Now Reading
यशो

यशो

Menaka Prakashan

पायात गोळे येऊन थकून यशो सोफ्यावर कलंडली. तिनं डोळे मिटले. तिच्या लक्षात आलं, सॅनिटरी नॅपकीन्स संपलेत. या वेळेला पाळी पाच दिवस अगोदर सुरू झालीये. तिला रागच आला त्याचा. तिची पाळी चुकवायला सिद्धार्थ घरी कुठे होता, दुःखाचं निदान करायला बाहेर पडला होता.
रात्रीचे साडेअकरा वाजलेत. ‘आत्ता कुठलं मेडिकल उघडं असेल?’
मेडिकलवाला सूचक हसला, तेव्हा ‘‘नाही… नाही whisper हवंय,’’ असं झोपाळलेल्या डोळ्यांनी तिनं सांगितलं. गाडीतलं पेट्रोल संपलं होतं, त्यामुळे चालतच यावं लागलं होतं.

तिला जाणवलं, कुणीतरी पाठलाग करतंय. अर्थात ती घाबरली. पर्स घट्ट पकडून चालत राहिली. ‘तो मघाचा मेडिकलवाला नसेल ना…’
ती थांबली, की सावलीही थांबत होती, तिच्या गतीशी संधान साधत होती. ती आणि सावली अपार्टमेंटच्या पायर्‍या चढू लागली. आणि… यशो स्वस्थ झाली. श्वास ऐकू येईल इतका तो तिच्या जवळ आला होता. तिनं मागे वळून पाहिलं नाही. तो आत आला. सगळं जसंच्या तसं होतं, तो सोडून गेला होता तसं.
ती म्हणाली, ‘‘तुला मी सिद्धार्थच म्हणणार आहे.’’
‘‘मलाही तेच आवडेल.’’ त्यानं तिच्याकडे न बघता उत्तर दिलं.
बाल्कनीजवळच्या त्याच्या आवडत्या खिडकीत तो जाऊन बसला, पाय मोकळे सोडून बाहेर बघत. ती कितीतरी वेळ नुसतीच त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिला राहवेना…
‘‘तुला मला जवळ घ्यावंसं वाटत नाहीये?’’
‘‘सॉरी! नाही.’’ तो तिची नजर चुकवत म्हणाला, पण अपराधभावाची एक छटा बोलण्यात बहुदा असावी.
‘‘हं… तू तरी काय करणार म्हणा तुझा ‘साक्षात्कारी निःसंग’ झालाय ना.’’
‘‘यशो, टोमणा मारू नकोस प्लीज.’’
‘‘ ‘यशो!’ wow… कित्ती दिवसांनी… कॉफी पिणार?’’
‘‘मी करतो.’’
‘‘तुला जमेल?’’
त्यानं फक्त एक लूक दिला तिला आणि किचनकडे गेला. तेवढ्या वेळात आतली जाणीव होऊन ती पर्स घेऊन बाथरूममध्ये गेली.
‘‘यशो, कॉफी कुठे ठेवलीये?’’
‘‘अरे, enlightenment नं शोध की.’’
तिच्या या वाक्यावर ‘आता तर कॉफी शोधलीच पाहिजे’ अशा हट्टाला पेटून त्यानं कॉफी तयार केली. तो कॉफीचे मग घेऊन हॉलमध्ये आला, तेव्हा ती त्या बाल्कनीजवळच्या खिडकीत बसली होती.
‘‘तसं काय करतीयेस?’’
तिनं खोल श्वास घेतला.
‘‘तुझा गंध तसाच आहे अजून.’’
‘‘तू आल्यापासून seduce काय करतीयेस?’’
‘‘चिडतोस कशाला? अरे, enlightenment….’’

