं होतं.
दोघांनी एकमेकांकडे बघून मान हलवली आणि रस्त्यापलीकडे घराकडे बघितलं.
अचानक रमेशनं टिंग्याचा खांदा दाबला. घरातून एक लांब वेणी आणि साडी नेसलेली बाई बाहेर अंगणात आली होती.
‘‘मिह्या…’’ रमेश जोरात म्हणाला. मिहीरनं वर बघितलं. रमेशनं तिच्या घराच्या दिशेनं मान हलवली.
‘‘मिह्या… जा, पटकन. विचार तिला.’’ तो म्हणाला.
‘‘कुणाला?’’ मिहीर म्हणाला.
‘‘अरे, ती बाई बघ, घरातून बाहेर आलीये. जा पटकन. विचार. कळेल तरी.’’
‘‘येडा आहे का तू रम्या?’’ टिंग्या म्हणाला, ‘‘ती का याला सांगेल?’’
‘‘ओके, इथे असं बसण्यापेक्षा जा, कॅज्युअली विचार. एखादवेळेस सांगेल पटकन.’’
‘‘काहीही सांगतोस रम्या… आणि हा तिथे जाऊन…’’ टिंग्या म्हणाला.
मिहीर अचानक उठला. ‘‘अ‍ॅक्च्युअली रम्या, यू आर राईट. मला काही सुचत नाहीये. सालं कळेल तरी…’’ तो म्हणाला.
‘‘अरे, पण…’’
‘‘आलोच.’’ मिहीर म्हणाला आणि बागेच्या समोरच्या गेटच्या दिशेनं पळाला.

कंपाऊंडच्या समोरच्या भगदाडातून तो बाहेर पडला आणि सायकल घेऊन जोरात चालवत बागेला वळसा घालून मागच्या रस्त्यावर आला.
रमेश आणि टिंग्या कंपाऊंडजवळ येऊन उभे होते. मिहीरनं त्यांच्याकडे बघितलं. मित्रांनी त्याला अंगठे वर करून चीअर केलं.
मिहीरनं घराच्या समोर सायकल पार्क केली. तेवढ्यात कामवाली बाई गेट उघडून बाहेर आली.
मिहीर एकदम धाडस करून पुढे झाला. ‘‘एक मिनिट…’’ तो चिरक्या आवाजात म्हणाला.
बाई थांबली. मिहीरनं घसा खाकरला. ‘‘अं… स्वातीताई आहेत का?’’ तो आवंढा गिळत म्हणाला.
‘‘स्वातीताई?’’ बाई म्हणाली. ‘‘हं, माझी… माझी बहीण… मैत्रीण आहे त्यांची. जरा निरोप द्यायचा होता.’’ मिहीर म्हणाला.
बाई काहीच बोलली नाही. ‘‘क्लास… क्लासचा निरोप… महत्त्वाचा आहे.’’ मिहीर धडधडत्या छातीनं म्हणाला.
बाईनं त्याला एकदा न्याहाळलं. ‘‘स्वातीताई उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे आल्या होत्या. दोन महिने. परवा रात्री मुंबईला परत गेल्या.’’ ती म्हणाली.
स्तब्ध उभ्या राहिलेल्या मिहीरकडे तिनं एक नजर टाकली आणि मग झपाझप चालत ती रस्त्याच्या पुढे निघून गेली.

– डॉ. स्मृती प्रधान

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.