यावर त्यानं पुन्हा जो काही लूक दिला, त्यावर त्याच्यावरची नजर अजिबात न हलवता कॉफीचा घोट घेत ती म्हणाली, ‘‘तसाच आहेस अजून… तिखट.’’
‘‘तुला चव आठवते माझी अजून?’’
‘‘तुलाच तर चाखलंय.’’
त्यानं कॉफी संपवून मग कुठेतरी ठेवून दिला.
‘‘मी कशीये रे चवीला?’’
‘‘आठवत नाही… म्हणजे खरंतर मला माहीत नाही.’’
ती बराच वेळ खिडकीच्या बाहेर पाहत बसली. त्यानं जरा अडखळत विचारलं, ‘‘तुला नाही सांगितलं कुणी…’’
‘‘काय?’’
‘‘तुझी चव.’’
‘‘तुझ्याव्यतिरिक्त कोण सांगणार?’’
तो विनाकारण सुखावला.
‘‘आता मला माझी चवच कधी कळणार नाही, कारण इथून पुढे तू माझ्यासोबत कधी झोपशील का… संभोगाचं कसं असतं ना की…’’
‘‘आपण इतर काही बोलूया का?’’
‘‘असो, तू काही माझी, किंवा राहुलची चौकशी करायला आलेला नाहीस. तर मूळ मुद्द्यावर येऊया. काही झालंय का?’’
‘‘तू कसं ओळखलंस?’’
‘‘तुला इतकी जगलीये ना मी. तुमचं असतं ना ते ‘अद्वैत’ वगैरे… ते सहज होऊन जातं माझ्याकडून. I can’t help it…’’
हे ऐकून तो मटकन खालीच बसला. ती एकदम त्याच्याजवळ गेली.
‘‘काही होतंय का? पाणी आणते.’’
‘‘नाही, नको. इथेच बस.’’
‘‘तू प्लीज बोलून मोकळा हो.’’
‘‘यशो, ते अजिंठा लेणं उभं करताहेत ना…’’
‘‘हं…’’
‘‘तिथे एक शिल्प कोरणार आहेत.’’
‘‘हो, मला माहितीये तुझ्या लेण्यांबद्दल.’’
‘‘त्यात तू आणि राहुल असं एक शिल्प ते करणार आहेत.’’
‘‘बरं… आम्ही नकोय का तुला त्यात?’’
‘‘नाही, तसं नाही…’’
‘‘मग?’’
त्याला बोलवेना…
‘‘अगं, त्यात मी खूप मोठा म्हणजे फारच मोठा उंचीनं आणि तुम्ही दोघं छोटे, असं सुचलंय त्याला.’’
‘‘मला काही कळत नाहीये… पण तुला काय माहीत त्याला सुचलेलं?’’
तो अडखळत म्हणाला, ‘‘अगं, ते नाही का enlightenment….’’
‘‘ठीकंय ना मग… एवढं काय त्यात…’’
‘‘तुला नाही फरक पडत, पण मला पडतो गं.’’ हे म्हणताना त्याचा चेहरा पाहून तिला भडभडून आलं.

‘‘आई, मी स्कूल युनिफॉर्ममध्ये पोझ दिलेली चालेल ना?’’ राहुलनं विचारलं.
‘‘हो.’’ आरशात साडीचा पदर सारखा करत ती म्हणाली.
प्रचंड असा ‘तो’ आपली पोझिशन सांभाळत दारात उभा आहे, चेहर्‍यावर स्मित टिकवण्याचा आटापिटा करत आणि चिमुकले यशो आणि राहुल उंबरठ्यावर उभे राहिले.
‘‘आई, नुसतं उभं राहायचंय?’’
‘‘हो.’’
‘‘हे कोण आहेत?’’
‘‘एक दुःखी माणूस.’’
‘‘काय झालं त्याला?’’
यशोच्या आतड्याला पीळ पडला…
‘त्याच्या विचारांचा ‘धर्म’ झालाय रे.’

– माधवी वागेश्वरी

View Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published.

© 2019 Menakaprakashan. All Rights Reserved.
Website Designed & Developed by Lets Webify

Scroll To Top
error: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.